* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ऑक्टोबर 2022

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/१०/२२

… जाणून घेऊया किटकपुराण..

● मुंग्या


जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्यांच्या प्रजाती आहेत.


ह्या कमीतकमी १० हजार ते १० लाख संख्येने एकत्रितपणे राहतात.


मुंग्या एकाचवेळी एकाच झाडाची सगळी पाने तोडत नाहीत.(निसर्गाने त्यांना तशी बुध्दी दिली आहे.)


लाखो हजारो संख्येने हल्ला करुन संपूर्ण झाडावरील सगळी पाने तोडू शकतात.पण त्या तसं करत नाही.आसपास असणाऱ्या इतर झाडांची पाने ती तोडतात.ही पाने आपल्या जमिनीखाली असणाऱ्या वारूळामध्ये (त्यांच्या घरात) नेऊन ठेवतात, व त्यावरती त्यांना खाण्यासाठी लागणारी बुरशी पसरवतात,त्यांची वाढ करतात.अशा पध्दतीने मुंग्या शेती करतात..


मुंग्या दुग्धपालन व पशुपालन सुद्धा करतात त्यांना आवडणारे जे किडे असतात. त्यांच्या शरीरातून जो पांढरा द्रव येतो. तो मुंग्यांना  फार आवडतो अशा किड्यांना मुंग्या पाळतात त्यांना खायला घालतात आणि त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा तो पांढरा द्रव खातात. मुंग्यांच्या नादाला कोणताही प्राणी किंवा पक्षी लागत नाही आणि मुंग्याही कुणाला भीत नाहीत कारण त्या एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करतात.

( हत्तीसुध्दा यांच्या नादाला लागत नाहीत.)


या मुंगीच्या घराची रचना ही विशिष्ट प्रकारे केलेली असते.ज्या छोट्याशा जागेतून म्हणजे मुंग्या आत जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काही मुंग्यांची ही नियुक्ती केली जात असते.( तिन्ही शिफ्टमध्ये यांचे हे सुरक्षा देण्याचे काम चालते.) तर विशिष्ट असा वेगळा आहार देऊन त्या मुंग्यांना बलवान केले जाते आणि मुंग्यानीच स्वतः तयार केलेल्या रसायनाचा वापर त्यांच्या डोक्यावरती करून त्यांचं डोकं ढालीसारखं टणक केलं जातं. यामुळे त्यांचं डोकं हे दरवाज्यासारखं होतं आणि घरात येणाऱ्या मार्गासमोर ते एका चिरेबंद दारासारखं बंद केलं जातं. या दरवाजातून ज्या वेळेला मुंगी आत येते त्यावेळी ही मुंगी आपलीच आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी तिच्या अंगाला 'ओळखीचा' वास येतो का याची आधी खात्री करून घेतली जाते,आणि मगच तिला या घरामध्ये प्रवेश दिला जातो. मुंगी आपल्या वजनापेक्षा पाच ते सात पट वजन जास्त उचलू शकते. आणि जर त्या एकाचवेळी एकत्रित आल्या.तर आपल्या समुहापेक्षा ५० ते ६० पट वजन उचलू शकतात.


● फुलपाखरु 


मोनार जातीच्या फुलपाखरांची रूंदी जवळजवळ १ फुटांपर्यंत असते.ते अंडी घालण्यासाठी आपल्या वस्तीपासून ४ हजार किलोमीटर दूर जातात.आणि तिथे अंडी घालतात.ते अंतर आहे कन्याकुमारीचे टोक लडाख असे जरी धरले.


तरी ते ३८००(अडत्तीशे) कि.मी.होते. त्या ठिकाणी जाऊन तिथे अंडे घालतात.व परत येताना ते आपल्या पिल्लांना सोबत घेऊन मूळ ठिकाणी परत येतात.

का,कसं याचं संशोधन अजून बाकी आहे?


फुलपाखरे ही क्षार मिळवण्यासाठी समुद्राकाठी येतात.कारण त्यांच्या शरीरामध्ये क्षार नसते. ते मिळवण्यासाठी ते मृत प्राण्याजवळ जातात. सर्वात अगोदर फुलपाखरे याठिकाणी पोहोचतात.याकामी त्यांची तीक्ष्ण संवेदना नैसर्गिकरित्या उपयोगाला येते.जी मृत प्राण्याजवळ जाण्यासाठी त्यांना मदत करते.


पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली. आणि यासाठी ऊर्जेची गरज भासली.व ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आल्या.ज्यावेळी खाणींमध्ये काम करत असताना. कोळशाचा चुरा,राख व इतर घटक हे हवेमध्ये मोठ्याप्रमाणात वातावरणात मिसळून  जात.त्यामुळे आसपासचा सर्व परिसर हा काळाकुट्ट व्हायचा.हे सर्व होत असताना.नकळतपणे जवळच असणारी माणसं,झाडं हीसुध्दा काळी झाली होती..पण या काळ्या वातावरणात मात्र ही फुलपाखरे रंगीबेरंगी होती.त्यामुळे एक अडचण निर्माण झाली होती.सगळा परिसर काळा पण फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी यामुळे त्यांना खाणारे सहज त्यांना ओळखत व मटकन खाऊन टाकत होते. त्यामुळे त्यांची पुढील पिढी अनुभव घेवून उत्क्रांत झाली.व त्यांनी काही कालांतराने आपला रंग कळा करून घेतला.पुढे कोळशाच्या खाणी बंद पडल्या त्यांची कोळशाची गरज संपली. परत पुढच्या ६० ते ७० वर्षामध्ये गंमत झाली. त्या फुलपाखरांनी परत आपला पुर्वीसारखा मुळ निसर्गाचा रंग धारण केला. त्यांच्या स्पिसिजमध्ये जे रंग होते.ते त्यांना सन्मानाने परत  मिळाले.


● कोळी ( स्पायडर )


आपल्याला जे कोळी दिसतात. त्यात कोळी जो जाळ विणतो. शक्यतो हे जाळ दरवेळी नर विणतो.त्यावेळी मादी बाजूला असते. मादी ही नरापेक्षा तीन चार पटीने मोठी असते. या जाळ्यामध्ये जर शिकार अडकली. तर नर आणि मादी दोघे मिळून त्याचा ताबा घेतात. यांच्यामध्ये एक भन्नाट पद्धत असते.जर एखाद्या नर कोळ्याला मादीला प्रपोज करायचं असेल तर त्या मादीला आवडणाऱ्या किड्याची शिकार करून त्याला अर्धमेला करून व्यवस्थित पॅकिंग करून मादीला तो भेट म्हणून देतो व तीला मागणी घालतो.(प्रपोज करतो)


जर मादीला ते पॅकिंग त्यातील किडा आवडला तर ती त्याला होकार देते,व ते एक होतात. असे निरीक्षण करून शास्त्रज्ञांनी त्याची नोंद घेतलेली आहे.


काही कोळी हुशार असतात त्यांना मुंग्या फार आवडतात. इतर कीटक त्यांना आवडतात पण मुंग्या त्यांच्या खास आवडीच्या असतात.आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की वाघाचं कातडं पांघरून वावरणारा लांडगा नेमकी याच गोष्टीची उजळणी हे कोळी करत असतात.


कोळ्यांना मुंग्या आवडतात पण मुंग्या सहजासहजी त्यांना 'हिगंलत' नाहीत.(विचारत) नाहीत.कारण त्या हल्ला करतात ही भीती असतेच. मग याठिकाणी कोळ्यांची कल्पकता धावून येते.हे कोळी मुंग्यांच्या जवळ जाऊन आकर्षित हालचाली करतात. आणि वेळ मिळताच एका मुंगीला अर्धमेली करतात.तिचे संपूर्ण शरीर आतून पोखरतात. व त्या शरीराच्या आत जातात. 'वरून मुंगी आतून कोळी' असं बहुरूप घेऊन हा कोळी मुंग्यांच्या वारूळात शिरतो.आणि हळूहळू त्यातील मुंग्यांचा फरशा पडतो. ही गोष्ट शोधून संशोधकांनी नवीन माहिती आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहे.


