मी दुसऱ्या प्रकरणात झाडांच्या भाषेबद्दल बोललो आहे. आपल्याला त्रासदायक कीटकांच्या भक्षकांना झाडं गंधाचा वापर करून आमंत्रण देतात.पण बर्ड चेरीचे झाड याहीपेक्षा एक वेगळा डावपेच वापरतं.
त्यांच्या पानात मकरंदाचे इंद्रिय असतात,
ज्यातून फुलांसारखे गोड द्रव्य ते सोडतात.बहतांश उन्हाळा झाडात घालवणाऱ्या मुंग्यासाठी हे द्रव्य असते.माणसांप्रमाणे त्यांनासुद्धा कधीकधी गोड खाऊपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं.आणि त्यांची ही भूक सुरवंट भागवतात.
ते करताना मुंग्या बर्ड चेरीच्या झाडाला सुरवंटांपासून मुक्त करतात.पण दर वेळेस झाडाला ईप्सित असतं तेच होतं असं नाही.सुरवंट तर फस्त होतात,पण त्यांना गोड द्रव्य कमी पडलं तर मात्र मुंग्या अफिड खायला सुरुवात करतात.मगाशी म्हटल्याप्रमाणे हे कीटक पानांमधून द्रव्य काढत असतात.मुंग्या आपल्या संवेदनाग्राने त्यांना गोंजारून जास्त द्रव्य बाहेर काढू लागतात.बार्क बीटल कीटक झाडांना धोकादायक असतो.तो अशक्त झाड शोधून काढून पोखरायला सुरुवात करतो. 'सर्वच घेईन किंवा काहीच नाही' या तत्त्वाने जाणारा हा कीटक आहे. हा एक कीटक झाडावर यशस्वीरीत्या आक्रमण करतो आणि मग आपल्या इतर बांधवांना गंधाने आमंत्रण देतो किंवा असंही होऊ शकतं की झाड त्या एका कीटकाला मारून टाकतं आणि इतरांपर्यंत संदेश पोचत नाही. झाडातल्या कॅम्बियम मिळवण्याकडे त्यांचं लक्ष असतं.साल आणि लाकडाच्यामध्ये कॅम्बियमचा फरक असतो.इथं झाडाची वाढ होते कारण याच्या आतल्या बाजूला लाकडाच्या पेशी तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला सालाच्या पेशी.
कॅम्बियममध्ये साखर आणि खनिजे भरलेली असतात.आपत्कालीन परिस्थितीत आपल्यालाही हे खाता येते. वसंत ऋतूमध्ये तुम्ही याचा प्रयोग करू शकता. वादळामध्ये पडलेल्या एखाद्या स्प्रूस झाडाचे साल चाकूने फाडा.नंतर उघड्या पडलेल्या खोडाच्या लांब पट्टया कापा.कॅम्बियमची चव राळ असलेल्या गाजरासारखी असते.यात भरपूर पोषण असते.बार्क बीटलना म्हणूनच हे आवडते आणि झाडाच्या सालामध्ये बोगदा करून ते आपली अंडी याच्याजवळच घालतात.इथून अळ्या बाहेर पडल्या की त्यांना भक्षकांपासून संरक्षण मिळते आणि भरपूर पोषणही. बार्क बीटलपासून बचाव करण्यासाठी स्प्रूस टरपीन आणि फेनॉल तयार करते.याने बार्क बीटल मरतात.हे अपयशी ठरले तर झाड चिकट राळ बाहेर काढून त्यांना त्यात अडकवते.पण स्वीडनमधील काही संशोधकांना असे दिसले आहे की,हे बीटल अशा डावपेचांपासून स्वतःचा बचाव करून घेतात.