* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: डॉ.सालिम अलींच्या सहवासात Dr.In the company of Salim Ali

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/५/२५

डॉ.सालिम अलींच्या सहवासात Dr.In the company of Salim Ali

जगद्विख्यात पक्षिशास्त्रज्ञ डॉ.सालिम अली यांना मी नावानं कोईमतूरला फॉरेस्ट कॉलेजमध्ये १९५८ सालापासून ओळखत होतो.जंगलातील भटकंतीत मी त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक 'दि बुक ऑफ इंडियन बर्ड्स' पक्षी ओळखण्यासाठी वापरीत असे.


१९६० साली मी पुणे जिल्ह्यातली वडगाव मावळात वनाधिकारी असताना शिरवते धरणावर पक्षिनिरीक्षणासाठी जाई.त्या वेळी नुकतीच कुठं नोकरीला सुरवात झाली होती.तिथं असताना त्यांचा पहिला परिचय झाला.तिथपासून त्यांच्या आठवणी मनात गर्दी करू लागतात.


डॉ.सालिम अलींच्या आठवणी म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी! त्यांची पत्नी तेहमिना यांचं निधन अगदी तरुण वयात झाल्यानंतर त्यांना व्यक्तिगत असं आयुष्य राहिलं नव्हतं.अवघा संसार पक्ष्यांचा झाला.सारं विश्व त्यांचं घर झालं.


लोणावळ्याजवळ वलवण गावातून जाताना वलवण धरणाची उंचच उंच दगडाची भिंत दिसते.तिथून आतल्या जंगलात गेलं की,शिरवते जलाशयाचं विपुल नितळ पाणी दिसतं.धरणाच्या दोन्ही बाजूंना हिरवी वनश्री.इथं मी पक्षिनिरीक्षणाला जायचो.

पाणकावळे पाण्यात मासे पकडताना दिसायचे.वृक्षांच्या जून खुंटांवर करोते पंख पसरून बसलेले असायचे.जिथं ओढ्याचं पाणी धरणात मिळतं तिथल्या कातळावर उभा राहून एखादा कातोडी उंच उड्या घेणाऱ्या चंदेरी मासळीचा तलवारीनं छेद करताना दिसे.मी डॉ.सालिम अलींना पत्र लिहिलं.त्या वेळी त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता.'एकदा वडगावला या.शिरवते जलाशयावर जाऊ.तिथं खूप पाणपाखरं दिसतात. पक्षिअभयारण्य करण्याच्या दृष्टीनं सल्ला पाहिजे.'


ते अनेक कामांच्या व्यापात गढलेले.लवकर येणं झालं नाही.बदली झाल्यामुळं मी वडगाव सोडण्याच्या तयारीत होतो.एके दिवशी गेटमधून एक स्टेशन वॅगन सरळ आत आली. गाडीतून साध्या पोशाखातील व्यक्ती उतरली.ती स्मित करीतच दाराकडे येत होती.चणीनं लहान,शिडशिडीत अंगकाठी,चेहऱ्यावर शुभ्र दाढीमिशा. रंगानं गोरी.राघूसारखं नाक.डोक्यावर सावलीची टोपी. अंगात शुभ्र पँट.बाह्यांचा गंजीफ्रॉक.गळ्यात दुर्बीण.मी ओळखलं.ते,डॉ.सालिम अली होते.ही आमची पहिली भेट.


मी डॉ.सालिम अलींना नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्यांनी खांद्यावर हात ठेवून थोपटलं.आम्ही घरात खुर्चीवर स्थानापन्न झालो.मी समोर बसून शिरवते जलाशयाविषयी इत्थंभूत माहिती सांगितली.तिथं आढळून येणाऱ्या पक्ष्यांची यादी दाखविली. पक्षिअभयारण्याकरिता तो जलाशय कसा आदर्श आहे, हे नकाशावरून दाखवून दिलं.सरोवराभोवती असणाऱ्या सुंदर चिरपल्लवी जंगलाविषयी सांगितलं.ते क्षेत्र त्यांना माझ्याबरोबर फिरून पाहायची इच्छा होती,पण मला ते आता शक्य नव्हतं.ही घटना १९६३ची.गुरूनं शिष्याच्या शोधात यावं,तसे ते माझ्या जीवनात आले.मनातील पाखरं जागी झाली.आता त्या उडालेल्या पक्ष्यांचा शोध घेत आयुष्यभर भटकतोय.


