* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आणि हा आपला टायटॅनिक सोबतचा शेवटचा प्रवास…!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

आणि हा आपला टायटॅनिक सोबतचा शेवटचा प्रवास…! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आणि हा आपला टायटॅनिक सोबतचा शेवटचा प्रवास…! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२/१/२३

आणि हा आपला टायटॅनिक सोबतचा शेवटचा प्रवास…!

२ तासांनी ५८ मैलावर असलेलं कुनार्डचं कार्फाथिया जहाज हे मात्र निरोप मिळाल्याबरोबर मदतीला धावलं आणि ७०५ जणांना वाचण्यात त्यांना यश मिळालं. बाकी प्रवाशांनी मात्र टायटॅनिकबरोबरच जलसमाधी घेतली होती.दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर समुद्रात भयंकर दृश्य दिसत होतं.समुद्रातल्या थंडगार पाण्यात हजारो शवांचा सडा पडला होता.जवळपास १५०० जणांचा मृत्यू झाला होता.काहींचा जहाजाचे भाग अंगावर पडून मृत्यू झाला होता,तर काहींचा बुडून.पण अनेकांचा समुद्राच्या पाण्यान गारठून मृत्यू झाला होता. अनेकांच्या हाती जहाजातल्या सामानाच्या फळ्या लागल्या होत्या.


याच फळ्यांबरोबर तरंगत गारठून गेलेली शवं पसरलेली होती.विशेष म्हणजे ही शवं गोळा करतानाही गरीब-श्रीमंत असा भेदभाव झाला होता.


झालं असं :


टायटॅनिकमधून मृत्युमुखी पडलेल्या लोकांची शवं घेऊन येण्यासाठी काही बोटींना पाठवलं गेलं.पण तिथं इतकी शवं होती की त्या शवांना गोळा करता करता या बोटींमधला अन्न आणि इंधनपुरवठा संपतो की काय अशी भीती वाटायला लागली.शेवटी श्रीमंतांच्या शवांची ओळख पटणं शक्य असल्यानं आणि त्यांची ओळख पटणं त्यांच्या संपत्तीच्या वारसदारांसाठी अत्यावश्यक असल्यानं त्या टीमनं फक्त फर्स्ट क्लासच्या प्रवाशांचीच शवं गोळा करण्याचा निर्णय घेतला होता.


टायटॅनिकमधल्या प्रवाशांबरोबरच त्यातल्या अनेक अधिकाऱ्यांचाही यात मृत्यू झाला.


कॅप्टन स्मिथची ही शेवटची सफर होती. यानंतर तो निवृत्त होणार होता.दैवदुर्विलास बघा,ती त्याची खरोखरच शेवटची सफर ठरली! पण शेवटपर्यंत त्यानं आपली जबाबदारी निभावली.त्यानं अनेकांचे जीव वाचवण्यात मदत केली.पण त्याचा जीव मात्र त्यानं गमावला. 


टायटॅनिकचा मुख्य डिझाइनर अँड्र्यूज हाही यातून प्रवास करत होता.त्याचं कुटुंबही त्याच्याबरोबर होतं.या सगळ्याचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता.आपल्या बायकोला लाइफ बोटमध्ये जबरदस्ती बसवून तो स्मोकिंग रूममध्ये गेला. आयुष्यातलं एक मोठं स्वप्न उद्ध्वस्त होत होतं. त्याच्या भावना गारठल्या होत्या.त्या रूममधल्या एका पेंटिंगकडे तो एकटक बघत उभा राहिला आणि जहाजाबरोबर त्यानंही जलसमाधी घेतली. टायटॅनिकमध्ये इस्मेही होता.त्याच्यासाठी खरंतर हा मोठा धक्का होता.त्यानंही अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.जहाजातल्या प्रत्येकाला आपला मृत्यू समोर दिसत होता. काही जण वाचण्याची धडपड करत होते,तर काही मात्र शांतपणे आपल्या मृत्यूला सामोरं जायची तयारी करत होते.काही जण लोकांना वाचवण्याचा प्रयत्नही करत होते.याच यादीतलं एक नाव म्हणजे विल्यम स्टेड !


