* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/११/२२

९ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..

'पाण्याच्या बचतीचा टाटा पॅटर्न'


आम्ही पैसे भरतो पाण्याचे... हवे तेवढे वापरू... हवे तसे वापरू... अशी उद्दाम भाषा बऱ्याच वेळा ऐकायला मिळते.आणखी दुसरी बाजू... करोडो रुपये उलाढाल असलेल्या कंपन्यांमध्ये पाण्याच्या बिलाची रक्कम किती? त्याची किंमत ती किती ? हे दोन्ही विचार पूर्णपणे बाजूला सारून,पैसे भरले म्हणजे वाटेल तो हक्क मिळाला किंवा किंमत कमी आहे म्हणून त्यात काय वाचवायचे असा कोणताही समज करून न घेता पाणी वाचवणे ही सामाजिक जबाबदारी आहे आणि त्याची पैशात किंमत कमी असली तरी त्याचे मोल अमुल्य आहे.हे जाणून व्यापाराआधी समाज कल्याणाचे उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या टाटा मोटर्स कार प्लांटमधील पाणी बचतीचे व पाणी पुनर्वापर संबंधित ही कंपनीतील ध्येयवादी पर्यावरण रक्षण विचाराने सांघिक कामगिरी केलेल्या विविध यशस्वी उपायांची ही कहाणी..!


गिरीश लिमये हे टाटा मोटर्स कार प्लांट इन्व्हरमेंट डिपार्टमेंट संबंधीत अधिकारी आहेत.....


आमच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या मासिक बैठकीत लक्षात आलं की गेली दोन महिने कंपनीतील पाण्याची मागणी आधीच्या महिन्यांच्या आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त आहे.आमचा दर दिवशीचा,दर महिन्याचा अन् दर वर्षीचा अनेक हिशेबापैकी एक 

म्हणजे पाण्याचा हिशोब! दर दिवशी किती पाणी लागले? प्रत्येक कार मागे किती पाणी लागले? त्याची पैशात रक्कम किती? हे हिशोब करताना लक्षात आले की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रक्कम खूप वाढली आहे.कारखान्यातील प्रॉडक्शन तर नेहमी होते तेवढेच होते,कामगार व अधिकाऱ्यांची संख्या ही तेवढीच होती.मग इतकी पाण्याची मागणी का वाढली? याचा आढावा घेतानाच उच्च अधिकाऱ्यांनी इन्व्हारमेंट डिपार्टमेंटला सांगितले की पाणी वापर,पाणी मागणी आणि पाणी बिल कमी करायला हवे. सांगा या एक वर्षात तुम्ही मागणी किती टक्क्यांनी कमी करणार ?... कोण उत्तर देणार? शेवटी कोणी तरी पुटपुटत म्हटलं दहा टक्क्यांनी मागणी कमी करू!! 


मीडियम स्केल व लार्ज स्केल कंपन्यामध्ये ईतर अनेक डिपार्टमेंट बरोबरच एक इन्व्हरमेंट डिपार्टमेंट असते.त्यांना कंपनी संबंधित पर्यावरणाच्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात (हजार्डस् वेस्ट डिस्पोजल) विघातक कचऱ्याची विल्हेवाट,एस.टी.पी.व ई.टी.पी. यांच्या कामाचे नियंत्रण,दुरुस्ती,उभारणी हे महत्त्वाचे काम असते.कंपनी कँटीनच्या उरलेल्या अन्नाची विल्हेवाट,तसेच कंपनीतील हवेची गुणवत्ता व कंपनीतून बाहेर पडणाऱ्या हवेत मिसळणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण यावरचे नियंत्रण व कार्यवाही ही महत्त्वाची कामे असतात.त्याचबरोबर सर्वप्रकारे वापरायच्या पाण्याची गुणवत्ता आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट ही संवेदनशील कामे या विभागाकडे असतात.या सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवणे,त्यांची माहिती आपल्या व्यवस्थापनाला व विविध सरकारी,निमसरकारी सरकारी संस्थांना पाठवणे, तसेच सर्व प्रकारचे कायदेशीर पत्रव्यवहार ठेवणे ही ही कामे या विभागाची असतात.


पण सध्या तरी सर्वात महत्त्वाचा संवेदनशील विषय म्हणजे पाणी आणि सांडपाणी !! तर वरिष्ठ साहेबांचा सर्वांसमोर विषय चालू होता. वर्षाआड दुष्काळ आणि पाण्यावर चर्चा,जगात चालू आहे.त्यांनी सांगितले दहा टक्के पाणी वापर कमी करणे हे काही चॅलेंजेस होऊ शकत नाही ते म्हणजे सहज होणारे आहे!! आव्हान नेहमी मोठे असावे, आव्हान आव्हान वाटले पाहिजे!! तरच माणूस झगडतो... घ्यायचं तर निम्मे पाणी वाचवू असे काहीतरी घ्या वगैरे वगैरे, सगळं इन्व्हरमेंट डिपार्टमेंट डोक्यावर डोंगर पडल्यासारखे एकमेकाकडे पाहायला लागले. पण साहेबांसमोर बोलणं शक्य नव्हतं. हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. हे कसं काय शक्य होईल..!


तीन महिन्यानंतर पहिला रिपोर्ट द्यायचा होता. आता प्रत्येक कार मागे जेवढं पाणी लागत होतं. ते आता आम्हाला निम्म्यावर आणायचं होतं. आता हे फक्त इन्व्हारमेंट डिपार्टमेंटच्या आटोक्यात येणारं काम नव्हतं.आता कार प्लांटमधील सर्व शॉप्स म्हणजे लोअर शॉपमधून पाणी-पर्यावरणप्रेमींचा एक गट स्थापन करायचं ठरलं!!


टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीची टेल्को ही अकराशे एकरमध्ये वसलेली.कंपनीचा कार प्लांट हा साधारण 'तीनशे एकरात'व्यापलेला विभाग आहे.तिथे सगळे मिळून सात हजार लोक काम करतात.येथे सर्व प्रकारच्या टाटा ब्रँडच्या कार्स बनवल्या जातात.तर ह्या पाणी टीममधील लोक त्यांच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त हे पाण्यासाठी काम करणार होते. याला क्रॉस फंक्शनिंग टीम असे नाव दिले. या टीममध्ये सिव्हिल आणि बांधकाम डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटला आवर्जून घेतले. प्लंबिंग आणि इतर तत्सम कामासाठी कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट आणि सर्वच आलेल्या गोष्टी फायनान्स डिपार्टमेंटला माहित असतील तर बजेट मंजूर करायला अडचण नको म्हणून फायनान्स डिपार्टमेंट,आता काम सुरू झाले.... एकेक शॉपच्या पाण्याचा हिशोब मांडणे व तपासणी करणे सुरू झाले. यातून सगळ्यात जास्त पाणी लागणारे ते सगळ्यात कमी पाणी लागणारे अशी क्रमवारी ठरू लागली.पहिल्या नंबर होता पेंट शॉपचा !! तो सर्वात जास्त पाणी संपवणारा,वापरणारा होता !! सर्वात जास्त पाणी का लागते ? आता एकेक गोष्ट तपासण्यास सुरुवात झाली.लक्षात आलं की एक जुनी पाईपलाईन व एक नवीन पाईपलाईन आहे.जुनी पाईपलाईन आणि त्याचा व्हाल्व चालू आहे.ते पाणी कुठे जाते हे कळत नव्हते. वापरले तर जात नव्हते. लगेच पाईप लाईन बंद केली.याने चक्क अडीच ते तीन लाख लिटर पाणी वाचू लागले..... ही एक नवीन दिशा देणारी गोष्ट होती!!


आता प्लांटमधील सर्वच पाईपलाईनचा सर्वे सुरू झाला.त्यांचे नियोजन व निरीक्षण व सुरू झाले. मग एकेक गोष्ट सापडत गेली.अशीच एक मोठी गोष्ट आढळली.कुलिंग टॉवरला पाणी सर्क्युलेट व्हायला हवे होते.पण तिथला रिटर्न हॉल बंद होता आणि पाणी परत परत वापरले जाण्याऐवजी ते बाहेर जाऊन एटीपीला जाऊन मिळत होते. तो पण व्हाल्व बदलला न् एक ते दीड लाख लिटर पाणी वाचायला लागले.


अंडरग्राउंड पाणी वॉटर लाईन्स चेक केल्या तर त्यांची गळती बऱ्याच प्रमाणात होती.मग दुरुस्ती किंवा नवीन पाईप टाकले. तिथेही हळूहळू एकेक करून एक ते दीड लाख लिटर पाणी वाचायला लागले.पाईपलाईनचे हे सर्व प्रकारचे काम हाताळून झाले.त्यात बरेचसे यश हाती लागले.आता एकेका शॉपमधील पाण्याच्या वापराकडे वळलो.एक JLR नावाचं शॉप आहे, तिथे गाडी धुतली जाते. ती माणसांनीच धुवावी लागते.तेथील सुपरवायझर व कामगाराशी चर्चा केली.त्यांचे समुपदेशन केले.गाडी स्वच्छ सुंदर धुवा,हयगय नका,पण अशा अशा पद्धतीने पाणी वाचवणे शक्य आहे.हे हे करा,यासाठी त्यांना एक चेकलिस्ट दिली.त्याप्रमाणे त्यांचे बिहेविअर चेंजिंग आणि प्रिसिजन वर्किंग हे अगदी गाडी धुण्याच्या कामातही शक्य आहे,हे त्यांना व आम्हाला ही उमगले. त्या शॉपला रोज एक लाख लिटर पाणी वाचायला लागले. 


आतापर्यंत आम्ही तर निम्मी लढाई जिंकली होती.टारगेट ठरवलं होतं.त्याच्या निम्मे पाणी आम्ही आता वाचवू लागलो होतो.आमचा आत्मविश्वास दुणावला,उस्ताह वाढला.यापूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता प्रत्येक कार बनवण्यासाठी लागलेले कमीत कमी पाणी किती त्यापेक्षा आम्ही बराच खाली आणला होता पाणी वापर..!


आमचे टीम वर्क सुरू होते.आता आमचा टिम मेंबर प्रत्येक शॉपमधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी संवर्धन हा विषय घेऊन पोहोचला होता. कंपनीतल्या प्रत्येकाला या विषयात गुंतवायचे होते.त्यांच्या सूचना,त्यांच्या सवयी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी सर्वच बाबतीत त्यांच्यावर लक्ष द्यायचे होते.बऱ्याच वेळा आम्ही या कामातला वेळ ८० टक्के नियोजनामध्ये घालवला आणि प्रत्यक्ष कामाला त्यामुळे २० टक्के वेळ लागला.


आता प्रत्येक शॉपचा ही पाणीवापर महिन्यागणिक हळूहळू का होईना कमी होऊ लागला.


प्रत्येक शॉपच्या टॉयलेट ब्लॉकची जबाबदारी एकेका लीडरला दिली.ती त्या कुठल्याही लिकेजसाठी,कोणत्याही सूचनेसाठी, सुधारणेसाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान आम्ही पूर्ण प्लांटमधील सर्वांसाठी खुली पाण्याविषयीची घोषवाक्यची स्पर्धा ठेवली त्यास उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आमची माहिती त्यांच्यापर्यंत अधिक कळकळीने पोहोचली.त्यांची विचारशक्ती काम करू लागली. आणि यातून त्यांची जागरूकता वाढली.


दरम्यान सर्व ठिकाणचे कॉक बदलण्यात आले. पूर्वीचे २१ सेकंद पाणी देण्याऐवजी आता अकरा सेकंद चालणारे कॉक बसवले गेले. आता त्यातून पन्नास टक्के पाणी वाचू लागले होते..


पाणी वाचवण्याचे प्रयत्न चालूच होते.त्याच बरोबर पाणी साठवणे,पाण्याचे शुद्धीकरण, सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापर या माध्यमातूनही काही योजना हाती घेतल्या होत्या. त्यातून ही यश साधले.तसे झिरो डिस्चार्ज कंपनी म्हणून आम्ही २०१३ मध्येच त्या टप्प्यावर पोहोचलो होतो.पण आता आमचा पाण्याचा इन टेक वाढत होता.आजही आम्ही झीरो डिस्चार्ज स्टेटसमध्ये आहोत पण पाण्याची एमआयडीसीकडून खरेदी निम्म्यावर आली आहे.


पाणी साठवण्याचे उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग !! ही सिस्टिम पूर्वी काही प्रमाणात उभारली होती पण ती वापरली जात नव्हती. त्याकडे चुकून अनेक वर्ष दुर्लक्ष झाले होते.मग त्यासंबंधीचे सगळेच बिल्डींग ड्रॉइंग,पाईपलाईन लेआउट वगैरेचा अभ्यास करण्यात आला व शक्य तिथे शक्य ते दुरुस्त केले.तर काही ठिकाणी समांतर नवीन पाईपलाईन टाकली,पावसाळ्यात तीन महिने हे पावसाचे पाणी साठवण्याची आमची क्षमता इतकी आहे की त्यातून सर्व प्लांटची पिण्याच्या पाण्याची गरज भागेल.


