* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/१/२३

आपणच वाट आणि आपणच वाटसरू अशी माणसाची अवस्था होती.

१.१ प्राचीन जग आणि भारतातलं आयुर्वेद..


बायॉलॉजी म्हणजेच जीवशास्त्र ही विज्ञानाची शाखा सजीवांचा अभ्यास करते. खरं तर ज्या क्षणी माणसाला आपल्या आजूबाजूचे दगड, माती,नद्या,समुद्र आणि पाणी या निर्जीव गोष्टी आणि हालचाल करणारे प्राणी,पक्षी,

वाढणाऱ्या वनस्पती आणि आपण स्वतः या सजीव गोष्टींमध्ये असलेल्या फरकाची जाणीव झाली, त्या क्षणी बायॉलॉजीचा जन्म झाला! 


अर्थात,हा काळ तसा फारच जुना म्हणावा लागेल.पण माणसाच्या मनात कायमच आपल्या भोवतालच्या गोष्टींबद्दल कुतूहल होतं,त्यामुळेच माणूस जीवनाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रगती करू शकला.


अश्मयुगातला माणूस जेव्हा स्वतःच उत्क्रांत होत होता,जंगली अवस्थेत होता,तेव्हा तो झाडाला लागलेली,जमिनीवर पडलेली किंवा पक्ष्यांनी प्राण्यांनी खाऊन उष्टी केलेली फळं-कंदमुळं,

बेरी,लहान किडे वेचून खायचा किंवा शिकार करून प्राणी आणि पक्षी यांना मारून खायचा.कोणती फळं चांगली लागतात,कोणती विषारी आहेत,कोणत्या प्राण्याची शिकार कशी करावी या गोष्टींचं ज्ञान तो तेव्हापासून आपल्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करत राहिला.हेही खरं तर जीवशास्त्राचंच ज्ञान होतं.पण ते ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं घेतलं नव्हतं तर ते आपल्या उपयोगासाठी घेतलं होतं.गंमत म्हणजे आपण कोणत्याही विज्ञान शाखेचा इतिहास पाहिला तर त्यात माणसानं आधी उपयोगाकरता ज्ञान मिळवलं आणि नंतर त्यातल्या पायाभूत विज्ञानाचा शोध घेतला! म्हणजेच आधी चक्क अप्लाइड सायन्स आलं आणि नंतर फंडामेंटल सायन्स आलं!


बायॉलॉजीच्या बाबतीतही हेच झालं.सुरुवातीला माणसानं आपल्या भोवतीच्या वनस्पती आणि प्राणी यांचे उपयोग शोधले आणि नंतर त्यांच्याबद्दलचा अभ्यास केला.त्यामुळेच आधी वैद्यकशास्त्र,

औषधनिर्माणशास्त्र,आयुर्वेद,शेती आणि पशुपालन या गोष्टी आल्या आणि त्यानंतर वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र आले.


गंमत म्हणजे ज्या गोष्टी आज आपण विज्ञानात समाविष्ट करतो,त्या गोष्टींना पूर्वीच्या काळी विज्ञान म्हणतच नव्हते! माणसाच्या इतिहासातली अनेक शतकं बायॉलॉजीला विज्ञानाचा दर्जा नव्हता.बायॉलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या विज्ञान शाखेचा अभ्यास खरं तर ख्रिस्तपूर्व काही हजार वर्षांपासून सुरू झाला होता.त्यात भारतातलं आयुर्वेद आणि ग्रीसमधलं नॅचरल सायन्स आघाडीवर होतं.पण बायॉलॉजी या शब्दाचा उगम व्हायला मात्र अठरावं शतक उजाडावं लागलं.त्याआधी बायॉलॉजीला नॅचरल हिस्ट्री,नॅचरल फिलॉसॉफी,नॅचरल थिऑलॉजी अशी अनेक नावं होती.


बायॉलॉजी हा शब्द सगळ्यात आधी..


