हायडलबर्ग हे जर्मनीतलं तसं लहानसं गाव. अवघ्या दीड लाख लोकवस्तीचं.मात्र हायडलबर्ग प्रसिद्ध आहे ते शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही.युरोपातलं पहिलं विद्यापीठ याच शहरात सुरू झालं,सन १३८६ मध्ये.
या हायडलबर्ग शहरात,शहराजवळच,एका पर्वतीसारख्या टेकडीवर बांधलेला किल्ला आहे.या किल्ल्याला 'हायडलबर्ग कासल' किंवा 'श्लोस' म्हणूनही ओळखले जाते.(जर्मनीत किल्ल्याला 'कासल' किंवा 'श्लोस' म्हटलं जातं). तेराव्या शतकात बांधलेला हा किल्ला व्यवस्थित देखरेखीखाली आहे.आणि म्हणूनच पर्यटकांच्या आकर्षणाचं एक मोठं केंद्रही आहे.या किल्ल्याच्या एका भागात एक नितांतसुंदर संग्रहालय आहे 'अपोथीकरी म्युझियम' किंवा 'औषधांचं संग्रहालय.'अत्यंत कलात्मक पद्धतीने,नीट- नेटक्या स्वरूपात,सुबक अशा बरण्यांमधून आणि बाटल्यांमधून,आकृत्या, पुतळे आणि जुन्या यंत्रांमधून त्यांनी औषधनिर्मितीचा इतिहास जिवंतपणे समोर उभा केला आहे.जर्मनीतला हा औषधांचा इतिहास उण्यापुऱ्या आठशे / नऊशे वर्षांचा.मात्र त्यांच्या मते जगातील औषधशास्त्राचे अग्रणी जर्मनच आहेत.
या संग्रहालयात अगदी लाजेकाजेस्तव भारताचा उल्लेख करण्यात आलेला आहे.आणि तोही असा की,'वास्को-डी-गामाच्या भारतभेटीनंतर भारतातल्या जडी-बुटींच्या औषधांची ओळख युरोपला झाली.'
गेल्या महिन्यात मी या हायडलबर्गच्या किल्ल्यातल्या औषधी संग्रहालयाला भेट द्यायला गेलो होतो,तेव्हा तिथे आसपासच्या कुठल्यातरी शाळेतली मुलं आली होती.चौथी-पाचवीतली ती पोरं,त्या संग्रहालयात बागडत होती,चिवचिवत होती.मात्र ती पोरं फार सूक्ष्मतेने प्रत्येक गोष्ट बघत होती,आपापसात जोरजोरात चर्चा करत होती.आणि गंमत म्हणजे प्रत्येकाच्या हातात कागद होता आणि ती पोर त्या कागदावर काही तरी लिहीत होती.जरा विचारल्यावर कळलं की, ही सहल म्हणजे त्या मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि त्या मुलाना ह्या संग्रहालयाच्या भेटीवर नोट्स काढायच्या .ह्या नोट्सच्या आधारावर त्यांची युनिट टेस्ट होणार आहे.खरं सांगतो,माझ्या काळजात लक्कन काही तरी हाललं...! आपल्या देशात असं होऊ शकेल.. ?
ती मुलं काय मत घेऊन बाहेर पडतील.. ? की जगामधे औषधांच्या / चिकित्साशास्त्राच्या क्षेत्रात (फक्त एक हजार वर्षांचा या संबंधात इतिहास असलेली) 'जर्मनी' सर्वांत पुढे आहे.भारत तर त्यांच्या खिजगणतीतही नसेल..! आणि आपण इतके कर्मदरिद्री की,तीन हजार वर्षांचा चिकित्साशास्त्राचा,औषधी विज्ञानाचा खणखणीत इतिहास असणारे आपण....... यातलं काहीही आपल्या नवीन पिढीला दाखवू शकत नाही..!!
