मूळ लेखक — अल्विन टॉफ्लर
पुस्तक — Third Wave
अनुवादक — शरदिनी मोहिते
प्रकाशक — महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे
प्रकाशन — नोव्हेंबर १९९१
भाग १
प्रत्येक संस्कृतीची एक अदृश्य संहिता असते; अभिप्रेत असलेले कायदे किंवा मानण्यात आलेली तत्त्वे यांचा तो संच असतो. आणि त्या संचाने आखून दिलेल्या आराखड्याप्रमाणे त्या संस्कृतीतील समाजांचे सर्व उद्योग, सर्व कृती करण्यात येत असतात. पृथ्वीवर जेव्हा औद्योगिकीकरणाने आपला पगडा वसवला, तेव्हा त्याचाही विशिष्ट, अदृश्य असा आराखडा हळूहळू स्पष्ट दिसू लागला. या आराखड्यात एकमेकांशी संबंधित असलेल्या अशा सहा तत्त्वांचा समावेश होता. या तत्त्वांनुसार लाखो लोकांच्या आचरणाचा क्रम घडत गेला. उत्पादन आणि वापर यांच्यातल्या फाटाफुटीतून उद्भवलेल्या या तत्त्वांचा जीवनाच्या प्रत्येक अंगावर — क्रीडा, लिंग, कार्य, युद्ध अशा विविध विषयांच्या क्षेत्रांवर — परिणाम होत गेला.
आपल्या शाळांतून, उद्योगांतून आणि सरकारात उद्भवलेले बहुतेक सर्व तीव्र संघर्ष या सहा तत्त्वांवरच केंद्रित झालेले आहेत. ही सहा तत्त्वे दुसऱ्या लाटेच्या लोकांनी अनुसरली आणि त्यांचा त्यांनी सतत पाठपुरावाही केला. तिसऱ्या लाटेच्या लोकांनी त्यांना आव्हान दिले आणि त्यांच्यावर हल्लाही केला.
प्रमाणीकरण
आपल्याला सर्वात अधिक परिचित असलेले दुसऱ्या लाटेचे तत्त्व म्हणजे प्रमाणीकरण. हे सर्वांनाच माहीत आहे की, औद्योगिक समाजात अगदी एकसारख्या अशा लाखो गोष्टींचे उत्पादन होत असते. तथापि, काही लोकांच्या हे ध्यानात यावयाचे थांबले आहे की, जेव्हा बाजाराचे महत्त्व वाढले तेव्हा आपण कोका-कोलाच्या बाटल्या, विजेचे दिवे, स्वयंचलितांचे ट्रान्समिशन्स अशा गोष्टींचे प्रमाणीकरण करण्याहून अधिक काही देखील करून ठेवले आहे. आपण तेच तत्त्व इतरही कितीतरी गोष्टींना लावले.
या गोष्टीच्या महत्त्वाचे आकलन पहिल्यांदा झाले, ते थियोडोर व्हेल याला. त्याने शतकाच्या बनावाच्या सुमाराला अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनीची प्रचंड बांधणी केली.
इ. स. १८६७ च्या सुमाराला रेल्वे पोस्टात क्लार्क म्हणून काम करणाऱ्या व्हेलच्या हे लक्षात आले की, एका ठिकाणाहून निघणारी आणि दुसऱ्या एका विशिष्ट ठिकाणी पोहोचणारी दोन पत्रे एकाच मार्गाने प्रवास करत नव्हती! पत्रांच्या पिशव्या पुढे-मागे प्रवास करीत, कधी आठवडे तर कधी महिने काढत, केव्हातरी इच्छित स्थळी जाऊन पोहोचत होत्या. व्हेलने मार्गाच्या प्रमाणीकरणाची कल्पना पुढे मांडून पोस्ट ऑफिसमध्ये एक प्रकारची क्रांतीच केली. त्यामुळे एकाच ठिकाणी जाणारी पत्रे ठरावीक मार्गाने जाऊ लागली.
