एखाद्या वस्तूची वॉरंटी,गॅरंटी किंवा हमी किती असू शकते? एक वर्ष,दोन वर्षं,पाच वर्षं,दहा वर्षं...? आपली झेप यापलीकडे जात नाही नं..?
पण निर्माण किंवा स्थापत्य क्षेत्रातल्या भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या विटेची गॅरंटी आहे,हमी आहे - ५,००० वर्षे..! होय.पाच हजार वर्षं.अन् ह्या विटा आहेत मोहन-जो-दारो आणि हडप्पा येथे सापडलेल्या पुरातन संस्कृतीच्या अवशेषांमधल्या !
भारतात जेव्हा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची तयारी चाललेली होती,त्या काळात भारताच्या उत्तर पश्चिमेला (म्हणजे आजच्या पाकिस्तानात) इंग्रज रेल्वेचं जाळं उभं करण्याच्या खटपटीत होते.लाहोर ते मुलतान ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीतर्फे चालू होत.या कामाचे प्रमुख होते जॉन आणि विलियम ब्रुनटन हे ब्रिटिश अभियंते यांच्या समोर मोठं आव्हान होतं की,रेल्वे लाईनच्या खाली टाकण्यासाठीची खडी (गिट्टी) कुठून मिळवावी हे.
काही गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की, ब्राम्हनाबाद जवळ एक पुरातन शहर 'खंडहर' झालेल्या स्थितीत पडलंय.तिथल्या विटा तुम्हाला मिळू शकतील.
रेल्वे अभियंता असलेल्या ह्या दोघा भावांनी मग त्या अवशेषांमधल्या विटा शोधून काढल्या.त्या बऱ्याच होत्या.
लाहोर ते कराची ह्या सेगमेंटमधील रेल्वे लायनीत जवळपास ९३ किलोमीटरची लाईन ही या विटांनी बांधली गेली आहे.
या दोघा अभियंत्यांना हे कळलंच नाही की, एका अतिशय पुरातन आणि समृद्ध अशा हडप्पाच्या अवशेषांना आपण नष्ट करत आहोत!
पुढे बरीच वर्षं ह्या ऐतिहासिक विटांनी लाहोर-मुलतान रेल्वे लाईनला आधार देण्याचं काम केलं.
नवीन झालेल्या कार्बन डेटिंगच्या शोधाने हे सिद्ध झालंय की मोहन- जो-दरों,हडप्पा,लोथल इत्यादी ठिकाणची आढळलेली पुरातन संस्कृती ही साडेसात हजार वर्षं जुनी असावी. ह्या विटा जरा अलीकडल्या म्हटल्या तरी त्या पाच हजार वर्षं जुन्या होतात.अशा ह्या किमान पाच हजार वर्षं जुन्या विटा,१८५७ साली मिळाल्या तेव्हाही मजबूत असतात आणि त्या पुढे ८० / ९० वर्षं रेल्वेचे रूळ सांभाळण्याचं काम करतात...!! आज अशा विटा बनू शकतील..?
हडप्पा येथे सापडलेल्या ह्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.ह्या भट्टीत व्यवस्थित भाजलेल्या आहेत.
साधारण १५ वेगवेगळ्या आकारांत ह्या आढळतात.पण ह्या सर्व आकारांत एक साम्य आहे ह्या सर्व विटांचं - प्रमाण हे ४ : २: १ असं आहे. म्हणजे ४ भाग लांबी, २ भाग रुंदी आणि १ भाग उंची (जाडी). याचाच अर्थ ह्या विटा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तयार झाल्या असाव्यात.मग प्रश्न निर्माण होतो की,साधारण पाच ते सात हजार वर्षांपूर्वी हे बांधकामशास्त्रातलं प्रगत ज्ञान आपल्या भारतीयांजवळ कुठून आलं.. ? की भारतानंच हे शोधून काढलं ?
याचं काहीसं उत्तर आपल्याला जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये मिळतं.
तंत्रशास्त्राचे काही ग्रंथ वाचिक परंपरेमुळे आज उपलब्ध आहेत.त्यातील कपिल वात्सायनाचा ग्रंथ आहे.'मयमतम कला- मुला शास्त्रं' नावाचा.हा ग्रंथ बांधकामासंदर्भातील अनेक बाबी स्पष्ट करतो. यातील एक श्लोक आहे
'चतुष्पश्चषडष्टाभिमत्रिस्तद्विद्विगुणायतः ॥ व्यासार्धार्धत्रिभागैकतीव्रा मध्ये परेऽपरे ।
इष्टका बहुशः शोष्याः समदग्धाः पुनश्च ताः।।'
याचा अर्थ आहे -'ह्या विटांची रुंदी चार,पाच, सहा आणि आठ ह्या नंतर भाजून घटकांमधे असून लांबी ह्याच्या दुप्पट आहे.ह्यांची उंची (जाडी) ही रुंदीच्या एक द्वितीयांश किंवा एक तृतीयांश असावी.ह्या विटा वाळवून घ्याव्यात.'
हा श्लोक ज्या ग्रंथात आहे,तो ग्रंथ लिहिला गेलाय इसवी सनाच्या सहाव्या शतकात. म्हणजे आजपासून साधारण दीड हजार वर्षांपूर्वी. आणि हडप्पामध्ये याच प्रमाणात/ आकारात सापडलेल्या विटा आहेत पाच ते सात हजार वर्षं जुन्या.
याचा अर्थ स्पष्ट आहे.बांधकामशास्त्रातलं अत्यंत प्रगत असं ज्ञान ज्ञात इतिहासाच्या काळापासून भारताजवळ होतं आणि ते शास्त्रशुद्धरीत्या वापरलं जात होतं.
