पाण्याला नवजीवन देणारं दांपत्य संदीप जोशी व सायली जोशी यांचे चरित्र समजून घेत असताना,मला एक बोधकथा आठवली.
ज्यांचा सत्यावर विश्वास आहे ते साधे सरळ आणि महत्त्वाचे सत्य या बोध कथेत मांडले आहे.
एक म्हातारा माणूस त्याच्या नातवाला म्हणतो -
" माझ्या मनात सदैव एक लढा चाललेला असतो.या भयंकर लढाईत दोन लांडगे लढत असतात. त्यातला एक लांडगा असतो दुष्टस्वभावी म्हणजे संतापी,हावरा,मस्तरी,उध्दट आणि भ्याड,तर दुसरा असतो सुष्टस्वभावी म्हणजे शांत,प्रेमळ,विनम्र,उदार प्रामाणिक आणि विश्वासू ! हे दोन लांडगे तुझ्याही मनात आणि सर्वच माणसांच्या मनात लढत असतात."
क्षणभर विचार करुन नातवाने विचारलं,
" त्यातला कुठला लांडगा जिंकणार ? "
त्यावर म्हातारा हसून म्हणाला,
" तु ज्याला खाऊ घालशील तो जिंकणार..!
पाण्यामुळे जीवसृष्टी आहे. पाणी जीवन देते व तेच जीवन आहे. पण पाणी जेव्हा प्रदूषित होते, पाणी मृत होते,त्या मृत पाण्याला नवजीवन संदीप व सायली जोशी देतात. शअगदी काव्यमय आणि अद्भुत वाटावे असेच हे आहे. निसर्गालाच जागृत करून त्याच्याकडूनच प्रदूषण निर्मूलन करण्याची प्रक्रिया करवून घेण्याचे तंत्रज्ञान भारतात जोमाने सुरू करणारे जगभरात प्रसिद्ध पावलेले हे दांपत्य आहे.
ही महान कथा सुरू होते धुळ्यातील बंगल्यामधील एका खोलीत सुरु झालेल्या ऑफिसमध्ये आणि व्हाया पुणे ती देशापरदेशांतून प्रवास करून दिल्लीतील गंगा शुद्धीकरण मंत्रालयापर्यंत पोहोचते... पुन्हा तिथून निघून ती पसरतच आहे,भारतभर....
नदी टप्प्याटप्प्याने शुद्ध होत चालली आहे... त्यात जिवांची निर्मिती होताना दिसते आहे... तेव्हा हे पती-पत्नी सहजच म्हणतात 'आम्ही नदीला आई होताना पाहत भारावून गेलो होतो.'
कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदेपासून सर्वोच्च सरकारी ऑफिसला एक वाक्य ते नेहमी ऐकवणार...'माझ्या देशातल्या नद्या मला शुद्ध करायच्या आहेत,ते माझे जीवनध्येय आहे!!' संदीप जोशी आणि सायली जोशी यांनी बायो रेमेडियल पद्धतीने दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्याच्या प्रक्रिया अनेक ठिकाणी राबवल्या.
दूषित पाणी नैसर्गिक पद्धतीने आणि प्रक्रियेने शुद्ध करतात.नेहमीच्या ट्रीटमेंट प्लांटच्या फक्त पाच ते सात टक्के रकमेत,त्यातही त्याला ना कधी ऊर्जा लागते ना देखभाल खर्च ना मनुष्यबळ !! हिरो होंडाची जाहिरात आठवते ना 'फिल ईट फरगेट इट...' तसंच बॅक्टेरिया काम करतच राहतात...
संदीप जोशी ह्या धुळ्याच्या तरुणाने पुणे विद्यापीठातून परिसर विज्ञान (एनवायर्मेन्ट सायन्स) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याच विषयात काम सुरू केले, तो काळ होता १९९१ चा,विविध कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे पारंपरिक पद्धतीचे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची प्रक्रिया व त्यांचे डिझाईन विकसित करणे असे काम सुरू केले होते. ते नोकरी करत असलेल्या सल्लागार कंपनीच्या वतीने अनेक खासगी कंपन्यांना डिझाईन देणे सुरू होते,पण त्यात त्यांना काही फार दम वाटत नव्हता. बऱ्याचदा करूनही या कामचलाऊ कामाविषयी त्यांना आस्था नव्हतीच. एक गोष्ट सतत अंतर्मनात बसली होती.... बायो रेमेडियल ट्रीटमेंट !! हीच शाश्वत प्रक्रिया व पद्धत आहे, आपण यातच काम करायचे.वेळ लागेल ही पद्धत लोकांना स्वीकारायला,पणआपण हेच करू..
