चौकट व थडगे यामध्ये काही फुटांचे अंतर असतं.हे हेन्री डेव्हिड थोरोचे वाक्य मनापासून विचार करायला लावणारं..माझ्यासाठी ते जीवनतत्त्व होतं.त्यानंतर माझी हेन्री डेव्हिड थोरो यांच्याबाबत वाचण्यासाठी मनाची घालमेल सुरू झाली. परभणीचे आमचे दादासाहेब मनोहर सुर्वे यांनी वॉल्डनबद्दल काही माहिती दिली. या पुस्तकाबद्दल काही मनोरंजक माहिती सांगितली. मी लगेच मधुश्री पब्लिकेशन यांचे 'वॉल्डन' आदरणीय लेखक जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक मागवले व वाचण्यास सुरुवात केली. पुस्तक वाचत असताना ते समजून घेत असताना सत्कार्णी वेळ जात होता व त्याचबरोबर माझ्यातील मीपणाही जात होता. डॅनियल गोलमन यांनी लिहिलेलं इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकानंतर मला हे पुस्तक वाचण्यास व समजून घेण्यास वेळ लागला.पण तो वेळ माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता.
इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत-निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.या वाक्याचा मी बराच वेळा विचार केला. कारण मला पुढे बराच विचार करायचा होता..!
जितराबावर बसून त्याचा फडशा पाडणाऱ्या गिधाडांना पाहून आपल्या मनात शिसारी येते पण ते मढ़ खाऊन ते गिधाड मोठे होते,उडते, हे पाहून आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे हेच जीवनसत्य यातून आपल्याला सांगायचे आहे.
निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी. पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प (किंवा जास्त ) असावे. सुज्ञ माणूस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो. औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे.अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो. अनुकंपा आणि दया हे त्यांच्या जागी ठीक आहेत. आपण एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोक करू शकतो पण मृत्यू' वर आपण प्रेमच केले पाहिजे..! पान नंबर ३०६ वरील हा उतारा मला जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन देऊन गेला.
ज्या माणसाचे विचार सूर्याबरोबर धावतात त्याचा दिवस हि निरंतर सकाळचं असते मग घड्याळात काहीही वेळ सांगो किंवा कामाला जाणारे काहीही सांगोत मी जागा झालो की माझी सकाळ होते आणि पहाट माझ्यात भिनते. झोपेचे,आळसाचे पांघरून फेकून देणे ही एक नैतिक सुधारणाच आहे असे मी मानतो. या नविन विचाराने मी प्रभावित झालो.
सद्गुण एखाद्या टाकून दिलेल्या पोरक्या मुलासारखे कधीच एकटे राहात नाहीत. ते तुमच्या जवळ असले की इतर चांगल्या गोष्टीही तुम्हाला चिकटतातच. कन्फ्युशियसचे हे तत्वज्ञान किती खरं आहे. मला याची जाणीव झाली.
प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतःचा कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो. थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो. आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा, पाऊस पाडणारा इंद्र असलो काय, काहीच फरक पडत नाही ही अप्रतिम वाक्ये मनाची ठाव घेणारी आहेत.
या पुस्तकात मला कीटकशास्त्र ही वाचावयास मिळाले. किर्बी आणि स्पेन्सच्या कीटक शास्त्राच्या पुस्तकानुसार कित्येक कीटक असे आहेत. जे पुर्ण वाढल्यावर तोंडही हलवीत नाहीत. जे काय खायच आहे ते त्यांनी अळीच्या स्वरूपात असतानाच खाऊन घेतले असते. या पुस्तकाच्या लेखकांनी याबाबतीत त्यांचे एक निरीक्षण लिहिले आहे,ते म्हणतात जवळ जवळ सर्व कीटकांचा आहार अळी असताना असतो त्यापेक्षा खूपच कमी असतो. उदा. खादाड अळीचे जेव्हा फुलपाखरांत रूपांतर होते तेव्हा त्याचे बोट मधाच्या अर्ध्या थेंबानेही भरते. फुलपाखरांच्या पंखाखाली दिसणारे त्याचे शरीर हे त्या आळीचे शिल्लक असलेले रूप आहे. या उरलेल्या अवयवांमध्ये बिचाऱ्या फुलपाखराला कधीकधी खाण्याचा मोह पडत असावा. हे सर्व वर्णन माझ्यासाठी अविस्मरणीय होते...