तेव्हाच्या लाइफ बोट्सच्या संख्येच्या नियमांविरुद्ध याआधीच अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते.'गॅझेट' या वर्तमानपत्राचा पत्रकार विल्यम स्टेड यानंही हा प्रश्न उपस्थित केला होता.त्यानं १८८८ साली याच वर्तमानपत्रात एका काल्पनिक अपघाताचं वर्णन केलं होतं.मोठमोठ्या बोटींवर लाइफ बोट्स जर पुरेशा प्रमाणात नसतील आणि ती बोट किंवा जहाज जर अँटलांटिक समुद्रात बुडालं तर काय कहर माजेल अशा आशयाची त्यानं एक गोष्ट रंगवली होती.ती काल्पनिक असली,तरी त्यात लाइफ बोट्सविषयीचा नियम किती तोकडा आहे याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याची ही भीती टायटॅनिकच्या अपघातामुळे लवकरच खरी ठरली.विशेष म्हणजे खुद्द स्टेडही टायटॅनिकमधून प्रवास करत होता.त्यानं अनेक स्त्रिया आणि लहान मुलं यांना लाइफ बोटमध्ये मदतही केली होती.


सगळ्या जीवरक्षक नौका गेल्यावर स्टेड शांतपणे टायटॅनिकच्या प्रथम दर्जाच्या धूम्रपान करायची परवानगी असलेल्या कक्षामध्ये गेला.तिथं एका खुर्चीत शांतपणे बसून "पुस्तक वाचायला" सुरुवात केली.काही मिनिटांतच त्यानं धडपडत एका जीवरक्षक नौकेला धरून ठेवायचा प्रयत्न केला, पण भयानक गारठ्यामुळे त्याच्या पायांमधली शक्ती गेली आणि त्यालाही जलसमाधी मिळाली!


स्टेडसारखे काही प्रवासी मदतीला धावले

स्वतःहून सदस्यांच्या क्रू होते.त्यातलीच एक होती.


" मला हे पुस्तक वाचत असताना या प्रवासातील आश्चर्यकारक घडलेला हा प्रसंग मनहेलावून सोडणारा होता. वमी ही अचंबित झालो."


'अनसिंकेबल मॉली ब्राऊन!' मागरिट ब्राऊन असं तिचं खरं नाव होतं.


जहाजावरच्या इतक्या गोंधळातही ती अत्यंत शांत होती.लोकांना बोटीत चढायला मदत करणं,लोकांना आणि क्रू सदस्यांना धीर देणं तिनं अत्यंत जबाबदारीनं पार पाडलं.खरंतर तीही एक प्रवासीच होती.तरीही तिनं हे सगळं केलं. इतकंच नाही,तर शेवटची बोट निघतानाही ती त्यात बसायला शेवटी तिला जबरदस्तीनं त्यात बसायला लावलं.तरी तिचं सगळं लक्ष जहाजामधल्या प्रवाशांकडे होतं.आपण जहाजाकडे परत जाऊ आणि ज्यांना वाचवणं शक्य आहे त्यांना वाचवू असं तिचं म्हणणं होतं. पण कोणी बोट फिरवायला तयारच झालं नाही. शेवटी तिनं स्वत: सुकाणू हातात घेतला.पुढे काय झालं याबद्दल अनेक मतांतरं आहेत. पण तिनं केलेल्या या धाडसामुळे तिला