विविध कंपन्यांशी संपर्क करून ते नेहमी सांगायचे,की आम्ही बीआरटी करून देऊ, कमी खर्चात प्रभावी उपाय होईल.दरम्यान १९९४ मध्ये त्यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिला शोधनिबंधही वाचला.त्याच वर्षी त्यांचे सायलीजींशी लग्न झाले. तशी ही दोन्ही कुटुंबे धुळ्यातील एकमेकांचे कौटुंबिक मित्रच, सायलीजीही मायक्रोबायोलॉजी गरवारे कॉलेज (पुणे) मधून झालेल्या... १९९४ ला एमएस्सी झाले आणि त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. दोघांचे शिक्षण एकमेकांना पूरक होते.
त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा धुळ्यातील बंगल्याच्या खोलीतून केला. ज्ञान हेच भांडवल!
जळगावला कल्याणी ब्रेकचे एक युनिट होते. तिथे संदीपजींचा मित्र होता नोकरीला त्याच्या ओळखीने प्लांट हेड एस. आर. कुलकर्णी यांच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचली.त्यांनी, 'चला बघू तर खरं' म्हणून पहिली ऑर्डर संदीपजींच्या हातात दिली.ते युनिट होते,
इलेक्ट्रोप्लेटिंगचे,यात सांडपाणी खूपच दूषित तयार होते.यावरची दूषित पाण्यावरची पारंपरिक ट्रीटमेंट तर खूप महागडी असते.त्यामुळे पाणी शुद्ध करण्याच्या पाठीमागे कोणीच लागत नव्हते. (अन् आपल्या देशात तेव्हा व आताही कोणत्याही प्रदूषणाबाबत काही फिकीर बाळगायची रितच नाही.) काम केले त्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रियेचे पहिल्याच व्यावसायिक कामात यशही मिळाले. इलेक्ट्रोप्लेटिंगच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये मायक्रोब्ज जगू शकणार नाहीत,कारण त्याच्यात खूप हेवी मेटल असतात,अशी शंका असल्याने हा प्रयोग कितपत यशस्वी होतो,याबद्दल अनेकजण साशंकच होते.पण त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला.जळगावच्या प्लांटमध्ये त्यांनी रोज तयार होणाऱ्या ६० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून दाखवली.ही यशस्विता झाल्यावर लगेच त्याच कंपनीच्या चाकणच्या प्लांटच्या प्रक्रियेचे काम मिळाले. मग काय 'पाऊले चालती पुण्याची वाट' चाकणचे कामही पूर्ण यशस्वी झाले. दोन्ही कामे खूप कमी पैशात झाली होती.कंपनीचे लोक काही काळ साशंक होते,पण हे दांपत्य निश्चिंत होते. 'बायोरिमिडील ट्रीटमेंट' चे हे पहिले पाऊल त्यांचेच... पाऊलवाट त्यांचीच... आणि गेल्या पंचवीस वर्षांच्या परिश्रमाने,साधनेने त्यांचा राज्य महामार्गही त्यांनीच केला.
या यशस्वीतेतून पुढे कामे मिळत गेली. बऱ्याचदा पुणे आणि बाहेरील विविध कंपन्यांचे सांडपाणी ते आपल्या पत्त्यावर मागवायचे, प्रयोगासाठी. हे कॅन पत्त्यावर त्यांच्या घरी आणि ऑफिसला पोहोचायचे कुरीयर,ट्रान्सपोर्टने हे सांडपाणी हीच संपत्ती,कारण ते प्रयोगाचे मटेरिअल.
