या ब्रह्मांडातील सर्व सिद्धांत हे न चुकता फक्त एकाच व्यक्तीच्या दिशेने दिसतात ती व्यक्ती म्हणजे तुम्ही..!
वॉल्ट व्हिटमन
याचा सत्वशील विचार फार दिवसांपूर्वी वाचला होता. मी एका कंपनीमध्ये शारीरिक कष्टाची कामे करतो. ज्या ठिकाणी लोखंड वितळले जाते. इथे उष्णतेचे तापमान मोठे असते. तरीही मी माझे आयुष्य शांततेने जगत आहे. पुस्तके मला आयुष्यात गारवा देतात.परिस्थिती बदलण्याअगोदरच मी बदलतो,माझ्या गरजा कमीत कमी आहेत.मी माझं जीवन सर्वांगीन सुखी समाधानी आनंदी जगतो. कारण मी
"वाचतो " पुस्तक वाचणे हे माझे एक वेळेचे जेवण आहे. मी जास्तीत जास्त पुस्तकांमध्ये म्हणजेच माझ्या 'मी' मध्ये असतो. माझी एक बहीण म्हणते तू पुस्तकाच्या फार जवळ आहेस. तुझं जीवन हे अतिसामान्य आहे. दुसरी बहीण म्हणते तुझं आत्ताच जीवन सर्वोत्तम आहे. माझी पत्नी मला नेहमीच म्हणते,अहो खरंच तुम्हाला काही कळत नाही...!
माणसाचं जीवन जन्माला आल्यानंतर साधं सोपं सरळ असतं पण आपण ते अतिशय गुंतागुंतीचे करून ठेवतो.
स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...!
हेन्री डेव्हिड थोरो चरित्र निबंध,मधुश्री पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं. आदरणीय जयंत कुलकर्णी यांनी अनुवाद केलेलं एक दुसरे पुस्तक नुकतंच वाचून संपवले.
हेन्री डेव्हिड थोरो याच्या मृत्यू नंतर श्रद्धांजली वाहताना. एमर्सन म्हणाला, " थोरो एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही." त्याने त्याच्या निरोगी शरीराचे आणि मनाचे कौतुक केले." तो अचूक पणे सोळा रॉड चालू शकत असे. जे अंतर इतरांना पट्टीनेही एवढे अचूक मोजता येणार नाही. तो भर रात्री जंगलात रस्ता चुकत नसे कारण तो नजरेने जंगल पहातच नसे तर पायाने पाहत असे. झाडांचा घेर व उंची तो नुसत्या नजरेने पाहून सांगू शकत असे. कुठल्याही प्राण्यांचे अचूक वजन तो नजरेने पाहून सांगत असे. डब्यातून पेन्सिल काढायच्या वेळी प्रत्येक वेळा तो बरोबर एक डझन पेन्सिली बाहेर काढायचा. ( त्याचा पेन्सिल उत्पादन करण्याचा व्यवसाय होता.) तो उत्कृष्ट पोहायचा, बोट वल्हवायचा, पळायचा स्केटिंग करायचा आणि मला वाटते पायी प्रवास करण्यामध्ये त्याचा हात धरणारा अमेरीकेत सापडणार नाही. त्याचे शरीर मन आणि निसर्ग एका अज्ञात धाग्याने बांधले गेले होते."
त्याने नंतर म्हटले," एवढे तारतम्य बाळगणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही. त्याचे हात कणखर होते. तर इच्छाशक्ती प्रबळ होती. त्याच्या बुद्धीमत्तेबद्दल तर बोलायलाच नको." भाषणाचा शेवट त्यांनी एखादी भविष्यवाणी करावी तसा केला."आपल्या देशाने किती महान पुत्र गमावला आहे याची अजून आपल्या देशवासियांना कल्पना नाही. त्यांनी जे काम सुरू केले आहे ते पूर्ण करणे कोणाला शक्य होईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हे काम अर्धवट टाकून या माणसाने ग्रंथाच्या पानावरुन निघून जावे हे कोणाच्याही मनात न पटणारी गोष्ट आहे. चीड आणणारी गोष्ट आहे. त्याने त्याच्या कामाची ओळख त्याच्या एवढ्या थोर माणसांना करून दिली असती तर बरे झाले असते एवढेच म्हणणे आपल्या हातात आहे. पण मला खात्री आहे तो समाधानाने गेला असणार. त्याचे हृदय विशाल,प्रेमळ व अनुकंपेने सदा भरलेले असायचे.जेथे सद्गुण आहेत, सौंदर्य आहे, निसर्ग आहे तेथे त्याला त्याचे घर सापडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना..!