फ्रेंच बायॉलॉजिस्ट जीन बाप्टिस्ट पिअरे अँटोनी दे मोनेत दे लॅमार्क Jean-Baptiste Pierre Antoine de Monet de Lamarck 


यानं अठराव्या शतकात वापरला.हा शब्द बायॉस म्हणजे सजीव आणि लॉगॉस म्हणजे अभ्यास या दोन ग्रीक शब्दांच्या जोडणीतून (संधीतून) आलेला आहे. 


लॅमार्कनंच आपल्या पुस्तकात पहिल्यांदा व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स यांच्यातला फरक दाखवून दिला.त्यानंतर मात्र १७९९ मध्ये थॉमस बेडॉस (Thomas Beddoes) यानं,१८०० मध्ये कार्ल फ्रेडरिक बर्दाच (Karl Friedrich Burdach)आणि मायकेल ख्रिस्तोफ हॅनोज़ (Michael Christoph Hanow's) यानं १७६६ मध्ये या तिघांनी हा शब्द - स्वतंत्रपणे आपापल्या पुस्तकांमध्ये वापरल्याचे उल्लेख आहेत.यानंतर मात्र सजीवांच्या अभ्यासासाठी सगळीकडेच 'बायॉलॉजी' हा शब्द वापरात यायला लागला.यानंतर बॉटनी आणि झूऑलॉजी या बायॉलॉजीच्या दोन महत्त्वाच्या शाखा मानल्या जायला लागल्या.


 एखादा रोग भूतपिशाच बाधा झाल्यानं होतो आणि देवाची उपासना केल्यावर बरा होतो ही अंधश्रद्धा दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीपासून जगात सगळीकडेच कित्येक शतकं कायम होती. 


त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही गोष्टीचं कार्य-कारण-भाव समजण्यासाठी माणसानं वैज्ञानिक दृष्टिकोनानं बघण्याआधी सगळ्याच गोष्टींकडे धार्मिक आणि अंधश्रद्धेच्या चश्म्यातून पाहिलं होतं.चश्मा कसला झापडंच ती विज्ञानानं ही झापडे काढून टाकून माणसाला कारणमीमांसेची स्वच्छ दृष्टी दिली.


त्या काळी विज्ञानाचा अभ्यास करणंही तितकं सोपं नव्हतं.विज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे काय शोधायचं आणि कसं शोधायचं हेही माणसालाच ठरवावं लागणार होतं.

आपणच वाट आणि आपणच वाटसरू 

अशी माणसाची अवस्था होती. 


त्या काळी मग माणूस वेगवेगळे जिवंत प्राणी, खाटकाच्या दुकानातले कत्तल केलेले मृत प्राणी किंवा धार्मिक स्थळी बळी दिलेल्या प्राण्यांचं निरीक्षण करायचा.अर्थात,अशी निरीक्षणंही पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी केलेली नव्हती तर यातून आपल्याला त्या प्राण्याचा जास्त उपयोग कसा होईल आणि ते ज्ञान आपण आपल्या पुढच्या पिढीला कसं देऊ शकू या विचारांनीच केलेलं होतं.गंमत म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक देशांमधले अँनॅटॉमिस्ट हे चक्क एखाद्या मेंढयाची कत्तल करून त्याच्या यकृताच्या आकारावरून त्या देशाच्या राजाचं आणि देशाचं भविष्य सांगणारे ज्योतिषी होते! शिवाय,अनेक देशांमध्ये सूर्याला प्राण्याचं किंवा चक माणसाचं हृदय अर्पण केल्यानं आपलं भलं होतं अशा प्रकारच्या अंधश्रद्धाही होत्याच.त्यातून अनेक देशांमध्ये युद्धं व्हायची तेव्हा माणसं मरायची,त्यांचे अवयव तुटायचे.अशा माणसांना मग त्या त्या काळचे वैद्य,हकीम किंवा डॉक्टर्स त्या वेळच्या ज्ञानानुसार उपचार करायचे.गंमत म्हणजे पिढ्यान् पिढ्या चालणाऱ्या अशा गोष्टींतूनच माणसाकडे आपल्या शरीरात कोणते अवयव असतात याची बरीचशी जमा होत गेली.उपयुक्त माहिती जमा होत गेली.