 'दि अनसिंकेबल मॉली ब्राऊन' असं नाव पडलं. ती स्वत:फर्स्ट क्लासची प्रवासी असूनही तिनं सेकंड क्लास आणि थर्ड क्लास प्रवाशांसाठी न्याय मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी तिनं एक समितीही स्थापन केली. विशेष म्हणजे 'कॅलिफोर्नियन' चा त्या दिवशीचा कॅप्टन आर्थर हेन्री रॉस्ट्रोन याचा तिनं सत्कारही केला होता.'न बुडणारं जहाज बुडालंच कसं?', 'प्रवाशांना वाचवण्यात कंपनीला यश का आलं नाही?' अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रवाशांच्या नातेमंडळींना आणि सगळ्या जनतेला हवी होती.या सगळ्या घटनाक्रमातून अनेक धक्कादायक बाबीही समोर आल्या. एरवी मे महिन्यात वाहत येणारे हिमनग,त्या वर्षी मात्र एप्रिलमध्ये दिसायला लागले होते.त्यांचं प्रमाणही एरवीपेक्षा जास्त होतं.टायटॅनिकच्या पुढे प्रवास करणाऱ्या अनेक जहाजांना ते दिसतही होते. 'टायटॅनिकच्या मार्गात हिमनग आहेत' याची कल्पना देणारे आणि टायटॅनिकच्या कॅप्टनला सावध करणारे अनेक संदेश टायटॅनिकच्या टेलिग्राफ ऑपरेटर्सना सतत मिळत होते.पण ते टायटॅनिकच्या कॅप्टनपर्यंत पोहोचलेच नाहीत! 'कॅलिफोर्नियन'लाही असे संदेश मिळाले होते आणि या संदेशांमुळे त्यांनी आहे तिथंच थांबायचा निर्णय घेतला होता. पण टायटॅनिकनं मात्र आपला प्रवास थांबवला नाही.विशेष म्हणजे टायटॅनिकला 'कॅलिफोर्नियन' ही सावध करायचा प्रयत्न केला होता.पण त्या वेळी ड्युटीवर असलेला फिलिप नावाचा ऑपरेटर प्रवाशांचे संदेश देण्याघेण्यात व्यस्त असल्यामुळे 'कॅलिफोर्नियन' ऑपरेटरवर चक्क ओरडला होता.या संदेशाचं गांभीर्य तेव्हा जाणवलं नाही याचं आणखीन एक कारण म्हणजे त्या संदेशाची सुरुवात 'एम.एस. जी. 'नं केलेली नव्हती. जहाजाच्या कॅप्टनसाठीचे संदेश हे 'एम.एस.जी' म्हणजेच 'मास्टर्स सर्व्हिस ग्राम' या अक्षरांनी करणं महत्त्वाचं असायचं.त्यामुळेच हा संदेश उगाचच वायफळ संदेश आहे असं वाटल्यामुळेच फिलिपला तो संदेश कॅप्टनला देण्याची गरज वाटली नाही.जेव्हा टायटॅनिक अडचणीत सापडलं,तेव्हा मात्र फिलिपनं 'कॅलिफोर्नियन'ला बरेच एस.ओ.एस. (S.O.S.) सिग्नल्स पाठवले होते. ज्या टेहळणी खांबावरून ते हिमनग दिसले,तिथं बायनोक्युलर्सच नव्हते.रात्रीची वेळ असल्यामुळे समुद्रही शांत होता.त्यामुळे ते हिमनग दृष्टिपथात येईपर्यंत उशीर झाला होता. लाइफ बोट्सची संख्या तर कमी होतीच,पण त्या 


पाण्यात उतरवायच्या कशा याबद्दलचं प्रशिक्षण आणि तालीम दिली गेली नव्हती.टायटॅनिक बेलफास्टहून निघायच्या आदल्या दिवशी ते होणार होतं, पण ते प्रशिक्षण चक्क रद्द केलं गेलं. 


एकूण या अपघातानंतर अनेक वर्षांनी या जहाजाचे अवशेष मिळाले.संपूर्णपणे गंज चढलेल्या अवस्थेतही हे जहाज आपल्या सौंदर्याचा पुरावा देत होतं.या अवशेषांमध्ये चीज तसंच वाइनच्या बाटल्याही सापडल्या होत्या.


जेम्स कॅमेरून या अमेरिकन दिग्दर्शकानं या अपघातावर १९९७ साली 'टायटॅनिक या नावाचा सुंदर चित्रपट बनवला होता.यातल्या काही गोष्टी काल्पनिक असल्या तरी बऱ्याच गोष्टी अभ्यासपूर्वक चितारल्या होत्या.विशेषत: अपघात आणि अपघातानंतरची भयानकता दाखवण्यात आणि त्याचा प्रेक्षकांवर आघात करण्यात कॅमेरून यशस्वी ठरला. 


