स्वप्नं बघणाऱ्यांना,भविष्यात डोकवायला मिळायचं असेल तर,त्यांच्या पोटात फक्त श्रद्धा पाहिजे,दुसरं काही नको.
दिवस कधीकधी असा उगवतो की अगदी आतून असं वाटतं की,आज खूप वेगळं असं काहीतरी घडणार आहे.दिवस कधीकधी असाही उगवतो की,अशा खूप वेगळ्या गोष्टी घडून,आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात.
ठरलेल्या वेळेस जेसन स्टीव्हन्स यायचा म्हणून मी वाट बघत होतो.या भेटींपासून पुढच्या शोधयात्रेचा महिना सुरू व्हायचा असतो,आम्हा दोघांसाठी.बोस्टनच्या क्षितिजरेषेकडे पहात मी खिडकीशी उभा होतो.मनात रेड स्टीव्हन्सचे विचार होते.
ज्याच्यावर प्रेम असतं, त्याचा मृत्यू पचवणं कठीण असतं;
विशेषतः त्याच्या आठवणी जेव्हा सदासर्वकाळ तुमच्या मनात असतात. कांही लोकांचा आपल्यावर असा खोल परिणाम झालेला असतो,की ती माणसे आपला एक हिस्साच होऊन बसतात.रेड स्टीव्हन्सचा माझ्यावर तसाच परिणाम होता आणि मला माहीत आहे की त्याचा बऱ्याचजणांवर असा परिणाम झालेला होता.
खूपदा वाटून जायचं,फोन उचलावा,पलिकडून पश्चिम टेक्ससच्या बोलितला खरखरीत आवाज ऐकू यावा, मला प्रतिसाद मिळावा.
पण रेड स्टीव्हन्सनं माझ्या आयुष्यात आणलेल्या चांगल्या गोष्टी कायम माझ्याजवळ रहाणार आहेत,हे मला माहीत होते.
कॉन्फरन्स रूमच्या टोकाशी असलेल्या मोठ्या व्हिडिओ पडद्यावर रेड स्टीव्हन्स आमच्यासामोर आला.तो खरोखर अवलिया माणूस होता.आयुष्यात तो जे जे करीत गेला त्यातून त्याचा भन्नाटपणा उघड होत गेला.
"जेसन,तू तिथं बसला आहेस तेवढ्यात मी एक मिनीट वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची जबाबदारी घेतल्याबद्दल मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज यांचे आभार मानण्यासाठी घेणार आहे.मला वाटतं की तू लक्षात ठेवशीलकी माझ्या मृत्यूपत्रातील शेवटच्या मसुद्याप्रमाणे मी तुझ्यासाठी योजलेली सर्वोत्तम देणगीत तुला जेव्हा मिळेल,ती माझे प्रिय मित्र थिओडोर हॉमिल्टन आणि मार्गारेट हेस्टिंग्ज यांचा खूपच हातभार लागल्यामुळे मिळेल.मोठ्या पडद्यावर रेड इतका सजीव वाटत होता. मला त्याला सांगावसं वाटलं,मला हे त्याचं काम करतांना खूप आनंद वाटत होता.पण हे पण मला ठाऊक होतं की हे शब्द बोलण्याचा काही उपयोग नव्हता.मला मात्र वाटलं माझ्या पद्धतीनं जेसनच्या या प्रवासात त्याची साथ करण्यासाठी त्यानं मला निवडलं तेव्हा मला आनंद वाटला,हे त्याला ठाऊक असणार,
"जेसन या महिन्यात तू जो धडा शिकायचा आहेस,तो धडा आहे स्वप्न,एक देणगी.ही देणगी थोर स्त्री पुरूषांना मिळालेली असते.
स्वप्नं म्हणजे आपल्या जीवनाचा गाभा असतात.जीवन जसं आहे तसं नाही,तर ते जसं असायला हवं,म्हणजे स्वप्नं,खास लोकांच्या मनात, हृदयात,स्वप्नं जन्मतात.पण ती स्वप्नं फळाला आली म्हणजे सगळ्या जगाला त्यांचा लाभ घेता येतो.
"तुला माहीत नसणार,पण थिओडोर हॅमिल्टन देशभर उत्तम विधिज्ञ म्हणून ओळखला जातो.मला तो जेव्हा भेटला,तेव्हा तसं होण्याचं त्याचं स्वप्न मी ओळखलं होतं आणि गेली पन्नास वर्षे हे स्वप्न तो जगतो आहे.हे स्वप्न वास्तवात येण्याआधी त्याच्या मनात,त्याच्या हृदयात आकाराला आलं होतं.