सदरची वाचणीय व ज्ञानात वाढ करणारी ही वैज्ञानिक माहिती सजीव या पुस्तकातील आहे.लेखक -अच्युत गोडबोले अमृता देशपांडे,प्रकाशक-मधुश्री पब्लिकेशन


आजपासून जवळपास ३००० वर्षापूर्वीची मृत शरीरं जपून ठेवण्याची इजिप्शियनांची कला पाहिली की थक्क व्हायला होतं.माणसाच्या शरीराचं सखोल ज्ञान असल्याशिवाय मृत शरीराची ममी तयार करणं शक्यच नव्हतं.काही ममीज तर इतक्या व्यवस्थित आहेत,की आजही आपण अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली ती व्यक्ती कशी दिसत असावी याची स्पष्ट कल्पना करू शकतो! मृत शरीराची ममी बनवण्याचा हा कार्यक्रम तब्बल ७० दिवस चालायचा!आधी मृत शरीरातले काही अवयव आणि शरीरातलं जवळपास सगळं पाणी काढून टाकून नंतर त्या शरीरात मसाले भरून ते शरीर पुन्हा बंद केलं जायचं.यातूनच कोरडं असलेलं शरीर कुजत नाही हे माणूस त्याच वेळी शिकला होता..


बॅबिलॉनच्या काळात ख्रिस्तपूर्व १९२० मध्ये मेसोपोटेमियातल्या दगडांत कोरलेल्या हमुराबी कोडमध्येही वैद्यकशास्त्राबद्दल लिहिलेलं आढळून येतं.यातून त्या लोकांकडे मागच्या अनेक पिढ्यांतून माणसाच्या शरीराच्या निरीक्षणांतून चालत आलेलं उपयुक्त ज्ञान होतं असं लक्षात येतं.


विशेष म्हणजे या ज्ञानाची उपासना सगळ्यात आधी आपल्या भारतात सुरू झाली,ज्या वेळी इतर सगळ्या जगात विज्ञान तर सोडाच,पण वैज्ञानिक दृष्टिकोनही विकसित व्हायला अजून काही शतकं लागणार होती,त्यावेळी भारतात अनेक ज्ञान शाखा विज्ञानाच्या पायावर अढळपणे उभ्या होत्या.भारतात खूप पूर्वीपासूनच विज्ञानाची आणि गणिताची खूपच मोठी परंपरा होती.


ख्रिस्तपूर्व २८०० ते २५००च्या काळात

प्रचंड भरभराटीला आलेली मोहेंजोदडोची संस्कृती,तिथली सुनियोजित शहरं,तिथलं इंजिनिअरिंग,धातुकाम,वजन आणि औषधं हे सगळं थक्कच करणारं होतं.रावळपिंडीपासून ३२ किमी पश्चिमेला असलेल्या पेशावरजवळ ख्रिस्तपूर्व ११ व्या शतकात स्थापन झालेलं तक्षशिला विद्यापीठ,

त्यातला व्याकरणतज्ज्ञ पाणिनी,ख्रिस्तपूर्व ८ व्या शतकातला आयुर्वेदाचार्य अमेय,ख्रिस्तपूर्व ४ थ्या शतकातला तिथलाच अर्थतज्ज्ञ कौटिल्य,ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून ते इ.स. ७०० पर्यंत चाललेलं नालंदा विद्यापीठ हे पाहून आपण चाटच पडतो. पाचव्या शतकातले आर्यभट्ट आणि वराहमिहीर, ७ व्या शतकातला ब्रह्मगुप्त,त्याच सुमारास भारतानं जगाला दिलेली शून्य (0) ची भेट आणि त्यानंतर झालेले महावीर (इ.स. ८५०),मंजुला (इ.स. ९३२),

श्रीपती (इ.स. १०२०) आणि भास्कराचार्य इ.स. (१११४) हे फार महान गणितज्ञ भारतात होऊन गेले आहेत.


याशिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांवर आणि ज्ञानप्रवाहांवर जाहीर चर्चा व्हायच्या. अनेक राजांच्या दरबारात अशी हुशार मंडळी वादचर्चेसाठी लोकप्रिय असायची.इतर प्रांतातली हुशार मंडळीही या वादचर्चेसाठी मुद्दाम आदरानं बोलावली जायची आणि त्यांच्यात वादचर्चा व्हायच्या.त्यातून सगळ्यांनाच नव्यानं शोध लागलेलं ज्ञान (आजच्या भाषेत 'कटिंग एज' नॉलेज) मिळत होतं.या सगळ्या विज्ञानवादावर आणि वादचर्चेबद्दल चार्वाक आणि लोकायत यांच्या तत्त्वज्ञानाच्या लिखाणातून आपल्याला कळतं.


नोबेल पारितोषिक मिळवलेले भारताचे सुपुत्र अमर्त्य सेन यांनी आपल्या 'द अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' या पुस्तकात अतिशय रंजकपणे हे मांडलंय.त्यात त्यांनी पूर्वीच्या काळी भारतात संस्कृती,वेगवेगळ्या ज्ञानशाखा,समाजशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र यांच्याबद्दलच्या वादचर्चा कशा चालायच्या हे रसाळपणे लिहिलंय.


क्रमशः

९/१/२३

सर्वांना समजून घेण्याचा अर्थ आहे. सर्वांना क्षमा करणे.'

" ऐक बेटा! मला तुला काही सांगायचंय.तू गाढ झोपेत आहेस.तुझा इवलासा हात तुझ्या सुकुमार गालाखाली दबलाय आणि तुझ्या घामाने भरलेल्या कपाळावर कुरळे केस विखुरले आहेत.मी तुझ्या खोलीत गुपचुप शिरलो आहे एकटाच,नुकताच मी जेव्हा लायब्ररीत वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा मला खूप पश्चात्ताप झाला.म्हणूनच मी अर्ध्या रात्री तुझ्याजवळ उभा आहे,एखाद्या अपराध्यासारखा!


ज्या गोष्टींबद्दल मी विचार करीत होतो त्या अशा आहेत बेटा.मी आज तुझ्यावर खूप रागावलो. जेव्हा तू शाळेत जायला तयार होत होतास तेव्हा मी तुझ्यावर खूप चिडलो.तू टॉवेलऐवजी पडद्याला हात पुसले होतेस.तुझे जोडे घाणेरडे होते,यावरूनसुध्दा मी तुला रागावलो.तू जमिनीवर इकडे तिकडे पसारा करून ठेवला होतास,त्यावरूनसुध्दा मी तुला खूप वेडंवाकडं बोललो.


नाश्ता करताना मी तुझ्या एका मागोमाग एक चुका दाखवत गेलो.तू टेबलावर खाणं सोडून दिले होतेस.खाताना तू मचमच आवाज करीत होतास.टेबलावर तू हाताची कोपरं टेकवली होतीस.तू ब्रेडवर खूप सारे लोणी चोपडले होतेस.एवढेच नव्हे,तर मी ऑफिसमध्ये जात होतो आणि तू खेळायला जात होतास तेव्हा तू वळून हात हलवून "बाय बाय,डॅडी "

म्हणाला होतास अन् मी भुवया उडवून तुला टोकले होते,'तुझी कॉलर नीट कर.


संध्याकाळीदेखील मी हेच सगळे केले. ऑफिसातून परतल्यावर तू मातीत मित्रांबरोबर खेळत होतास हे मी पाहिले.तुझे कपडे मळलेले होते,तुझ्या मोज्यांना भोके पडली होती.मी तुला पकडून घेऊन गेलो आणि तुझ्या मित्रांसमोर 'मोजे महाग आहेत.जेव्हा तुला विकत घ्यावे लागतील तेव्हा तुला त्याची किंमत कळेल'असं म्हणून तुला अपमानित केले.जरा विचार करा, एक बाप आपल्या मुलाचे मन यापेक्षा अधिक कसे दुखावू शकेल ?


तुला आठवतेय का,जेव्हा मी लायब्ररीत वाचन करत होतो तेव्हा तू माझ्या खोलीत रात्री आला होतास,एखाद्या घाबरलेल्या हरणाच्या पाडसासारखा,तुला किती दुःख झाले आहे हे तुझ्या डोळ्यांवरून कळून येते होते आणि मी वर्तमानपत्रावरून तुझ्याकडे बघत माझ्या वाचनात व्यत्यय आणल्याबद्दल आता काय हवंय,कधी तरी आरामात बसू दे मला!' असं म्हणत तुला झिडकारुन टाकले होते.त्या वेळी तू दारातच थबकला होतास.


