तरी त्या त्रासदायक अवस्थेत मी सूर्य मावळेपर्यंत थांबलो.त्यानंतरचाही पुढचा संपूर्ण आठवडा मी रोज तसाच काढला,परंतु वाघ त्या परिसरात आल्याचं किंवा कोणी त्याला पाहिल्याचं कुठूनही ऐकायला आलं नाही.
त्या दरम्यान एक मात्र झालं,माझ्या नजरेच्या टप्प्यातलं प्रत्येक झुडूप,तसंच वाघ माझ्यावर हल्ला करायला आला,
तर तो कुठल्या वाटांनी येऊ शकतो,त्या वाटांवरून लपतछपत येण्यासाठी तो कुठल्या आडोशांचा वापर करू शकतो,याचा एक तपशीलवार नकाशा माझ्या डोक्यात फिट्ट बसला.
पहिला आठवडा असा वाया गेल्यानंतर या रटाळ,
कंटाळवाण्या कामात थोडा विरंगुळा, म्हणून मी बिरुरच्या रेल्वेस्टेशनवरच्या पुस्तकाच्या दुकानातून काही हलकीफुलकी पुस्तकं विकत घेऊन आलो.पुस्तक वाचत तो ओंडका आपटताना मी माझे कान मात्र उघडे ठेवले होते.अशाप्रकारे दुसराही आठवडा उलटला,पण वाघाची कुठलीही चाहूल लागली नाही..
आता माझा वैताग वाढू लागला होता आणि एकाच जागी जास्त हालचाल न करता बसून काढल्यानं मी कंटाळलोही होतो.एखादी अजून चांगली काही योजना आखता येईल का,याचा विचार करत मी माझं डोकं बरंच खाजवलं,पण मी करत होतो त्यापेक्षा वेगळं मला काहीही सुचलं नाही.वाघाच्या या भागातल्या आधीच्या फेरीला तीन महिने उलटून गेले होते आणि चौथा महिना सुरू झाला होता.वाघानं आखलेली कार्यक्रमपत्रिका बदलली नसली,तर तो कुठल्याही वेळेस इथे येणं अपेक्षित होतं.
माझं आणि चिकमंगळूर जिल्ह्याच्या डेप्युटी कमिशनरचं असं ठरलं होतं,की त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात कुठेही मानवी बळी पडला,तर त्यानं ती खबर त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत किंवा जमेल मला तातडीनं पोहोचवायची.त्या काळात अशी तातडीची बातमी पोहोचवण्यासाठी रनर असायचे.दोनच दिवसांत चिकमंगळूर ते साक्रेपटना रस्त्यावरच्या एका वस्तीवर वाघानं माणूस मारल्याची बातमी मला रनरनं दिली.त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी रनर परत आला.त्यानं दिलेल्या खबरीनुसार, आयरनकेरे तलावाच्या उत्तरेच्या तीरावर वाघानं एका गुराख्याला मारलं होतं.
होगारेहळ्ळीपासून नऊ मैलांवरच्या मडक तलावापासून हे ठिकाण पाच मैलांवर होतं.
आत्तापर्यंत आलेल्या या खबरी समाधानकारक होत्या.म्हणजे वाघ आपल्या ठरावीक मार्गानं पुढे येत होता आणि शेवटचा बळी पडल्याची बातमी मला मिळाली,त्याच्या दोन दिवस आधी तो इथून चौदा मैलांवर होता,म्हणजे या कालावधीत तो आता होगारेहळ्ळीच्या आसपास असणं अपेक्षित होतं किंवा आलेलाही असणं शक्य होतं.शिवाय त्यानं शेवटचं खाणं खाल्ल्याला तीन दिवस होत होते,त्यामुळे आता तो नवा बळी मिळवायला नक्कीच आतुर असणार होता.
त्या संध्याकाळी मी मुदलागिरी गौडाला, नरभक्षक वाघ या परिसरात दाखल झाल्यामुळे, होगारेहळ्ळी आणि आसपास राहणाऱ्या लोकांनी,नारळी-पोफळीच्या बागा आणि खुरट्या झुडुपांच्या जंगलापासून काहीही करून दूर राहावं,असा इशारा द्यायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर मी माझी नेहमीची जागा घेतली,मात्र या वेळेला मी वाचायला पुस्तक आणलं नव्हतं.ह्या वेळेला जमेल तेवढ्या जोरात तो ओंडका आपटून आवाज करायचा,खोकला काढायचा आणि झाडावर जमेल तेवढी हालचाल करायची, जेणेकरून मला त्या वाघाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेता येईल असा मी विचार केला होता.त्या दिवशी काही झालं नाही.संध्याकाळी गावात परत येताना अचानक हल्ला झाला,तर त्याला तोंड द्यायला मी अत्यंत सावध होतो.असे दोन दिवस गेले,पण काहीच घडलं नाही किंवा कुठेतरी अजून एखादा बळी पडल्याचीही काही बातमी आली नाही.
