* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: फेब्रुवारी 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२७/२/२३

जगावेगळी कौतुकाचे थाप..

" जे लोक पराकोटीचे प्रेम करू शकतात, तीच लोक अपार वेदना सहन करू शकतात."  - टॉलस्टॉय


आम्ही लहान असताना खेळायला जात होतो. (तसं प्रत्येकजण कधी ना कधी खेळायला गेलेलं असतचं) पायात चप्पल नसायची अनवाणी फिरायचं.मग कधी कधी पायात काटा घुसायचा त्यावेळेला सुई वगैरे सोबत नसायची.मग काट्यानेच काटा काढला जायचा.पायातून काटा निघाल्यानंतर त्या काट्याला मी शिव्या द्यायचा. पण ज्या काट्याने काटा काढला असायचा त्याला मात्र मी प्रेमाने स्पर्श करायचा.त्यावेळी अधिक खोलात जाऊन कधी विचार करत नसायचा.पण आता मला माझ्या त्या वागण्याचं हसू येतं.कारण माझ्या पायात जो काटा मोडायचा आणि ज्याला मी शिव्या द्यायचा.तो काटा ज्या काट्याने मी तो काटा काढलेला असायचा,त्याचा भाऊबंदच असायचा.हा सर्व जीवनातील जगण्याचा,

अनुभवाचा पुस्तक वाचण्यातून आलेला समजूतदारपणा आहे.


' मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि तीही आहे की मला काहीच माहित नाही.'अशा पद्धतीने आपलं संपूर्ण जीवन जगणाऱ्या सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष देण्यात आलं.सॉक्रेटिसने ते विष आनंदाने घेतले.याचा परिणाम मृत्यू असूनही ते त्याने आनंदाने स्वीकारले.


आपण साधं आजारी जरी पडलो तरी बरं होण्यासाठी ज्या गोळ्या खातो त्या गोळ्या खाताना आपण तोंड वेडे-वाकडे करतो.इंजेक्शनची भीती वाटते.कारण आपल्या कुणालाच वाटत नसतं आपण आजारी पडावं.पण तरीसुद्धा आपण आजारी पडतो.


पुस्तक नवीन विकत घेतलं असताना ते उघडून एकदा पूर्ण श्वास घ्या.त्या पुस्तकाचा सुगंध आपल्या फुफ्फुसात साठवून ठेवा.हा सुगंध म्हणजे जणू काही कोटी वर्षांपूर्वी पहिला जो पाऊस पडला होता त्या पावसावेळी मातीतून आलेला सुगंध याची आठवण करून देणारा असतो.


लेखक पांढऱ्या कागदांवरती काळ्या अक्षरांनी अंधारी जीवन प्रकाशमय करीत असतो.पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. अनेकांच्या आयुष्याचं फक्त कल्याणच करतात.


लेखक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र आणि वाचक म्हणजे त्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्राचे सप्तरंगी छायाचित्र..


पुस्तक वाचत असताना लेखकाच्या जीवाची झालेली घालमेल,त्याची झालेली जीवाची तगमग,भावनिक गुंतागुंत,कमी जास्त झालेला रक्तदाब या सर्व भावनांशी एकरूप होऊन जो पुस्तक वाचतो तोच खरा वाचक..


लेखक हा नेहमीच पुस्तकांसोबत जोडलेला असतो नाही तो असावाच लागतो.लेखकाची व पुस्तकाची नाळ ही सदैव जोडलेले असावी.


पण बऱ्याच वेळेला पुस्तक संपल्यानंतर त्या लेखकाचा आणि पुस्तकाचा काही संबंध राहत नाही.पुस्तक त्या लेखकापासून दूर जातं.


माणसाच्या भावभावना सोबत घेऊन जगणारा लेखक आणि पुस्तक लिहून त्यापासून बाजूला होणारा लेखक यामध्ये फार संवेदनशील अंतर आहे.


काही लेखक फोन केल्यानंतर फोन उचलत सुद्धा नाहीत,आणि फोन उचलल्यानंतर फारच कामात आहे असं सांगून बोलणं थांबवतात. त्यांना जिवंत माणसाशी बोललेलं कदाचित आवडत नसावं..


पण याला सुद्धा अपवाद आहे आणि तो अपवाद जीवन आनंदाने जगण्यासाठी फारच अलौकिक आणि अविस्मरणीय असा आहे.


परवाच शिक्षणात्री या मासिकामध्ये फेब्रुवारी २०२३ या अंकामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा जागर करणाऱ्या महानुभावांच्या वाचन छंदा विषयी.. वाचन आवडी विषयी मा.बाबाराव मुसळे जेष्ठ कथाकार यांचा माझं वाचन,माझी वाचन प्रक्रिया या लेखामध्ये त्यांनी लेखक बनण्यामागची खडतर तपश्चर्या याबद्दल लिहिले होते..हा लेख वाचून मी त्यांना फोन लावला. यापूर्वी मी त्यांच्याशी कधीही बोललो नव्हतो त्याचा नंबर ही माझ्याकडे नव्हता.या लेखाखाली तो दिला होता.

पहिल्यांदा फोन लागला तेव्हा तो व्यस्त लागला.आणि थोड्यावेळाने त्यांचा मला फोन आला तब्बल वीस मिनिटे आम्ही बोललो. त्यांच्याशी बोलत असताना ते कोणी परके किंवा परग्रहावर राहणारे आहेत असं मला कधी वाटलंच नाही.त्यांच्याशी बोलत असताना आमचे काही ऋणानुबंध आहेत असंच वाटत होतं.पुलकी,प्रेम,जिव्हाळा,

नात्यातील पावित्र्यता या सर्व भावना व या भावनेला सोबत घेऊन विशाल मन बाळगणाऱ्या या लेखकांशी बोलताना ऊर भरून आला.आणि माझा चांगुलपणावरील विश्वास दृढ झाला.


यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला सॉक्रेटिसचे विचार आठवले.मला काहीच कळत नाही हे तरी कळतं.इतरांना तेही कळत नाही.


त्यानंतर त्यांनी लगेचच फेसबुक वरती माझा आणि त्यांचा झालेला मोबाईल वरील सुसंवाद पोष्ट केला.( ही पोस्ट वाचून प्राचार्य भास्कर गायकवाड यांचा मला फोन आला व त्यांनी माझी कौतुक केले.) पण त्याचबरोबर शिक्षणयात्री या मासिकामध्ये 'पुस्तकांसोबत जगताना.' एक विस्तृत अशी आशीर्वाद स्वरूप शब्दरूपी प्रतिक्रिया दिलेली आहे.फेसबुक वरील ती पोस्ट व माझा लेख वाचून दिलेली प्रतिक्रिया जशी आहे तशी खाली देत आहे.


असाही एक दर्दी वाचक।


परवा एक निनावी फोन आला,फोन निनावी आले तरीसुद्धा मी उचलतो.कारण कोण,कधी, कुठून,कसे कोणत्या विषयावर बोलेल याचा नेम नसतो,माझ्याशी असं बोलणाऱ्या माणसांची संख्या जास्त असते.उगीच काहीतरी आगाऊपणा म्हणून मला फार कमी फोन येतात.बरेच मान्यवर असे आहेत की ते निनावी फोन उचलत नाहीत.पण मी तसे करत नाही।


तर तो निनावी फोन मी घेतला,आणि पलीकडून एक व्यक्ती बोलू लागली,'सर,तुमचा एक लेख माझ्या वाचनात आला.त्या लेखातून तुम्ही लेखक बनण्या मागची तुमची जी खडतर तपश्चर्या आहे ती मांडली आहे,ती मला खूप भावली आहे,म्हणून फोन केला।'असं बरंचसं माझ्यासाठी उत्साहवर्धक वाटेल असं तो बराचवेळ बोलत राहिला.


त्या लेखाचे शीर्षक'लेखक होणे खरंच सोपे आहे का?असे असावे मध्यंतरी हा लेख औरंगाबादच्या दिव्य मराठी या दैनिकाच्या रविवार पुरवणीत प्रकाशित झाला होता.तो लेख अनेकांना आवडला होता.त्यावेळी कित्येक फोन मला येऊन गेले होते.धुळे जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावावरून निघणाऱ्या एका मासिकात तोच लेख पुनर्मुद्रित झाला.तो विजय गायकवाड यांच्या वाचनात आला,हा लेख त्या मासिकात छापून आल्याबद्दल मला काहीही माहिती नव्हते.गायकवाड यांनी सांगितलेले मासिकाचे व संपादकाचे नावही माझ्या परिचयाचे नव्हते.

तरीही त्या मासिकाने हा वाचक मला मिळवून दिला यासाठी त्या संपादकाचे मला विशेष आभार मानावेसे वाटतात.


