" परिणामांची हळुवारपणे जाणीव करून देणारं पुस्तक नरभक्षकाच्या मागावर "
पुस्तके..!
...मनुष्यप्राणी जेवढा काळ या पृथ्वीवर आहे तो मोजला तर त्याच्या ९९ % काळात कोणालाच वाचता येत नव्हते किंवा लिहिताही येत नव्हते. पुस्तकाचा शोध अजून लागायचा होता. स्वतः घेतलेला अनुभव सोडल्यास इतर माहिती आपल्यापर्यंत तोंडीच यायची. आता यात एक तोटा होता. काडेपेटीच्या टेलिफोनशी खेळणाऱ्या मुलांचे उदाहरण घेऊ.जसे जसे मधल्या दोराची लांबी वाढत जाते तसे तसे बोलणे अस्पष्ट ऐकू यायला लागते आणि शेवटी शेवटी सगळे संभाषण गायब होते. तोंडी ज्ञान देण्याच्या पद्धतीत हाच प्रकार होतो. जसा जसा काळ उलटत जातो तसे ते ज्ञान अस्पष्ट होऊ लागते आणि शेवटी नाहिसे होते.
पण पुस्तकांनी हे सगळे बदलले.
इतर वस्तूंच्या तुलनेत स्वस्त असलेली पुस्तकांमुळे आपण गतकालीन घटनांबद्दल अचूक माहिती मिळवू शकतो, त्याची चिकित्सा बऱ्यापैकी कठोरपणे करू शकतो. मनुष्य प्राण्याच्या शहाणपणाचे काही कण वेचू शकतो. इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊ शकतो, नुसत्या सत्ताधारी मंडळींचा नाही तर इतर जणांचाही. आपल्या शिक्षकांशी चर्चा करण्यास पुस्तके मदत करतात आणि निसर्गाचे अंतरंग मोठ्या कष्टाने उलगडणाऱ्या ऋषितुल्य माणसांची ओळख करून देतात. जगातील ज्ञानी - वर्तमानातील आणि भूतकाळातील माणसांची, पुस्तकांमुळेच आपली ओळख होते. पुस्तकांमुळे स्वर्गवासी झालेली माणसे आपल्या कानात कुजबुजतात. पुस्तके आपल्याबरोबर कुठेही सोबत करतात.जेथे आपल्याला समजण्यास वेळ लागतो तेथे पुस्तके सहनशील असतात. ती आपल्यावर ओरडत नाहीत की लाजेने मान खाली घालत नाहीत, आपल्याकडे तिरस्काराने पाहात नाहीत,उलट न समजलेले परिच्छेद आपण कितीही वेळा पाहिजे तितका वेळ घेऊन आपण वाचू शकतो. पुस्तके निर्बुद्ध आणि बुद्धिमान वाचकांमध्ये फरक करत नाही. येथे सगळ्यांना समान संधी आहे. पुस्तके म्हणजे जगाकडे पाहण्याची एक खिडकी आहे जी आपल्यासाठी कायम सताड उघडीच असते. हे विश्र्व समजण्याची गुरुकिल्ली म्हणजे पुस्तके. एवढेच नाही तर समाजातील लोकशाहीमध्ये सुदृढपणे भाग घेण्यासाठी पुस्तके आपल्या मदतीस धाऊन येतात... अशी ही पुस्तके...!
कार्ल सेगन ( अनुवाद - जयंत कुलकर्णी )
जुनी पुस्तके!
जुनी पुस्तके,
उनाड स्वतंत्र पुस्तके,
विस्थापित पुस्तके!
पक्षांच्या थव्यासारखी माझ्या दारी अवतरली.
रंगबिरंगी पिसे असलेली विविध पुस्तके!
त्यांचे प्रकार वेगळे नावे वेगळी!
ग्रंथालयातील शिष्ठ आणि माणसाळलेल्या
पुस्तकात यांची मजा नाही.
या अचानक गवसलेल्या पुस्तकांमध्ये
एखादा जिवापाडाचा मित्र मिळून जातो
आयुष्यभर सोबत करण्यासाठी.
- व्हर्जिनिया वुल्फ
(जसे मला वॉल्डन मिळाले!)
- जयंत कुलकर्णी.
