पाण्याचे प्रदूषण करणाऱ्या या सर्व घटकांवर मोहन कुलकर्णी यांनी त्यांच्या 'ऋतु बायोसिस' या कंपनीद्वारे काम केले आहे व ते प्रदूषण स्रोतांच्या सुरवातीलाच कसे 'कमीत कमी' पातळीवर आणता येतील हे साध्य करून दाखवले आहे.
त्यांनी वॉटरलेस युरिनल्सच्या माध्यमातून मानवी मूत्रामुळे होणारे प्रदूषण ९५ टक्क्याने कमी केले आहे. तर मानवी मैल्याचे वेगाने व नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात प्रमाणात विघटन करून ते ६० ते ७० टक्क्यांनी त्याचे आकारमान कमी करण्यास यश मिळवले आहे. तर घरातील व ऑफिसमधील सर्व स्वच्छतेसाठी लागणाऱ्या फिनॉल,ॲसिड यांना जैवतंत्रिक (बायो टेक्निकल) रसायन हा पर्याय देऊन त्यामुळे होणारे प्रदूषण ९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मजल मारली आहे. इतकंच नाही तर घनकचऱ्याच्या विघटनाच्या अशा प्रक्रिया विकसित केल्या आहेत की त्यातून कचऱ्याची दुर्गंधी जवळजवळ शून्यावर येते,आणि जरी विघटीत कचरा पाण्यात वाहून गेला तरी त्याचे विघटन प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली असते.त्यामुळे प्रवाहाचा केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) किंवा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) हा फार मोठा असत नाही. म्हणजे प्रदूषणाच्या उगमा जवळच पाण्याचे प्रदूषण संपवायचे किंवा कमी करायचे.हे मोठ्या प्रमाणात सर्वत्र झाले तर प्रवाहांचे पाणी कमी प्रदूषित होईल आणि मग ट्रीटमेंट प्लांटवरील भारही कमी होईल. प्रवाह स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग अशा प्रकारची पर्यायी रसायने किंवा विविध पर्याय दिल्यामुळे वाढू लागेल,घनकचरा व्यवस्थापन आटोक्यात येईल. थोडक्यात या सर्व गोष्टींमुळे पाणी प्रदूषणावर नियंत्रण येईल!
आणि विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला कळण्यासाठी भन्नाट नवनवीन प्रयोग सुरू केले.मोहन कुलकर्णी यांनी 'मुतारीवर' सुध्दा अनेक प्रयोग केले.व त्यातूनच 'ब्लू बॉल्स' तयार केले. यामध्ये ठासून भरलेत बॅक्टेरिया.. या बॅक्टेरियांचे खाद्य म्हणजे यूरिक ॲसिड,मुतारी मध्ये दुर्गंधी येते अमोनियाची,अमोनिया येतो यूरिक ॲसिडमधून आणि हे यूरिक ॲसिड येथे लघवीवाटे आपल्या शरीरातून,त्यांच्या या प्रयोगामुळे दुर्गंधीच्या मुळावरच घाव घातला गेला. बॅक्टेरिया हे युनिक ॲसिड खातात. ते संपवतात.त्यातून बॅक्टेरियांची संख्या वाढते. त्यांची वसाहत मुतारीच्या भांड्यात व त्या खालच्या पाईपमध्ये तयार होते.सततच्या वापराने या बॅक्टेरियाच्या कॉलनी थेट ड्रेनेज लाईनपर्यंत ही जातात.बॅक्टेरियांनी खाल्ल्यामुळे यूरिक ॲसिड शिल्लक राहत नाही तर तिथे अमोनियाची दुर्गंधी येईलच कशी...!
विचारालाही विचार करायला लावणारे हे विचारशील प्रयोग वाचून मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
समाजाचे कल्याण साधताना,संशोधन आणि अभ्यास हे करताना लोकांच्या अज्ञानाचा नाही, तर आपल्या ज्ञानाचा फायदा करून घेऊन व्यवसाय करणे हे सर्वोत्तम उद्योजकाचे लक्ष असते,उद्योजकाचे साध्यही पवित्र आणि साधनाही पवित्र असायला हवी असा नवीनच 'माणुसकीचा' धडा मोहन कुलकर्णी यांनी दिला आहे.