पावसाळ्यातील या तीन महिन्यातील एमआयडीसीकडून विकत घेत असलेल्या पाण्याची मागणी इतकी कमी झाली की तीन महिने मिळून तीस टक्के पाणी बिल वाचले!! पाणी साठवणूक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून अजून वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.त्यासाठी भूगर्भातील पाणी साठवणुकीसाठी योग्य खडक याचा शोध घेऊन म्हणजेच अॅक्विफर मॅपिंग करून आणि रिचार्ज झोन ठरवून जिथून पाणी उत्तम रीतीने जमिनीत जीरु शकणार आहे.हा भाग शोधून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरून पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचे स्वप्न आहे.त्यामुळे आणखी ही एक मोठे स्वप्न साकार करता येईल ते म्हणजे टाटा मोटर्स कार प्लांट निसर्गातून जेवढे पाणी वापरण्यासाठी घेते तेवढे किंवा त्यापेक्षा थोडे का होईना अधिक पाणी निसर्गाला परत देण्याची सोय करणे.


तो टप्पा ही लवकरच पार करू असा विश्वास टाटा मोटर्सच्या एन्व्हारमेंट टीमला नक्की आहे.


या टीमने मध्ये तयार झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर ही बरेच काम केले आहे. ईटीपीच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रायमरी व सेकंडरी ट्रीटमेंट करतातच,पण tirsury म्हणजे थर्ड स्टेज ट्रीटमेंट व रिव्हर्स ऑस्मॉसिस ट्रीटमेंटमधून अधिकाधिक स्वच्छ पाणी मिळवले जाते.इंडस्ट्रीतील ट्रीटमेंट प्लांटमधील आर.ओ. प्लांट हा पिण्याच्या पाणी मिळवण्याकरता असणाऱ्या प्लांटपेक्षा वेगळा असतो.म्हणजे यातील फिल्टर मेंब्रेन वेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असतात व मेम्ब्रेन संख्येने पण जास्त असतात. त्या मेंब्रेन्सच्या किमतीही खूप जास्त असतात. त्याचबरोबर त्यांचे आयुष्यही तुलनेने जास्त असते.


तर ह्या प्लांटमधून बाहेर पडणारे पाणी पेंट शॉपमध्ये वापरतात.पेंट शॉपमध्ये काही केमिकल्स बनवण्यासाठी मिनरल वॉटर लागते, ते ह्या आरो प्लांटमधून उपलब्ध होते. या प्रक्रियेमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे रोज ७ ते ८ लाख लिटर पाणी दर दिवशी वाचू लागले. विविध शॉपवर ठिकाणी स्वच्छतेसाठी लागणारे पाणी ही आम्ही यातलेच वापरतो.


या प्लांटमधला निघणारा गाळ निघतो त्यातील पाणी काढून टाकतो. त्याला विशिष्ट मशिनने गरम करून वाळवतो.


या सर्व कामापलीकडेही आमचे अजून प्रयत्न असणार आहेत.नवनवीन कल्पना,तंत्रज्ञान, लोकसहभाग यांचा वापर करून पाण्याची मागणी कमी कशी करता येईल असेही आमची टीम म्हणते.


Waterless Urinals, E.T.P. मधील काही पर्यायी प्रक्रिया आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यातून आम्ही आमच्या ध्येयाच्या बरेच पुढे जाऊ असाही आत्मविश्वास आहे.


याबरोबरच सहा हजार लोक रोज कंपनीत जेवतात.त्या किचनचे किचन वेस्ट ही पाणी खराब/प्रदूषित करणारा घटक आहे.त्याची विल्हेवाट लावणे ही कंपनीची जबाबदारी आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही त्यातून बायोगॅस बनवता येईल असा मोठा प्लांट उभा केला आहे. कॅन्टीनमध्ये स्वयंपाकासाठी या बायोगसचा उपयोग होतो.


" संगणके जेउते नेले "


'माळ्याच्या मळ्यामधी पाटाचे पाणी जाते' हे आपल्याला ठाऊक असते.पण आताच्या काळात पाटापाटातून झुळझुळ पाणी नेलंय नव्हे तर शेतीला,बागेला पाणी किती व कधी द्यायचे नियोजन संगणक करतो.इंटरनेट ऑफ थिंग ही ह्या दशकाची क्रांतीच,भारतात इंटरनेट ऑफ थिंगचा वापर शेतीसाठी पाणी नियोजना करिता व व्यावसायिक तत्वावर पहिल्यांदा केला तो चक्रधर बोरकुटे यांनी..!


चक्रधर नागपूरच्या रायसोनी कॉलेज मधून २००३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर झाला. आवडीचा विषय आणि त्यात चांगली गती होती तरी नोकरीसाठी पुण्यात आल्यावर पहिली नोकरी करावी लागली ती बँकिंग मार्केटिंगची. काही काळातच त्यात चांगला जम बसवला.हे चांगले चालू लागले होते पण इलेक्ट्रॉनिक संबंधित काम करण्याचा निश्चय मनात कायम होता.इलेक्ट्रॉनिक्समध्ये कामाची संधी एकदा आली पण पगार अगदी नगण्य म्हणावा असा होता.पगारापेक्षा महत्वाचे वाटले ते आपल्या ज्ञानाचा व्यवहारात करता येवू शकणारा उपयोग आणि त्यातून मिळणारा आनंद.... मग मनावर घेतले आणि भविष्य घडविण्याचे काम आत्मविश्वासाने सुरू केले.बँकिंग मार्केटिंगच्या काळातच एका सॉफ्टवेअर कंपनीत ही काम केले होते.पगार व आर्थिक प्रगतीसाठी तेव्हाही आणि आताही सॉफ्टवेअर ही सर्वात चांगली संधी समजली जाते.पण चक्रधर तिथे रमला नाही.थोडा अनुभव पोतडीत भरून घेतला.


तो एका इलेक्ट्रोनिक चीप्स डिझाईन करण्याच्या कंपनीत काम करू लागला.मेहनती चक्रधर वर मालकाचा विश्वास बसला.इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर व सॉफ्टवेअर डिझाईन करणारी ही कंपनी मालकाने एक दिवस अचानक चक्रधरलाच चालवायला दिली.मालक स्वतः बेंगलोरला तिकडे खूप काम असल्यामुळे निघून गेले.


मग या कंपनीचे सर्व नियोजन चक्रधर कडे आले.त्याची चीप्स डिझाइन बरोबरच विवेक सावंत सरांच्या एमकेसीएल बरोबर ट्रेनिंग प्रोग्रामची ही कामे चालू होती. काही कंपन्यांसाठी ऑटोमेशन चे काम होते ते केले. त्याच दरम्यान एका गृहप्रकल्पाचेही सिक्युरिटी साठी ऑटोमेशनचे काम केले.असे विविध स्तरावर विविध प्रकारचे काम सुरू होते.


दरम्यान २००९ मध्ये विवाह झाला.सौ.चेतना याही इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरींगच्या पदवीधर असल्याने तर त्यांच्या कंपनीची टेक्निकल बाजू अधिकच भक्कम झाली.त्यांचे एक मित्र प्रशांत पाटील हेही त्यांच्या सल्लागाराच्या भूमिकेत तेव्हापासून आजपर्यंत आहेतच.


रेल्वे मंत्रालयाबरोबर रेल्वेसाठी विविध इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशनच्या यंत्रणांची ऑर्डर चक्रधरच्या कंपनीला २०१५ मध्ये मिळाली होती.त्यानिमित्ताने रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतत भेटी होत असत.तिथेच लुपिन फाऊंडेशनच्या योगेश प्रभूंची भेट झाली.योगेश प्रभू यांच्याशी चर्चा करताना शेतीमधील इलेक्ट्रॉनिक्स व आटोमेशन याबद्दलही चर्चा झाल्या.योगेश प्रभू आणि त्यांचे लुपिन फाउंडेशन हे समाजकार्य म्हणून ग्रामविकास आणि त्यातही विशेषतः शेती व शेतकरी विकासाविषयक खूप कामे करत असल्यामुळे शेतीतल्या गरजा काय आहेत हे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत.चक्रधर विविध सेन्सर बनवतात व त्यावर आधारित अनेक यंत्रणाही,त्या प्रगत राष्ट्रांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांसाठी बनवतात,हे योगेश प्रभू व त्यांचे वरीष्ठ श्री.रावसाहेब बढे यांना समजल्यापासून शेतीसाठी असे काही संवेदक विकसित व्हायला हवे हे वाटत होते.विशेषतः योग्य इरिगेशन सिस्टिमसाठी,या विषयीची चर्चा चक्रधर बरोबर झाली आणि त्यातून कल्पना पुढे आली की सिस्टीम आणि जमिनीतली आर्द्रता संवेदकाने मोजणे व त्याआधारावर पिकांसाठी सिंचन करणे हे काम व्हायला हवे.हे आपली कंपनी हे काम करू शकते चक्रधरांच्या लक्षात आले. चक्रधर,त्याचा मित्र प्रशांत पाटील व पत्नी चेतना यांनी भरपूर अभ्यास करून विविध प्रयोग करून पूर्ण स्वयंचलित सिंचन व्यवस्था शेतीसाठी विकसित केली. त्यात इलेक्ट्रॉनिक व I.O.T (Internate of Things) चा उत्तम मिलाफ आहे. पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे हे तसे खूप आव्हानात्मक काम आहे आणि त्यासाठी ही स्वयंचलित सिंचन व्यवस्था पूर्णपणे उत्तर ठरते. आपण यासाठी आधी पिकांना योग्य प्रमाणात पाणी म्हणजे काय याविषयी चर्चा करू म्हणजे ते लक्षात येईल.


योग्य प्रमाणात पाणी म्हणजे नक्की काय व किती यासाठी काही माहिती आधी मांडावी लागेल.जमिनीवरील पिकांची वाढ ही प्रामुख्याने जमिनीखाली मुळांच्या वाढीवर अवलंबून असते. मुळे सजीव असल्याकारणाने पीक वाढीच्या काळातील शोषून घेत असताना श्वसनही करत असतात.मात्र त्यासाठी जमिनीत पाणी व हवा यांचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. जमिनीतील हवा व पाण्याच्या समतोल असण्याला वापसा म्हणतात.ही वापसा अवस्था जेवढे जास्त काळ पिकाच्या वाढीस दरम्यान राहील तेवढे पीक जोमदार येते.जमिनीत पाणी जास्त असेल परंतु पिकास शोषून घेता येत नसेल तर झाडाची पाने पिवळी पडतात,त्यांची वाढ खुंटते,हीच अवस्था जास्त काळ राहिली तर पीक मरते देखील,तसेच या उलट जमिनीत पाणी कमी राहिले,हवा जास्त राहिली तर पिकास पाणी कमी पडते.अन्नद्रव्य कमी पडत जातात.पाने कोमेजतात,पीक वाळू लागते आणि ही अवस्था जास्त काळ राहिली की पीक मरते.


पीकाच्या उत्तम वाढीसाठी जमिनीतून झाडाद्वारे पाण्याचे योग्य प्रमाणात शोषण होणे आवश्यक असते.त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घनपदार्थ ५० टक्के,पाणी २५ टक्के आणि हवा २५ टक्के असे संतुलन आवश्यक असते.जमिनीतील किंवा शेतीतील पाणी नक्की कुठे कसे असते तेही थोडक्यात पाहू.जमिनीत मातीचे कण एकमेकांच्या जवळ येऊन समूह निर्माण करतात या मांडणीला मृदेची किंवा मातीच्या कणांची रचना असे म्हणतात.मातीच्या कणांच्या बारीक वालुकामय किंवा मध्यम जाड आकारावरून व प्रमाणावरून जमिनीचे वर्गीकरण ठरवतात.त्यालाच जमिनीचा पोत असे म्हणतात.जमिनीच्या पोतावर पाण्याची जलधारणाशक्ती,पाण्याची वाहकता जमिनीतील सूक्ष्म कृमींची (उपयुक्त बॅक्टेरीया) वाढ अवलंबून असते. जमिनीतील किंवा मातीतील पाणी तीन प्रकारचे असते.मातीच्या कणाने शोषलेले पाणी, मातीच्या कणांच्या भोवतीच्या पोकळीत साठलेले पाणी आणि खाली खाली जाणारे मुक्त पाणी…


जमिनीची सच्छिद्रता म्हणजे माती कणांच्या आकारमान व त्यांची रचना यावर साधारणतः ५० टक्के इतकी असते.जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीप्रमाणे ती कमी जास्त होते.


या सर्व गोष्टीची व्यवस्थित माहिती,त्यांचे शास्त्रीय ज्ञान,पिकाच्या वाढीची अवस्था, त्या त्या वेळी त्या त्या पिकाची पाण्याची गरज, तसेच हवामानातील ऋतूपरत्वे बदल यावर बदलणारी पाण्याची गरज,त्याप्रमाणे पाण्याचे मोजमाप या सर्व गोष्टी पाणी व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक ठरतात.


