* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/११/२२

मानवी भावनिक हाकेला संवेदनशील ओ देणारा ' व्यवस्थेचा बइल '

रोज सकाळी आपलं नैसर्गिक घड्याळ सेट करण्यासाठी आपल्या डोळ्यांना सकाळच्या कोवळ्या उन्हाची गरज असते.जर सकाळी हे घड्याळ सेट झालं तर रात्री शांत झोप लागते. पण हा प्रकाश खिडकीच्या काचेतून किंवा गॉगलमधून मिळालेला नसावा. सरळ सूर्यप्रकाश मिळण्यासाठी सकाळचा काही वेळ काढा किंवा ऑफिसला जाताना गाडीच्या काचाखाली करून सुर्याचे दर्शन घ्या आणि कवळ्या सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या.

इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकातील वाक्य वाचून जरा थांबलोच.


असाच व्हॉट्सॲपचा स्टेटस बघत होतो.एका ठिकाणी डॉ.प्रभाकर शेळके यांचा ग्रामीण जीवनाचा ' सत्य ' सांगणारा कथासंग्रह या कथासंग्रहावर आमचे मित्र शरद ठाकर यांनी लिहिलेली वृत्तपत्रातील समीक्षा वाचली. त्यांनी आदरणीय डॉ.प्रभाकर शेळके यांचा भ्रमणध्वनी नंबर दिला.या समिक्षेवर व कथासंग्रहाबाबत लेखकांसोबत सर्वोच्च आत्मिय सुसंवाद झाला.बैल व बइल,देव व दैव या मानवी जीवनातील शब्दांमागची इमोशनल भावना,या संबधी अवर्णनीय अशी माहिती त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रकट झाली.साहेबांनी माझ्या सन्मित्र हाकेला पुस्तकरुपी ओ दिली,भेटस्वरुप म्हणून व्यवस्थेचा बइल हे पुस्तक मला मिळाले.प्रथमत:त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद


१२ कथांचा हा संग्रह संपुर्ण ग्रामीण जीवनाचे जीवंत दर्शन घडवितो.यातील कथा,पात्र ही प्रत्येक माणसाची जिंदगी आहे.


मी माझाच उधळत गेलो.मस्तवाल बैलासारखा.मी या व्यवस्थेचा उधळलेला बैल हे 'प्रामाणिक मनोगत काळजाची ठाव घेते.डॉ.दादा गोरे यांची प्रस्तावना स्वतःला स्वतःसाठी स्वतःमध्ये कसं तटस्थपणे बघायचा 'आरसा' च आहे.या प्रस्तावनेमुळे हे पुस्तक समजण्यास सोपे जाते.


व्यवस्थेचा बइल,चांदणफुला,मुलडा,मिरग,जटायू,दंडुका,कंदुरी,

कुरण,खुरमुंढी,उमश्याचा बाप,भदपड्या,कुब्जा,संट्या अशा विचारांच्या या वेगवेगळ्या कथा,या कथा माणसात,मानसिकतेत झालेला बदल,गावांचं झालेलं शहरात रुपांतर,मुलभूत गरज व दिखाऊ गरज,

माणसाच्या माणुसकीचा होणारी घुसमट,प्रत्येक ठिकाणी स्वार्थीपणाने विविध पातळ्यांवर होणारी पिळवणूक,काय केलं व काय करायला हवं होतं याची भुमिका स्पष्ट करणारी सुक्ष्म रेषा म्हणजे हा कथासंग्रह


माय, तु मला जन्म दिला.तुझ्या पदराच्या सावलीत नाही विसावलो.तुझ्या दुधाचे उपकार कसे फेडू ? घरच्या दरिद्री परिस्थितीमध्ये बदल करुन सुखाचे चार घास खाण्यासाठी लवकरच मोठा झालेला लेक परिस्थितीतीचे चटके खातो.नोकरीसाठी गाव सोडावं लागतं.गावशिवारात राहिला नाही 'गोतावळा' उडाला 'पाचोळा' मनातली 'धग' घेवून शहरातल्या भोंगळ 'कोसल्या'मध्ये आणि म्हणून वाट्याला येतं आहे जगण्यातली 'काचवेल'.. नोकरीसाठी शिक्षण पदव्यांचा ढिग पण नोकरीच नाही.मी उध्वस्त आत्म्याचा कैदी ..शिंगे खिलार आहे,खांदा,रंग,शेपूट,दात सगळं चांगलं आहे.एकीकडे मनात सुगंधाशी लग्न करावं,एकीकडे बेकारीने तळपतो.ह्या व्यवस्थेत मी दीन झालेला नंदीबइल..विशाल मनाचं दर्शन होतं.