(सोनकिडे किंवा सोंडकिडे ही हाच मार्ग अवलंबतात.पण जर ते सापडले तर मात्र मुंग्या त्यांचा फडशा पाडतात. )


आतापर्यंत शोध लागलेल्या व शोधलेल्या अशा

७ लाख कीटकांच्या जाती माहीत झालेल्या आहेत. 


जाता जाता..!


मित्रांनो,जगामध्ये अमेरिकासारख्या देशात 'किड्याचा' मोठा पुतळा आहे.जो अलाबामा शहरात १०० वर्षापूर्वी सन्मानपूर्वक उभा केला आहे.अमेरीकेत त्यावेळी साधारणतः कपाशीचे पिके घेतले जात असे.त्यावेळी त्या राज्यातील सर्व पिकांवर कीड पडली. व किड्यांनी संपूर्ण पीक नष्ट केले. सर्वजण देशोधडीला लागली.


लोक परागंदा झाली.काहींनी राज्य सोडले.आणि त्याच वेळी 'एक होता कार्व्हर' यांचे आगमन झाले.त्यांनी त्या लोकांना भुईमूग,मका अशी  वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेण्यास सांगितले.त्यासाठी लागणारी सर्व माहिती त्यांनी लोकांना सांगितली. त्यानंतर दहा वर्षातच कष्ट करून त्या राज्याने आपली प्रगती केली.व लवकरच ते राज्य समृद्ध राज्य म्हणून गणले जावू लागले.


मग सर्वानुमते एक ठराव संमत करण्यात आला.आणि तो ऐतिहासिक,क्रांतिकारी जगावेगळा निर्णय घेण्यात आला. ज्या किड्यामुळे आपले कपाशीचे पीक नष्ट झाले,आणि आपणास पर्यायी पिकांचे उत्पादन घेण्याचा मार्ग मिळाली.त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे बळ प्रदान करून नैसर्गिक निवड करायला सहकार्य केलेल्या त्या किड्याचा आपण मनस्वी सन्मान करायचा.त्या किड्याने जर पीक नष्ट केले नसते तर आपण दुसऱ्या पिकांचा विचारही केला त्या किड्याने आपणास पर्यायी मार्ग शोधण्यासाठी मदतच केली. म्हणून सन्मानपूर्वक सन्माननीय असा पुतळा बसवला गेला.

धन्य ती लोकं धन्य तो किडा..! हिच ती 'निसर्गाची नवलाई'


'निसर्गाची नवलाई' या सतीश खाडे यांच्या पाॅडकास्टमधून..


शब्दांकन - विजय कृष्णात गायकवाड


सदर लेखामधील भाग "मासिक शिक्षणयात्री ऑक्टो - नोव्हे जोडअंक 2022 ( दिवाळी विशेषांक ) मध्ये प्रकाशित केल्याबद्दल सर्वच संपादकीय मंडळाचे आभार..








२८/१०/२२

वानरांची शेकोटी…।

 पंचतंत्रात एका ठिकाणी वानरं गुंजा जमा करून त्याभोवती शेकत बसल्याचा उल्लेख आहे.


कोणा पर्वतातील जंगलात वानरांचा कळप राहात होता.थंडीच्या दिवसांत तेथे अति शीत वारे वाहू लागले. त्यातून पाऊस पडल्यामुळे ती वानरे गारठून गेली. तेव्हा त्यांतील काही वानरांनी अग्नीसारख्या दिसणाऱ्या तांबड्या गुंजा गोळा केल्या आणि त्यांभोवती बसून सारी वानरे अंग शेकू लागली. ते दृश्य सूचिमुख नावाच्या पक्ष्याने पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अरे मूर्खानो, गुंजा जरी विस्तवासारख्या लाल असल्या,तरी त्यामुळं तुम्हांला ऊब मिळणार नाही. थंडीपासून निवारण करण्यासाठी वनप्रदेशातील गुहा अथवा गिरिकंदरं यांचा आश्रय घ्या."


नागपुरात धंतोली भागात राहणारे वनस्पतीचे गाढे अभ्यासक आप्पासाहेब बुटी यांची ओळख १९९० साली माझे ग्रंथप्रेमी मित्र लक्ष्मणराव सोनी यांनी करून दिली. ते आप्पासाहेबांच्या शेजारीच राहतात.


आप्पासाहेब तरुणपणी चंद्रपूर, गडचिरोली इथं आणि पंचमढीजवळच्या सातपुडा पर्वतात शिकारीच्या निमित्तानं खूप भटकले आहेत. एके काळचे ते नामांकित शिकारी,परंतु शिकारीपेक्षा त्यांना वनौषधींच्या संशोधनात अधिक रस होता. अशा अरण्यभ्रमंतीत वनवासी लोकांकडून त्यांनी खूप माहिती गोळा केली आहे. त्याविषयी ते तासन् तास बोलतात. वन्यप्राण्यांचंदेखील त्यांनी जवळून निरीक्षण केलं आहे.


एकदा आप्पासाहेबांचा वनस्पतिशास्त्रावरील दुर्मीळ ग्रंथसंग्रह पाहात असता ते म्हणाले,


"चितमपल्लीसाहेब, तुम्ही कधी ऐकलंय का, जंगलातील वानरांचा कळप थंडीच्या दिवसांत शेकोटी करतो ?"


मी म्हणालो,

" परंतु वानरं तर आगीला भितात!"

ते म्हणाले,

"ऐका तर खरं,ते काटक्यांची शेकोटी रचतात, परंतु ती पेटवीत नाहीत." मी पंचतंत्रातील सूचिमुख पक्ष्यानं वानरांना विचारलेला प्रश्न आप्पासाहेबांना केला,


"मग त्यांना ऊब कशी मिळत असेल ?"

"ते मला सांगता येणार नाही!"


"तुम्ही ती शेकोटी कधी पाहिलीय्?" "मी पाहिली नाही. जळगाव जिल्ह्यातील माझ्या एका नातेवाईकानं पाहिल्याचं ते सांगत होते. "

मी लगेच म्हणालो,

"त्यांच्याकडे चौकशी करायला जायचं का? कारण वानरांविषयी मी गेली अनेक वर्षं अभ्यास करतोय.परंतु त्यांच्या या सवयीविषयी मी पहिल्यांदाच ऐकतोय. वन्यप्राणिशास्त्रावरील कुण्या नव्या किंवा जुन्या ग्रंथात याचा उल्लेख नाही.भेटी अंती सारा काही खुलासा होईल. वाटल्यास त्यांच्याबरोबर जंगलात जाऊन शेकोटीचं निरीक्षणही करता येईल!" यावर ते म्हणाले,

"असं करू या. पुढच्या म्हणजे मे महिन्यात तेच माझ्या घरी येणार आहेत. तेव्हा त्यांची ओळख करून देतो. त्यांना काय ते सविस्तर विचारा.' "


परवा रावेर तालुक्यातील विवरे गावचे श्री. अनंत रामकृष्ण कुलकर्णी यांची भेट झाली. आप्पासाहेब बुटी यांचे ते नातेवाईक. बुटी यांनीच त्यांची ओळख करून दिलेली होती.


मी शेकोटीविषयी विचारताच ते सांगू लागले :


"१९५२ सालची गोष्ट. सातपुड्याजवळ पालच्या एका शेतकऱ्यानं मला एक माकडाचं पिलू पाळायला आणून दिलं. बोलण्याच्या ओघात त्या शेतकऱ्यानं वानरं आणि माकडं शेकोटी करीत असल्याचं सांगितलं. माझा त्यावर विश्वास बसेना. म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्या शेतकऱ्याबरोबर सातपुड्याच्या जंगलात गेलो. ते थंडीचे दिवस होते. जंगलात बराच वेळ वानरांच्या शेकोटीच्या शोधात आम्ही भटकत राहिलो. शेवटी एका ठिकाणी वानरांचा कळप शेकोटीभोवती बसलेला दिसला. शेतकरी म्हणाला, " हीच ती शेकोटी".

"आम्ही त्यांच्या नजीक जाताच ती वानरं पळून गेली. मी त्यांच्या शेकोटीचं निरीक्षणं केलं. जंगलातील सुकलेल्या काटक्या-कुटक्या गोळा करून ती शेकोटी रचलेली होती.' 