त्याने जेव्हा पुढे अ. टे. टे. कंपनी तयार केली, तेव्हा प्रत्येक अमेरिकन घरात एकसारखा टेलिफोन बसविण्यास सुरुवात केली.
त्याने केवळ टेलिफोन हँडसेटचेच व त्याच्या इतर सर्व घटकांचेच प्रमाणीकरण केले नाही, तर अ. टे. टे.च्या उद्योग निर्मात्यांचे आणि प्रशासकांचेही प्रमाणीकरण केले! व्हेलला हे अचूक उमजले होते की, दुसऱ्या लाटेच्या एकूण परिस्थितीत यश मिळवायचे असेल, तर यच्चयावत् संपूर्ण प्रमाणीकरण अत्यंत आवश्यक आहे!
औद्योगिक समाजाला आकार देणाऱ्या प्रमाणीकरणाचे महत्त्व जाणणाऱ्या अनेक मोठ्या लोकांपैकी व्हेल हा केवळ एक होता. फ्रेडरिक टेलर हा असाच दुसरा महान पुरुष. त्याचा असा ठाम विश्वास होता की, प्रत्येक कामगाराने करावयाच्या कामाच्या प्रत्येक पायरीचे-टप्प्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय काम खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध होणारच नाही.
या शतकाच्या पहिल्या काही दशकांत टेलरने असे दाखवून दिले की, प्रत्येक काम करण्याची एकच उत्तम, प्रमाणीभूत पद्धत असते; त्यासाठी एकच उत्तम, प्रमाणीभूत साधन वापरण्यात येत असते आणि काम पूर्ण होण्यासाठी एकच निर्धारित, प्रमाणीभूत कालावधी असतो.
या विशिष्ट तत्त्वप्रणालीने तो जगाचा व्यवस्थापकीय ‘गुरु’ झाला. पुढे याची फ्रॉइड, मार्क्स आणि फ्रँकलिन यांच्याशी तुलना होऊ लागली. यानंतर भांडवलवाले मालक आपल्या कामगारांच्या उत्पादनशक्तीचा शेवटचाही अंश पकडून घेण्यास उत्सुक राहू लागले. हाच उत्साह साम्यवाद्यांमध्येही भरून राहिलेला होता. समाजवादी उत्पादनात टेलरच्या पद्धतींचा अंगीकार व्हावा अशी उत्कट इच्छा खुद्द लेनिनने व्यक्त केली होती. प्रथम मुख्यतः औद्योगिकीकरणाला गती व प्रोत्साहन देणारा आणि नंतर साम्यवादी असलेला लेनिन प्रमाणीकरणाच्या तत्त्वाचा कळकळीचा अनुयायी होता.
कार्यपद्धती आणि खुद्द कार्यही सुटे घेणे ही गोष्ट दुसऱ्या लाटेच्या समाजात अधिकाधिक प्रमाणीभूत होत गेली. अयोग्य ठरणाऱ्याला ओळखण्याच्या आणि डच्चू देण्याच्या चाचण्या प्रमाणीभूत झाल्या. त्यांचा विशेषतः नागरी सेवेतून उपयोग करण्यात आला. सर्व उद्योगांमध्ये वेतनांचे, लाभांचे, जेवणांच्या वेळांचे, सुट्ट्यांचे आणि गाऱ्हाण्यांबाबतच्या कार्यपद्धतींचेही प्रमाणीकरण झाले.
युवकांना नोकरीच्या बाजारास योग्य म्हणून तयार करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाचेही शिक्षणतज्ज्ञांनी प्रमाणीकरण केले. शाळांच्या प्रती ठरविणे, शाळांतील प्रवेश कार्यप्रणाली आणि अधिकृत मान्यतेविषयीच्या नियमांचेही प्रमाणीकरण झाले.