ऑलिम्पिक आणि ब्रिटॅनिक या जहाजांचं पुढे काय झालं? ही दोन्ही जहाजंही आकाराने मोठीच होती.टायटॅनिकच्या आधी ऑलिम्पिकनं समुद्रात सेवा द्यायला सुरुवात केली होती.एक अपघात सोडला तर या जहाजानं यशस्वी सेवा दिली.१९३० साली हे जहाज स्क्रॅप केलं गेलं. ब्रिटॅनिक हे टायटॅनिकपेक्षाही देखणं बनवायचा निर्णय टायटॅनिक बनवतानाच घेतला गेला होता. त्यात टायटॅनिकपेक्षा जास्त सुविधाही असणार होत्या.पण नेमकं पहिलं महायुद्ध  सुरू झाले आणि ब्रिटॅनिकमध्ये चक्क हॉस्पिटल बनवावं लागलं.जिथं कोरीव खांब उभे राहणार होते, जिथं मऊ गालिचे अंधरले जाणार होते,जिथली सजावट एखाद्या राजमहालाला लाजवेल अशी केली जाणार होती तिथं सैनिकांच्या जखमा बऱ्या करायला हॉस्पिटलच्या खाटा आणि औषधं ठेवली गेली.ब्रिटॅनिक जर ठरल्याप्रमाणे तयार झालं असतं,सगळं सुरळीत झालं असतं तर कदाचित ब्रिटॅनिकचं नाव 'पाण्यात तरंगणारा आलिशान राजमहाल' असं कोरलं गेलं असतं! विशेष म्हणजे ब्रिटॅनिकाचा अंतही टायटॅनिकसारखाच झाला.तीही बुडाली.पण शत्रूशी लढता लढता !!


गंमत म्हणजे या तिन्ही जहाजांच्या अपघातातून एक महिला दरवेळी बचावली होती.तिला


 'मिस अनसिंकेबल' असंच नाव पडलं होतं. व्हायोलेट जेसोप (Violet Jessop) असं या महिलेचं नाव होतं. 


यातल्या दोन जहाजांवर ती स्टीवर्ड म्हणून आणि तिसऱ्या जहाजावर नर्स म्हणून कामाला होती. लहानपणापासूनच ती अनेकदा मरता मरता वाचली होती.१९१० साली वयाच्या २१व्या वर्षी ती व्हाईट स्टार कंपनीत स्टीवर्ड म्हणून कामाला लागली.१९११ साली ऑलिम्पिक जहाजावर तिची नेमणूक झाली.२० सप्टेंबर १९११ रोजी हे जहाज बंदरावरून निघालं तेव्हा काही अंतरावरच त्याची ब्रिटिश युद्धनौकेशी टक्कर झाली.ऑलिम्पिकचं नुकसान झालं असलं तरी ते सगळ्या प्रवाशांना सहीसलामत घेऊन बंदरावर परतू शकलं होतं.त्यानंतर तिची टायटॅनिकमध्ये नेमणूक झाली.लाइफ बोट्समध्ये बसवायचं काम चालू असताना तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टायटॅनिकमध्ये काहीजण इंग्लिश भाषक नव्हते, त्यामुळे इंग्लिशमध्ये दिल्या गेलेल्या सूचना त्यांना समजणं शक्य नव्हतं.अशांना खाणाखुणा करून सूचना सांगणं आणि त्याचं पालन होतं आहे की नाही हे पाहणं ही तिची जबाबदारी होती. शेवटची लाइफ बोट निघताना तिलाही त्यात बसण्याची सूचना दिली गेली.ती बसत असतानाच तिच्या हातात एक लहान बाळ दिलं गेलं.जहाजात सगळा कल्लोळ माजला होता. त्यामुळे कोणाचं कोण कुठं आहे याचं भान कुणालाच नव्हतं.याच भानगडीत कुणाचं तरी हे बाळ एका क्रू मेंबरच्या हाती लागलं. त्या बाळाचे आईवडील शोधत बसण्यासाठी वेळ नव्हता. म्हणून त्यानं ते बाळ सरळ जेसोपकडे सोपवलं. त्याचं पुढे काय याचा विचार कुणाच्याच मनाला शिवला नव्हता. कारण जीव वाचणं हा एकमेव उद्देश होता. तोही वाचेल की नाही याची अजूनही शाश्वती नव्हतीच. कॅलिफोर्नियननं या सगळ्यांना आपल्या जहाजात घेतलं.तेव्हाही हे बाळ जोसेपच्या मांडीवर होतं.सगळ्यांनाच मानसिक धक्का बसलेला होता.तशीच जोसेपही धक्क्यात होती.शून्यात बघत असतानाच एक बाई अचानक आली आणि जेसोपच्या मांडीवरचं बाळ घेऊन झटकन निघून गेली. 'ती बाई या बाळाची आई असेल का? आणि असलीच तर तिनं एक चकार शब्द उच्चारायचेही कष्ट कसे घेतले नाहीत?' असा विचार तिच्या मनात चमकून गेला.पण सगळ्यांची मनोवस्था बिकट होती. म्हणून जेसोप तो प्रसंग विसरून गेली.


