* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: "ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय ?"

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/१०/२२

"ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय ?"

"ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय? इथं नुसती पुस्तके चाळायला हे काही प्रदर्शन नव्हे" पुस्तक दुकानाचा मालक अगदी तावातावाने बोलत होता.


"अहो पण पुस्तक घ्यायचे आहे म्हणूनच चाळतोय ना?" पंचविशीतला नारायण त्या दुकानदाराला म्हणाला.


"पण आमच्याकडे तशी पद्धत नाही. पुस्तक पाहिजे असेल तर निवडा,विकत घ्या आणि चला, इथं उगाच जागा अडवून उभे राहू नका."


नारायण,ज्याचा श्वासच पुस्तक होता, त्या दुकानदाराच्या वर्तणुकीने फारच दुःखी झाला. अवघ्या तेरा वर्षाच्या बालवयात नारायणने आपल्या शाळेच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून काढली होती.अगदी हलाखीचे बालपण,वडिलांचे छत्र अडीच वर्षाचा असतानाच हरपलेले आणि आईच्या काबाडकष्टातून साकारलेले जीवन,अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढणाऱ्या या मुलाचे आयुष्य वेगवेगळ्या लेखकांच्या लेखणीतून फुलत होते. स्वामी विवेकानंदांच्या कार्याने प्रभावित झालेल्या नारायणने लहानपणी साठविलेले पैसे खाऊसाठी न वापरता त्यातील सत्तावीस रुपये विवेकानंदाचे समग्र वाङ् मय कोलकत्याहून मागविण्यासाठी पाठवून दिले होते. याच नारायणला आज एक दुकानदार हटवत होता.


नारायण दुकानाची पायरी उतरला. त्याने मागे वळून दुकानाकडे पाहिले आणि आपणही मुंबईमध्ये असेच दुकान काढायचे,असे विचार त्याच्या मनामध्ये दुकानाची बांधणी करू लागले. अर्थात पंचविशीतल्या या तरुणाला ही काही सहजी शक्य होणारी गोष्ट नव्हती. कारण त्यासाठी लागणारी कोणतीच गोष्ट नारायणजवळ नव्हती. पण निदान नारायणने यानिमित्ताने त्याच्या मनातील या इच्छेचे बी पेरले होते.


जसा नारायणला पुस्तकांचा छंद होता, तसाच इंग्रजी सिनेमांचाही होता.. साधारण १९४८ साली एक दिवस तो मुंबईतील स्ट्रॅन्ड नावाच्या चित्रपटगृहामध्ये इंग्रजी सिनेमा पाहायला गेला. त्या चित्रपटगृहामध्ये शिरताना त्याची नजर तेथील एका रिकाम्या कोपऱ्याकडे गेली आणि या कोपऱ्यात जर आपण दुकान काढू शकलो तर? असा एक विचार त्याच्या मनात विजेप्रमाणे चमकून गेला. नारायणच्या मनातली विचार चक्रे फिरू लागली आणि दुसऱ्याच दिवशी,मुंबईतील त्यावेळी पंचावन्न चित्रपटगृहांचे मालक असलेल्या केकी मोदी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर "जाऊन तो उभा राहिला. केकी मोदींसारख्या मोठ्या व्यक्तीसमोर नारायणने हा प्रस्ताव मांडला. नारायण अपरिपक्क आहे. त्याला पुस्तक व्यवसायाची कसलीही माहिती नाही हे मोदींच्या तात्काळ लक्षात आले पण त्यांना नारायणामध्ये काहीतरी विशेष असल्याचे जाणवले आणि त्यांनी नारायणचा प्रस्ताव स्वीकारला आणि अशाप्रकारे टी.नारायण शानभागच्या जीवनातील सुवर्णदिन उगवला आणि १९४८ साली नोव्हेंबर महिन्यात 'स्ट्रॅन्ड बुक स्टॉल' स्ट्रॅन्ड चित्रपटगृहामध्ये सुरू झालाही.