हे सर्व माझ्यासाठी थरारक व नाविन्यपूर्ण शोध घेण्यासाठी पुरेसं होतं.ज्या व्यक्तीचं जाण ज्या,व्यक्तीचा मृत्यू इतका सर्वश्रेष्ठ होता तर त्याचं जीवन किती उच्च व सर्वोत्तम असेल याचा न विचार करायला लागलो. व चरित्र माझ्या 'मी' मध्ये सामावून घेऊ लागलो.
" ....राहण्यासाठी हे जग सुंदर करावे या उद्देशाने मी या जगात आलो नाही तर ते जसे असेल त्यात आनंदाने राहावे म्हणून !..." असे म्हणणारा माणूस आनंदाने आला आणि आनंदाने गेला असेच म्हणावे लागेल... आता थोरोच्या जाण्याचा शोक करायचा कि कसे मारायचे हे त्याने शिकवले यासाठी त्याचे आभार मानायचे हे मात्र मला उमजत नाही.
( जयंत कुलकर्णी लेखक ) यांचे मी विशेष आभार मानतो.
थोरो अवलिया माणूस १८४२ च्या जुलैमध्ये थोरोने मार्गारेट फुलरच्या भावाबरोबर म्हणजे रिचर्ड फुलर बरोबर वाचूसेटवर भ्रमंती केली. या भ्रमंतीचे वर्णनाचे रूपांतर शेवटी एका मोठ्या लेखात झाले. ही सफर त्यांनी अगदी आरामात केली. त्यावेळी थोरो लिहितो, "मला आता कळले आहे की माणसाचे आयुष्य हे त्याच त्याच गोष्टीने बनलेले आहे.आणि त्याचे त्या गोष्टींशी संबंधही तेच तेच आहेत. माणसामध्ये नवीन काही ढुंडाळण्यास बाहेर पडण्यात काही अर्थ नाही. पण निसर्गामध्ये तसे नाही..."
असे स्वतंत्र निराळं जिवन मी आजपर्यंत कधी जगलोच नाही या न जगलेल्या व हातातून निघून गेलेल्या जीवनाबद्दल मी आता फार हळहळत आहे.
मला लवकरच तळ्याकाठी माझ्या स्वतःच्या जागेत राहायला जावे असे सतत वाटत आहे. जिथे माझ्या कानावर फक्त वाऱ्याने बांबूच्या बनात घातलेली शीळ पडेल.जर सगळं मागे सोडून तेथे जाता आले तर बरंच आहे. पण माझे मित्र मला विचारतात," तेथे जावून तू करणार काय ? " आता यांना काय सांगू ? कि ऋतू बदलताना निसर्ग पाहणे या सारखा दुसरा उद्योग या जगात नव्हता आणि आताही नाही...."
हे प्रामाणिक उत्तर आणि जगणं पाहून मलाही वाटत होतं की आपल्या जीवनामध्ये रिकामी जागा भरपूर आहे.
