* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वैज्ञानिक जीवन सत्य उलगडणारे पुस्तक जादूई वास्तव (द मॅजिक ऑफ रिॲलिटी)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

वैज्ञानिक जीवन सत्य उलगडणारे पुस्तक जादूई वास्तव (द मॅजिक ऑफ रिॲलिटी) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैज्ञानिक जीवन सत्य उलगडणारे पुस्तक जादूई वास्तव (द मॅजिक ऑफ रिॲलिटी) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६/९/२२

वैज्ञानिक जीवन सत्य उलगडणारे पुस्तक जादूई वास्तव (द मॅजिक ऑफ रिॲलिटी)

लेखक ज्या हेतूने एखादे पुस्तक लिहितो,ज्या आत्मीयतेने लिहितो त्या आत्मीयतेने वाचकाने ते वाचले पाहिजे. बरं ज्या भाषेत ते लिहिले आहे नुसती ती भाषा येऊन चालत नाही. कारण बोलीभाषा आणि लिखित भाषा याच्यात बरेच अंतर असते. कानावर पडणारी भाषा आणि डोळ्यासमोर येणारी भाषा यात महदंतर असते. एक औटघटकेची असते. तिच्यात क्षणाक्षणाला बदल होत असतात. ती आपण आवाज आणि जिभेच्या सहाय्याने शिकतो. त्याबाबतीत आपल्यात आणि जनावरांमध्ये फारसा फरक नाही कारण ती आपण आपल्या आईकडून नकळत उचलतो. दुसरी मात्र बरीच परिपक्व असते,अनुभवसिद्ध असते.पहिली जर आपली मातृभाषा असेल तर ही पितृभाषा आहे असे म्हणावे लागेल.


आपण शारीरिक आजारांवर पैसे खर्च करतो पण मानसिक आजारावर नाही किंवा असे म्हणूया की मानसिक आजार होऊ नये म्हणून कसलीही उपाययोजना करीत नाही. वाचन हा त्या उपाय योजनेचा एक भाग आहे.एखादा पूल बांधला नाही तरी चालेल. आपण नदीला वळसा घालून जाऊ शकतो. पण ज्या अज्ञानाच्या लाटांनी आपल्याला वेढले आहे, ती अज्ञानाची खाई पार करण्यासाठी सगळे मिळून त्याच्यावर एखादी तरी कमान बांधूया !..


प्रकाशाचा वेग इतका प्रचंड आहे की सहसा घटना घडल्याक्षणीच आपल्याला दिसलेली आहे असे आपण समजतो. पण दूरदूरच्या ताऱ्याकडून येणाऱ्या प्रकाशांच काय? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहचायला आठ मिनिटे लागतात.म्हणजे उद्या सूर्याचा स्फोट झाला. तर या सत्याची जाणीव होईपर्यंत मधे आठ मिनीटं गेलेली असतील ! पण तोपर्यंत आपण संपलेले असू सूर्यानंतर आपल्याला जवळचा तारा म्हणजे प्रॉक्झिमा सेंटॉरी.! याच्याकडून येणारा उजेड आपल्या पर्यंत पोहोचायला चार वर्षे लागतात.( म्हणजेच हा आपल्या पासून चार प्रकाशवर्ष दूर आहे ) आज (२०१६ दुर्बिणीतून दिसणारं त्याचं रूप हे २०१२ सालीचं असणार आहे. आपण मिल्की वे नावाच्या आकाशगंगेच्या किनारी राहतो. आकाशगंगा म्हणजे तारकांचे पुंजके.आपल्या सगळ्यात नजीकची आकाशगंगा आहे.


ॲण्ड्रोमेडा,अडीच कोटी प्रकाशवर्ष दूर ! म्हणजे आज इथून दिसणारी ॲण्ड्रोमेडाची छबी ही तिची अडीच कोटी वर्षापूर्वीची अवस्था आहे तर. म्हणजे काळयंत्रात बसून उलटा प्रवास केल्यासारखं आहे हे.