 तर हा वाचक नाव विजय कृष्णात गायकवाड, मुक्काम पोस्ट टोप,तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर फक्त नववा वर्ग शिकलेला.कोल्हापूरला कुठल्या कारखान्यात जेथे लोखंड वितळवून त्याच्या रसापासून मोटर्सचे पार्ट बनविण्यात येतात त्या कारखान्यात काम करणारा आहे.कामगार आणि तोही असा वाचक की ज्याच्याजवळ स्वतः विकत घेतलेली जवळपास दीडशे पुस्तके मला कौतुक वाटलं.ते सांगत होते,'सर,मला पुस्तक वाचल्याशिवाय चैन पडत नाही.हा तुमचा लेख वाचला,त्यात तुम्ही ज्या गोष्टी दर्शविल्या त्या मला भावल्या,आणि म्हणून तुम्हाला फोन करण्याची हिम्मत केली.'


मी माझ्याबद्दल त्यांना फारसं सांगत बसलो नाही कारण एरव्हीही मला कोणाहीसोबत माझ्याविषयी अधिक बोलणे हे मुळात आवडत नाही.तरीही मी त्यांना माझ्या दोन गोष्टी वाचायची शिफारस केली,एक माझा सहावीच्या वर्गात बालभारती पुस्तकात असणारा' बाकी वीस रुपयांचं काय?' हा पाठ कारण हे पुस्तक सहज उपलब्ध होते.आणि माझी 'हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी,ही कादंबरी मिळविण्यासाठी मी त्यांना मा.अनिल मेहता यांच्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी द्वारा जवळ असणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुस्तक विक्री दुकानात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना माझ्याबद्दल सांगून तिथून विकत घ्यायला सांगितले.आणि ते त्यांना शक्य आहे असे ते बोलले.


असा वाचक भेटणे म्हणजे लेखकाला प्रचंड ऊर्जा स्रोत मिळणं होय.याआधी प्राचार्य भास्कर गायकवाड,

औरंगाबादचे नारायण कुडलीकर हे असेच थोर वाचक आहेत.त्यात आता भर पडली विजय कृष्णात गायकवाड यांची..



 'विजय' शिक्षण यात्री या मासिकात आलेला पुस्तकांसोबत जगताना हा तुमचा लेख वाचला आणि एक बऱ्यापैकी यशस्वी लेखक म्हणून मी मला समाधानी मानत असताना मी कुछ भी नही याची जाणीव मला या लेखाच्या व्यापक प्रसार पुस्तक व्यवस्थेतून दिसून आली.


तुम्ही ज्या अलेक्झांडरच्या नावाने असणाऱ्या वाचनालयाचा संदर्भ देता त्या वाचनालयात माझं पुस्तक जावो अशी जर मी अपेक्षा केली तर मी आणि ती वाचनालय यांच्यात कितीतरी योजने नव्हे तर काळही अंतरावर उभा आहे.कदाचित त्यासाठी मला लेखक म्हणून हजार वेळा जन्म घेऊनही मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही.


आज माझी अवस्था ही समुद्रातल्या वाळूच्या एका छोट्यातल्या छोट्या अशा कणासारखी आहे.मला वाटणारा माझा दुराभिमान एका अफाट पोकळीत भिरकावून दिलेल्या वाळलेल्या पानासारखा वाटतो.

माझ्या स्थिरावण्याने माझं अस्तित्व जगाला कळावे ही माझ्यासाठी दुर्मिळात दुर्मिळ अशी गोष्ट असेल.


मित्रा,केवळ तुमच्यामुळे या माझ्या वास्तव स्थितीची मला जाणीव झाली.त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.


 तुम्ही फेसबुकवर नाहीत याचा आनंद झाला आणि फेसबुकवर कधी येण्याचा प्रयत्न करू नका.कारण ते जग रिकामटेकड्यांचे आहे असे मला वाटते.मी त्या जगाचा सहप्रवासी जरूर आहे.पण माझ्या गरजेपुरता मी त्याचा वापर करतो.मला त्या जगात माझी वाचकांची संख्या वाढविण्याची संधी मिळते असं वाटते.पण ते सारं भ्रामक आहे.तिथे असणारे जे वाचकं ते टाइमपासवाले आहेत.

त्यातून फार क्वचित नामांकित असे वाचक मिळू शकतात नाही असे नाही.


पण तुमच्यासारखा आयुष्यातला फार थोडा वेळ वाचनासाठी खर्च करणाऱ्या सात्विक आणि सच्च्या वाचकाला पुस्तकं हीच योग्य साथ देऊ शकतात.


फेसबुक हे आभासी जग,आभासी माध्यम आहे.

त्यामुळे फेसबुकवर जाऊन तितकी मजा वाटत नाही.मी म्हणतो त्या पद्धतीचं लेखन जर तुम्ही विस्तारपूर्वक केलं तर तो या जगातल्या तुमच्यासारख्या काही निस्तं वाचनातून आनंद,

समाधान मिळवणाऱ्या वाचकांसाठी फार मोठी देणगी असेल.तुमचा अनुभव हा त्यांच्यासाठी फार मोलाचा ठरेल.हे तर खरंच पण त्या अनुभवाचा फायदा अनेकांना ते पुस्तक उपलब्ध असेल तोपर्यंत घेता येईल.


पुस्तकं ही मर्यादित आयुष्य लाभणारी गोष्ट आहे,

आपल्याकडे अलेक्झांडरच्या त्या लायब्ररीसारखी व्यवस्थाही नाही.त्यामुळे आपल्याकडची पुस्तकं किती काळ राहतात आणि पुस्तक नसले की तो लेखक किती लवकर विस्मृतीतही जाऊ शकतो.याचा पण विचार आवश्यक आहे.पण आता अलीकडे पुस्तकांच्या जगातही काही क्रांती होते आहे.पुस्तकांची ई-बुक्स तयार होत आहेत आणि ती नेटवर कधीही उपलब्ध आहेत.माझीही काही ई- बुक्स तयार झालेली आहेत.पण ती नेमकी मला शोधत येत नाहीत.जर तुम्हाला ती शोधता आली तर त्याचाही मला आनंद होईल.


प्राचार्य भास्कर गायकवाड सर हे उत्तम वाचक आहेत.

त्यांची स्वतःची अशी फार मोठी लायब्ररी आहे.

त्यांच्याजवळ मोठमोठे ग्रंथ आहेत.मी ते पाहिले आहेत.आजही ते मोठ्या पुस्तकांवर खर्च करतात.पण ते वाचल्यावर फारसे व्यक्त होत नाहीत,हा त्यांचा दोष आहे.

मी त्यांना तसे म्हणतही असतो.त्यामुळे ते तुमच्या संपर्कात आले.तुमच्याशी बोलले याचा मला आनंद होतो. 


खरं म्हणजे लेखकाचे जसे एक जग असते.तसं तुमच्यासारख्या वाचकांचे एक जग असावं त्यात तुमच्यासारख्या वाचकांचा एकमेकांशी परिचय ही तर बाब आहेच.पण तुमचेही दर वर्षातून एखादे संमेलन व्हावे.किमान तुम्ही एकमेकांना भेटावे,त्यातून विचार विमर्श व्हावा.त्यातूनही काहीतरी एक वेगळं असं रसायन बाहेर यावं.जे जगाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरू शकणार आहे.बघा काय करता येईल ? नारायण कुडलीकर यांनाही मी तुमचा नंबर देईन किंवा  त्यांचा नंबर मी तुम्हाला देईन त्यांच्याशी कसा संपर्क करता येईल 


मस्त वाचा,लिहा.तुम्हाला अनंत शुभेच्छा..


आदरणीय बाबाराव मुसळे ( नाना )

- जेष्ठ कथाकार


यांच्या एकूण १० कादंबऱ्या आहेत.बाकी वीस रुपयाचं काय ? इयत्ता सहावी बालभारतीमध्ये ही कथा आहे.दावणीचा बैल व हाल्या हाल्या दुधु दे ( कांदबरी ) विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.


हा लेख मी आता पूर्णविराम देऊन थांबवतो. तरीसुद्धा हा लेख तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना व विचारांना सोबत घेऊन चालत चालत राहील अखंडपणे कधीही न थांबण्यासाठी.


विजय कृष्णात गायकवाड

२५/२/२३

प्राचीन भारतीय ज्ञानपीठं…

इसवी सनाच्या दहाव्या शतकात,अर्थात इ.स. १००० मध्ये,भारत हा जगातली सर्वांत मोठी आर्थिक शक्ती होता.जागतिक व्यापारात भारताचा वाटा हा २९% पेक्षा जास्त होता असे प्रख्यात अर्थशास्त्री प्रोफेसर अंगस मेडिसन यांनी लिहून ठेवलं आहे. (सध्या जागतिक व्यापारात १४.४% वाटा असलेला चीन पहिल्या क्रमांकावर आहे.अर्थात या बाबतीत भारताचा 'विक्रम' कोणीही मोडू शकलेला नाही..!) 'बेरेनाईक प्रकल्पा' सारख्या ठिकाणांमधून भारताच्या ह्या जागतिक व्यापाराचे अनेक प्रत्यक्ष पुरावे मिळतात.