त्यावर विविध प्रयोग सुरू,त्यातून त्यांनी अनेक प्रक्रिया व अनेक उत्तरे तयार केली. यातूनच एखादा शोधनिबंध तयार व्हायचा. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कारखान्यात कामे होत होती,पण अनेक कामे प्रदूषण मंडळाची मान्यता किंवा सरकार मान्यता या मुद्द्यांवर हातची जायची. खूप खंत वाटायची त्यांना.पण फिल्डवर यश आणि यशच मिळताना मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढत होता.खरंतर त्यांनी भर दिला होता संशोधनावर,त्यांनी संस्था जी स्थापन केली तिचे नावच मुळी 'सृष्टी एन्व्हायरमेंटल रीसर्च इन्स्टिट्यूट',हिचे मुख्य ध्येय नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण! ट्रीटमेंट प्लांट व त्यातील रासायनिक प्रक्रिया यांना खूप मर्यादा आहेत व त्या खूप खर्चिक आहेत.त्यात ऊर्जेचा वापर मोठा असतो आणि इतके सगळे असूनही त्यातून बाहेर पडणारे पाणी तितकेसे निसर्गाला अनुकूल नसते.ते प्रदूषित राहते.याउलट 'सृष्टी' किंवा 'सेरी' प्रत्येक इकोसिस्टीमला तिच्या कमतरता भरून काढण्यासाठी तेथील परिस्थितीप्रमाणे उत्तरे शोधायची असतात,अशी संकल्पना मांडत होती. प्रत्येक ठिकाणी नव्याने शोध घेणे व त्या पद्धतीने तेथे पर्याय देणे हे त्यांना सांगायचे होते. पण सरकारदप्तरी याची माहिती असलेले लोक नव्हते व त्यांची नवीन ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. काही ऐकायचा किंवा समजून घेण्याचा त्यांना धीर नव्हता आणि इच्छा ही नव्हती. हे सर्व नवीन तंत्रज्ञान होते आणि यात प्रमाणीकरण (Standerdisation & Formulation) असे काही अजून झालेले नव्हते. राजमान्यता नसल्याने चांगला परिणाम मिळत असूनही बरेच इंडस्ट्रीतले लोक हे तंत्रज्ञान स्वीकारायला तयार नव्हते..
त्या काळात १९९८ मध्ये पुण्यात इलेक्ट्रोप्लेटिंगची जवळपास ८० छोटी मोठी युनिट्स होती. त्यांना अनेकांना प्रदूषण मंडळाच्या पाण्याविषयीच्या नोटिसा आल्या होत्या. त्यापैकी एका युनिटला 'सृष्टी'ने ट्रीटमेंट प्रोसेस उभी करून दिली.अगदी जळगावला मिळाले तसेच परिणाम मिळाले.सर्वांना दिसले की प्रक्रिया यशस्वी होते आहे. त्याला खर्च आला होता उणेपुरे पाच हजार रुपये !!
सर्व इलेक्ट्रोप्लेटिंग युनिट मालकांचे ठरले, की हा प्रक्रिया प्लांट आपल्याकडे बसवायचा,सर्व बोलणी झाली. सर्व प्लांटला बी.आर.टी. बसवायचे ठरले.त्यांच्या असोसिएशनच्या वतीने बोलणी झाली,पण एमपीसीबीने सांगितले, की आम्ही ही ट्रीटमेंट मान्य करणार नाही. कारण ही आधी कुणी केलेली नाही.याचा पाया आम्हाला माहीत नाही. आमचा यावर विश्वास नाही. ऑर्डर रद्द! पुढे अनेक वर्षे हीच काय, कोणतीही ट्रीटमेंट सिस्टीम कुठल्याही इलेक्ट्रोप्लेटिंग प्लांटवर बसली नाही. उलट सर्वांचे वाढणारे अधिकाधिक दूषित सांडपाणी तसेच वाहत राहिले.