मी माझ्या सोबतीच्या शेतकऱ्याला विचारलं,

"शेकोटी पेटलेली नसताना वानरांना ऊब कशी मिळते?"

त्याला ह्या गोष्टीचा खुलासा करता येईना; परंतु तो म्हणाला "या काटक्या तुम्ही पेटवून पहा. या अजिबात जळणार नाहीत. "

" मी लगेच खिशातील आगपेटी काढून त्या काटक्या पेटविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी पेट घेतला नाही. शेवटी मी त्या घरी आणल्या. त्यावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. वरवरचं रॉकेल जळलं,परंतु काटक्या मात्र जळल्या नाहीत. "

मी नंतर कुलकर्णी यांना विचारलं,

"काटक्या न जळण्याचं कारण काय असावं ?" ते काही क्षण विचार करीत म्हणाले,

"काष्ठात अग्नी असतो, हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यातील अग्नितत्त्व वानरांनी आपल्या नजरेनं खेचून घेतलं असावं!"

मी मनात म्हणालो, "हे तर अतिच झालं. वानरांना योगी म्हणायचं की काय ?"

परंतु पातंजलीनं मात्र वन्य प्राणी हे खरोखरीचे सिद्धयोगी असतात,असं विधान केलं आहे. विज्ञानाच्याही पलीकडं पाहायची आपल्या प्राचीन भारतीय विचारवतांजवळ जी दृष्टी होती. तिचा अभाव आता जाणवत आहे.


" पाखरमाया - मारुती चितमपल्ली "

यांच्या पुस्तकातून..



२५/१०/२२

जीवनातील सर्वोत्तम प्रेम…

'प्रेम'तुम्हाला खुणावील तेव्हा त्यामागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असतील.

प्रेमानं तुमच्यावर पाखर घातली म्हणजे त्याला शरण जा. 

त्याच्या पंखांत पोलादाची पाती लपलेली असतील. ती तुम्हाला जखमी करतील.

प्रेम तुमच्याशी संवाद करील तेव्हा त्यावर विश्वास ठेवा.

उत्तरेकडून येणारा वारा बगीचा उद्ध्वस्त करतो तसा प्रेमाचा स्वर तुमची स्वप्नं उधळून लावील. कारण,प्रेम तुम्हाला राजवैभव देईल तसं सुळावरही नेईल.

तुमच्या अंतःकरणाच्या उंचीला ते पोहोचेल. सूर्यप्रकाशात थरथरणाऱ्या नाजूक डहाळ्यांना कुरवाळील,तसं ते तुमच्या मुळांपर्यंत जाईल आणि त्यांना गदगदून तुमची मनोभूमी थरकापवील.

धान्याचे पाचुंदे बांधावे तसं ते तुम्हाला तुमच्याशी आवळून धरील. झोडपून तुम्हाला नागवं करील. तुम्हाला दळून काढील. तुमचं पीठ करील. तुम्हाला तिंबील, खिळखिळं करील.

मग ते तुम्हाला ईश्वरी ज्वालेच्या निखाऱ्याशी नेईल, तेव्हाच त्याच्या पावन भोजनाचं खाद्यान्न तुम्ही व्हाल.

हे सगळं, प्रेम कशासाठी करील? तर त्यामुळं तुमच्याच अंतःकरणाची रहस्यं तुम्हाला उमजावीत आणि त्या जाणिवेनं ईश्वरी चैतन्याचा एक अंश तुम्ही होऊन जावं..


पण जिवलगांनो, भयाच्या आहारी जाऊन प्रेमाकडून शांतीची न् सुखाचीच आकांक्षा कराल तर आपलं नागवेपण झाकून प्रेमाच्या यातनाघराकडे तुम्ही पाठ फिरवावी हेच बरं. मग तुमचं जग ऋतुरंगहीन होईल.

तुम्ही हसाल, पण त्यात तुमचं सुखसर्वस्व नसेल. तुम्ही रडाल,पण त्यात तुमचं दुःखसर्वस्व नसेल. प्रेम काय देतं? तर केवळ स्वतःचंच दान देतं. प्रेम काय नेतं? तर केवळ स्वतःलाच विन्मुख करतं.

प्रेम तुम्हाला झडपणार नाही

की स्वतः ही झडपलं जाणार नाही 

कारण प्रेम स्वयंपूर्ण आणि स्वयंतृप्त आहे. 

तुम्ही प्रेम करता त्यावेळी म्हणू नका की ईश्वर माझ्या हृदयात आहे. म्हणा की मी ईश्वराच्या हृदयात वस्तीला आहे.

कधीही मनात आणू नका, की प्रेमाचा मार्ग मी आखून काढीन : तुम्ही पात्र असाल तर प्रेमच तुम्हाला मार्गदर्शन करील. 

आपण सिद्धीस जावं ही एकच वांछा प्रेमाला असते. प्रेम करीत असताना इच्छा आणि वासना तुमच्यापाशी असतील तर त्या कशा असाव्यात? 


वितळलेल्या बर्फाच्या वाहत्या झऱ्यानं 

रात्रीच्या प्रहरांना गाणी ऐकवावीत,

तशी तुमची इच्छा असावी.

नितान्त कोमल संवेदनांनी होणारं दुःख 

जाणून घ्यावं,अशी तुम्ही इच्छा करावी. स्वतःमधील प्रेमजाणिवेनं जखमी व्हावं, स्वेच्छया रक्त वाहू द्यावं 

आणि त्याचा आनंद मानावा,अशी तुमची

 इच्छा असावी 

पंख - फाकल्या चित्तानं पहाटेची जाग यावी, आणि प्रेमपूजनासाठी नवा दिवस उगवला याबद्दल तुम्ही ईश्वराचे आभार मानावे.


दुपारच्या निवान्त समयी 

प्रेमाच्या निर्भरतेचं चिंतन घडावं 

आणि कृतज्ञ अंतःकरणानं सायंकाळी तुम्ही घराकडे परतावं

 हृदयस्थ प्रेयसीसाठी प्रार्थना करीत.

 स्तवनगीत ओठांवर घोळवीत 

तुम्ही झोपेकडे वळावं.


' जीवनातील सर्वोत्तम प्रेम या बद्दल दोन पाने…


' द प्रॉफेट - खलील जिब्रान '



२४/१०/२२

भाऊबीजेचा दिवस..

मंगळवार असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे कवठेमंहाकाळला गेलो होतो. माझी कवठेमहांकाळची व्हिजिट मला नेहमीच आवडते... त्याला कारण की ती साधीभोळी खेडूत माणसं.

एक म्हातारा आणि एक म्हातारी आत आली. म्हातारीने म्हातार्‍याला हात धरून आणलं आणि खुर्चीवर बसवलं.

" बस हितं." ती बोलली.

" काय होतंय आजोबा? " मी विचारलं.

" हाता पायाला आग लागल्या ह्याच्या." म्हातारी बोलली.

" आग लागल्या म्हणजे खाजतंय की जाळ उठतोय?" मी विचारलं.

" जाळ उठतोय. रात भर पाण्यात पाय बुडवू कि तोंडात हात घालू असं करतोय ह्यो." म्हातारी

" कधीपासून ? "

" वरीस सहा म्हैने झालं असणत्याल की ! "

मी बघितलं. त्याच्या अंगावर काही उठलेलं दिसत नव्हतं. तळहात तळपाय ही व्यवस्थित होते. ग्लुकोमीटरच्या सहाय्याने शुगर बघितली तरी ती साडेचारशे.

" जेवण झालंय ? " मी विचारलं

" व्हय ... इंजेक्शन घ्यायला लागलं तर चक्कर यायला नको म्हणून मीच बळबळ खायला घालून आणलंय." म्हातारी बोलली.

" किती वेळ झाला असेल जेवण करून ? " मी विचारलं

" दीड दोन घंट झालं असत्याल की ! "

" होय काय ?..यांची साखर वाढलेली आहे."

" व्हय ? "

" होय,अगदी तीनपट."

"आर देवा,आता काय करायचं ? म्हातारी घाबरून बोलली."आता काय कराव लागलं वं?"

" गोडधोड सगळं बंद करावं लागेल."