पुस्तकासारखा माझा जिव्हाळ्याचा मित्र नाही. पुस्तकाचा तर मी नेहमीच आभारी आहे. पांढऱ्या कागदांवर काळ्या अक्षराने जे लिहिलं जातं ज्या लेखकांच्याकडून हे महान काम होतं.त्या सर्वांचा त्याचबरोबर प्रकाशकाचांही मन:पूर्वक आभारी आहे. पुस्तकातील हीच काळी अक्षरे माणसाच्या काळोख्या अंधकारमय जीवनातील खडतर वाटेवर प्रकाशमय उजेड पाडून माणसाचे जीवन खर्या अर्थांने सुंदर करतात. अशी पुस्तके नेहमीच माझ्या हाताच्या व हाकेच्या अंतरावर असतात. म्हणूनच मी कधीही 'एकटा' नसतो.
आमचे कोल्हापूरचे एक आदरणीय मित्र संतोष पांचाळ हे नेहमी मला म्हणतात. तुम्ही मला समोर दिसलात की मी श्रीमंत असण्याची जाणीव होते. व ज्या वेळी तुम्ही माझ्यासोबत बसता त्या वेळी खऱ्या अर्थाने मी गर्भश्रीमंत झालो. अश्या उच्चकोटीच्या भावनेने मन भरून जाते. मी त्यांना उलट प्रश्न केला खिशाचा विचार करता मी श्रीमंत कसा? त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मी पुस्तकांसमोर आणखीन नम्र झालो.
या जगावेगळ्या माणसाची पारख असणाऱ्या या व्यक्तीचे उत्तर होतं.'आम्ही पैशाने काहीही खरेदी करू शकतो. त्यातून आम्हाला आनंद मिळतोच. पण तो चिरकाल टिकणारा नसतो. कुठेतरी अपुरेपणा, रिकामापणा आहे. याची प्रखरपणे जाणीव होते. याच्या उलठ तुम्ही तुमचे जीवन जगत असताना.हा अपुरेपणा व रिकामापणा आपल्या जगण्यात नसतो.' अशा या मनस्वी व्यक्तीला नमस्कार..।
काही दिवसापूर्वी राजहंस प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशन केलेले..२०७ पानांचे 'नरभक्षकाच्या मागावर' पुस्तक. केनेथ अँडरसन मुळ लेखक याचा मराठी अनुवाद खूपच प्रेमळ लेखक आदरणीय संजय बापट यांनी केला आहे. यांनी हे मूळ इंग्रजी पुस्तक त्यांच्या आयुष्यात ५० वर्षांपुर्वी वाचले होते. ही माहिती मला त्यांच्याकडूनच मिळाली.तीही थेट अमेरिकेतून ही समिक्षा मी लिहित असताना ते अमेरिकेत आपल्या मुलींच्याकडे गेलेले होते.खूपच मोकळ्या मनाचं व्यक्तिमत्व आतापर्यंत दोनदा त्यांच्याशी सुसंवाद झालेला आहे.
मनोगत किंवा प्रस्तावना हा कुठल्याही पुस्तकातला अपरिहार्य असा भाग असतो. सहसा वाचक यावरून एक ओझरती नजर टाकून पुस्तकाच्या मुख्य भागाकडे वळतात. परंतु माझ्या मते हे मनोगत \ प्रस्तावना वाचकांनी आवर्जून वाचायला हवी. पुस्तक जन्म घेतानाची प्रक्रिया त्यावरून कळते. ते पुस्तक लिहिण्याची उर्मी लेखकाला का व कशी झाली यावर त्याने तुमच्याशी आणि स्वतःशी साधलेला तो एक संवाद असतो. हा त्यांच्यातील प्रामाणिकपणा मला हळवा करून गेला.
जिम कॉर्बेट हे भारतातील एक प्रसिद्ध नाव. जवळपास डझनभर नरभक्षक वाघांना मारणारा शिकारी आणि भारतातील जंगलावर व त्यात राहणाऱ्या साध्याभोळ्या माणसांवर प्रेम करणारा एक सह्रदय माणूस-अशी त्यांची ओळख होती. त्याच्या नावाने उत्तराखंडात नॅशनल पार्कही आहे. याची संपूर्ण कारकीर्द उत्तर भारतात गेली. जिम कॉर्बेटनंतर ३५ वर्षांनी केनेथ अँडरसनचा जन्म झाला. तो ही जिम कॉर्बेट सारखा 'गोरा साहेब' चे होता,परंतु त्यांची कर्मभूमी मात्र दक्षिण भारत होती. त्याने कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ भागातील सुमारे पंधरावीस नरभक्षक वाघांना आणि बिबट्यांना मारून तेथील लोकांना भयमुक्त केले.