हबल दुर्बिणीतून आपल्याला स्टीफनची पंचकडी नावाची,एकमेकांसी टकरा घेणाऱ्या पाच आकाशगंगाची मालिका दिसते. पावणेतीन कोटी प्रकाश वर्ष अंतरावर आहे ही.आज जे आपल्याला दिसतयं ते तिथे पावणेतीन कोटी वर्षांपूर्वी घडलं होतं.तिथे जर कुणी परग्रहवाशी असतील आणि जर त्यांच्याकडे शक्तिशाली दुर्बीण असेल आणि आज त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं तर त्यांना आपण नाहीच दिसणार,त्यांना दिसतील पावणेतीन कोटी वर्षांपूर्वीचे आपले 'डायनासोर भाईबंद'


अचंबित करणारे हे वास्तव कथन वाचून मी किती क्षुद्र जीव आहे याची मला प्रखरपणे जाणीव झाली.


तुम्हाला आश्चर्य वाटेल पण "पहिला"असा कुणी माणूस नव्हताच. कारण ज्याला "पहिला" म्हणाव, त्याला आई-बाप असणारच आणि तेही 'मानव' असणार ! माणसाचंच कशाला,सशांचही असचं आहे. पहिला ससा, असा कधी नव्हताच, ना होती पहिली मगर, ना होता पहिला चतुर, जन्मलेला प्रत्येक जीव आप-आपल्या आई-बाबांच्याच जातीचा (Species) होता. (काही अति दुर्मिळ अपवाद येथे जमेस धरलेले नाहीत.) आई- बाबांसारखा होता म्हणजे आजी-आजोबांचा सारखा असणारच,म्हणजे पणजोंबासारखाही असणार तो.असं मागे मागे अखंडपणे चालूच.जीवशास्त्र असं शिकवतं की होमो सेपियन आणि होमो इरेक्टस यांचा संकर होऊ शकत नाही.हे विज्ञान सत्य समजलं


आपले पुरातन पूर्वज होते कोण आणि कसे हे कळलं कसं आपल्याला? जीवाश्मावरून जीवाश्म हे 'अश्म' म्हणजे दगड असतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आकारात आपोआप तयार झालेले हे दगड,बहुतेक जीव जीवाश्म न बनताच नष्ट पावतात. जर तुम्हाला जीवाश्म बनायचे असेल तर सुयोग्य अशा मातीत, गाळात तुम्ही मरायला हवं. ह्या गाळाचे खडक (स्तरीय खडक) होतील तेव्हा तुम्ही जीवाश्म व्हाल... ह्या ठिकानी मी अंगभर शहारलो.


आता आपण जाऊ प्राण्यांच्याकडे अनेक मिळत्याजुळत्या प्रजातींची एक 'फॅमिली' (कुटुंब) बनते.'Felidac' ही मार्जार फॅमिली. यामध्ये आहेत सिंह, बिबटे, चित्ते, वाघ आणि (वाघाची मावशी) मांजरे वगैरे. अनेक फॅमिल्या मिळून बनते एक 'ऑर्डर' (गण) कुत्र, मांजर, अस्वल, मुंगूस, तरस हे सारे कार्निव्होरा ह्या 'ऑर्डर' चे पण वेगवेगळ्या फॅमिलीचे 'प्रायमेट' ही सुद्धा एक ऑर्डरच आहे. यात 'एप्स' आहेत. (आपण एप्सचा उपप्रकार म्हणून आहोत.),माकडे आहेत, लेमूर माकडे आहेत; असे भिन्न भिन्न फॅमिलीतील भिन्न प्राणी आहेत. अनेक ऑर्डरचा मिळून 'क्लास' (प्रगण) होतो. सर्व सस्तन प्राणी हे 'मॅमेलीया' ह्या क्लासचे आहेत.ही माहिती वाचून माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती.


आता विश्व माझ्याशी बोलत होते. विश्व बनलं आहे अणूंचं. सोन्याचा अणु हा सोन्याचा सर्वात छोटा तुकडा. हा पुढे विभागाला तर आता त्यात सोन्याचे गुणधर्म राहणार नाहीत. जी गोष्ट सोन्याची तीच लोहाची, आणि इतर मूलद्रव्यांची. एकाच प्रकारच्या अणूनी बनलेल्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. लोह,तांबे सोनं,चांदी यासारखे धातू ; ऑक्सिजन,हायड्रोजन,नायट्रोजन यासारखे वायूही मूलद्रव्यं आहेत.मॉलीब्डीनम् हे अगदी दुर्मिळ मूलद्रव्य आहे. इतक की कदाचित तुम्ही हे नाव ही ऐकलं नसेल. पण ते दुर्मिळ आहे इहलोकी, पृथ्वीवर. विश्वात इतरत्र ते विपुल प्रमाणात आढळतं. अशी सुमारे १०० मूलद्रव्य आहेत. पैकी निसर्गत: ९० आढळतात. बाकीची अगदी अल्प प्रमाणात,निव्वळ कृत्रिमरीत्या निर्माण केलेली आहेत.