तू काहीही न बोलता,फक्त लाडात येऊन माझ्या गळ्यात हात घालून माझे चुंबन घेऊन "गुड नाइट" म्हणून निघून गेला होतास.


तुझ्या छोट्या छोट्या हातांच्या मिठीवरून असे कळून येत होते की तुझ्या अंत:करणात ईश्वराने प्रेमाचे असे फूल लावले आहे जे इतक्या उपेक्षेनंतरही मरगळले नाही... मग तू जिन्यावर खट-खट आवाज करीत निघून गेलास.


तर बेटा,या घटनेनंतर थोड्याच वेळाने माझ्या हातून वर्तमानपत्र गळून पडले आणि मला खूपच हताश वाटू लागले.हे मला काय होत आहे? दोष काढण्याची,धाकदपटशा दाखवण्याची सवय होत चालली होती मला,आपल्या मुलाच्या बालिश चुकांचे हे बक्षीस मी त्याला देत होतो.असं नाही 


बेटा,की मी तुझ्यावर प्रेम करीत नाही,पण मी एका लहान मुलाकडून आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा करत होतो.मी तुझं वागणं आपल्या वयाच्या तराजूनं तोलून बघत होतो.


तू इतका लोभस आहेस,इतका चांगला आणि 


खरंच,तुझे छोटेसे हृदय इतके विशाल आहे जशी की पर्वतांच्या मागून उगवणारी पहाटच! 


तुझी महानता यावरूनच दिसून येते की दिवसभर वडिलांकडून बोलणी खाऊनही त्यांना रात्री गुड नाइट किस द्यायला तू आलास. आजच्या रात्री इतर काहीच महत्त्वाचे नाही बेटा. मी या अंधारात तुझ्या उशाशी आलोय आणि इथे गुडघे टेकून शरमिंदा होऊन बसलोय.


हा एक कमकुवत पश्चात्ताप आहे.मला माहीत आहे की जर मी तुला जागं करून हे सगळं सांगितलं तर कदाचित तुला हे काहीच समजणार नाही.पण उद्यापासून मी नक्कीच तुझा लाडका बाबा बनून दाखवेन.मी तुझ्याबरोबर खेळेन,तुझ्या मजेदार गोष्टी मन लावून ऐकेन,तुझ्यासह खळखळून हसेन आणि तुझ्या दुःखात सहभागी होईन.यापुढे जेव्हा कधी मी तुला रागवायला तोंड उघडेन,त्याआधीच मी माझी जीभ दातांखाली दाबून धरेन.मी एखाद्या मंत्रासारखं असं वारंवार म्हणेन, "तो तर अगदी छोटासा आहे... छोटासा मुलगा !"


मला याचे दुःख होते की मी तुला मुलगा नव्हे तर मोठा माणूस समजलो होतो.पण आज जेव्हा मी तुला पाय पोटाशी घेऊन झोपलेला,थकलेला पाहतोय तेव्हा बेटा,मला असं वाटत आहे की तू अजून छोटाच तर आहेस! कालपर्यंत तू आपल्या आईच्या कुशीत होतास,तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होतास.मी तुझ्याकडून किती अवास्तव अपेक्षा केली होती,किती तरी जास्त !


लोकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा.आम्ही हे शोधून काढायला हवे की ते जे काही करतात ते का बरे करतात.हे टीका करण्यापेक्षा अधिक रोचक आणि लाभदायक होईल.एवढेच नव्हे,तर त्यामुळे सहानुभूती,सहनशक्ती आणि दयाळूपणाचे वातावरण निर्माण होईल.सर्वांना

समजून घेण्याचा अर्थ आहे सर्वांना क्षमा करणे.'


डॉ.जॉन्सननी म्हटलंय,

"ईश्वर स्वतःमानवाच्या मृत्यूआधी त्याचा निर्णय घेत नाही." 