'एक चांगले पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवते.'
पुढील प्रकरण व वाचण्यासाठी पान उघडले. आणि 'ज्वालाग्राही पाणी' ही सुरुवात वाचूनच मी अवाक् झालो. प्रदीप पुरंदरे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरील सर्वत्र बहुचर्चित नाव हायड्रिलॉजी तज्ञ,जल व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक आणि पाणी विषयाचे अभ्यासक पंडित,ते जलव्यवस्थापर्यंत पोहोचले आहे. पाण्याला ज्वालाग्रही बनवणारे ते सत्याग्रही आहेत. त्यांचे कार्य ध्येय ( मिशन स्टेटमेंट ) आहे की 'जल व्यवस्थापन व्यवस्थेत प्रथम लोक सहभाग वाढवा, तिथे जनरेटा निर्माण करा,त्याआधी सिंचन व्यवस्था नीट अभ्यासा, त्याचे अस्त्र बनवून प्रकल्पस्तरावर परिणामकारक हस्तक्षेप करा पाणी वाया जाण्यापासून वाचवा..!
हे वाचल्यावर सर्वप्रथम मला पाणी हे मानवी जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे. याचे मुल्य समजले.
'आकड्यात सैतान लपलेला असतो' म्हणजेच आकडेवारी बारकाईने अभ्यासली तर त्यातील बदमाशी,त्रुटी कळते,विरोधाभास कळतो, वरकरणी तसे काहीच वाटत नसले तरी ही अनास्था आणि अनागोंदी अशी असते.हे रहस्य सविस्तरपणे या पुस्तकात वाचल्यानंतर
' होय, वादळांनी फितूर झालेल्या लाटांना न जुमानता उलट त्याच लाटांवर स्वार होऊन वादळाला सामोरं जाऊन मार्गक्रमण करत इच्छित किनारा गाठणे हेच जहाज निर्मितीचे उद्दिष्ट असतं !
या उदात्त कर्तृत्ववान विचारांनी जीवनातील जीवंत वैचारिक क्रांतीची ओळख होईल हे मात्र नक्कीच..!
मी दररोज पाणी 'आडातून' खुप खोलवरुन वरती खेचून काढतो. या पाण्याच्या शोधात मला आतून खोलात जावं लागतं.
असेच फार काळापासून पाण्याच्या शोधात .. खोलात शंशाक देशपांडे आपल्या पुढे गेलेले आहेत.फक्त आपल्याकरीताच..!
आज सगळ्यात जास्त निकड आहे भूजलाच्या थेंबाथेंबाच्या नियोजनाची.'नितीआयोगा' चा अहवाल सांगतो, की बिहारमधील एक लाखापेक्षा अधिक बोरवेल बंद पडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील ७७ हजारांपेक्षा अधिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. महाराष्ट्राच्या ५२ टक्के जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. म्हणजे तिथे पाणीच नसल्याने काहीच बोलू शकत नाहीये. भारतातल्या १५ हजार नद्यांपैकी साडेचार हजार नद्या कोरड्या पडल्या आहेत. ( ही अभ्यासपूर्ण लेखमाला प्रत्यक्ष पुस्तकात वाचत असताना 'मला अजूनही अभ्यास करायचा आहे याची सत्यता समजली.) सगळ्यांचा संबंध आहे,अमर्याद भूजलाचा उपसा आणि त्यातून आटलेले भूजल यांच्याशी,या पार्श्वभूमीवर भूजलाचा,ते साठवून ठेवणाऱ्या 'जलधर' असा या खडकाचा जलधारांच्या सीमा निश्चित करण्याच्या,त्यातील पाण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करण्याच्या,स्वानुभवातून व स्वअध्ययनातून विकसित केलेल्या पद्धती, इतकंच काय,पूर्ण महाराष्ट्रासाठी एक हाती लिहिलेला भूजल कायदा हा पुढे केंद्र सरकारनेही स्वीकारला. हे आणि असेच भूजलासंबंधीचे मैलाचा दगड ठरतील अशी अनेक कामे डॉ. शशांक देशपांडे यांनी केली आहेत.