एकदा थोरोने एमर्सनला लिहिले, " माणसाचा मृत्यू ही खरे तर किती सरळ साधी गोष्ट आहे! पण माणसाला ते मान्य नाही.निसर्गाने जे काही गमावले आहे ते सगळे त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात परत मिळते. पण मृत्यू सुंदर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याकडे एक अपघात म्हणून न पाहता एक सृष्टीनियम म्हणून पाहतो तेव्हा तो जन्माइतका सर्वसाधारण असतो. मृत्यूत विशेष असे काही नाही. माणसे इथिओपियात मरतात,माणसे इंग्लंडमध्ये मरतात आणि विस्कॉनसिनमध्येही मरतात आणि शेवटी या जीवसृष्टीत अमरत्वाचा मक्ता घेऊन कोण मागे उरले आहे? यावर्षी दिसते ते गवत आणि दिसणाऱ्या वनस्पती या काय मागच्या वर्षातील आहेत का? निसर्गातील गवताचे प्रत्येक पाते, फांदीवरील प्रत्येक पान हे ऋतु बदलात आनंदाने धारातीर्थ पडते आणि तेवढ्याच आनंदाने परत फुटते. ऋतुचक्रातील चार महिन्याची ती करामत असते.मृत वाळलेली झाडे,सुकलेले गवत व वनस्पती या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग नाहीत का? आहेत..! शिशिरातील बदललेली मनाला भुरळ पाडणारी झाडे शेवटी मृतवत होणाऱ्या पानांचा रंगामुळेच प्रेक्षणीय आहेत ना? खरे तर हे दृश्य म्हणजे शिशिरातील वार्याने निसर्गाच्या कॅनव्हासवर चितारलेल्या वेदनाच असतात की ! तरीपण आपण त्यांचा आनंद लुटतो."
जॉनच्या ( थोरोचा भाऊ ) त्याला मृत्युचा खरा अर्थ समजला. एवढेच नव्हे तर मृत्यू शेवटी स्वीकारावा लागतो व कसा स्वीकारावा लागतो हेही त्याला समजले.प्रत्येक तरुणाला ते त्याच्या आयुष्यात कधी ना कधी शिकणे भागच आहे आणि हा अनुभव जवळच्या व्यक्तीचा मृत्यूनेच येऊ शकतो. जसा हेन्री थोरोला जॉन थोरोच्या मृत्यूने आला.जसे तलवारीचे तापलेले पाते पाण्यात बुडल्यावर एकदम गार होते तसे काहीसे थोरोचे झाले. त्याच्या भावनांची काही काळ वाफ झाली,पण त्यामुळे त्याच्या विचारांवरील व स्वीकारलेल्या मार्गावरचा त्याचा विश्वास अजूनच दृढ झाला. तलवारीप्रमाणे त्याला अजूनच धार चढली.
हे सर्व वाचत असताना मी बधिर झालो होतो. आजपर्यंत,या क्षणापर्यंत ज्या सत्याकडे पाठ फिरवत होतो. तेच माझ्याकडे पाहून हसत होते. मला अजून बरंच जगणं समजून घ्यायचं आहे.
माणूस त्याच्या आयुष्यात फक्त एकच अंत्यविधी आणि एकच शव पाहू शकतो. ( म्हणजे त्याला एकदाच मनापासून वाईट वाटू शकते.)
सगळेजण आपापली जर्नल लिहायचे.हॉवथॉर्नही जर्नल ठेवत होता ज्यात त्याने हेन्री थोरोचे वर्णन खालील प्रमाणे केलेले आढळते.-" थोरोचे व्यक्तिमत्व आगळेवेगळे आहे. त्याच्या रक्तात भिनलेला जंगलाचा आणि निसर्गाचा भाग अजून शिल्लक आहे. पण तरीही समाजामध्ये मिसळून राहण्याचे त्याचे कौशल्य हे खास त्याचे असे आहे."
त्याच्या स्वभावामुळे काही गैरसमज निर्माण होत,पण तो त्याचीही मजा घेत असे.दोन दिवसांपूर्वी मला मारिया मावशीने डॉ.चॅमर्सचे चरित्र वाचण्यास सांगितले. मी अर्थातच तसे काही वचन तिला दिले नव्हते. काल ती ओरडून शेजारच्या जेन मावशीला ( हिला कमी ऐकू येतं असे ) सांगत होती, काय माणूस आहे ! काल दिवसभर त्या बेडकांचे ओरडणे एकत उभा होता पण मी वाचायला सांगितले तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्याने...( थोरो ) "
चरित्र वाचत असताना मी जीवन जगण्याचं शिकत होतो.
सविनय कायदेभंग हा लेख कर भरला नाही म्हणून हेन्री डेव्हिड थोरोने तुरुंगात गेल्यावर लिहिला. महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला,त्यात ते म्हणाले,"माझ्या अमेरिकन मित्रांनो ! अमेरिकेने मला थोरोंच्या रूपाने एक गुरु दिला आहे. मी जो लढा उभारला आहे, त्याचे ठाम व वैचारिक पुष्टीकरण मला थोरो यांच्या ' ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स'या निबंधात मिळाले आणि दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होतो, ते काही चुकीचे नव्हते याचा हा मोठा पुरावा आहे.