हा वाघ होगारखान डोंगरातल्या जंगलात निघून गेला की काय?की होगारेहळ्ळीला वळसा घालून वायव्येला लिंगडहळ्ळी,किंवा पश्चिमेला सांतावेरीच्या दिशेला गेला?मला शंका येऊ लागली.
सध्या हवा जरा गरम होती आणि सप्तमी अष्टमी असल्यानं चंद्र अर्ध्यावर असणार होता,त्यामुळे मी पुढचे दोन दिवस दुपारी आणि रात्रीही झाडावरच बसायचं ठरवलं.वाघ रात्रीही माझ्याकडे आकर्षित होईल,अशी मला आशा होती.आधीचे पंधरा दिवस मी अत्यंत तणावग्रस्त अवस्थेत झाडावर बसून काढले होते,पण माझ्या हाती काही लागलं नव्हतं.मला त्याचा शीणही जाणवत होता,पण हाती घेतलेलं कार्य तडीस न्यायचं मी ठरवलं होतं.
दुसऱ्या दिवशी दुपारी मी परत माझी जागा घेतली.ह्या वेळेस मी अशा अवघडलेल्या अवस्थेत रात्र काढायला आवश्यक,म्हणून माझं रात्रीचं जेवण,गरम चहानं भरलेला थर्मास,एक ब्लॅकेट,टॉर्च,पाण्याची बाटली अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या होत्याच,परंतु रात्री झोप लागू नये म्हणून बेंझेड्रिनच्या गोळ्याही बरोबर ठेवल्या होत्या.
ओंडका आपटण्याचं काम मी जे दुपारी सुरू केलं,ते रात्री पार उशिरापर्यंत चालू ठेवलं.एका शृंगी घुबडाचा घुत्कार आणि लांब कुठेतरी एक जंगली मेंढी ओरडल्याचा आवाज सोडला,तर सारं जंगल त्या रात्री जरा जास्तच शांत होतं.
दीड वाजता चंद्र मावळला.गडद अंधार पडला आणि गारठाही वाढला.तीनच्या सुमारास माझ्या डोळ्यावर झापड येऊ लागली,म्हणून मी बेंझेड्रिनच्या दोन गोळ्या घेतल्या.
अर्ध्या तासानंतर झुडुपात थोडी खसफस झाली आणि पाठोपाठ तरसाच्या हसण्याचा हलका,पण कर्कश्श आवाज आला.एकतर त्यानं मला पाहिलं होतं किंवा त्याला माझा वास आला होता.काही का असेना,ते लपतछपत अंधारात नाहीसं झालं..
पुन्हा एकदा शांतता पसरली ती पहाटेपर्यंत अबाधित राहिली.त्यानंतर मात्र रानकोंबडे बांग देऊन उगवत्या सूर्याचं स्वागत करू लागले.मी अत्यंत सावधगिरीन झाडावरून खाली उतरलो,कसाबसा होगारेहळीला परत आलो आणि चार तास झोप काढली.
सकाळी अकरा वाजता मी पुन्हा एकदा झाडावर होतो.मी इतका थकलो होतो,की मला हे असे फार काळ चालू ठेवता येणं अवघड होतं.गरम दुपार नेहमीसारखी काही न घडता गेली. तांबट पक्ष्याचा 'टोक टोक' आवाज व कोकिळेची 'कुहू कुहू' एवढेच आवाज येत होते.संध्याकाळ जवळ येऊ लागली,तसे गवतातले किडे टिपणारे तितर पक्षी 'कुकुर्रक कुकुर्रक' करू लागले,जसा सूर्य होगारखान पर्वताच्या मागे बुडाला,मोरांनी 'मियाउ मियाउ म्हणत त्याला निरोप दिला.
आता रात्रीच्या पक्ष्यांनी ताबा घेतला आणि ते आकाशात घिरट्या घालत शीळ घालू लागले.दहा वाजून थोडाच वेळ झाला असेल,चितळ 'अय्याव ! अय्याव ! आवाजात सातत्यानं ओरडून धोक्याचा इशारा देऊ लागले.