१९८५ ला शशांकजींनी व त्यांच्या दोन मित्रांनी खडकशास्त्र व हायड्रॉलॉजीतील संदर्भाचा वापर करून त्यासाठी एक छोटे यंत्र वापरून पाण्याची जागा दाखवण्याचा सल्ला देणारा व्यवसाय सुरू केला. गावे, जिल्हा परिषद व महाराष्ट्र सरकारने त्यांना यासाठी पहिले काम दिले. त्यांनी या यंत्राच्या आधाराने विविध ७० ठिकाणं दाखवली. त्यापैकी ५७ ठिकाणी भरपूर पाणी लागलं, म्हणजे ८० टक्के ठिकाणं बरोबर दाखवली होती. म्हणजे यांचं तंत्र,यंत्र आणि तर्क खूपच उपयोगी होता. पुढे लवकरच छत्तीसगड (तेव्हा ते मध्यप्रदेशात समाविष्ट होते) मधील रायपूर जिल्ह्याच्या शिवनी तालुक्यात काम मिळाले. खूप दुष्काळ होता. तिथे त्यावेळी बोरवेलसाठी एकूण शंभर ठिकाणं दाखवली होती, पैकी ९० ठिकाणं अचूक निघाली, जिथे भरपूर पाणी लागले. पाणी पाहण्याचे यंत्र म्हणजे इलेक्ट्रिकल कामात वापरले जाणारे मेगर किंवा रेसिस्टीविटी मीटर,कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटमधील विद्युत प्रवाहाचा अवरोध मोजण्यासाठी याचा वापर करतात.जमिनीचा,त्यातील खडकांचा विद्युत वहनाला होणारा अवरोधही त्याने मोजता येतो. त्याचे काही शास्त्र व तंत्र आहे.जमिनीत विद्युत प्रवाह सोडला जातो आणि मेगरने त्याचा अवरोध मोजला जातो.जिथे खडकाला भेगा आहेत,पोकळी आहे अशी ठिकाणे यामुळे सापडतात.त्यांचे आकारमान इत्यादीही समजते. ते जमिनीपासून किती खोलवर आहे,हेही अनुमान काढता येते. त्यावर आधारितच हे मशीन जमिनीतले पाणी दाखवणारे मशीन म्हणून ओळखले जाते.
हे सर्व वाचत असताना एका वाक्याची प्रकर्षाने जाणीव झाली.
''तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकू शकत नाहीत;तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरूप बदललेलं असतं.'' - हेरॅक्लिटस'
भारतीय संविधानाप्रमाणे प्रवाहातील पाण्यावर प्रवाह जिथून जिथून वाहतो तेथील सर्वांचा हक्क असतो. त्यामुळे गाव हे प्रमाण मानून हे काम केले जाते. मागच्या गावात पाणी अडवले जाते, तेव्हा त्या गावात येणाऱ्या एकूण पाण्याच्या ६५ टक्के पाणी त्या गावाला स्वतःसाठी अडवता येते, बाकी ३५ टक्के पाणी पुढे सोडावे लागते. हे नदीलाही लागू आहे. इतकेच काय, एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जातानाही हाच नियम लागू आहे.हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं.!
जीवन जगत असताना असले पुस्तक सोबत असणे म्हणजे आपली सावलीच आपल्या सोबत असणे.हा अनुभव बरचं काही शिकवून गेला.
माहिती थेंबाची... थेंबाच्या थांबण्याची...! या प्रकरणाची सुरुवातच थांबण्यापासून होते. पळण्यापूर्वी आपल्याला कोठे थांबायचे आहे हे ठरवता आलं पाहिजे. थांबण्याची सीमारेषा म्हणजे सुनील गोरंटीवार यांचे साधक जीवन..