केनेथ अँडरसनच्या कथा वाचताना त्याला इथले वन्यप्राणी, वन्य जमाती आणि इथल्या जंगलांबद्दल असलेली आस्था आणि आत्मीयता पदोपदी जाणवते; पण जिम कॉर्बेटसारखं प्रसिद्धीचे वलय मात्र त्याला कधीच लाभलं नाही. किंबहुना तसं हे नावही बहुतेकांना माहीत नाही. या पुस्तकातील महत्त्वाचा गाभा या भोवती फिरत आहे.
आठ नरभक्षक बिबळे (सात नर व एक मादी) आणि सात वाघ (पाच नर आणि दोन माद्या) यांचीच ही चित्तथरारक कथा..
शिकारीच्या अनुभवाने काही गोष्टी स्थिर झाल्या होत्या. पण पहिल्या प्रकरणांमध्ये नरभक्षक होण्यामागची कारणे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेली आहेत. ज्यामध्ये दोन वाघ एक गुराढोरांना मारणारा तर दुसरा खात्रीने नरभक्षक. ती नर-मादीची जोडी असून त्यातल्या एकाला नर माणसाची चटक लागली असावी, अशीही एक शक्यता होती. जर ती तशी असली तर माझ्या उभ्या आयुष्यात मी अशी जोडी पाहिली नव्हती. दुसरी शक्यता म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले व आता वयात आलेले ते बछडे असू शकत होते. पण तसंही नसावं. कारण इन्सनं पाहिलेला वाघ हा मला मोठा होता. हे वाचत असताना या केनेथ अँडरनला प्राण्याच्या संवेदनांची जाणीव होती. याची प्रखरपणे जाणीव होते. अभ्यासपूर्ण विचार, घडून गेलेली घटना, पुढे घडत येणारे घटना यासाठी सहावं इंद्रिय प्रखरपणे काम करत असल्याचा सत्य अनुभव अनुभवास येतो. नरभक्षक वाघिणीला मारुन परिसरातील लोकांना भयमुक्त केल्यानंतर त्या वाघिणीचं कातड सोलताना ती नरभक्षक का झाली असावी, याच एकही कारण त्यांना दिसलं नाही. तो वारसा बहुदा तिच्या मागच्या पिढीतून तिच्याकडे आला असावा. म्हणजेच अनुवंशिकता..!
तिला मारण्यामागचं प्रामाणिक कारण "वाघांचा एकत्र येण्याचा हंगाम नुकताच संपला होता. या वाघिणीचा नर जोडीदार तिच्याबरोबर फार दिवस नसावा,अन्यथा तोही नरभक्षक बनू शकला असता. या वाघिणीला पिल्ले झाली असती, तर तीने खात्रीने त्यांना नरमांस खायला शिकवलं असतं व त्या जिल्ह्यातील ही परंपरा पुढे चालू राहिली असती. म्हणून तिला व इतरांना मारण्यात आले होते." हातात अग्निशस्त्र ( बंदुक ) परवानाधारक शिकारी असूनही गमंत म्हणून कधीही केनेथ अँडरसन त्याने एक ही गोळी मारून जंगलातील शांतता बिघडू दिली नाही. खरंच हा माणूस जंगलातील शांतता जगत होता.
भारतात जंगली कुत्री तीन ते तीसच्या कळपाने राहतात आणि शिकार करतात. म्हैसूर आणि कोइंबतूर इलाख्यात ती मोठ्या प्रमाणात आढळतात. विशेषता कोइंबतूर भागात हे जंगली कुत्र्यांचे कळप हरणाच्या सगळ्या जाती खास करून सांबर आणि चितळांसाठी कर्दनकाळ असतात. ते मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार करतात आणि ही शिकार करताना ते भक्ष्य जिवंत असतानाच त्याचे लचके तोडत त्याला खायला सुरुवात करतात.
याठिकाणी चकवाचांदणं ( एक वनोपनिषद ) या ग्रंथातील नोंद 'एकदा नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीवर असलेल्या हेटरकस्सा या तळ्यावर मारुती चित्तमपल्ली यांनी दीडशे ते दोनशे रानकुत्री असलेला एक गळप पाहिला होता.