याचा दुसरा अर्थ,भारताची निर्यातक्षमता प्रचंड होती.'फक्त भारतातून केलेल्या आयातीच्या 'कमिशन'मधून युरोपातली शहरं समृद्ध होत होती'असं युरोपियन इतिहासकारांनीच लिहून ठेवलं आहे..


अर्थातच त्या काळात भारतात तशा क्षमतेची माणसं,

तंत्रज्ञ,कामगार,व्यापारी,संशोधक असतील,तेव्हाच तर जागतिक व्यापारातील हे स्थान भारताला प्राप्त करता आले.आणि जर ही अशी कुशल माणसं भारतात असतील,तर ती तयार कशी होत असतील..? त्यांच्या प्रशिक्षणाची काय व्यवस्था असेल..? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.


इंग्रज इतिहासकारांनी असे चित्र निर्माण करून ठेवलंय की त्यांनीच भारतात शिक्षणपद्धत रुजवली शाळा काढल्या,कॉलेज उभारली वगैरे इंग्रज येण्यापूर्वी भारतात फक्त संस्कृतचं आणि पौरोहित्याचं शिक्षण मिळत होतं असा (गैर) समज फार मोठ्या प्रमाणात समाजात पसरलाय.


याशिवाय 'इंग्रज येण्यापूर्वी शिक्षण फक्त ब्राम्हणांना आणि तेही पुरुषांना उपलब्ध होतं' असाही एक खूप मोठा (गैर) समज पसरवून ठेवण्यात आलाय.दुर्दैवानं काही भारतीय इतिहासकारांनी आणि समाजात काम करणाऱ्या तथाकथित 'सेक्युलर' लोकांनीही,इतिहासाचा धांडोळा न घेता याच विचारांची री ओढलेली दिसते.आता हे जर खरं असेल तर एक हजार वर्षांपूर्वी भारताचा जागतिक व्यापारात जवळपास एक तृतीयांश वाटा कसा काय असू शकतो,याबाबत कोणीच काही सांगत नाही...!


मात्र इतिहासाचे एक एक पुरावे बघत आपण पुढे जाऊ लागलो की जे चित्र दिसते,ते फारच वेगळे,भव्य आणि अभिमान वाटावा असे आहे.इंग्रज आणि मुस्लीम आक्रमक येण्यापूर्वी या देशात जी शिक्षणपद्धती होती,तिची तोड जगात कुठेही दिसत नाही.अत्यंत व्यवस्थित रचलेली ही पद्धत,आवश्यक त्या सर्व क्षेत्रांत ज्ञान आणि प्रशिक्षण देत होती.


जगातले पहिले विद्यापीठ (विश्वविद्यालय - युनिव्हर्सिटी) हे भारतात प्रारंभ झाले,हे किती लोकांना माहीत आहे..? त्या काळात भारतात 'अशिक्षित' असा प्रकारच नव्हता,हेही किती लोकांना माहीत आहे..? आज आपली मुलं शिकायला वेगवेगळ्या देशांत जातात.मात्र त्या काळात वेगवेगळ्या देशांतली मुलं भारतात शिकायला येत होती,परंतु एकही भारतीय मुलगा शिकायला बाहेर जात नव्हता,हेही किती लोकांना माहीत आहे..?


प्रख्यात सूफी संगीतकार,गायक,कवी आणि 'कव्वाली'चा जनक अमीर खुस्रो (सन १२५२ - १३२५) हा जेव्हा भारताच्या विद्यापीठांमध्ये आला,तेव्हा भारतावर मुस्लीम आक्रमकांचे आक्रमण होऊन त्यांचा जम बसायला लागला होता.साहजिकच तो काळ,भारतीय विद्यापीठांचा पडता काळ होता.मात्र तरीही अमीर खुस्रोने भारतीय शिक्षणाबद्दल आणि येथील विद्यापीठांबद्दल जे लिहून ठेवलंय ते अफाट आहे.भारतीय शिक्षणपद्धतीची खुस्रोने बरीच प्रशंसा केलेली आहे.


मुलांच्या 'अरबी सुरस आणि चमत्कारिक' गोष्टींचा नायक हारून अल रशीद हा बऱ्याच आधीचा.सन ७५४ ते सन ८४९ ह्या काळातला. याने आणि अरबी सुलतान अल मन्सूरने भारतीय विद्यापीठांतून हुशार मुलांना घेऊन येण्यासाठी आपले दूत पाठवले होते अशा नोंदी बऱ्याच ठिकाणी आढळतात.


हा भारतातला पहिला ज्ञात 'कॅम्पस इंटरव्ह्यू'..! सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचा..!!


मुस्लीम आक्रमक भारतात येण्याआधी भारतात परिपूर्ण शिक्षणप्रणाली होती.या संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मुला / मुलींना साधारण आठव्या वर्षापर्यंत घरीच शिकवलं जायचं. आठव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार झाला की त्याला गुरुकुलामध्ये किंवा गुरूकडे पाठविण्याची पद्धत होती.येथे 'गुरू' म्हणजे फक्त संस्कृत शिकविणारे ऋषी असा अर्थ कदापि नाही. 'गुरू' हा त्या त्या क्षेत्रातला दिग्गज माणूस असायचा. समुद्रकिनाऱ्यावरच्या बऱ्याच कुटुंबांमधील मुलं ही जहाज बांधणाऱ्या आपल्या गुरूकडे राहून, जहाजबांधणीचं प्रत्यक्ष शिक्षण घेत.हीच पद्धत धनुर्विद्या,मल्लविद्या,

लोहारकाम,वास्तुविद्या वगैरेसारख्या गोष्टी शिकण्यासंबंधी होती.साधारण ८-१० वर्षे गुरूकडे शिक्षण घेतल्यानंतर यातील काही विद्यार्थी विद्यापीठात पुढील उच्च शिक्षणासाठी जात.या विद्यापीठांमध्ये वेगवेगळी शास्त्रं आणि कला शिकण्याची व्यवस्था होती. पुढे मुसलमान आक्रमकांनी ही विद्यापीठं नष्ट केली.त्यामुळे इसवी सन १२००-१३०० नंतर ह्या विद्यापीठांचं अस्तित्वच नष्ट झालं.मात्र - तरीही गुरुगृही शिकण्याची परंपरा बऱ्याच अंशी कायम राहिली.


या आक्रमणापूर्वीच्या काळात स्त्रियांनी शिकण्याची पद्धत आणि परंपरा होती.ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.प्रारंभिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ऋषिका' आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ब्रम्हवादिनी' म्हटले जायचे.

ऋग्वेदात अशा ऋषिका आणि ब्रम्हवादिनी स्त्रियांची नावेच दिलेली आहेत.


रोमासा,लोपामुद्रा,अपला,कद्रू,घोष,गौपयना,

जुहू,वागंधिनी,पौलोमी,जरिता, श्रद्धा,

कामायनी,उर्वशी,सारंगा,यमी,इंद्रायणी, सावित्री,देवजयी,नोधा,सिकातनीबावरी, अक्रीष्ट्रभाषा,इत्यादी.अशी २३ नावं दिलेली आहेत..


पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणासंबंधी लिहून ठेवलंय.मुलींकरिता वसतिगृहं (होस्टेल्स) होती.त्यासाठी पाणिनीने 'छत्रीशाळा' हा शब्द वापरलाय.उपनिषद काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा उल्लेख येतो.एकुणात काय,तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या भारतात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण फार चांगले होते.स्त्रिया मोकळेपणी समाजात मिसळत होत्या.


शिक्षकांची किंवा गुरूंची ही मोठी परंपरा होती, जी शतकानुशतकं चालत आलेली होती. आचार्य/ उपाध्याय /चरक/ गुरू/यौजनासातिका/ शिक्षक अशा वेगवेगळ्या उपाध्या गुरूंसाठी होत्या.


विद्यापीठांमध्ये शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचाही मोठा उत्सव असायचा.सत्रारंभ सोहोळ्याला 'उपकर्णमन' आणि सत्र समापन सोहोळ्याला 'उत्सर्ग' म्हटले जायचे. उपाधी प्रदान सोहोळ्याला (ज्याला आपण 'ग्रॅज्युएशन सेरेमनी' म्हणतो), 'समवर्तना' म्हणायचे.

सुट्टयांसाठी 'अनध्याय' हा शब्द वापरला जायचा.