आणि पुन्हा एकदा बुरशी मदतीला धावून येते.बीटलच्या शरीरावर बुरशी उगवते आणि भोक पाडत असताना बुरशी सालावर जाऊन इथे पोचून ते स्प्रूसचे रासायनिक बचावाचे निष्क्रिय पदार्थात रूपांतर करून निकामी करते.सालात भोक पाडण्याच्या बीटलच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बुरशी वाढते आणि बीटलपेक्षा एक पाऊल पुढे असते.म्हणजे बारके बीटल जिथे जातील त्याच्या आधीच पूर्ण क्षेत्र सुरक्षित झालेले असते.आता त्यांची संख्या वाढण्यास कोणतीच बाधा येत नाही आणि काही काळातच हजारो अळ्या बाहेर पडतात व सशक्त झाडेही कमकुवत होतात.पण ही गोष्ट प्रत्येक वृक्षाला सहन होते,असं नाही.मोठी शाकाहारी जनावरं मात्र एवढं कौशल्य दाखवत नाहीत.त्यांना दिवसाकाठी भरपूर अन्न खावं लागतं,
पण खोल जंगलात अन्न मिळणं सोपं नसतं.इथे सूर्यप्रकाश नसल्यामुळे तळाला फारशी हिरवाई नसते आणि लज्जतदार पालवी उंच असल्यामुळे तिथंपर्यंत ते पोचू शकत नाही.आणि त्यामुळे सर्वसाधारण अशा परिसंस्थेत हरणे कमी असतात.एखादं मोठं झाड वठलं की मगच त्यांना संधी मिळते.असं होताच सूर्यप्रकाश इथं पोचतो आणि थोड्या काळासाठी तरी जंगली झुडपं आणि गवत वाढू लागते.अशा क्षेत्रात जनावरं धावून येतात.इथं मोठ्या प्रमाणात चराई होते आणि नवीन रोपटी वाढू शकत नाहीत.सूर्यप्रकाश म्हणजे साखर,आणि त्यामुळे चराई करणाऱ्या प्राण्यांना तरुण झाडं आकर्षित करतात.
खोल जंगलाच्या अंधारात नवीन कोंबांना सूर्यप्रकाश मिळत नाही.त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जे अन्न लागतं ते त्यांच्या पालकांकडून मुळांच्याद्वारे दिले जाते.
साखरेपासून वंचित राहिलेले कोंब कणखर आणि कडवट बनतात आणि म्हणून हरण त्यांच्यावर चराई करत नाहीत.पण सूर्यप्रकाश मिळताच नवीन कोंब फुटू लागतात.प्रकाश संश्लेषण सुरू होते आणि त्यांची पालवी जाड व रसरशीत होऊ लागते.
कोंबांमध्ये भरपूर पोषण भरते आणि त्या छोट्या रोपांवर भरभरून कळ्या फुटतात.हे असेच अपेक्षित आहे,कारण पुढच्या पिढीला लवकरात लवकर उंची गाठून तो सूर्यप्रकाश पुन्हा बंद करायचा असतो.पण या सगळ्यांमध्ये हरणांचं लक्ष वेधलं जातं आणि असा लज्जतदार खाऊ त्यांना सोडता येत नाही.पुढील काही वर्ष हरणं आणि रोपटी यांच्यात अशीच स्पर्धा चालू राहील.हरणाचं तोंड आपल्या मुख्य खोडापर्यंत पोचू शकणार नाही इतकी उंची ते छोटे बीच,ओक आणि फरची रोपटी झटपट गाठू शकतील का?
