'प्रेम' या जगात जिवंत असणारा शब्द व जिवंत असणारी भावना,असं म्हणतात प्रेमानं जग जिंकता येतं.जे प्रेम करतात आणि ज्यांना प्रेम समजलं आहे.त्यांना प्रेम ही एक अशी समर्पित भावना आहे. जी सर्वाठायी एकसमान आहे.या सत्याची ओळख झाली आहे.कारण प्रेम या भावनेमध्येच आपण सर्वजण एकच जीवन जगतो.
मित्र नाही अशी एकही व्यक्ती नाही.मित्र म्हणजे प्रेम व विश्वास,मैत्रीच्या कथा ऐकतच आपण मोठे झालेलो आहे.
अशीच एक कथा आहे.जी जोओ व त्याचा मित्र पेंग्विन डिनडिमची.
साधारणपणे २०११ ठिकाण होते.ब्राझिल शहरातील रियो दे जानेरियोच्या जवळ एक समुद्रकिनारा..!
समुद्रातून मालवाहतूक करणारे मोठे जहाज या जहाजाला असणाऱ्या तेलाच्या टाकीला गळती लागली. लाखो लिटर तेलाचा तवंग समुद्राच्या पृष्ठभागावरती पसरला. त्यामध्ये अनेक समुद्री जीवांनी केविलवाण्या परिस्थितीत या जगाचा निरोप घेतला. त्याच दरम्यान जोओ हा मानवी भावनेशी जोडला गेलेला माणूस,ज्याला प्रेमाची भाषा चटकन कळत असे.
तो समुद्र काठावरून फिरत असताना त्याला काहीतरी पडलेले दिसलं.उत्सुकता म्हणून तो जवळ गेला पाहतो तर एक पेंग्विन मृत्यूच्या जवळ जाऊ लागला होता..जोओच्या मनात कालवाकालव झाली.तो त्याला घेऊन आपल्या घरी गेला.
पेंग्विन म्हणजेच डिनडिम पूर्णपणे तेलाने माखला होता. श्वास घेण्यास अडचण येत होती. भुकेने तो कासावीस झाला होता.जोओने त्याला आंघोळ घालून स्वच्छ केले. त्याला प्रेमाने खाऊ घातले. हळूहळू डिनडिम बरा होऊ लागला. आठ ते दहा दिवस तो जोओ जवळ राहिला. या दिवसात तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला.डिनडिम आपल्या मूळ घरी निघून गेला.
त्याच घर तसं फारच दूर होतं कारण पेंग्विन हे ध्रुवावर राहतात.डिनडिम निघून गेला जोओ परत आपलं सरळ साधं जिवन जगू लागला.असं म्हणतात.आनंदी राहणे ही साधी गोष्ट आहे,पण साधे राहणे खूप अवघड काम आहे..! पण तो हे अवघड काम सहजच करत होता.कारण त्याला प्रेम समजलं होतं.
काही महिने असेच गेले आणि सकाळी लवकरच त्यांच्या घरासमोरील अंगणातून एक ओळखीचा आवाज आला.बाहेर जावून जोओ बघतो,तर डिनडिम आला होता.(डिनडिमबाबत घडलेली घटना ही नेहमीप्रमाणेच समजल्यामुळे) अचानक डिनडिमला समोर बघून जोओचं मन प्रेमाने भरून गेले. त्याने त्याला पळत जाऊन मिठीत घेतले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.डिनडिम ही प्रेम करू लागला.तो साधारणतः जूनमध्ये परत आला होता. त्यानंतर तो बरेच महिने जोओच्या घरी राहिला. घरातील दुसऱ्या कोणत्याही माणसाला डिनडिम जवळ येऊ देत नव्हता. तो फक्त ज्यानं त्याला जीवनदान दिलं त्या जोओवरतीच जिवापाड प्रेम करत होता. त्या आपल्या मित्रासाठीच तो परत आला होता.
डिनडिम ठरलेल्या वेळी न चुकता यायचा व तो जून ते फेब्रुवारी ( जवळपास ८ महिने ) जोओ जवळ राहायचा व परत निघून आपल्या घरी जायचा.
.. आणि आश्चर्यचकित करणारा हा प्रवास होता.
तब्बल ५ हजार किलोमीटर अंतराचा एवढ्या दूरवरून सर्व संकटांचा सामना करत डिनडिम आपल्या प्राणप्रिय मित्र जोओला भेटण्यासाठी येत होता.
काय ते प्रेम,काय ती भावना खरचं अचंबित करणारी आहे.'निसर्गाची नवलाई' प्रेम शिकवणारी आहे.
सत्यकथा..सतीश खाडे यांचा पाॅडकास्ट व युट्युब वर आधारीत..!
सदरची कथा 'मासिक शिक्षणयात्री' मध्ये 'प्रेम' या नावाने सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकाशित केली. सर्वच संपादकीय मंडळाचे आभार..