* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/१/२३

भारतच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक !

भारतात हैदर-टिपू सुलतानाबरोबर झालेल्या युद्धात इंग्रजांना दोन नवीन गोष्टींचा शोध लागला होता.(अर्थात हे इंग्रजांनीच नमूद करून ठेवलंय) एक म्हणजे युद्धात वापरले जाणारे रॉकेट आणि दुसरं म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी.


इंग्रजांना सापडलेल्या ह्या प्लॅस्टिक सर्जरीचा इतिहास मोठा गंमतीशीर आहे.सन १७६९ ते १७९९ ह्या तीस वर्षांत हैदर अली-टिपू सुल्तान आणि इंग्रजांमध्ये ४ मोठ्या लढाया झाल्या.यांतील एका लढाईत इंग्रजांकडून लढणारा 'कावसजी' हा मराठा सैनिक आणि ४ तेलंगी बाजार बुणगे टिपूच्या फौजेच्या हातात सापडले. टिपू सुल्तानच्या फौजेने ह्या पाची जणांची नाकं कापून त्यांना इंग्रजांकडे परत पाठवले.


काही दिवसांनी एका इंग्रज कमांडरला,एका भारतीय व्यापाऱ्याच्या नाकावर काही खुणा दिसल्या.चौकशी केल्यावर कमांडरला समजले की,त्या व्यापाऱ्याने काही 'भानगड' केली होती म्हणून त्याचे नाक कापण्यात आले होते.परंतु त्या व्यापाऱ्याने एक वैद्याकडून आपले नाक पूर्वीसारखे करून घेतले.आश्चर्यचकित झालेल्या इंग्रजी कमांडरने त्या कुंभार जातीच्या मराठी वैद्याला बोलाविले आणि कावसजी व इतर चौघांची नाक पहिल्यासारखी करायला सांगितलं.


कमांडरच्या आज्ञेवरून पुण्याजवळ हे ऑपरेशन झाले.हे ऑपरेशन होताना दोन इंग्रजी डॉक्टर्स उपस्थित होते.त्यांची नावं- थॉमस क्रूसो आणि जेम्स फिंडले.या दोघांनी 'अज्ञात मराठी वैद्याने' केलेल्या ह्या ऑपरेशनचं सविस्तर वर्णन मद्रास गॅझेटमध्ये पाठवलं,जे छापून आलं. ह्या मद्रास गॅझेटमध्ये छापून आलेल्या लेखाचं पुनर्मुद्रण, लंडनहून प्रकाशित होणाऱ्या 'जंटलमन' ह्या मासिकाने ऑक्टोबर १७९४ च्या अंकात केलं. या अंकात 'बी. एल.' ह्या नावाने एका गृहस्थाने ही बातमी दिलेली आहे.लेखासोबत शस्त्रक्रियेसंबंधी काही चित्रेही दिली आहेत. या लेखापासून प्रेरणा घेऊन इंग्लंडच्या जे.सी.कॉर्प ह्या तरुण सर्जनने याच पद्धतीने दोन शस्त्रक्रिया केल्या,ज्या यशस्वी झाल्या.हे ऐकून ग्रेफे ह्या जर्मन सर्जननेही याच धरतीवर प्लॅस्टिक सर्जरीच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.आणि मग पाश्चात्त्य जगाला आणि विशेषतः इंग्रजांना 'प्लॅस्टिक सर्जरी'ची ओळख झाली.पहिल्या विश्वयुद्धात तर अशा शस्त्रक्रियांचा फारच उपयोग झाला.पाश्चात्त्य जगात 'एडविन स्मिथ पापिरस' ने सर्वप्रथम प्लॅस्टिक सर्जरीचा उल्लेख आढळतो.मात्र रोमन ग्रंथांमध्ये या शस्त्रक्रियेचा उल्लेख हजार वर्षांपूर्वीपासून मिळतो.


अर्थात भारतासाठी या शस्त्रक्रिया फार जुन्या आहेत.सुमारे पावणेतीन हजार वर्षांपूर्वी सुश्रुत या शस्त्रवैद्यकाने या शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती देऊन ठेवली आहे.झाडाचे एक पान घेऊन ते नाकावर ठेवले जाते.नाकासारखा आकार त्याला दिला जातो.आणि नंतर त्या पानाला आवश्यक तिथे कापून,त्याच आकाराची कातडी गाल, कपाळ किंवा हात,पाय यातून काढली जाते. विशिष्ट औषधांचा लेप लावून ती कातडी आवश्यक तिथे बसवून तिला बांधले जाते. बसवलेली कातडी आणि काढलेली कातडी.या दोन्ही जागांवर ठराविक औषधांचा लेप लावला जातो.साधारण तीन आठवड्यांनी दोन्ही ठिकाणी नवीन कातडी येते आणि हे कातडीचे प्रत्यारोपण पूर्ण होते.याच माहितीच्या अनुसार त्या 'अज्ञात मराठी वैद्याने' कावसजीवर नाकाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.