चांदणफुला जयर्‍याच्या प्रेमाचा झालेला चुराडा ही प्रेमकहाणी जीवनातील क्षणभंगुरता दाखविते.इकडे जयर्‍याचा वळू गावभर सैराट होऊन पळतो आहे.तिकडे संजीचा चांदणफुला आभाळ गोदतो आहे.


माणसं पैशासाठी काम करत्यात की,मरण पुढं लोटण्यासाठी कळतं नाही.हे कळण्यासाठी मुलडा प्रत्यक्ष वाचलाच पाहीजे.


शेतकर्‍यांचा उपाशी संघर्षमय जीवन प्रवास उपाशी पोटाने केली जाणारी बियाणांची खरेदी पाचशे एकावन्न रूपयाची खरेदी झाली.ते देण्यासाठी बगलखिशात हात घातला तर सगळं जगणंच थांबलेलं हे सर्व भयावह वास्तव आहे.मिरुग आहे.


तो,आयुष्याची काही लक्तरे बांधून जगतो आहे.गावशीव सोडून शहराच्या गुर्‍हाळात चिपाड होऊन.त्यानं घालवलेलं असतं आपलं मरणप्राय आयुष्य मी सुद्धा जटायू आहे याची जाणीव झाली.


नोकरीवरुन अचानक कारणाशिवाय काढून टाकल्यानंतर झालेली अनेक जीवांची घालमेल गावकरी,सरपंच यांनी न्यायासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे.जगण्यासाठीचा दंडुका


कंदुरी माणसाच्या जगण्याचे वैविध्यपूर्ण स्वभाव मान,सन्मान,अपमान,प्रेम,जिव्हाळा,यांच आध्यात्मिक दर्शन देणारी कथा भावनेला हात घालते.


जग रडून ऐकतो हसून सांगतो हे जगण्याचं मर्म सांगणारं कुरणं सत्याच्या जवळ घेवून जाते.


खुरमुंढी व्यसनाधीनता व त्याचे परिणाम यावर भाष्य करणारी कथा बरंच काही सांगून जाते.


उमश्याचा बाप विचारांच्या पलिकडे विचार करायला लावतो.


भदपड्या,कुबदा,संट्या आवर्जून समजून,उमजून जीवन उलगडुन दाखविणार्‍या कथा अप्रतिम आहेत.


हा कथासंग्रह वाचत असताना त्याच्यासोबत मी दुसरं पुस्तक 'संन्यासारखा विचार करा'वाचत होतो.मी नेहमीच दोन पुस्तके वाचण्यास घेतो. या पुस्तकात एक प्रसंग आहे. लंडनमधील मंदिरात राधानाथ स्वामी व्याख्यान देत असताना त्यांच्याकडून सांगितलेली विचार पद्धत..! ज्यांनी मिठासारखं जगायला सांगितलं आणि आपल्या अन्नात खूपच मीठ असलं किंवा अगदीच कमी मीठ असलं तरच आपलं त्याच्याकडे लक्ष जातं याकडे आमचे लक्ष वेधलं,आत्तापर्यंत कोणीही कधीच असं म्हणत नाही की,'किती छान,या अन्नात अगदी योग्य प्रमाणात मीठ आहे.ज्या वेळी मिठाचा शक्य तितक्या उत्तम प्रकारे वापर केला जातो. त्या वेळी ते लक्षातही येत नाही.मिठ इतकं विनयशील असतं की, ज्यावेळी एखादा पदार्थ बिघडतो, त्यावेळी त्याचा दोषारोप ते स्वत:वर घेतं आणि ज्यावेळी काही सारं आलबेल असतं, त्यावेळी त्याचं श्रेय ते घेत नाही.


खरचं हा कथासंग्रह म्हणजे मानवी जीवनातील मिठच आहे.आदरणीय लेखक डॉ.प्रभाकर शेळके यांचे पुनश्च मनापासून आभार…!