मी तिला डायबेटिक लोकांचं पथ्य आणि त्यांचा आहार समजावून सांगितला.औषधं लिहून दिली आणि पुढच्या मंगळवारी येण्यास सांगितलं.

" मावशी,कोण आहेत हे ?.. तुमच्यापेक्षा वयान कमी वाटतात म्हणून विचारलं." मी म्हटलं.

" माझ्यापरास ल्हानच हाय त्यो !" म्हातारी बोलली,"माझ्या पाठीवरचा भाऊ हाय. माझ्या लग्नापासंन माझ्याकडंच हाय."

" होय ? "

" डोसक्यानं जरा कमी हाय पर माझ्यावर लै जीव हाय.माझ्या लग्नात आठ धा वर्साचा असंल.... माझं लगीन लागल्यावर दोन वर्सानं ज्यो माज्याकडं आलो तो पुन्हा घरला गेलाच न्हाई."

" काय सांगता ? "

" व्हायचं की !..आमचा बाप मेला तवा चार दिस गेला असंल तेवढाच.थोरलं पोरंगच समजून मोठं केलयं मी त्येला.. लै गुणाचा ! ..कवा कवा तरच डोस्कं फिरल्यागत करतोय.आज सकाळी ओवाळायला जरा उशीर झाला तर बसला लगीच रुसून ! ओवाळल्यावर मग हरकला.कपाळावर नाम बी मोठा लावायला पाहिजे ! ... बघा की केवढा नाम लावलाय ? कपाळभरुन." म्हातारीनं मोठ्या कौतुकानं आपल्या भावाकडे बघितलं. मग बोलली," आता तुम्ही रगात तपासायला टोचलंय की नाही,तर सांजच्यापातुर रुसून बसलं बघा."

" यांचं लग्न ? "

" न्हाय वं ! ... खुळा कावरा हाय भाऊ माजा,कोण द्याचं पोरगी ह्याला ? 

.... घास मुटका खाऊन जगतोय तेच बास झालं. मी हाय तवर तरी याची काही फिकीर न्हाई."

" आणि तुमच्या माघारी ? "

" ते त्या पांडुरंगाला कोडं !..


सगळ्या बहिणी आपल्या भावाला बक्कळ औक्ष मिळू दे म्हणत्यात... मी मातूर माझ्या भावा पेक्षा मला जास्त औक्ष मिळू दे म्हणत्या... का माहिताय?

... कारण मला माहित हाय मी हाय तर माझा भाऊ हाय." बोलता बोलता म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आतापर्यंत आमचं बोलणं लहान मुलासारखं ऐकणाऱ्या आपल्या भावाचा हात धरला आणि 'चल रं !' म्हणून ती चालु लागली. मी मात्र त्या जगावेगळ्या बहिणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो..!


 डॉ.अशोक माळी यांच्या "माणसं" या  पुस्तकातून..!


२२/१०/२२

"अगं खरचं मला काही कळत नाही..!"

या ब्रह्मांडातील सर्व सिद्धांत हे न चुकता फक्त एकाच व्यक्तीच्या दिशेने दिसतात ती व्यक्ती म्हणजे तुम्ही..!


वॉल्ट व्हिटमन 


याचा सत्वशील विचार फार दिवसांपूर्वी वाचला होता. मी एका कंपनीमध्ये शारीरिक कष्टाची कामे करतो. ज्या ठिकाणी लोखंड वितळले जाते. इथे उष्णतेचे तापमान मोठे असते. तरीही मी माझे आयुष्य शांततेने जगत आहे. पुस्तके मला आयुष्यात गारवा देतात.परिस्थिती बदलण्याअगोदरच मी बदलतो,माझ्या गरजा कमीत कमी आहेत.मी माझं जीवन सर्वांगीन सुखी समाधानी आनंदी जगतो. कारण मी 

"वाचतो " पुस्तक वाचणे हे माझे एक वेळेचे जेवण आहे. मी जास्तीत जास्त पुस्तकांमध्ये म्हणजेच माझ्या 'मी' मध्ये असतो. माझी एक बहीण म्हणते तू पुस्तकाच्या फार जवळ आहेस. तुझं जीवन हे अतिसामान्य आहे. दुसरी बहीण म्हणते तुझं आत्ताच जीवन सर्वोत्तम आहे. माझी पत्नी मला नेहमीच म्हणते,अहो खरंच तुम्हाला काही कळत नाही...!


 माणसाचं जीवन जन्माला आल्यानंतर साधं सोपं सरळ असतं पण आपण ते अतिशय गुंतागुंतीचे करून ठेवतो.


स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...!


हेन्री डेव्हिड थोरो चरित्र निबंध,मधुश्री पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं. आदरणीय जयंत कुलकर्णी यांनी अनुवाद केलेलं एक दुसरे पुस्तक नुकतंच वाचून संपवले.


हेन्री डेव्हिड थोरो याच्या मृत्यू नंतर श्रद्धांजली वाहताना. एमर्सन म्हणाला, " थोरो एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही." त्याने त्याच्या निरोगी शरीराचे आणि मनाचे कौतुक केले." तो अचूक पणे सोळा रॉड चालू शकत असे. जे अंतर इतरांना पट्टीनेही एवढे अचूक मोजता येणार नाही. तो भर रात्री जंगलात रस्ता चुकत नसे कारण तो नजरेने जंगल पहातच नसे तर पायाने पाहत असे. झाडांचा घेर व उंची तो नुसत्या नजरेने पाहून सांगू शकत असे. कुठल्याही प्राण्यांचे अचूक वजन तो नजरेने पाहून सांगत असे‌. डब्यातून पेन्सिल काढायच्या वेळी प्रत्येक वेळा तो बरोबर एक डझन पेन्सिली बाहेर काढायचा. ( त्याचा पेन्सिल उत्पादन करण्याचा व्यवसाय होता.) तो उत्कृष्ट पोहायचा, बोट वल्हवायचा, पळायचा स्केटिंग करायचा आणि मला वाटते पायी प्रवास करण्यामध्ये त्याचा हात धरणारा अमेरीकेत सापडणार नाही. त्याचे शरीर मन आणि निसर्ग एका अज्ञात धाग्याने बांधले गेले होते."


त्याने नंतर म्हटले," एवढे तारतम्य बाळगणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही. त्याचे हात कणखर होते. तर इच्छाशक्ती प्रबळ होती. त्याच्या बुद्धीमत्तेबद्दल तर बोलायलाच नको." भाषणाचा शेवट त्यांनी एखादी भविष्यवाणी करावी तसा केला."आपल्या देशाने किती महान पुत्र गमावला आहे याची अजून आपल्या देशवासियांना कल्पना नाही. त्यांनी जे काम सुरू केले आहे ते पूर्ण करणे कोणाला शक्य होईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हे काम अर्धवट टाकून या माणसाने ग्रंथाच्या पानावरुन निघून जावे हे कोणाच्याही मनात न पटणारी गोष्ट आहे. चीड आणणारी गोष्ट आहे. त्याने त्याच्या कामाची ओळख त्याच्या एवढ्या थोर माणसांना करून दिली असती तर बरे झाले असते एवढेच म्हणणे आपल्या हातात आहे. पण मला खात्री आहे तो समाधानाने गेला असणार. त्याचे हृदय विशाल,प्रेमळ व अनुकंपेने सदा भरलेले असायचे.जेथे सद्गुण आहेत, सौंदर्य आहे, निसर्ग आहे तेथे त्याला त्याचे घर सापडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.‌.!


हे सर्व माझ्यासाठी थरारक व नाविन्यपूर्ण शोध घेण्यासाठी पुरेसं होतं.ज्या व्यक्तीचं जाण ज्या,व्यक्तीचा मृत्यू इतका सर्वश्रेष्ठ होता तर त्याचं जीवन किती उच्च व सर्वोत्तम असेल याचा न विचार करायला लागलो. व चरित्र माझ्या 'मी' मध्ये सामावून घेऊ लागलो.


" ...‌.राहण्यासाठी हे जग सुंदर करावे या उद्देशाने मी या जगात आलो नाही तर ते जसे असेल त्यात आनंदाने राहावे म्हणून !..." असे म्हणणारा माणूस आनंदाने आला आणि आनंदाने गेला असेच म्हणावे लागेल... आता थोरोच्या जाण्याचा शोक करायचा कि कसे मारायचे हे त्याने शिकवले यासाठी त्याचे आभार मानायचे हे मात्र मला उमजत नाही.