नाक,कान आणि ओठांना व्यवस्थित करण्याचे तंत्र भारताला फार पूर्वीपासून अवगत होते.पूर्वी, टोचलेल्या कानात जड दागिना घातला की कानाची पाळी फाटायची.अशा कानाला ठीक करण्यासाठी तेथे गालाची कातडी बसवण्याची पद्धत रूढ होती.अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतात ह्या शस्त्रक्रिया वैद्यांद्वारे केल्या जायच्या.हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा तर अशा शस्त्र- वैद्यकांसाठी प्रसिद्ध होता. सं म्हटलं जातं की,कांगडा हा शब्दच मुळी कान+गढा (हिंदीत 'गढा' म्हणजे तयार करणे) यातून निर्माण झाला आहे.डॉ.एस.सी.अलमस्त यांनी या 'कांगडा मॉडेल' वर बरेच लिहून ठेवले आहे.ते कांगडा च्या 'दिनानाथ कानगढीया' ह्या नाक,कानाची शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला स्वतः भेटले. त्याचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.सन १४०४ पर्यंतच्या पिढीची माहिती असणारे हे 'कानगढीया',नाक आणि कानाची 'प्लॅस्टिक सर्जरी' करणारे कुशल वैद्य समजले जात. ब्रिटिश संशोधक सर अलेक्झांडर कनिंघम (१८१४ - १८९३) याने कांगडाच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या प्रक्रियेबद्दल विस्ताराने लिहून ठेवले आहे.


अकबराच्या काळात 'बिधा' नावाचा वैद्य कांगडामधे शस्त्रक्रिया करायचा हेही लिहून ठेवलेले आढळते.


सुश्रुतच्या सुमारे अकराशे वर्षांनंतर सुश्रुत संहिता आणि चरक संहितांचा अरबी भाषेत अनुवाद झाला.हा आठव्या शतकातच झाला.'किताब-ई- 'सुसरुद' ह्या नावाने सुश्रुत संहिता मध्यपूर्वेत पोहोचली.


पुढे ज्याप्रमाणे भारतातील गणित आणि खगोल शास्त्रासारख्या विज्ञानाच्या इतर शाखा अरबी लोकांच्या माध्यमातून युरोपात पोहोचल्या, तशीच ही माहितीही युरोपात पोहोचली.


चौदाव्या पंधराव्या शतकांत,ह्या शस्त्रक्रियेची माहिती अरब - पर्शिया (इराण) - इजिप्त ह्या मार्गाने इटलीला पोहोचली.या माहितीच्याच आधारे इटलीमधल्या सिसिली बेटावरचा ब्रान्का परिवार आणि गास्परे टाग्लीयाकोसी यांनी कर्णबंध आणि नाकाच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या.मात्र चर्चच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना त्या थांबवाव्या लागल्या.आणि म्हणूनच एकोणिसाव्या शतकापर्यंत युरोपियनांना प्लॅस्टिक सर्जरी अज्ञातच राहिली.


ऋग्वेदातील आत्रेय उपनिषद हे अति-प्राचीन उपनिषदांपैकी एक समजले जाते.ह्या उपनिषदात गर्भातील मूल कसे तयार होते,याचे वर्णन आहे.त्यात असे म्हटले आहे की,गर्भाच्या अवस्थेत प्रथम तोंडाचा काही भाग तयार होतो. नंतर नाकाचा,मग डोळे,कान,हृदय इत्यादी अवयव तयार होत जातात.आजच्या आधुनिक शास्त्राचा आधार घेऊन,सोनोग्राफी वगैरे करून बघितलं तर ह्याच अवस्थांमधून मूल तयार होत जाते.आता हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना कुठून मिळाले..?


त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरी भारतात किमान अडीच ते तीन हजार वर्षांपासून अस्तित्वात होती याचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत.शरीरशास्त्राचे ज्ञान,त्यावरील उपचार हे भारताचे वैशिष्ट्य होते. आपण आपल्या जुन्या ज्ञानातून तयार केलेल्या गोष्टी म्हणजे जुनाट कल्पनांना कवटाळणे.. अशा चुकीच्या समजुतीपायी आपण आपल्याच समृद्ध वारशाला नाकारत आलो आहोत..


१८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..


२०/१/२३

मानवी शरीर किती गुंतागुंतीचे आहे ही सांगणारी सत्य घटना…!

केईएममध्ये घडलेली घटना पंचवीशीचा एक तरुण रुग्ण होता.त्याला हर्निया होता.शस्त्रक्रियेसाठी घेतलं,

तर त्याच्या पोटात गर्भाशय सापडलं.शस्त्रक्रियेनं ते काढल.तो 


'युटराइन हार्निया सिंड्रोम' होता... जन्मतःच बाळाच्या वाढीत काही हार्मोनल गुंतागुंत झालेली असते.पुरुष बाळात स्त्री हार्मोन्स थोडी जास्त असतात.आणि त्यामुळे त्याचं गर्भाशय आणि त्याआसपासचे काही अवयव तयार झालेले असतात.अर्थात,पुरुष हार्मोन्स अधिक असल्यामुळे त्यांची पूर्ण वाढ होत नाही,पण मुलगा मोठा झाला की त्याला हार्नियाचा त्रास सुरू होतो आणि मग हे लक्षात येतं.क्वचित घडणारी गोष्ट आहे.


ही,पण पुरुषाच्या पोटात गर्भाशय आहे हे 

कुटुंबाला समजून घ्यायला फार कठीण जातं.सुदैवाने आम्ही ज्याची शस्त्रक्रिया केली होती,त्या तरुणाची पुरुषाची इंद्रियं नॉर्मल होती आणि त्यामुळे तो पुढचं आयुष्य नीट जगू शकला.आमच्यासाठी ही एक सायंटिफिक केस होती नि ती आम्ही पुढे प्रसिद्ध केली.त्यावर एक पेपरही लिहिला.


