माणसांच्या अंतरात्म्यातील निर्मळ मानवी प्रेमाचा अखंड प्रवाह म्हणजेच नदीष्ट..!
चाकोरी व थडगं यातील फरक फक्त काही फुटांचा असतो.असे थोरो यांनी म्हटले आहे. आपलं जीवन जगत असताना आपल्याला आपल्यामधून बाहेर पडावं लागतं. जसं नदीचं पाणी प्रत्येक ठिकाणी नवीन होतं तसं माणसानंही प्रत्येक वेळी नवीन व्हावं 'नदीष्ट' कादंबरीबाबत आमचे मित्र शरद ठाकर यांच्याकडून ऐकले. ही कादंबरी मला माझ्या जन्मदिवसाची भेट म्हणून चाफेश्वर गांगवे हे 'नदीष्ट' नदी निस्वार्थपणे सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे यांच्याद्वारे ही (पुस्तकरुपी) गोदामाई माझ्यापर्यंत प्रवाहित होत आलेली आहे.
'माणसाशी वाईट वागलं की कवितेशी प्रतारणा केल्यागत वाटतं.... आपल्या मनस्वी पणाला ही ओंजळभर नदी....
• मनोज बोरगावकर.'
या कादंबरीचे निर्माते व लेखक मनोज बोरगावकर यांनी गोदावरी नदीकाठी खऱ्या अर्थाने आयुष्य जगलेले आहे. हे आयुष्य जगत असताना या नदीकाठी त्यांना भेटत गेलेली.सकिनाबी,पार्वती माय,मंदीरातील पुजारी,बामनवाडा,इरबाने,
सगुणा,भिकाजी,अब्रार,
मोहम्मद,प्रसाद,मालाडी,
मलकीत चाची रौनक,बायजाबाई, दादाराव
दादाराव लेखकांचे गुरु ज्यांनी त्यांना नदी संपूर्ण पोहण्याचे ज्ञान दिले. ते नेहमी म्हणत आडदांड मुलाच्या कानफटात मारतानाही त्याला इजा होण्यापेक्षा तो सुधारावा ही जशी आईची भावना असते, अगदी तशीच भावना महापुरातल्या नदीची असते. तिला जीवन उध्वस्त करायचे नसते, तर पुनर्जीवन करायचे असते.१६८ पानांची असणारी ही कादंबरी मी वाचत गेलो. आणि ही कादंबरी त्यातील ही जीवन समजावून सांगणारी लोकं..! मला जीवन समजून-उमजून जगायचं असतं हे सांगत गेली. जसं आहे तसं असणं म्हणजेच पारदर्शक जगणं मोगऱ्याच्या झाडावरील फुल झाडापासून अलगद बाजूला होतं. खाली पडताना ते स्वतः भोवती फिरत वाकडे-तिकडे खाली पडतं.. ते ही गुरुत्वाकर्षण सिध्दातांच्या नियमात राहून. त्या फुलाचं जगणं हे पारदर्शक असतं.
जेव्हा आपण आत्म्याद्वारे गोष्टी करता तेव्हा आपण एक नदी आपल्यात फिरत असल्याचे जाणवते- रुमी
मेळघाटच्या जंगलात एका फॉरेस्ट ऑफिसरने सांगितलेले आठवलं की,माकड जेव्हा फांद्या हलवून झाडावरची फळं खाली पाडत असतात तेव्हा त्या त्यांच्या निव्वळ माकडचेष्टा नसतात तर जंगलातल्या इतर प्राण्यांनाही तो रानमेवा मिळावा अशी त्यांची ती सामाजिक बांधिलकी असते.डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत मनापासून पटला. माकडाबद्दलची नोंद पाहून मात्र शंभर टक्के खात्री पटली की आपण माकडांचे वंशज आहोत. ही परोपकाराची भावना तिकडूनच आपल्याकडे वाहत आली असावी. दाटून येणार्या अंधारातही माकडांनी हरणांवर केलेल्या परोपकाराच्या उजेडाचा तुकडा सोबत घेऊन मी अंधार तुडवत मंदिराकडे निघालो. घाटावरच्या ट्यूबच्या तीव्र प्रकाशात तो खालून आणलेला उजेडाचा तुकडा केव्हा हरवला गेला.हे कळलेच नाही. आपल्याही आयुष्यात आपण जगत असताना. महत्त्वाच्या गोष्टी आपण सोडून देतो याची प्रकर्षाने जाणीव झाली.