यह ॲप का जमाना है भाई... मोबाईल ॲप का! शेतीला काटेकोर पाणी देण्यासाठी मोबाईल ॲप! हे ॲप डाऊनलोड करा, शेतात जाऊन पिकाचा फोटो काढा,तो ॲपवर डाऊनलोड करा... विचारलेल्या दोन-तीन प्रश्नांची उत्तरे द्या... ॲप तुम्हाला सांगेल, तुमचा पंप किती वेळ सुरू ठेवायचा. हवे तितकेच पाणी शेतीला मिळते.... होय, हे जागतिक दर्जाचे संशोधन करून जलव्यवस्थापनात उच्च मानांकन मिळवणारे संशोधक म्हणजे डॉ. सुनील गोरंटीवार.गेली पस्तीस वर्षे सिंचन क्षेत्रात समृद्ध ज्ञान निर्मिती करणारा हा साधक आहे.
एक पाण्याचे गणित पाहू...
'भारी जमिनीत ठिबकने पाणी दिले की पडणारा थेंब जमिनीत आधी आडवा पसरतो मग हळूहळू तो खालच्या दिशेला जातो व मुळाभोवती तो बल्ब तयार करतो तो 'कांद्याच्या' आकारात पसरतो. तर हलक्या जमिनीत तो आडवा न पसरता खालच्या दिशेने सरळ प्रवास करतो तेव्हा तो गाजरासारखा आकार धरतो.'
आपल्या भाषेत सुनील गोरंटीवार सोप्या भाषेत समजून सांगतात.
बाष्पर्णोत्सर्जन (Evapotranspiration) हा शब्द जड वाटत असला तरी तो शालेय जीवनात येऊन गेलेला असतो. तर मला जे आठवते ते सांगतो.आपण झाडाला पाणी देतो ते जमिनीत. जमिनीला दिलेल्या पाण्यापैकी सर्वच पाणी झाडाने शोषून घेईपर्यंत काही पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते उडून जाते ते बाष्पीभवन. तसचं झाडाने शोषलेल्या पाण्यापैकी ८५ ते ९० टक्के पाणी हे पानाच्या रंध्राद्वारे झाडाच्या बाहेर श्वासाद्वारे बाहेर टाकले जाते.
(हे transpiration). जेमतेम ५ ते ७ टक्के पाणी अन्न बनवण्यासाठी वापरले जाते. झाडाचे स्वतःचे तापमान बाहेरील हवामान व तापमानाशी जुळवून घेण्यासाठी हे उत्सर्जन सुरू असते. हे दोन्ही मिळून बाष्पपर्णोत्सर्जन (Evapotranspiration)
तर ते सांगत होते की Evapotranspiration जेवढे अधिक तेवढी झाडाची वाढ जोमाने होते. उन्हाळ्यात झाडांना किंवा पिकांना पाणी जास्त लागते.तर हिवाळ्यात कमी तर पावसाळ्यात अगदीच कमी द्यावे लागते. त्याचे कारण हेच तर!
या ठिकाणी सॉक्रेटिसचा प्रसिद्ध विचार समोर उभा राहीला.
'मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि तीही आहे की मला काहीच माहित नाही..!
माणसांनी नेहमी अभ्यास करत राहावे. वाचत जावे व स्वतःला घडवत राहावे. मला सर्व माहित आहे. असा भ्रम तयार झाल्यानंतर माणसाचा प्रवास जागीच थांबतो. तो जागीच थांबू नये म्हणून आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे.
'शुध्द पाण्यासाठी ओझोन थेरपी' किरण गद्रे हे 'क्लोरीन पुराण' सांगतात.
मोठ्या प्रमाणात निर्जंतुक पाणी निर्मितीसाठी साधारण काही प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. क्लोरीनेशन,अल्ट्रावायलेट,ओझोनेशन, ब्रोमीन ॲसिड ट्रीटमेंट,चांदी व तांबे यांचे आयन, तसेच पोटॅशियम परमॅग्नेट,अल्ट्रासोनिकेशन इत्यादी..