अठरा वर्षांचा एक मुलगा १९९५-९६ मध्ये आला होता.त्याच्या पोटात मोठा गोळा होता, उपचारासाठी तो आला होता.त्याचं सीटी स्कॅन केलं तर ते मृत अर्भक होतं!


 याला 'फीटस इन फिटू' म्हणतात.जन्मतः तो जुळा असेल,पण दोन स्वतंत्र,सुटे गर्भ तयार होण्याऐवजी एकात एक दोन बाळं तयार झाली.हे इतकी वर्षं कळलंच नाही.त्याची शस्त्रक्रिया करणं तसं जिकिरीचं होतं.तरी आम्ही ते यशस्वीरित्या केलं.तो रिपोर्ट आम्ही पब्लिशही केला.त्याच्या आजाराचं 'निदान' ऐकून त्याचे नातलग आठवडाभर फिरकलेच नाहीत.ते आल्यावर त्यांना समजावलं.खूप प्रयत्नांनंतर त्यांनी ते स्वीकारलं.


अशा अनेक केसेस केईएममध्ये पाहिल्या. अनेकांवरच्या शस्त्रक्रियांमध्ये सहभागी झालो, अनेक शस्त्रक्रिया स्वतः केल्या.अनेक रुग्ण माझ्या लक्षात राहिले,त्यांच्या मी लक्षात राहिलो. आमच्यात एक छान नातं निर्माण झालं... ते अजूनही आहे.


'सर्जनशील' या पुस्तकातील हा अभ्यासपूर्ण उतारा…


लेखक -डॉ.अविनाश सुपे

ग्रंथाली प्रकाशन 

१८/१/२३

आणि तीही काळ्या रंगातली अक्षरं नाहीत,तर केशरी रंगातली,अष्टगंधाने काढलेली आहेत,असं वाटणारी अक्षरं !

अदृश्य शाईचे रहस्य….


आमगाव हा आपल्या महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा लहानसा तालुका.छत्तिसगढ आणि मध्यप्रदेशाला लागून असलेला.गाव तसं लहानसंच.ह्या गावातले रामगोपाल अग्रवाल हे व्यवसायाने सराफ.घरचा चांदी-सोन्याचा व्यापार.'बेदिल' ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या रामगोपालजींना एक दिवस काय उपरती झाली,कोणास ठाऊक.पण त्यांच्या मनाने घेतलं की,आसामच्या दक्षिणेला असलेल्या ब्रम्हकुंडात स्नान करण्यासाठी आपण जायचं.आता ब्रम्हकुंडच का..? तर त्याला काही विशेष कारण नाही.हे ब्रम्हकुंड (ब्रम्हसरोवर), परशुराम कुंड म्हणूनही ओळखलं जातं. आसामच्या सीमेवर असलं तरी हे कुंड येतं अरुणाचल प्रदेशाच्या लोहित जिल्ह्यात.मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते.


हे स्थान म्हणजे अग्रवाल समाजाचे मूळ पुरुष भगवान अग्रसेन महाराजांचं सासर.त्यांच्या पत्नी माधवीदेवी ह्या नाग लोकांच्या राजकन्या.ह्या ब्रम्हकुंडा- शेजारीच अग्रसेन महाराजांचा विवाह झाला असं सांगितलं जातं.


कदाचित हेच कारण असेल,रामगोपाल अग्रवाल 'बेदिल' ह्यांच्या ब्रम्हकुंडाला भेट देण्याच्या निश्चयात.मग ठरल्याप्रमाणे रामगोपालजी, आपले ४-५ मित्र घेऊन ब्रम्हकुंडावर पोहोचले. भेट देण्याच्या आधल्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलं की 'उद्या त्या ब्रम्हसरोवराच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाच्या खाली एक साधू बसलेला असेल.तेथेच तुला हवं ते मिळेल.'


दुसऱ्या दिवशी सकाळी रामगोपालजी त्या ब्रम्हकुंडाच्या (ब्रम्हसरोवराच्या) काठाशी गेले तर त्यांना तिथे भला मोठा वृक्षही दिसला आणि दाढी वाढवलेला एक साधूही दिसला. रामगोपालजींनी त्याला नमस्कार करताच त्याने आपल्याजवळची,एक चांगल्या कापडात बांधलेली वस्तू त्यांना दिली अन् म्हटले, "जाव.. इसे ले जाओ.." हा दिवस होता,९ ऑगस्ट १९९१.


भलंमोठं दिसणारं,पण हलकं वाटणारं ते गाठोडं घेऊन रामगोपालजी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले,आणि त्यांनी ते गाठोडं उघडून बघितलं.तर आत कोरी भूर्जपत्रं व्यवस्थित बांधून ठेवलेली.आता कोरी भूर्जपत्रं (म्हणजे त्यांना भूर्जपत्र म्हणायचं असं रामगोपालजींना फार उशिरा समजलं) काय करायची असा विचार त्यांच्या मनात आला.पण प्रसाद समजून त्यांनी ते गाठोडं आमगावला आणलं.फक्त ३० ग्रॅम वजनाच्या या गाठोड्यात ४३१ कोरी (रिकामी) भूर्जपत्रं होती..