● विजय कृष्णात गायकवाड




विजय कृष्णात गायकवाड

२९/११/२२

" करपलेली भाकरी मी व सौभाग्यवती..! "

माझी ही सकाळी सकाळी कामाला जायची लगबग चालली होती.( सौ. मेघा ) ही फारच गडबडीत होती.तव्यामध्ये भाकरी टाकली. व काही तरी कामासाठी ती बाहेर निघून गेली. मी सकाळी कामाला जाण्याअगोदरच जेवतो ..!


भाकरी तव्यामध्ये होती.मी सुक्ष्मपणे,चिंतनशीलपणे त्या भाकरीकडे पाहत होतो. हळूहळू भाकरी करपून धुर यायला सुरू झाला. काही वेळापूर्व संपूर्ण,सर्वश्रेष्ठ,

प्रकाशमय अशा भाकरीमध्ये अमूलाग्र बदल होत होता.भाकरी संपूर्ण काळी पडून करपरली यावेळेस 'तिचे' आगमन झाले...!


'तुम्हाला काय झालयं...? ही भाकरी दिसत नव्हती का..? मला हाक तरी मारायची ..? माझ्या वाटणीची भाकरी करपली ? तुम्ही हे मुद्दाम केलं आहे.दिसत असूनही तुम्ही गप्प बसलात,अवघड आहे या माणसाचं ..!


मी शांत निवांत करपलेल्या भाकरीचं तत्वज्ञान समजून घेतलं भाकरीला माणसाचा हात लागला नाही.तर अनपेक्षित असा तिच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होतो.तिच्या अस्तित्वामध्ये असण्यामध्ये चिरंतन फरक पडतो.बदलनं,जागा सोडनं,उत्क्रांत होणं.जीवनातील हेच अटळ सत्य आहे." मग सूक्ष्मपणे विचार केला कि मी कधी बदलणार...!


"असाच काहीसा प्रसंग माझ्या नजरेसमोरून गेला.जो हेन्री डेव्हिड थोरो यांच्या सर्वोत्तम जीवनाशी निगडित आहे." ( जो हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र या पुस्तकातील आहे.)


" दोन दिवसांपूर्वी मला मारिया मावशीने डॉ.चॅमर्सचे चरित्र वाचण्यास सांगितले.मी अर्थातच तसे काही वचन तिला दिले नव्हते. 


कालच ती ओरडून शेजारच्या जेन मावशीला

( हिला कमी ऐकू येत असे ) सांगत होती,"काय माणूस आहे ! काल दिवसभर त्या बेडकांचे ओरडणे ऐकत उभा होता पण वाचायला सांगितली तर त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं त्याने...."


● विजय कृष्णात गायकवाड

२७/११/२२

" कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." नोम चोम्स्की..

'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या;

( जग बदलणारे ग्रंथ मधून सन्मापुर्वक )


… आदरणीय नमस्कार


जे तुम्ही शोधत असता ते देखील तुम्हाला शोधत असते.या प्रमाणेच आपला 'जग बदलणारे ग्रंथ' मला शोधत शोधत माझ्यापर्यंत आला.

अनुक्रमणिका वाचली आणि काहीतरी वेगळं सापडलेला भाव मला त्याच्या असण्याची जाणीव करून गेला.


सव्वीस पानांचे आदरणीय दीपा देशमुख यांचे असणारे मनोगत पुस्तकाचे महत्व,त्याच्याबद्दल अनेकांनी लिहिलेली कविता,घटना प्रसंग लेख मनाला जगण्याची उभारी देऊन गेले.


पुस्तकांचं/ग्रंथांचं महत्त्व प्राचीन काळात खूप जास्त होतं.याचं कारण आज कोणतंही पुस्तक स्वस्त आणि सहज उपलब्ध होतं.पूर्वी हस्तलिखितांच्या युगात ग्रंथ म्हणजे सोन्यापेक्षाही महाग असत.तीनशे-चारशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांच्या काळात त्यांच्या 'भागवता'ची किंमत एक हजार रुपये (म्हणजे आजचे जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये) इतकी होती.एवढा पैसा खर्च करून लोक हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करीत असत.भागवत,रामायण,

महाभारत,या पोथ्या सावकारांकडे कर्जासाठी तारण म्हणून त्या काळी स्वीकारल्या जात होत्या. सोन्याचा वर्ख लावून त्या काळी ग्रंथातली अक्षरं लिहीत असत.