हे वाचून मी आश्चर्यरित्या थक्क झालो.
मला आज निसर्गासाठी काहीतरी बोलायचं आहे. पूर्ण स्वातंत्र्य आणि या अफाट घनदाट निसर्गासाठी बोलायचं आहे. पण मला निसर्गावर बोलायचे नाही.या समाजाचा एक घटक समजून मी हे बोलणार नाही तर समाज या निसर्गाचा एक घटक आहे असं समजून मी बोलणार आहे.
ही भटकंती तर माझ्या मनाला चटका लावून गेली.
एखादा माणूस रानावनाच्या प्रेमापोटी त्या रानात भटकू लागला तर समाज त्याला निरुद्योगी उडाणटप्पू म्हणतो. पण एखादा माणूस जर झाडे तोडण्याच्या कामावर देखरेखीसाठी त्या जंगलात दिवसभर उभा राहिला,पृथ्वीवरचे वृक्षांचे आवरण अकाली खरडू लागला तर मात्र प्रचंड उद्योगी माणूस म्हणून त्याचे प्रचंड कौतुक होते. मला तर कधी कधी वाटते गावकऱ्यांना या जंगलात काही रस उरलेला नाही म्हणूनच ते ही जंगले देशोधडीला लावत आहेत.
मला वाटते वरील वर्णन म्हणजे आपले तत्वहीन जीवनच आहे.
निरातिशय सौंदर्य अद्वितीय असते पण आपली इंद्रिये त्याचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे घेतात किंवा त्याला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतात आणि त्याचे रसग्रहणही करतात. एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात आपण ते
" पाहतो ", संगीतात आपण ते
" ऐकतो ", सुगंधात त्याचा आपण
" वास घेतो ",खाण्याच्या पदार्थात आपण त्याची " चव " घेतो, आणि आपली प्रकृती उत्तम असेल तर तो आनंद आपल्या शरीरभर पसरलेला असतो याची आपण आणि " अनुभूती " घेतो. या आनंदाचे प्रकटीकरण वेगवेगळे आहे पण त्याची अनुभूती एकच आहे तिचे वर्णन करणे अवघड आहे ते फक्त अनुभवानेच उमजते.
प्रेमाचा हा विस्तार व व्याप्ती पाहून मी प्रेममय झालो.
थंडीतील एक भटकंती करीत असता .. ! कानी गुंजते फक्त व्हिनस आणि मार्सची कुजबुज ज्याने आपल्या रूदयात प्रेमाची ऊब वाढते. एक दैवी आनंद देणारा पंथ ज्यात देव एकमेकांस भेटतात, पण मनुष्यास ते दिसत नाही. इकडे पृथ्वीला ढुलकी लागली आहे पण आसमंत आकाशातून गिरक्या घेत खाली येणाऱ्या बर्फाच्या फुलांनी जिवंत होतोय. जणूकाही धान्याची देवता सेरेस चांदीसारख्या चमचमणाऱ्या धान्याची पृथ्वीवर उधळण करीत आहे.
हे वर्णन नैसर्गिक अविस्मरणीय, अलौकिक व अगम्य आहे.
रात्र आणि चंद्रप्रकाश यामध्ये चंद्रप्रकाशात चालतानाही आपल्या विचारांना,मला वाटते, गुलाबी किंवा तांबूस छटा नसते पण आपण विचाराने आणि नैतिकतेने अल्बिनो आहोत हे उमगते.. सत्याच्या सूर्याचा आपल्याला त्रास होतो. हे आपल्याला चंद्रप्रकाशात चालताना उमगते. हा चंद्राशी बोलण्याचा..!
खरंच माझ्याशी चंद्र बोलेल का ?
कॅप्टन जॉन ब्राऊन या क्रांतीकाराबद्दल मला नाविन्यपूर्ण, पराक्रम जीवनाची कथा परिपूर्ण स्वरूपात वाचावयास मिळाली. या क्रांतिकारकाला फासावर लटकवण्यात आले. त्याचे जीवन तत्व होते. त्याबद्दल लिहून ठेवले आहे." त्याने नेहमीच त्याचे उच्चार दुरुस्त करण्यापेक्षा एखाद्या पडणाऱ्या माणसाला आधार देण्यात धन्यता मानली.