सर्वसाधारणपणे हरणं सगळी झुडपं फस्त करत नाहीत.त्यामुळे काही रोपटी शिल्लक राहतात आणि त्यांची वाढ आकाशाकडे सुरू होते.ज्या रोपट्यांचे मुख्य खोड खाऊन टाकलेले असते ते मात्र वाकलेलेच वाढते.स्पर्धेत मागे पडली जातात आणि कालांतराने खूप इजा झालेली रोपटी सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे मरून जातात आणि पुन्हा मातीत जैविक माल म्हणून मिसळतात.याबाबतीत हनी फंगस बुरशीचे फळ म्हणजे छत्री,ही आपल्या आकाराच्या मानाने खूपच धोकादायक आहे. याच्या छत्र्या यूरोप आणि उत्तर अमेरिकेत वठून पडलेल्या झाडावर उगवलेल्या दिसतात.मध्य युरोपमध्ये याच्या सात प्रजाती आहेत पण सर्व प्रजाती झाडांना त्रासदायक असतात.ते मायसिलीयम,म्हणजे त्यांच्या तंतूच्या जाळ्याने फर,बीच आणि ओक वृक्षांच्या मुळात शिरतात.तिथून त्या खोड आणि सालीमध्ये शिरतात आणि आपल्या छत्र्या बाहेर काढतात.कॅम्बियम मधून ते मुख्यतः साखर आणि पोषणद्रव्ये आपल्या जाड काळ्या धाग्यासारख्या अवयवातून घेतात.बुटाच्या लेस सारखे दिसणारे हे अवयव बुरशीच्या जगात वैशिष्ट्यपूर्ण आहेत.पण हनी फंगस फक्त साखरेवर थांबत नाही. त्याची जशी वाढ होते तसे लाकूडही खाल्ले जाते आणि झाड कुजायला सुरुवात होते.कालांतराने ते झाड मरून जाते.ब्लूबेरी आणि हेदर या बुटक्या रानटी झाडांच्या कुळातील पाईनसॅप नावाची वनस्पती जास्त सूक्ष्मपणे कार्यरत असते.या वनस्पतीला एक साधं दिसणारं फिक्कट तपकिरी फूल असतं,तिच्यामध्ये हिरवं रंगद्रव्य नसतं.ज्या वनस्पतीत हिरवा रंग नाही त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही आणि प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमताही नाही.म्हणजे पाईनसॅप ही वनस्पती अन्नासाठी पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असते.झाडांच्या मुळांना मदत करणाऱ्या 'मायकोरायझल' या झाड आणि बुरशी यांमधल्या सहजीवी जाळ्याबरोबर ती स्वतःला धूर्तपणे जोडून घेते.आणि प्रकाशसंश्लेषण करत नसल्यामुळे जंगलातल्या स्प्रूसच्या खूप अंधारी भागातही वाढू शकते.बुरशी आणि झाडाच्या मुळांमधून ती स्वतःसाठी पोषणद्रव्ये शोषून घेत राहते. 'स्मॉल काऊ व्हीट' सुद्धा पाईनसॅप सारखेच करते,पण जरा पवित्रपणाचे ढोंग आणून.यालासुद्धा स्प्रूस आवडतं आणि मुळांपाशी असणाऱ्या बुरशी मुळांमधल्या जाळ्यात ते शिरतं. आमंत्रण नसलेल्या पाहुण्यासारखे तिथे पोचून ताव मारतं.या वनस्पतीचे जमिनीवरचे अवयव साध्या पानांसारखे हिरवे असतात आणि थोडंफार प्रकाशसंश्लेषण करून साखर बनवू शकतात.पण फार थोडं अन्न ते बनवतात आणि जवळजवळ पूर्णपणे अन्नासाठी दुसऱ्यांवरच अवलंबून राहतात.ही थोडी हिरवी पानं ही जंगलाला फसवण्यासाठी केलेलं ढोंग असतं,बरं का!जीवसृष्टीला झाडांकडून फक्त खाद्य नाही तर बरंच काही मिळतं.जनावरांकडून छोट्या झाडांचा वापर अंग खाजवण्यासाठी केला जातो.
उदाहरणार्थ,नर हरणांना दरवर्षी त्यांच्या शिंगावर येणारे वेलवेटसारखे कातडे काढून टाकावे लागते.