१९७० सालच्या डिसेंबर महिन्यात डॉ.सालिम अली आणि त्यांना गुरुस्थानी असलेले जर्मनीतील प्रख्यात पक्षिशास्त्रज्ञ डॉ.स्ट्रेसमन महाशय व त्यांचा चार-पाच जणांचा मित्र परिवार कर्नाळ्यात पक्षि-निरीक्षणासाठी आला.त्यांचा चार-पाच दिवसांचा मुक्काम होता.


वडगावच्या भेटीनंतर पुन्हा त्यांची भेट अशी कर्नाळ्यात झाली.

वनकुटीतील त्यांच्या शेजारच्या कक्षात मी थांबलो,तेव्हा त्यांना मला अगदी जवळून पाहता आलं. ते पहाटे चारला उठत.

मुखमार्जन उरकल्यानंतर पाच वाजता पक्षिनिरीक्षणाला जायच्या तयारीत असत.त्या वेळी त्यांचा पोशाख हिरव्या रंगाचा असे.

ऑलिव्ह ग्रीनची पँट,अंगात पोपटी रंगाचा शर्ट,डोक्यावर पी-कॅप, गळ्यात दुर्बीण व हातात नोंद वही आणि पायात निळ्या रंगाचे कॅनव्हास शू.अशा वेळी ते उभ्या उभ्या फळांचा नास्ता करीत.विशेषतः संत्री त्यांना खूप आवडायची.


बरोबर साडेपाचला आम्ही सारेजण पक्षिनिरीक्षणाला कर्नाळा किल्ल्याकडे निघालो.वाटेनं पाखरांची गाणी ऐकत,त्यांच्या आवाजावरून ती' ओळखत,तर कधी त्यांच्या रंगरूपावरून,तर कधी आकार आणि उड्डाणाच्या लकबीवरून स्ट्रेसमन महाशय पक्ष्यांची ओळखण सांगत.एका ठिकाणी झाडाखाली पाखराची पिसं विखुरलेली दिसली.त्यावर त्यांनी सांगितलेली माहिती अतिशय मार्मिक होती.ती पिसं कुठल्या पाखराची,त्या पाखराला कुणी मारलं,कसं मारलं, हे सांगत असता ते वाकून पिसाच्या अवतीभवती फिरून पाहत.नोंदवहीत बारीकसारीक गोष्टींच्या नोंदी करीत. खून झाल्यावर पोलिसानं गुन्हेगाराला शोधून काढावं तसा काहीसा हा प्रकार होता.एका परीनं ते माझं पक्ष्यांविषयीचं अरण्यवाचनच होतं.त्या अरण्यवाचनाची सुरवात झाली ती अशी.


पक्षिनिरीक्षणाला अशी सुरवात झाली.ती उत्तरोत्तर डॉ. सालिम अलींच्या सहवासात वाढत गेली.ते जर परदेशात अथवा हिमालयात गेले नसतील,तर अगदी नियमितपणे दर शनिवारी मुंबईहून पनवेलच्या माझ्या घरी बरोबर पहाटे पाचाला स्टेशन वॅगननं येत.मी त्यांची येण्याची वाटच पाहत बसलेला असे.लगेच आम्ही कर्नाळ्याची वाट धरत असू.सकाळी सहा ते नऊपर्यंत आम्ही जंगलातील साऱ्या पायवाटा तुडवीत पक्षिनिरीक्षण करीत असू.नंतर साडेनवाला विश्रामगृहावर परतल्यावर समोरच्या हिरवळीवर चहा घेत असू.पक्षिनिरीक्षणाची दुसरी फेरी पनवेल-पुणे रस्त्यापलीकडच्या जंगलात करीत असू.पक्षी कुठं पाहावेत,

निरीक्षण करताना त्यांना नेमकं कसं शोधून काढावं,एकदा शोधून काढल्यानंतर त्यांच्याविषयीच्या माहितीच्या नोंदी वहीत कशा कराव्यात,हे पहिल्यांदा त्यांच्याकडूनच मी शिकलो.