बालाघाट जवळच्या 'गुलालपुरा' गावात ह्या रामगोपालजींचे गुरू होते.त्या गुरूंना बोलावण्यात आलं आणि ते गाठोडं दाखवलं. रामगोपालजींनी गुरूंना विचारलं,'काय करू ह्या कोऱ्या भूर्जपत्रांचं ?'गुरुजींनी उत्तर दिलं, 'कामाचे वाटत नाहीत नं तुला,मग पाण्यात टाकून दे.' आता रामगोपालजी दोलायमान.ते गाठोडं ठेववतही नाही आणि टाकवतही नाही..


तशातच एक दिवस पूजा करत असताना देवघरात ठेवलेल्या ह्या कोऱ्या भूर्जपत्रावर पाण्याचे काही थेंब पडले आणि अहो आश्चर्यम..! त्या तितक्या भागात अक्षरं उमटून आली.रामगोपालजींनी मग एक भूर्जपत्र पाण्यात बुडवलं.अन् चमत्कार झाल्यासारखा त्या पानावरचा संपूर्ण मजकूर अगदी स्वच्छ दिसू लागला.आणि तीही काळ्या रंगातली अक्षरं नाहीत,तर केशरी रंगातली,अष्टगंधाने काढलेली आहेत,असं वाटणारी अक्षरं !


थोड्या वेळानंतर,त्या भूर्जपत्रातलं पाणी वाळल्याबरोबर ती अक्षरंही दिसेनाशी झाली. मग रामगोपालजींनी पूर्ण ४३१ पानं पाण्यात टाकून,ती वाळण्यापूर्वी त्यातील मजकूर उतरवून घेण्याचा प्रयत्न केला.मजकूर देवनागरी लिपीत, संस्कृतमधे लिहिला होता.हे काम काही वर्षं चाललं.काही संस्कृत जाणकारांकडून या मजकुराचा अर्थ समजावून घेतला तर लक्षात आलं,भूर्जपत्रावर अदृश्य शाईने लिहिलेली ती पोथी म्हणजे अग्रसेन महाराजांचं चरित्र आहे - 'अग्र भागवत' या नावाचं.


हजारो वर्षांपूर्वी जैमिनी ऋषींनी लिहिलेल्या 'जयभारत' नावाच्या एका मोठ्या ग्रंथाचा,'अग्र भागवत' एक भाग आहे.पांडव वंशातील परीक्षिताचा मुलगा जनमेजय.त्याला लोकधर्माच्या साधनेचा विस्तार करण्यासाठी जैमिनी ऋषींनी हा ग्रंथ सांगितला.


या अग्र भागवत ग्रंथाची लोकांमध्ये बरीच चर्चा झाली.अग्रवाल समाजात ह्या ग्रंथाचं प्रचंड स्वागत झालं.ग्रंथाची पानं अनेकदा पाण्यात बुडवून,लोकांना दाखवून झाली.या ग्रंथाची कीर्ती इतकी पसरली की,अग्रवाल समुदायापैकी एक, इंग्लंडमधील प्रख्यात उद्योगपती,लक्ष्मी मित्तल यांनी काही कोटी रुपयांमध्ये तो ग्रंथ विकत घेण्याची तयारी दाखविली.


हे सर्व बघून अग्रवाल समाजातली काही मंडळी पुढे आली आणि त्यांनी संस्कृतचे विद्वान, नागपूरचे श्री.रामभाऊ पुजारी यांच्या मदतीनं एक ट्रस्ट स्थापन ॥ श्रीमद् अग्रभागवतम् ॥ केला आणि त्या ग्रंथाला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली.


आज तो ग्रंथ 'अग्रविश्व ट्रस्ट' मधे सुरक्षित आहे. सुमारे १८ भारतीय भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित होऊन प्रकाशित झालेला आहे आणि रामभाऊ पुजारी यांच्या सल्ल्यानुसार मूळ भूर्जपत्रावरील ग्रंथ सांभाळून ठेवला आहे.


ह्या सर्व प्रकरणातला श्रद्धेचा भाग सोडूनही देऊ, तरी मुद्दा शिल्लक उरतो की हजारों वर्षांपूर्वी भूर्जपत्रांवर अदृश्य शाईने लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणते ? ते कसे वापरले जायचे,अन् कुठे वापरले जायचे?


भारतामध्ये लिहून ठेवण्याची पद्धत खूप खूप प्राचीन आहे.ताम्रपत्र, - चर्मपत्र,ताडपत्र,भूर्जपत्र ही सारी लिखाणाची माध्यमं.


मराठी विश्वकोशात भूर्ज-पत्रांबद्दल माहिती दिलेली आहे ती अशी - 


'भूर्जपत्रे ही भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवीत.हे वृक्ष बेट्यूला वंशातील असून हिमालयात,विशेषतः काश्मीरातील हिमालयात वाढतात.यांच्या साली सोलून व वाळवून त्यांना तेल लावून त्यांची पृष्ठे गुळगुळीत करीत व त्यांचे मोठ्या लांबी-रुंदीचे पत्रे तयार करून त्यांच्यावर शाईने लिहीत.पत्रांना भोके पाडून व त्या भोकांत दोरी ओवून पुस्तके बांधली जात.


ही भूर्जपत्रे,त्यांच्या दर्जानुसार ३ महिने ते २,००० वर्षे टिकत.भूर्जपत्रावर किंवा ताडपत्रांवर लिहिण्यासाठी फार पूर्वीपासून शाईचा वापर

केला जात होता. इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षेपर्यंत शाई वापरली जाण्याचे पुरावे मिळाले आहेत.भारतात शाई केव्हापासून वापरली जातेय,नक्की सांगणं कठीण आहे.भारतावर चाल करून आलेल्या आक्रमकांनी येथील ज्ञान मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे असे जुने दुवे मिळत नाहीत.