या बद्दल एक आठवण सांगताना, एका संध्याकाळी पाच वाजता मी बंगल्यापासून मैलभर अंतरावर होतो ऑर्किड जातीची जरा वेगळीच फुलं मला दिसली,ती मी बघत होतो. तेवढ्यात मला कर्कश्श किंकाळ्या,हंबरल्यासारखा सारखा आवाज आणि डुकरं रेकतात तशा आवाजांचा गोंधळ आला. जंगली कुत्री एखाद्या डुकराचा किंवा अस्वलाचा पाठलाग करत असतील, असं वाटून मी माझी रायफल घेऊन धावलो.मी जेमतेम एक फर्लांग गेलो असेन, कोपऱ्यावर अर्धा डझन कुत्र्यांनी घेरलेली वाघिण धावत आली. एका झाडामागे लपून मी ते नाट्य पाहू लागलो. कुत्र्यांचा वाघिणीभोवती सैलसर वेढा होता. वाघिण जोरजोरात गुरगुरत होती,मधूनच एखादा कुत्रा तिच्या मागून तिला चावला पुढे व्हायचा, त्याला रोखायला ती वाघीण वळली, की वेगळ्या दिशेने अजून एकदोन कुत्रे पुढे सरसावायचे असं करून कुत्र्यांनी तिला सारखं होलतं ठेवलं होतं. त्या वाघिणीची झपाट्याने दमछाक होत होती.
हे जे सगळे चाललं होतं,तेव्हा कुत्री जोरात किंचाळत होती, कारण मला लवकरच कळलं. त्यांचा मुख्य कळप या कुत्र्यांना मदत करायला असेच किंचाळल्याचे आवाज करत धावून येत होता. वाघिणीच्या ही ते लक्षात आलं असावं, कारण सगळा राग एकटवत ती दोन कुत्र्यांवर तुटून पडली.एका कुत्र्याच्या पाठीवर तिच्या पंजाचा जबरदस्त फटका बसून फांदी मोडल्यासारखा आवाज आला त्याचा मणका मोडला होता.दुसरा मात्र उडी मारून मागे पळत कसाबसा वाचला. त्याचा फायदा घेत वाघिण धूम पळत सुटली पण उरलेले पाच कुत्रे तिच्या पाठलागावर निघाले त्याच वेळेस त्यांचा संपूर्ण कळप अत्यंत वेगाने धावत येत त्यांना मिळाला मी त्या कळपात एकंदर २३ कुत्री मोजली माझ्याकडे लक्ष न देता ती सगळी कुत्री धावत निघाली लवकरच सर्व शांत झाले, तिथे मी आणि तो मरून पडलेला कुत्रा वगळता काहीच राहिलं नाही.
वाघावर हल्ला करणाऱ्या त्या कुत्र्यांच्या धाडसाची मला कमाल वाटली. ते नाट्य पाहण्यात मी एवढा गुंतून गेलो होतो की, कुत्र्यांवर किंवा वाघिणीवर गोळी झाडायचं मला सुचलंच नाही.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या जवानांना काल घडलेल्या प्रसंगाचं काय झालं हे शोधायला पाठवलं. ते दुपारपर्यंत वाघाच्या कातडीचे काही तुकडे घेऊन परत आले. त्या कुत्र्यांनी साधारण पाच मैल वाघिणीचा पाठलाग करत तिला एवढं दमवलं होतं की शेवटी ती पूर्णपणे त्यांच्या तावडीत सापडली होती. कुत्र्यांनी त्या वाघिणीचे लचके तोडून तिला अक्षरशः फाडून खाल्लं होतं. त्या खुणांवरून माझ्या माणसाला जे कळत त्यानुसार त्या अखेरच्या लढाईत पाच कुत्री मारली गेली होती. त्यानंतर 'विजयी' झालेल्या कुत्र्यांनी वाघिणीचा फडशा तर पाडला होताच,पण आपल्या मेलेल्या जातभाईंनाही खाल्लं होतं.
माझ्या अज्ञानाचे हे पुस्तक वाचत असताना ज्ञानात रूपांतर होत होते.
एका प्रसगांची नोंद - वाघाला हल्ला केललं आपलं भक्ष्य हलवलं गेलेलं पाहून वाघ बराच वेळ गुरगुरत राहिला. खरं तर तो मृतदेह केवळ पन्नास फुटच हलवला होता.तरीसुध्दा हा मानवी हस्तक्षेप वाघाला मुळीच आवडला नाही. आपण मारून अर्धवट खाल्लेलं भक्ष असं दूर गेलेलं पाहून वाघाला दाट संशय आला.