( जयंत कुलकर्णी लेखक ) यांचे मी विशेष आभार मानतो.


थोरो अवलिया माणूस १८४२ च्या जुलैमध्ये थोरोने मार्गारेट फुलरच्या भावाबरोबर म्हणजे रिचर्ड फुलर बरोबर वाचूसेटवर भ्रमंती केली. या भ्रमंतीचे वर्णनाचे रूपांतर शेवटी एका मोठ्या लेखात झाले. ही सफर त्यांनी अगदी आरामात केली. त्यावेळी थोरो लिहितो, "मला आता कळले आहे की माणसाचे आयुष्य हे त्याच त्याच गोष्टीने बनलेले आहे.आणि त्याचे त्या गोष्टींशी संबंधही तेच तेच आहेत. माणसामध्ये नवीन काही ढुंडाळण्यास बाहेर पडण्यात काही अर्थ नाही. पण निसर्गामध्ये तसे नाही..." 


असे स्वतंत्र निराळं जिवन मी आजपर्यंत कधी जगलोच नाही या न जगलेल्या व हातातून निघून गेलेल्या जीवनाबद्दल मी आता फार हळहळत आहे.


मला लवकरच तळ्याकाठी माझ्या स्वतःच्या जागेत राहायला जावे असे सतत वाटत आहे. जिथे माझ्या कानावर फक्त वाऱ्याने बांबूच्या बनात घातलेली शीळ पडेल.जर सगळं मागे सोडून तेथे जाता आले तर बरंच आहे. पण माझे मित्र मला विचारतात," तेथे जावून तू करणार काय ? " आता यांना काय सांगू ? कि ऋतू बदलताना निसर्ग पाहणे या सारखा दुसरा उद्योग या जगात नव्हता आणि आताही नाही...." 


हे प्रामाणिक उत्तर आणि जगणं पाहून मलाही वाटत होतं की आपल्या जीवनामध्ये रिकामी जागा भरपूर आहे.


एकदा थोरोने एमर्सनला लिहिले, " माणसाचा मृत्यू ही खरे तर किती सरळ साधी गोष्ट आहे! पण माणसाला ते मान्य नाही.निसर्गाने जे काही गमावले आहे ते सगळे त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात परत मिळते. पण मृत्यू सुंदर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याकडे एक अपघात म्हणून न पाहता एक सृष्टीनियम म्हणून पाहतो तेव्हा तो जन्माइतका सर्वसाधारण असतो. मृत्यूत विशेष असे काही नाही. माणसे इथिओपियात मरतात,माणसे इंग्लंडमध्ये मरतात आणि विस्कॉनसिनमध्येही मरतात आणि शेवटी या जीवसृष्टीत अमरत्वाचा मक्ता घेऊन कोण मागे उरले आहे? यावर्षी दिसते ते गवत आणि दिसणाऱ्या वनस्पती या काय मागच्या वर्षातील आहेत का? निसर्गातील गवताचे प्रत्येक पाते, फांदीवरील प्रत्येक पान हे ऋतु बदलात आनंदाने धारातीर्थ पडते आणि तेवढ्याच आनंदाने परत फुटते. ऋतुचक्रातील चार महिन्याची ती करामत असते.मृत वाळलेली झाडे,सुकलेले गवत व वनस्पती या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग नाहीत का? आहेत..! शिशिरातील बदललेली मनाला भुरळ पाडणारी झाडे शेवटी मृतवत होणाऱ्या पानांचा रंगामुळेच प्रेक्षणीय आहेत ना? खरे तर हे दृश्य म्हणजे शिशिरातील वार्‍याने निसर्गाच्या कॅनव्हासवर चितारलेल्या वेदनाच असतात की ! तरीपण आपण त्यांचा आनंद लुटतो."


जॉनच्या ( थोरोचा भाऊ ) त्याला मृत्युचा खरा अर्थ समजला. एवढेच नव्हे तर मृत्यू शेवटी स्वीकारावा लागतो व कसा स्वीकारावा लागतो हेही त्याला समजले.प्रत्येक तरुणाला ते त्याच्या आयुष्यात कधी ना कधी शिकणे भागच आहे आणि हा अनुभव जवळच्या व्यक्तीचा मृत्यूनेच येऊ शकतो. जसा हेन्री थोरोला जॉन थोरोच्या मृत्यूने आला.जसे तलवारीचे तापलेले पाते पाण्यात बुडल्यावर एकदम गार होते तसे काहीसे थोरोचे झाले. त्याच्या भावनांची काही काळ वाफ झाली,पण त्यामुळे त्याच्या विचारांवरील व स्वीकारलेल्या मार्गावरचा त्याचा विश्वास अजूनच दृढ झाला. तलवारीप्रमाणे त्याला अजूनच धार चढली.


हे सर्व वाचत असताना मी बधिर झालो होतो. आजपर्यंत,या क्षणापर्यंत ज्या सत्याकडे पाठ फिरवत होतो. तेच माझ्याकडे पाहून हसत होते. मला अजून बरंच जगणं समजून घ्यायचं आहे.


माणूस त्याच्या आयुष्यात फक्त एकच अंत्यविधी आणि एकच शव पाहू शकतो. ( म्हणजे त्याला एकदाच मनापासून वाईट वाटू शकते.)


सगळेजण आपापली जर्नल लिहायचे.हॉवथॉर्नही जर्नल ठेवत होता ज्यात त्याने हेन्री थोरोचे वर्णन खालील प्रमाणे केलेले आढळते.-" थोरोचे व्यक्तिमत्व आगळेवेगळे आहे. त्याच्या रक्तात भिनलेला जंगलाचा आणि निसर्गाचा भाग अजून शिल्लक आहे. पण तरीही समाजामध्ये मिसळून राहण्याचे त्याचे कौशल्य हे खास त्याचे असे आहे." 


त्याच्या स्वभावामुळे काही गैरसमज निर्माण होत,पण तो त्याचीही मजा घेत असे.दोन दिवसांपूर्वी मला मारिया मावशीने डॉ.चॅमर्सचे चरित्र वाचण्यास सांगितले. मी अर्थातच तसे काही वचन तिला दिले नव्हते. काल ती ओरडून शेजारच्या जेन मावशीला ( हिला कमी ऐकू येतं असे ) सांगत होती, काय माणूस आहे ! काल दिवसभर त्या बेडकांचे ओरडणे एकत उभा होता पण मी वाचायला सांगितले तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्याने...( थोरो ) " 


चरित्र वाचत असताना मी जीवन जगण्याचं शिकत होतो.


सविनय कायदेभंग हा लेख कर भरला नाही म्हणून हेन्री डेव्हिड थोरोने तुरुंगात गेल्यावर लिहिला. महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला,त्यात ते म्हणाले,"माझ्या अमेरिकन मित्रांनो ! अमेरिकेने मला थोरोंच्या रूपाने एक गुरु दिला आहे. मी जो लढा उभारला आहे, त्याचे ठाम व वैचारिक पुष्टीकरण मला थोरो यांच्या ' ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स'या निबंधात मिळाले आणि दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होतो, ते काही चुकीचे नव्हते याचा हा मोठा पुरावा आहे.


हे वाचून मी आश्चर्यरित्या थक्क झालो.


मला आज निसर्गासाठी काहीतरी बोलायचं आहे. पूर्ण स्वातंत्र्य आणि या अफाट घनदाट निसर्गासाठी बोलायचं आहे. पण मला निसर्गावर बोलायचे नाही.या समाजाचा एक घटक समजून मी हे बोलणार नाही तर समाज या निसर्गाचा एक घटक आहे असं समजून मी बोलणार आहे.


 ही भटकंती तर माझ्या मनाला चटका लावून गेली.