एक शिकारी जनावर शिकारीला निघालं होतं आणि हा सदैव सावध हरणांना एक तर त्याचा वास आला होता किंवा त्यांनी त्याला पाहिलं होतं.तो एक साधा वाघ होता का नरभक्षक वाघ होता का एखादा बिबळ्या होता,हे कळणं आवश्यक होतं.मी आता जरा जास्त उत्साहाने तो ओंडका आपटून आवाज करू लागलो.. फक्त हे लाकूडतोडे एवढ्या रात्री जंगलात कसे?'अशी शंका त्या वाघाला येणार नाही,अशी मला आशा होती.
मिनिटांमागून मिनिटं जात होती आणि अचानक पॉक पॉक व्हियाँक!" असा धोक्याचा इशारा देत एक नर सांबर अर्ध्या मैलापेक्षा कमी अंतरावरून ओरडलं आणि नंतर होगारखानच्या दिशेने पुढे गेलं,त्यानंतर स्मशानशांतता पसरली एकीकडे तो ओंडका आपटत मी त्या अर्धवट चंद्रप्रकाशात नजरेच्या टप्प्यात येणारं प्रत्येक झुडूप बारकाईनं न्याहाळत होतो आणि वाघ कुठून झाडाकडे येईल व त्याला असलेल्या लपायच्या जागा,याचा अंदाज बांधत होतो.कुठेही काहीही हलत नव्हतं. त्या सांबराच्या ओरडण्यानंतर एकही आवाज आलेला नव्हता.
आता कुठल्याही क्षणी काहीतरी घडणार आहे, अशी एक विचित्र भावना मला सारखी होत होती.माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, असंही वाटत होतं;परंतु एखादा बारीकसाही आवाज नव्हता.तो ओंडका आपटत,मी जरा खोकलो,थोडा इकडे तिकडे हललो,शेवटी तर मी चक्क उभा राहून खाकरत थुंकलो.तरी काहीच नाही.आणि अचानक तो आला.जादू व्हावी,तसा एक भला मोठा राखाडी आकार जेमतेम दहा यार्डावर असलेल्या झुडुपाआडून प्रकट होऊन, पंख असल्यासारखा,मी बसलेल्या झाडाच्या बुंध्यावर झेप घेत माझ्या खालच्या फांदीच्या दुबेळक्याशी आला.
एक भलंमोठं डोकं माझ्या खालच्या बाजूला फक्त तीन याडांवर अवतीर्ण झालं.मी टॉर्चचं बटण दाबलं आणि त्या प्रकाशात चमकणाऱ्या दोन डोळ्यांच्या मधोमध गोळी झाडली.त्या धमाक्यानं वाघ एक भलीमोठी डरकाळी फोडत मागे जमिनीवर पडला.मी दुसरी गोळी झाडली. पुन्हा एक डरकाळी फोडून तो गायब झाला. शंभर यार्ड अंतरावरून मला 'हर्रफ' असा एक आवाज ऐकू आला,
मग मात्र शांतता पसरली.
मी झाडलेल्या दोन्ही गोळ्या वाघाला नक्की लागल्या होत्या,किमान दुसऱ्या गोळीनं तरी तो मला मारता यायला हवा होता.मात्र मला एवढी खात्री होती,की तो जबर जखमी झाला आहे आणि तो फार दूर जाऊ शकणार नाही.उरलेली रात्र मी डुलक्या मारल्या आणि वाघामागे कशाप्रकारे जाता येईल,हे ठरवायला होगारेहळ्ळीला सकाळी परत आलो..
आल्यावर मी एक छोटीशी झोप काढली,उठून गरमगरम चहा,टोस्ट व बेकनचा नाश्ता करेपर्यंत मुदलागिरी गौडानं कमाल केली.वाघ ज्या झुडुपांमध्ये असायची शक्यता होती,त्या झुडुपांतून आपल्या म्हशी हाकलत नेण्यासाठी त्यानं म्हशींच्या कळपाच्या एका मालकाला तयार केलं होतं.म्हशी जवळ आल्या म्हणजे वाघ आपल्या लपलेल्या जागेतून बाहेर आला असता.