साऱ्या जगाला जेव्हा चिकित्सा,मेडिसिन, अपोथिके,फार्मेसी यांसारखे शब्दही माहीत नव्हते,
त्या काळात,म्हणजे इसवी सनाच्या सातशे वर्षं आधी,जगातील पहिल्या (तक्षशीला) विद्यापीठात चिकित्साशास्त्र नावाचा सुव्यवस्थित विभाग होता..! इसवी सनाच्या सहाशे वर्षं आधी सुश्रुताने 'सुश्रुत संहिता' हा चिकित्साशास्त्रावरचा परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता.सुश्रुत हा जगातील पहिला ज्ञात 'शल्य चिकित्सक (सर्जन) आहे. ह्या शल्य चिकित्सेसाठी तो १२५ प्रकारची उपकरणे वापरायचा.या सर्व उपकरणांची यादी सुद्धा त्याने दिली आहे.सुश्रुताने ३०० प्रकारच्या वेगवेगळ्या 'शल्य चिकित्सा' (ऑपरेशन्स) केल्याचे लिहून ठेवले आहे.
अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे सुद्धा त्याने सविस्तर वर्णन केले आहे.लक्षात घ्या,हे सारे पावणेतीन हजार वर्षांच्या आधीचे आहे..! युरोपसकट साऱ्या जगाला या शब्दांची तोंडओळख होण्याच्या किती तरी आधीचे !
आजच्या विद्यार्थ्यांना तर जाऊच द्या,पण जाणत्या पिढीला तरी यातलं कितीसं माहीत आहे..?
चिकिस्ताशास्त्राच्या प्राचीनतेसंदर्भात तीन प्रकारच्या प्रणालींचा विचार केला जातो -
१. भारतीय चिकित्सापद्धती-प्रामुख्याने आयुर्वेद
२. इजिप्शियन प्रणाली
३.ग्रीक प्रणाली
यातील इजिप्शियन चिकित्सा प्रणालीचा मूळ पुरुष मानला जातो.इसवी सनापूर्वी सत्तावीसशे वर्षं हा त्याचा कार्यकाळ मानला जातो.अर्थात आजपासून सुमारे पावणेपाच हजार वर्षं जुना मात्र शास्त्रशुद्ध रीत्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती.प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भुता-खेतांपासून) वाचविण्यासाठी काही औषधं वापरण्यावर भर होता.यातील इजिप्शियन प्रणालीत,पिरामिडमध्ये 'ममीज' ठेवण्याचं शास्त्र त्यांना माहीत असल्याने प्राचीन मानलं जातं.या प्रणालीत 'इमहोटेप'(Imhotep) हा अनेक विषयांत पारंगत असलेला गृहस्थ,इजिप्शियन चिकिस्ता प्रणालीचा मूळ पुरुष मानला जातो.अर्थात आज पासून सुमारे पावणे चार हजार वर्षे जुना.मात्र शास्त्रशुद्धरीत्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती.प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भूता-खेतांपासून) वाचवण्यासाठी काही औषध वापरण्यावर भर होता.
ग्रीक चिकित्सा प्रणाली ही देखील बरीच जुनी.आजचे डॉक्टर्स ज्या 'हिप्पोक्रेट' च्या नावाने,व्यवसाय सुरू करण्याआधी,शपथ घेतात,तो हिप्पोक्रेट हा ग्रीसचाच.सुश्रुतच्या सुमारे दीडशे वर्षं नंतरचा,ह्या हिप्पोक्रेटच्या काळात भारतात चिकित्साशास्त्र विकसित स्वरूपात वापरले जात होते.ख्रिस्तपूर्व सातव्या-आठव्या शतकांत तक्षशीला विद्यापीठातील चिकित्साशास्त्राचा अभ्यासक्रम शिकायला अनेक देशांचे विद्यार्थी येत होते.आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की,हिप्पोक्रेटच्या लेखांमधे सुश्रुत संहितेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
पुढे येशू ख्रिस्ताच्या काळात 'केलसस' (-ulus Cornelius Celsus- ख्रिस्तपूर्व २५ ते ख्रिस्तानंतर ५० वर्षे) ने चिकित्साशास्त्रासंबंधी 'डीमेडीसिना'हा आठ भागांचा मोठा ग्रंथ लिहिला.यात सातव्या भागात काही शस्त्रक्रियांची माहिती दिलेली आहे.आणि गंमत म्हणजे यात वर्णन केलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची माहिती ही या ग्रंथाच्या सहाशे वर्षं आधी सुश्रुतने लिहिलेल्या 'सुश्रुत संहिता' मधील मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेच्या माहितीशी तंतोतंत जुळणारी आहे..!