याठिकाणी हे लक्षात घेण्यासारखा आहे की, वाघ किंवा बिबटे नरभक्षक झाले की ते अत्यंत सावधपणे वागतात आणि त्याच बरोबर जरा भित्रे होतात ती नेहमी एकटा व्यक्तीवर हल्ला करतात तोही आवाज होऊ न देता.दबक्या हालचाली करत आणि आजूबाजूला जवळपास कोणीही नसल्याची खात्री करून माणसाच्या गटावर हल्ला केल्याची जवळपास एक घटना नोंदवली गेली नाही, उलट वाघ हल्ला करताना ऐनवेळी बळीचा कोणी मित्र किंवा नातेवाईक मदत करायला धिटाईने पुढे आला. तर बळीला सोडून वाघ घाबरून पळून गेल्याची मात्र असंख्य उदाहरणे आहेत वाघाच सहावे इंद्रियही अत्यंत तीक्ष्णपणे काम करतं. त्याला निशस्त्र माणूस आणि जाणीवपूर्वक पाठलागावर आलेला सशस्त्र माणूस यातला फरक कळतो.निशस्त्र माणसावर तो दबकत जावून हल्ला करील.पण अगदी कोंडीत सापडल्याशिवाय सशस्त्र माणसावर हल्ला करणार नाही.
सहावं इंद्रिय हा शब्द बऱ्याच वेळेला या पुस्तकात आलेला आहे. हे सहावं इंद्रिय माणसालासुद्धा आहे. पण फारच थोड्या जणांना याची जाणीव होते.
' जंगलात एक-दोन तप राहिल्यावर हे सहावं अतींन्द्रिय तुम्हाला आपोआपच लाभतं.' ( चकवाचांदण )
सहावं इंद्रिय बाबत कोल्हापूर मध्ये शिवाजी विद्यापीठात माणिक पुरी साहेबांसोबत बोलत असताना. त्यांनी सांगितलेली व त्यांच्या रोजनिशीतील एका नोंदीतील घटना डोळ्यापुढे उभी राहिली.
अंधाराची पावलं माळरानाच्या दिशेनं सरकू लागली. काही वेळानं माळरान अंधारात बुडून जाईल. त्यापूर्वी अनेक प्राण्यांच्या हालचालींनी वेग पकडला. पश्चिमेकडून रानडुकरांची टोळी दुरमडत पळत सुटली. ही टोळी पाणवठ्याच्या दिशेनं निघालेली.रानडुकरांच्या मागोमाग काळवीट नर तीन माद्यांना घेऊन पाणवठ्याच्या दिशेनं हळूवार चालत होता. माळरानावर झाडं विरळ असल्यामुळं त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येई. त्या दिशेनं येणाऱ्या अनेक रानवाटा पाणवठ्यालगत एकत्र येत.जणू रानवाटेलाच पाण्याचा गंध येत असावा! पाणी म्हणजे जीवन हे पुन्हा-पुन्हा कळू लागलं.
रानडुकरांची टोळी एका रांगेत उतरू लागली. मध्यम आकाराच्या रानडुकरानं नेतृत्व स्वीकारलेलं. त्याच्या मागं पिलावळ. अगदी शेवटी अंगानं भरलेलं भलं मोठं रानडुक्कर स्वतःच्या वजनाचा तोल सांभाळत पाण्याच्या ओढीनं स्वतःला फरफटत आणत होतं. त्याचे सुळे दात जरी विद्रुप दिसत असले तरी त्याच्यासाठी संरक्षणाचं कवच होतं. कोल्ह्यासारखे प्राणी त्याच्यापासून चार हात लांबच राहत.जस-जसा पाणवठा जवळ येऊ लागला तस-तशी त्यांच्या चालण्याची गती मंदावली. दोन-चार पावलं चालत. पुन्हा थांबत. दुरून पाणवठ्याजवळ यायला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागला. या दोन्ही अंतरातील गणित निराळंच होतं. कुठं काही धोका जाणवतो का? याचा अदमास घेऊन ही टोळी पाणवठ्यापर्यंत पोहोचली.कारण पाणवठ्याजवळच अधिक धोका असतो हे त्यांनी अनेक वेळा अनुभवलेलं. तिथं काळही दडून बसलेला असू शकतो.