सकाळी नऊ वाजता मी,मुदलागिरी गौडा,दोन वाटाडे,पंधरा म्हशींचा कळप आणि त्याचा मालक,मी जिथे बसायचो,त्या झाडाशी आलो. मी आधी झाडावर चढून,वाघ कुठे दिसतोय का हे पाहिलं पण मला काहीही दिसलं नाही.मी खाली उतरताना झाडाच्या खोडावर,मी झाडलेली पहिली गोळी वाघाच्या चेहऱ्याला किंवा डोक्याला लागून उडालेले रक्ताचे थेंब मला दिसले.खाली उतरल्यावर,तो तिथून ज्या झुडुपामागून गेला,तिथून माग काढताना मात्र, भरपूर रक्त सांडलेलं आम्हाला दिसलं,म्हणजे माझी दुसरी गोळीही वर्मी लागलेली होती.वाघ गेलेल्या दिशेनं आम्ही त्या म्हशींना पांगवून त्यांची एक सैलसर आडवी रांग केली.मी त्या म्हशींच्या मागे चालत होतो.ते दोन वाटाडे माझ्यामागे चालत होते.मुदलागिरी व त्या कळपाचा मालक मी बसायचो त्या झाडावर बसले.आम्ही साधारण दोनशे यार्ड गेलो असू. आम्हाला एक जोरदार गुरगुराट ऐकू आला.म्हशी जागीच थांबल्या आणि मान खाली करत, ज्या दिशेनं आवाज आला,त्या दिशेला शिंगं रोखून त्या उभ्या राहिल्या.
माझ्या थोडं डाव्या बाजूला एक झाड होतं.मी एका वाटाड्याला त्यावर चढून वाघ कुठे दिसतोय का हे बघायला सांगितलं.त्यानं वर चढून पाहिलं आणि खुणेनंच काही दिसत नसल्याचं सांगितलं.दरम्यान,म्हशी थोड्या मागे हटल्या होत्या आणि हाकलूनही पुढे जायला तयार नव्हत्या.त्या म्हशींना तिथेच सोडून मी आणि उरलेला वाटाड्या मागे मुदलागिरीकडे आलो.मी त्याला जाऊन गावातली चारपाच कुत्री घेऊन यायला सांगितलं.तो निघाला लगेचच,पण त्याला परत यायला चांगला दीड तास लागला आणि त्याच्याबरोबर फक्त दोन कुत्री होती. तेवढीच तो मिळवू शकला होता.आम्ही त्या कुत्र्यांना म्हशींवर सोडलं.कुत्री मागे लागली, म्हणून त्या म्हशी पंचवीस एक यार्ड पुढे गेल्या असतील,लगेचच वाघानं भयानक गुरगुराट केला.म्हशी जागीच थांबल्या आणि कुत्री जोरजोरात भुंकू लागली.
मी हळूहळू सर्वात पुढे असलेल्या दोन म्हशींच्या मागे गेलो आणि त्यांच्या पायांमधून मी झुडुपांत लपलेला वाघ दृष्टीस पडतोय का हे बघायचा प्रयत्न केला;पण मला काहीच दिसलं नाही.मी एका म्हशीला पुढे जायला ढोसलं,पण ती गर्रकन माझ्याच दिशेनं वळली.तिच्या लांबलचक अणकुचीदार शिंगांपासून मी थोडक्यात बचावलो.मी अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलो होतो.माझ्या समोर कुठेतरी तो जखमी वाघ होता,की जो कुठल्याही क्षणी माझ्यावर हल्ला करू शकत होता;तर दुसरीकडे माझ्या आजूबाजूला अस्वस्थ म्हशी होत्या,ज्या कधीही उचकून एकत्र येऊन,माझ्यावर चालून आल्या असत्या आणि जरी त्यांचा मोहरा बाहेर आलेल्या वाघाकडे वळला असता,तरी मी त्यांच्या मार्गात आलो असतो.मी काही पावलं मागे आलो आणि त्या झाडावर बसलेल्या वाटाड्याला खाली उतरायला सांगितलं.त्याच्या व दुसऱ्या वाटाड्याच्या मदतीनं म्हशींच्या पलीकडे जिथून तो वाघ गुरगुरला होता,त्या झुडुपांवर आम्ही दगड फेकायला सुरुवात केली.त्याबरोबर लगेचच तो वाघ पुन्हा गुरगुरू लागला,पण तो लपलेल्या जागेतून बाहेर काही येत नव्हता आणि तिथून निघूनही जात नव्हता.
याचा अर्थ तो चांगलाच जखमी होता आणि तिथून निघून जाता येत नाही,अशी त्याची अवस्था असावी.