एक तुलनेनं अलीकडचं उदाहरण घेऊ. विजयनगर साम्राज्याच्या उत्तर काळात,म्हणजे सन १५८३ मधे बांधलं गेलेलं लेपाक्षी मंदिर. असं सांगितलं जातं की,जटायूने सीतेचं हरण करणाऱ्या रावणाबरोबर संघर्ष करून येथेच देह ठेवला होता.बंगलोरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर,पण आंध्र प्रदेशाच्या अनंतपूर जिल्ह्यात असलेलं हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.विजयनगर साम्राज्याच्या वीराण्णा आणि विरूपण्णा ह्या दोन सरदार भावंडांनी हे मंदिर बांधलेय.कूर्मशैल पठारावर म्हणजे कासवाच्या पाठीच्या आकाराच्या टेकडीवर बांधलेले हे मंदिर वीरभद्राचे आहे.सुमारे सव्वापाचशे वर्षं जुने हे मंदिर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे.
सत्तर खांबांवर आधारलेल्या ह्या मंदिराचा एक खांब हा झुलता आहे..! अर्थात तो तसा वाटत नाही.जमिनीवर टेकलेलाच वाटतो.मात्र त्याच्या खालून पातळ कापड आरपार जाऊ शकते.वरती बघितलं तर त्याला बांधून ठेवणारी अशी कोणतीही रचना तेथे दिसत नाही.
बांधकामशास्त्रातल्या दिग्गजांना आणि शास्त्रज्ञांना सतावणारे हे गूढ आहे.हा खांब (स्तंभ) कोणत्याही आधाराविना झुलता कसा राहतोय हे कोणालाही सांगता येत नाही. इंग्रजांचे शासन असताना एका इंग्रज अभियंत्याने ह्या खांबावर बरेच उपद्व्याप करून बघितले.पण त्यालाही ह्या रचनेचे रहस्य शोधता आले नाही.
म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बांधकामशास्त्रातले हे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होते.पुढेही ते अनेक ठिकाणी दिसते.
प्रतापगड आणि रायगड तर शिवाजींच्या काळातच बांधले गेले.पण इंग्रजांनी मुद्दाम केलेली पडझड सोडली तर आजही हे किल्ले बुलंद आहेत.
पण नंतर इंग्रजांनी आपले सिव्हील इंजिनिअरिंग भारतात आणले आणि
स्थापत्य / बांधकामशास्त्रातील थोडेफार उरलेले भारतीय ग्रंथ बासनात गुंडाळले गेले आणि अडगळीत पडले.
भारतीय शिल्पशास्त्राचे (किंवा स्थापत्यशास्त्राचे) अठरा प्रमुख संहिताकार मानले जातात.ते म्हणजे भृगु,अत्री,वसिष्ठ,विश्वकर्मा,मय,नारद, नग्नजीत,
विशालाक्ष,पुरंदर,ब्रम्हा,कुमार,नंदिश, शौनक,
गर्ग,वासुदेव,अनिरुद्ध,शुक्र व बृहस्पती. या प्रत्येकाची शिल्पशास्त्रावरील स्वतंत्र अशी संहिता होती.मात्र आज फक्त मय,विश्वकर्मा,भृगु,नारद आणि कुमार यांच्याच संहिता उपलब्ध आहेत.अर्थात शिल्पशास्त्रातील एक तृतीयांशपेक्षाही कमी ज्ञान आज उपलब्ध आहे.इतर संहिता मिळाल्या तर कदाचित लेपाक्षी मंदिरातील झुलणाऱ्या खांबाच्या रहस्यासारखी इतर रहस्ये उघडकीला येतील.
भारतात उत्तरेकडून ज्या काळात मुसलमानांच्या आक्रमणांची तीव्रता वाढली,त्याच काळात, म्हणजे ११ व्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने 'समरांगण सूत्रधार' हा ग्रंथ संकलित केला. यात ८३ अध्याय आहेत.आणि स्थापत्य - शास्त्रापासून ते यंत्रशास्त्रापर्यंत अनेक बाबींचे विस्तृत विवरण आहे.अगदी हायड्रोलिक शक्तीने टर्बाईन चालविण्याचा विधीही यात दिलेला आहे-
'धारा च जलभारश्च पायसो भ्रमणम तथा । यथेोच्छ्रायो यथाधिक्यम यथा निरन्ध्रतापिच । एवमादिनी भूजस्य जलजानीप्रचक्षते' ।। अध्याय ३१
अर्थात जलधारा वस्तूला फिरवते.आणि उंचावरून जलधारा पडली तर तिचा प्रभाव अधिक तीव्र असतो आणि तिच्या वेगाच्या आणि वस्तूच्या भाराच्या प्रमाणात वस्तू फिरते.
या समरांगण सूत्रधारावर युरोपमधे बरेच काम चालले आहे.मात्र आपल्या देशात या बाबतीत उदासीनताच दिसून येते.साधारण ८० च्या वर वय असलेल्या डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे यांनी या ग्रंथाचा चिकाटीने इंग्रजीत अनुवाद केला अन् पाश्चात्त्य जगाचे लक्ष या ग्रंथाकडे गेले.
हे असं स्थापत्यशास्त्रावरचं ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात अडगळीत पडलंय.त्याला बाहेर आणणं आवश्यक आहे.मंदिर स्थापत्यशास्त्र आणि मूर्तिकला या विषयांवर आपल्यापर्यंत झिरपत आलेलं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचं 'भारतीय मूर्तिविज्ञान' या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे.पण या विषयावर आजच्या काळात बरंच काम होणं आवश्यक आहे.
एकुणात काय,तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाची कवाडं शोधणं आणि ती उघडणं याचाच हा सारा प्रवास आहे..!
२८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…