तर मग तुम्ही आणि मी असे करणारे कोण ?"

फादर फरगेट्स

(प्रत्येक पित्याने हे लक्षात ठेवावे) - 

डब्लू.लिव्हिंगस्टोन लार्नेड


मंजुल पब्लिशिंग हाऊस

मित्र जोडा-डेल कार्नेगी मधून..

७/१/२३

तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं…'दान'

मग एक श्रीमंत सावकार म्हणाला,'दानाविषयी आम्हाला काही सांग.' त्यावर अल् मुस्तफा बोलू लागला :


तुमच्या धनदौलतीतलं तुम्ही देता तेव्हा तुम्ही काहीच दिलं नाही,असं होतं.तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं.कारण तुमची दौलत म्हणजे काय असतं? तर,आज ना उद्या गरज पडेल त्यावेळी ताब्यात असाव्यात अशा वस्तूंचा तुम्ही परिग्रह केलेला असतो.त्या संचयामागे त्यांना गमावण्याचं भय असतं.


'उद्या',म्हणजे तरी काय? पवित्र दिव्यनगरीच्या यात्रेकरूंना वाळवंटात सोबत करीत असलेला एखादा अतिशहाणा कुत्रा वाळूखाली हाडकं पुरून ठेवत चालला तर भविष्यात त्याचा निर्वाह होईल काय ?


एखाद्या गरजेचं भय ही देखील नड आणि गरजच की!तुमची विहीर भरलेली असताना तहानेचं भय तुम्हाला पडेल तर तुमची तहान शमेल कशी? प्रचंड धनदौलतीतला नगण्य हिस्सा काहीजण दानार्थ देतात,त्यांना नावलौकिक हवा असतो.त्यांच्या या छुप्या वासनेनं त्यांचं दान निःसत्त्व होऊन जातं.


काहीजण परिग्रहशून्य असतात,तरी जवळचं सर्व काही देऊन बसतात.त्यांची जीवनावर आणि विश्वंभर चैतन्यावर श्रद्धा असते.त्यांची तिजोरी कधीच रिती पडत नाही.कित्येकांना दान करण्यानं आनंद होतो.आनंदात त्यांचा परितोष असतो.


काहींना दान करताना दुःख होतं.त्या दुःखात नवजीवनाची दीक्षा असते.काहीजण असे असतात की देताना दुःख होत आहे याचीही त्यांना जाणीव नसते,की आनंद मिळवावा ही धडपड नसते.आपण पुण्यकृत्य करीत आहोत,याचीही त्यांना वार्ता नसते.


दूरच्या डोंगरदरीत मर्टल् ची शुभ्र फुलं अवकाशात आपला परिमळ विखुरतात,तशी ती माणसं असतात.त्यांच्या हातांमधून ईश्वराची वाणी ऐकू येते.त्यांच्या डोळ्यांतून तो या धरणीवर स्मित करीत वावरतो.


कुणी याचना केली असता दान द्यावं हे चांगलंच, पण अ-याचकालाही उमजून द्यावं हे अधिक चांगलं.मुक्तहस्तांनी खैरात करणाऱ्याला,दान न करताच आपल्याकडून कुणी काही घेतलं तर फार आनंद होतो..


तसं बघितलंत तर देण्याला हात आखडावा असं आपल्यापाशी काय असतं?


 आपलं ज्याला म्हणतो ते सर्वच्या सर्व एके दिवशी विसर्जित होणार असतं.म्हणून म्हणतो की द्यायचं ते आताच द्या.तुमच्या वारसदारांना ती संधी

कशासाठी ?


तुमच्या नेहमी बोलण्यात येतं:दान देईन,पण केवळ पात्र असणाऱ्याला.तुमच्या फळबागेतली झाडं असं कधी म्हणतात काय? तुमच्या कुरणांवर चरणारे मेंढ्यांचे कळप असं कधी म्हणतात काय ?


सर्वस्व - दान हे त्यांचं जीवन असतं.दान आखडून धरावं यात मृत्यू असतो.


दिवसाचा प्रकाश आणि रात्रीची विश्रांती ज्याला बहाल झाली आहे,तो कोणीही असो,तुमच्या दानाला पात्र समजा.