आपल्या सुंदर सरळ अक्षरात त्यांना नोंदी करताना मी अनेकदा पाहिलं आहे.परतीच्या वाटेवरून चालताना ते सांगायचे, "पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्र,तशीच कीटकशास्त्राची माहिती पाहिजे.त्याला वनं आणि वनाच्या प्रकारांविषयी ज्ञान हवं.भूगोलाचा अभ्यास हवा. रसायन आणि भौतिकशास्त्राचा परिचय पाहिजे.गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.इतर शास्त्रांप्रमाणं पक्षिशास्त्राला देखील अंत नाही.ते नित्य नूतन आहे."


मी शास्त्र आणि वानिकी शिकलो असल्यानं मला त्यांनी उल्लेख केलेल्या जवळजवळ सर्वच शास्त्रांची माहिती होती.

पक्षिनिरीक्षणामुळं इतर शास्त्रांतही उत्तरोत्तर प्रगती झाली.ते सर्व ज्ञान मनात ताजंतवानं राहिलं.त्यांचा विसर तर कधीच पडला नाही.विहंग अवलोकनाची खरी किमया त्यांनीच मला शिकविली.


ब्रेडस्लाइसपासून बनविलेले शाक किंवा सामिष टोस्ट आणि फळं असा त्यांचा मिताहार असे.थोडी विश्रांती घेतल्यावर ते अलिबागजवळ असलेल्या किहीमला जात.तिथं त्यांचा बंगला होता.रविवारचा संपूर्ण दिवस तिथं घालवून पुन्हा ताजेतवाने होऊन सोमवारी ते परत मुंबईला जात.अशा रीतीनं जवळजवळ चार वर्षे मी त्यांच्या सहवासात असताना पक्षिशास्त्राचे धडे घेतले. कर्नाळ्यात अंदाजे दीडशे प्रकारचे पक्षी आढळून येत.ते मी त्यांच्या आवाजावरून ओळखत असे.


कित्येकदा ते अचानक कर्नाळ्याला येत.मी कुठंतरी जंगलात पक्षिनिरीक्षण करीत भटकत असे.माझी चौकशी करून मला बोलावून घेत असत.माझ्याकडे स्मित करीत ते म्हणायचे,"मला तुमच्या जंगलातील वास्तव्याचा हेवा वाटतो.तुमच्यासारखं अहोरात्र जंगलात राहून पक्षिनिरीक्षण करता आलं असतं,तर मोठी बहार आली असती."अशा वेळी मी त्यांच्याकडे स्मित करीत पाहायचो.ते म्हणायचे,"चितमपल्ली,आपण असं करू या.तुमचं जीवन मला द्या,अन् माझं जीवन तुम्ही घ्या."


मी नम्रतेनं म्हणायचो,"सर,आपली बरोबरी मी काय करणार? पण आपणाला वचन देतो,मला संधी मिळाली,तर एक चांगला वनाधिकारी आणि पक्षिशास्त्रज्ञ होऊन दाखवीन."


ते माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे,"मला त्याची खात्री आहे."


'पिंक हेडेड डक' हे रानबदक नामशेष झालं होतं. चकचकीत गुलाबी डोकं आणि मान असलेला हा सुंदर पक्षी साऱ्या रानबदकांत उठून दिसतो.बाकीच्या शरीराचा रंग तपकिरी पिंगट असतो.आभाळात उडू लागला की,पंखाखालील पिवळट गुलाबी रंग त्याच्या शरीराच्या तपकिरी रंगाला शोभून दिसतो.


