खरे प्रेम तसे कठीणच असते. पण आपण ते अनुभवायला आतुर असतो.प्रेम हे जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी सर्व त्याच्या पार्श्वभूमीसाठी असते. प्रेम करणे हे निसर्गाने मानवावर सोपवलेले सर्वांत कठीण आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. तरुणाईला वाटते की प्रेम हा आपला प्रांत आहे,पण तरुणांची प्रेम करायची कुवतच नसते.आपल्या सर्वस्वानिशी प्रेम करायला शिकावे लागते. प्रेम म्हणजे दुसऱ्यामध्ये विरघळून जाणे किंवा स्वतःला समर्पित करणे किंवा एक होणे नव्हे ! कारण दोन अपूर्ण, स्वतःला नीट न ओळखणारी,एकस्पंद नसलेली माणसे एक कशी होतील ?
प्रेम हे तुम्हाला संपूर्ण परिपक्क करणारी गोष्ट आहे. स्वतः पूर्णत्वाकडे नेणारी,आपल्या आतील अवकाश असीम विस्तारणारी,दुसऱ्यासाठी अवघे विश्वच बनायची प्रेरणा देणारी बाब म्हणजे प्रेम !कधी कधी एका आयुष्यात ते पूर्णत्वाला जाईल असे नाही.प्रेम जीवनाचे अंतिम रूप आहे.तरुण माणसे प्रेमात स्वतःला विरून टाकतात. एकासाठी दुसरा मिटवून घेतो,अन् आपल्याबरोबर दुसऱ्यालाही अपूर्ण बनवतो.अशा तुकड्यातून कुणाला कसे काय पूर्णत्व मिळू शकेल? त्यातच आनंद मानून राहणाऱ्याच्या वाट्याला भविष्यात निराशा अन तिरस्कार हेच येईल. सामान्यांना त्यातच स्वर्ग आहे,असे वाटते,पण आपला आतील अवकाश,आपला सर्जनाला प्रेरक ठरणारा असीम एकाकीपणा कधीही मिटू देऊ नये. प्रेमाने त्याच्या या अवकाशाच्या कक्षा आणखी रुंदावायला हव्यात खऱ्या प्रेमात दोघांचाही विकास व्हायला हवा ! एकमेकांपासून स्वतंत्र, विकसनशील अन तरीही बंधनात असणे, ही भावना जाणवायला हवी !
'प्रेम' या मूल्याविषयी जर्मन कवी रिने मारिया रिल्के याने एका तरुण कवीला लिहिलेले पत्र..!
'अवेकन द जायंट विदिन मधून..'