मी निशब्द आहे. देशप्रेम स्वातंत्र्य निष्ठा या गोष्टी मला नव्याने समजल्या.
" मनुष्य प्राणी नावाच्या वनस्पतीं बद्दलही हेच म्हणता येईल.आपण मात्र या वनस्पती बद्दल विचार करताना भेदभाव करतो व या वनस्पतीच्या मृत्यूबद्दल आक्रोश करतो. जोपर्यंत आपले मृत्यूचे शोकगीत 'विजय' गानात बदलत नाही तोपर्यंत हा भेदभाव नष्ट होणार नाही. किंवा आपल्या शोकमग्न सुस्कारे हे शेतांवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाजाप्रमाणे जेव्हा मंद होतील तेव्हा तो भेदभाव नष्ट झाला असे म्हणता येईल."
" हे पुस्तक वाचल्यावर अगदी खोलात जाऊन प्रत्येकाने वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर भोगाला सर्वस्व मानणाऱ्या हल्लीच्या मानवजातीला त्याशिवाय अजून काहीतरी जीवनात आहे हे निश्चितच उमगेल..."
... जाता जाता
एक सत्य घटना आहे. कोलंबसन अमेरिकेचा शोध घेण्यासाठी मोठ्या सफरीला निघाला. जहाजावर त्यांनी तीन महिन्याचे धान्य - पाणी घेतले. इतकेच नव्हे तर काही कबुतरेही त्यांनी आपल्यासोबत घेतली.या प्रवासात त्याला कुठेही जमीन किंवा एखाद्या बेटाचा तुकडाही दृष्टीपथास पडला नाही. सगळीकडे फक्त पाणीच पाणी. एके क्षणी प्रवासात सोबत घेतलेले सगळे अन्न-धन्य संपायला आले. शेवटी तर केवळ तीन दिवसांचा शिधा तेवढा उरला.
रोज सकाळी कोलंबस कबुतरांना आकाशात उडवायचा पण कुठेही जमीन नसल्यामुळे कबुतरे पुन्हा बोटीवर परतायची. जेव्हा कबुतरे परतायची, तेव्हा कोलंबस खूप उदास व्हायचा ! सभोवताली फक्त अथांग समुद्र-पाणीच पाणी. तो दिवस असाच गेला.दुसऱ्या दिवशी कुठेतरी किनारा मिळेल म्हणून त्याने आपली कबुतरे आकाशात सोडली, पण याही वेळेला कबुतरे परत जहाजावरच परतली.
तीन महिन्यात एखादा जमिनीचा तुकडा देखील दृष्टिपथात दिसलेला नव्हता. आता तर सगळेच अन्न-धान्य, पाणी संपून गेले होते. बरं परत फिरावं म्हटलं तर ते शक्य नव्हते. तिसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कोलंबसने आपली कबुतरे आकाशात सोडली. कबुतरे चारही दिशांना पांगली. मुख्य म्हणजे बराच वेळ झाला तरी परतली नाहीत. कोलंबसला आशेचा मोठा किरण दिसला. तीन-चार तास झाले तरी कबुतरे परत यायची काही चिन्हे दिसेनात. तेव्हा कोलंबसच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तो सहकाऱ्यांना म्हणाला,'इतक्या दिवसांच्या प्रवासाचे-मेहनतीचे फळ आपल्याला मिळते आहे. ज्याअर्थी कबुतरे परत फिरली नाहीत, त्याअर्थी आसपास इथेच कुठेतरी जमीन आहे. कोलंबसच्या साथीदारांच्या डोळ्यात पाणी आले. अखेरीस त्यांना किनारा दिसला. कोलंबससह सगळे साथीदार आनंदाने नाचू लागले. एकमेकांना मिठ्या मारू लागले.
सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सर्वांगीण परिपुर्ण आनंदी नविन जीवन लाभल्याचा मला साक्षात्कार झाला.धन्यवाद सर्वांचे
शेवटी...
माझ्या पत्नीकरीता "अगं खरचं मला काही कळत नाही..!"
- विजय कृष्णात गायकवाड