वर्षभरातील प्रमुख अनध्याय होते महिन्यातील दोन्ही अष्टम्या,दोन्ही चतुर्दशी, अमावस्या,पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.या नित्य अनध्यायांशिवाय नैमित्तिक अनध्यायही असायचे.अर्थातच आजच्यासारखी 'रविवारी सुटी' ही भानगड नव्हती.गंमत म्हणजे,भारतीय संस्कृतीचा प्रसार ज्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये,उदा - लाओस,कंबोडिया,जावा-सुमात्रा (इंडोनेशिया), सयाम (थायलंड)- झाला,त्या सर्व देशांमध्ये अगदी अलीकडल्या काळापर्यंत अनध्यायाचे दिवस हे प्राचीन भारतीय पद्धतीप्रमाणेच होते. -


तक्षशीला विद्यापीठ


जगातील पहिले विश्वविद्यालय (विद्यापीठ) हे 'तक्षशीला' मानले जाते.आजच्या पाकिस्तानात (रावलपिंडीपासून १८ मैल उत्तरेकडे) असलेले हे विद्यापीठ इसवी सनाच्या सातशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले. पुढे इसवी सन ४५५ मध्ये 'पूर्व युरोप' च्या आक्रमकांनी,अर्थात 'हूणांनी' ते नष्ट केले.जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या ह्या विद्यापीठाने सुमारे १२०० वर्षं ज्ञानदानाचे मोठे काम केले.श्रेष्ठ आचार्यांची परंपरा निर्माण केली,अनेक जगप्रसिद्ध विद्यार्थी दिले.तक्षशीला विद्यापीठ बंद पडल्यानंतर काही वर्षांतच मगध राज्यात (आजच्या बिहारमधे), नालंदा विद्यापीठ स्थापन झाले.


ही दोन्हीही नामांकित विद्यापीठ एकाच वेळेस कधीही कार्यरत नव्हती.


असे म्हणतात,तक्षशीला ह्या नगरीची स्थापना भरताने त्याच्या मुलाच्या,'तक्षाच्या' नावावर केली.पुढे येथेच विद्यापीठ स्थापन झाले.जातक कथांमध्ये तक्षशीला विद्यापीठासंबंधी बरीच माहिती मिळते.ह्या कथांमध्ये १०५ ठिकाणी ह्या विद्यापीठाचे संदर्भ मिळतात.त्या काळात, अर्थात सुमारे हजार वर्षे,तक्षशीला ही संपूर्ण भरतखंडाची बौद्धिक राजधानी होती.तिची ही ख्याती ऐकूनच 'चाणक्य' सारखी व्यक्ती मगध (बिहार) हून इतक्या दूर तक्षशीलेला आली.बौद्ध ग्रंथ 'सुसीमजातक' आणि 'तेलपत्त' मध्ये तक्षशीलेचे अंतर काशीपासून २००० कोस सांगितले आहे.


इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी,जेव्हा 'चिकित्सा' शास्त्राचे नाव सुद्धा जगात कुठेच नव्हते,तेव्हा तक्षशीला विद्यापीठ हे चिकित्साशास्त्राचे फार मोठे केंद्र मानले जात होते.येथे ६० पेक्षा जास्त विषय शिकवले जात होते.एका वेळेस १०,५०० विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय होती.


तक्षशीला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फार उज्वल परंपरा आहे. -


 या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर,अर्थात इसवी सनापूर्वी ७०० वर्ष,येथून शिकून गेलेला पहिला प्रसिद्ध विद्यार्थी म्हणजे पाणिनी,ज्याने संस्कृतचे व्याकरण तयार केले.


इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात, चिकित्साशास्त्र शिकलेला 'जीवक' (किंवा 'जिबाका'), पुढे जाऊन मगध राजवंशाचा राजवैद्य झाला.याने अनेक ग्रंथ लिहिले.


इसवी सनापूर्वी चौथ्या शतकातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी 'चाणक्य', जो पुढे 'कौटिल्य' नावाने प्रसिद्ध झाला. चिनी यात्री आणि विद्यार्थी, 'फाह्यान' हा सन ४०५ मधे तक्षशीला विद्यापीठात आला.हा काळ ह्या विद्यापीठाचा पडता काळ होता.पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमकांच्या संख्येत वाढ झाली.अनेक आचार्य विद्यापीठ सोडून गेले.अर्थातच फाह्यानला तेथे फार काही ज्ञानाचा लाभ झाला नाही.त्याने तसे लिहून ठेवलंय.पुढे सातव्या शतकात, तक्षशीलासंबंधी वर्णनं ऐकून आणखी एक चिनी यात्री,'ह्युएन त्सांग' तेथे गेला,तर त्याला विद्याभ्यासाची कसलीही खूण आढळली नाही.


नालंदा विद्यापीठ


हूण आक्रमकांनी ज्या काळात तक्षशीला विद्यापीठ उद्ध्वस्त केले,जवळपास त्याच काळात मगध साम्राज्यात नालंदा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली जात होती.मगधाचे महाराज 'शकादित्य' (अर्थातच गुप्तवंशीय सम्राट कुमार गुप्त : सन ४१५ ते ४५५) यांनी आपल्या अल्पकाळात नालंदामधील जागेला विद्यापीठाच्या रूपात विकसित केले. या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव होते - 'नलविहार'. 


पुढे इसवी सन ११९७ मध्ये बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ जाळून टाकेपर्यंत सुमारे सातशे वर्षं, हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ होते.


ह्या विद्यापीठात प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागत असे.अनेक दुर्लभ आणि दुर्मीळ ग्रंथांचा प्रचंड मोठा संग्रह ह्या विद्यापीठात होता.'चिनी यात्री 'ह्युएन त्सांग' येथे दहा वर्षं अध्ययन करत होता.त्याचा गुरू शीलभद्र हा आसामचा होता. ह्युएन त्सांगने ह्या विद्यापीठाबद्दल भरभरून आणि खूप चांगले लिहिले आहे.


नालंदा विद्यापीठ हे अनेक इमारतींचं एक फार मोठं संकुल होतं.यातील प्रमुख भवनं होती - रत्नसागर,रत्नोदधी आणि रत्नरंजक.सर्वांत उंच प्रशासकीय भवन होतं 'मान मंदिर'.


विक्रमशील विद्यापीठ


आठव्या शतकात बंगालचा पालवंशीय राजा धर्मपालने ह्या विद्यापीठाची स्थापना आजच्या बिहारमधे केली होती.ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत ६ विद्यालयं होती.प्रत्येक विद्यालयात १०८ शिक्षक होते.दहाव्या दशकातील प्रसिद्ध तिब्बती लेखक तारानाथने ह्या विद्यापीठाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे.ह्या विद्यापीठात प्रत्येक दाराला एक एक प्रमुख आचार्य नियुक्त होते.नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हे आचार्य परीक्षा घ्यायचे.त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश मिळत असे.हे आचार्य होते- पूर्व द्वार - पं. रत्नाकर शास्त्री,पश्चिम द्वारवर्गाश्वर कीर्ती,उत्तरी द्वार - नारोपंत आणि दक्षिणी द्वार प्रज्ञाकर मित्रा,यांतील नारोपंत हे महाराष्ट्रातून आलेले होते.आचार्य दीपक हे विक्रमशील विद्यापीठाचे सर्वाधिक प्रसिद्ध आचार्य झालेले आहेत.



बाराव्या शतकात येथे ३,००० विद्यार्थी शिकत होते.हा या विद्यापीठाचा पडता काळ होता. पूर्वेत आणि दक्षिणेत मुसलमान आक्रमक पोहोचत होते आणि मिळेल ती ज्ञानाची साधनं आणि स्थानं उद्ध्वस्त करत होते.म्हणूनच उत्खननात जे अवशेष सापडले आहेत,त्यांवरून असं लक्षात येतं की,विद्यापीठाच्या मोठ्या सभागृहात ८,००० लोकांची बसायची व्यवस्था होती.


या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांमध्ये तिब्बती विद्यार्थ्यांची संख्या सर्वांत जास्त होती. त्याचं एक कारण म्हणजे बौद्ध धर्माच्या 'वज्रयान' संप्रदायाच्या अभ्यासाचं हे महत्वाचं आणि अधिकृत केंद्र होतं.


नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झाल्यानंतर,सुमारे सहा वर्षांनी,अर्थात सन १२०३ मध्ये,नालंदा जाळणाऱ्या बख्तियार खिलजीनेच ह्या विद्यापीठालाही जाळून टाकलं.


उड्डयंपूर विद्यापीठ


पाल वंशाची स्थापना करणाऱ्या राजा गोपाळने ह्या विद्यापीठाची स्थापना बौद्ध विहाराच्या रूपात केली होती.याच्या विशाल भवनांना बघून बख्तियार खिलजीला वाटलं की हा एखादा किल्लाच आहे.म्हणून त्याने यावर आक्रमण केलं.वेळेवर सैनिकी मदत मिळू शकली नाही. फक्त विद्यार्थी आणि आचार्यांनीच शर्थीनं झुंज दिली.पण सर्वच्या सर्व मारले गेले.. !