साकिनाबी भिकारीन लेखकाला "माटीमले ..दिन खुलनेकू नदी पे मिलता और रात बंद होने कू ठेसन पे क्या कोई कामा नही क्या रे तेरेकू !"असं काळजीपोटी बोलून बाईमाणसाची जिंदगी सहजपणे सांगून गेली. जणू नदीचं आत्मचरित्रच सांगितलं.असं सहज जीवन जगण्याचं सुत्र सांगून निरोपा निरोपीची कोणतीही औपचारिकता न करता तरातरा ती निघून गेली. जणू अखंडितपणे वाहणाऱ्या गोदामाई सारखी..।
रोज मी स्टेशन वर जात असताना,गळ्यामधील सोन्याची चेन घरी ठेवून येत होतो. एका दिवशी नकळतपणे ती माझ्या गळ्यात राहिली.तिने मला पाहिले.चोरट्यांची टोळी जवळच होती. तिने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मला सावध केले होते. (तेही नदीवरच्या आणि ठेसनातल्या जुजबी ओळखीशी इमान राखून) बरेच महिने ती मला दिसली नाही. मी तिला शोधत असताना* *सकीनाबीची पार्वती मानलेली माय मला म्हणाली. बापू, तिलाच पाहतूसना तू ? सहा महिन्यापूर्वीच रेल्वेखाली येऊन पाय तुटून मेली. तिचे डोळे भरून येत होते. हा प्रसंग वाचताना मला तर माणुसकीचा पाय तुटल्यागत वाटले.
बामनवाडा कोळी त्याला नदीमध्ये असणाऱ्या माशांची सर्व नावे त्यांच्या किमती सहीत माहिती असायचीत. आज कोणता गावला आणि कोणता गावला नाही मला* *सांगायचा. ज्या दिवशी जास्त मासे गावायचे, त्यादिवशी किलो दीड किलोचा एखादा मासा हातात धरून म्हणायचा,'याला मिठमिरची लावनं होईल का नाही, माहित नाही पण याच्या जोरावर मीठ मिरचीची सोय होईल तो मासे विकायला आणि मी माझा दिवस विकायला चलते बनायचो.हा संवाद मला पोटातील सत्य सांगून गेला.
लेखकांची आंघोळीला जात असताना कालूभैया सुनसान किनाऱ्यावर काळजी घेणारा मला लाख मोलाचा वाटला. नदीच्या वाहतेपणाच्या साक्षीने ही सर्व नाती निर्माण झाली.असल्यामुळे त्यातील ओल जाणवण्या इतपत आहे.
सगुणा एक तृतीयपंथी आपल्या भाषेत शारीरिक पातळीवरील हिजडा आईच्या गर्भात अकराव्या आठवड्यात 'सेक्शुअल ऑर्गन' विकसित करणाऱ्या हार्मोनने आपली भूमिका योग्य रितीने पार पाडलेली नसण्याचा परीणाम हा हिजडा नदीवर आला असता त्याला पाहुन लेखकांच पळून जाणं पुन्हा अख्खा रेल्वेच्या डब्यातील सगुणाची लगट घाबरू नको मर्द ना तू ? त्यादिवशी नदीवर जवळ येऊन पळून का गेलास? लेखकांचे उत्तर "जाऊ देना त्यात काय पडले? सगुणाचा प्रतिप्रश्न "सांग ना रे राजा ! बोल, मी काहीही उठणार नाही इथून .. आम्हाला तुम्ही काय म्हणताय सांगितल्याशिवाय."