पृथ्वीवर मिथेन (गोबर गॅस) हा वायूरूप आहे. पण शनीच्या, टायटन नामे उपग्रहावर, इतकी थंडी आहे की हा गॅस तिथे द्रवरूपात आहे. गोबरगॅसचे समुद्र आहेत तिथे. आणखी थंड ग्रहावर गोबरगॅसचे खडक असणेही शक्य आहे. पारा हा आपल्याला द्रव्य म्हणून माहित आहे. पण टुंड्रा प्रदेशाच्या थंडीत पार्‍याचा दगड व्हायला वेळ लागणार नाही.घनरूप लोखंड तापवलं तर त्याचा रस होतो. पुरेशी उष्णता दिली तर त्याची वाफही होईल. पृथ्वीच्या पोटात खोल खोल इतके उच्च तापमान आहे की तिथे लोहाचा (आणि निकेलचा) रसच आहे. कुणी सांगावं, एखादा अतितप्त ग्रह असेल सुद्धा, त्याच्यावर लोखंडाचे रसाचे सागर उसळत असतील आणि यात सुखाने पोहणारे काही जीवही असतील.!


असे या पुस्तकातील पानापानावर मला नवीन आश्चर्यकारक सत्य धक्के बसत होते.


सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेला जात नसून पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्यभ्रमणाचा आभास फक्त निर्माण होतो. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते आहे. आस म्हणजे जणू उत्तरध्रुवा पासून दक्षिण ध्रुवापर्यंत आर पार जाणारा एक दांडा आहे असं समजायला हरकत नाही. या भोवती पृथ्वी फिरते आहे.फिरताना पृथ्वीला धक्के बसत नाही तर,त्यामुळे ती फिरते आहे हे लक्षात येत नाही. पृथ्वी फिरते, तिच्यावरचे आपण फिरतो,आपल्या भोवतीचं वातावरण ही त्याच गतीनं फिरत असतं. तसं नसतं तर पृथ्वीच्या वेगाने वाहणारे, म्हणजे ताशी काही हजार किलोमीटरने वाहणारे वारे आपल्याला सतत जाणवले असते. हे अर्थात विषुववृत्तापाशी,जसे जसे आपण ध्रुवांकडे सरकतो तसा तसा पृथ्वीचा वेग कमी होतो. ध्रुवांजवळ आसाभोवती एक चक्कर मारायला तास चोवीसच, कापायचं अंतर कमी. विषुववृत्तापाशी केवढी तरी मोठी चक्कर,ध्रुवाजवळ अगदी छोटी चक्कर,यामुळे ध्रुवाजवळ पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी असतो. पृथ्वी एका लयीत फिरत असते (धक्के नाहीतच) आणि वातावरणही तिच्याबरोबर फिरत असतं, त्यामुळे आपण फिरतोय हे आपल्याला जाणवतच नाही एखाद्या स्थिर वस्तूकडे बघितलं (रेल्वेतून प्लॅटफॉर्मकडे) तरच आपली हालचाल आपल्याला समजेल. अशा स्थिर वस्तू म्हणजे सूर्य आणि तारे पण आपल्याला वाटतं,हिच मंडळी आभाळात घिरट्या घालत आहेत.आपण स्थिर आहोत आणि प्लॅटफॉर्म सरकायला लागला आहे, असं समजण्यासारखं आहे हे. दृष्टीभ्रम तो हाच.. अशा अनेक वैज्ञानिक अवघड गोष्टी मला सरळ साध्या भाषेमध्ये दाखवलेल्या दिसत होत्या. काही काही वेळा मी अवकाश प्रवास केल्यासारखे मला जाणवत होते.