पण आज या टोळीतल्या एकाही सदस्यानं पाण्याला तोंड लावलं नाही याचं आश्चर्य वाटलं. यापूर्वी अनेक वेळा या टोळीला चिखलात लोळताना पाहिलय. पाण्यात उतरून अंग ओलं करत. पण आज त्यांना कशाची तरी भीती जाणवत होती. तोंड वर करून नाकानं वास हुंगायची. आम्ही उंच मचानीवर बसलेलो होतो. पाणवठ्यापासून ८० मीटर अंतर असावं. हवा त्यांच्याच दिशेनं वाहत होती. कदाचित माणसांचा वासच आला असावा. आल्या पावलांनी टोळी वापस गेली. तहानेनं व्याकुळ झालेली माळरानावरची जनावरं पाण्याला तोंड न लावताच निघून गेली त्यामुळं मला फार अपराध्यासारखं वाटलं. काळविटानं तर दुरुनच पलायन केलं. नीलगायीनं गळ्यातून आवाज काढला आणि सगळ्या कळपाला हाकारत दूर नेलं.
हा प्रसंग वाचत असताना चकवाचांदणं या ग्रंथातील एक प्रसंग आठवला जो या सहाव्या इंद्रियाबद्दल सांगतो."एकदा सायंकाळी आंघोळ करताना जिम कॉर्बेटच्या लक्षात आलं, की त्याचे पाय तांबड्या धुळीनं भरलेले आहेत. घराकडे जाण्याच्या रस्त्यावर एका ठिकाणी तो धुळीतून चालला असावा. परंतु त्याच्या हे लक्षात येईना की आपण असे का वागलो? त्याला तो प्रसंग आठवू लागला. अठरा इंच उंच भिंतीच्या पुलीयावरून तो चालत गेला होता. त्यावरून जाताना तो उजव्या बाजूच्या रस्त्याकडे वळला. काही अंतर चालून गेल्यावर पुन्हा त्यानं डावीकडून घरची वाट धरली.
त्याच्या मनात गोंधळ झाला. कॉर्बेटच्या हे लक्षात येईना, की आपण विसराळूपणं असा कसा रस्ता ओलांडला? दुसऱ्या दिवशी तो स्वतःच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत गेला. पुलाखालच्या ओढ्याच्या रेतीत डाव्या बाजूला त्याला वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. जिम कॉर्बेट लिहितो,
"वाघाचा मला मारण्याचा हेतू नसेलही.परंतु रस्ता ओलांडताना आजूबाजूच्या जंगलातील सावट ऐकायला थांबलो असतो किंवा खोकलो-खाकरलो-शिकलो असतो वा माझ्या खांद्यावरची बंदूक दुसऱ्या खांद्यावर बदलली असती तर माझ्या या हालचालीमुळं बिचकून वाघानं माझ्यावर हल्ला केला असता. माझ्या अंतर्मनाला हा धोका कळला नव्हता. अरण्यसंवेदना माझ्या साहाय्याला धावून आली आणि अपेक्षित धोक्यापासून बचाव होण्यासाठी मार्गदर्शक झाली.
"कॉर्बेटच्या अरण्यसंवेदनेचं कसं स्पष्टीकरण करता येईल? ते अतींद्रिय ज्ञान की सुप्त मनानं केलेलं निरीक्षण? कॉर्बेटन पुलावरून जाण्याचा मार्ग बदलला हे तर्कशुद्ध कृत्य असलं तरी त्यामागं अंतर्मनाचा प्रभाव होताच. घराकडे जाण्यापूर्वी तासभर ह्यानं वाघाचा आवाज ऐकला होता. आवाज कोणत्या दिशेनं आला याची नोंद अंतर्मनानं घेतली असणार. तसंच पुलाजवळ चिटपाखरू नसणं, मोडलेल्या फांद्या दिसणं-यांवरून अंतर्मनानं धोका टाळण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला. मनानं केलेल्या या अरण्यवाचनाची कॉर्बेटला कल्पना नव्हता. जागृत मनानं केलेलं अरण्यवाचन जिवावरचा धोका टाळण्याकरता अशा रीतीनं " उपयुक्त ठरलं. '
खुपचं प्रभावी भावनिक प्रसंग डोळ्याच्या कडा ओल्या करून गेला.
या पुस्तकातील काही नोंदी
बिबळ्याला पाण्याची गरज वाघापेक्षा कमी असते. धूर्तपणात, धाडसीपणात आणि धोका जाणवताच अत्यंत चपळाईनं,आवाज न करता गायब होण्यात बिबळ्याचा हात कोणी धरू शकणार नाही. हा बिबळा भारताचा मुळ रहिवासी आहे. वाघ हा उत्तरेकडच्या थंड प्रदेशातून भारतात आला आहे.