सुलोटगी विद्यापीठ


कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हे महत्त्वाचे विद्यापीठ.अकराव्या शतकाच्या शेवटी उभे राहिले.राष्ट्रकूटांचे शासन असताना कृष्ण (तृतीय) ह्या राजाचा मंत्री नारायण याने हे विद्यापीठ बांधले.मात्र विद्यापीठ म्हणून काही करून दाखविण्याच्या आतच यावर मुसलमानी आक्रमकांनी कब्जा केला आणि ह्याला उद्ध्वस्त केलं.येथील पविट्टागे हे संस्कृत महाविद्यालय अल्पावधीतच संस्कृत शिक्षणासाठी चर्चित झाले होते.देशभरातली निवडक २०० विद्यार्थ्यांना भोजन-निवासासह शिक्षण देणारे हे विद्यापीठ वैशिष्ट्यपूर्ण होते.


सोमपूर महाविहार


बांगलादेशच्या नवगाव जिल्ह्यात बादलगाझी तालुक्यातील पहाडपूर गावात महाविहार म्हणून स्थापित झालेले हे शिक्षा केंद्र पुढे विद्यापीठ म्हणून नावारूपाला आले.पाल वंशाचा दुसरा राजा धर्मपाल देव ह्याने आठव्या शतकाच्या शेवटी ह्या विहाराचे निर्माणकार्य केले.जगातील सर्वांत मोठे बौद्ध विहार म्हणता येईल अशी याची रचना होती.चीन/ तिब्बत/ मलेशिया / जावा / सुमात्रा येथील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत होते.


दहाव्या शतकातील प्रसिद्ध विद्वान अतीश दीपशंकर श्रीज्ञान हे ह्याच विद्यापीठाचे आचार्य होते.


रत्नागिरी विद्यापीठ,ओडिशा सहाव्या शतकात बौद्ध विहाराच्या रूपात स्थापन झालेले हे स्थान पुढे शिक्षणाचे मोठे केंद्र झाले.तिबेटमधील अनेक विद्यार्थी येथून शिकून गेले.तिबेटीयन इतिहासात या विद्यापीठाचा उल्लेख 'कालचक्र तंत्राचा विकास करणारे विद्यापीठ' असा केलेला आहे.कारण येथे खगोलशास्त्राचा अभ्यास व्हायचा.


अखंड भारताच्या अक्षरशः कानाकोपऱ्यात शिक्षणाची ही केंद्र वसलेली होती.अगदी लहान नाही.लहान विद्या केंद्र तर किती होती त्याची गणतीच नाही.


जबलपूरला,भेडाघाटमधे चौसष्ट योगिनींचे मंदिर आहे. त्याला 'गोलकी मठ' असेही म्हणतात.ह्या 'गोलकी मठ'चा उल्लेख 'मलकापूर पिलर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोदकामातही झालेला आहे.


'मटमायुर वंश' हा कलचुरी वंशांपैकीच एक आहे.या वंशाच्या युवराजदेव (प्रथम) ह्याने ह्या मठाची स्थापना केली.मुळात हे तांत्रिक आणि इतर विषयांचं विद्यापीठ होतं.ह्या गोलकी मठाच्या अर्थात विद्यापीठाच्या आधीन अनेक विद्यालयंही आंध्र प्रदेशात होती.


बंगालमधील 'जगद्द्ल',आंध्र प्रदेशातील 'नागार्जुनकोंडा',

काश्मीरमधील 'शारदापीठ', तामिळनाडूमधील 'कांचीपुरम',ओडिशामधील 'पुष्पगिरी',उत्तर प्रदेशातील 'वाराणसी'... अशी किती नावं घ्यावीत..? ही सारी ज्ञानमंदिरं होती, ज्ञानपीठं होती.अगदी वनवासी अन् (आजच्या भाषेत) मागास भागातही आवश्यक ते शिक्षण सर्वांना मिळत होते.संस्कृत ही फक्त राजभाषाच नव्हती तर ती लोकभाषा होती.पुरुषपूर (पेशावरचे प्राचीन नाव) पासून ते कंबोडिया, लाओस,जावा सुमात्रापर्यंत संस्कृत हीच भाषा चालत होती.इसवी सनापूर्वी शंभर / दोनशे वर्षांपासून ते इसवी सन अकराशेपर्यंत या संपूर्ण भूभागावर संस्कृत ही राजभाषा आणि लोकभाषा म्हणून प्रचलित होती.भारतीय विद्यापीठांची कीर्ती जगभरात पसरली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात भारत सर्वोच्च स्थानावर होता,आणि म्हणूनच व्यापारातही होता..! -


आज ह्या साऱ्या गोष्टी परीकथेतल्या वाटतात. एक हजार वर्षांच्या मुस्लीम आणि इंग्रजी राजवटीमुळे आपलं समृद्ध असं ज्ञान तर आपण विसरलोच,पण शिक्षणाच्या बाबतीतही पूर्णपणे मागासलो.


शिक्षणाचा आपला समृद्ध वारसा आठवायला आपल्याला पाश्चात्त्य चिंतकांची आणि संशोधकांची मदत लागते,हीच आपली शोकांतिका आहे.


२१ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…

२३/२/२३

पुस्तकांसोबत जगताना…

नमस्कार मी विजय गायकवाड राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर ( कोल्हापूर ) जवळच असलेल्या टोप या गावात मी राहतो.पोट भरण्यासाठी जे काय सर्व संघर्ष करावे लागतात.ते मी करतोच कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करत असताना माझीही दमछाक होते,वैचारिक संघर्ष,न पटणारे विचार या धावत्या जगात मी ही अस्वस्थ होतो.मेनन पिस्टन रिंग टोप संभापूर या कंपनीमध्ये जनरल कास्टिंग (फौन्ड्री) या ठिकाणी मी काम करत आहे.दिवसभर शारीरिक कष्ट करतो,व सायंकाळी माझ्या घरट्याकडे म्हणजेच घराकडे परत येतो.कंपनी ते घर या सरळ मार्गावरील मी सरळ प्रवास करणारा माणूस.. माझ्याही जीवनात चढउतार हे येतात व जातात. या जगण्यावर या जगण्यावर मी शतदा प्रेम करतो. हा जीवनातला प्रवास करत असताना एक दिवस आयुष्याला वेगळं वळण देणारी घटना घडली. ती मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही. 


आयुष्यात माझी पुस्तकाशी झालेली सर्वप्रथम भेट तो क्षण माझ्यासाठी जिवंत व अविस्मरणीय होता. स्टीफन हॉकिंग साहेबांनी फार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं होतं की हे सगळं जग आपण फुकट वापरत आहोत या जगाला जर आपल्याला काय परत फुकट द्यायचं असेल तर असं काहीतरी द्या की ज्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटेल की खरंच आपण काहीतरी या जगाला दिलेलं आहे. कारण अनेकांनी आपल्याला बरचं काही दिलेलं आहे.त्यामुळे आपणही असंच काहीतरी दुसऱ्यांना द्यावं हे ओघाने आलेच.


'तुम्हाला कोणीही बघत नसताना तुम्ही जे असता तेच तुम्ही असता.' हे पुस्तकातील वाक्य मला जगायचं कसं हे सांगून जातं.परिस्थिती बदलल्यानंतर माणसाला बदलण्यास फार वेळ लागतो व त्रासही होतो.पण पुस्तके माझ्या जीवनात अंधकार नष्ट करून सदैव प्रकाशाची योजना करणारा चिरंतन असा प्रकाशाचा ठेवा आहे.वार ( हवा ) जेव्हा आपल्याला अंगाला जाणवत नसतं त्यावेळेला वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूला आहे हे आपण सहजपणे सांगू शकत नाही,पण त्याचवेळी जर आपण झाडाचा शेंडा पाहिला तर आपल्याला नक्कीच कळतं की वाऱ्याची दिशा कोणती आहे.पुस्तके मला परिस्थिती बदलण्या अगोदर बदलण्याचे बळ देतात.


'ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल.अशी झाड आपण लावली पाहिजेत‌..!' 


हे जिवंतत्व मी पुस्तकातूनच शिकलो आहे.


'पुस्तके ही जमिनीवर असतात पण आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ती आपणास देतात.'


पुस्तक वाचल्यामुळे माझ्यामधील 'संयम' वाढीला लागला आहे.जे जसं आहे तसं ते स्वीकारायचं हे सत्य पुस्तक मला नेहमी सांगतात.शरीराच्या वाढीसाठी,विकासासाठी अन्न हे जसं महत्त्वपूर्ण आहे,त्याचबरोबर माणसाचे जीवन सुलभ होण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा ही जशी मूलभूत गरज आहे,तसंच पुस्तक वाचन ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे असं मला वाटतं. पुस्तकाच्या वाचनामुळे माझं अविकसित जीवन विकसित झालं,विस्तृत झालं व माझं मर्यादित जीवन हे अमर्यादित झालं.मानवी जीवनातील अवघडातील अवघड प्रश्नाची उत्तरे सरळ व सोप्या भाषेमध्ये मला पुस्तकात सापडतात.त्यामुळे मी नेहमीच निवांत व बिनधास्त असतो.कारण पुस्तके माझ्यासोबत असतात.मी दररोज न चुकता वाचन करतो. पुस्तक वाचन करणे आता माझा श्वास बनलेला आहे.