एकदा नवेगावच्या तळ्यात ह्या पक्ष्याची जोडी पाहण्याचा योग आला.माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना.जवळजवळ पन्नास-साठ वर्षे नामशेष झालेला पक्षी दिसल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.मी माधवराव पाटलांना आणून तो दाखविला,

तेव्हा त्यांचीही खात्री पटली.त्यांनी देखील पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी नवेगावजवळच्या वांगी आणि चिंगीच्या तळ्यात तो पाहिल्याचं आठवत असल्याचं सांगितलं.


१९७८ साल असावं.डॉ.सालिम अली 'बार्ड जंगल आऊलेट'च्या शोधात मेळघाटच्या जंगलात फिरत होते. त्या वेळी त्यांना तो सापडला नाही.परंतु १९८२ साली नवेगाव बांध येथील संजय कुटीजवळच्या जंगलात हुमायुन अब्दुलाली ह्या पक्षितज्ज्ञाला तो पहिल्यांदा दिसला.


जेरडॉन कोर्सर ह्या पक्ष्याची कथाही अशीच आहे. अंदाजे शंभर वर्षांपूर्वी हा तितिरासारखा जमिनीवर राहणारा पक्षी जेरडॉन ह्या पक्षिशास्त्रज्ञान चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंच्याच्या जंगलात पाहिला होता. अलीकडच्या काळात त्या पक्ष्याचा शोध घेता तो नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं.डॉ.सालिम अलींनी मला तो शोधून काढण्याची सूचना दिली.मला आत्मविश्वास होता की,तो सिरोंच्याच्या नदीकाठच्या जंगलात निश्चित आढळून येईल.मी त्याचा सप्टेंबर ८४ मध्ये शोध सुरू केला.तेव्हा आढळून आलं की,तो पक्षी तिथं अजूनही आहे.


एक अशीच आणखी आठवण.डॉ.सालिम अली यांच्या सूचनेवरून मी तणमोराच्या शोधला लागलो होतो.


तणमोराला इंग्रजीत 'लेसर फ्लोरिकन' म्हणतात.हा पक्षी माळढोकाच्या कुळातला.खरं म्हणजे त्याला 'छोटा माळढोक' ही म्हणतात.गेली पंचवीस-तीस वर्षं हा पक्षी कुणाच्या फारसा नजरेला आला नाही.पूर्वी तो खानदेशात आढळून येई.यातला नर दिसायला मोरासारखा,तर मादी तितिरासारखी.आकार कोंबडीएवढा.त्याचं आवडतं निवासस्थान गवती कुरण.तणात राहणारा मोर तो तणमोर.तणमोर एखाद्या डोंबाऱ्यासारखा सात ते आठ फूट उंच उड्या मारतो.माद्यांना साद घालतो.त्याचं ते कौतुक पाहायला पाच-सहा माद्या त्याच्याभोवती जमा होतात.जुन्या काळात पावसाळ्यात कुरणातल्या एखाद्या उंच ठिकाणी सकाळी उभं राहिलं की,हे अद्भुत दृश्य दिसत असे.


पण असलं दृश्य गेल्या पाव शतकात पक्षिशास्त्रज्ञांना दिसलेलं नव्हतं.चौकशी चालू झाली.हा दुर्मिळ सुंदर पक्षी नष्ट झाला की काय? अनेक नवोदित पक्षिशास्त्रज्ञ साऱ्या भारतभर त्याचा मागोवा घेऊ लागले.


वयोवृद्ध डॉ.सालिम अली स्वतःत्या पक्ष्याचा शोध घेत फिरताना जुलै महिन्यात इंदूरला गेले.तिथून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एका वनाधिकाऱ्यानं त्यांना गवती रानात तणमोराची जोडी व सहा पिलं दाखवली.ते दृश्य पाहून डॉक्टर अक्षरशः लहान मुलाप्रमाणे नाचले.ज्या अर्थी मध्यप्रदेशात हा पक्षी दिसला,त्या अर्थी त्याला जोडून असणाऱ्या विदर्भातही तो सापडायला पाहिजे,असं त्यांचं अनुमान होतं. महाराष्ट्राच्या मुख्य वनसंरक्षकांना जुलै ८१ मध्ये डॉ. सालिम अलींनी पत्र पाठवलं.लिहिलं होतं, 'वनविभागातील अधिकारी मारुती चितमपल्ली यांना तणमोर पक्ष्याच्या सर्वेक्षणाला पाठवाल काय?'वरिष्ठ अधिकाऱ्यांत याविषयी विचारविनिमय झाला.मला तीन-चार महिन्यांकरिता नवेगावबांधहून सुट्टी मिळाली.पावसाळ्याचे तीन-चार महिने विदर्भातल्या आठ जिल्ह्यांतून तणमोराचा शोध घ्यायचा होता.