आयओटीने जगात तिसरी क्रांती आणली आहे असे म्हटले जाते.पहिली औद्योगिक क्रांती,दुसरी संगणक क्रांती आणि तिसरी ही इंटरनेट ऑफ थिंग्सची क्रांती.यातूनच कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उगम झाला आहे. हे अगदी थोडक्यात सांगायचे तर स्वतः निर्णय घेणारा व त्यावर आधारित कृतीही करणारा संगणक !! यापूर्वीचे संगणक कसे आहेत ? तर त्यांना जे विशिष्ट काम करायचे आहे त्यासाठी खास प्रणाली (Software) विकसित करायची त्यात बाहेरून कोणी तरी माहिती भरणार (Data input) त्यावर कम्प्युटर किंवा संगणक निष्कर्ष देणार आणि त्यावर आधारित कृती परत माणसाला करावी लागणार.पण आता गेल्या दशकभरात हळूहळू अनेक क्षेत्रात आयओटीचा वापर वाढत आहे.सुरुवातीला फक्त उत्पादन क्षेत्रात येणाऱ्या कारखान्यातून यांचा वापर सुरू झाला.पुढे वैद्यकीय क्षेत्र व्यापले, आता वाहतूक क्षेत्र व्यापत चालले आहे आणि तो आता तर घराघरात येऊन पोहोचला आहे.शेतीसाठी आयओटी चा वापर सुरू आहे.पण भारतामध्ये तर बहुतेक बोरकुटे हेच पहिल्या पाच लोकांमध्ये असतील ज्यांनी तिचा वापर आपण शेती व सिंचनासाठी करूया असा विचार केलाय. किंबहुना आता तर ते पहिलेच आहेत सिंचनासाठी गेटवेचा वापर करून सिंचनाची सर्व यंत्रणा स्वयंचलित करून दाखवणारे! यात त्यांना त्यांच्या पत्नीची बरोबरीने साथ आहे. सौ. चेतना यांनी काही काळ पुण्यातील नामवंत इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.त्याच काळात त्या त्यांच्या विषयात सल्लागार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या.नंतर प्राध्यापिकेची नोकरी सोडून पूर्णवेळ कंपनीची मुख्य जबाबदारी सांभाळून लागल्या.संशोधन व उत्पादनाचे डिझाईन ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे.


या पाणी व्यवस्थापनातील यंत्रणेबाबत चर्चा करताना त्यांनी सांगितले की आमचे संवेदक पाचपट स्वस्त आहेत.पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते सहजी कोणालाही हाताळता येतात, वापरता येतात.फूटभर उंचीचे हे संयंत्र जमिनीत नऊ-दहा इंच खोल रोवतात.वर एक डबी सारखा छोटा भाग असतो.त्यात बॅटरी असते.ही बॅटरी किमान तीन वर्षे टिकते.एका एकरासाठी दोन संवेदक पुरतात.संवेदक,गेट-वे व सॉफ्टवेअर हे सगळे मिळून एक एकरासाठी तीस हजाराची गुंतवणूक एकदाच होते.हे संवेदक काढून दुसरीकडे ही बसवता येतात.हे संवेदक जमिनीखालील नउ इंचापर्यंतची आर्द्रता सांगू शकतात.


फळपिकासारखा पिकांची मुळे अधिक खाली जात असल्याने तिथे काय करायचे असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की फूट दीड फूट खड्डा करून तिथून खाली हे संवेदक रोवायचे.त्याला बाजूला थोडं संरक्षित करायचे.द्राक्षबागेत दोन-तीन ठिकाणी अशीच खड्डे घेऊन त्यात छोट्या बादलीच्या तळाला छिद्र पाडून त्या बादलीतून खाली नेऊन हे संवेदक रोवले. ही कल्पना शेतकऱ्यांचीच बरं का! ही यंत्रणा बाफना फार्म,केसनंद वाघोली (पुणे जिल्हा) येथे आणि मोहोळ तालुक्यातील एके ठिकाणी द्राक्ष बागायतीसाठी उभी केली आहे.तर जुन्नरला वैष्णव धाम (बुचकेवाडी) येथे फळबागेबरोबरच भाजीपाला आणि अगदी ज्वारीसाठीही ही वापरली आहे.या यंत्रणेमुळे सर्वोच्च काय साधले जाते तर ते म्हणजे प्रिसिशन इरिगेशन (Precision Irrigation) पाणी देण्यातली अचूकता.त्यातून पाण्याची वाढलेली उत्पादकता! 


'वर्तमान काळात सातत्याने जिवंत राहण्याचं सजग उद्दिष्ट बाळगणारी सामान्य व्यक्ती म्हणजे " संन्याशी " होय.'

( रास्ट ) 


खरचं हे कार्य नम्र होण्याचे 'शिक्षण' देवून गेले.


कोणत्याही प्रवाहापासून ३० मीटर बांधकामे असू नयेत,असा नियम असताना ओढ्यातच बांधकामे करण्यापर्यंत गोष्टी गेल्या आहेत. तसेच हे खूप कमी कालावधीत घडले,फक्त आठ - दहा वर्षात..बांधकामाचा म्हणजे जमीन,इमारतींनी व्यापलेला हा वेग निसर्गाचा पूर्ण विध्वंस करत गेला व जात आहे.


'पाण्याचा पत्ता सांगणारा माणूस'


डॉ. श्रीकांत गबाले म्हणजे पाण्याचा पत्ता सांगणारा व पाण्यापर्यंत पोहोचायचा नकाशा काढून देणारा माणूस.


पाणी व्यवस्थापन कुठलेही असो... छोट्या घरातलं,खेड्याचं,शहराचं,धरणाचं कालव्याचं, की पुराचं सुद्धा... आराखडे आणि नकाशाशिवाय काहीच करता येत नाही. एकावेळी दहा-दहा नकाशांचा संदर्भ द्यायचा आहे,हजारो रीडिंगची पडताळणी करायची आहे, अशा कामासाठी लागतात कम्प्युटरवर पाहता येतील असे नकाशे,त्यांचं आकलन उत्तम रीतीने करून त्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरमध्येही पारंगत होऊन पाणी विषयात अनेक विविध प्रकल्पांना सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉ. श्रीकांत गबालेंची आणि त्या निमित्ताने भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदन (Geographical Information system & Remote Sensing) या नवतंत्रज्ञानविषयीची ही कहाणी.....


खरंतर सुरुवातीपासून वसतिगृहात राहून शालेय शिक्षण पूर्ण करणारा श्रीकांत अकरावी शास्त्रसाठी मॉडर्न महाविद्यालयात आला. चुणचुणीत श्रीकांत अवांतर वाचनाच्या सवयीने पर्यावरणाबाबत हळवा झाला.आणि पर्यावरणात काहीतरी काम नक्की करायचं,तर भूगोलाचा अभ्यास करायला हवा... (खरंतर असं का वाटलं,की यासाठी भूगोलच घ्यायला हवा,याचं उत्तर आजही त्यांच्याकडे नाही...) पण ठरवून तो भूगोल विषय घेऊन बी.ए. झाला.खडक निर्माण शास्त्रातील पुढील शिक्षणासाठी एस. पी. कॉलेजमध्ये एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला. (Geology यासाठी ही सोय आहे बी.ए. करून एम.एस्सी.ला प्रवेश मिळवता येतो.) खडक निर्माण शास्त्राबरोबरच बी.ए.फायनलला जीआयएस,आरएस हा विषय होता.नवीन तंत्र, संगणकचा वापर या गोष्टींमुळे आणि त्या विषयासाठी चांगले प्राध्यापक असल्याने त्यात श्रीकांत यांना जास्त रस वाटू लागला होता... एम.एस्सी.ला दुसऱ्या वर्षी प्रकल्प सादर करावा लागतो. खरंतर कॉलेज,विद्यापीठाने ही खूप उपयुक्त योजना विद्यार्थ्यांसाठी आखली आहे. आजवर घेतलेल्या ज्ञानाचा वापर,कौशल्यांचा वापर करत व्यवहारोपयोगी नवनिर्मिती करावी, त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा,व्यक्तिमत्त्वाचा परिचय जगाला व्हावा हा उद्देश... पण फार थोडे विद्यार्थी या संधीचं सोनं करतात... बाकी सगळे टिक मार्क काम करतात.श्रीकांत ह्या थोड्या लोकांपैकी एक निघाला.प्रोजेक्टला काय विषय निवडायचा,ही चर्चा दुसऱ्या वर्षाचे कॉलेज सुरू झालं की सुरू होते.त्याच काळात बातम्या येत होत्या,कोकण रेल्वेच्या मार्गावर दरडी कोसळत आहेत.अशा दरडी कोसळण्याच्या घटना त्या वर्षी चार-पाच वेळा घडल्या.दरडी कोसळणे हा तर पूर्ण विषयच अभ्यासक्रमाचा,या विषयावरच काम करायचं,प्रोजेक्ट करायचं ठरले.त्यांच्या प्राध्यापकांनीही या विषयाला खूपच उचलून धरले.त्यावरच काम करण्यासाठी आखणी सुरू झाली. कागदावर काय करायचे, हे ठरवण्यासाठी आधी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करणे आवश्यकच होते.मोठी दरड कोसळलेली 'कॉमेंट' गावात त्यांचे प्राध्यापक व वर्गमित्रांबरोबर साईट व्हिजिटसाठी श्रीकांत पोहोचले.तिथे मोठी रिटेनिंग वॉल बांधलेली होती,तिच्यासकट रेल्वे ट्रॅक मूळ जागेपासून ३२ फुटांनी सरकला होता. इतकी मोठी दरड कोसळली होती.या अनुषंगाने पुढे,मागे फिरून बाकी निरीक्षणही त्यांनी नोंदवले.मागे,पुढे बरेच बोगदे खणलेले होते. त्यांच्यावर जी गावं वसलेली होती त्यांच्या विहिरी आटल्या होत्या.जमीन कोरडी,नापीक झालेली होती.खूप विध्वंस झालेला होता निसर्गाचा... मग नकाशांचा अभ्यास झाला,पूर्वीचे जुने कागदावरचे नकाशे मिळवले गेले... ते जुळवले गेले,त्याचबरोबर सॅटेलाइट इमेजेसही तपासण्यात आल्या.त्यात पूर्वीच्या प्रवाहांचे ओढे,नाले,डोंगर,रस्ते,झाडे,प्रवाह त्यांचे आकार, आकारमान आणि दिशा तपासली गेली.दरड कोसळल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीचे निरीक्षण केले.तेथील स्थानिक लोक व कोकण रेल्वेच्या कामासंबंधित लोक यांच्याशीही संवाद साधला. हा रेल्वेचा ट्रॅक डोंगराच्या तीव्र उतारावर होता. दरड कोसळली तिथून थोडेच पुढे दरीतील मोठा पूल होता. जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा होता... यावरून ट्रॅक किती उंचावर होता,याचा अंदाज येऊ शकेल. खूप तीव्र उतारावर ट्रॅकसाठी रुंदी मिळण्यासाठी बराच डोंगर तोडला होता.तसाच बराच भरावही घातला होता..!  ठिकठिकाणी डोंगराचे लचके तोडल्याने व भरावामुळे अनेक प्रवाह मधेच तुटले होते, गायब झाले होते,वळले होते.त्यामुळे पाऊस झाल्यावर ओढ्यातून वाहत आलेले पाणी भरावात मोठ्या प्रमाणात घुसले,त्याच्या दबावाने रिटेनिंग वॉलवरही दबाव आला आणि तीच सरकली... रिटेनिंग वॉल भरावाला धरून ठेवण्यासाठी असते,तीच सरकली.भरावही खचला आणि पाण्याच्या दबावामुळे सरकलादेखील... या सगळ्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना व खडक,माती, डोंगर,दरी,खाच-खळगे,ओढे-नाले या सर्वांचा संदर्भ घेताना,त्यांची मांडणी करताना भौगोलिक माहिती प्रणालीचा जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम व रिमोट सेन्सिंग प्रथमच खूप मोठ्या प्रमाणात वापर करायला मिळाला.खूप मूलभूत ज्ञान खूप पक्के झाले.त्या विषयाच्या या अभ्यासातून या वेळी श्रीकांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी या समस्येचे उत्तर रेल्वेचा ट्रॅक बदलणे,म्हणजे दुसऱ्या सुरक्षित जागेतून हा ट्रॅक नेणे आवश्यक आहे,असा निष्कर्ष काढला. अर्थात हा विद्यार्थी व प्राध्यापक पातळीवरचा अभ्यास होता रेल्वे खाते किंवा सरकारी पातळीवर यावर आधारित निर्णय होण्यासारखा नव्हता.यावर श्रीकांत यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला.त्यावर परिषदेत खूपच चर्चा झाली... तसेच या निबंधाला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. या सर्व प्रकल्प व शोधनिबंधातही डॉ. मनोज नरवणे, विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे पूर्ण मार्गदर्शन होते. श्रीकांतजी त्यांचा उल्लेख खूप कृतज्ञतापूर्वक वारंवार करतात... पुढे नंतर शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल घेऊन कोकण रेल्वेचा ट्रॅक बदलण्याचा सल्ला दिला.यावरून श्रीकांत व टीमचा अभ्यास व निष्कर्ष यावर शिक्कामोर्तब झाले. नंतर लवकरच हा शोधनिबंध 'डेक्कन ग्राफ जिओग्राफी' या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला... यामुळे या प्रकल्पाला प्रतिष्ठा लाभली. यातून पुढच्या आयुष्याची प्रेरणा मिळाली... आत्मविश्वास वाढला.... दिशाही ठरली... जीआयएस व आर. एस. क्षेत्रातच काम करायचे ठरले. विद्यार्थीदशेतच असे यश मिळू शकते, यासाठी पुस्तकी व कॉलेजमधला अभ्यास आवश्यक आहेच,पण समाजाला सुद्धा सतत वाचत राहिले पाहिजे.त्यामुळे लोकसमस्या, व्यावहारिक समस्यांची जाण होते.त्या समस्या आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,तर आपण खऱ्या अर्थी शिक्षण घेतले असे वाटते... इतकेच नाही, तर यात आपल्याला व्यावसायिक व जीवन याचे मार्ग निश्चित करून यश मिळवता येते. फारच थोडे लोक असा पर्याय स्विकारतात.