मुळात भारतात आयुर्वेदाची सुरुवात कोठून झाली हे कोणालाच ठामपणे सांगता यायचं नाही.ऋग्वेदात आणि अथर्ववेदात यासंबंधी उल्लेख सापडतात.अथर्ववेदात तर चिकित्साशास्त्रासंबंधी अनेक टिपण्या आढळतात.आणि म्हणूनच आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद समजले जाते.आता अथर्ववेदाचा निश्चित कालखंड कोणता..? कठीण आहे सांगणं.कोणी ख्रिस्तपूर्व १२०० वर्षे सांगतात,तर कोणी ख्रिस्तपूर्व १८०० वर्षे.
आणि या ग्रंथामधूनही 'आयुर्वेद' हा नवीन शोधलेला प्रकार आहे,असं जाणवत नाहीच. त्या काळात असलेल्या ज्ञानाला अथर्ववेदासारखा ग्रंथ शब्दबद्ध करतोय असंच दिसतंय.याचाच अर्थ,आपली चिकित्सा पद्धत ही अतिप्राचीन आहे.
मुळात आयुर्वेद हे अत्यंत सुव्यवस्थितपणे रचलेलं चिकित्सा / आरोग्य शास्त्र आहे.चरक आणि सुश्रुतांच्या परंपरेला त्यांच्या शिष्यांनी पुढे नेलं.पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतातील वाग्भटांनी चरक,सुश्रुत आणि कश्यप यांच्या ग्रंथांना एकत्र करून,त्यांच्या आधाराने एक ग्रंथ लिहिला.त्यालाच 'अष्टांग हृदय' असे म्हटले जाते.
यातील रोग / विकारांवर अधिक काम करून आठव्या शतकात वैद्य माधव ऋषी यांनी 'निदान ग्रंथ' लिहिला.या ग्रंथाची ७९ प्रकरणं आहेत, ज्यात रोग,त्यांची लक्षणं आणि त्यावरील उपचार याबाबत सखोल विवेचन केलेले आहे.यानंतर 'भावप्रकाश','योग रत्नाकर' हे ग्रंथ तयार झाले. शारंगधरांनी औषधनिर्मितीच्या प्रक्रियेसंबंधी बरेच लिहिले.पुढे अकराव्या शतकात मुस्लीम आक्रांतांची आक्रमणं सुरू झाल्यानंतर भारतातही आयुर्वेदाची परंपरा क्षीण झाली.
मात्र आज जगात इजिप्शियन चिकित्सा पद्धती अस्तित्वात नाही.ग्रीक चिकित्सा पद्धत (यूनानी) काही प्रमाणात आहे.मात्र त्यातील 'शुद्ध युनानी' औषधं किती,हा प्रश्नच आहे.जगात आज बोलबाला आहे तो अँलोपॅथिक (ऍलोपॅथिक)पद्धतीचा,जी साधारण आठशे / नऊशे वर्षांपासून विकसित होत आलेली आहे.होमियोपेथी तर अगदी अलीकडची.१७९० मध्ये जर्मनीत सुरु झालेली.
या सर्व पार्श्वभूमीवर किमान तीन / चार हजार वर्षं जुनी असणारी आणि आजही जगभर प्रचंड मागणी असणारी 'आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती' ही अद्वितीय ठरते.फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही,हेच काय ते दुःख आहे..!
१४ फेब्रुवारी २०२३ लेखाचा पुढील भाग..