"लुइझियानाच्या दलदलीतून भटकता भटकता टेक्ससमध्ये तेल आणि गुरंढोरं यांची सगळ्यात मोठी उलाढाल करणारा सम्राट होण्याची स्वप्नं मी पहात असायचा.ती स्वप्नं माझा इतका भाग बनून गेली की, जेव्हा माझं पण उद्दिष्ट मी गाठलं तेव्हा मी पूर्वी कधीच न राहिलेल्या आपल्या घरातच मुक्कामाला जणू पोचलो होतो.
(सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS ) "या सर्वोत्तम देणगीला निश्चित रूप देत असतांना, त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ देणगी कोणती बरं,असं ठरवायचा मी प्रयत्न करत होतो.एकाच देणगीचं नाव घ्यायचं झालं तर मी स्वप्न ह्या देणगीचं नाव घेईन.
जीवन कसं आहे त्यापेक्षा ते कसं असावं ही दृष्टी आपल्याला स्वप्नांमुळेच येते.या स्वप्नांमधूनच,या जीवनातून जी जी इतर देणगी मिळवायची असेल तिच्यासाठी मार्ग सापडतो."
रेड थोडा वेळ थांबला आणि तो विचारात गढून गेल्यासारखा वाटला.तो पुढे बोलायला लागला,"जेसन स्वप्नांची तुझी ओळख करून द्यायची तर आधी काही स्वप्नं कशी असतात,
याची तुला माहिती करून द्यायला हवी.आयुष्यभर अशा खूप स्वप्नांची मला जाण होती.
स्वप्नांबरोबरची माझी सलगी हा माझा ठेवा होता.
"मला आयुष्यात भेटलेला स्वप्न बघणारा सर्वात मोठा माणूस,लोकांच्या कल्पनाशक्तीला स्पर्श करील अशी ठिकाणं,अशा वस्तू तयार करण्याची त्याला प्रचंड आस होती.ही आस त्यानं आयुष्यभर जपली.त्याच्या वाट्याला माघार,मानहानी,अपयश नाहीतर हेटाळणीही आली.जेव्हा भेटायचा,तेव्हा तो त्याच्या नवीन योजनांविषयी,नवीन बेता विषयी माझ्यापाशी बोलायचा.भितीवर टांगायला नव्या नव्या स्वप्नांच्या पाट्या तयार करण्याची त्याला सवय लागली होती. आणि त्या योजनेच्या पुर्ततेसाठी आराखडे तो तयार करायचा.
"मला आठवतंय,तो मृत्यूशय्येवर होता.त्याच्या खोलीत छताला त्यानं त्याच्या नवीन योजनेचा आराखडा टाचून घेतला होता.
त्याच्या डोक्यात जसजसा त्या योजनेला आकार येत होता,
तसतसा तो त्या छतावरील आराखड्यामुळे जास्त स्पष्ट होत होता.
"रूग्णालयात त्याला भेटायला एक वार्ताहर आला. माझा मित्र इतका अशक्त झाला होता की त्याला जेमतेम बोलायला येत होते.तो पलंगावर जरा सरकला आणि वार्ताहाराला त्याने शेजारी आडवं व्हायला सांगितलं.असं केल्यानं छतावरच्या त्या आराखड्याकडे त्यांना नीट बघता येऊन त्याविषयी मित्राला चर्चा करता येणार होती.
"एका गंभीर दुखण्याशी झगडत असतांनाही एखादा माणूस एवढी आपली आस जपतोय हे पाहून तो वार्ताहर गहिवरला.वार्ताहाराने त्याची मुलाखात आटोपली.माझ्या मित्राचा त्यानं निरोप घेतला आणि तो रूग्णालय सोडून निघून गेला.
"नंतर त्याच दिवशी माझा मित्र गेला.
"तू मुद्दा निसटू देऊ नकोस बरं.मृत्यूशय्येपर्यंत आपली ज्वलंत स्वप्नं जोपासत,आयुष्यभर ती अगदी उत्कटपणे सांभाळणारा माणूस केवढा नशीबवान असला पाहिजे. आयुष्यभर माझा मित्र त्याच्या स्वप्नांमध्ये जगला.ती स्वप्नं सतत संख्येनं वाढायची आणि आकारानं मोठी व्हायची.त्यानं स्वप्नापैकी एखादा मैलाचा दगड गाठला की लगेच आणखी एखादं मोठं आणि एखादं जास्त दिव्य स्वप्नं त्याला खुणावत असायचं.