काय आहे जीआयएस आणि आरएस ? त्याचा पाण्याच्या कामाशी कसा संबंध आहे? जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ही प्रणाली म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरील सर्व घटकांची माहिती टिपणे... ती साठवणे... ती विविध रूपांत उपलब्ध करणे... तीवर वेगवेगळ्या प्रक्रिया करणे... त्यातून विविध अर्थ लावणे... त्या माहितीचे नियमन करणे... या सगळ्यांना स्थळांचे संदर्भ असतात... या प्रणालीत सॅटेलाइट कॅमेरा,संवेदक,हार्डवेअर,सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो विशिष्ट स्थळ निश्चित करणे,स्थळाचे टिपण घेणे,स्थळांवरची हवी ती माहिती घेणे, स्थळांचा आकार-मोजमाप ठरवणे. तिची माहिती व तिचे ठिकाण याची नोंद घेणे, माहितीची आकडेवारी नोंदवणे... माहितीत होणारे बदल टिपणे, विविध नोंदी वेळेवर उपलब्ध करणे इत्यादी.


भूगोलात आपण सर्वात जास्त कशाच्या साह्याने अभ्यास करतो,तर नकाशाच्या साहाय्याने... कितीतरी प्रकारचे नकाशे, सर्व भाषा, नकाशांची.भूगोल म्हणजे..... जमिनीवरच्या सर्व गोष्टींचा अभ्यास... यात खडकांचा अभ्यास व खडकांचे नकाशे,त्यात खडकांच्या वयाचे नकाशे वेगळे, त्यांच्या प्रकाराचे नकाशे वेगळे... कोणत्या भागात कोणते खडक असे अनेक प्रकार... मग जमिनीवरचे डोंगर, पर्वत, दरी, चढ उतार हे सर्व नोंदवणारे नकाशे,अगदी प्रत्येक बिंदूची समुद्रसपाटीपासूनची उंची,त्यावर आधारित कंटूर नकाशा... मग फक्त जंगलाच्या क्षेत्राचे नकाशे,त्यात पुन्हा उपविभाग सदाहरित जंगले,कुरणे,खुरटी जंगले इत्यादी,हवामानाच्या विविधता दाखवणारे नकाशे,पिकांचे स्थळे दाखवणारे नकाशे,खाणी कुठे कुठे आहेत त्याचे नकाशे,कोणते प्राणी कुठे सापडतात त्याचे नकाशे... महत्त्वाचे म्हणजे देशाच्या राज्यांच्या सीमा दाखवणारे... रेल्वे, रस्ते, विमान मार्ग, लोकसंख्या,लोकसंख्येवर आधारित असलेली सर्व माहिती, वेगवेगळी माहिती दाखवणारे... सगळी सगळी माहिती नकाशाद्वारे नोंद करता येते.ही सगळी माहिती आणि नकाशे लोकांच्या विविध सोयी,सुविधा यांच्या व्यवस्थापनासाठी घेतले जातात.आणि यातून खूप मोठ्या उलाढाली होत असतात..... यातील एकेका भागात हजारो उपविभाग, त्यातून माहिती... आणि माहिती... आणि माहिती... सर्व माहितीच्या साठवणुकीसाठी कम्प्युटरचा वापर सुरू झाला, १९६० मध्ये रॉजर टॉमजिन्सन याने सर्वप्रथम ही कल्पना मांडली,अस्तित्वात आणली,त्यांना जीआयएसचा जनक असे म्हणतात.


पंधराव्या शतकात नकाशा विषयावर विचाराने काम होऊ लागले.... युरोपातील दर्यावर्दी विविध विभागावर पोहोचू लागले... तिथे जाण्याचा मार्ग लक्षात ठेवून तो कागदावर उतरवू लागले.... युरोपातील राजांनी त्याचे महत्त्व ओळखले. त्यांनी या प्रक्रियेला प्रोत्साहन दिले.पुढे एकेक करून एका भूभागावर युरोपातील एकेक देश हक्क निर्माण करू लागला.त्यातून जन्मले भूभागाचे मापन आणि त्यातून जन्मल्या कागदावरच्या सीमा... त्या सीमांनी बनवले नकाशे... सोळाव्या शतकाच्या अखेरीस देशांच्या सीमा सांगणारा जगाचा नकाशा पुसटसा जन्माला आला होता... त्यात सतत नवनवीन भर पडत राहिली.... आणि आज याच नकाशाशास्त्रावर पृथ्वीवरील ८०० कोटी लोकसंख्येचे व्यवस्थापन सुरळीत सुरू आहे. 


'आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या संदर्भात आपण जितक्या जास्त प्रमाणात स्वतःची व्याख्या करू लागू तितके आपण अधिक हरवून जाऊ.' 


'संन्याशासारखा विचार करायला' लावणारं वाक्य खुपच अद्भुत


आणि या पुस्तकातील शेवटच प्रकरण..


'दुर्गंधी हरवणारा प्रसन्न माणूस'


पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ रघुनाथराव केळकर यांच्या समाधीसमोरची पुण्याती टाकी गाळाने भरली होती.वर्षानुवर्षे दुर्गंधी भरून राहिली होती. परिसरात एके सकाळी काही तरुण-तरुणी कुदळ-फावडे घेऊन आले... टाकीतला जमेल तेवढा गाळ या तरुण-तरुणींनी काढला... या मंडळींचे नेतृत्व करीत असलेला तरुण इंग्लंडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन आला होता. सिंगापूरमधून त्याने डॉक्टरेट मिळवली होती. या चमूने येथे एक पान गवत लावले काही दिवसातच पाणगवत वाढले.आणि दुर्गंधी गायब झाली... कामाला सुरुवात केली तेव्हा हेटाळणी व विरोध झाला होता,पण आता कौतुक होऊ लागले... 'नदीची दुर्गंधी हरवणारा' म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्या... प्रसन्न जोगदेव त्यांच्या तंत्रज्ञानासह पर्यावरण क्षेत्रातला एक नायक झाला.


जसजसा निसर्ग अधिक बारकाईने कळू लागलाय गेल्या चाळीस-पन्नास वर्ष,तसतसा त्याच्याकडेच स्वतःच्या दुरुस्तीची कशी व्यवस्था आहे हे समजते आहे.जसं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वगैरे विषय आपण अनुभवतोय तसंच पाण्यात येणारे गवतच पाण्याला शुद्ध ठेवण्यासाठीची निसर्गाची रचना आहे.याच तत्वावर आधारित पानगवताच्या माध्यमातून दूषित पाणी शुद्ध करता येते.याची विविध उदाहरणे निर्माण करून एक नवा पर्यावरणीय पर्याय देत असलेल्या प्रसन्न जोगदेव यांच्याबद्दल आणि त्यांच्या तंत्रज्ञानाबद्दलची ही कथा..!


डकवीड म्हणजे पाणगवताची एक जात. हे गवत बदकांना खूप आवडते म्हणून त्याला 'डकवीड' म्हणतात.आपल्याकडे अशा प्रकारच्या गवताला 'टिकली गवत' असेही म्हणतात.हे दिवसागणिक खूप वाढते, म्हणजे पाण्यावर आडवे पसरत जाते.पाण्यातील विरघळलेल्या व न विरघळलेल्या पाणी प्रदूषीत करणाऱ्या अनेक घटकांना मुळाद्वारे शोषून घेते आणि त्यावर वाढते.


प्रसन्नने प्रोजेक्टसाठी डकवीड संबंधित विषय निवडला.डकवीडच्या काही जाती त्यांचे बनवलेले अन्न स्टार्चच्या स्वरूपात तर काही जाती प्रोटिन्सच्या रूपात जमा करून ठेवतात. प्रसन्नला त्याच्या प्रोजेक्ट व या विषयातली ताकद हळूहळू लक्षात येवू लागली.जगात यावर काम सुरू आहेच.भारतातील सांडपाण्याची व त्यातून आरोग्याची समस्या खूप मोठी आहे त्या दृष्टीने डकवीडच्या मदतीने सांडपाणी शुद्धीकरणाला खूप वाव मिळू शकेल,हे त्यांनी हेरले.हे उत्तम पशुखाद्य असल्याने प्रदूषण निर्मूलनाबरोबरच उच्च प्रतीचे पशुखाद्य निर्मिती हा दुहेरी फायदा साधता येईल असे त्याला वाटले.त्याने एम.एस. बायोटेक विषयात करतानाच ही दिशा ही निश्चित केली. 


एम.एस.करून भारतात परतल्यावर काही दिवस फर्गसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला.काम शिकवण्याचे होते,पण त्याचे जास्त लक्ष संशोधनावर होते.पुजा तेंडूलकर या विद्यार्थिनी बरोबर संशोधनासाठी प्राथमिक काम सुरू केले.विषय निवडला 'मुठा नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पर्यायाची चाचपणी करणे.' तीन ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले,खडकवासला धरणाजवळ नदी सुरू होते तिथे; दुसरा नमुना ओंकारेश्वरजवळ;तिसरा नमुना संगम पुलाजवळ घेतला. खडकवासल्याजवळ म्हणजे जास्तीत जास्त मूळ स्वरूप नदीचे,ओंकारेश्वरजवळ म्हणजे जिथे जास्तीत जास्त शहराचे मैलापाणी नदीत येते आणि संगम पुलाजवळ इंडस्ट्रियल सांडपाण्याचा प्रवाह येऊन मिळतो.काम सुरु केले होते.कुणाला काही मदत मागायला गेले, परवानगी मागायला गेले किंवा माहिती सांगायला गेले की लोक प्रसन्नला पदवी, डॉक्टरेट,स्पेशलायझेशन याबद्दल विचारू लागले.प्रसन्नला प्रोत्साहनापेक्षा निराशजनक प्रतिसाद येऊ लागला.विषय जाईचना. 

मग एका क्षणाला प्रसन्नने निर्णय केला की आपण डॉक्टरेट पूर्ण करून टाकू...!


गुणवत्तेच्या बाबतीत जगात अकरावा नंबर असलेल्या सिंगापूरच्या नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU) या विद्यापीठात त्याने अर्ज केला.तिथल्या संशोधनासाठीच्या पायाभूत सुविधा व मार्गदर्शक दोन्हींच्या दर्जाने प्रसन्नला तिथेच जाणे इष्ट वाटले.त्याला डकवीडवरच संशोधन करुन डॉक्टरेट करायची होती.तशाच तयारीने तो गेला होता.पण जसजसा विषय पुढे सरकला, प्रयोग करण्यासाठी जागा वगैरेच्या परवानगी मागायला सुरू झाले त्या वेळी परत माघार घ्यावी लागली.कारण सिंगापूरला सर्वात मोठी टंचाई जागेची आहे आणि या प्रयोगाला तर काही ना काही जागा लागणारच होती.परत तलवार म्यान करावी लागली,ध्यास मात्र तसाच राहिला.


जागा नाही,प्रयोग नाही,तर निधी मिळणार नाही. सगळाच हिरमोड झाला.मग त्या विद्यापीठात Role of Microorganisms in marine corrosion' या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली. प्रबंध पूर्ण होत गेला तसतशी भारतातील पुढील योजनेची तयारी सुरू केली.जुन्या समविचारी मित्रांना संपर्क करून काम सुरू करूया अशी चर्चा सुरू केली.काहींनी प्रतिसाद दिला आणि मग भारतात आल्यावर प्रसन्नने एका कंपनीची स्थापना केली.त्यात त्याची फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी पूजा तेंडुलकर आणि इतर काही मित्र हे सहभागी आहेत.दरम्यान पूजा तेंडूलकरनेही सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प काही ठिकाणी यशस्वी केले होते.


कंपनीमार्फत २०१८ ला काम सुरू केले. 'लेमनिऑन ग्रीन सोल्युशन्स' असे कंपनीचे नाव. हे नाव भारतात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या डकवीडच्या एका प्रजातीच्या नावावरून घेतले आहे.