आपल्या भारतीय लोकांना आपल्या लोकांनी केलेल्या संशोधनावर विश्वास नसतो. त्यांना समजून घ्यायची तयारीही नाही. स्टार्टअप धोरण आले, तरीही लाल फिती काय किंवा खासगी क्षेत्र काय, विश्वास, प्रोत्साहन यांना थारा नाही. परकीय, इम्पोर्टेड ते चांगले, मग ती वस्तू असो की सेवा अन् तंत्रज्ञान असो की संशोधन, मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीचे आजही आपण आणि आपली व्यवस्था शिकार ठरत आहोत. हाच अनुभव 'सृष्टी'ला २००६ मध्ये हैदराबाद येथील हुसेन सागर स्वच्छतेबाबतच्या कामातही आला. त्यांना त्यांची प्लांटची प्रोजेक्ट कॉस्ट अतिशय कमी,अनुभव पुरेसा, सादरीकरणही तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ या सगळ्या गोष्टी जुळत असून ही त्यांना काम मिळाले नाही. उलट काम इस्रायली कंपनीला मिळाले. ज्यांच्याकडे याचा काहीही अनुभव नव्हता. तंत्रज्ञानाचा कोणताही खुलासा त्या कंपनीने केलेला नव्हता,उलट त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की आमचा हा पहिला प्रकल्प आहे.पुन्हा परदेशी म्हणजे भारी आणि त्यात इस्राईल म्हणजे आणखी भारी... याच समजुतीतून 'सृष्टी'ऐवजी त्या परदेशी कंपनीला काम गेले होते.
या विषयातले तज्ज्ञ 'सृष्टी'च्या तंत्रज्ञानास मान्यता देत होते. आपल्याकडे अनेक कंपन्यांमध्ये प्लांट यशस्वी होत होते,पण सरकारी यंत्रणेकडून अधिकृत मान्यता मिळत नव्हती,ही सल सतत होती. अपूर्णता वाटत होती. तसेच ती व्यवसायाची व पर्यावरणाची गरज पण होती..
...आणि पुढील संवाद मन वेधून घेतो.'हो, इथे नदी खूप लाल होते आहे... पण नदी जिवंत होते आहे... नदीत मोयना (बुरशीचे नाव) येऊ लागले आहेत. मोयना हे त्या नदीतल्या माशांचे खाद्य आहे. आता मोयना आले म्हणजे लवकरच मासेही येतील.'पर्यावरण अभ्यासक खूप आनंदात आणि उत्साहात नदी जवळूनच ह्या गोष्टी सांगत होता.नदी जिवंत होऊ लागली आहे, ही त्याची ही सुरुवात होती. नदी आई बनताना आम्ही पाहत होतो, या काव्यभाषेत एका वाक्यात सगळ्या सगळ्या भावना येत होत्या.
किती हे काव्यमय... मला एकदम जीवसृष्टीची उत्पत्ती आठवली.एकपेशीय प्राणी.... त्यातून जिवाणू... त्यातून हरित द्रव्य तयार करणारा पहिला जिवाणू... त्यातून पहिली हरितद्रव्य निर्मिती... मग वनस्पती विश्व... मग प्राणी-विश्व सायलीजींनी हे सर्व एखादे सुंदर काव्य ऐकवावे तसं भावपूर्ण शब्दांत ऐकवलं. ही संवेदनशीलताच त्यांना कार्यप्रवृत्त करते हे जाणवतं. "ज्ञानेश्वरांनी संवेदनशील माणसाचं खूप उत्कट वर्णन केले आहे,ज्याला मुंगीच्या पायातल्या पैंजणाचा आवाज ऐकू येतो आणि फुलपाखराची उचकी दिसते तो संवेदनशील माणूस !! " इथे तर संदीप सायलीजींना जिवाणूंच्या संवेदना ऐकू येण्याचा सराव झालाय.त्या जिवाणूंच्या संवेदना मलाही भविष्यात ऐकू येतील असा विश्वास मात्र दृढ झाला.
पुढील उदाहरण वाचताना तर मानवी उत्क्रांतीचे रहस्य समजल्याचा आनंद झाला.