पुस्तकांची आवड असलेल्या नारायण शानभागांकडे त्यावेळेस पुस्तके विकत घेण्यासाठी केवळ ४५०/- रुपये होते, पण त्यांच्यातील चोखंदळ वृत्तीमुळे त्यांनी त्या भांडवलातूनही अतिशय निवडक अशी पुस्तके आपल्या स्टॉलवर ठेवली आणि बघता बघता नारायण शानभागांच्या स्ट्रॅन्ड बुक स्टॉलचे नाव अतिशय उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू मंडळींमध्ये घेतले जाऊ लागले. नारायण शानभागांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या स्टॉलवरील पुस्तके लोकांना मुक्तपणे हाताळायला द्यायचे आणि त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे ते प्रत्येक ग्राहकाला पुस्तकांच्या मूळ किमतीवर २० टक्के सूट द्यायचे.स्वतःसाठी केवळ किमान नफा घेऊन बाकीचे ग्राहकांना परत करायचे तत्त्व शानभागांनी पहिल्या दिवसापासून आजवर निष्ठेने पाळले आहे.


स्ट्रॅन्डमधील पुस्तके,तिथे मिळणारी सवलत,पुस्तके चाळायला मिळत असलेले स्वातंत्र्य आणि अतिशय आदराने वागणारा मालक यामुळे शानभागांची अतिवेगाने मुखप्रसिद्धी होऊ लागली आणि अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते त्या काळात केंद्रीय अर्थमंत्री असलेले टी.टी. कृष्णम्माचारींपर्यंत वेगवेगळ्या स्तरातील अनेक व्यक्ती स्ट्रॅन्डमध्ये आपली वर्णी लावू लागल्या. शानभाग यांच्या आरंभीच्या ग्राहकांपैकी एक होते सर अंबालाल साराभाई,त्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रख्यात परमाणू शास्त्रज्ञ विक्रम साराभाई आणि त्यानंतर त्यांचे लाडके शिष्य डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम किमान ४० वर्षे स्ट्रॅन्ड मध्ये येत असत. 


एकदा तर चक्क पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मुंबई भेटीत स्ट्रॅन्ड मध्ये भेट देण्याचे ठरविले आणि शानभागांच्या सूचनेवरून रात्री १०.३० वाजता लाल दिव्याच्या गाडीतून सायरनचा आवाज न करता नेहरूंनी स्ट्रॅन्डला भेट दिली आणि आपल्या पसंतीची पुस्तके खरेदी केली. पुढे नेहरूंच्या विनंतीवरून शानभाग स्वतः दिल्लीला जाऊन नेहरूंना पुस्तके देत असत. पण गंमत म्हणजे त्यांनाही ते २०% सूट देत होते. एके दिवशी पंडितजी शानभागांना म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानासही २०% सवलत का देतोस? त्यावर शानभाग म्हणाले, "आपण देशाचे राज्यकर्ते आहात. सर्व अद्ययावत माहिती आपल्यासाठी तयार ठेवणे,एक नागरिक म्हणून माझे कर्तव्य आणि आणि इतरांना देतो त्याप्रमाणे आपल्यालाही सवलत देताना मला आनंद होतो. '


अशाप्रकारे चांगली चांगली आणि दुर्मीळ पुस्तके समाजाला उपलब्ध करून देण्याचे काम गेली जवळजवळ पंचावन्न वर्षे शानभाग नित्यपणे करत आहेत.त्यांनी अगणित वाचक निर्माण केले,पुस्तक विकत घेण्याची सवय त्यांनी लोकांना लावली आणि त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी त्यांना राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या हस्ते 'पद्मश्री' हा बहुमान देण्यात आला आहे. केवढी ही भरारी ! एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नारायण केवळ आपली आवड आणि आपण ठरविलेले ध्येय याचा सातत्याने पाठपुरावा करतो आणि भारतातला 'पद्मश्री' हा बहुमान मिळालेला पहिला पुस्तक विक्रेता होतो, ही काही साधी गोष्ट नाही.


म्हणून नारायण शानभागसारख्या व्यक्तींच्या जीवनाकडून आपणही काहीतरी घेतले पाहिजे. मुळात ध्येयवेडे व्हायला पाहिजे.त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्य ठेवले पाहिजे. शानभागांच्या जीवनप्रवासाकडे जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,ठरवलं तर आपणही आपल्याला वाटेल ते साध्य करू शकतो. फक्त आवश्यकता आहे 'स्वतःमध्ये विश्वास असण्याची. '


भरारी ध्येयवेड्यांची - डॉ.प्रदिप पवार

विठ्ठल मारुती कोतेकर