यापुढे दगडफेक करून काही फायदा नव्हता. म्हशींना तिथेच सोडून मी ते दोन वाटाडे आणि ती दोन कुत्री बरोबर घेऊन एक भलामोठा वळसा घातला आणि वाघाच्या साधारण तीनशे यार्ड मागच्या बाजूला पोहोचलो.तिथून पुढे मात्र आम्ही अतिशय सावकाश पुढे जाऊ लागलो. माझ्या सूचनेनुसार,वाटेतल्या प्रत्येक झाडावर किंवा उंच जागेवरून तो वाघ दृष्टीस पडतोय का, हे आम्ही पाहात होतो.असे आम्ही सुमारे दोनशे यार्ड अंतर कापले असेल,तेव्हा एका झाडाच्या फांदीवर चढलेला वाटाड्या,त्याला काहीतरी दिसल्याच्या खुणा करू लागला.शेवटी खाली उतरून त्यानं माझ्या कानात फुसफुसत,सुमारे पन्नास यार्डावरच्या झुडुपात,एक पांढरी, तपकिरी रंगाची वस्तू दिसते आहे असं सांगितलं. त्या पलीकडे अजून पन्नास यार्डांवर त्या म्हशी होत्या.
वाटाड्याला ज्या फांदीवरून काहीतरी दिसलं होतं,त्या फांदीवर मी त्याला घेऊन चढलो.त्यानं एका झुडुपाकडे बोट दाखवलं.आधी मला काहीच दिसलं नाही,पण नंतर मात्र मलाही काहीतरी पांढरं तपकिरी दिसलं.मी नेम धरला आणि गोळी झाडली.ही गोळी कुठून आली, याबद्दल वाघाच्या मनात गोंधळ उडाला आणि डरकाळ्या फोडत त्यानं समोरच्या म्हशींवर हल्ला चढवला.सर्वात जवळच्या म्हशीवर त्यानं उडी घेतली.बाकीच्या म्हशी एकत्र आल्या. आपली शिंगं रोखत त्या वाघावर चालून गेल्या. वाघ त्या म्हशीच्या पाठीवर बसून जोरजोरात गुरगुरत होता.
मी झाडावर असल्यानं,मला समोरचं दृश्य अगदी स्पष्ट दिसत होतं,पण मी झाडलेली गोळी त्या म्हशीला किंवा आजूबाजूनं पुढे येणाऱ्या म्हशींपैकी एखादीला लागायची शक्यता होती..
बाकीच्या सर्व म्हशी आता तिथे दाटीवाटीनं शिंगं रोखून पुढे आल्या.आपल्याला उद्भवलेला धोका लक्षात येऊन वाघानं त्या म्हशीवरून उडी मारली आणि पंचवीस एक यार्ड अंतरावरच्या एका झुडुपाआड तो दडला.म्हशींकडे लक्ष ठेवून बसलेला वाघ मला स्पष्ट दिसत होता.माझी गोळी वाघाच्या डाव्या खांद्यामागे घुसली आणि वाघाचा खेळ खलास झाला.
वाघाची नंतर तपासणी केली,तेव्हा मला कळलं,आदल्या रात्री झाडलेल्या गोळ्यांमधली पहिली गोळी डोळ्याच्या दोन इंच खाली लागून तिथल्या हाडाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. माझी दुसरी गोळी त्याच्या पोटातून आरपार गेली होती,पोटाला पडलेल्या छिद्रातून त्याची आतडी लोंबत होती.माझ्या तिसऱ्या गोळीनं थेट त्याच्या हृदयाचा वेध घेतला होता.कार शिकाऱ्यांनी झाडलेली गोळी लागून त्याचा जबडा मोडला होता आणि तो नीट जुळून आला नव्हता, त्यामुळे त्याला नैसर्गिक खाद्य मिळवायला जबड्याचा वापर करता येत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून तो नरभक्षक झाला होता.
जी म्हैस त्याच्या ताकदवान पंज्यांनी जखमी झाली होती,तिच्या मालकाला मी नुकसानभरपाई दिली;पण मला खात्री आहे की,
थोड्याच दिवसांत ती बरी होऊन हिंडू फिरू लागेल,कारण म्हशी मुळातच तब्येतीनं ठणठणीत असतात.
अशाप्रकारे येमेडोड्डीच्या नरभक्षकाची कारकीर्द संपुष्टात आली आणि सर्व जिल्हा भयमुक्त झाला परंतु हे सर्वांनी समजून घायला हवे की, परिणामांची काहीही पर्वा न करता अत्यंत बेजबाबदारपणे वागलेल्या या कार शिकाऱ्यांमुळे एकोणतीस निरपराध लोकांचा बळी गेला होता.
कथा पुर्ण झाली.मनस्वी धन्यवाद
नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन
अनुवाद - संजय बापट