आपल्याकडे पाणी निर्जंतुक करण्यासाठी सरसकट क्लोरीनेशनचा वापर होतो. पाणी गाळून त्यातील माती बाजुला करुन व तत्सम घटकांना पाण्यातून वेगळे केले जाते.. तुरटीचा वापर करून गरजेप्रमाणे क्लोरीनची मात्रा पाण्यात मिसळली जाते. पाणी थेट घराच्या नळाद्वारे आपण पाणी भरेपर्यंतच्या काळापर्यंत आणि नंतरही काही काळ काही प्रमाणात टिकून राहील इतक्या प्रमाणात क्लोरीनची मात्रा असते. यात पाणी निश्चितपणे निर्जंतुक होते. ही मात्रा पाच पीपीएम म्हणजे एका लिटरसाठी पाच मिलीग्राम इतकी असते व आपल्या नळाद्वारे भांड्यात पडेपर्यंत पाण्यातली मात्रा ०. १ ते १ पीपीएम इतकी कमी होत जाते.
पूर्ण अमेरिकेत २,००० हून अधिक वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीनेशन केले जात नाही. तिथे निर्जंतुकीकरणासाठी ओझोनचा वापर केला जातो. फ्रान्समधे तर १९०३ पासूनच ओझोन पाणी प्रक्रिया केंद्रात पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरायला सुरूवात झाली होती. हा जगातला पहिलाच ओझोनने पाणी शुध्दीकरण करण्याचा प्लांट होता. १९७० ते ८० पर्यंत जगात सर्वत्र क्लोरीनेशनने पाणी शुद्ध केले जात होते. पण पाण्यातील कोरीनेशनचा दुष्परिणाम यावर संशोधन सुरू झाले आणि हळूहळू मोठे क्लोरीनेशन पुराण बाहेर येऊ लागले.जसजसे हे क्लोरीन पुराण बाहेर येवू लागले तसतसा क्लोरीनचा वापर थांबवला गेला. मग सर्वाधिक सुरक्षित पर्याय ओझोनचा पुढे आला.
पिण्याच्या पाण्यात निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन मिसळला की पाण्यातील सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांशी क्लोरीनचा संयोग होतो. त्यातून शरीराला बाधक अशी अनेक रसायने तयार होतात. त्या घातक रसायनांमुळे मूत्राशय, गुदद्वार व आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. केस व कातडीवर परिणाम होतात. थायरॉईड ग्रंथीवरही परिणाम होतात. सर्व जीवनाश्यक खाण्यापिण्याचे व त्यातील औषधी घटकांचे घातक पदार्थात रूपांतर होते. जन्मतः बालकात व्यंग,अपंगत्व, श्वसनाचे रोग येण्याची शक्यता वाढते. हृदयाचे स्नायू व रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य निर्माण होते. क्लोरीनमुळे तयार झालेल्या पाण्यातील विविध रसायनांचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो. त्यातून हार्मोन्सचा समतोल बिघडून त्याचे विकार वाढतात. हेही सिद्ध झाले आहे की पाण्यात क्लोरींनमुळे होणारी संयुगे हे आपल्याला नैसर्गिकरीत्या आवश्यक असलेल्या औषधी तत्वांचे रूपांतर कर्करोगयुक्त पदार्थ निर्मितीत करतात,की ज्यामुळे अगदी चहापासून भाज्या फळे मसाल्यांचे पदार्थ औषधी वनस्पती यांचे शरीरासाठी आवश्यक असणारी गुणधर्मच नष्ट होऊन जातात.
असेही सिद्ध केले आहे की पिण्याच्या पाण्यात क्लोरीनने जितका त्रास होऊ शकतो त्यापेक्षा जास्त धोका पोहण्याच्या तलावातील पाण्यातील क्लोरीनमुळे आहे असे आढळते. उदाहरणार्थ ज्यावेळी एखादा माणूस गरम पाण्याने शॉवरखाली अंघोळ करतो त्यावेळी त्याच्या त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात. साधारण ४२ अंश तापमानाला क्लोरीनमुळे निर्माण झालेले क्लोरोफॉर्म,ट्राय हॅलो मिथेन हे पदार्थ त्या रंध्रामधून रक्तात भिनत जातात. तेथून ते फुफ्फुसात जातात. त्यातूनच श्वसनाचे विकार विशेषतः दमा वाढतो. तसेच स्विमिंग टँकमधल्या क्लोरीनमुळे केसांवरही अनिष्ट परिणाम होऊन ते रुक्ष, रंग विरहित होतात. डोक्याच्या त्वचेवर व शरीराच्या इतर त्वचेवर सुद्धा या पदार्थांचे घातक परिणाम होतात.