दोनदा जीव जाता जाता वाचला असला तरी जेसोप डगमगली नाही.'ब्रिटॅनिका' या आता हॉस्पिटल झालेल्या जहाजात ती कामाला लागली.२१ नोव्हेंबर १९१६ रोजी जहाजात अचनाक धमाका झाला आणि अवघ्या ५७ मिनिटांत या जहाजानं जलसमाधी घेतली.यात ३० जण ठार झाले.पण जेसोप याही वेळी बचावली.ती आणि काही जण लाइफ बोटीत चढले.पण अचानक जहाजाचा प्रोपेलर त्या लाइफ बोटीवर आदळणार असल्याचं लक्षात आल्यावर तिनं लाइफ बोटीमधून उडी मारली. तरीही तिच्या डोक्यावर प्रोपेलरचा एक भाग आदळला आणि ती जबर जखमी झाली.जखम गंभीर असूनही ती त्यातून बचावली आणि नंतर आणखीनही जहाजांवर आपली सेवा दिली. निवृत्त झाल्यावर एका लहानशा खेड्यात तिनं आपलं उर्वरित आयुष्य शांतपणे घालवत असतानाच तिला एकदा एक फोन आला.'मीच ते बाळ' असं समोरच्यानं तिला सांगितलं.काही विचारायच्या आतच तो फोन कट झाला.तिला तो मुलगा भेटायलाही आला आणि त्यानं तिला आपल्या आईच्या वतीनं धन्यवाद दिल्याचाही काही जण दावा करतात.काही असो,पण तिच्या हातून एका जिवाला जीवनदान मिळालं होतं हे नक्की.मृत्यूला सतत हुलकावण्या देणाऱ्या या 'मिस अनसिंकेबल'चा वयाच्या ८३ व्या वर्षी अखेर मृत्यू झाला तो हृदयविकारामुळे! 


'अनसिंकेबल्स'च्या यादीत एक नाव घेतलं जातं. ते नाव म्हणजे ह्यु विलियम्स (Hugh Williams)! याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसली तरी हा योगायोग फारच मजेशीर आहे. १६६४ साली वेल्स जवळच्या समुद्रात एक बोट बुडाली होती.त्यात जवळपास ८१ प्रवासी ठार झाले होते,तर काही जण बचावले होते. वाचलेल्यांपैकी एकाचं नाव होतं-ह्यु विलियम्स. 


जवळपास १०० वर्षांनी त्याच ठिकाणी आणखीन एक बोट बुडाली.त्यात ६० जण ठार झाले.बचावलेल्यांपैकी एकाचं नाव होतं ह्यु विलियम्स. १८२० सालीही त्याच ठिकाणी आणखीन एक बोट बुडाली. त्यातही बचावलेल्यांपैकी एकाचं नाव ह्यु विलियम्स होतं !! जागा आणि वाचणाऱ्याचं नाव यांच्या या योगायोगाला काय म्हणावं?


उत्क्रांत होण्यामध्ये माणूस घडवण्यामध्ये या पुस्तकांचे 'असणं ' अतिशय महत्त्वपूर्ण आहे.वाचलेली पुस्तके,न वाचलेली पुस्तके हया पुस्तकांच्या निर्मिती मागे सर्वांचे,लेखकांचे प्रकाशकांचे मनस्वी आभार! आपण सर्वंजण या पुस्तकांचे ऋणी असलो पाहिजे.पुस्तकांचे उपकार सदैव आपल्यावरती राहतील..


'प्रवास' या पुस्तकातील २९.१२.२०२२ मधील टायटॅनिक या कथेतील ही शेवटची कथा..