सर्व पाहणीनंतर माझी खात्री झाली की,तणमोर सर्व विदर्भात आहेत.मात्र शिकार आणि पिकांची औषधफवारणी इत्यादींमुळं त्यांची संख्या कमी होत चालली असावी,पण हा पक्षी नष्ट झालेला नाही.मुंबईस जाऊन डॉ.सालिम अलींची मी भेट घेतली.दौऱ्याचा धावता वृत्तान्त श्रवण करून त्यांनी पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली.सविस्तर अहवाल खात्यातर्फे पाठवायला सांगितला.


मुंबईतील पाली हिलमधील त्यांच्या घरी मी अनेकदा गेलोय.

अनेक मजली उंच इमारतींच्या समूहात त्यांचं ते कौलारू घर एखाद्या पाखराच्या घरट्यासारखं शोभे.समोर बैठक कक्ष.

त्यातून आत गेलं की,लांबच लांब हॉल.हॉलच्या मध्यावर तितक्याच लांबीच्या टेबलांची ओळ.टेबलांवर ठिकठिकाणी पुस्तकांचे ढीग ठेवलेले.त्या ग्रंथांच्या ढिगाआड ते कुठंतरी बसून लिहीत-वाचीत असलेले.त्यांचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. त्यात इंग्रजीबरोबर इतर परदेशी भाषांतील पुस्तकांचाही समावेश होता.साऱ्या भिंती पुस्तकांच्या.मी त्या ग्रंथसंपत्तीकडे वेड्यासारखा पाहत राही.तो डॉ.सालिम अली समोरून स्मित करीत आनंदानं स्वागत करीत येत. अशा वेळी हाफ पँट आणि अंगात जर्सी अशा साध्या पोशाखात ते असत.त्यांची राहणी अत्यंत साधी होती. स्वभाव मनमोकळा,शिस्तप्रिय,वक्तशीर आणि भिंतीवर त्यांच्या पत्नीच्या फोटोशिवाय अन्य कुठलीही चित्रं नाहीत.


भारतात नामशेष झालेले वरील तीन प्रकारचे पक्षी म्हणजे पिंक हेडेड् डक, बार्ड जंगल आऊलेट, जेरडॉन कोर्सर हे विदर्भातून शोधून काढण्यात आम्हाला यश मिळालं, ह्यापरता आनंद नाही. त्यांना मी दिलेलं वचन अशा रीतीनं पुरं करून दाखविलं.


डॉ.सालिम अली यांच्या निधनाच्या बातमीनं मला धक्काच बसला.

यापूर्वी त्यांच्या आयुष्यात दोनदा त्यांच्या निधनाची वार्ता जगभर पसरली होती.


अशा बातमीनं त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं म्हणतात. त्यांच्या बाबतीत ते खोटं ठरलं.शतायुष्याकडे झुकलेल्या डॉ.सालिम अलींची ह्या वेळची त्यांच्या मृत्यूची वार्ता खरी ठरली.त्यांच्या मृत्यूनं पक्षिशास्त्राच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.


डॉ.सालिम अली हे परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याच्या गूढरम्य रूपाचा शोध आयुष्यभर घेत होते.कैलास आणि मानस सरोवराची म्हणजे पक्षितीर्थाची यात्रा करणारा हा युगपुरुष ह्या धरतीचा नव्हताच.त्यांचं नातं पक्ष्यांप्रमाणं आभाळाशी होतं.म्हणूनच आता ते परमहंस गतीला मिळाले आहेत.