हे सर्व एकाच ठिकाणी व एकत्रितपणे वाचायला मिळाले व मनाला फार आनंद झाला.एकूण १८० ग्रंथांनी जग बदललं आहे. त्यातील ५० ग्रंथांची ही सांगड म्हणजे माणुसकी व मानवता यांचा शोध व सांगड घालणारी आहे. हा ग्रंथ म्हणजे समस्त मानव जातीला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे आहेत.


वॉल्डन ही डेव्हिड थोरो यांची ही कादंबरी जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली मी वाचलेली आहे. पण 'वॉल्डन टू' ही १९४८ मध्ये स्किनरनं प्रकाशित केलेली कादंबरी याची नोंद वाचून नवीन दृष्टिकोन तयार झाला.


एरिक फ्रामनं न्यूनगंड म्हणजे काय याविषयी अतिशय अप्रतिम असे विवेचन केलंय.

' न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की मला काही येत नाही असं नसून न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला काही येत नाही.' विचार करायला लावणारं हे विवेचन..


१८५९ मध्ये थोरोनं चार्ल्स डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशिज' हे पुस्तक विकत घेऊन वाचलं.

( पुस्तक विकत घेऊन वाचणारी माणसं ही कोण असतात.ती गरीब नक्कीच नसतात ती तर श्रीमंत असतात.या तत्वाची आठवण झाली.)


या ग्रंथातील सत्याचे प्रयोग,द सेकंड सेक्स, ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम,इमोशनल इंटेलिजन्स, गन्स,जर्म अँण्ड स्टील,सेपियन्स:अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमन काइंड ही ग्रंथ मी वाचलेली आहेत.

हा ग्रंथ म्हणजे खरोखरच जग बदलणारा,माणूस बदलणारा ग्रंथ आहे.


आपले व मनोविकास प्रकाशनचे ( अरविंद पाटकर ) यांचे मनापासून मी आभार मानतो.सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असा हा जग बदलणारे ग्रंथ ( एकुण पृष्ठसंख्या - ४३२ ) माणसाला माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली संशोधने,त्यासाठी त्यांना घ्यावा लागलेला त्रास त्यासाठी त्याला सोसाव्या लागलेला विरोध या सर्वांवरती विजय प्राप्त करून त्यांनी एक आदर्श समाज,आदर्श माणूस घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं.अशा या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचा जीवनपट आपण जिवंतपणे या ग्रंथाद्वारे समोर उभा केला आहे यामध्ये लेखक व प्रकाशक यशस्वी ठरलेले आहेत.

आपल्याकडून असेच सर्वोत्कृष्ट वैचारिक, बुद्धिजीवी ग्रंथांची व पुस्तकांची निर्मिती व्हावी हीच विनंती.


"कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." 

नोम चोम्स्की यांच्या विचारांचा आठवण करून देणारा हा ग्रंथ आहे.आपले पुनश्च एकदा आभार धन्यवाद.

२५/११/२२

जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी..

माकड,शेळी,बकरी,कुत्री हे आपल्या पिलांचा आवाज चार वर्षानंतरही ओळखतात व त्याला बिलगतात.


आता जाणून घेऊया कॉफीच्या व मोहाच्या शोधाबाबत..


कॉपी व मोहाचा शोध शेळ्या व मेंढ्यामुळे लागला आहे.मध्यएशियातील ही कहाणी आहे काही शतकांपूर्वीची एकदा एक मेंढपाळ आपल्या शेळ्या बकऱ्या घेऊन चरण्यासाठी घेऊन गेला होता.त्याचं चरणं चालू असताना त्याच्या शेळ्या मेंढ्यांनी एक फळ खाल्लं आणि त्या उड्या मारायला लागल्या त्यांच्यामधील असणारी एनर्जी,त्यांच्यामधील असणारा उत्साह अचानक वाढू लागला.आणि त्या सैरावैरा इकडे तिकडे धावत जावू लागल्या,आणि उड्या मारू लागल्या त्या मेंढपाळाला काय समजेना कोणता तरी विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे काय तरी होते आहे का?असा त्याला प्रश्न पडला.पण याचे उत्तर थोडावेळ थांबल्या नंतर त्याला मिळाले.