पुस्तक वाचन करणे म्हणजे माझे एक वेळचं जेवण आहे.


कोल्हापूरातील वाचणालयामध्ये सभासद झालो.बरीत पुस्तके वाचलीत.महिण्याकाठी मला पगारापोटी ९ ते १० हजार पगार मिळतो.

त्यातील महिण्याला किमान १ हजार ते पंधराशे रुपयाची पुस्तके विकत घेवून वाचतो. 


'पुस्तक विकत घेणारे आणि वाचणारे लोक कोण असतात.असं तुम्हाला वाटतं ते गरीब नक्कीच नसतात."


कधी कधी पुस्तके वाचायला कमी पडलीत तर आमचे मित्र,मार्गदर्शक मला हवी ती पुस्तके आनंदाने पाठवितात.


त्यामध्ये सुनिल घायाळ,माधव गव्हाणे,विष्णु गाडेकर पाटील,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सुधीर सरवदे, विनायक पाटील,शितल खाडे,विश्वास खाडे,तात्या गाडेकर.सतिश खाडे,दादासाहेब ताजणे,राजेश कान्हेकर,संतोष पांचाळ,

सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,

निखिल इंगळकर व इतर मित्रमंडळी आवर्जुन पुस्तके पाठवतात.त्याच्या ऋणात कायम राहणे मला मनापासून आवडते.


चांगले वाचणे म्हणजे खरी पुस्तके खऱ्या 

भावबळाने वाचणे.ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने

आणि संयमानेलिहिले जातात,तितक्याच हेतुपुरस्सरतेनेआणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत.हेन्री डेव्हिड थोरोने सांगितलेला नियम मी न मोडता पाळतो.त्यामुळे पुस्तके मला 'आपला' म्हणतात.माझ्याकडे सध्या १४८ पुस्तके आहेत.ती ४०७१५ रुपयाची आहेत.


स्वतःच स्वतःसाठी असणे,फार फार महत्त्वाचे आहे.मी जर स्वतःसाठीच नसेन,तर माझ्यासाठी कोण असणार आहे ? " हिलील यांच हे जीवनतत्व मला पुस्तकांनीच शिकवले आहे.


इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलीडे, इमोशनल इंटेलिजन्स - डॅनियल गोलमन,जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख,ह्युमनकाइंड - रूट्बर्ग ब्रेगमन,कुरल - सानेगुरुजी,सजीव - अच्युत गोडबोले,दगड - धोंडे-नंदा खरे,वारूळ पुराण-नंदा खरे,द सीक्रेट-रॉन्डा बर्न,चकवा चांदणं मारुती चितमपल्ली,द सेकंड सेक्स-सिमोन द बोव्हुआर,इसेंशियलिझम-ग्रेग मँकेआँन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-अच्युत गोडबोले,पाश्चात्य राजकीय विचारवंत,

शरीर,गन्स,जर्म्स अँड स्टील-जेरेड डायमंड,द पावर ऑफ पर्सिस्टन्स-जस्टीन सँच,द आर्ट ऑफ रिसायलेन्स-गौरांगदास,द गॉड डेल्युजन - रिचर्ड डॉकिन्स,सर्वोत्तम देणगी-जिम स्टोव्हँल,थिंक लाईक अ विनर-डॉ.वॉल्टर डॉयले स्टेपलस् अशाच अनुषंगाने मी पुस्तक वाचीत आहे.व शेवटपर्यंत वाचीत राहीन.


१९९६ साली मी शाळा सोडली.(मी ९ पास आहे.)अजूनही मला शाळेने सोडलेलं नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मी शाळेशी व शाळा माझ्याशी जोडलेले आहोत. पुस्तकांनी मला जोडून ठेवलेले आहे. 


तुमच्या वेदनेची दुःखाची जर तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही माणूस आहात तशीच दुसऱ्याच्या वेदनेची दुःखाची तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही जिवंत आहात. ही भावना संवेदना मला पुस्तकांनी दिली आहे.


जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन या ग्रंथामध्ये पुस्तकांविषयी अनेक महत्त्वपूर्ण नोंदी केलेल्या आहेत.


'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या; 


अलेक्झांडरचं स्वप्न तुर्कस्थानचा खलिफा उमर याच्यामुळे उद्ध्वस्त झालं असलं, तरी २००२ साली तिथल्या सरकारने त्याचं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचं ठरवलं आणि पुन्हा बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया या नावाचं एक मोठं ग्रंथालय उभं केलं.हे ग्रंथालय अतिशय भव्य असं असून एकूण १० लाखांवर पुस्तकं,सव्वा दोन लाख चौरस फुटांचा वाचन कक्ष,३ सभागृह, १ तारांगण,४ संग्रहालयं,४ कलादालनं,उपाहारगृहं, प्रदर्शनं आणि वेगवेगळ्या विषयांनुसार केलेले वेगवेगळे पुस्तकांसाठीचे असंख्य कक्ष असा अवाढव्य पसारा या ग्रंथालयात आहे.या ग्रंथालयात जाताना बरोबर गाईड घेऊन जाणं आवश्यक असून आत जाण्यासाठी प्रवेश तिकीट खरेदी करावं लागतं.अरेबिक, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषेतली पुस्तकं जास्त प्रमाणात असून शिवाय जगातलं कुठल्याही देशातलं कुठलंही पुस्तक इथे तुम्हाला मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी २ हजार वाचक बसून निवांत वाचन करू शकतील अशी

सुरेख रचना या ग्रंथालयात केली आहे.एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचा सुखद अनुभव या ग्रंथालयात गेल्यावर मिळतो.पुरातन काळात जिथे अलेक्झांड्रिया विद्यापीठ होतं,त्याच जागेवर हे ग्रंथालय उभारण्यात आलं आहे. या ग्रंथालयाच्या उभारणीत इजिप्शियन सरकार, फ्रेंच सरकार आणि युनेस्कोनेही आर्थिक मदत केली आहे.या सगळ्यांच्या मदतीने भव्य असं 'बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' हे ग्रंथालय आज दिमाखात उभं आहे.या ग्रंथालयात ८० लाख पुस्तकं ठेवण्याची सोय करून ठेवलेली आहे. १९४ देशांमधली पुस्तकं इथे बघायला मिळतात. त्या ग्रंथालयात पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचीही पुस्तकं उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचं संगणकीकरण झालं असून इथे डिजिटल लायब्ररीचा विभाग देखील आहे. समजा,एखादं दुर्मिळ पुस्तक आपल्याला हवं असेल,तर अवघ्या पाच मिनिटांत तिथे असलेल्या प्रिंटरवरून ते हवं असलेलं पुस्तक मूळ पुस्तकासारखंच छापून त्या वाचकाला दिलं जातं हे विशेष!


"बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' या ग्रंथालयात अंध व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग असून हजारो पुस्तकं ब्रेल लिपीत उपलब्ध आहेत. ऑडिओ स्वरूपातली पुस्तकं वाचण्यासाठी खास विभाग आणि बसायला आरामदायी खुर्च्या,हेडफोन्स अशी व्यवस्था वाचकासाठी केलेली आहे.एकदा वाचक ग्रंथालयात गेला,की तो सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत कितीही वेळ आतमध्ये व्यतीत करू शकतो.या ग्रंथालयाची संपूर्ण इमारत वातानुकूलित असून वाचकाला टिपण काढण्यासाठी वही आणि पेन मोफत उपलब्ध

केले जातात.संगणकावर हव्या असलेल्या पुस्तकाची माहिती टाकताच,तिथले स्वयंसेवक हवी तेवढी पुस्तकं वाचकाला त्याच्या टेबलवर आणून देतात.'बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' सारखी ग्रंथालयं संपूर्ण जगभर निर्माण झाली, तर खरंच काय बहार होईल ?