डकविक हिरवे हिरवे खवले पाण्यावर तरंगत आहेत असं दिसतं ते किंवा दगडफूल हिरवं असतं तर कसं दिसलं असतं तसं ते दिसतं. पाण्यावर आडवी पसरत त्याची वाढ होते.मूळ खाली पाण्यात तीन ते चार इंचापर्यंत वाढतात. वनस्पतीशास्त्राच्या भाषेत ती 'अंजीओस्पर्म' या प्रकारातली.म्हणजे नेचे वगैरे प्रकारातली.अ अपुष्प वनस्पती आणि याचे पुनरुत्पादन विजिटेटीव्ह रिप्रोडक्शन प्रकारातून होते. भारताच्या पाच सहा प्रकारच्या जाती सापडतात पण विपुल प्रमाणात दिसणारी जात म्हणजे 'लेम्नि शिया' जगात आतापर्यंत ३६ प्रकारच्या डकवीडच्या जाती नोंदवल्या गेल्या आहेत.याचा वाढीचा वेग खूप जास्त असतो.आता बायोमास भाषेत सांगायचे झाले तर ५० ग्राम बायोमासचे दोन-तीन दिवसात शंभर ग्राम इतके बायोमास तयार होऊ शकते.या एकूण वजनात ३० ते ४० टक्के प्रोटीन असतात.ही प्रोटीन्स जनावरे व माणसे खाऊ शकतील अशा रासायनिक रचनांची असतात.मुख्य म्हणजे या डकवीडच्या मुळावर व पानांवर जे विशिष्ट बकरी असतात ते सांडपाण्यातील विविध विद्राव्य व अविद्राय घटकांचे विघटन करतात.ते विघटीत घटक डकवीड मुळावाटे शोषून घेते व आपल्या अन्नात व बायोमासमध्ये रुपांतर करते.त्यामुळे पाण्यातील विद्राव्य व अविद्राव्य घटक कमी कमी होत जातात.पाण्यातील हे घटक कमी झाल्याने हळूहळू ऑक्सिजन विरघळत जाऊन पाणी अधिक जिवंत होऊ लागते म्हणजे पाण्यात जीवसृष्टी वाढू शकेल अशी स्थिती निर्माण होते.


हे तंत्रज्ञान नवीन,विषय नवीन,कुठून कशी सुरुवात करायची? की एखादे काम हातात घ्यायचे?की व्यावसायिक पातळीवर पैसे गुंतविण्यासाठी कसे पुढे आणायचे? सगळेच प्रश्न होते.


याची उत्तरे प्रत्यक्ष पुस्तकात भेटतील.


जाता जाता...!


मेनका प्रकाशन यांनी खूपच आकर्षण पद्धतीने मांडणी करून जास्तीत जास्त पुस्तक आकर्षित बनवलेलं आहे. यांचे मनःपूर्वक आभार..!


'अभिनव जलनायक' हे पुस्तक मानवी जीवनातील 'जीवन' पाणी यासाठी नम्रपणे वाहिलेले आहे. जलसंवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि ते साकारणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सरळ साध्या सोप्या गोष्टी सोप्या समजतील अशा भाषेत आहेत.


या पुस्तकाचे लेखक 'सतीश खाडे' हे माझे मनस्वी मित्र आहेत.युवराज माने यांच्यामुळे या अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी माझी ओळख झाली.


तहानलेल्या माणसाला पाण्याची तहान लागते आणि पाणी पिल्यानंतर त्याला जसं आत्मिक समाधान मिळतं. तसंच कधीकधी 'पाण्यालाही' तहानलेल्या माणसाची तहान लागते व ते पाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या तहानलेल्या माणसाजवळ जाते. तसंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल.


स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...!


एमर्सन हेन्री डेव्हिड थोरोला म्हणाला होता.


ह्या पुस्तकाचे परीक्षण व समिक्षा मी केलेली नाही,तर ह्या पुस्तकानेच माझे परीक्षण व समिक्षा केलेली आहे.( माझी जिवंत असतानाची चिरफाड केलेली आहे. )


अशी पुस्तके सोबत असणं म्हणजे अज्ञात आयुष्य ज्ञात करून परिपूर्णतेने प्रवास करण्यासारखं आहे.पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेतील मी प्रवासी आहे.आणि या पुस्तकासोबत घेऊन केलेला प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व अलौकिक असा आहे.


पाणी सर्वांसाठी तर या पाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं व एकत्रितपणे एकसारखे जीवन जगावं असा संदेश हे पुस्तक देते.


मेनन पिस्टन रिंग्ज या ठिकाणी मी फॉड्री मध्ये मी काम करतो.जास्त तापमानामध्ये काम करत असूनही माझं हे आयुष्य पाण्यासारखं शांत व शितल आहे.हे या पुस्तकाच्या संगतीचे परिणाम आहेत.


या पुस्तकाचं वाचन चालू असताना.एक महत्वाची घटना घडली ज्या घटनेने माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा बदल केला.


'सहित वितरणचे' शिंदे साहेब ज्यांना मी पुस्तकातील महान माणूस म्हणतो.त्यांना सहज मी बोलत असताना,या महिन्यांमध्ये पैशाचं गणित जमणार नाही.( ते मला कधीच जमत नाही) या महिन्यात मला पैसे अभावी पुस्तक घेता येणार नाहीत.नंतर घेतो'त्या वेळेला त्यांनी दिलेलं उत्तर माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होतं."पैशाचं नंतर बघू ते राहू दे ! मी पुस्तक पाठवतो.'काहीही झालं तरी तुमचं वाचन थांबवू नका.'मी तुमची पुढील पुस्तके मी पाठवून देतो. अशी महान माणसं मला अशा महान पुस्तकांमुळेच भेटलीत.


'अभिनव जलनायक' हे पुस्तक लिहून सतीश खाडे यांनी


' ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता,असे झाड त्यांनी आपल्या सर्वांसाठी लावलेले आहे.'


आपण करून दिलेली ही नवीन ओळख माझ्यासाठी माझं जनुक बदलणारी आहे.मी आपल्या लिखाणाचा मनापासून आभारी आहे. हे नवीन जीवन,नवीन दृष्टिकोन माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने माझा जन्म झाला आहे.मी स्वतंत्र झालो आहे.

आपल्या सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार व धन्यवाद..!


◆विजय कृष्णात गायकवाड

९/११/२२

७ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

'येथे कूपनलिका भरुन मिळते!' हे काहीतरी नवीन आहे.आणि हे करत असतात.राहुल बाकरे


बोअरवेल घेतली तेव्हा खूप पाणी होते. पण आता कोरडी ठाक पडली आहे.पाणी गेले कुठे?


आता पाऊसपाण्याचे दिवस सोडले,तर या कूपनलिकेला पाणी मिळणारच नाही का? कूपनलिकेचे पाणी आटले असले तरी धीर सोडू नका राहुल बाकरे यांना संपर्क करा. ते बोअरवेलची ॲन्जिओप्लास्टी करून बोअरवेलला पुन्हा पाणीपुरवठा होऊ लागेल हे पाहतील.


हो बोअरवेलची ॲन्जिओप्लास्टी.


जमिनीच्या पोटात खनिज तेलाचे साठे तंत्रज्ञानाने शोधण्याचे तंत्र मागच्या शतकात विकसित झाले.त्यातून जगातील अर्थकारण, राजकारण,जीवनमान बदलत गेले.उपग्रहांचा वापर,काँप्युटर,तसेच इतर विकसित होणाऱ्या विज्ञानाबरोबरच तेल शोधण्याचे तंत्र अधिक अधिक प्रगत होत गेले. त्याचे कुतूहल आपल्याला सतत वाटत राहिले आणि अजूनही वाटते आहे.पण विसावे शतक तेलाचे होते, एकविसावे शतक पाण्याचे आहे. जे जे तेलाबाबत घडलं तेच या शतकात पाण्याबाबत घडतंय न् अजूनही घडणार आहे.


तेलाच्या संशोधनासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान पाण्यासाठी जसेच्या तसे वापरले जात नसले तरी तितक्याच उच्च तांत्रिकतेने जमिनीतील पाणी कुठे,किती,कसे उपलब्ध आहे व त्याचा वापर कसा करून घेता येईल याची शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध मांडणी करणाऱ्या ते पाणी प्रत्यक्षात तुमच्या बोअरवेलमध्ये भरून देण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या ज्याला ते बोअरवेलची 'अँजिओप्लास्टी' असे म्हणतात अशा राहुल बाकरे यांच्या पाणीविषयक काम आणि कर्तृत्वाची, त्यांच्या अनुभवाची व त्यांनी विकसित केलेल्या तंत्राची ही गोष्ट..!


गोष्टच पण ती साधी सरळ नाही. ती आहे चढउतारांनी भरलेली.


राहुलजींचा प्रवास तसा भारीच आहे,एका मोठ्या डोंगरावर चढून जायचे परत अचानक त्यावरून खाली उतरायचे आणि दुसरा डोंगर चढायला लागायचे,असे पाच-सहा डोंगर चढून उतरण्याचा त्यांचा प्रवास आता भूजलाच्या उपलब्धतेसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या वाटेवर वेगाने सुरू आहे. खूप सकारात्मक व अनेक अर्थांनी बदल देणारी भूजलाच्या नियोजनाबाबत व उपलब्धतेबाबत मोठे बदल घडवणारी ही वाटचाल सुरू आहे.


राहुल बाकरे ज्ञान प्रबोधिनीत शालेय शिक्षण घेउन पुण्याच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (मेकॅनिकल) झाले. त्यानंतर लगेच अमेरिकेतील एमआयटी या तंत्रशिक्षणासाठी जगातून सर्वाधिक पसंती असलेल्या विद्यापीठातून ऑटोमोबाईल विषयात एम.एस.पूर्ण केले. त्यावेळी त्यांचा विषय ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित होता.हा पहिला डोंगर पूर्ण चढून झाल्यावर त्यांनी तो पूर्ण उतरुन त्यांचा मोर्चा जगात त्यावेळी प्रत्येक बुद्धिमान युवकांचे आकर्षण असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे वळवला.आता त्याचा अभ्यास करून त्यात वाटचाल करायचे ठरले,तसे केलेही.मग त्यावर आधारित संगणकावर ऑनलाईन खेळांचे प्रस्थ त्या काळात बरेच वाढत होते,व त्या ऑनलाईन खेळांसाठी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीत ते काम करू लागले.कंपनीचा कारभार मोठाच होता. वर्षाला सहाशे कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या कंपनीत राहुल बाकरे त्या कंपनीच्या बिलिंग सॉफ्टवेअरवर काम करत होते,परत एक दिवस हाही डोंगर उतरायचं मनात आलं. हे सगळं भौतिक चंगळवादी जीवन,नुसते पैसे पैसे अशा विषयांच्या चर्चांनी राहुलजींचे तिथून मन उडाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या त्यांना अस्वस्थ करत होत्या.ज्ञान प्रबोधिनी संस्कार आठवू लागले.मनाला टोचू लागले, माझे ज्ञान सामान्य माणसासाठी हवे.माझे जीवन समाजासाठी हवे,माझ्या मातीतल्या माणसांसाठी हवे,ही भावना प्रबळ होऊ लागली.त्यामुळे हा ही डोंगर उतरायचा असा मनाचा निर्णय झाला. लगेच अमलातही आणला गेला.


समाजाचे काम करायचे म्हणजे गळ्यात शबनम, पायात स्लीपर आणि वाढलेल्या दाढी घेऊन समाजवाद आणि समाजकारणाचा तुणं तुणं वाजवत विरक्तीच्या आणि त्यागाच्या गप्पा करत आणि शेवटी अपयशाने सरकार व भांडवलदारांच्या माथ्यावर खापर फोडत व्याख्याने देणार्‍या समाजसेवकांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवूण चालायचे नव्हते.


अर्ध्यमची काम करण्याची साधारण पद्धत अशी होती की विविध ठिकाणाहून आलेल्या पाणी संदर्भातल्या कामांच्या मागणीच्या ठिकाणांना भेट देऊन तेथील लोकांना ही भेटणे.प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देणे.सध्या ते लोक यावर कसा मार्ग काढत आहेत हे पाहणे.येथील पारंपरिक काही जलसंवर्धनाच्या व जलशुद्धीकरण त्यांच्या म्हणून काही पद्धती आहेत का हे पाहणे.अशी माहिती काढल्यावर पारंपरिक तंत्राला काही गोष्टींची भर घालून त्यांचे बळकटीकरण करायचे की नवीन तंत्रज्ञानावर आधारित पर्याय निवडायचे हा निर्णय करायचा.त्यातून त्या लोकांना या समस्या त्यांची कारणे व त्यांची पर्यायी उत्तरे याबाबत प्रशिक्षण देत त्यांच्यातच समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करायची हा पुढचा टप्पा.उदाहरणार्थ आमचे पाणी खूप जड आहे आणि लोक सारखे सारखे आजारी पडतात आम्हाला आर.ओ.प्लांट पाहिजे अशी मागणी आली तर लगेच आर.ओ. प्लांट देणे हे त्यावर उत्तर नाही. कारण दुर्गम भागात आर.ओ. प्लांटसाठी कायम वीज उपलब्ध असते का? त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणी जवळपास उपलब्ध होईल का? किंवा स्थानिक लोकांना याबाबत काहीतरी माहिती आहे का? हे जाणणे महत्वाचे. अन्यथा लाखो रुपयांचे मशीन घेऊन त्याची देखभाल न झाल्यावर ते वर्षा-दोन वर्षात बंद पडते.ते तसेच नादुरुस्त राहून गंजून जाते. लोक परत तेच जड पाणी पीत राहतात. पैसेही वाया गेलेले अन् समस्याही संपली नाही अशी खूप उदाहरणे खूप विषयांबाबत आहे. भारतीय समाजाचा हा दोष किंवा मर्यादा आहे. हा सार्वत्रिक अनुभव आहे.याला म्हणूनच पर्याय आधी स्थानिक पारंपरिक ज्ञानाचा,व तो शोधण्याचा प्रयत्न राहुलजींचा असायचा.मग अशावेळी मटका गाळणी,विविध झाडांच्या बियांचा वापर,किंवा अशाच निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला.पण म्हणजे हे शक्य नसेल तर आर.ओ.प्लांट पण दिला, नाही असे नाही.पाणी जिरविण्याचे,जमिनीतील पाणी वाढवण्यासाठीचे विविध उपाय,बंधारे बांधणे, बोअर मारणे या आणि अशा विविध समस्यांवरच्या विविध उत्तरांचा ही अवलंब करण्यात आला.