यासाठी ते एक छोटे लवचीक पण धडधाकट झाड शोधतात.पुढले अनेक दिवस जोपर्यंत सर्व कातडं निघून जात नाही तोपर्यंत ते आपले शिंग झाडाला घासत बसतात. यानंतर त्या झाडाची साल इतकी खराब होते की,बहुतेकदा झाड मरून जातं.
जंगलामध्ये जे काही वेगळे किंवा वैशिष्टपूर्ण असेल, नेमकी तीच झाडं हरणांना पसंत पडतात.मग ते स्प्रूस, बीच,पाईन असो किंवा ओक,असे का कोणास ठाऊक? कदाचित तुकडे पडून गेलेल्या सालाचा सुवास त्यांना धुंद करणारा वाटत असेल.माणसांचेही काही वेगळे नाही.आपल्यालाही दुर्मिळ गोष्टीच साठवून ठेवायच्या असतात.
पण जर झाडाच्या खोडाचा व्यास चार इंचाहून अधिक असला तरच त्या उतावळ्या हरणांचा त्रास झाडांना सहन करता येतो.त्यांचं खोड मजबूत आणि स्थिर झालेलं असतं,त्यामुळे हरणांच्या शिंग घासण्याने ते वाकत नाही.पण आता हरणांना याहून काही वेगळं हवं असतं.सर्वसाधारणपणे हरणं जंगलात चराईला येत नाहीत कारण त्यांना गवत पसंत असते.हरणांच्या कळपाला लागेल इतकं गवत काही जंगलात मिळत नाही.म्हणूनच हरिण उजाड माळरान पसंत करतं.
नदीच्या खोऱ्यात मैदानात भरपूर गवत वाढतं,पण अशा खोऱ्यातून माणसांचं वास्तव्य असतं.इथे प्रत्येक चौरस यार्ड घरासाठी किंवा शेतीसाठी वापरला जातो. आणि म्हणूनच दिवसा हरणं जंगलात जातात आणि रात्री हळूच बाहेर पडतात.शाकाहारी जीव असल्यामुळे त्यांना आपल्या अन्नातून तंतूंची जरूर असते आणि म्हणूनच काही मिळाले नाही की त्यांच्याकडून झाडाची सालं खाल्ली जातात.
उन्हाळ्यात जेव्हा झाडामध्ये भरपूर पाणी असते तेव्हा त्याचं साल सोलून खाणं तसं सोपं असतं.फक्त खालच्या जबड्यात असलेले पुढचे कापणारे दात वापरून ते झाडावरून पट्ट्या काढू शकतात.
हिवाळ्यात जेव्हा झाडं वामकुक्षी करतात आणि साल कोरडं असतं तेव्हा हरणं फक्त त्याचे काही तुकडे काढू शकतात. आणि झाडाला हे त्रासदायक तर असतंच पण त्यांच्या जीवाला धोका ही पोचतो. या उघड्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात बुरशी आत शिरते आणि झाडाला झालेली जखम भरून काढता येत नाही. जर हे झाड एखाद्या दाट जंगलात शांतपणे वाढत असलं तर त्याला हा आघात पचवता येतो. त्यांच्या खोडाची घडण सूक्ष्म वळ्यांपासून झालेली असल्यामुळे लाकडाची घनता जास्त असते आणि कणखर असते. यामुळे बुरशीला आत शिरणे सोपे नसते.मी अशी झाडं पाहिली आहेत.त्यांना एखादं दशक लागतं,पण ते अशा जखमा भरून काढतात.
पण आमच्या व्यावसायिक लागवडीच्या जंगलात मात्र असं होत नाही.इथं त्यांची वाढ झपाट्याने होते आणि खोडातली वळी मोठी असतात.म्हणून लाकडामध्ये भरपूर हवा असते.हवा आणि आर्द्रता एकत्र आली की बुरशींची मजा आणि मग जखम झालेली झाडं कालांतराने मोडतात.जखमा जर छोट्या असतील तर मात्र त्या बुजवणं झाडांना शक्य होतं.
समाप्त…