ग्रंथालयांची जशी उभारणी झाली पाहिजे,तसंच प्रत्येक ग्रंथाची बांधणी चांगली,उत्तम दर्जाची होणं आवश्यक असतं.नाही तर पानं निखळतात आणि ग्रंथ नष्ट होतो.आजच्या भाषेत पुस्तकाचं बाइंडिंग नीट आणि पक्कं असायला हवं.पूर्वी कापडामध्ये घट्ट गुंडाळून ग्रंथ व्यवस्थित ठेवत. ते इतके घट्ट बांधलेले असत की,पाण्यात पडले तरी आतला कागद भिजत नसे.ग्रंथांच्या पानांना कसर लागू नये म्हणून त्यात सापाची कातण किंवा लिंबाची पाने ठेवत.म्हणून प्राचीन ग्रंथ हजारो वर्षे टिकले.थायलंडची राजधानी असलेलं बँकॉक हे शहर जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या शहराचं वैशिष्ट्य असं की,या शहरात मोजकीच पण पुस्तकांची इतकी भव्यं दुकानं आहेत,की इथे भेट देणारा पुस्तकप्रेमी चकित होतो.इथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांची मांडणी आणि सजावट इतक्या आकर्षक पद्धतीने केलेली आहे,की वाचकाला पुस्तका विकत घेण्याचा मोह व्हावा.पुस्तक शोधताना प्रत्येक पुस्तकाला खालून स्प्रिंग लावलेल असल्यामुळे तिथलं बटण दाबताच हवं ते पुस्तक समोर येतं.त्या पुस्तकाला अनेक वाचकांनी हाताळू नये,त्याचं नवेपण अबाधित राहावं यासाठी ती व्यवस्था केली असून वाचक पुस्तक विकत घेण्यासाठी प्रवृत्त कसा होईल याची काळजी इथल्या दुकानांनी खूप कल्पकतेनं घेतली आहे.ही नाविन्यपूर्ण माहिती ऐकून मी थक्क झालो.


ज्या कुणाचं आयुष्य अतिशय साधं आहे,त्यांना समाधान नक्कीच मिळतं.आनंद मिळण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठीही साधेपणा 

अत्यंतिक महत्वाचा आहे. हे दलाई लामा यांचे वाक्य जगण्याला उर्मी देऊन जातं. 


कारण आपण सर्वजण सुखी व समाधानी राहू शकतो.या धकाधकीच्या व धावत्या जगामध्ये,

आयुष्यामध्ये एवढाच एक शांततेचा विरंगुळा असेल तो ही स्वतःसाठी..


शेवटी जाता जाता..


प्रख्यात कवी गुलजार यांच्या एका सुरेख कवितेचा अनुवाद विजय पाडळकर यांनी केला, त्यात पुस्तकाशी हितगुज करताना गुलजार म्हणतात :


मित्राशिवाय सारा दिवस कसाबसा ढकलला स्वतःशीच अनोळखी असा

एकाकी,उदास

समुद्रकिनाऱ्यावर दिवस विझवून

 मी परत इथेच आलो

निर्मनुष्य रस्त्यावरील रिकाम्या घरात

दरवाजा उघडताच

टेबलावर ठेवलेलं पुस्तक 

हलकेच पान फडफडवीत म्हणालं 

उशीर केलास,मित्रा!


"दररोज मी पुस्तके वाचतो.. 

आणि स्वतःला' च शिकवतो."

पुस्तकातील हे वाक्य मला बरचं काही शिकवून जातं.


"सर्वियन कादंबरीकार मिलोराद" यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात" 


जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही" 


पुस्तकांचे,लेखकांचे,प्रकाशकांचे पुस्तकासोबत जोडले गेलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद..


हा लेख मासिक 'शिक्षण यात्री' मध्ये जानेवारी - फेब्रुवारी या जोड अंकामध्ये प्रकाशित केल्याबद्दल संपादकिय मंडळ व ह्या अंकांच्या निर्मितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..


विजय कृष्णात गायकवाड


२१/२/२३

आपले प्राचीन 'संपन्न' रसायनशास्त्र..

पाऱ्याचा शोध नेमका कोणी लावला? ह्या प्रश्नावर निश्चित असे उत्तर कोणीच देत नाही. पाश्चात्त्य जगाला तर अगदी सतराव्या शतकापर्यंत पाऱ्याची नीट ओळख नव्हती. इजिप्तमधल्या पिरामिडमधे इसवी सनाच्या १८०० वर्षांपूर्वीचा पारा ठेवलेला आढळला. पारा विषारी असतो याबाबत सर्वांचेच एकमत आहे.म्हणूनच १४० पेक्षा जास्त देशांनी पाऱ्याचा समावेश असलेल्या भारतीय आयुर्वेदिक औषधींवर तीन वर्षांपूर्वी प्रतिबंध लावला होता,जो नंतर उठवला गेला.


मात्र गंमत म्हणजे हा विषारी समजला जाणारा पारा,इसवी सनाच्या दोन/अडीच हजार वर्षांच्या आधी,वेगवेगळ्या क्षेत्रांत भारताद्वारे वापरला जात होता.इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वीपासून तर हा आयुर्वेदात वापरला जातोय.अगदी पोटात घेण्याच्या औषधांमध्ये..! आता,पाश्चात्त्य जग ज्याबद्दल तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतं,अशा विषारी पाऱ्याचा उपयोग साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आपण औषध म्हणून करतोय,हेच मुळात आश्चर्य आहे.

आणि अशा प्रकारे पाऱ्याचा उपयोग करताना त्याची पूर्ण 'प्रोसेसिंग' करून तो वापरला जायचा हे महत्त्वाचं.


आपल्या संस्कृतीत ज्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्यावर सोळा संस्कार केले जातात, त्याप्रमाणे पाऱ्यावर अठरा प्रकारचे संस्कार करून मगच तो औषधाद्वारे सेवन करण्यायोग्य होतो. हे १८ संस्कार आहेत -


१.स्वेदन, २.मर्दन,३.मूर्च्छन,४.उत्थापन,

५.पातन,६.रोधन,७.नियामन,८.संदीपन,

९.गगनभक्षणमान,१०.संचारण,११.गर्भदृती,

१२.बाह्यदृती,१३.जारण,१४.ग्रास,१५.सारण,

१६.संक्रामण,१८.शरीरयोग


वाग्भटाचार्यांनी लिहिलेल्या 'रस रत्नसमुच्चय' या ग्रंथात पाऱ्याच्या औषधी उपयोगाबद्दल बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे.हा ग्रंथ साधारणपणे सन १३०० च्या आसपास लिहिला गेलेला आहे.यातील माहिती ही,संकलित आहे.अर्थात जे ज्ञान आधीपासूनच माहीत आहे, त्याला हे तेराव्या/ चौदाव्या शतकातले वाग्भटाचार्य शब्दांकित करून,सविस्तर समजावून आपल्यापुढे (हे वाग्भट वेगळे आणि 'अष्टांग हृदय' हा आयुर्वेदाचा परिपूर्ण ग्रंथ, पाचव्या शतकात लिहिणारे वाग्भट वेगळे.)


वेगळ्या प्रक्रियांचे विधी सविस्तर दिलेले आहेत. अर्थात किमान दोन अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या भारतीयांना हे 'रसायन शास्त्र' फार चांगल्याप्रकारे माहीत होतं आणि आपल्या पूर्वजांनी त्याचा अत्यंत पद्धतशीरपणे विकास केलेला होता.


'रस रत्नसमुच्चयात'दिलेल्या माहितीनुसार दोला यंत्र,पातना यंत्र,स्वेदनी अधः-पालन यंत्र,यंत्र,जारणा यंत्र,विद्याधर (ऊर्ध्वपातन) यंत्र,सामानत यंत्र,बालुका यंत्र,लवण यंत्र,हंसपाकयंत्र,भूधर यंत्र,कोष्टी वलभी यंत्र,तिर्यकपातन यंत्र,पालिका यंत्र,नाभी यंत्र,इष्टीका यंत्र,धूप यंत्र,स्वेदन (कंदुक) यंत्र,तत्पखल यंत्र... अशा अनेक यंत्रांचा उपयोग 'रसशाळेत' केला जायचा.या यंत्रांद्वारे पारद (पारा),गंधक इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया करून औषधं तयार केली जायची.


नागार्जुनाने 'रस रत्नाकर' या ग्रंथात सिनाबार या खनिजापासून पारद (पारा) मिळविण्याच्या आसवन विधीचा विस्ताराने उल्लेख केला आहे. असाच विधी 'रस रत्नसमुच्चय' आणि पुढे चरक / सुश्रुत यांच्या संहितेतही आढळतो.यात आसवन प्रक्रियेसाठी ढेकी यंत्राचा उपयोग सांगितलेला आहे.गंमत म्हणजे ज्या आधुनिक पद्धतीने पारा प्राप्त केला जातो,तो विधी,ह्या ग्रंथात दिलेल्या विधीसारखाच,फक्त आधुनिक साधनांनी केलेला,आहे...!


हे फार महत्त्वाचं आहे.ख्रिस्तपूर्व पाचशे / सहाशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अत्यंत व्यवस्थित, well defined, systematic अशा अनेक रासायनिक प्रक्रिया वापरायला सुरुवात केली होती,ज्यांचं मानकीकरण (standardization) त्याच काळात झालेलं होतं.


आचार्य सर प्रफुलचंद्र रे (सन १८६१ ते १९४४) यांना आधुनिक काळातील आद्य रसायनशास्त्रज्ञ म्हटले जाते.