वाघ गाईला पाठीवर घेऊन जावू शकतो.
एकट्या कोल्ह्याबाबत बरेच काही लिहिलं गेलं आहे. बरेच काही समज, आख्यायिका, अंधश्रद्धा आहेत. यातल्या दोन महत्त्वाच्या समजांपैकी एक म्हणजे - हा कोल्हा वाघ किंवा बिबळ्या, जास्त करून वाघाबरोबर असतो. तो आपल्या विचित्र ओरडण्याने वाघाला शिकार कुठे असेल, याची जाणीव करून देतो व त्याचा मोबदला म्हणून,वाघाचं खाणं झाल्यावर, त्यातला वाटा मिळवतो.
दुसरा समज म्हणजे-एका ठराविक वाघाबरोबर हा जोडी जमवतो. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहात तो आपल्या खाण्याची सोय करतो. यातलं काहीही खरं असलं तरी, एका कोल्ह्याची कोल्हेकुई म्हणजे वाघ किंवा बिबट्या जवळपास असल्याचे चिन्ह आहे.
वाघ स्वच्छतेचे भोक्ते असतात. खाणं सुरू करायच्या आधी ते जनावराच्या पोटातील घाण खाण्यात मिसळू नये म्हणून,त्याचा मागचा भाग फाडून त्याची आतडी काढून ती दहाएक फूट अंतरावर नेऊन ठेवतात.
हिंस्त्र मांसभक्षी प्राण्यांचा एक विशिष्ट वास असतो. कुजलेल्या भाजीपाल्याचा येतो तसा हिरवट वास..।
साधारणपणे वाघ सहसा अंगावर येत नाहीत. अगदी समोरासमोर आले तरी शांतपणे निघून जातात. कधी कधी वाघसुद्धा आपल्याला पाहून दचकतात.
हत्तीची श्रवणशक्ती तीव्र असते. एका प्रसंगामध्ये केनेथ अँडरसन याने बोटं जुळवून एकापाठोपाठ एक दोन चुटक्या वाजवल्या आणि वाजवलेल्या चुटक्यांचा छोटासा आवाज त्या हत्तीला ऐकू आला.
नरभक्षक होण्यामागची कारणे
वाघाला एकच डोळा होता. दुसरा डोळा आक्रसून जवळजवळ नाहीसा झाला होता.
तपासणीसाठी डोळ्याची खोबन खोदून काढली, बंदुकीचा एक छर्रा सापडला. कुठल्या तरी अनधिकृत शिकाऱ्यानं ठासणीच्या बंदूकीनं झाडलेल्या गोळी छर्रा त्याच्या डोळ्यात शिरून तो डोळा निकामी झाला होता. होणाऱ्या वेदना व गमावलेला डोळा यामुळे नैसर्गिक शिकार करणे या वाघाला जमेनासं झालं आणि ज्यामुळे ही परिस्थिती आली, त्याचाच सुड उगवायला तो नरभक्षक झाला.
बिबळ्याची तपासणी करत असताना त्याच्या पायाची जखम पाहिली. ती गोळी वगैरे लागून झाली नव्हती, तर पायात साळींदराचे काटे मोडल्याने ती झाली होती. आणि ती बरीच आधी झाली होती, कारण त्या काट्यांभोवती त्वचेची गाठ झाली होती, ज्यामुळे त्याला पाय नीट टेकवता येत नव्हता.
काही ठिकाणी तर नरमांस खाण्याची विकृत चटक लागल्यानेच नरभक्षक झाला आहे.हा अपवाद आहे.
एका सत्य घटनेनुसार एका कथेत- वाघिणीचे सुळे बोथट झाले होते, त्यामुळे ती मनुष्यवस्ती जवळ राहून मारायला सोपे अशा कुत्री, बकऱ्या व गाईगुरांवर गुजराण करत होती. मनुष्य प्राण्यांबद्दल एकीकडे वाटणारी भीती व दुसरीकडे वाटणारा तिरस्कार यामुळेच केवळ ती नरभक्षक झाली नव्हती; परंतु ती वेळीच मारली गेली नसती, तर आज ना उद्या ती नक्कीच नरभक्षक बनली असती. भुख आणि वय यामुळे ती एवढी माथेफिरू आणि हिसंक झाली होती की काय कोण जाणे.