पण शाई तयार करण्याच्या काही प्राचीन पद्धती माहीत आहेत.त्या अधिकांश पद्धतीत काळ्या शाईचाच उल्लेख आहे.फक्त काही ठिकाणी गेरू वगैरेंच्या मदतीने तयार केलेल्या केशरी शाईचा उल्लेख येतो. मराठी विश्वकोशात शाईची दिलेली माहिती अशी -


'भारतात दोन प्रकारची शाई वापरीत असत. कच्च्या शाईने व्यापारी जमाखर्च, तर पक्क्या शाईने ग्रंथ लिहीत असत. पिंपळाचा गोंद दळून, उकळून, तिळाच्या तेलावरील काजळी पातळ कापडात घालून गोंदाच्या पाण्यात ती पुरचुंडी फिरवीत. भूर्जपत्रावर लिहिण्याची शाई वेगळी असे. बदामाच्या साली व कोळसे यांपासून किंवा जाळलेले भात गोमूत्रात उकळून ती तयार करीत.काळ्या शाईने लिहिलेला सर्वांत जुना मजकूर इ.स. तिसऱ्या शतकातील सापडतो.


पण यात एक गंमत आहे.ज्या पदार्थांचा शाई तयार करण्यासाठी उपयोग होतो,ते सर्व पदार्थ पाण्यात विरघळणारे आहेत.मात्र आपल्या 'अग्रभागवत' या ग्रंथातील भूर्जपत्राचे पान पाण्यात टाकल्यावर शाई दिसू लागते.


अर्थात किमान दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाला अदृश्य शाईने लिहिण्याचं तंत्र अवगत होतं.हे तंत्र तेव्हा अनेक संशोधनांनंतर सिद्ध झालं असेल.अनेक प्रकारची रसायनं यात वापरली गेली असतील.त्यांचे वेगवेगळे प्रयोग या देशात झाले असतील.दुर्दैवानं आज मात्र यातील काहीही शिल्लक नाही.उपलब्ध आहे तो अदृश्य शाईच्या अस्तित्वाचा खणखणीत पुरावा - 'अग्रभागवत'च्या रूपात..!


थोडक्यात काय तर विज्ञान,आणि तेही 'शास्त्रशुद्ध विज्ञान',हा प्रकार पाश्चिमात्यांनी आणला या घट्ट झालेल्या मनोभूमिकेला हे 'अग्रभागवत' म्हणजे एक मोठाच हादरा आहे.


एकेकाळी अत्यंत प्रगत असं लेखनशास्त्र या देशात नांदत होतं आणि ज्ञानाच्या प्रचंड भांडाराचं पिढी - दरपिढी हस्तांतरण करण्याची क्षमता या शास्त्रात होती,हे आता सिद्ध झालंय.


१६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

१६/१/२३

कुतुबुद्दीन ऐबकाने हा मिनार बांधला.पुढे इल्तुतमिष आणि मोहम्मद तुघलकाने याचं बांधकाम पूर्ण केलं असं तिथे सापडलेले शिलालेख सांगतात.

लोहस्तंभ…


दक्षिण दिल्लीत आपण मेहरोलीच्या दिशेने जाऊ लागलो की,दुरूनच आपल्याला कुतुबमिनार दिसू लागतो.२३८ फूट उंच असलेला हा मिनार म्हणजे जवळपास २३ मजली उंच इमारत.पूर्ण जगात विटांनी बांधलेली ही सर्वोच्च वास्तू आहे. जगभरातले पर्यटकही मिनार बघायला येत असतात.


साधारण ९०० वर्षं जुनी असलेली ही इमारत युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.आज जिथे हा मिनार उभा आहे,तिथे पूर्वी, म्हणजे पृथ्वीराज चौहानच्या काळात,त्याची राजधानी 'ढिल्लीका' ही होती. ह्या ढिल्लीकामधील लालकोट ह्या किल्लेवजा गढीला पाडून मोहम्मद घोरीच्या सेनापतीने, म्हणजे 


कुतुबुद्दीन ऐबकाने हा मिनार बांधला.पुढे इल्तुतमिष आणि मोहम्मद तुघलकाने याचं बांधकाम पूर्ण केलं असं तिथे सापडलेले शिलालेख सांगतात.


मात्र ह्या 'ढिल्लीका' च्या परिसरात,ह्या कुतुब मिनारपेक्षा कितीतरी जास्त विलक्षण गोष्ट अनेक शतकं उभी आहे.कुतुब मिनारपेक्षाही त्या गोष्टीचे महत्त्व अनेक पटींनी जास्त आहे.कुतुब मिनारला लागूनच,साधारण शंभर,दीडशे फूट अंतरावर एक लोहस्तंभ उभा आहे.कुतुब मिनारपेक्षा बराच लहान.फक्त ७.३५ मीटर्स किंवा २४.११ फूट उंच... कुतुब मिनारच्या एक दशांश..! पण हा स्तंभ कुतुब मिनारपेक्षा बराच जुना आहे. इसवी सन ४०० च्या आसपास बनलेला हा स्तंभ म्हणजे भारतीय ज्ञानाच्या रहस्याचा खजिना आहे.