"आम्ही तुम्हाला हिजडा म्हणतो.. छक्का म्हणतो"ती खूपच भयाण हसली. मांडीवरचे हात काढत म्हणाली "माहित आहे, मला तु गाडीत चढताना आपली नजरानजर झाली, ना.. मग नजर कोणी वळविली तू का मी?"हो मीच नजर चोरली!"ती थोड्याशा आवेशातच म्हणाली,नजर चुरानेवाले तुम..और हिजडे हम..वारे व्वा ..सच्ची बता,आँखमे आँख डालके देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा? आँख चुरानेवाला हिजडा हुआ नारे!"सगुणाच्या या वाक्याने लेखकांचे आडवे अस्तित्व हादरून गेले.वरकरणी समाजाच्या दृष्टीने तिरस्कृत, बीभत्स असलेल्या हिजड्यात एक अविस्मरणीय शहाणपण दडलेले असल्याचे जाणवले. या भेटीत व होणाऱ्या पुढील दोन भेटीत सगुना या व्यक्तिमत्वानं आपलं आभाळासारखं विराट जीवन चरित्र कथन केले. लेखकाला जानू म्हणून अखेरची शेवटच्या भेटीतील मारलेली मिठी त्या मिठीमध्ये लेखकाचा गुंतलेला श्वास त्यांचे थांबलेलं जीवन चक्र मी अनुभवले. वाहणं हा नदीचा स्वभाव आहे. आपल्या जीवनातही असंच वाहणं असतं. हे सगुना मला सांगून गेली.आणि मी माझ्यातील सुप्त हिजडा शोधू लागलो.
प्रसाद नावाचा सर्पमित्र नदीकाठी भेटला "जंगल किंवा प्राणी विपरीत वागायला लागतात असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा एक खूणगाठ मनाशी पक्की बांधावी. त्यांचे वागणे विपरीत नसून माणसाने जसे वागायला पाहिजे तसे तंतोतंत ते वागत असतात. हे सहज सोपे जीवन तत्व त्यातून सापडतं. दोन नागांची पाच किलोमीटवरील हक्क प्रस्थापित करण्यासाठी जीवघेणी लढाई लढतात. पण वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या या जीवघेण्या लढाईतही त्या नागांमध्ये एक मूक करार झालेला असतो. परस्परांवर आक्रमण करताना, ते जहरी नाग एकमेकांवर विषाचा अजिबात प्रयोग करीत नाहीत. हा माणसाने घेण्यासारखा उदात्त विचार मला स्पर्शुन गेला.
भिकाजी भिकारी का झाला यामागची हृदयद्रावक कथा अक्षरश: आत्मपरीक्षण करायला लावते. तो कोणाशिवाय जगायला छान स्थिरावला होता. त्याच गुढ हसणं "जे बाळगावं लागतं त्याचेच ओझे खूप आहे. जे कमी करता येण्यासारखे आहे. तेवढे तरी कमी करावे." ही शिकवण मला जगायचे कसे हे शिकवून गेली.
अविरत वाळूचा उपसा चालू असायचा.. नदीच्या गाभ्यापर्यंत जखम करणारा! 'किती खोलवर इजा होत असेल नदीला! ॲबॉर्शनमुळे स्त्रीला होणार्या इजेसारखीच!' आपल्यालाही स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आले, पण गाभ्यापर्यंत कुठे जाता आले ? स्त्रीच्या उदरात राहता आले, पण तिच्या काळजापर्यंत कुठे पोहोचता आले? म्हणूनच वाटते आपल्यासाठी आई असते कलेजाचा तुकडा, पण आईसाठी मात्र आपणच अख्खे काळीज! एवढाच काय काळजीभर फरक आपल्या अन् आईच्या प्रेमात या वाक्यांनी माझ्यातील 'मी' शहारलो.
होमोओपॅथीतले 'सिलिका'हे औषध वाळूपासूनच तयार होते. निष्णात सर्जनचे हात देखिल जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचून हे औषध काम करते. काय गुणधर्म असतील या नदीचे..!
नादीष्ट असण्यापेक्षा 'नदीष्ट' असणं केव्हाही चागलंच नदीष्ट कादंबरी वाचत असताना. या पात्रांचा संवाद समजून घेत असताना. मीही त्यांच्यातीलच एक होतो. सगुना सोबतची शेवटची भेट माझ्यासाठी डोळ्यात आसवं आणणारी होती. माझ्या जीवनामध्ये सगुनाचे स्थान अलौकिक आहे. माझ्या आयुष्यात सगुना मला पुन्हा भेटेल. भिकाजी आपला फोन नंबर मला देईल. 'नदी किनारी असणाऱ्या बहात्तर पायऱ्या माणुसकी जोडणार्या आहेत.' ही कादंबरी आत्मिक बदल करणारी आहे. ही निर्मिती एक दस्तऐवज आहे. माणसाला माणूस बनवणारी आहे. लेखकांचे व प्रकाशकांचे (ग्रंथाली प्रकानश) मनापासून आभार व धन्यवाद...!
■ विजय गायकवाड