असाच थोडा वेळ गेला.आणि नंतर त्यांचा तो उत्साह त्यांचे उड्या घेणे,थांबले,आणि त्या नेहमीप्रमाणे चरायला लागल्या.अशाप्रकारे दररोज ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना असंच व्हायचं उड्या मारणं सैरावैरा पळण्याचा प्रकार वारंवार बघितला आणि शेवटी त्याने निरीक्षण केलं आणि ते फळ खाऊन त्याने स्वतः खावून बघितलं,त्यानंतर त्यालासुद्धा ते फळ खाल्ल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटली.आणि इथे कॉफीचा शोध लागला.


अशाच एका दिवशी हरणाने सहज मोहाची फुले खाल्ली आणि ती झिंगायाला लागली.असं दोन-तीन वेळा झाल्यानंतर माणसांनी त्याचं निरीक्षण केलं.आणि ती फुल स्वतः खाऊन बघितली आणि त्यांनाही तसेच वाटलं आणि या फुलापासून उत्तेजना निर्माण होते,झिंगायला होतं याचा त्यांना शोध लागला.तर अशाच शोधांमध्ये प्राण्याचीही भूमिका महत्त्वाचे असते.


या प्राणी जीवांच्या संवेदना,भावना, बुद्धिमत्ता,प्रेम ह्या काही वेळा स्वतः ला बुद्धिमान समजणारा 'माणूस' ही समजू शकत नाही.


एका ठिकाणी पोल्ट्री फार्म होता.ही घटना साधारणतःत्यावेळची आहे ज्यावेळी कॅमेरे नव्हते.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंडी निर्मितीची प्रक्रिया चालायची.व ती अंडी योग्य ठिकाणी पोहोचवली जायची.यासाठी कर्मचारी वर्ग ही मोठा होता.बरेच दिवस सर्व काही सुरळीत चाललं होतं.आणि एक दिवस नोंद घेण्यासारखी घटना घडली.त्याचं झालं काय दिवसभरामध्ये जमलेली सर्व अंडी मोजून एकत्रितपणे क्रेटमध्ये व्यवस्थित लावली जायचीत.यासाठी विशिष्ट जबाबदार व्यक्ती होती.ती या सर्व गोष्टींची नोंद घेत असे.आदल्या दिवशी सायंकाळी मोजणी झाली.त्याची नोंदणी केली.दुसऱ्या दिवशी ती अंडी ठराविक ठिकाणी पोहोचवण्यापूर्वी आणखी एकदा खात्री करण्यात आली.तर त्यावेळी २०० अंडी कमी लागली.एक दोन अंड्यांचा फरक नव्हता.तर तो फरक होता तब्बल १०० ते २०० अंड्यांचा परत दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे काम सुरू झाले. ते सायंकाळी बंद झाले.अंड्यांची मोजणी व नोंदणी झाली.दुसऱ्या दिवशी सकाळी परत मोजली असता २०० अंडी कमी पडलीत.या प्रसंगाने संबंधित व्यक्तीला घाम फुटला.त्याला काहीच कळेना.त्यांने ही गंभीर घटना वरिष्ठांना सांगितली.त्यांनाही आश्चर्य वाटले.संशयाने सर्व लोकांची कसून तपासणी करण्यात आली. या सर्व नियमाची शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होत होती. पण तिकडेही दररोज २०० अंडी गायब होत होती. संपूर्ण रात्र पहारे ठेवण्यात आले.स्टोअरवरही 'निगराणी' ठेवण्यात आली.


इतके सगळे करूनही ठोस असे कोणतेच कारण सापडेना.सगळ्यांनी विचार केला पण काही सूचेना,ज्यावेळी आपण सर्व विचार करतो. आणि आपल्याला काही सुचत नाही.त्यावेळी आपण म्हणतो, 'की ही काहीतरी भुताटकीची भानगड आहे.भुताटकी आली कि पोटात भीतीचा गोळा आलाच.


मग एकदा रात्री एक धाडस करायचं ठरवलं स्टोअरची रात्री तपासणी करून निरीक्षण करायचे ठरले.मग रात्री उशिरा स्टोअरमध्ये जावून लाईट लावून पाहीले.सर्वकाही व्यवस्थित होते.