ह्या लोहस्तंभात ९८% लोखंड आहे.इतकं लोखंड म्हणजे हमखास गंजण्याची शाश्वती.मात्र गेली सोळा-सतराशे वर्षं सतत उन्हा-पावसात उभं राहूनही ह्याला अजिबात गंज चढलेला नाही.विज्ञानाच्या दृष्टीने हे एक मोठं आश्चर्य आहे.आजच्या एकविसाव्या शतकातही,प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात,धातुशास्त्रात अनेक प्रयोग, शोध आणि संशोधनं होऊनही ९८% लोखंड असलेला स्तंभ,गंजल्यावाचून राहत नाही.त्या स्तंभावर एखादं 'कोटिंग' केलं तर तो स्तंभ फक्त काही काळ गंजल्यावाचून राहू शकतो.मग ह्या लोहस्तंभात असं काय वैशिष्ट्य आहे की, हा स्तंभ आजही जसाच्या तसा उभा आहे..?


आय.आय.टी.कानपूरच्या 'मटेरियल्स अँड मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग' विभागाचे प्रमुख प्रोफेसर आर.सुब्रमण्यम यांनी यावर बरंच काम केलेल आहे.इंटरनेटवरही त्यांचे ह्या विषयासंबंधी अनेक पेपर्स मिळतात.


प्रो.सुब्रमण्यम यांच्या मतानुसार लोह-फॉस्फरस संयुगाचा उपयोग इसवी सनाच्या चारशे वर्षांपूर्वी,म्हणजे अशोकाच्या काळात,भरपूर व्हायचा.आणि ह्या पद्धतीनेच हा लोहस्तंभ तयार करण्यात आलेला आहे.


प्रो. सुब्रमण्यम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ह्या स्तंभावर वेगवेगळे प्रयोग करून हे सिद्ध करून दाखवलंय.त्यांच्या म्हणण्यानुसार लोखंडाला गंजनिरोधन करण आजच्या तंत्रज्ञानापुढचं मोठं आव्हान आहे.बांधकाम व्यवसाय,मेकॅनिकलशी संबंधित उद्योग यात अशा गंजरोधक लोखंडाची आवश्यकता असते आणि त्यासाठी इपोक्सी कोटिंग,कॅडोडिक प्रोटेक्शन पद्धत इत्यादी वापरल्या जातात.मात्र या साऱ्या पद्धती गंज लागणं लांबवतात.पूर्णपणे थांबवत नाहीत. गंज लागू द्यायचा नसेल तर त्या लोखंडातच गंजरोधक थर निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे.आज एकविसाव्या शतकात असे लोखंड निर्माण होऊ शकलेले नाही जे स्वत:च असा गंजरोधक थर निर्माण करते..!


पण भारतात चौथ्या शतकात असे लोखंड निर्माण होत होते,आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे दिल्लीचा लोहस्तंभ.हा लोहस्तंभ मुळात दिल्लीसाठी बनलेलाच नव्हता.

चंद्रगुप्त विक्रमादित्य या प्रसिद्ध राजाने इसवी सन ४०० च्या आसपास हा स्तंभ,मथुरेतील विष्णु मंदिराच्या बाहेर लावण्यासाठी बनवला होता.या स्तंभावर गरुडाची मूर्ती पूर्वी विराजित झाली असावी.त्यामुळे याला 'गरुडस्तंभ' असेही म्हटले जाते.


ह्याला आधार आहे,ह्या स्तंभावर ब्राम्ही लिपीत कोरलेला एक संस्कृत श्लोक.चंद्र नावाच्या राजाच्या स्तुतीने भरलेला हा श्लोक विष्णुमंदिरा समोरच्या ह्या स्तंभाचं महत्त्व सांगतो.चंद्र नावावरून आणि चौथ्या शतकात हा स्तंभ तयार केला गेला असावा असा विचार करून,चंद्रगुप्त विक्रमादित्याने हा स्तंभ बांधला असावा असा तर्क काढण्यात आला.या कोरलेल्या श्लोकाची शैली ही गुप्तकालीन वाटत असल्याने ह्या तर्काला बळकटी मिळते.मथुरेजवळ असलेल्या विष्णुपद ह्या पर्वतावरील विष्णु मंदिरासमोर बांधण्यासाठी हा स्तंभ तयार करण्यात आल्याची नोंद ह्या श्लोकात मिळते.


(मात्र अनेक इतिहासतज्ज्ञांचे मत असे नाही. त्यांच्या मते इसवी सनापूर्वी ९१२ मधे हा स्तंभ बनवण्यात आला आहे.)


७ मीटर उंच असलेला हा स्तंभ,५० सेंटीमीटर (म्हणजे साधारण पावणे दोन फूट) जमिनीखाली आहे.४१ सेंटीमीटरचा व्यास खाली तळाशी तर ३० सेंटीमीटरचा व्यास वर टोकाला आहे.पूर्वी, म्हणजे सन १९९७ पर्यंत,पर्यटक ह्या स्तंभाला पाठीमागून कवेत पकडण्याचा प्रयत्न करायचे. अशा प्रकारे स्तंभ कवेत आला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जायचं.पण त्यामुळे स्तंभाच्या लोखंडाला ठोकणे,त्यावर कोरण्याचे प्रयत्न करणे असं सगळं व्हायला लागल्यामुळे सन १९९७ पासून आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने या स्तंभाभोवती एक संरक्षक फेन्सिंग उभारले.त्यामुळे आता ह्या लोहस्तंभाला प्रत्यक्ष स्पर्श करणं शक्य नाही.