यांनीच भारताची पहिली औषधं निर्माण करणारी कंपनी,'बेंगाल केमिकल्स अँड फार्मेस्युटीकल्स'स्थापन केली.इंग्रजांच्या वरिष्ठ वर्तुळातही यांना बराच सन्मान होता. ह्या प्रफुलचंद्र रे ह्यांनी एक सुरेख पुस्तक लिहिलंय -


'हिंदू केमिस्ट्री' नावाचं. या पुस्तकात त्यांनी ठामपणे हे मांडलंय की,रसायनशास्त्राच्या निर्मितीत आपले हिंदू पूर्वज कितीतरी पुढे होते. या पुस्तकात त्यांनी वेदांमधे असलेला वेगवेगळ्या रसायनांचा उल्लेख,अणू / परमाणूंच असलेलं विस्तृत विवेचन,चरक आणि सुश्रुत यांनी रसायनांवर केलेले विस्तृत प्रयोग यांबद्दल विस्तारानं लिहिलं आहे.अगदी त्या काळात असलेल्या केस रंगवण्याच्या कलेपासून ते पाऱ्यावर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांपर्यंतचे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात. धातुशास्त्राबद्दलसुद्धा या पुस्तकात त्यांनी लिहिल आहे.१९०४ मध्ये लिहिलेल्या ह्या पुस्तकाने इंग्रज संशोधकांचा आयुर्वेद आणि आपल्या प्राचीन रसायनशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.


आपल्या वेदामध्ये रसायनशास्त्रासंबंधी अनेक उल्लेख येतात.आयुर्वेदात अश्मन,मृत्तिका (माती),सिकता (वाळू),अयस (लोखंड किंवा कांसे),श्याम (तांबे),सीस (शिसे) यांच्या मदतीने केलेल्या प्रयोगांची उदाहरणं आहेत.


तैत्तिरीय संहितेचा भाष्यकार,'सायण' याने श्यामचा अर्थ काळे लोखंड असा केला आहे. यजुर्वेदात एका मंत्रात अस्ताप (Iron Smelter) चा उल्लेख आहे.लोखंडाच्या खनिजाला लाकूड / कोळशाने तापवून कशा प्रकारे लोखंड हा धातू तयार केला जातो याचे वर्णन यात केलेले आहे. अथर्ववेदात शिसे या धातूवर 'दधत्यम सीसम..' नावाचे पूर्ण सूक्त आहे.शिशाचे बनवलेले छर्रे युद्धात वापरायचे असा अर्थ यातून ध्वनित होतो...


प्राचीन काळातील यज्ञशाळा ह्याच या देशातील मूळ रसायनशाळा होत्या.


तैत्तिरीय संहितेत यज्ञशाळेत/ रसायनशाळेत लागणाऱ्या उपकरणांची सूचीच दिलेली आहे

इष्य - इंधन

बर्ही - फुंकणी किंवा स्ट्रॉ

वेदि / घिष्ण्य - अग्नी निर्माण करण्याच्या जागा,ज्यातून रासायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या भट्ट्या निर्माण झाल्या.

स्त्रुक - चमचे

चमस - प्याले / भांडी

ग्रावस - खल-बत्ता मधील बत्ता

द्रोणकलश - रसायने ठेवण्याचे लाकडी पात्र 

आघवनीय - रसायनांचे मिश्रण करण्याचे पात्र

ही यादी बरीच लांबलचक आहे.पण याचा अर्थ स्पष्ट आहे.त्या वैदिक काळात,शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेल्या रसायनशाळा होत्या.तेथे कोणकोणत्या वस्तू / पात्रं असावीत हे निश्चित होतं.आणि करण्यात येणाऱ्या प्रक्रिया सुद्धा निश्चित आणि ठरलेल्या होत्या.


शतपथ ब्राम्हण,ऋग्वेद,यजुर्वेद,अथर्ववेद इत्यादी ग्रंथांत ठिकठिकाणी रसायनं आणि त्यांचे विविध क्षेत्रांत होणारे उपयोग यासंबंधी विवेचन आढळते.


या काळात जगाच्या इतर भागात, रसायनशास्त्रासंबंधी असे सुस्पष्ट,व्यवस्थित आणि प्रक्रियेसहित केलेले विवेचन आढळते का..? उत्तर नकारार्थी आहे.इजिप्तमधे काही मोजके उल्लेख आढळतात आणि चीनमधे चीनने अनेक रसायनांवर त्या काळात काम केल्याचे दिसते.मात्र हे सोडलं तर जगात इतरत्र कोठेही रसायनशास्त्र इतक्या प्रगत अवस्थेत आढळत नाही.


अकराव्या शतकातील चक्रपाणी दत्तने 'चक्रदत्त' नावाचा ग्रंथ लिहिलाय.जुन्या माहितीला शब्दबद्ध करून तो सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवतो.यात त्याने ताम्ररसायन बनविण्याचा विधी दिलेला आहे.पारा,तांबे आणि अभ्रकावर प्रक्रिया करून त्याला गंधकाचा पूट देऊन ताम्ररसायन कसे तयार करतात,हे त्याने समजावून सांगितले आहे.याच पद्धतीने 'शिलाजतुरसायन' चे विवरण आहे.


चक्रपाणीच्या दोनशे वर्षांनंतर शारंगधराचार्य यांनी लिहिलेल्या 'शारंगधर संहिते'मधे अनेक रसायन प्रक्रियांबद्दल उल्लेख आहेत. मात्र यात सुरुवातीलाच लिहिले आहे की,जुन्या ऋषी-मुनींनी आपापल्या संहितांमध्ये जे श्लोक दिलेले आहेत,आणि अनेक चिकित्सकांनी ज्यापासून यश मिळवले आहे.अशा श्लोकांचे हे संकलन आहे.या संहितेत आसव,काढे बनवताना रासायनिक प्रक्रिया अत्यंत विस्तृतपणे दिलेल्या आहेत.


या किंवा अशा अनेक ग्रंथांमध्ये कणादच्या अणू / परमाणू सिद्धांताचा उल्लेख केलेला आढळतो.कणादने सांगितले आहे की,


 एका प्रकारचे दोन परमाणू संयुक्त होऊन 'द्विणूक' निर्माण होऊ शकते.द्विणूक म्हणजेच आजच्या शास्त्रज्ञांनी परिभाषित केलेला 'बायनरी मॉलीक्युल' वाटतो.


प्राचीन भारतात रासायनिक प्रक्रियांसंबंधी बरीच माहिती होती.याच पुस्तकातील 'अदृश्य शाईचे रहस्य' या लेखात,पाण्यात भूर्जपत्र टाकल्यावर दिसू शकणाऱ्या शाईचे वर्णन केले होते.अशा प्रकारची शाई तयार करताना अनेक प्रयोग, अनेक रासायनिक प्रक्रिया त्या काळात केल्या असतील.वातावरणातील आर्द्रता,प्राणवायू, अनेक आम्लीय / क्षारीय पदार्थांबरोबर धातूंचा संपर्क झाल्यावर होणाऱ्या प्रक्रिया... यातून धातूंच्या संरक्षणाचे उपाय.. या साऱ्या गोष्टी तेव्हा माहीत होत्या.'याज्ञवल्क्य स्मृती' मध्ये धातूंना शुद्ध करण्याची प्रक्रिया दिली आहे. 'रसार्णव' मधे सांगितलं आहे की,शिसे,लोखंड, तांबे,चांदी आणि सोने ह्या धातूंमध्ये स्वसंरक्षणाची प्रवृत्ती ह्याच क्रमात कमी होत जाते,जी आजच्या आधुनिक रसायनशास्त्राप्रमाणे बरोबर आहे.


हे खरं आहे की,आजच्या रसायनशास्त्राने अफाट प्रगती केलेली आहे. 


मात्र आजपासून दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी रसायनशास्त्राचे मूलभूत सिद्धांत मांडत,अत्यंत व्यवस्थित,परिपूर्ण अशी डॉक्युमेंटेड सिस्टम भारतामधे कार्यरत होती,ज्यांद्वारे अनेक क्षेत्रांत रासायनिक प्रक्रियांद्वारे कार्य होत होते.औषधी शास्त्र,खनिज शास्त्र,धातुशास्त्र यांसारखी अनेक क्षेत्रं होती,ज्यात रासायनिक प्रक्रिया आवश्यक होत्या.मात्र महत्त्वाचे म्हणजे ही सर्व रसायने, जैविक स्रोतांपासून प्राप्त केली जात होती. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने ह्या प्रक्रिया चालत होत्या.


आणि हे सर्व करत असताना आपल्या पूर्वजांनी इतकी मोठी विरासत आपल्यासाठी मागे ठेवली आहे,की त्यातील अनेक प्रक्रियांचा नीट अर्थ लावणंच आपल्याला शक्य झालेलं नाही. अर्थातच प्राचीन रसायनशास्त्राच्या अभ्यासाची आज नितांत निकड आणि गरज आहे...!!


१५ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..