प्रत्येक वॉटर बॉडीचे आपलं एक वैशिष्ट्य असतं तेही लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ कृष्णेचे पाणी खूप संथ असते,त्याचबरोबर त्याची खोली खुप असते. काही नद्यांमध्ये कठीण खडक असतात,तर काही नद्यांच्या तळाशी वाळूचे खूप खूप उंच थर असतात.असे वेगवेगळ्या टप्प्यांत आम्ही प्रवाहाचे निरीक्षण नोंदवतो.मोजमापे घेतो.यानंतर समजून घ्यावी लागते ती नदीची किंवा प्रवाहाची इकोसिस्टीम,प्रत्यक्ष जिथे प्रवाहावर काम करायचे,तेथील निसर्गच बरंच काही बोलत असतो.त्याचे निरीक्षण बारकाईने करून त्याचाही विचार ट्रीटमेंट करताना करावा लागतो. त्यांची खूप मदत होते.त्याची काही उदाहरणे देताना त्यांनी काही रंजक माहिती दिली. नदी किंवा प्रवाहाच्या काठावर दिसणाऱ्या पक्ष्यांवरून काही अनुमान काढले जाते. घार, कावळे,टिटव्या असे पक्षी बहुदा कुजलेले मांस खातात. त्यावरून तिथे मृत मासे मोठ्या संख्येने आहेत हे समजते... म्हणजे नदीची इकोसिस्टीम मृतावस्थेत आहे,असे अनुमान निघते. खंड्या, बगळा असे मासे खाणारे पक्षी असतील, तर काही प्रमाणात इकोसिस्टीम जिवंत आहे,असे समजण्यास हरकत नाही.आणखी एक उदाहरण पिंपळ, वड, उंबर, करंज व तत्सम वृक्ष या इकोसिस्टीममध्ये खूप कमी असतील किंवा नसतील,तर त्याचे कारण तिथे भारद्वाजासारखे पक्षी जास्त संख्येने आहेत.भारद्वाज पक्षी इतर लहान पक्ष्यांची अंडी खातात ज्या पक्ष्यांच्या विष्ठेतून वड,पिंपळ या वृक्षांच्या बीजाचे परिवहन होते. पक्षी नाहीत " म्हणून वृक्ष ही तुरळक असे ते निरीक्षण.जिथे जलपर्णी आहे, त्या पाण्यात फॉस्फेट,नायट्रेट व तत्सम रसायने आहेत. बेशरम, आळू, कर्दळी भरपूर प्रमाणात वाढलेली असेल, तर पाणी नक्की दूषित आहे. कारण ही पक्ष्यांशिवाय वाढणारी इकोसिस्टीम आहे, हे समजते. तर अशा प्रकारे हे बायोइंडिकेटर प्रवाहाबद्दलची बरीच समज वाढवतात. (मारुती चितमपल्ली यांचे लिखाण वाचताना जंगल समजत जाते, त्या विषयी प्रेम आणि तादात्म्य वाढत जाते.)
हे अभ्यासपूर्ण प्रकरण वाचताना मी सध्या मारुती चितमपल्ली यांचे 'चकवाचांदण' हे पुस्तक वाचत असल्याचे मला नैसर्गिकरीत्या समाधान मिळाले.
'पहिला आणि सर्वोत्कृष्ट विजय म्हणजे स्वतःला जिंकणे; स्वतः द्वारे जिंकले जाणे हे सगळ्यात अत्यंत लज्जास्पद आणि अधर्म आहे.'
प्लेटोचा हा प्रदीर्घ अभ्यासपूर्ण विचार या पुस्तकाशी मला जोडून ठेवत होता.
स्वयंशिस्त लावल्यास अनेक अशक्य कामे सहज शक्य होतात.यासाठी चिकाटी,मेहनत व विश्वास महत्वाचा आहे.
शुभ्र तुरे फेसांचे,जीव घेणे !