कथेनुसार दक्षिण आणि मध्य अमेरिकेत, स्पॅनिश पोहोचण्यापूर्वी (सोळाव्या शतकापूर्वी), इंका,अझ्टेक (मायन संस्कृती नंतर मला नवीन समजलेली संस्कृती) अशा महान संस्कृती नांदत होत्या. हे सारे लोक सूर्योपासक होते.ॲन्डीजनिवासी इंका लोक स्वतःला चंद्र-सूर्याचे वंशज समजत. मेक्सिकोतल्या ॲझ्टेक संस्कृतीत आणि त्याहीपूर्वी माया संस्कृती, सूर्यदेव आहेच. 


सूर्याला खूष करण्यासाठी विविध बळी, भोग, प्रसाद, हवि, नैवद्य दाखवले जायचे. पण सूर्य देवाचा लाडका नैवद्य म्हणजे ताजंताजं, अजूनही फडफडणारं, मानवी ह्रदय,लढाया व्हायच्या त्या मुख्यत्वे युद्धबंदी मिळवण्यासाठी, म्हणजे मग एकेक करून त्यांचं हृदयार्पण करणं सोप्प. पिरॅमिडच्या टोकाशी, एका उंच उंच वेदीवर हा ह्रदयार्पण सोहळा चालायचा. सूर्याच्या तेवढंच जवळ, ॲझ्टेक, माया आणि इंका संस्कृतीत हे पिरॅमिड बांधायचे तंत्र चांगलंच विकसित झालं होतं. 


सूर्य हा तारा आहे. इतर अनेक ताऱ्यांप्रमाणे हा एक,फक्त आपल्या खूपच जवळ आहे. नुसता जवळ नाही अगदी खेटूनच आहे आपल्याला,त्यामुळे तो आपल्याला इतर सूर्याच्या मानाने खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो. तो जवळ असल्यामुळे त्यांची तीव्र उष्णता आपल्याला भाजून काढते, कडक उन्हाने रापून जाते त्वचा, थेट त्याकडे पाहिलं तर डोळे जातात आपले,इतरांपेक्षा जवळ म्हणजे किती जवळ, ह्याच आकलन होणे अवघड आहे. विश्वाच्या पसाऱ्याचं आकलन,अवघड नाही अशक्य आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा या सूर्याला माझा बसल्या ठिकाणाहून नमस्कार


साडेतीनशे वर्षांपूर्वी न्यूटनने असं पाहिलं की पांढरा रंग म्हणजे सप्तरंगाचे मिश्रण आहे. (या सप्तरंगासारखं न्यूटनचं कर्तुत्व ही सप्तरंगी आहे) वर्णपटाबरोबरच त्याने इतर अनेक शोध लावले कल्पना मांडल्या.


 प्रकाश म्हणजे भौतिक शास्त्राच्या दृष्टीने सर्व रंगाचे मिश्रण,हवेतून काचेत शिरताच प्रकाश किरण वाकतात, ह्याची ही किमया,कोणत्याही पारदर्शक पदार्थातून आरपार जाताना,अगदी पाण्यातूनही जाताना प्रकाश किरण वाकतात. त्यांचे अपवर्तन होते,अपवर्तनामुळे पाण्यात बुडालेला वल्ह्याचा भाग वाकलेला भासतो. याठिकाणी मला इंद्रधनुष्याचे रहस्य समजले. मनाला एक चैतन्य उभारी आली.


प्रत्यक्षात आपल्याला दिसणारे सारे रंग सूर्यप्रकाशात असतात आणि सारेच आल्याला दिसतात. न्यूटनने हे दाखवून दिलंच आहे. आपल्याला दिसू शकतात,पण अजून दिसले नाहीत,असे रंगच नाहीत.चित्रकारांनी कितीही निरनिराळ्या छटा वापरल्या, नवीन नवीन वापरल्या तरी सुर्यप्रकाशात त्या आहेतच. प्रत्येक रंघ

छटा म्हणजे विशिष्ट तरंग लांबीचा प्रकाश लाल,पिवळा,निळा ही त्या त्या तरंगलांबीला आपण दिलेली नाव, दिसू शकणारे सगळे रंग इये 

पृथ्वीचीये नगरी,आपल्या आसपास मौजुद 

आहेत. ग्रह ताऱ्यांकडे उधळायला आता आणखी रंग नाहीत. 