एखादा माणूस रानावनाच्या प्रेमापोटी त्या रानात भटकू लागला तर समाज त्याला निरुद्योगी उडाणटप्पू म्हणतो. पण एखादा माणूस जर झाडे तोडण्याच्या कामावर देखरेखीसाठी त्या जंगलात दिवसभर उभा राहिला,पृथ्वीवरचे वृक्षांचे आवरण अकाली खरडू लागला तर मात्र प्रचंड उद्योगी माणूस म्हणून त्याचे प्रचंड कौतुक होते. मला तर कधी कधी वाटते गावकऱ्यांना या जंगलात काही रस उरलेला नाही म्हणूनच ते ही जंगले देशोधडीला लावत आहेत.


मला वाटते वरील वर्णन म्हणजे आपले तत्वहीन जीवनच आहे.


निरातिशय सौंदर्य अद्वितीय असते पण आपली इंद्रिये त्याचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे घेतात किंवा त्याला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतात आणि त्याचे रसग्रहणही करतात. एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात आपण ते

 " पाहतो ", संगीतात आपण ते 

" ऐकतो ", सुगंधात त्याचा आपण 

" वास घेतो ",खाण्याच्या पदार्थात आपण त्याची " चव " घेतो, आणि आपली प्रकृती उत्तम असेल तर तो आनंद आपल्या शरीरभर पसरलेला असतो याची आपण आणि " अनुभूती " घेतो. या आनंदाचे प्रकटीकरण वेगवेगळे आहे पण त्याची अनुभूती एकच आहे तिचे वर्णन करणे अवघड आहे ते फक्त अनुभवानेच उमजते.


प्रेमाचा हा विस्तार व व्याप्ती पाहून मी प्रेममय झालो.


थंडीतील एक भटकंती करीत असता .. ! कानी गुंजते फक्त व्हिनस आणि मार्सची कुजबुज ज्याने आपल्या रूदयात प्रेमाची ऊब वाढते. एक दैवी आनंद देणारा पंथ ज्यात देव एकमेकांस भेटतात, पण मनुष्यास ते दिसत नाही. इकडे पृथ्वीला ढुलकी लागली आहे पण आसमंत आकाशातून गिरक्या घेत खाली येणाऱ्या बर्फाच्या फुलांनी जिवंत होतोय. जणूकाही धान्याची देवता सेरेस चांदीसारख्या चमचमणाऱ्या धान्याची पृथ्वीवर उधळण करीत आहे.


हे वर्णन नैसर्गिक अविस्मरणीय, अलौकिक व अगम्य आहे.


रात्र आणि चंद्रप्रकाश यामध्ये चंद्रप्रकाशात चालतानाही आपल्या विचारांना,मला वाटते, गुलाबी किंवा तांबूस छटा नसते पण आपण विचाराने आणि नैतिकतेने अल्बिनो आहोत हे उमगते.. सत्याच्या सूर्याचा आपल्याला त्रास होतो. हे आपल्याला चंद्रप्रकाशात चालताना उमगते. हा चंद्राशी बोलण्याचा..!


खरंच माझ्याशी चंद्र बोलेल का ?


कॅप्टन जॉन ब्राऊन या क्रांतीकाराबद्दल मला नाविन्यपूर्ण, पराक्रम जीवनाची कथा परिपूर्ण स्वरूपात वाचावयास मिळाली. या क्रांतिकारकाला फासावर लटकवण्यात आले. त्याचे जीवन तत्व होते. त्याबद्दल लिहून ठेवले आहे." त्याने नेहमीच त्याचे उच्चार दुरुस्त करण्यापेक्षा एखाद्या पडणाऱ्या माणसाला आधार देण्यात धन्यता मानली.


मी निशब्द आहे. देशप्रेम स्वातंत्र्य निष्ठा या गोष्टी मला नव्याने समजल्या.


" मनुष्य प्राणी नावाच्या वनस्पतीं बद्दलही हेच म्हणता येईल.आपण मात्र या वनस्पती बद्दल विचार करताना भेदभाव करतो व या वनस्पतीच्या मृत्यूबद्दल आक्रोश करतो. जोपर्यंत आपले मृत्यूचे शोकगीत 'विजय' गानात बदलत नाही तोपर्यंत हा भेदभाव नष्ट होणार नाही. किंवा आपल्या शोकमग्न सुस्कारे हे शेतांवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाजाप्रमाणे जेव्हा मंद होतील तेव्हा तो भेदभाव नष्ट झाला असे म्हणता येईल."


" हे पुस्तक वाचल्यावर अगदी खोलात जाऊन प्रत्येकाने वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर भोगाला सर्वस्व मानणाऱ्या हल्लीच्या मानवजातीला त्याशिवाय अजून काहीतरी जीवनात आहे हे निश्चितच उमगेल..."


... जाता जाता


एक सत्य घटना आहे. कोलंबसन अमेरिकेचा शोध घेण्यासाठी मोठ्या सफरीला निघाला. जहाजावर त्यांनी तीन महिन्याचे धान्य - पाणी घेतले. इतकेच नव्हे तर काही कबुतरेही त्यांनी आपल्यासोबत घेतली.या प्रवासात त्याला कुठेही जमीन किंवा एखाद्या बेटाचा तुकडाही दृष्टीपथास पडला नाही. सगळीकडे फक्त पाणीच पाणी. एके क्षणी प्रवासात सोबत घेतलेले सगळे अन्न-धन्य संपायला आले. शेवटी तर केवळ तीन दिवसांचा शिधा तेवढा उरला.


रोज सकाळी कोलंबस कबुतरांना आकाशात उडवायचा पण कुठेही जमीन नसल्यामुळे कबुतरे पुन्हा बोटीवर परतायची. जेव्हा कबुतरे परतायची, तेव्हा कोलंबस खूप उदास व्हायचा ! सभोवताली फक्त अथांग समुद्र-पाणीच पाणी. तो दिवस असाच गेला.दुसऱ्या दिवशी कुठेतरी किनारा मिळेल म्हणून त्याने आपली कबुतरे आकाशात सोडली, पण याही वेळेला कबुतरे परत जहाजावरच परतली.


तीन महिन्यात एखादा जमिनीचा तुकडा देखील दृष्टिपथात दिसलेला नव्हता. आता तर सगळेच अन्न-धान्य, पाणी संपून गेले होते. बरं परत फिरावं म्हटलं तर ते शक्य नव्हते. तिसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कोलंबसने आपली कबुतरे आकाशात सोडली. कबुतरे चारही दिशांना पांगली. मुख्य म्हणजे बराच वेळ झाला तरी परतली नाहीत. कोलंबसला आशेचा मोठा किरण दिसला. तीन-चार तास झाले तरी कबुतरे परत यायची काही चिन्हे दिसेनात. तेव्हा कोलंबसच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तो सहकाऱ्यांना म्हणाला,'इतक्या दिवसांच्या प्रवासाचे-मेहनतीचे फळ आपल्याला मिळते आहे. ज्याअर्थी कबुतरे परत फिरली नाहीत, त्याअर्थी आसपास इथेच कुठेतरी जमीन आहे. कोलंबसच्या साथीदारांच्या डोळ्यात पाणी आले. अखेरीस त्यांना किनारा दिसला. कोलंबससह सगळे साथीदार आनंदाने नाचू लागले. एकमेकांना मिठ्या मारू लागले.


सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सर्वांगीण परिपुर्ण आनंदी नविन जीवन लाभल्याचा मला साक्षात्कार झाला.धन्यवाद सर्वांचे 


शेवटी... 

माझ्या पत्नीकरीता "अगं खरचं मला काही कळत नाही..!"


- विजय कृष्णात गायकवाड

२०/१०/२२

ये तेरा घर ये मेरा घर ..!

साधा नायक,साधी नायिका,

साधा दिग्दर्शक,साधे बोल,साधा गायक

पण हृदयाला स्पर्श करणारी सगळीच गोष्ट..!

या युट्युबवरील गाण्याखालील 'जिवंत' प्रतिक्रिया..