विशेष काम झाले ते अर्सेनिक युक्त व फ्लोराइड युक्त पिण्याचे पाणी ज्या विभागात आहे त्या भागात!! अर्सेनिक युक्त व फ्लोराइड लोकांचे जीवनच उद्धस्त करतात.गंगेच्या खोऱ्यात ही समस्या खूप आहे. इथे पूर्वी पिण्याचे पाणी विहिरीतून व आडातून घेतले जायचे. त्यावेळी ही समस्या कमी होती कारण विहिरींची खोली फार नसायची. त्या खडकाच्या वरच्या थरात थोडेफार अर्सेनिक असते ते पाण्यात विरघळून विहिरीच्या पाण्यात वरच्या भागात यायचे.त्याचा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन ऑक्सिडेशन प्रक्रिया घडून त्याचा गाळ विहिरीत खाली बसायचा. विहिरीचे पाणी भरताना बादलीला झटका देत वरच्या भागाचे पाणी बाजूला करून खालचे पाणी भरले की त्यात आर्सेनिक जवळजवळ नसायचे. (ज्यांनी पूर्वी पाणी विहीरीतून शेंदलेय त्यांना याचा अनुभव नक्कीच असेल अशा प्रकारे पाणी भरण्याचा,हो मी दररोज पहाटे ५ वाजता या पध्दतीने आडातून पाणी काढतो.) पण पाण्याची मागणी वाढत गेली.बोअरवेलची संख्या त्याचबरोबर खोलीही वाढत गेली तशी ही समस्या वाढत गेली.खोलवरच्या खडकातील बॅक्टेरीया अर्सेनिकच्या खनिजाचे विघटन करतात.ते बोरवेलमधील पाण्यात मिसळते. हे पाणी प्यायले की अर्सेनिकची बाधा होते.तसेच जनावरे व गाई हे पाणी पितात,त्यामुळे त्यांच्या दुधात आर्सेनिक असते.इतकेच काय त्यांच्या शरिरातही अर्सेनिक जाते,ते शेणात उतरते. त्याच्या गोवऱ्या जाळण्याने स्वयंपाकघरातील धुरातून आर्सेनिक फुफ्फुसात जाते.बोअरवेलचे पाणी शेतीला दिलेले असते काही वेळा भाताच्या ओंब्या लोंबत असतात त्या पाण्यात भिजत राहतात तेव्हा ही रसायने तांदळात शोषली जातात व भातातून आर्सेनिक पोटात,म्हणजे आर्सेनिक वगळून पाणी शुद्ध करून प्यायले तरी इतर अनेक माध्यमातून ते शरीरात जातेच.


अर्सेनिकमुळे तोंडाचा,आतड्याचा,फुप्फुसाचा, गुदद्वाराचा, किडनीचा कर्करोग होऊ शकतो. खूप गंभीर प्रकरण आहे हे आणि भारतातल्या बारा राज्यात याचा प्रभाव आहे.पण कोणत्याही सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही.काही प्रमाणात स्थानिक उपाय व काही प्रमाणात तंत्रज्ञान वापरून ऊर्ध्वम फाउंडेशनने राहुल बाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले.पण समस्येचा घेरा मोठा आहे. एक दोन व्यक्ती,संस्था यांना खूप मर्यादा येतात. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य समजलेल्या व त्यावर उपाय झाले पाहिजेत यासाठी हे माहीत असलेल्या लोकांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून राहुल यांनी एक दबाव गट तयार केला आहे.अनेक तंत्रज्ञ व तत्सम बुद्धीवादी लोकांना एकत्र केलं त्यासाठी,असाच विषय फ्लुराईडचा ! याचे प्रमाण पाण्यात जास्त झाले की हाडे वेडीवाकडी होतात,स्नायू कमकुवत होतात,जबडा वेडावाकडा होतो, रक्तवाहिन्या कडक होतात.भयंकर समस्या ! महाराष्ट्रातील सतरा-अठरा जिल्ह्यात आणि भारतातील नऊ दहा राज्यांत ही समस्या आहे. त्यावर दोन-तीन चांगले उपाय अवलंबले गेले. पारंपारिक उपायांबरोबरच किंवा नैसर्गिक संसाधने वापरण्या बरोबरच नवीन तंत्रज्ञान ही अवलंबले जात होते.शेवग्याच्या बियांची भुकटी, नारळाची राख व इतर तत्सम वनस्पतीजन्य पदार्थाच्या राखेतून पाणी गाळून घेतले की त्याचे प्रमाण कमी होते.


कर्नाटकात काही ठिकाणी वेगळा प्रयोग केला गेला यावर उपाय म्हणून घराजवळ टाक्या बांधून पावसाच्या पाणी साठवून त्या पाण्याचा वापर करणे तसेच घरावरील व शेतातील पावसाचे पाणी एकत्र करून ते भुजलात मिसळून व त्यातून फ्लोराईडचे पाण्यातले प्रमाण कमी करणे उपाय केले तसेच नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन फ्लोराईडमोठ्या प्रमाणात असलेले खडक शोधून काढून तिथे बोरवेल घेण्यास मनाई करण्यात आली. तसेच जिथे फ्लोराइड युक्त खडक नाहीत अशा जागा निवडून,जिथे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरवता येते तिथे पाणी जिरवण्याची व्यवस्था वाढवली. (याला खडक शास्त्रात व पाणी व्यवस्थापन शास्त्रात रिचार्जिंग झोन असे म्हणतात. ग्राउंड वॉटर रिचार्ज करते म्हणून रिचार्ज झोन!)


देशातील काही ठिकाणी या समस्येवर उपाय म्हणून ॲक्टिव्हेटेड ॲल्युमिनियम पद्धतीचा वापर केला गेला तर काही ठिकाणी मातीत चांदीचे नॅनो पार्टिकल टाकून त्याचे मटका फिल्टर्स बनवणे व त्या मार्गाने पाण्यात पाण्यातील फ्लुराइडचे प्रमाण कमी केले. हे आणि असे अनेक उपाय राहुल यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करून ठेवले आहे.त्यामुळे पुढे अनेकांना या पर्यायांचा बिनधोक वापर करता येईल.


या कामाबरोबरच जलनिस्सारण व आरोग्य विषयावरही राहुलजींचे अर्ध्यमच्या माध्यमातून काम चालू होते.अनेक शौचालये बांधली दुर्गम अतिदुर्गम न शहरी भागात,पण त्याहीपेक्षा दोन महत्त्वाची दिशादर्शक कामे या विषयात राहुलजींनी केली.एक म्हणजे ड्राय टॉयलेटची मोठ्या प्रमाणात यशस्वी उभारणी आणि दुसरं म्हणजे मानवी मूत्राचा शेतीत उपयोग.ही दोन्ही कामे पाणी व जलनिस्सारण विषयात काम करणाऱ्यांसाठी दिशादर्शक कामे आहेत.


आपल्याकडे २००५ साली त्सुनामी नंतर तामिळनाडूमध्ये पर्यावरणस्नेही सार्वजनिक शौचालय बांधले गेले.त्याच प्रकारचे ही शौचालये भारतात अनेक ठिकाणी अर्ध्यमने उभारली. मानवी मल,मूत्र व पाणी यांना वेगळं करण्यासाठी टॉयलेटच्या भांड्याला तीन वेगवेगळी छिद्र पाडली जातात. मूत्र व पाणी एकत्र आल्यास जिवाणूंची वाढ होते,मिथेन वायू तयार होऊन दुर्गंधी येते. त्यामुळे दुर्गंध नाहिसा केला व त्यात पाणी जाऊ दिले नाही तर याचा युरीया तयार होतो. हा युरीया महिनाभर टाकीत साठवून ठेवला जातो.मल दुसऱ्या टाकीत साठवलं जातं. सहा महिन्यात याचं उत्तम कंपोस्ट तयार होतं,त्याला आपल्याकडे सोनखत म्हणतात. या सगळ्या अशा प्रकारच्या शौचालयाला ड्राय टॉयलेट्स म्हणतात.


'निसर्गाने प्राण्यांचे मल व मूत्रविसर्जन वेगळे राहवे ही रचना केलेली आहे,पण इथेही आपण निसर्गाच्या विरोधात जातो शक्य तिथे ड्राय टॉयलेट्स करायलाच हवेत कारण 'एक थेंब मैला हजार लिटर पाणी प्रदूषित करतो असे राहुलजी ठामपणे सांगतात त्यांच्यातील हा ठामपणे मला जीवनात ताठ उभा राहायल सांगून गेला.


भूजलाच्या सध्या परिस्थिती बाबत काही थोडंस .... आजमितीला भारतभर ज्ञात असलेल्या साडेचार कोटी बोअरवेलमधून पाणी उपसले जाते.१३० कोटी जनतेपैकी ८० टक्के जनतेच्या गरजा भूजलातून भागवल्या जात आहेत. त्यामुळे बेसुमार उपसा सुरू आहे.


सत्तरच्या दशकातील जमिनीखाली विस तीस फुटांवर मिळणारे पाणी आता दोनशे फुटापर्यंत ही मिळत नाही.देशभर खोल बोरवेल्स मारण्याची स्पर्धा सुरु आहे.महाराष्ट्रात विशेषता मराठवाड्यात पाचशे,हजार अगदी-बाराशे फुटांपर्यंत खोल जात आहेत पाणी मिळवण्यासाठी,पंजाब,हरियाणा या पाच नद्यांच्या प्रदेशातही भूजल संपत चालले आहे. तिथे भाताचेही पीक ते लोक भूजलावर घेत आहेत.पाण्याचा किती हा अपव्यय,शास्त्रज्ञांनी कार्बन कालमापन पद्धतीवर आधारित भूजलाची वय सांगण्याची पद्धत विकसित केली आहे. दोनशे फुटांवर मिळणारे पाणी दोनशे वर्ष जुने असते.त्याला जमिनीपासून खाली मुरत मुरत दोनशे फुटांवर जाण्यासाठी दोनशे वर्ष लागले आहेत. तसेच ८०० फुटावरचे पाणी आठशे वर्षांपूर्वीचे आणि बाराशे फुटावरचे पाणी बाराशे वर्षांपूर्वीचे आहे. पण आपण त्याचा उपसा काही महिन्यातच करून टाकतो.उद्या हे संपणार आहे. किंबहुना आकडेवारी सांगते आहे,की निव्वळ महाराष्ट्रात द्रवर्षी चाळीस हजारापेक्षा अधिक बोरवेल आटल्यामुळे निकामी होत आहेत...


खरेतर लोकांना जागे करण्यासाठी दोन महत्वाच्या विषयावर जनजागरण करणे खूप महत्त्वाचे आहे.आभासी पाणी (Water foot print) व पाण्याची उत्पादकता (Productivity of Water),भारताचा पाणी वापर हा शेतीत सर्वात जास्त म्हणजे पावसापासून मिळणाऱ्या पाण्याच्या ८५ ते ९० टक्के पाणी शेतीला वापरले जाते. पण पाण्याच्या उत्पादकतेत आपण प्रचंड मागासलेले आहोत. युरोपातला शेतकरी एक हेक्टर जमिनीतून साडेतीन लाख रुपये कमावतो तर आपला शेतकरी हेक्टरी फक्त नऊ हजार रुपये कमावतो. ही आकडेवारी २०१५ ची आहे.


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.