ताऱ्यांचाच का, इथलाही निरनिराळ्या स्तोत्रांकडून येणारा प्रकाश अभ्यासला तर निरनिराळे बारकोड दिसतात कोणत्या मूलद्रव्यांकडून हा प्रकाशयेतोय  यावर हे यावर हे अवलंबून आहे. प्रत्येक मूलद्रव्याचा प्रकाशाचा बारकोड निराळा.सोडियमपासून येणारा उजेड पिवळा असतो. (सोडियमच्या वाफेत विजेचा लोळ सोडला कि ती निळी प्रकाशमान होते. आपण रस्त्यावर सोडीयम पेपर लॅम्प वापरतो त्यातूनही पिवळा प्रकाश येतो.) पिवळ्या पट्ट्यात मधूनच काळ्या रेघा उमटलेल्या दिसतात. असं का याचं उत्तर क्कांटम थिअरीत आहे म्हणे,पण मलाही ते नीट उमगलेलं नाही. मी आहे जीवशास्त्रज्ञ,(रिचर्ड डॉकिन्स) आणि हा तर भौतिकशास्त्राचा प्रदेश.ही सत्याची स्पष्ट कबुली मला जीवनात बरंच काही सांगून गेली.


आवाजाच्या लहरींचा वेग ठरलेला असतो. आवाज बेडकाचा असो, बिगुलाचा असो वा बोलण्याचा असो, वेग तोच. आवाज कुणाचा? हा प्रश्न इथे गैरलागू. हवेत वेग असतो ताशी १२३६ कि.मी... पाण्यात हा चौपट होतो आणि काही घन पदार्थाच्या याहीपेक्षा जास्त असतो. हा आवाजाचा वेग पाहून मी अचंबित झालो आणि पुढील प्रकरणाकडे मी आपसूकच आलो.


कधी तरी असं होतं की जाग तर येते,पण स्नायू मात्र लुळे ते लुळेच राहतात. याला म्हणतात स्लिप पॅरॅलीसीस. भयप्रदच अनुभव हा. आपण जागे असतो. सगळं दिसत असतं, ऐकू येत असतं, पण हालचाल अजिबातच करता येत नाही. कधी या अवस्थेत भयानक भास होतात. काहीतरी जीवघेणा प्रकार आहे, काय ते कळत नाहीये असं वाटायला लागतं. स्वप्न आणि जाणिवेच्या सीमेवर झुलत राहतो आपण. कधी भास व्हायला लागतात. हे आभासी जग अगदी खरंखुरं वाटायला लागतं. मानसशास्त्रज्ञ स्यु ब्लॅकमोर यांच्या मते स्वप्न - वास्तवाच्या सीमारेषेवरच्या भासांच कारण,स्लीप पॅरॅलिसीस हेच आहे. माझ्यासाठी ही माहिती संपूर्ण नवीन होती.


भूकंप म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याआधी आपल्याला ( प्लेट टेटॉनिक्स ) भुकवच आणि त्याच्या हालचालींची माहिती करून घ्यावी लागेल. यासोबतच शतकभरापूर्वी,आल्फ्रेड वेगेनेर ह्या जर्मन शास्त्रज्ञाने, खंड सरकतात अशी एक बंडखोर कल्पना मांडली. बऱ्याच जणांनी त्याला वेड्यात काढलं प्रचंड गलबतासारखे खंड हलत असतात असे त्याने सुचवले. वेगनरच्या मते आफ्रिका, दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे सारे खंड आधी एकत्र होते. पुढे ते सरकत सरकत लांब लांब गेले. वेगेनेरची भरपूर चेष्टा झाली. पण अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं. व जे हसले त्यांचे दात दिसले. हा नवीन सिद्धांत मला बदलाची व समजून घेण्याची जाणीव देऊन गेला.


 तो जर सुखकर्ता, तर मग विघ्नाची का वार्ता यामध्ये तर जर घोटाळा किंवा काही गोची व्हायची असेल तर ती होतेच' हा मर्फीचा मजेशीर नियम जगप्रसिद्ध आहे."लोणी लावून टाकलेला ब्रेडचा स्लाईस नेमका लोण्याच्या बाजूलाच जमिनीवर पडतो", हाही मर्फी चा आणखी एक नियम मला खुपचं भारी वाटला. मर्फीच्या नियमाचे आणखी एक उदाहरण नाणेफेकीमध्ये आपल्याला जेव्हा काटा हवा असेल तेव्हा नेमका छापा पडतो याला तुम्ही निराशावादी नियमही म्हणू शकता आशावादी म्हणतील जबरदस्त इच्छा असेल तर नाणे तुमच्या मर्जीप्रमाणे पडेलच पडेल. त्याच बरोबर डॉ.पंग्लोस यांच्या म्हणण्यानुसार " या चांगल्या जगात सदैव चांगले तेच घडत असतं,अशी त्यांची खात्री होती. हे विस्ताराने समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचल पाहिजे.