हे गाणं ऐकता ऐकताच लहानाचा मोठा झालो आपण जन्माला येण्याअगोदर पासूनच घर उभे राहिलेले आहे. तसा घराचा इतिहास हा फार फार जुना आहे तो आपल्याला खूपच मागे घेऊन जातो,ज्या वेळेला माणूस शिकार करून भटके जीवन जगत होता त्याकाळी वरती मोकळं निरभ्र,विस्तारित आभाळ व खाली सर्वांना सामावून घेऊन प्रेमाचा आधार देणारी जमीन हेच घर होते.अवघे विश्वचि माझे घर ही त्यावेळेला घराची व्याख्या होती. जीवन भटके असल्या कारणाने एका ठिकाणी स्थिर शांत राहण्यासाठी घराची आवश्यकता कधी भासली नाही, किंवा तशी कल्पना केली गेली नाही आणि माणूसही उत्क्रांतीच्या टप्प्यावरती होता. काही काळानंतर शिकारी,भटके जीवन थांबल्यानंतर शेतीचा शोध लागला,आणि माणूस एका ठिकाणी स्थिर राहायला लागला.


पण शेती करत असताना माणसाला जंगलाच्या जवळ जावं लागलं.आणि जंगलाच्या जवळ गेल्या कारणाने सर्वप्रथम त्याला एक विचार सुचला.( तो पर्यंत माणूस विचार करु लागला होता.व जबाबदारीची जाणीव ही झाली होती.) कुठेतरी आपल्याला निवारा असावा.इतर जंगली जनावरांकडून जीवाला धोका होऊ नये म्हणून सर्वप्रथम त्याने घर तयार केले. ते तयार करताना निसर्ग तत्परतेने धावून आला.( तोच निसर्ग आजही धावून येतो.) आणि झाडाफुलाने बनलेलं एक सुंदर घर तयार झालं.आणि त्यामध्ये तो राहू लागला. हे घर तयार करत असताना प्रेमाने जिव्हाळ्याने आपुलकीने त्याचे निर्माण होत होते.म्हणजेच ते घर मानवी उत्कंठ भावनेने तयार होत होते.अखेर ते 'आत्मा' असलेले घर तयार झाले. त्यानंतर मग माणूस विचाराने प्रगल्भ झाला आणि अनुभवातून शिकत शिकत त्याने त्या राहत्या घरातही बदल केले.आज घर, प्रसाद,बंगला,वन बीएचके,

(यामध्ये परमेश्वराचे मंदिर म्हणजे घर सुद्धा येते.) असा या घरांच्या साधेपणातून सुरु झालेला प्रवास अँन्टीकपिस म्हणजेच 'वास्तू' पर्यंत आलेला आहे.


जीवसृष्टीचा सगळा इतिहास निर्जीव फॉसिल्समधून रेखला जातो. तर खनिजं, बांधकाम साहित्य, पायाचे दगड यांसोबत,दगडांमधून दिसणारं पुराजीवशास्त्रही सापडलं.त्या शास्त्राची दशलक्ष आणि अब्ज वर्षांची मापं ओळखीची,सवयीची झाली आणि माणसांचे व्यवहार 'आखूड' वाटायला लागले.


माणसांचा इतिहास महिने-वर्षं, दशकं शतकं एवढ्यांत - संपतो. भूशास्त्रात मात्र लक्ष,कोटी आणि अब्ज वर्षांची मापं वापरली जातात. आपण काही तरी थोर आहोत असा गर्व करायला इथे जागाच नाही!तर नम्रता या गुणाचीही जरा उजळणी करा!


जीवसृष्टीतल्या बदलांचे साक्षीदार दगड-धोंडे नंदा खरे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वैचारिक,वैज्ञानिक माहिती माणुस म्हणून विचार करायला भाग पाडते.


आश्चर्यकारक अचंबीत करणाऱ्या काही गंमतीशीर व अभ्यासपूर्ण पक्षांच्या घरट्याबद्दच्या नोंदी 'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पाॅडकास्ट मधून मानवी संवेदनशीलतेतून 'जाणीवेतून जाणून' घेतल्या.


गरुडाचं घरटं हे डेरेदार झाडांवर असतं.ते जवळजवळ बैलगाडीच्याचाका इतकं असतं.आणि दरवर्षी त्यामध्ये काटक्यांची भरही पडतचं असते.कारण जुन्या काटक्या वाळून खाली पडतात.हे घरटं भरभक्कम व मजबूत असतं.कितीही आपत्ती,वादळ पाऊस आला तरी ते गरुडासारखचं मजबूत रहातं.त्या घरट्याला काहीही फरक पडत नाही.याठिकाणी रसिक,सौदर्यदृष्टी लाभलेल्या गरुडाचं नोंद आश्चर्याचा धक्का देवून जाते.


नर गरुड हा दररोज न चुकता फुलांनी भरलेली ढहाळी ती नाही मिळाली तरी रसरसीत पानांची ढहाळी त्या घरट्यात आणून टाकत असतो.जसा माणुस गजरा आणतो.घरात फुलदाणी आणतो.अशाच प्रकारची ही भावना असते.आणि जोपर्यंत मादी अंड्यावर बसलेली असते तोपर्यंतच दररोज गरुड न चुकता हे करत असतो.ही रसिकता पाहुन मीच विचार केला कि कधीतरीच गजरा घेतो.तो ही 'घरातून' सांगितल्यानंतरच ..!


ही घरटीही विणीच्या हंगामात वाढलेल्या नवीन येणाऱ्या 'पाहूण्यासाठी'अंड्याचे,जन्मलेल्या पिल्यांच्या संरक्षणाठी सुरक्षित ठिकाण म्हणून बांधली जातात.


काही गमंतीशीर पक्षी ही मधमाश्यांच्या पोळ्याजवळ त्यातील माशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.असे'सुरक्षित अंतर' ठेवून हे घरटं बांधलं जातं.(यामुळे त्यांना खाणारे पक्षी 'पोळ्याच्या भीतीने' त्याच्यांजवळ जात नाहीत.हा दुरदृष्टी विचार त्यामागे असतो.)


काही पक्षी हे गांधीलमाशीच्या घराजवळ आपलं घरटं बांधतात. कारण या गांधील माशा चावल्या तर भरपुर आग होते.कारण त्यांचे विष हे जहरीले असते त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणीही जात नाही.काही ठिकाणी समुद्राच्या काठावर अनेक पक्षी मिळून एकत्रित घरटी बांधतात.हजारोंच्या संख्येने झाडावर एका ठिकाणी स्वसंरक्षणासाठी ती घरटी बांधलेली असतात. कोणीही शिकारी आला तर इतक्या मोठ्या समूहापुढे तो काहीही करू शकत नाही.ही सर्वजन एकाचवेळी हल्ला करु शकतात. 


बरेच पक्षी हे वड आणि पिंपळ या झाडांवरती आपली घरटी बांधतात कारण ही झाडे वादळ वाऱ्यातही मजबूतपणे उभी असतात. व या वडाच्या झाडावर जी फळ लागतात ती फळे या पक्षांना आवडतात म्हणून या झाडांची ती मोठ्याप्रमाणात निवड करतात.


मेक्सिकोच्या चिमण्यांच्या घरट्यामध्ये अलीकडे सिगारेटची थोटकं आढळली आहेत.काही जणांना असं वाटलं की त्या सिगारेटच्या मागे असणारा जो मऊ मऊ कापूस आहे त्याचा वापर ती घरटं मऊ राहण्यासाठी करत असावीत.पण तंबाखु सोबत अर्धवट जळालेल्या सिगारेटची ही थोटकं होती. त्यामुळे त्याचा आणखी जास्त गंभीरपणे अभ्यास केला असता. एक गंमतीचा असा निष्कर्ष निघाला की ही अर्धवट तंबाखू सोबत असणारी थोटकं घरट्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्या उग्र वासामुळे मुंग्या कीटक यापासून त्यांचे संरक्षण व्हायचं. या उग्र वासामुळे त्यांच्या घरट्याकडे कोणीही फिरकत नाही. त्यामुळे त्यांची पिल्ले आणि त्यांची घरटं ही सुरक्षित राहतात. (हे ज्ञान त्यांनी कुठून घेतलं हे अजूनही समजलेलं नाही.हे २१ व्या शतकाला शोभेल असं उदाहरण आहे.)


असा हा घरट्यांचा इतिहास समजून घेऊन आपण आपल्या घराकडे परत येऊ.