७/११/२२

५ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

१९९०-९१ सालची गोष्ट. मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या BESE कंपनीला मुंबई जवळच औष्णिक विद्युत केंद्र सुरू करायचे तेव्हा उहाणूला ते करायचे ठरले. तिथे ५०० (२x२५०) मेगावॉटचा प्रकल्प उभारायचा होता... औष्णिक विद्युत केंद्राला कूलिंग टॉवरसाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते... या केंद्रासाठी कुलिंग टॉवरला लागणारे पाणी दरदिवशी २०० लाख लिटर लागणार होते.एवढे पाणी फक्त उपलब्ध होणार.. आणि ते समुद्रातच सोडू शकणार. त्यामुळे अर्थातच समुद्राचे पाणी घ्यायचे ठरले. पण समुद्राच्या पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात असलेले क्षार आणि त्यातही मुंबई जवळ असल्यामुळे मुंबईचे सर्व प्रदूषित पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळलेले.त्यामुळे एक तर खूप मोठ्या क्षमतेचे पाणी उपसण्याचे पंप लागणार होते.म्हणजे १,७०० एच.पी.चा एक तसे चार पंप,तसेच प्रदूषित व खाऱ्या पाण्यामुळे नेहमीचा पोलादापासून बनवलेल्या पंपाला गंज लागणे,झीज होणे व इतर केमिकल्समुळे पोलाद खराब होणे,यातून तो वरचेवर खराब,नादुरुस्त होणे हे झाले असते. याला उपाय म्हणून स्टेनलेस स्टीलचे सगळे पार्ट बनलेला पंप बसवायला हवा होता.पण स्टील पंपाची किंमत खूप जास्त होती. शिवाय आहे तेवढ्या क्षमतेचा पंप किर्लोस्कर कंपनी काय,भारतात कोणी बनवला नव्हता.... किंवा बनवतही नव्हते... त्यामुळे आयात करणे हाच पर्याय होता... आयात केली तरी त्याची खात्री देता येत नव्हती, या पंपाच्या उभारणीसाठी BESE ने टेंडर मागवले.मोठ्या किमतींच्या किंवा खूप कौशल्याच्या कामाचे टेंडरसाठी दोन तीन टप्पे असतात. पहिला टप्पा असतो, 'प्रिक्वलिफिकेशन' म्हणजे 'पूर्व पात्रता',यात तुम्ही हे काम कसे करणार आहात,यातील तुमचा अनुभव, तंत्रज्ञान काय असणार आहे... या आणि अशा अनेक गोष्टी चर्चिल्या जातात. किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने हे टेंडर भरायचे ठरवले. त्यासाठी अभियंत्यांची एक टीम निवडली गेली. त्यात रविंद्रजी ही होते... त्यांच्यापेक्षा अनेक अनुभवी अभियंते पण टीममध्ये होतेच.या सर्वांनी मिळून एक नवीन कल्पना मांडली.स्टेनलेस स्टीलच्या पंप ऐवजी काँक्रीटची बॉडी असलेल्या पंप तयार केला तर? अशा प्रकारचे अगदीच मोजके पंप जगात काही ठिकाणी वापरले जात असल्याचे त्यांना वाचून माहिती होते.एक-दोघांनी कॉन्फरन्समध्ये ही हे ऐकले होते. मग या टीमने त्यावर पूर्ण अभ्यास केला. त्याविषयी पुर्ण तंत्रज्ञान त्याच्या खाचाखोचा,आर्थिक गणिते यावर भरपूर परिश्रम घेतले. आणि या निर्णयावर आले की... आपण हे काँक्रिट वोल्युट पंप करू शकतो.आणि हे करायचेच... आपण भारतातला पहिला काँक्रीट वोल्युट पंप बनवू आणि कामही मिळवू.पूर्व पात्रता मीटिंगमध्ये किर्लोस्करच्या टीमने काँक्रीट वोल्युट पंप आणि त्यावर आधारित सर्व कामाची उत्तम मांडणी व सादरीकरण केले. BESE च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे शंका समाधान केले. ही कल्पना व तंत्रज्ञान पसंत पडले. पण त्यांनी काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपनीला बरोबर घ्या अशी अट घातली. त्यासाठी मग एका फ्रेंच कंपनी बरोबर करार झाला. तंत्रज्ञान पुरवण्याबाबत आणि स्पर्धेतून किर्लोस्कर कंपनीला हे काम देण्यात आले. काँक्रीट वोल्युट पंप KBL पहिल्यांदा करत होते, त्यामुळे या टीमला धाकधूक होती.पण गेली अनेक वर्षे पंप बनविण्यातून आत्मविश्वास ही होता.या साईटवर काम सुरू करून पूर्णत्वाला नेण्यासाठीच्या टीममध्ये रविंद्रजी यांची नेमणूक झाली होती.


हा काँक्रीट वोल्युट पंप काय आहे?


पोलादाचा पंप समुद्राच्या किंवा प्रदूषित पाण्याने गंजतो. त्याला भरपूर सुट्या भागांनी जोडावे लागते तेही गंजतात, वारंवार बदलावे लागतात. तसेच त्याला व्हायब्रेशन्स ही खुप येतात. ते टाळणे जवळजवळ अशक्य आहे. गंजण्यावर पर्याय म्हणून स्टेनलेस स्टील किंवा तत्सम मिश्र धातूचे पंप बनवणे हा पर्याय असतो.पण तुलनेने ते खूप महाग पडतात. त्याबरोबर व्हायब्रेशन त्यांना ही टळत नाही.त्यातून दुरुस्ती व स्पेअर पार्टचा खर्च स्टेनलेस स्टीलमुळे आणखीनच महागडा होतो.तसेच पंप नादुरुस्त झाल्यावर काम बंद पडू नये म्हणून राखीव पंपांची ही सोय ठेवावी लागते.हा अधिकचा खर्च असतो. याला पर्याय पंपाचा गाभारा म्हणजे केसिंग म्हणूया, बॉडी म्हणूया,तो भाग पूर्ण काँक्रीटचा बनवायचा अशा प्रकारची ती रचना असते. पोलाद किंवा स्टेनलेस स्टील ऐवजी काँक्रीटची बॉडी असल्याने गंजणे होतच नाही. तसेच अनेक सुट्टया भागांना सुट्टी मिळते या रचनेमध्ये. हा पंप M २५ ग्रेडचे काँक्रीट वापरून केलेला असतो. अगदी भूकंपप्रवण किंवा अशीच खास गरज असेल तरच M ४० काँक्रीटचा असतो. (आपल्या सामान्य इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट M १५ ग्रेडचे असते) M २५ ग्रेडमध्ये M १५ पेक्षा सिमेंटचे प्रमाण अधिक असते.


हे कॉक्रिट वोल्युट पंप बनवताना खूप आव्हानात्मक असतो तो भाग म्हणजे त्याचा साचा बनवणे... इंजिनिअरिंगच्या भाषेत याला फॉर्मवर्क असे म्हणतात.त्या पंपाच्या काँक्रीटसाठीच्या साच्या बनवताना सर्व मापे मायक्रोनपर्यंत (म्हणजे मिलिमीटरचा दहावा भाग) तंतोतंत पाळावे लागतात.सर्व प्रक्रियेत हे साध्य करणे इंजीनियरिंग व फॉर्मवर्क करणारे कारागीर यांचा खूप कस लावणारे काम आहे. काँक्रीट पंपाचे आयुष्य कमीत कमी पन्नास वर्षे असते किंबहुना त्यापुढेही ते चालू शकतात. इतके मोठे पोलाद किंवा स्टेनलेस स्टीलचे पंप खूप थोड्या ठिकाणी बनवतात,त्याच्या बाकीच्या ॲक्सेसरीज बाबतही तेच,शिवाय,त्याचा आयात खर्च, वाहतुकीचा खर्च,वाहतुकीतील सुरक्षा, वेगवेगळे कर अशा सगळ्यांचा विचार करता काँक्रीट वोल्युट पंप सर्व बाजूंनी सरस आहे.


भारतातला हा सर्वात मोठा पंप असणार होता; ९० च्या दशकात आणि पहिलाच पंप असणार होता. काँक्रीट वोल्युट पंप हा पंप दर तासाला दोन कोटी साडेसात लाख लिटर पाणी खेचून २० मीटर उंचीवर नेऊन सोडतो. हा पंप आजही उत्तम चालू आहे.विनातक्रार ! हा पंप बसवण्याचे ठरल्यापासून त्याचे तंत्रज्ञान समजून घेणे; त्याचे प्रशिक्षण,त्यावरची साईटवरती प्रत्यक्ष काम करताना करावे लागणारे किरकोळ बदल, हे काम पूर्ण करून घेऊन प्रत्यक्ष पंप चालू करण्यापर्यंतची सर्व जोखीम व जबाबदारी टीमनी उचलली होती.पहिल्या पंपाची यशस्वी निर्मिती झाल्यावर पुढे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीने हे पंप वापरता येईल का याबद्दल विचारणा केली. ही जगातली पाचव्या क्रमांकाची वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. सर्व मिळून ही ६० हजार मेगावॉट इतकी वीज बनवते.भारताच्या गरजेच्या ४० टक्के वीज ही कंपनी बनवते. त्यांच्याकडे ही पहिल्या प्रकल्पात यशस्वी झाल्यावर अनेक प्रकल्पात एनटीपीसीने अधिक मोठ्या क्षमतेची ही कॉक्रीट वोल्युट पंप वापरले.अर्थातच ते सर्व किर्लोस्कर कंपनीने उभारले. पहिला पंप बसवून २७ वर्षे झाली. त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही.


सौराष्ट्र सब कॅनॉल यशस्वी कहाणी 


या काँक्रीट वोल्युट पंपाची कीर्ती वाढत होती आणि यशस्वीताही... १९९४ मधली गोष्ट, पंडित नेहरूंनी कोनशिला बसवलेल्या आणि अनेक वर्षे काम चाललेल्या सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होत आले होते. त्या प्रकल्पाचे कॅनॉल बांधकाम सुरू होते. हा कॅनॉल सरदार सरोवरपासून सुरु होवून,पूर्ण गुजरात व राजस्थानातून तो जैसलपरपर्यंत जातो. त्याची लांबी ५४३ किलोमीटर आहे.याचा सब कॅनाल सौराष्ट्राला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधला आहे.आत्ताचा सौराष्ट्राचा भूभाग लाखो वर्षापूर्वी समुद्रातील एक बेट होते. पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे पुढे हे बेट भारतीय उपखंडाला येऊन चिकटले. त्यामुळे सौराष्ट्राच्या रचना बशीसारखी आहे. सीमेवर उंचवटा व मध्यवर्ती भाग खोल गेला आहे. तीन कोटी लोकसंख्या असलेल्या सौराष्ट्रात पाऊस खूप कमी पडतो.सौराष्ट्रात कोणतीही नदी वाहत नाही. फक्त खोलगट भागात मध्यवर्ती ठिकाणी नळ सरोवर आहे. पण जमीन मात्र खूपच उपजाऊ. भुईमूंगाच्या उत्पन्नासाठी तर अतिउत्तम... पण पाणी नाही... त्याचबरोबर खाद्यतेल व्यापार सौराष्ट्रात मोठा! तेथील तेल व्यापारी आणि सौराष्ट्रातील राजकीय लॉबी गुजरातच्या राजकारणावर पकड ठेवून असते... त्यामुळे आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सुद्धा सौराष्ट्राला पाणी पोहोचवणे सर्व विपरीत परिस्थितीत सुद्धा आवश्यक बनले होते. सरदार सरोवर ते सौराष्ट्रपर्यंत पाणी उताराने जाऊ शकत नाही अशी नैसर्गिक परिस्थिती आहे. त्या अर्थाने विपरीत परिस्थिती! पाणी सौराष्ट्राला पुरवायचे,पण कसे हे तंत्रज्ञ अभियंत्यांना हे मोठे आव्हान होते. त्यावर उत्तर शोधले होते ते असे कि,सरदार सरोवर ते गांधीनगर जवळ कडी गावापर्यंत पाणी उताराने आणले जाईल... हे पाणी उपसा जलसिंचन पद्धतीने पाच टप्प्यात सौराष्ट्रात पोचवायचे. प्रत्येक टप्प्यावर पाणी तलावात न सोडता कॅनॉलमध्ये सोडायचे. तेवढ्या काही अंतरात कॅनलची रुंदी व थोडी खोली वाढवायची. उपसा सिंचन योजना. त्यात पाणी पोहचवायचे आहे ७० किलोमीटर ह्या अंतरावर सत्तर मीटरवर चढवायचे आहे! चक्क दर सेकंदाला सहा लाख तीस हजार लिटर पाणी ७० मीटर उंचीपर्यंत पोचवायचे होते. खूप खूप आव्हानात्मक काम होते. यासाठी गुजरातच्या शासकीय अभियंते व प्रकल्प सल्लागार यांनी नेहमीचे हजारो पंप बसवण्यासंबंधी आराखडा बनवण्याचे चालले होते.पण किर्लोस्कर कंपनीने यात काम करायचे ठरवले.१०० सामान्य पंपाच्या जागी एकच कॉंक्रीट व्हॉल्यूट पंप बसवून हे काम करता येणे शक्य आहे. हे कंपनीच्या अभियंत्यांनी गुजरातच्या अभियंत्यांना व प्रशासनाला अशी कल्पना दिली. कंपनीच्या टीममध्ये रवींद्रजींना परत मध्यवर्ती भूमिका मिळाली. त्याची कारणे दोन तीन महत्त्वाची. म्हणजे काँक्रीट वोल्यूट पंपाची डिझाईन व उभारणी करण्याचा अनुभव आणि दुसरे म्हणजे रवींद्रजींना येत असलेली गुजराती भाषा, गुजराथमध्ये शिक्षण झाल्यामुळे अस्खलित आणि गुजराथ्यांच्या लहेजात! काही तांत्रिक आणि इंजिनिअरिंग सर्व सादरीकरण व पत्रव्यवहार गुजरातीतच करावा लागायचा... त्यामुळे तिथेही रविंद्रजी असायचे. असो. पुढे किर्लोस्कर कंपनीला हे काम मिळाले. 