मग त्यांनी एक 'वेगळा' विचार केला.दुसर्‍या रात्री अंधारात या कारणाचा शोध घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला. त्यावेळी अंधारात त्यांनी जे पाहिलं. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


त्यांनी अंधारात पाहीलं होत.दोन उंदीर हळूच बिळातून बाहेर यायचे.ज्या ठिकाणी अंड्याचा क्रेठ ठेवला होता.तिथेपर्यंत दोन उंदीर जायचे दोन पायांनी अंडी उचलून तिथेच जवळ असणाऱ्या टेबलावर ठेवून पायाने अंडी खाली सोडून द्यायचेत.अंडे खाली पडल्यानंतर फुटू नयेत. म्हणून विशिष्ट प्रकारचे मॅट खाली अंथरलेले असल्याकारणाने ती अंडी फुटत नव्हती.खाली पडलेली अंडी दुसरे दोन उंदीर ढकलत पुढे घेवून जात.तिथून पुढे दुसरे उंदीर अशी एक संपूर्ण टीम ((टीमवर्क म्हणजे काय अंडी फुटू नये म्हणून केले जाणारे काम याचे निरीक्षण उंदरानी केलेले होते.)त्यामुळेच हे काम हुशारीने नियोजन पध्दतीने ती करत होती.


ही काम करण्याची पद्धत ज्याला आपण टीमवर्क म्हणतो.त्या टिमवर्कचे काम हे उंदीर दिवसभर बघत असायचेत. त्याच पद्धतीने त्यानी हे काम केले होते. ही त्यांची ही काम करण्याची पद्धत (टिमवर्क) बघून त्यांची बुद्धिमत्ता पाहून सर्व लोकांना हसू आवरता आले नाही.


मग सावकाशपणे त्यांच्या बिळांचा शोध घेतला. आणि त्या ठिकाणी उकरले असता त्यांच्या बिळामध्ये शेकडो अंडी होती. काही फुटलेली, काही खाल्लेली तर काही तशीच पडलेली. त्यांची ती बिळे त्यांनी मुजवून टाकलीत. व या प्रकरणावर पडदा पडला. ही होती उंदरांच्या बुद्धिमत्तेची गोष्ट..!


दुसरी सत्य घटना आहे कोथरूडमध्ये घडलेली. असंच एक कुटुंब ज्या कुटुंबातील सर्व लोकं नोकरीनिमित्त घराबाहेर जायचे.प्रत्येक घरात फ्रिज हा असतोच तसा यांच्याही घरी फ्रीज होता.आणि त्यांनी फ्रिजमध्ये वरच्या बाजूला अंड्याच्या ट्रेमध्ये अंडी ठेवलेली असायची आणि एक दिवस अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना विचार करायला भाग पडलं पाच सहा अंडी होती त्यातील एक दोन अंडी ही मोकळीच होती.( त्यातील पिवला बलक गायब होता.) त्यांना आश्चर्य वाटलं अंड्याला कुठेही तडा गेलेला नाही,अंड कुठेही फुटलेले नाही वरचं कवच तळ व्यवस्थित आहे,मग आतला बलक कुठे आहे?असे प्रकार वारंवार घडायला लागले. त्यांनी याचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी प्रयत्न केला पण उत्तर काय सापडेना ती नवीन अंडी आणून ठेवायचीत आणि दुसऱ्या दिवशी ती अंडी मोकळी असायचीत.आता गमंतीचा भाग सुरू होतो.एक दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरात होते. (मांजरीच्या हे लक्षात आले नाही.) आणि एक मांजर नेहमीप्रमाणेच तिथे आली तिने हळूच फ्रीजचा दरवाजा थोडाच उघडला आणि एका पायाने तो दरवाजा धरला आणि दुसऱ्या पायाच्या नखाने त्या अंड्यावर टक्क करुन एक लहान छिद्र पाडले आणि त्यातून बलग तिने ओढून घेतला.त्या मांजराने अभ्यासपूर्ण निरीक्षण केले होते,त्या घरातील लोकांची कामावर जाण्याची वेळ,फ्रीज कसा उघडतात तो कसा झाकतात कोणत्या ठिकाणी अंडे आहेत यातून तिने 'शिक्षण' घेतले होते.त्याचा न चुकता वापर करत होते.या प्रत्यक्ष बघितलेल्या घटनेमुळे त्यांना हायसे वाटले,या प्रश्नाचे अचूक उत्तरही सापडले आणि मांजरीच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यांना वाटले.