एका वाघाणं घेतलेल्या बळींची संख्या सत्तावीसवर पोहोचली होती. त्याला जबाबदार होते. 'कार शिकारी' जे गाडीमध्ये बसून असतात. गंमत म्हणून शिकार करतात. त्यातूनच सहज म्हणून मारलेली गोळी वाघाचा जबडा तोडून गेली. परिणामांची काहीही पर्वा न करता अत्यंत बेजबाबदारपणे वागलेल्या या 'माणसांमुळे' एकोणतीस निरपराध लोकांचा बळी गेला होता. आपण याचा कधी विचार करणार..!
एक वेगळा संदर्भ याच पुस्तकातील नोंदी संदर्भातील ('देवळाई' चकवाचांदण मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकातील)
" केनेथ अँडरसन यांनी आपल्या ग्रंथात अस्वलाच्या भाकरीचा उल्लेख केला आहे. एक इंच जाड आणि अंदाजं दहा इंच रुंद अशी ती गोलाकार असते. रंग काळपट,कळकट पिवळा.ती चिकट असते.
मादी अस्वल जंगलातील फणसाचे गर व कवठं खाते. त्यानंतर मधाची पोळी खाते. तद्नंतर गुहेत सगळे येऊन ओकते. तो गोळा सुकला की त्याची भाकरी होते.अशा रितीनं पावसाळ्यासाठी आपल्या पिलांसाठी अन्नाची तरतूद करते.
अँडरसन हे दक्षिण भारतातील म्हैसूर- बंगलोर इथं राहणारे प्रख्यात शिकारी.कर्नाटकातील कुरंबा आदिवासींकडून पहिल्यांदा त्यांनी अस्वलाच्या भाकरीविषयी ऐकलं होतं. नंतर त्यांनी गुहेत जाऊन त्याबद्दल खात्रीही करून घेतली. कुरंबा आदिवासी अशी भाकरी मोठ्या प्रयत्नांनी मिळवून खातात. त्यापायी कित्येकदा अस्वलीण त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही करते.
जाता जाता
केनेथ अँडरसनला भारतातील जंगलाबद्दल विलक्षण प्रेम होतं. जंगलात त्याला मनशांती मिळायची. म्हणून तो रात्री जंगलातच वस्ती राहायचा. त्याच्या Tales of jungles या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो म्हणतो. मी जंगलाशी तादात्म पावलो आहे. हेच माझे घर आहे. जंगलाच्या कुशीतूनच माझा जन्म झाला. आणि आयुष्याच्या अखेरीस हीच माझी चिरविश्रांती जागा असेल. लोकांना शांततेने आनंदाने जगू देण्यासाठी केनेथ अँडरसन महिनो महिने घरापासून दूर असायचा. एकदा तर त्याची काळजी वाटल्याने त्याची बायको बंगलोरहून तिची गाडी घेऊन तिथे पोहोचली, ते हे विचारायला, माझं घर आहे, तिथे माझी बायका मुलं आहेत.(जून आणि डोनाल्ड) हे माझ्या लक्षात आहे का? आणि माझा परत यायचा विचार आहे, का नाही.?
परवा रात्री या पुस्तकाचे लेखक संजय बापट यांच्याशी फोनवर बोलणं झालं त्यावेळी त्यांनी 'मॅनइटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग जिम कॉर्बेट यांचे हे पुस्तक विश्वास भावे यांनी अनुवाद केलेले ' साधारणत: ५० ते ५२ वर्षापुर्वी वाचले होते. ते पुस्तक वाचत असतानाचा थरार यावर आमची संवेदनशील चर्चा झाली.त्यावेळी रात्री ते पुस्तक इतकं तल्लीन होऊन ते वाचत होते.आणि क्षणभर त्यांना वाटले कि आता वाघिणीचा पंजा खिडकीतून वर आला तर..! हा अंगावर रोमांच उभा करणारा प्रसंग ऐकताना मी सुध्दा हबकलो.
"अजब विचाराचा गजब माणुस मनाला चटका लावणारा"
हा फक्त इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद नाही. माणसांनी जंगलातील प्राण्यांशी कसं वागावं, त्यांच्याप्रती आपली जबाबदारी, हे आपलं सहावं इंद्रिय जोपासून मानवता ही मानवतेच्या भावनेशी जोडावी म्हणून केलेला जीवापासूनचा आटापिटा आहे. लेखकांनी या विषयाला न्याय दिलेला आहे. माणूसपण समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. लेखकांचे मनःपूर्वक आभार.
विजय कृष्णात गायकवाड