संभाजी पठारे यांची स्टोरी
तुरे फेसांचे... ओढ्यालगतच्या झुडपांवर, नदीच्या किनाऱ्यावर,प्रवाहातल्या शुभ खडकांवर,खाडीच्या पाण्यावर शुभ्र तुरे फेसांचे, दुर्गंधी... पाण्याबरोबर शेतमळ्यात पसरली. शुभ्र तुरे फेसांचे जीवघेणे... नदी खाडीतील मासे गायब झालेले,असलाच चुकून एखादा मरून तरंगत येतो काठावर.काजू,आंबे,कोकम यांचा मोहर धरेना, शेतात गेलेले हे पाणी का संपवते हे पीक. नदीतील खडकांवरही धरू देत नाही शेवाळ जरासेही.शुभ्र तुरे फेसांचे धाक दाखवतात झाडेझुडपे,पशुपक्षी सगळ्यांच्याच जगण्याला,महाड परिसराला... पण तो आला, त्याने पाहिले, त्याने मनाशी ठरवले आणि इतरांना बरोबर घेत हे बदलवलंही... संभाजी पठारे यांनी महाड परिसरात औद्योगिक जलप्रदूषण रोखण्यासाठी कंबर कसली...
सगळेच कारखाने आपले सांडपाणी जवळजवळ काहीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून देत असत.पुढे सामायिक प्रक्रिया केंद्रातही हाच प्रकार आणि त्यातून बाहेर पडणारे पाणी तर अति भयानक ! तांत्रिक भाषेत सांगायचे,तर त्या पाण्यासाठी केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे COD हा तीन हजार इतका असायचा.म्हणजे नदीच्या शुद्ध पाण्यात हे सांडपाणी मिसळल्यावर तिच्याही पाण्याचा जवळ जवळ इतकाच COD होणार.
पाण्याच्या दूषितपणा मोजण्याची परिमाणे बरीच असली तरी सर्वात मुख्य दोन परिमाणे असतात.
१. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड.
२. सीओडी - केमिकल ऑक्सिजन डिमांड
पाण्यातील सेंद्रिय (ऑर्गनिक) घटकांचे विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन पाण्यातील जीवाणू व इतर सूक्ष्म जीवाणूंच्या श्वसनासाठी हवा असतो.पाण्यात मुळात ऑक्सिजन विरघळलेला असतो.तो विरघळलेला ऑक्सिजन पाण्यातील माशांसहित सर्व जलचरांना श्वासोच्छ्वाससाठी आवश्यक असतो.पण जसजसे पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढत जाते,तसतसे सेंद्रिय घटकांचे विघटन होऊन पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. इतकेच काय जलचरांना हवा असलेल्या प्रमाणात ऑक्सिजन येण्यासाठी पाण्याची ऑक्सिजनची मागणी वाढते (त्यालाच बीओडी असे म्हणतात) तो ऑक्सिजन या सेंद्रिय पदार्थांचे विघटन प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मैल्यामुळे त्या सांडपाण्याचा बीओडी अधिक असतो. तसेच अशाच प्रकारे असेंद्रिय (Non Organic) पदार्थांच्या विघटनासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीला केमिकल ऑक्सिजन डिमांड असे म्हटले जाते.या दोन्ही प्रकारच्या ऑक्सिजनची मागणी जेवढी जास्त तेवढे पाणी अधिक प्रदूषित असते.सीओडी व बीओडी मोजण्यासाठी विविध रासायनिक प्रक्रिया आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जात आहेत.
स्वतः २००० मध्ये संभाजी पठारे १९८९ मध्ये केमिकल इंजिनिअर झालेले. २००४ पर्यंत दोन-तीन मोठ्या साखर कारखान्यातून विविध पदावर काम करून आलेले. तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता. सहकारातून खाजगी क्षेत्रात आलेले पठारे २००४ ला महाडमध्ये एका चांगल्या कंपनीत रुजू झाले. मुळात शेतकरी कुटुंबातला खेड्यातला जन्म. महाविद्यालयीन शिक्षण ही ग्रामीण भागातच, पहिली पंधरा वर्षे नोकरीही साखर कारखान्यात म्हणजेच ग्रामीण भागातच आणि शेतकऱ्यांशी संबंधित खूप संवेदनशील मनाचा हा माणूस हुशार आणि मेहनतीही.