'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पॉडकास्ट वरून…


★ विजय कृष्णात गायकवाड.


२३/११/२२

■ मानवतेची आठवण करून देणारी माऊली..

आज दुपारी गरगरीत बासुंदी पुरीचं जेवण मनसोक्त तुडुंब करुन,दही बुत्ती खाऊन,मस्तपैकी लावून आणलेले पान तोंडामधे धरुन,हातामधे पुढारी घेऊन,बाहेरच्या खोलीत तक्क्याला टेकून निवांत बसलो होतो.


अंगणामधे बऱ्यापैकी ऊन पसरलेलं होतं... समोरच्या रस्त्यावर दुपारची शांतता पसरलेली... एखाद दुसरी गाडी किंवा रिक्षा ये जा करत होती..


समोरच्या घराच्या नारळाच्या झाडाच्या सावलीत एक भंगारवाला आपली हातगाडी लावून तिथेच हातगाडीवर फडक्याची पुरचुंडी सोडून भाकरी आणि कसली तरी भाजी खात होता... हातगाडीवर तेल,डालडा,पावडरीचे रिकामे डबे, बियरच्या रिकाम्या बाटल्या त्याने गोळा केलेल्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या...


आणखी एका घरासमोर एक बोहारीण बसलेली... समोर ती डबे-भांड्यांची टोपली ठेवलेली आणि शेजारी जुन्या कपड्यांचे गाठोडे ठेवलेले... डोक्यावरची चुंबळ तशीच डोक्यावर होती... थकली भागली जर्मनच्या तपेलीतले पाणी गळ्यातली गोटी खालीवर करत घटघट पीत होती... पदराने चेहेरा पुसत होती...


दुपारची गरम शांतता होती ती !


तेवढ्यात कानांवर आवाज आला... "जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी... "


जांभळं म्हटल्यावर ताड्कन् कॉटवरुन उठलो आणि अंगणात आलो... त्या मावशीला हांक मारली... आत बोलावले... अंगणात आली... ती दोघं होती... ती आणि तिचा नवरा ! त्याने डोक्यावरची जांभळाची पाटी जमिनीवर उतरवली आणि पाटीला बांधलेले कापड सोडले... आईशप्पथ... पाटीभर काळीभोर, टप्पोरी जांभळं ! प्युअर डायरेक्ट रानातून आलेली... दर विचारला...


मावशी म्हणाली ," १०० रु. किलो..."


आई आतून आली, "७५ ला किलो दे... तेवढ्यात मिळतायत... "


मावशी..."न्हाय ओ आज्जी... ७५ ला न्हाय मिळत आता आसली जांभळं... १०० चा दर हाय बघा... "


मी तिथेच बाजूला अंगणात सावलीत मांडी घालून बसलो होतो.हे संभाषण ऐकून मी मधे पडलो, "द्या मावशी एक किलो...  आणि दोन चार जांभळं उचलून खायला सुरुवात केली... तोवर आई घरामधे पातेलं आणायला गेली, आणि तेवढाच चान्स घेऊन मी मावशीच्या हातात १२५ रु. टेकवले आणि पट्कन तिला खुणावून लपवायला सांगितले.., तिने पण ते पट्कन लुगड्याच्या केळ्यात लपवले...


आई पातेलं घेऊन आली... ते तराजू मी हातात घेतला आणि अर्धा अर्धा किलोचे दोन वेळा वजन करुन एक किलो जांभळं वजन करुन पातेल्यात ओतली... मी अजून सहा सात जांभळं हातामधे घेतली आणि मस्तपैकी अंगणातच मांडी घालून खात बसलो.


आई पातेलं आत ठेवायला गेली तेवढ्यात मावशी म्हणाली, "दादा, वाईच दोन घास खाऊन घेतो इथं बाजूला सावलीत बसून !"


"बसा ओ मावशी... घ्या जेवण करुन निवांत !"


सैय्याला सांगून त्यांना छोट्या कळशीतून पाणी दिले... आईने दोन वाट्या बासुंदी आणि चार पाच पुऱ्या आणून दिल्या.