शेवटी निसर्गात भलंबुरं जे जे घडतं ते ते साधारण समप्रमाणात घडत असतं.नया विश्वाला ना मन आहे, ना जाणीव,ना व्यक्तिमत्व.त्यामुळे तुम्हाला व्यक्तीश: खुश करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात, त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात एवढंच. आपल्याला त्या चांगल्या-वाईट कशाही वाटोत,आपल्या वाटण्यामुळे घटितांची वारंवारता बदलत नाही. हे पचणं खूप कठीण आहे.पाप्यांच्या पदरी वेदना आणि पुण्यवानांना सुखाचं वरदानची कल्पना गोंजारायला खूप खूप सोयीची आहे. पण दुर्दैवाने या विश्वाला तुमच्या सोयीशी काही सोयरसुतक नाही. हे सत्य जीवन तत्व मनापासून स्वीकारलं व त्यापासून मी खूप दूर होतो.हे पुस्तक वाचून,विचाराने आणि तत्त्वाने मी सत्याच्या आसपास आलो हे माझ्यासाठी खूप खूप महत्वपुर्ण आहे.         

       

भक्ष भक्षकांच्या भक्षस्थानी पडतात. तसेच भक्षकही भक्ष्यांना बळी पडू शकतात.हरणाने स्वतःचा जीव वाचवणे म्हणजे सिंहाला उपाशी मारणं आहे. असंच काहीसं परोपजीवी आणि त्यांच्या यजमानांबद्दलही म्हणता येईल शिवाय प्रत्येक जीव,प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या जातीच्या इतर जीवांशी अशी स्पर्धा करत असतो. एक पारड जड झाले की परिणामी,दुसऱ्यात नैसर्गिक निवडीचं जास्तीचं दान पडतं.


तुम्हा सर्वांचा जाताजाता निरोप घेताना एकदा चमत्काराचं लेबल लावलं की शोध संपतो, शोधायची जबाबदारी ही संपते. हे आळसाचं, अप्रामाणिकपणाचं आहे. आज याचा कार्यकारणभाव ज्ञात नाही आणि उद्या ही ज्ञात होणं शक्य नाही,असं मान्य केल्यासारखं आहे हे 'अतिनैसर्गिक'असा शिक्का ही शरणागती आहे, आज याचा बोध होत नाहीये आणि पुढे कधीच होणार नाही असं मान्य केल्यासारखे आहे.


द मॅजिक ऑफ रिॲलिटी

रिचर्ड डॉकिन्स (प्रकाशक विवेक जागर संस्थेसाठी प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे राज्य कार्यवाह,प्रकाशन विभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

जादुई वास्तव-मूळ लेखक रिचर्ड डॉकिन्स,भावानुवाद-

डॉ. शंतनू अभ्यंकर ! एकूण पाने-२०७


आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद


 हे पुस्तक आपल्याला पुन्हा परत लवकरच भेटेन म्हणून सांगत आहे.


माणसाला या विश्वाच्या पसार्‍यात कस्पटाएवढंही स्थान नाही हे. लक्षात आणून देणार आहे. मनुष्यमात्रांचा अहंभाव निखळून पाडणारा आहे. विश्वाचा पसार्‍याप्रती विस्मय वाढवणारं आहे. हाच आहे निखळ वैज्ञानिक सत्याचा चमत्कार. हेच आहे जादुई सत्य..!


ज्यांनी ज्यांच्या पुस्तकातून मला नवीन दृष्टिकोन दिला. त्या लेखकांना "वॉल्डन" मधील चार ओळीतील सत्य नम्रपणे अर्पित करत आहे.


अंतरात्म्यात डोकावून पहा,

हजारो प्रदेश दिसतील मनात


ज्याचा शोध नसेल घेतला कोणी

त्या अज्ञात विश्वाचा शोध घ्या..!


धन्यवाद अल्पशी विश्रांती