या जीवन-महासागराचे घोट घेण्यास जो पात्र आहे तो तुमच्या ओहोळातून प्याला भरून घेण्यास योग्य नसेल काय ?


ज्या धीरानं,विश्वासानं आणि उदारपणानं दान स्वीकारलं जातं,ते खरं तर मेजवानीनंतरच्या मुखशुद्धीहून फार थोर असतं काय ?


माणसांनी आपलं अंतःकरण उघडून ठेवावं, स्वाभिमान उचकटून दाखवावाअसे तुम्ही कोण आहात ?त्यांची योग्यता आणि त्यांची अस्मिता उघडीनागडी पाहावी अशी तुमची कोणती पात्रता?दान देण्यास किंवा दानाचा बटवडा करण्यास तरी आपण पात्र आहोत का,याची पारख करा.


खरं तर,चैतन्य ज्याच्या स्वाधीन होतं तेही चैतन्यच असतं.दान देतो म्हणवणारे तुम्ही,दानाचे फार तर साक्षी असता.


बंधुजनहो बंधु तुम्ही सर्वचजण दान ग्रहण करणारे आहात.घेतलेल्या दानाला उपकार समजून ओझं मानू नका.मानाल तर,स्वतःच्या आणि दानकर्त्याच्या जिवाला जोखडाखाली घालाल.


दानकर्त्यानं दिलेल्या दानावर तुम्ही दोघेही एकजुटीनं उभे व्हा... दोन्ही पंख उघडून आकाशगामी व्हा...


घेतलेलं दान कर्ज आहे असं सारखं समजत राहणं म्हणजे दात्याच्या औदार्याविषयी शंका घेणं होय.मुक्त हातांनी प्रदान करणारी धरणी त्याची आई आहे आणि ईश्वर त्याचा पिता आहे,हे विसरू नका.


खलील जिब्रान यांच्या 'द प्रॉफेट या पुस्तकातून..


६/१/२३

एक छोटी गोष्ट संताची.. बरचं काही सांगणारी..!

माझ्या तरुणपणातले दिवस होते.डोंगरापल्याडच्या

शांत वनराईत भटकताना एका संतपुरुषाची भेट झाली.बोलता बोलता आमच्या संभाषणात सद्गुणाविषयी काही बोलणं निघालं.तेवढ्यात डगरीवरून एक पुंड लुटारू लंगडत,धापा टाकत येताना आम्हाला दिसला.आम्ही होतो तिथं तो आला.त्या संत पुरुषासमोर गुडघे टेकून म्हणाला,"महाराज,माझ्या जिवाची बेचैनी शांत करा.माझी पापं मला छळत आहेत."


संतपुरुष म्हणाला,"माझी पापंदेखील मला छळत आहेत.'पुंड म्हणाला,"महाराज,मी चोर आहे,दरोडेखोर आहे.'


संतपुरुष उत्तरला,"मीही तसाच आहे रे.'


चोर बोलला,"मी खुनी आहे.कित्येकांची हत्या मी केली आहे.त्यांच वाहून गेलेलं रक्त माझ्या कानांत घोंगावत आहे.'


संतपुरुष म्हणाला,"मीसुद्धा तसाच खुनी आहे आणि पुष्कळांची हत्या माझ्या मानगुटीवर बसलेली आहे.'


पुंड म्हणाला,'सांगता येणार नाहीत इतके गुन्हे मी केले आहेत.संतपुरुष म्हणाला, 'माझं तरी काय? मीही तसाच गुन्हेगार आहे.'


इतकं झाल्यावर तो लुटारू उभा राहून संतपुरुषाकडे टक लावून पाहू लागला.त्याच्या नजरेत काही वेगळंच पाणी दिसत होतं.आमच्यापासून तो निघाला आणि उड्या टाकीत डोंगर उतरून गेला.


संतपुरुषाकडे वळून मी म्हणालो,


"न केलेल्या हत्यांचे आणि गुन्ह्यांचे आरोप तुम्ही स्वतःवर का ओढवून घेतलेत?जाताना तो कसा गेला ते बघितलंत ना?तुमच्या बोलण्यावर त्याचा मुळीच विश्वास बसला नाही.'