इतिहासातून बाहेर निघालेला हा एकटाच लोहस्तंभ अपवाद म्हणून आपल्याला दिसतो का..? तर तसे नाही. इतरही काही ठिकाणी असे न गंजलेले लोहस्तंभ उभे राहिलेले दिसतात.


भारतात ही कला इसवी सनापूर्वी सहाशे,सातशे वर्षं (किंबहुना त्याही पूर्वी) होती असे अनेक पुरावे मिळालेले आहेत.सोनभद्र जिल्ह्यात राजा नाल-का-टीला,छत्तीसगडमधील मल्हार आणि पश्चिम बंगालमधील पांडुराजार धिबी व मंगलकोट ह्या जिल्ह्यांत उत्तम प्रतीच्या लोखंडाचे अनेक अवशेष सापडले आहेत.आणि हे सर्व पुरावे नि:संशयपणे हेच सांगताहेत की, लोखंडाचं धातुकर्म भारतात विकसित झालं. अत्यंत उच्च प्रतीचं लोखंड भारतात तयार व्हायचं, शअसं त्या काळातल्या विदेशी प्रवाशांनीही लिहिलेलं आढळतं.


भारतात त्या काळापासून लोखंड तयार करणारे विशिष्ट समूह आहेत.त्यांपैकी 'आगरिया लोहार' समाज हा आजही,कोणतीही आधुनिक यंत्र न वापरता,जमिनीतील खाणींमधून लोखंडाची माती गोळा करतो.मातीतून लोखंडाची दगडे वेचून त्या दगडांवर प्रक्रिया करतो आणि या सर्व प्रक्रियेतून शुद्ध लोखंड तयार करतो.लोखंड निर्माण करण्याची ही आगरिया लोहार समाजाची परंपरागत पद्धत आहे.


'आगरिया' हा शब्द 'आग' ह्या शब्दापासून तयार झाला आहे.लोखंडाच्या भट्टीचे काम म्हणजे आगीचे काम. म्हणूनच 'आगरिया' हा शब्द.मध्य प्रदेशातल्या मंडला,शहडोल,अनुपपूर आणि छत्तिसगढच्या बिलासपूर आणि सरगुजा ह्या जिल्ह्यांत हा समाज आढळतो.हा समाज म्हणजे गोंड समाजाचेच अंग समजले जाते. ह्या समाजात दोन पोट-जाती आहेत -'पथरिया' आणि 'खुंटीया' यापैकी लोखंडाची भट्टी तयार करताना जे दगडाचा उपयोग करतात,ते झाले पथरिया (पत्थर म्हणजे दगड) आणि जे भट्टी तयार करताना खुंटीचा वापर करतात,ते झाले खुटीया.आजही ह्या समाजाच्या उपजीविकेचे साधन हे लोखंड 'तयार' करून त्यापासून अवजारं आणि हत्यार तयार करण्याचं आहे. भोपाळच्या संगीत वर्मा ह्या दिग्दर्शकाने ह्या आगरिया लोकांवर एक वृत्तचित्र तयार केलं आहे.ह्या वृत्तचित्रात जंगलातल्या मातीतून लोखंडाचे दगड निवडण्या पासून तर लोखंडाची अवजारं तयार करण्यापर्यंत पूर्ण चित्रण केलेलं आहे.


म्हणजे दोन-अडीच हजार वर्षांपासूनची ही धातुशास्त्राची परंपरा,फक्त या जमातीत का होईना,झिरपत झिरपत शिल्लक राहिलेली आहे. मग राजाश्रय आणि लोकाश्रय असताना अडीच हजार वर्षांपूर्वी ह्या धातुशास्त्राच्या कलेचं स्वरूप कसं असेल..?

नुसत्या कल्पनेनंच मन थक्क होतं..!


१४ जानेवारी २०२३ मधील लेखातील पुढील भाग…

पुढील भागात पाहू-अदृश्य शाईचे रहस्य..

१४/१/२३

गुढरम्य इतिहासाची किलकिली झालेली कवाडं...!

'दा विंची कोड' आणि 'एंजल्स एंड डेमंस' सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिणाऱ्या डेन ब्राऊन यांनी 'द लॉस्ट सिंबल' नावाचे एक पुस्तक लिहिलेय.त्यात नायक प्रश्न विचारतो, 


'मानवजात ज्ञानाच्या मागे लागली आहे आणि अत्याधुनिक ज्ञान मिळवत चाललीय.ज्ञान मिळविण्याचा वेग प्रचंड वाढत चालला आहे. हा सर्व प्रवास,पुढील पन्नास-शंभर वर्षांत आपल्याला कुठे घेऊन जाईल..? आणखी कशा प्रकारचं ज्ञान मिळवू आपण ह्या प्रवासात..?'


नायकाला उत्तर मिळते,"हा ज्ञानाचा प्रवास जो पुढे चाललेला दिसतोय,तो मुळी पुढे पुढे जातच नाहीये.तर आपलं मागील ज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न आहे हा.आपल्या जवळ जुन्या ज्ञानाचं इतकं प्रचंड भांडार आहे की पुढे जात जात तेच आपल्याला मिळणार आहे..!"


