अदृश्य शाईचे रहस्य….
आमगाव हा आपल्या महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा लहानसा तालुका.छत्तिसगढ आणि मध्यप्रदेशाला लागून असलेला.गाव तसं लहानसंच.ह्या गावातले रामगोपाल अग्रवाल हे व्यवसायाने सराफ.घरचा चांदी-सोन्याचा व्यापार.'बेदिल' ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या रामगोपालजींना एक दिवस काय उपरती झाली,कोणास ठाऊक.पण त्यांच्या मनाने घेतलं की,आसामच्या दक्षिणेला असलेल्या ब्रम्हकुंडात स्नान करण्यासाठी आपण जायचं.आता ब्रम्हकुंडच का..? तर त्याला काही विशेष कारण नाही.हे ब्रम्हकुंड (ब्रम्हसरोवर), परशुराम कुंड म्हणूनही ओळखलं जातं. आसामच्या सीमेवर असलं तरी हे कुंड येतं अरुणाचल प्रदेशाच्या लोहित जिल्ह्यात.मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते.
हे स्थान म्हणजे अग्रवाल समाजाचे मूळ पुरुष भगवान अग्रसेन महाराजांचं सासर.त्यांच्या पत्नी माधवीदेवी ह्या नाग लोकांच्या राजकन्या.ह्या ब्रम्हकुंडा- शेजारीच अग्रसेन महाराजांचा विवाह झाला असं सांगितलं जातं.
कदाचित हेच कारण असेल,रामगोपाल अग्रवाल 'बेदिल' ह्यांच्या ब्रम्हकुंडाला भेट देण्याच्या निश्चयात.मग ठरल्याप्रमाणे रामगोपालजी, आपले ४-५ मित्र घेऊन ब्रम्हकुंडावर पोहोचले. भेट देण्याच्या आधल्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलं की 'उद्या त्या ब्रम्हसरोवराच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाच्या खाली एक साधू बसलेला असेल.तेथेच तुला हवं ते मिळेल.'
दुसऱ्या दिवशी सकाळी रामगोपालजी त्या ब्रम्हकुंडाच्या (ब्रम्हसरोवराच्या) काठाशी गेले तर त्यांना तिथे भला मोठा वृक्षही दिसला आणि दाढी वाढवलेला एक साधूही दिसला. रामगोपालजींनी त्याला नमस्कार करताच त्याने आपल्याजवळची,एक चांगल्या कापडात बांधलेली वस्तू त्यांना दिली अन् म्हटले, "जाव.. इसे ले जाओ.." हा दिवस होता,९ ऑगस्ट १९९१.
भलंमोठं दिसणारं,पण हलकं वाटणारं ते गाठोडं घेऊन रामगोपालजी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले,आणि त्यांनी ते गाठोडं उघडून बघितलं.तर आत कोरी भूर्जपत्रं व्यवस्थित बांधून ठेवलेली.आता कोरी भूर्जपत्रं (म्हणजे त्यांना भूर्जपत्र म्हणायचं असं रामगोपालजींना फार उशिरा समजलं) काय करायची असा विचार त्यांच्या मनात आला.पण प्रसाद समजून त्यांनी ते गाठोडं आमगावला आणलं.फक्त ३० ग्रॅम वजनाच्या या गाठोड्यात ४३१ कोरी (रिकामी) भूर्जपत्रं होती..
बालाघाट जवळच्या 'गुलालपुरा' गावात ह्या रामगोपालजींचे गुरू होते.त्या गुरूंना बोलावण्यात आलं आणि ते गाठोडं दाखवलं. रामगोपालजींनी गुरूंना विचारलं,'काय करू ह्या कोऱ्या भूर्जपत्रांचं ?'गुरुजींनी उत्तर दिलं, 'कामाचे वाटत नाहीत नं तुला,मग पाण्यात टाकून दे.' आता रामगोपालजी दोलायमान.ते गाठोडं ठेववतही नाही आणि टाकवतही नाही..
