'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या;
( जग बदलणारे ग्रंथ मधून सन्मापुर्वक )
… आदरणीय नमस्कार
जे तुम्ही शोधत असता ते देखील तुम्हाला शोधत असते.या प्रमाणेच आपला 'जग बदलणारे ग्रंथ' मला शोधत शोधत माझ्यापर्यंत आला.
अनुक्रमणिका वाचली आणि काहीतरी वेगळं सापडलेला भाव मला त्याच्या असण्याची जाणीव करून गेला.
सव्वीस पानांचे आदरणीय दीपा देशमुख यांचे असणारे मनोगत पुस्तकाचे महत्व,त्याच्याबद्दल अनेकांनी लिहिलेली कविता,घटना प्रसंग लेख मनाला जगण्याची उभारी देऊन गेले.
पुस्तकांचं/ग्रंथांचं महत्त्व प्राचीन काळात खूप जास्त होतं.याचं कारण आज कोणतंही पुस्तक स्वस्त आणि सहज उपलब्ध होतं.पूर्वी हस्तलिखितांच्या युगात ग्रंथ म्हणजे सोन्यापेक्षाही महाग असत.तीनशे-चारशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांच्या काळात त्यांच्या 'भागवता'ची किंमत एक हजार रुपये (म्हणजे आजचे जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये) इतकी होती.एवढा पैसा खर्च करून लोक हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करीत असत.भागवत,रामायण,
महाभारत,या पोथ्या सावकारांकडे कर्जासाठी तारण म्हणून त्या काळी स्वीकारल्या जात होत्या. सोन्याचा वर्ख लावून त्या काळी ग्रंथातली अक्षरं लिहीत असत.
हे सर्व एकाच ठिकाणी व एकत्रितपणे वाचायला मिळाले व मनाला फार आनंद झाला.एकूण १८० ग्रंथांनी जग बदललं आहे. त्यातील ५० ग्रंथांची ही सांगड म्हणजे माणुसकी व मानवता यांचा शोध व सांगड घालणारी आहे. हा ग्रंथ म्हणजे समस्त मानव जातीला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे आहेत.
वॉल्डन ही डेव्हिड थोरो यांची ही कादंबरी जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली मी वाचलेली आहे. पण 'वॉल्डन टू' ही १९४८ मध्ये स्किनरनं प्रकाशित केलेली कादंबरी याची नोंद वाचून नवीन दृष्टिकोन तयार झाला.
एरिक फ्रामनं न्यूनगंड म्हणजे काय याविषयी अतिशय अप्रतिम असे विवेचन केलंय.
' न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की मला काही येत नाही असं नसून न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला काही येत नाही.' विचार करायला लावणारं हे विवेचन..
१८५९ मध्ये थोरोनं चार्ल्स डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशिज' हे पुस्तक विकत घेऊन वाचलं.
( पुस्तक विकत घेऊन वाचणारी माणसं ही कोण असतात.ती गरीब नक्कीच नसतात ती तर श्रीमंत असतात.या तत्वाची आठवण झाली.)
या ग्रंथातील सत्याचे प्रयोग,द सेकंड सेक्स, ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम,इमोशनल इंटेलिजन्स, गन्स,जर्म अँण्ड स्टील,सेपियन्स:अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमन काइंड ही ग्रंथ मी वाचलेली आहेत.
हा ग्रंथ म्हणजे खरोखरच जग बदलणारा,माणूस बदलणारा ग्रंथ आहे.
आपले व मनोविकास प्रकाशनचे ( अरविंद पाटकर ) यांचे मनापासून मी आभार मानतो.सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असा हा जग बदलणारे ग्रंथ ( एकुण पृष्ठसंख्या - ४३२ ) माणसाला माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली संशोधने,त्यासाठी त्यांना घ्यावा लागलेला त्रास त्यासाठी त्याला सोसाव्या लागलेला विरोध या सर्वांवरती विजय प्राप्त करून त्यांनी एक आदर्श समाज,आदर्श माणूस घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं.अशा या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचा जीवनपट आपण जिवंतपणे या ग्रंथाद्वारे समोर उभा केला आहे यामध्ये लेखक व प्रकाशक यशस्वी ठरलेले आहेत.
आपल्याकडून असेच सर्वोत्कृष्ट वैचारिक, बुद्धिजीवी ग्रंथांची व पुस्तकांची निर्मिती व्हावी हीच विनंती.
"कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे."
नोम चोम्स्की यांच्या विचारांचा आठवण करून देणारा हा ग्रंथ आहे.आपले पुनश्च एकदा आभार धन्यवाद.