भूक लागलेली नसताना केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नग्रहण करून आनंद मिळवलेला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडायची नाही. यासाठी माणसे अन्नांच्या खमंग चवीला जबाबदार धरतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर पदार्थाच्या चवीने मला त्या पदार्थांची अनुभूती घेता येते त्यासाठी मी चवीचा अत्यंत ऋणी आहे. चव भुकेसाठी प्रेरणादायी आहे आणि भुकेने मला प्रेरणा मिळते. माझ्या बुद्धिमत्तेच्या वाढीमध्ये व प्रतिभा स्फुरण्यामागे जंगलातील डोंगरांमध्ये वेचून खाल्लेल्या बेरींचाही वाटा आहे हे सांगण्यास मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. आपला अंतरात्मा त्याचा स्वतःचा गुलाम नाही त्यामुळे होते काय, आपण बघतो पण आपल्याला खऱ्या अर्थाने दिसत नाही. आपण ऐकतो पण आपल्याला ऐकू येत नाही. आपण खातो पण आपण त्याचा आनंद घेत नाही. जो माणूस चवीने खातो तो खादाडखाऊ होऊच शकत नाही आणि जो अन्नाचे सेवन चवीने करीत नाही तो खादाडखाऊ शिवाय दुसरा काही होत नाही. मॅथ्यू यांच्या वाचनामध्ये थोडासा बदल करून सांगितलं गेलं आहे की तुम्ही ग्रहण करीत असलेल्या अन्नाने तुम्हाला कधीच अपचन होत नाही, तुम्ही ते किती भूक असताना खाता यावर ते अवलंबून असते. किती अन्न खाता आणि कुठल्या प्रतीचे खाता यावर काही अवलंबून नाही, ते तुम्ही किती श्रध्देने, आनंदाने खाता यावर त्याचे पचन अपचन अवलंबून आहे. थोडक्यात काय, अन्न हे पूर्णब्रह्म आहे यावर तुमची श्रद्धा हवी. यासारख्या सरळ साध्या सांगितलेल्या अनेक श्रद्धा या पुस्तकात जागोजागी आहेत. या श्रद्धेपुढे मी नतमस्तक आहे.
तो माणूस खरा नशीबी,
ज्याने त्याच्यातील पशु,
मनातील आंधारे जंगल तोडून,
त्याला हाकलून दिले आहे...
पृथ्वी म्हणजे काही इतिहासाचा एक उडालेला टवका नाही ना दगड मातीचे एकमेकांवर रचलेले थर,जशी पुस्तकांची पाने एकमेकांवर रचलेली असतात. शास्त्रज्ञ आणि साहित्यिक या टक्क्याचा आणि पानांचा अभ्यास करतीलही पण पृथ्वी म्हणजे एक जिवंत काव्य वृक्षांच्या पानांसारखे जी फळाफुलांच्या आधीच फांद्यांवर फुटतात.पृथ्वी म्हणजे काही जिवाष्म नव्हे पृथ्वी सजीव आहे. किंबहुना पृथ्वीचे आयुष्य पाहता मला तर वाटते त्यावरील सर्व जीवसृष्टी ही एक बांडगुळच आहे.अशा या पृथ्वीला वेदना दिल्या तर तिच्या एका हुंदक्या सरशी तिच्यात गाडली गेलेली मढी एका झटक्यात बाहेर पडतील. तुम्ही धातूच्या सुंदर मूर्ती ओताल,मला त्याही आवडतात पण या वाहणाऱ्या वाळूत जे मला आकार व कला पाहायला मिळतात तेच मला भावतात व ते पाहून मी अगदी खूश होऊन जातो. नुसते आकारच नाही तर तो निसर्ग ही कुंभाराच्या हातातील माती प्रमाणे त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो, किंवा घेऊ शकतो त्याची मला जास्त मजा वाटते. हे पृथ्वीचे जीवन वर्णन मनाला बरंच काही सांगून गेल.
या पुस्तकामुळे माझ्या मध्ये व माझ्या दृष्टिकोनामध्ये बदल होण्यास सुरूवात झाली आहे. शेवटी या पुस्तकातील वाक्याने मी मला जाणीव झालेला निरोगी दृष्टिकोन आपल्या समोर सादर करून मी अल्प विश्रांती घेतो.
मधुश्री पब्लिकेशन,हेन्री डेव्हिड थोरो,आदरणीय लेखक जयंत कुलकर्णी या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे व त्यांना धन्यवाद देतो.अतिशय साध्या सोप्या भाषेत अवघड अशी जगण्याची जीवन पद्धत समजावून सांगितली आहे. त्यामुळेच मी वॉल्डेन व तिथे असणाऱ्या व वैविध्यपूर्ण निसर्गाचा पक्षी प्राण्यांचा माझ्या आत्म्यापासून प्रवास करु शकलो.
मनुष्याला फक्त स्वतःचा किनारा माहीत होता आणि त्याला समुद्र पार करण्याची नव्हती गरज..!
विजय कृष्णात गायकवाड