तशातच एक दिवस पूजा करत असताना देवघरात ठेवलेल्या ह्या कोऱ्या भूर्जपत्रावर पाण्याचे काही थेंब पडले आणि अहो आश्चर्यम..! त्या तितक्या भागात अक्षरं उमटून आली.रामगोपालजींनी मग एक भूर्जपत्र पाण्यात बुडवलं.अन् चमत्कार झाल्यासारखा त्या पानावरचा संपूर्ण मजकूर अगदी स्वच्छ दिसू लागला.आणि तीही काळ्या रंगातली अक्षरं नाहीत,तर केशरी रंगातली,अष्टगंधाने काढलेली आहेत,असं वाटणारी अक्षरं !
थोड्या वेळानंतर,त्या भूर्जपत्रातलं पाणी वाळल्याबरोबर ती अक्षरंही दिसेनाशी झाली. मग रामगोपालजींनी पूर्ण ४३१ पानं पाण्यात टाकून,ती वाळण्यापूर्वी त्यातील मजकूर उतरवून घेण्याचा प्रयत्न केला.मजकूर देवनागरी लिपीत, संस्कृतमधे लिहिला होता.हे काम काही वर्षं चाललं.काही संस्कृत जाणकारांकडून या मजकुराचा अर्थ समजावून घेतला तर लक्षात आलं,भूर्जपत्रावर अदृश्य शाईने लिहिलेली ती पोथी म्हणजे अग्रसेन महाराजांचं चरित्र आहे - 'अग्र भागवत' या नावाचं.
हजारो वर्षांपूर्वी जैमिनी ऋषींनी लिहिलेल्या 'जयभारत' नावाच्या एका मोठ्या ग्रंथाचा,'अग्र भागवत' एक भाग आहे.पांडव वंशातील परीक्षिताचा मुलगा जनमेजय.त्याला लोकधर्माच्या साधनेचा विस्तार करण्यासाठी जैमिनी ऋषींनी हा ग्रंथ सांगितला.
या अग्र भागवत ग्रंथाची लोकांमध्ये बरीच चर्चा झाली.अग्रवाल समाजात ह्या ग्रंथाचं प्रचंड स्वागत झालं.ग्रंथाची पानं अनेकदा पाण्यात बुडवून,लोकांना दाखवून झाली.या ग्रंथाची कीर्ती इतकी पसरली की,अग्रवाल समुदायापैकी एक, इंग्लंडमधील प्रख्यात उद्योगपती,लक्ष्मी मित्तल यांनी काही कोटी रुपयांमध्ये तो ग्रंथ विकत घेण्याची तयारी दाखविली.
हे सर्व बघून अग्रवाल समाजातली काही मंडळी पुढे आली आणि त्यांनी संस्कृतचे विद्वान, नागपूरचे श्री.रामभाऊ पुजारी यांच्या मदतीनं एक ट्रस्ट स्थापन ॥ श्रीमद् अग्रभागवतम् ॥ केला आणि त्या ग्रंथाला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली.
आज तो ग्रंथ 'अग्रविश्व ट्रस्ट' मधे सुरक्षित आहे. सुमारे १८ भारतीय भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित होऊन प्रकाशित झालेला आहे आणि रामभाऊ पुजारी यांच्या सल्ल्यानुसार मूळ भूर्जपत्रावरील ग्रंथ सांभाळून ठेवला आहे.
ह्या सर्व प्रकरणातला श्रद्धेचा भाग सोडूनही देऊ, तरी मुद्दा शिल्लक उरतो की हजारों वर्षांपूर्वी भूर्जपत्रांवर अदृश्य शाईने लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणते ? ते कसे वापरले जायचे,अन् कुठे वापरले जायचे?
भारतामध्ये लिहून ठेवण्याची पद्धत खूप खूप प्राचीन आहे.ताम्रपत्र, - चर्मपत्र,ताडपत्र,भूर्जपत्र ही सारी लिखाणाची माध्यमं.