"खरंच आहे.माझ्यावर विश्वास नसेना का,पण जाताना त्याची बेचैनी पुष्कळ कमी झाली होती."


त्या क्षणी,दूर अंतरावरून त्या लुटारूच्या तोंडून निघणाऱ्या गाण्याच्या लकेरी आमच्या कानी आल्या.त्यांच्या पडसादांनी त्या दरीत उल्हास भरून आला.


खलील जिब्रान यांच्या द प्रॉफेट या पुस्तकातून 

'संत' भावानुवाद - त्र्यं.वि.सरदेशमुख

मधुश्री पब्लिकेशन



४/१/२३

" तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका." " स्टीव्ह जॉब्ज "

..वरील वाक्याची सत्यता पटवून देणारी कथा नुकतीच वाचणात आली.


सून फोनवर आईशी बोलत होती,"आई मी काय सांगू,आजकाल शिळ्या कढीला पण उत आलाय !सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून,


दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात.आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी ! अजूनही स्वतःला पंचवीशीतलेच समजतात.


तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या.त्यांनी हे सर्व ऐकले होते,पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला. 


नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन् पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं.पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.


पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता.त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची.


आयुष्यभर त्यांनी फक्त मुलासाठीच खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी,ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.


अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल,जास्वंदी,चाफा,मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती.एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती.हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत.स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर,पुदिना,मेथी तिथलीच असायची!


पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही.पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे.खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती.पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपाळा हवा होता तो त्यांनी आणला.आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.


आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते.त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या,तरीही सूनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं.अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.


त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे.एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.


"आपण मोठी कार का खरेदी करत नाही ... नवीन"


"कल्पना चांगली आहे,पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे." नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.


"जागा का नाही,ती बाग आहे ना ! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात!"


"तू जरा जास्तच बोलतेस!" म्हणत नविनने तिला फटकारले खरे,पण त्यानेही याबाबत बाबांशी बोलायचे ठरवले होते.


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला,"बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे."


"पण बेटा,मोठी गाडी आधीच घरात आहे,मग तू ती ठेवणार कुठे?"


"या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी सोनम काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल ? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल."


प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं ! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले,"मला तुझ्या आईशी बोलावं लागेल,मला थोडा वेळ दे."


"काय पप्पा ... आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग ?",नवीन जरा चिडूनच म्हणाला. 


"तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता,चार लोकांचा विचार न करता इथे बसता.आता सोनम सुद्धा घरात आहे,लहान मुलंही आहेत.पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता."


आतून सोनमची बडबड चालूच होती.


नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले.पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही.इच्छाच नव्हती कसली.दोघेही रात्रभर जागेचं होते!


पण सकाळी त्याबद्दल विचार करताना,बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले.त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला.पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्या दिवशी झाडांना पाणी देण्यासाठी बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.


दिवसभर सर्वकाही सामान्य होते,पण संध्याकाळी,'घर भाड्याने देणे आहे' असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले,"पप्पा, घर मोठे आहे हे मान्य,पण हे काय"?


"पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत,ते या घरात राहतील",त्यांनी शांतपणे उत्तर दिले.


"पण कुठे?"


"तुमच्या भागात",अशोकजींनी साध्या 

आवाजात उत्तर दिले.


"आणि आम्ही?"


"तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे.दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा,जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल !


आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू.तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले.आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं."


"बाबा,मला असे म्हणायचे नव्हते," नवीन हात जोडत म्हणाला.


"नाही बेटा,तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे.जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो?हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड,ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत,म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही."


"बाबा, तुम्ही गंभीर झालात",नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.


"नाही बेटा ... तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून,खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला.आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.म्हणूनच फक्त हा कोपराच नाही,संपूर्ण घर तिचे ऋणी आहे.तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.


आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या.पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये?


मानवी भावभावना संवेदना जपणाऱ्या सर्वांना मनस्वी समर्पित…


लेखक - अनामिक