क्लोरीनमुळे जलवाहिन्यांच्या गंज प्रक्रियेला वेग येतो आणि त्यामुळे पाणीपुरवठा लाईन्स वरचेवर लिकेज होऊ लागतात.
क्लोरिन व ओझोनची बॅक्टेरिया बाबतची प्रक्रिया एकच आहे. क्लोरीन किंवा ओझोन बॅक्टेरियाची पेशी भित्तिका फोडून टाकतात व त्याच्या पेशीद्रव्याबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन पेशी नष्ट होतात.
क्लोरीनचे तोटे आणि ओझोनचे फायदे सविस्तरपणे 'अभिनव जलनायक' या पुस्तकात वाचायला मिळतील.
मला वाटते आपण अशीच पुस्तके वाचली पाहिजेत.
जी तुमच्या हृदयावर खोलवर जखमा करतात...!
पुस्तक कसे पाहिजे?
एखाद्या कुर्हाडीसारखे ज्याने आपल्यातील बर्फ वितळला पाहिजे.फ्रान्झ काफ्काचे अप्रतिम वाक्य जे पुस्तकातील अंतःकरण उलगडून सांगणारं आहे.
'अभिनव जलनायक' हे पुस्तक सुध्दा हेच सांगत आहे.हे पुस्तक काळाच्या पुढे आहे.
आता पाहू राघव खडककर यांचा जीवनपट 'मेम्ब्रेन सिस्टिमचे डॉक्टर'
कारखान्याच्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न मोठा गंभीर आहे. या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून यंत्रणा उभारलेली असते. या यंत्रणेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम डॉक्टर हवा असतो.असेच मेम्ब्रेन सिस्टीमचे डॉक्टर आहे राघव खडककर.
पाणी प्रदूषण ही जगातली सर्वात मोठी समस्या. जगाचे सगळ्यात जास्त नुकसान त्यामुळे होते. मुळात पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली तीच मुळी पाणी असल्यामुळे..
त्यामुळे पाणी प्रश्न हा सर्व जीवसृष्टीचा आहे.पण दुर्दैवाने पाणी प्रदूषणाची चर्चा सामान्यपणे माणसाला भेडसावणारी समस्या म्हणूनच केली जाते. नुकसान आर्थिक बाबतीत अधिक आहे पण तुलनेत जलचर, उभयचर यांच्या प्रजातीच प्रदूषित पाण्यामुळे नष्ट होत आहेत. प्राण्यांपासून शेवाळ, प्रवाळ, पाण्यातील विविध सूक्ष्म आणि मोठे जीव अशा सर्व जीवसृष्टींना हानी पोहचते.
पाणी प्रदूषणाचा प्रश्न गहन गंभीर आहे, पण आजकाल मोठमोठ्या कारखान्यांमधून समाधानकारक गुणवत्तेचे सांडपाणी बाहेर सांडलेले दिसते,विविध तंत्रज्ञानातून उभारलेल्या मशिनरीमुळे हे शक्य होत आहे. या मशिनरीची उभारणी व देखभाल करणारी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेत सातत्य ठेवता येणे शक्य होते.