पुढे मात्र डेन ब्राऊन लिहितो, 'हे जे प्राचीन ज्ञान आहे,ते भारत, ्चीन यांसारख्या ठिकाणीच मिळेल. विशेषतः भारतात हा अमूल्य खजिना दडलाय..!'


एखाद्या तत्त्वज्ञ व्यक्तीने असे म्हणणे ही एक बाब,आणि डेन ब्राऊन यासारख्या लोकप्रिय लेखकाने हे म्हणणे ही वेगळी बाब होते.आणि म्हणूनच मग त्या प्राचीन ज्ञानाचा धांडोळा घेत मागे वळून बघितलं की जी काही थोडीफार, शिल्लक राहिलेली,ज्ञानाची किरणं दिसतात,ती बघूनच थक्क व्हायला होतं. असं वाटतं, 'त्या काळात हे असं ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं ?'


त्या अद्भुत ज्ञानाची कवाडे किलकिली करण्याचा हा लहानसा प्रयत्न. .


- प्रशांत पोळ


बाणस्तंभ…


इतिहास हा फार चकवणारा विषय आहे.आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अशा जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते.हे असं शक्य आहे का, याविषयी मनात गोंधळ उडतो.दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.


गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी आल्यावर आपली अशीच स्थिती होते.मुळात सोमनाथ इतिहासच विलक्षण.बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं,वैभवशाली शिवलिंग.इतकं समृद्ध की, उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं.सोनं,नाणं,चांदी,हिरे, माणकं, रत्नं... सर्व गाडे भरभरून नेलं.आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तशाच वैभवानं उभं राहायचं.


मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्त्वाचं नाही.सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे.विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही.कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उद्ध्वस्त झाले नाही.


ह्या सोमनाथच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा 'बाणस्तंभ' म्हणून ओळखला जातो. हा केव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांडोळा घेत घेत मागे गेलो की,कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो,जिथे ह्या बाणस्तंभाचा उल्लेख आढळतो.


पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारला गेलाय असं सिद्ध होत नाही.हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही. 


"हा बाणस्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे.यावर एक बाण उभारलाय,आणि खाली लिहिलंय


'आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग' 


याचा अर्थ असा - या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.


ज्या क्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन् हा शिलालेख वाचला,तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला! हे। ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरंच असेल तर किती समृद्धशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!


संस्कृतमधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्थामधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत.ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे,


सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत (म्हणजे अन्टार्क्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मध्ये एकही भूखंड लागत नाही.


आता हे खरं कशावरून.. ? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही.गुगल मॅप वरून बघितलं तर वरवर बघता भूखंड दिसत नाही.मात्र तो मोठा भूखंड.एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला 'एन्लार्ज' करत करत पुढे जायचे.हे तसं किचकट काम.मात्र संयम ठेवून, चिकाटीने हळूहळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड,म्हणजे 10 Km X10Km चा, लागत नाही.


त्याखालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल.थोडक्यात,तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.


पण मूळ प्रश्न तसाच राहतो.अगदी सन ६०० मध्ये हा बाणस्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं? बरं,दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही,हे 'मॅपिंग' कोणी केलं ?सारंच अद्भुत..!


याचाच अर्थ,बाणस्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही,तर ह्या पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर ध्रुवही आहेच), हे ज्ञानही होतं.हे कसं काय शक्य झालं? त्यासाठी पृथ्वीचा 'एरियल व्ह्यू' घेण्याचं काही साधन होतं का? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता का?


नकाशाशास्त्र (इंग्रजीत 'कार्टोग्राफी' - मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र.ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत.मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला,यावर एकमत नाही.भारतीय ज्ञानाचे पुरावें मिळाले नसल्याने 'एनेक्झीमेंडर' ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो.ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड.मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे.त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे,तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे.या नकाशात उत्तर आणि दक्षिण ध्रुव दिसण्याचंही काही कारण नाही.


आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलसने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात,कोलंबसने ह्याच नकाशाचा आधार घेतलेला होता.


'पृथ्वी गोल आहे' हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळा व्यक्त केलेले आढळते.एनेक्झीमेंडरने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका 'सिलेंडर'च्या स्वरूपात बघितले होते.ॲरिस्टॉटलनेही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.


मात्र भारताजवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात.


याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्टने फक्त पृथ्वी गोल आहे,हेच सांगितले नाही,तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापनाप्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. 


आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि.मी.आहे.अर्थात आर्यभट्टच्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६%. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्टजवळ हे ज्ञान आले कोठून..?


सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ज्ञ जोसेफ श्वार्टझबर्गने हे सिद्ध केले की, 


ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते.नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच,पण नौकानयनासाठी आवश्यक असे नकाशे असल्याचेही पुरावे आढळतात.


भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं.संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा,सुमात्रा,यवद्वीप ओलांडून जापानपर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत.१९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरातच्या लोथलमध्ये अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत.यात भारताच्या प्रगत नौकानयनाविषयी अनेक पुरावे दिसतात.


अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण ध्रुवापर्यंतचे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.दुसरा अजून एक विचार समोर येतो की,दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं,की दक्षिण ध्रुवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते,तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण-स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, ('आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग) तो ज्योतीमार्ग म्हणजे नेमकं काय..?


सध्या तरी हे गूढच आहे..!


पुढील भागात 'लोहस्तंभ' 

भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