२००४ मध्ये सामायिक सांडपाणी केंद्राच्या कार्यकारणीत ते दाखल झाले. पुढची सहा-सात वर्षे त्या कार्यकारिणीचे सदस्य राहिले. तेथील सर्व कामकाज पाहून ते अस्वस्थ होत होते. बऱ्याच वेळा नदीकाठच्या गावातून तक्रारी घेऊन लोक येत असून बऱ्याच वेळा त्यांना हतबलता जाणवायची,अपराधी वाटायचे. २०१० मध्ये या सांडपाणी केंद्राचे ते व्हाईस चेअरमन झाले. त्यांनी बऱ्याच कारखान्यांर्गत तसेच इंडस्ट्रियल एरिया व त्यांच्या प्रक्रिया केंद्रे याविषयी माहिती गोळा करणे सुरू केले.सर्वांशी संवाद वाढवला. दरम्यान ज्या कंपनीत काम करत होते,ती कंपनी यांना बढत्या देतच होती.सांडपाणी केंद्रावर ते सोडून कुणीही विचार करीत नव्हतं.कोण चुकतंय,कोण मुद्दाम करतोय किंवा कोणामुळे किती नुकसान होतं यावरही त्यांनी सखोल माहिती घ्यायला सुरुवात केली होतीच..
याच दरम्यान त्यांना एक कल्पना सुचली. ते स्वतः ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या सांडपाण्यातून काही प्रक्रिया केल्या तर त्यातून ॲसिटिक ॲसिड तयार होऊ शकत होते,हे ॲसिटीक ॲसिड व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्न देणारे होते.ॲसिटिक ॲसिडचा प्लांट होता,पण तो पुर्ण क्षमतेने वापरला जात नव्हता.पठारेंनी तो सुरु केला. त्यातून कंपनीच्या उत्पन्नात भर पडली आणि त्यांच्या कारखान्यांच्या सांडपाण्यातील प्रदूषणाची पातळी भर खूप कमी झाली. नंतर कंपनीत शक्य त्या प्रकारे पाणी साठवण्याचे उपाय (उदा: बोरवेल रिचार्ज व रेनवॉटर हार्वेस्टिंग) अवलंबले. कंपनीतील प्रत्येक विभागानुसार पाण्याचे लेखापरीक्षण करून घेतले. विविध ठिकाणी पाणी वाचवण्याचे तंत्र अवलंबले गेले. त्यात मूळ रासायनिक प्रक्रियेतही काही बदल करायचे धोरण त्यांनी ठेवले. इतके झाल्यावर कंपनीच्या सांडपाण्यातही त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्याची यंत्रणा सुरु केली.जलसंधारणाचे,पाणी वाचवण्याचे, रिसायकलिंग अशी जवळजवळ सर्व मॉडेल्स उभी केली आणि जलसंवर्धन संबंधित सर्व योजना राबवायला सुरुवात केली होती. त्यासाठी आधी कंपनीच्या व्यवस्थापनाला समजावून सांगणे,आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेणे, महत्त्व पटवणे हे त्यांनी सुरू केले होते.मग कधी निर्मितीप्रक्रियेत काही बदल करणे,काही नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे व त्याची कंपनीत अंमलबजावणी करणे हे प्रामुख्याने केले. तंत्रज्ञान व्यवहार आणि पाणीबचत या त्रिसूत्रीचा वापर,प्रयोग करत करत त्यांनी यशस्वी केला.
कारखाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प खरंतर का चालवत नाहीत? कारण पठारे त्यांच्या स्वतःच्या कंपनीतील विविध उपाययोजनेतून जो अभ्यास झाला त्याचे मुख्य फलित म्हणजे प्रक्रिया खर्चापेक्षा दंड - हप्ते हे कमी खर्चाचे असतात.सांडपाणी प्रक्रियेसाठी लागणारा खर्च खूप जास्त येतो,त्यापेक्षा दंड भरणे,यंत्रणेला हप्ते देणे असे त्या कंपन्यांना वाटते हे सोयीचे आहे. हा गैरसमज आहे हे सिद्ध झाले.कोणत्याही कारखान्याने थोडा जास्त भांडवली खर्च केला आणि नफ्यात घट किंवा उत्पादनाची वाढवलेली वाजवी किंमत यातून तो झालेला खर्च वसूल केला.तर सांडपाणी प्रक्रियेतून चांगले पाणी बाहेर टाकले जाणे शक्य आहे, हा धडा त्यांनी आपल्या कंपनीत सिद्ध केला. २०१० मध्ये त्यांना सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष करण्यात आले. पठारेंचा आग्रह सुरू होता की आमच्या कंपनीने ज्या काही उपाययोजना केल्या आहेत तशाच सगळ्यांनी आपापल्या कंपन्यांमध्ये कराव्या. नंतरच ते पाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात सोडावे.पण फार कोणी मनावर घेत नव्हते. त्याच दरम्यान जगभरातील औद्योगिक वसाहतींचा प्रदूषणा संबंधात सर्वे करण्यात आला होता. त्या सर्वांमध्ये जगातील सर्वोच्च प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील पहिल्या तीसमध्ये महाड औद्योगिक वसाहतीचा नंबर आलेला होता. ही वसाहत 'थर्टी डर्टी' म्हणून कुप्रसिद्धीस आली. साहजिकच महाडमधील विविध रासायनिक कारखान्यांच्या पुढे नवीन समस्या उभ्या राहिल्या.जागतिक बाजारपेठेत येथील उत्पादनबाबत पीछेहाट व्हायला लागली. त्याचबरोबर भारत सरकारनेही एका नव्या कायद्याच्या आधारे महत्त्वाचा निर्णय असा दिला होता की,ज्या वसाहतींच्या सांडपाण्याबद्दल व हवाप्रदूषणाबाबत आजूबाजूच्या गावातील, वाड्या वस्त्यावरील त्यातील लोकांच्या तक्रारी आहेत, तेथील कारखान्यांच्या परवान्याबाबत, त्यांच्या विस्तारीकरणबाबतच्या परवानगीला पूर्ण थांबवण्याचे धोरण सरकारने जाहीर केले होते. यामुळे महाडमधील ज्या कंपन्यांना विस्तार करायचा होता त्यांचे घोडे अडले होते. वेगवेगळ्या कंपन्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक आपापल्या परीने प्रदूषणाबाबत ब्लॅकमेलिंग करीत होतेच.त्यातून खंडणी वसूल करत होते.या सर्व पार्श्वभूमीवर पठारे यांच्या कंपनीस काहीही तोशीस नव्हती,कारण सर्व नियमात सुरू होते व नियमात करूनही उत्पादन खर्च आटोक्यात येत होता.त्यामुळे त्यांचे संचालक व व्यवस्थापन पठारेंवर बेहद्द खूष होती.
आता इतर कंपन्यांना त्यांची चूक उमगली.इतर सर्व कारखान्याच्या प्रतिनिधींनी पठारे यांना २०१४ मध्ये सामायिक सांडपाणी केंद्राच्या कार्यकारिणीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीला पठारे यांनी नकार दिला. परंतु पुढच्या बैठकीत परत आग्रह झाल्यावर ते त्यांच्या अटी व शर्तीवर अध्यक्ष होण्यास तयार झाले. मी सर्वांना सारखाच नियम लावीन. प्रत्येक कारखान्यातून ठरलेल्या मानांकनानुसारच सांडपाणी बाहेर सोडायला हवे.तसेच सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ही सर्व प्रक्रिया शास्त्रीय व तांत्रिकतेच्या सर्व कसोट्या पाळूनच केली जाईल. त्यासाठीचा भांडवली व चालू प्रक्रियेसाठीचा खर्च सर्वांनी मिळून करावा लागेल. दरम्यान माझ्या परीने सर्व कारखान्यांना अंतर्गत सांडपाणी सुधारणासाठी मदतीला मी सदैव तयार आहे.
विस्कळीत बेशिस्त व आपमतलबी व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेत राहून स्वयंशिस्त व लोक समज वाढवून व्यवस्था सुनियोजीत,स्वयंप्रेरित, शिस्तीत काम करणारी व व्यापक समाजहिताची करता येते..! याचे जिवंत उदाहरण म्हणजेच संभाजी पठारे..!
... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.
विजय कृष्णात गायकवाड