"अतिशय थेट पद्धतीनं खूप लोकांना स्वप्न बघायला आणि जास्त चांगल्या जगाची कल्पना करायला त्यानं शिकवलंय त्याचं नाव होतं वॉल्ट डिस्ने.
"पण तुला एक काळजी घ्यावी लागेल.आयुष्यभर जपायची स्वप्नं : ती केवळ तुझीच असायला हवीत. दुसऱ्या कोणाची ती असूच शकत नाहीत. आणि ती स्वप्नं संख्येनं आणि आकारानं वाढती रहायला हवीत.
"माझा दुसरा एक मित्र होता.त्याच नावं तुला माहीत नाहीये.तो म्हणायचा,खूप कष्ट करायचे आणि आयुष्याची पन्नाशी आल्यावर निवृत्त व्हायचं,असं त्याचं स्वप्न होतं.त्यानं खरोखर खूप कष्ट केले आणि धंद्यात अफाट यश मिळवलं.तो निवृत्त होण्याचं स्वप्न बाळगून होता.पण त्यापलिकडे कसलीच ओढ त्याला नव्हती.
"त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी आम्ही बरीचजणं जमलो.
त्याचा पन्नासावा वाढदिवस आणि त्याची निवृत्ती साजरी केली.त्यानं त्याचं स्वप्न नीट कशालातरी जोडून घेतलं असतं तर त्याच्या जीवनातला तो सर्वात आनंदाचा दिवस झाला असता.दुर्दैवानं त्याची सारी कर्तबगारीची वर्ष त्याच्या धंद्यासाठी खर्ची पडली. त्यात मात्र त्याला खूप अभिमान आणि आत्मसन्मान मिळाला.सुकाणूप्रमाणे वाट दाखवणारा उद्योगधंदा थांबवला तेव्हा अंगात जोम,ताकद असलेला तो माणूस निवृत्तीनंतर ढेपाळायला लागला.लवकरची निवृत्ती मिळावी असं त्याचं नेहमी म्हणणं होतं.पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याच्या जगण्याला आधार मिळावा अशी काही आस राहिलीच नाही."नंतर एकाच महिन्यानं माझ्या या दुसऱ्या मित्रानं आत्महत्त्या केली.
"एक स्वप्न पाहणारा माणूस,तो मृत्यूशय्येवर असतानाही जीवनभर जपलेल्या ओढीमुळे उत्साहित होत होता आणि दुसरा,ज्याचं स्वप्न त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी अशोभनीय होतं,त्यानी आत्महत्त्या केली.यांच्यातला फरक तुला स्पष्ट झालाच असेल.
"जेसन स्वप्न हे फक्त तुझं असणं फार महत्त्वाचं आहे.ते सब घोडे बारा टक्के नसतं.तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल असं तुझं स्वप्न असावं.तुझ्याबरोबर ते स्वप्न ही वर्धिष्णू वाढत रहावं.त्या स्वप्नांची ओढ असणारा फक्त तूच असशील.
रेड स्टीव्हन्स थांबला,त्यानं घसा साफ केला,आणि असं वाटलं की त्याच्या मनाचं तारू दिशा बदलत आहे. शेवटी तो बोलू लागला. "जेसन,या महिन्यात स्वप्नांच्या देणगीच्या अनुभवाला तू सुरूवात करायची आहेस. सगळं शक्य आहे असं समजायचं.आयुष्यात काय काय करायचं,काय काय व्हायचं,काय काय मिळवायचं याची यादी कर.तुझ्या अंतःकरणाचा सर्वात जास्त कशाकडे ओढा आहे हे विचारात घेऊन अग्रक्रम कशाला द्यायचा ती यादी तयार करायची.
"महिन्याच्या अखेरीस तू त्यातल्या काही स्वप्नांबद्दल मिस्टर हॅमिल्टन बरोबर बोलायचे.
उत्तर बरोबर किंवा चूक असं नसणार.आणि लक्षात ठेव जशी वर्ष लोटतील तशी तुझी स्वप्नं वाढतील आणि विकसित होतील,
स्वप्नांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे,स्वप्न बघणारा होण्याची प्रक्रिया.
"तुला सुंदर स्वप्नं बघण्याचं जीवन मिळो."
रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावलीआणि कॉन्फरन्स रूममधल्या टेबलवर घडी घालून ठेवलेल्या हातांकडे जेसन क्षणभर बघत राहिला.शेवटी तो म्हणाला, "आयुष्यात आपण काय करायचं याविषयी मी कधीच विचार केला नाहीये.आपण जिवंत असतो आणि जीवनाचा प्रवाह दिवसामागून दिवस गेले की आपोआप चालू राहतो,असंच मला वाटतं."