मराठी विश्वकोशात भूर्ज-पत्रांबद्दल माहिती दिलेली आहे ती अशी -
'भूर्जपत्रे ही भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवीत.हे वृक्ष बेट्यूला वंशातील असून हिमालयात,विशेषतः काश्मीरातील हिमालयात वाढतात.यांच्या साली सोलून व वाळवून त्यांना तेल लावून त्यांची पृष्ठे गुळगुळीत करीत व त्यांचे मोठ्या लांबी-रुंदीचे पत्रे तयार करून त्यांच्यावर शाईने लिहीत.पत्रांना भोके पाडून व त्या भोकांत दोरी ओवून पुस्तके बांधली जात.
ही भूर्जपत्रे,त्यांच्या दर्जानुसार ३ महिने ते २,००० वर्षे टिकत.भूर्जपत्रावर किंवा ताडपत्रांवर लिहिण्यासाठी फार पूर्वीपासून शाईचा वापर
केला जात होता. इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षेपर्यंत शाई वापरली जाण्याचे पुरावे मिळाले आहेत.भारतात शाई केव्हापासून वापरली जातेय,नक्की सांगणं कठीण आहे.भारतावर चाल करून आलेल्या आक्रमकांनी येथील ज्ञान मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे असे जुने दुवे मिळत नाहीत.
पण शाई तयार करण्याच्या काही प्राचीन पद्धती माहीत आहेत.त्या अधिकांश पद्धतीत काळ्या शाईचाच उल्लेख आहे.फक्त काही ठिकाणी गेरू वगैरेंच्या मदतीने तयार केलेल्या केशरी शाईचा उल्लेख येतो. मराठी विश्वकोशात शाईची दिलेली माहिती अशी -
'भारतात दोन प्रकारची शाई वापरीत असत. कच्च्या शाईने व्यापारी जमाखर्च, तर पक्क्या शाईने ग्रंथ लिहीत असत. पिंपळाचा गोंद दळून, उकळून, तिळाच्या तेलावरील काजळी पातळ कापडात घालून गोंदाच्या पाण्यात ती पुरचुंडी फिरवीत. भूर्जपत्रावर लिहिण्याची शाई वेगळी असे. बदामाच्या साली व कोळसे यांपासून किंवा जाळलेले भात गोमूत्रात उकळून ती तयार करीत.काळ्या शाईने लिहिलेला सर्वांत जुना मजकूर इ.स. तिसऱ्या शतकातील सापडतो.
पण यात एक गंमत आहे.ज्या पदार्थांचा शाई तयार करण्यासाठी उपयोग होतो,ते सर्व पदार्थ पाण्यात विरघळणारे आहेत.मात्र आपल्या 'अग्रभागवत' या ग्रंथातील भूर्जपत्राचे पान पाण्यात टाकल्यावर शाई दिसू लागते.
अर्थात किमान दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाला अदृश्य शाईने लिहिण्याचं तंत्र अवगत होतं.हे तंत्र तेव्हा अनेक संशोधनांनंतर सिद्ध झालं असेल.अनेक प्रकारची रसायनं यात वापरली गेली असतील.त्यांचे वेगवेगळे प्रयोग या देशात झाले असतील.दुर्दैवानं आज मात्र यातील काहीही शिल्लक नाही.उपलब्ध आहे तो अदृश्य शाईच्या अस्तित्वाचा खणखणीत पुरावा - 'अग्रभागवत'च्या रूपात..!
थोडक्यात काय तर विज्ञान,आणि तेही 'शास्त्रशुद्ध विज्ञान',हा प्रकार पाश्चिमात्यांनी आणला या घट्ट झालेल्या मनोभूमिकेला हे 'अग्रभागवत' म्हणजे एक मोठाच हादरा आहे.
एकेकाळी अत्यंत प्रगत असं लेखनशास्त्र या देशात नांदत होतं आणि ज्ञानाच्या प्रचंड भांडाराचं पिढी - दरपिढी हस्तांतरण करण्याची क्षमता या शास्त्रात होती,हे आता सिद्ध झालंय.
१६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..