मावशीने तिची ती फडक्यात बांधलेले दुपारचे जेवण सोडले... मस्तपैकी तीन चार दशम्या दिसल्या मला... त्यात छानपैकी तेलात भिजवलेली लसणाची चटणी... तो तेलसर लाल रंग भाकरीच्या तलम पापुद्र्यावर पसरलेला... दुसऱ्या एका छोट्या डब्यातून तिने वांग्याची रस भाजी काढली... दोघांच्या मधे तिने ते कापड पसरले दोन भाकऱ्या नवऱ्याला आणि एक स्वतःसाठी घेतली... दोघांनीही काही सेकंद डोळे मिटून नमस्कार केला आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली... जेवण झालं... मावशींनी सगळं आवरलं... जिथे ते दोघे जेवले तिथल्या फरशीवर पाणी शिंपडून जागा स्वच्छ केली... पाण्याची कळशी विसळून दरवाज्यात ठेवली... बासुंदी पुरी दिलेला वाट्या आणि ताटली स्वच्छ करुन कळशीला टेकवून ठेवली आणी घटकाभर अंगणातल्या आंब्याच्या झाडाखाली तसेच बसून राहिले...


तिच्या नवऱ्याने चंची उघडली... अडकित्त्याने सुपारी कातरुन मला दिली आणि स्वतःही तोंडात टाकली... पाच सहा नागवेलीची पाने हातामधे घेऊन तळव्यावर पसरुन ठेवली... अंगठ्याची नखुली पानांच्या शिरांवर हळूवार फिरवत त्याने शिरा मऊ केल्या... केशरी चुना अंगठ्यावर घेऊन छानपैकी पानांवर लावला आणि पानाची घडी माझ्याकडे सरकवली... आपणही खाल्ली... वर काथाचे तुकडे दिले आणि नंतर छानपैकी काळी तंबाखू लयदार मळून चिमूटभर मला देऊन आपणही तोंडात डावीकडे बारीक गोळी ठेवली. मस्त समाधान उतरलं !


पाचदहा मिनीटानंतर ती दोघेही निघायला उठली... तिने आईला हांक दिली, "आज्जी... आमी जातोय हं !"


आईने आतून,"थांब गं जरा दोन मिंटं !" सांगून थांबायला सांगितले.


आई बाहेर आली. आईच्या हातामधे हळदकुंकवाचा करंडा आणि छोटा स्टीलचा डबा होता. आईने तिला हळद-कुंकू लावले,तिनेही आईला लावले आणि आईने हातातला स्टीलचा डबा तिला देत सांगितले, "यात बासुंदी आहे वाडीची ! संध्याकाळी घरी गेल्यावर तुझ्या मुलांना दे खायला  !"


ती नको नको म्हणत असताना आईने तो डबा तिच्या पाटीमधे ठेवला.


ती दोघेही पुढे आली आणि वाकून आईला नमस्कार केला... "माऊली... माऊली..." असं काहीसं पुटपुटले !


आई आतमधे गेली... ती दोघे माझ्याकडे आली, "दादांओ...!" म्हणत खाली वाकली माझ्या पायाला स्पर्श केला !


मी थोडा दचकलो... पट्कन् मी ही वाकून त्यांच्या पावलांना स्पर्श करत असताना नकळत पणे माझ्या तोंडातून बाहेर आले, "माऊली... माऊली !"


त्याने खिशात हात घालून छोटी कागदाची पुडी काढली, उघडली ! आत मधे बुक्का होता... चिमटीत बुक्का घेत त्याने माझ्या कपाळावर टेकवला आणि म्हणाला, "दादा, लै शिरीमंत हायसा बगा तुमी ! आवो,माऊली नांदतीया तुमच्या घरात... !" नंतर त्याने दरवाजाच्या उंबऱ्यावर डोकं टेकवले आणि मागे वळून पाटी उचलून मावशीच्या डोक्यावर ठेवली,पिशवी हातामधे घेतली... आणि गेट उघडून दोघेही मला पाठमोरे होऊन लांब लांब जायला लागले... वाऱ्यावर विरत जाणारा मावशींचा आवाज येत होता कानांवर...


"जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी..


लेखक - अनामिक


कोल्हापूरचे आमचे मित्र विनायक पाटील यांनी ही कथा मला पाठवून जतन करायला सांगितली.