मंगळवार असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे कवठेमंहाकाळला गेलो होतो. माझी कवठेमहांकाळची व्हिजिट मला नेहमीच आवडते... त्याला कारण की ती साधीभोळी खेडूत माणसं.
एक म्हातारा आणि एक म्हातारी आत आली. म्हातारीने म्हातार्याला हात धरून आणलं आणि खुर्चीवर बसवलं.
" बस हितं." ती बोलली.
" काय होतंय आजोबा? " मी विचारलं.
" हाता पायाला आग लागल्या ह्याच्या." म्हातारी बोलली.
" आग लागल्या म्हणजे खाजतंय की जाळ उठतोय?" मी विचारलं.
" जाळ उठतोय. रात भर पाण्यात पाय बुडवू कि तोंडात हात घालू असं करतोय ह्यो." म्हातारी
" कधीपासून ? "
" वरीस सहा म्हैने झालं असणत्याल की ! "
मी बघितलं. त्याच्या अंगावर काही उठलेलं दिसत नव्हतं. तळहात तळपाय ही व्यवस्थित होते. ग्लुकोमीटरच्या सहाय्याने शुगर बघितली तरी ती साडेचारशे.
" जेवण झालंय ? " मी विचारलं
" व्हय ... इंजेक्शन घ्यायला लागलं तर चक्कर यायला नको म्हणून मीच बळबळ खायला घालून आणलंय." म्हातारी बोलली.
" किती वेळ झाला असेल जेवण करून ? " मी विचारलं
" दीड दोन घंट झालं असत्याल की ! "
" होय काय ?..यांची साखर वाढलेली आहे."
" व्हय ? "
" होय,अगदी तीनपट."
"आर देवा,आता काय करायचं ? म्हातारी घाबरून बोलली."आता काय कराव लागलं वं?"
" गोडधोड सगळं बंद करावं लागेल."
मी तिला डायबेटिक लोकांचं पथ्य आणि त्यांचा आहार समजावून सांगितला.औषधं लिहून दिली आणि पुढच्या मंगळवारी येण्यास सांगितलं.
" मावशी,कोण आहेत हे ?.. तुमच्यापेक्षा वयान कमी वाटतात म्हणून विचारलं." मी म्हटलं.
" माझ्यापरास ल्हानच हाय त्यो !" म्हातारी बोलली,"माझ्या पाठीवरचा भाऊ हाय. माझ्या लग्नापासंन माझ्याकडंच हाय."
" होय ? "
" डोसक्यानं जरा कमी हाय पर माझ्यावर लै जीव हाय.माझ्या लग्नात आठ धा वर्साचा असंल.... माझं लगीन लागल्यावर दोन वर्सानं ज्यो माज्याकडं आलो तो पुन्हा घरला गेलाच न्हाई."
" काय सांगता ? "
" व्हायचं की !..आमचा बाप मेला तवा चार दिस गेला असंल तेवढाच.थोरलं पोरंगच समजून मोठं केलयं मी त्येला.. लै गुणाचा ! ..कवा कवा तरच डोस्कं फिरल्यागत करतोय.आज सकाळी ओवाळायला जरा उशीर झाला तर बसला लगीच रुसून ! ओवाळल्यावर मग हरकला.कपाळावर नाम बी मोठा लावायला पाहिजे ! ... बघा की केवढा नाम लावलाय ? कपाळभरुन." म्हातारीनं मोठ्या कौतुकानं आपल्या भावाकडे बघितलं. मग बोलली," आता तुम्ही रगात तपासायला टोचलंय की नाही,तर सांजच्यापातुर रुसून बसलं बघा."
" यांचं लग्न ? "
" न्हाय वं ! ... खुळा कावरा हाय भाऊ माजा,कोण द्याचं पोरगी ह्याला ?
.... घास मुटका खाऊन जगतोय तेच बास झालं. मी हाय तवर तरी याची काही फिकीर न्हाई."
" आणि तुमच्या माघारी ? "
" ते त्या पांडुरंगाला कोडं !..
सगळ्या बहिणी आपल्या भावाला बक्कळ औक्ष मिळू दे म्हणत्यात... मी मातूर माझ्या भावा पेक्षा मला जास्त औक्ष मिळू दे म्हणत्या... का माहिताय?
... कारण मला माहित हाय मी हाय तर माझा भाऊ हाय." बोलता बोलता म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आतापर्यंत आमचं बोलणं लहान मुलासारखं ऐकणाऱ्या आपल्या भावाचा हात धरला आणि 'चल रं !' म्हणून ती चालु लागली. मी मात्र त्या जगावेगळ्या बहिणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो..!
डॉ.अशोक माळी यांच्या "माणसं" या पुस्तकातून..!