असेच एक डॉक्टर आहेत राघव खडककर आणि त्यांची विपणन कंपनी. दिवसेंदिवस इंडस्ट्रीचा आकार,
आवाका,संख्याही खूप वाढते आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात समोर असलेल्या कंपन्याच माहिती असतात. पण प्रत्यक्षात भरपूर मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांची उत्पादने आपल्या नजरेच्या पलीकडे सुरू असतात. हा आवाका व आकार याबाबत सांगायचे झाले तर 'रोज दोन तीन कोटी लिटर पाणी ह्या इंडस्ट्रीज वापरतात', म्हणजे तितकेच सांडपाणी ही तयार करणाऱ्या अशा या अवाढव्य कंपन्या आपल्या देशात व जगात अनेक आहेत. खाण उद्योग,धातू उद्योग,टेक्स्टाईल, फार्मासिटिकल,
केमिकल,फर्टीलायझर, पेट्रोकेमिकल याबरोबरच पॉवर प्लांट देखील या आणि इतर क्षेत्रातल्या या कंपन्या आहेत. म्हणजे या सांडपाण्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण होत असेल याची कल्पना येते.पण काही ठिकाणी दोन तीन प्रमुख गोष्टींमुळे हे प्रदूषण रोखले जात आहे.
१) कंपन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सतत उपलब्ध असणे हे खूप आव्हानात्मक आहे.
२) मोजकेच पण प्रभावी पर्यावरणप्रेमी लोक व पर्यावरणप्रेमी प्रशासन यांनी माणूस,प्राणी, वनस्पती व जमीन या सर्वांच्या अस्तित्वाचा व भवितव्याचा विचार करून बनवलेले प्रदूषण व पर्यावरण विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी.
३) या विषयात असलेले सजग कार्यकर्ते व जनसामान्यांचा नैतिक दबाव या कारखान्यांवर असणे,या सर्वांचा विचार या मोठ्या उद्योगांना करावाच लागतो, कारण त्यांच्या कारखान्यांचा नफा, उत्पादकता ही कारखाने चालू असल्यामध्येच आहे, त्यामुळे पर्यावरणीय कायदे व लोकांचा विरोध या मुद्दयावर तोटा किंवा उद्योग बंद पडणे हे यांना परवडणारे नसते. म्हणूनच प्रदूषित घटकांच्या प्रक्रियेवर काम करणे गेल्या दोन-तीन दशकांत खूप अग्रक्रमाचे ठरत आहे. म्हणूनच सांडपाणी प्रक्रिया व हवेचे प्रदूषण नियंत्रणासाठी कोट्यावधी रुपयांची यंत्रे आणि यंत्रणा काम करत असते. सांडपाणी प्रक्रियेत ई.टी.पी. (Effluent Treatment Plant) च्या वापराबरोबरच गेली काही दशके मेम्ब्रेन फिल्टर्सच्या माध्यमातून रिव्हर्स ऑस्मॉसिसने सांडपाणी शुद्ध केले जाते. साधे पाणी शुद्ध करण्यासाठी आर.ओ. फिल्टर मेम्ब्रेन आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठीचे मेम्ब्रेन वेगवेगळे असतात. तसेच सांडपाणी प्रत्येक इंडस्ट्रीचे वेगळे वेगळे असल्याने मेम्ब्रेनची संख्या व त्यांचे प्रकार वेगळे असतात. या मेम्ब्रेनमधून सांडपाणी शुद्ध केले जाते. या एकेका मेम्ब्रेनची किंमत २२ ते २५ हजार रुपये असते.असे हजार-पंधराशे मेम्ब्रेनची एक सिस्टिम आणि अशा सात आठ किंवा जास्त ही सिस्टिम अशी ती मांडणी असते,यंत्रणा असते. म्हणजे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या सांडपाणी प्रक्रियेत झालेली असते. तर यातल्या या मेम्ब्रेनचा अभ्यास,त्यांची योग्यता,त्यांचा वापर, त्यांच्या समस्या आणि त्यावर उत्तरे शोधण्याचे काम करते राघव खडककर यांची कंपनी.मेम्ब्रेन पाणी तंदुरुस्त ठेवते आणि मेम्ब्रेनला तंदुरुस्त राघवजी.म्हणजे प्रत्यक्ष पाण्याची आणि जलचरांची सेवाच की!
ही सेवा म्हणजे संपुर्ण मानवतेचीच सेवा या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे जाऊ..!
... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.
विजय कृष्णात गायकवाड