मी उभा राहून दाराच्या दिशेनं चालता चालता म्हटलं, "जेसन स्वप्नं बघायला सुरुवात करायला ही छान वेळ आहे.आणि हे शिकायचं असलं तर रेड स्टीव्हन्सकडूनच शिकायचं.त्याच्याहून दुसरा कोणी चांगला शिक्षक नाही. महिन्याच्या शेवटी तुझ्या अहवालाची मी वाट बघतो."
कॉन्फरन्सरूममधून मी बाहेर पडलो,तेव्हा जेसन विचारांमध्ये गढलेला होता आणि मला वाटतं त्याच्या स्वप्नांमध्ये ही.तीन आठवड्यांनी मी माझ्या लिहिण्याच्या टेबलाशी जेसन स्टीव्हन्ससमोर बसलो होतो आणि तो त्याच्या जीवनभराच्या स्वप्नांबद्दल बोलत होता.तो दिवस मी कधीच विसरणार नाही.त्यानं सुरूवात हळूहळू केली होती,पण तो मग बोलण्याच्या रंगात आला.
"सुरूवातीला मला काय करायचंय,कोण व्हायचंय, काय हवंय याची एक लांबचलांब यादी तयार केली.मग लक्षात आलं की ती काही वास्तविक पाहता स्वप्न नव्हती मला हवं तर त्या गोष्टी करणं,तसं बनणं,त्या मिळवणं मला सहज शक्य होतं.आजवर त्या करायला मी वेळ किंवा उत्साह दाखविला नव्हता इतकंच.पण मी जेव्हा वॉल्ट डिस्नीचा विचार केला,तेव्हा माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आल्या." जेसन जरासा थांबला.त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे बघून परत माझ्याकडे बघितलं.मला वाटतं त्याला प्रोत्साहन हवं होतं.मिस् हेस्टिंग्ज हसली आणि तिनं त्याच्याकडे बघत मान डोलावली.जेसननं बोलणं पुढे चालू ठेवलं.त्याचा विश्वास वाढायला लागला होता.
"कुठल्या तरी मार्गानं,वंचित तरूण माणसांचं आयुष्य सुधारावं म्हणून मला काही करता यायला हवं.म्हणजे माझ्या डोळ्यासमोर गरीब तरूण माणसं नाही येत.ज्या लोकांच्या कल्पनेतही स्वतःची ताकद,उत्कट इच्छा, मूल्ये या गोष्टी नाहीत की ज्यामुळे त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण नाही,अश्या लोकांसाठी मला काम करायचंय. माझे आजोबा रेड माझ्यासाठी जे करताहेत ते मी एका प्रकारे दुसऱ्या तरूणांसाठी करणार आहे."
मिस् हेस्टिंग्जने टाळ्या वाजवल्या.आणि ती आनंदानं म्हणाली, "जेसन मला हे ऐकून फार उत्तेजित वाटतंय. तू किंवा दूसरा कोणी याहून चांगलं आपल्या आयुष्यात करील असं मला वाटत नाही. "जेसन माझ्याकडे बघून म्हणाला, "तुम्हाला हे ठीक वाटतंय ना ?"
हसत मी उत्तर दिलं, "जेसन,चाळीस वर्षांच्या सहवासानंतर मी एक तत्त्व शिकलो आणि ते असं की आयुष्याच्या लढाईत टिकाव धरायचा तर नेहमी मिस् हेस्टिंग्जशी सहमत व्हावं.आणि खरंच माझंपण तिच्यासारखंच मत आहे.तुझ्या जगण्यासाठी एक अगदी छान स्वप्न,एक योग्य ध्येय तुला मिळालं.तुझ्या आजोबांच्या मित्रांच्या गोष्टींची सतत आठवण ठेव. आजोबांनी तुला त्या गोष्टी ऐकवल्या आहेतच. तू जिवंत असेपर्यंत तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेव."
मिस् हेस्टिंग्ज जेसनबरोबर लिफ्टपर्यंत गेली.मी आपल्या लिहिण्याच्या टेबलाशी एकटाच राहिलो. मी आपल्या स्वप्नांचा विचार करायला लागलो.ती आजही, माझ्या ऐशीव्या वर्षीही,माझी सोबत करत आहेत.पण तरी मी तेव्हाच शपथ घेतली की माझी सर्व स्वप्न टिकून असतील आणि वर ती वर्धिष्णूही असतील.
समाप्त...