 मी लहान असताना जवळजवळ सगळी घरं एकसारखीच असायची.साध्या मातीने ती तयार केलेली वरती साधी कौलं व बाजूनी मातीच्या भिंती हे घर बांधण्यासाठी निसर्गातीलच घटकांचा आपण वापर केलेला असायचा. त्यामुळे त्या घरामध्ये नैसर्गिक निसर्गही माणसासोबंत रहायचा. त्या घरात राहणारी माणसं ही साधी सरळ,निकोप प्रेमळ सगळ्यांवरती मोकळ्या मनाने प्रेम करणारी होती. त्या घरातील स्त्रिया घराची काळजी मनापासून घेत असायच्या वेळच्यावेळी देखभाल केली जायची. व दर वर्षी पावसाला सुरुवात होण्याअगोदर या घराचा जिर्णोद्धार केला जायचा.या सर्वगोष्टी श्रद्धेने केल्या जायच्या.माणसांचा मूळचा स्वभाव प्रेमळ असल्याकारणाने ते घरावर व सर्वांच्या वरती प्रेम करायचेत. घर हे फक्त भिंतींने तयार होत नसतं, तर घर हे घरातील माणसाच्या स्वभावाने तयार होत असतं प्रत्येक घराला त्याचा विशिष्ट असा आत्मा असतो.


दररोज सकाळी पहाटे उठून महिला त्या घरामध्ये दळप कांडप करायच्या जात्यावरती गाणी गायली जात.हे काम करत असताना हातांचा,हातातील काकणांचा लयबध्द आवाज होत असायचा.या आवाजाणेच घरातील सर्वांना उत्साही 'जाग' यायची असं हे जीवनच संगीतमय करुन टाकणार 'मनस्वीघर' सर्वांनाच हवहवसं वाटायचं.जे केलं जायचं ते सर्वांसाठी असायचं त्यामुळे त्या घरांना एक विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला असायचा. फार पूर्वी करमणुकीची साधने नसल्याकारणाने संध्याकाळी 'शुभंकरोती कल्याणम्' झाल्यानंतर सुसंगत,सुसंस्कृत,

सुसंवाद व्हायचा.यामध्ये सामाजिक,

आर्थिक,नैसर्गिक,कौटुंबिक,सर्व विषयातील अनुभवाची देवाणघेवाण व्हायची.व घरातील 'जाणत्या' व्यक्तीच्या आज्ञेच पालन काटेकोरपणे केलं जायचं.या सर्व सुसंवादामध्ये 'घर' ही मुकपणे आपला सहभाग नोंदवायचे.


घरातील लोकांची संख्या जरी वाढली तरी हा एकोपा अखंडच होता. हळूहळू औद्योगिक क्रांती होत गेली व शहरांनी 'गावाला' बोलवून घेतले. मग वैयक्तिक विचार बाळसे धरू लागले. स्वतंत्र राहणे ही आता गरज बनू लागले आणि भावनिक पातळीवरती असणारी माणुसकी 'कोरडी' होत गेली. घराघरात मतभेद ज्येष्ठ जाणत्या लोकांना अडगळीचे ठिकाण प्राप्त झालं.कारण प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा होता. हे सर्व बघत असताना घराचं काळीज मात्र तीळ तीळ तुटत होतं.पूर्वीच्या काळी घराचा आवाज सर्वांना जाणवत होता कारण ते सगळे संवेदनशील मानसिक पातळीवरील नातं होतं.आता तो आवाज येत नव्हता कारण विचारांमध्ये झालेला अमुलाग्र बदल,घर जाग्यावरचं स्तब्ध होतं.आतील माणसं मात्र बदलत होती.


आणि माणसाचं जीवन धावपळीच झालं आणि त्यांनी ते स्वीकारलं. साध्या घरात राहणारा माणूस आज वन बीएचके मध्ये स्वतःच्या मनासारखं घर तयार करून त्यामध्ये राहू लागला.पण तो खरोखरच आनंदी आहे का? हा प्रश्न अनुत्तरीच आहे.(आनंदी रहाणं सोप आहे.पण साधं सरळ रहाणं फार अवघड आहे) धावायचं कितपत आणि कोणासाठी याला काही मर्यादा नाही. पूर्वीसारखी घराकडे जाण्यासाठीची ओढ आता आहे का? कारण आता घरात जाऊनही कामं केली जातात कुटुंबामध्ये सुसंवाद होत नाही फक्त कामापुरते बोलणं होतं.


घरातील ज्येष्ठ जाणती लोकं आता अँटिक पीस झालेले आहेत. घर हे आता दाखवण्याची वास्तू झालेली आहे. सर्व सुख सोयी पायाशी लोळण घेत असूनही माणूस प्रेमाविना कोरडा ठणठणीत राहिलेला आहे.(याला अपवाद असतील त्यांना सलाम)


नवीन घर बांधणे आता स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे कारण दिवसभर राबल्यानंतर पोटाला चार घास मिळतात. अशी सत्य परिस्थिती असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन घर कसं बांधायचं याचा विचारच करून माझ्या अंगावर काटे उभे राहतात.अजूनही काही जणांसाठी घर बांधणे म्हणजे एक मोठा न सुटलेला प्रश्न आहे. लहानपणापासून मी हे ऐकत आलेलो आहे.की 'घर बघावे बांधून,लग्न करावे बघून व विहीर बघावी बांधून' त्या वेळेला मला याचा फारसा अर्थ कळत नसायचा पण ज्या वेळेला मी स्वतःच्या घराचा विचार केला त्या वेळेला माझी झोप उडाली होती,त्यामुळे आमच्यासाठी घर म्हणजे स्वप्नातीलच आहे.आता घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव आभाळाला जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे हल्ली स्वप्नातील घर हे स्वप्न सुद्धा कोणाला पडत नाही.


(या ठिकाणी एका गोष्टीचे आठवण झाली जी व्हाट्सअप वरती वाचलेली होती.)


एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे १०० वर्ष जुने लिचीचे झाड होते.


 त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.


काही काळानंतर घराचे नुतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि ३० वर्षांपासून हाँगकाँग येथील वास्तुशास्त्राचे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.


काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे.मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.


घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मुल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले.  त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता.  तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले - दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?


ते मोठ्या सहजतेने म्हणाले, मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..


मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.


घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, "जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ राहू शकतो का?"


मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की,  "कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.


मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, "या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही."


त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले - का?*


मास्टर काओ - "जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील - ते ठिकाण,ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय 

पवित्र-आनंददायी-फलदायी असेल".


"आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.


जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.


आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा "वास्तू" सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.


सिमोन द बोव्हुआरचे 'द सेकंड सेक्स' (अनुवाद - करुणा गोखले,पद्मगंधा प्रकाशन) हे पुस्तक स्त्रीवादाचे बायबल समजले जाते.या ग्रथांतील 'घराबद्दल' नोंद 


कुटुंब ही स्वतःत बंदिस्त अशी संस्था नसून एक सामाजिक संस्था आहे, म्हणूनच घरसुद्धा कुटुंबात राहणाऱ्या माणसांसाठी केवळ छप्पर नसते. ते त्या कुटुंबाच्या सामाजिक स्थानाचे प्रतीक असते. कुटुंबाची सांपत्तिक स्थिती, सांस्कृतिक व शैक्षणिक पातळी, कुटुंबातील व्यक्तींची अभिरुची,हे सर्व घराद्वारे व्यक्त होत असते.कुटुंबाचे समाजातील स्थान घर कसे ठेवले जाते यावर ठरते.


जाता जाता..


द प्रॉफेट,खलील जिब्रान पुस्तकात देवदूत प्रकरणामध्ये अल् मुस्तफा सांगतो.


तुमचं घर नौकेच्या नांगरासारखं न होता शिडासारखं असलं पाहिजे. तुमचं घर जखमेवरल्या चमकत्या खपलीसारखं नसावं : डोळ्यांचं रक्षण करणाऱ्या पापणीसारखं ते असावं.


दारांतून ये-जा करताना तुम्हाला पंख मिटावे लागू नयेत. छताला आदळेल म्हणून तुम्हाला मस्तक नमवावं लागू नये. भिंतींना तडे जाऊन त्या कोसळतील या भयान तुमचा श्वासोच्छ्वास कोंडू नये.


विजय कृष्णात गायकवाड