इकडे वृत्तमाध्यमे स्वस्थ बसली नव्हती. डोळ्यांसमोर हुबेहूब चित्र उभे करण्याची किमयाच त्यांनी प्रमाणीभूत केली. त्यामुळे लाखो लोक त्याच जाहिराती, त्याच बातम्या, त्याच लघुकथा त्याच प्रमाणीभूत आस्थेने वाचू लागले. छोट्या गटांच्या वापरातील भाषा केंद्र सरकारांकडून दडपल्या जाऊ लागल्या. जनसामान्यांवर या गोष्टींचा परिणाम घडू लागला आणि त्याचा परिणाम म्हणून स्थानिक किंवा प्रादेशिक अशा काही बोली, कधीकधी तर वेल्श किंवा अल्सेशियनसारख्या संपूर्ण भाषा देखील जवळजवळ लुप्त झाल्या. ‘प्रमाणीभूत अमेरिकन इंग्लिश’, फ्रेंच, रशियन भाषांनी ‘अप्रमाणीभूत’ भाषांची जागा घेतली. प्रमाणीकरणाचे तत्त्व जीवनाच्या अंगोपांगात भिनून गेले.
हृदयापेक्षा वरच्या पातळीवर पाहताना दिसून येते की, औद्योगिक संस्कृतीला वजने आणि मापे यांच्या प्रमाणीकरणाची अतिशय निकड वाटली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या पहिल्या काही पावलांतील एक पाऊल याच दिशेने उचलले गेले. हा काही केवळ योगायोग नव्हता. दुसऱ्या लाटेत जगाच्या बहुतेक भागात प्रमाणीभूत वजने व मापे वापरली जाऊ लागली.
सामूहिक उत्पादनासाठी प्रमाणीभूत यंत्रे, उत्पादने, प्रक्रिया यांची निकड होती. सतत विस्तार पावत जाणाऱ्या बाजाराला पैशांचे, फार काय किमतीचेही समांतरित प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता वाटली. इतिहास पाहताना आपल्याला असे आढळून येईल की, व्यक्तींनी खाजगी अखत्यारीत, राजांनी, बँकांनी निर्माण केलेली चलने वापरात आणली. परंतु औद्योगिकीकरण करणाऱ्या देशांनी ही प्रथा बंद पाडली. बिनसरकारी चलनांचे उच्चाटन करून चलनांमध्ये प्रमाणीभूतता आणली.
एकोणिसाव्या शतकापर्यंत औद्योगिक देशातील ग्राहक व विक्रेते कैरो बाजाराप्रमाणे पूर्वापार चालत आलेली घासाघीसयुक्त किंमत करत होते. परंतु इ. स. १८२५ साली उत्तर आयर्लंडमधून आलेला एक व्यापारी ए. टी. स्टुअर्ट याने न्यूयॉर्कमध्ये सुक्या फळांचे दुकान उघडून तिथे असलेल्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित पक्की किंमत सांगून ग्राहकांना आणि त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांना धक्काच दिला. पुढे याच धोरणामुळे, किमतीच्या प्रमाणीकरणामुळे स्टुअर्ट हा व्यापाऱ्यांतला जणू राजपुत्र ठरला. त्याने सामुदायिक वितरणाच्या प्रगतीतील एक मोठा अडथळा दूर केला.
इतर कोणतेही मतभेद असोत, पुढारलेले, दुसऱ्या लाटेतले विचारवंत या एका गोष्टीवर एकमत झाले की, प्रमाणीकरण अधिक कार्यक्षम आहे. दुसऱ्या लाटेने अगदी निष्ठुरपणाने हे प्रमाणीकरणाचे तत्त्व सर्वत्र लागू केले. त्यामुळे अनेक पातळ्यांवरील मतभेद कमी झाले; व समतलता आली.
विशेषीकरण
सर्व दुसरी लाट-समाजामध्ये आढळून येणारे महत्त्वाचे दुसरे तत्त्व म्हणजे विशिष्ट व्यासंग. दुसऱ्या लाटेने भाषा, निवांतपणाचे सुख आणि एकूण जीवनपद्धतीतले वैविध्य कमी करत आणले आणि तिला कामाच्या क्षेत्रात मात्र वैविध्याची आवश्यकता वाटू लागली.
कामाच्या विभागणीचे तत्त्व वेगाने वाढवत असताना तिने सर्व कामे थोडी का होईना जाणून वेळ निभावून नेणाऱ्या शेतकऱ्याच्या जागी अतिशय मर्यादित क्षेत्रातच प्रवीण असणारा कामगार आणला. हा कामगार फक्त त्याच्या एकाच कामात प्रवीण होता आणि ते तो पुन्हा पुन्हा करीत राहिला.
इ. स. १७२० मधल्या एका अहवालात — हा अहवाल The Advantages of the East India Trade वरील आहे — असे म्हटले आहे की, कामातील विशेषीकरण कमी वेळात व कमी श्रमात कामे करून देते. अॅडम स्मिथने इ. स. १७७६ मध्ये म्हटले की, कामाची विभागणी होत असल्यामुळेच कामगारांच्या उत्पादकशक्तीत मोठी सुधारणा घडून आली.
स्मिथने पिनांच्या उत्पादनाचा दाखला दिला आहे. जुन्या काळच्या पद्धतीनुसार एकच कामगार सर्व कामे स्वतःच करीत राहून दिवसाला केवळ मूठभर पिनाच तयार करू शकत होता; फार फार तर वीस, कधी तर एक देखील नाही. उलट, स्मिथने जेव्हा पिना तयार करण्याचा कारखाना पाहिला तेव्हा त्याला आढळून आले की, पिन तयार करण्यासाठी दहा विशेषज्ञ कामगार काम करीत होते. प्रत्येकजण कामातील एक किंवा दोनच पायऱ्या पूर्ण करीत होता. परंतु ह्या सर्वांनी केलेल्या त्या कामाचा परिणाम असा की, ते दररोज ४८,००० पिना तयार करू शकत होते.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अधिकाधिक काम कारखान्याकडे गेले आणि अधिकाधिक मोठ्या प्रमाणात पिनांच्या कथेचीच सगळीकडे पारायणे होऊ लागली. उत्पादन बेसुमार वाढले. त्याचप्रमाणे विशिष्ट कामात पारंगत असलेली माणसे तयार करण्यासाठीचा सर्व प्रकारचा व्ययही वाढला.
टीकाकारांनी असे म्हटले की, अशा तऱ्हेची विशिष्टता आल्यामुळे कामगारातील मानवत्व दिवसेंदिवस कमी होऊन तोदेखील यंत्राचाच एखादा भाग बनून यंत्रवत् काम करू लागला.
इ. स. १९०८ मध्ये जेव्हा हेन्री फोर्डने मॉडेल T चे उत्पादन करायला सुरुवात केली, तेव्हा मॉडेल T तयार होण्यासाठी केवळ १८ प्रक्रिया नव्हेत, तर निरनिराळ्या ७,८८२ प्रक्रिया आवश्यक ठरल्या. आपल्या आत्मचरित्रात फोर्डने म्हटले आहे की, ही ७,८८२ विशिष्ट कामे करण्यासाठी ९४९ “समर्थ, तगडे आणि अगदी तंदुरुस्त” अशा माणसांची आवश्यकता होती.
त्यातील ३,३३८ कामे करण्यासाठी आवश्यक असणारी माणसे “सामान्य” शारीरिक ताकदीची असत. उरलेली कामे स्त्रिया किंवा मोठी मुले करू शकत होती. फोर्ड थंडपणे पुढे म्हणतो, “६७० कामे पाय नसलेले लोक करू शकतील अशी, तर २,६३७ कामे एकच पाय असणारे करू शकतील अशी, दोन कामे दोन्ही हात नसलेले करू शकतील अशी, ७१५ कामांना एका हाताची आवश्यकता होती, तर १० कामे आंधळी माणसे करू शकतील अशी होती.”
थोडक्यात, विशिष्ट कामाला संपूर्ण मानवाची आवश्यकता नव्हती, तर त्याच्या काही भागांची आवश्यकता होती. अतिविशिष्टीकरणाचा याहून अधिक स्पष्ट पुरावा, त्याच्या क्रूरपणाची साक्ष देण्यासाठी, आपल्याला सापडणे कठीण आहे.
टीकाकारांनी ह्या पद्धतीचे श्रेय भांडवलशाहीला दिले; परंतु ही पद्धत समाजवादाचेही अंगभूत वैशिष्ट्य बनून गेली होती. कारण दुसऱ्या लाटेच्या सर्व समाजात रूढ झालेल्या या अतिवैशिष्टीकरणाचे मूळ उत्पादन आणि वापर यांच्या फाटाफुटीत आहे.
रशिया, पोलंड, पूर्व जर्मनी, हंगेरी या देशांतील कारखाने विशिष्ट व्यासंगी कामगारांखेरीज चालूच शकणार नाहीत. जपानमध्ये तीच परिस्थिती. अमेरिकेतही तीच. इथे इ. स. १९७७ मध्ये कामगार खात्याने २०,००० अति-विशिष्ट सेवांची यादी प्रसिद्ध केली होती.
भांडवलशाही व समाजवादी दोन्ही प्रकारच्या राज्यात, ह्या वैशिष्टीकरणासह व्यावसायिकता, जीवनात उतरली. संधी मिळताच हे वैशिष्टिक गट आपल्या खाजगी ज्ञानाची मक्तेदारी करू लागले. त्यांनी कटाक्षाने नवागतांना आपल्या क्षेत्राबाहेरच ठेवले.
दुसरी लाट प्रगत होत असताना जाती व ग्राहक यांच्यात बाजाराने दुही निर्माण केली. दुसऱ्या लाटेच्या राज्यात आरोग्य ही गोष्ट डॉक्टरांनी पुरवठा करण्याची झाली. ‘आरोग्य पुरवठ्या’चीही नोकरशाही झाली. पेशंट बुद्धिमत्तेने स्वतःची काळजी घेण्याचे केव्हाच विसरून गेला. शिक्षण हे शिक्षकाने केलेले उत्पादन आणि विद्यार्थी हे ग्राहक झाले.
दुसऱ्या लाटेच्या समाजात आपण राजकीय चळवळींचाही धंदा म्हणूनच विचार केला. लेनिनने असे प्रतिपादन केले की, सर्वसामान्य लोक धंदेवाईक राजकारण्यांची मदत मिळाल्याशिवाय क्रांतीचा उठाव करू शकत नाहीत. तो म्हणाला की, ‘क्रांतिकारकांच्या संघटनां’ची आवश्यकता आहे. आणि या संघटनेत ‘क्रांतिकारकाचा धंदा’ करणाऱ्या लोकांनाच सदस्यत्व मिळू शकते.
जमाती, भांडवलदार, कार्यकारी, शिक्षणतज्ज्ञ, पुरोहित, राजकारणी या सर्वांची मनोभूमिका दुसऱ्या लाटेने एकच ठेवली आणि अशा अतिविशिष्ट कामाच्या विभागणीच्या दिशेने कूच कायम ठेवली. क्रिस्टल पॅलेस प्रदर्शनात प्रिन्स अल्बर्ट याने म्हटले होते की, विशेषीकरण ही संस्कृतीची चलनशक्ती आहे.
हे थोर प्रमाणीकरण आणि थोर विशिष्टतावादी हातात हात घालून पुढे चालले होते.