या प्रकल्पाद्वारे पाणी आता पाच टप्प्यात उचलले गेले. प्रत्येक टप्प्यावर कॅनॉलची एक शाखा सिंचनाच्या पाण्यासाठी तर एक शाखा पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी काढण्यात आली. पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकी चार पंप बसवण्यात आले. ज्याची पाणी घेण्याची क्षमता प्रतिसेकंद पाच हजार लिटर इतकी होती. म्हणजे प्रत्येक सेकंदाला चार पंप मिळून वीस हजार लिटर पाणी खेचत असतात. तर शेतीसाठी जी सिंचन आहे,त्यासाठी पहिल्या टप्प्यावर १९ पंप असे आहेत की,त्यांची प्रत्येकाची पाणी खेचण्याची क्षमता प्रत्येक सेकंदाला २० हजार लिटर आहे. (म्हणजे एकूण पाणी खेचण्याचा ३ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) हे पाणी पुढे कॅनॉलमध्ये पडणार पुढे १२ किलोमीटर वाहात जाणार त्यातले काही पाणी ठिकठिकाणच्या फाट्यावरून सब कॅनॉलमध्ये जाणार व ते शेतीसाठी वापरले जाणार... तसेच दुसऱ्या टप्प्यावर १५ पंप तिसऱ्या टप्प्यावर १५ पंप चौथ्या टप्प्यावर ८ पंप व शेवटच्या टप्प्यावर ८ अशा प्रकारची रचना केली आहे.


काम वेगाने पूर्ण करून पहिल्या पंपिंग स्टेशनच्या सर्व टेस्टिंग पार पाडल्यानंतर २२ मार्च २००७ ला जागतिक जलदिनाला त्याचे उद्घाटन केले गेले.पाच हजारांपेक्षा अधिक लोक तिथे उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. रविंद्रजी व त्यांच्या टीमची गावकऱ्यांनी या निमित्ताने मिरवणूकही काढली... हे काम मिळाले तेव्हा किर्लोस्कर कुटुंबाने ह्या कामाबद्दल सर्व टीमचा घरी सत्कार समारंभ ठेवला. कौतुकही केले.... पाणी सौराष्ट्रात पोचले. ढोलीधजा धरणात पाणी पोहचले... बारा वर्षांनी धरणात पाणी आले होते... यापूर्वी तर धरण भरलेले पाहिल्याचे कुणालाच आठवतही नव्हते.... पण या पाण्याने मात्र ते पूर्ण भरले. या प्रकल्पामुळे सौराष्ट्राची खूप जमिन ओलीताखाली आली आहे.


ही कथा होती जळासी चालविता रवींद्र उलंगवार यांची या ठिकाणी हेन्री डेव्हिड थोरो यांचे वाक्य बरचं काही सांगून जाते.


'स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहीत नाही.'



लोकांना मदत पुरवणे हा परोपकाराचा भाग नसून तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे मिळणारी मदत व सुविधा या चांगल्या दर्जाच्या व त्यांचा आत्मसन्मान येणाऱ्या हव्यात आहे त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. असे महत्त्वाचे सूत्र सांगतात.


'आपत्तीतील आधार - ॲक्वाप्लसचे राहूल पाठक 


जगात कुठेही वादळ, महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध, दंगली, समूहाची स्थलांतरे यासारखी मानवनिर्मित आपत्ती येतात,तेव्हा प्रचंड नुकसान होते. सर्वात जास्त समस्या उभी राहते पिण्याच्या पाण्याची... कारण अशा वेळी पाण्याचे सर्व स्त्रोत एक तर त्यांची मोडतोड झालेली असते किंवा त्याहीपेक्षा पाणी सर्वत्र घाण झालेले असते. मग लोक,स्थानिक यंत्रणा, शसरकार यांच्या माध्यमातून कुठेतरी आश्रय घेतात. या आपत्तीनंतर अधिक मोठी आपत्ती येते ती साथीच्या रोगांची! दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची साथ येऊन तेथील शेकडो-हजारो लोक रोगग्रस्त होतात.अशा वेळी जवळपास कुठेतरी उपलब्ध असलेले पाणी त्यांना पुरवले जात असते.तेही अपुरे असते,त्यात शुद्ध करण्यास वेळही नसतो,यंत्रणाही नसते. त्याबद्दल काही माहितीही नसते. अशा परिस्थितीत मिळेल ते पाणी मिळेल तसे द्यावे लागते. यातून अनेक लोक बळी पडतात,अधू होतात. समस्यांची मालिका सुरूच राहते. यासाठी आरोग्य यंत्रणा आणि इतर सरकारी यंत्रणेवर सुद्धा खूप ताण येतोच आणि यंत्रणा तोकडी पडते.तसेच त्यानंतर तो पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत होण्यासाठी शहर असो वा गाव पुढील काही आठवडे कधीकधी महिने लागतात. ही आपत्तीनंतरची आपत्ती अधिक आव्हानात्मक असते.


पण आपत्ती व्यवस्थापनात लगेचच पाणी शुद्ध करून देणारे तंत्र मिळाले,सहज हाताळता येणारे उपकरण / यंत्र / संयंत्र मिळाले तर पुढच्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत. याबद्दलचे विचार आणि कृती निदान भारतात तरी पहिल्यांदा कुणी केली असेल तर राहुल पाठक यांनी केली.ॲक्वाप्लस या कंपनीद्वारे आपत्तीग्रस्तांच्या समूहासाठी कुठेही घेऊन जाता येण्यासारखा,कुणालाही सहज जोडणी करता येऊ शकणारा आणि मुख्य म्हणजे कोणतीही किंवा इंधन न लागता मनुष्यबळावर सहज चालवणारा,तासाला सातशे लिटर ते पाच हजार लिटर पाणी शुद्ध करणारा मोबाईल फिल्टर त्यांनी सर्वप्रथम बनवला. त्या माध्यमातून पंधरा सोळा वर्षात कोट्यवधी आपदग्रस्तांना शुद्ध पाणी मिळण्याची सोय केली... मळलेल्या सोडाच कुठल्याशा पायवाटेवरूनही न चालता पहिल्यापासूनच स्वतःची वाट निर्माण करून त्याचा महामार्ग,राजमार्ग करणारे राहुल पाठक हे व्यक्तिमत्व इंग्रजीत याला आऊट ऑफ बॉक्स थिंकींग म्हणतात,तसं कायम विचार करणारे... पाण्यासारखं प्रवाही... खळखळणारं नितळ मन... प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची आणि काहीही करताना अत्युच्च गुणवत्तेची कास धरणारी ही व्यक्ती.... त्यांच्या कामाची सुरूवातच १९९४-९५ मध्ये झाली घरात वापरण्याच्या वॉटर फिल्टरच्या मार्केटिंगपासून ते अगदी ठरवून मार्केटिंग शिकले... तेही फिल्टरचे..!


पुढचा टप्पा ठरवलेला होताच,फिल्टर बनवण्याचा पुढे लवकरच फिल्टर बनवायला केली ही.पण घरातले फिल्टर न बनवता मोठे फिल्टर करायचे ठरवले.घरात सुरु वापरायचे फिल्टर आणि मोठ्या प्रमाणात पाणी शुध्द न् निर्जंतूक करणारे फिल्टर यांच्या तंत्रज्ञानात फरक होता.नुकतेच बाजारात मेम्ब्रेन फिल्टरचा वापर मोठ्या प्रमाणात या पाणी शुद्धीकरणासाठी होता. म्हणजे थोडक्यात मिनरल वॉटर बाटलीत मिळू लागलं होतं ना त्यावेळी त्या मिनरल वॉटर प्लांटमध्ये लागणारे फिटर्स ते पाठक बनवू लागले.


आता मग त्यातून इतर लोक हे फिल्टर बनवत आहेत ना, मग आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे... हे वेगळे काहीतरी डोक्यात घेणे हा त्यांचा स्थायीभाव! आजही तो कायम डोकावतोच कुठेना कुठे.


तर वेगवेगळ्या काही ना काही करण्याच्या विचारांमध्ये त्यांनी या वॉटर फिल्ट्रेशन या क्षेत्रात दोन वाटा सुरू करून त्यांचा महामार्ग केला.


पहिली वाट निवडली मोबाईल वॉटर फिल्टर बनवायची..कुठेही घेऊन जाता येईल असा वॉटर फिल्टर. त्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केले आणि तो बनवला देखील. अर्थातच मेम्ब्रेन फिल्टर !!


मेम्ब्रेन फिल्टर म्हणजे एक पातळ कागदासारखी दिसणारी गाळणी. याची छिद्र इतकी बारीक असतात की त्यातून बॅक्टेरिया पण जाऊ शकत नाही. इतकंच काय पण पाण्यातील क्षारांचे रेणू सुद्धा जाऊ शकत नाही इतकी सूक्ष्म छिद्र असलेली चाळणी म्हणजे मेंब्रन फिल्टर या फिल्टरमधे साधारण तीन प्रकार असतात. 


१) मायक्रोफिल्ट्रेशन ०.०२

मायक्रॉन यातून मातीचे कण व बॅक्टेरिया गाळले जातात.


 २) अल्ट्राफिल्टरेशन । मायक्रॉन यातून मातीचे कण,बॅक्टेरिया व व्हायरस गाळले जातात.


 ३) नॅनोफिल्ट्रेशन साईज ०.००१ मायक्रॉन यातून निवडक मिनरल्स गाळले जातात. 


४) रिव्हर्स ऑस्मॉसिस (आर.ओ.) यातून ९९ टक्के क्षार गाळले जातात. 


कुठल्याही आपत्तीत जमिनीवरचे पाणी दूषित होते, मुख्यतः त्यामुळे क्षारयुक्त पाण्याचा संबंध नसल्याने या मोबाइल फिल्टरमधे अल्ट्रा फिल्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २००५ मध्ये भूकंप झाला होता.त्यांच्या कंपनीने त्वरित तिकडे

संपर्क साधला तर तेथील सर्व आपत्ती व्यवस्थापन भारतीय लष्कर सांभाळत होते. पाठक त्यांच्यापर्यंत पोहोचले.आम्ही व आमची कंपनी आपल्याला मोबाईल फिल्टर देतो,दान करतो पण तो तिकडे वापरा अशी विनंती केल्यावर लष्करी अधिकारी शाशंक मनाने तयार झाले.कारण असा मोबाईल फिल्टर भारतात पहिल्यांदाच बनला होता... पहिल्यांदाच उपलब्ध होता. तो प्लांट भारत पाकिस्तानच्या सीमेवरील उरी येथे बसवला गेला जिथे भारतीय लष्कराचा तळ आहे.लष्करी तळाबरोबरच उरी व टंगधार गावातील व परिसरातील लोकांना शुद्ध निर्जंतुक पाणी आपत्तीनंतर उपलब्ध झाले. हा दोन गोष्टींसाठी पहिलाच अनुभव होता एक म्हणजे Aqua Plus कंपनीचा हा पहिलाच आपत्तीनंतर ताबडतोब प्रतिसाद आणि दुसरे म्हणजे पहिल्यांदाच मोबाईल फिल्टर्स वापरला जात होता. हा मोबाईल फिल्टर प्लांट तिथे उरीला बरेच दिवस होता.


दरम्यान अनेक संस्था तिथे उरीला आपत्ती व्यवस्थापनात लष्कराला मदत करत होत्या. पैकी REDR (Ragistered Engineers for Disaster Relief) ही व्यावसायिक अभियंत्यांची अशी संघटना जे आपत्तीत आपली व्यावसायिक स्वयंसेवक म्हणून सेवा देतात. या जगव्यापी आपत्ती व्यवस्थापनात प्रसिद्ध असलेल्या संस्थेच्या नजरेस हा फिल्टर आला. ही संस्था आपत्ती व्यवस्थापनात विविध कामे करते. पण मुख्यत्वे दोन प्रमुख कामे करते. 


१) आपदग्रस्तांना आपत्तीस तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी विविध कौशल्य विकास उपक्रम आणि 


२) या व्यवस्थापनात उपयोगी ठरणाऱ्या विविध वस्तू,सेवा,संस्था,त्याला अर्थसहाय्य करणारे विविध घटक इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळवते व त्यांची माहिती जगाला उपलब्ध करण्यासाठी नोंदी ठेवते.पूर्वी रजिस्टरच्या स्वरूपात तर आता पोर्टलच्या स्वरूपात नोंदी ठेवते. थोडक्यात सर्वंकष माहिती संकलन !!


त्यांनी REDR च्या माहिती यादीत हा फिल्टर नोंदवला. पुढे ती माहिती वॉटर अँड सॅनिटेशन यात काम करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या OXFAM कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहिली. त्यांनी लगेच फिल्टरची ऑर्डर दिली. त्यांनी ० ते ४,००० लिटर प्रति तास इतके शुद्ध पाणी देणाऱ्या फिल्टरची ही मागणी केली. ह्या राहुल पाठक यांच्या  Aqua Plus कंपनीने तो बनवला.


या यशाबद्दल राहुल पाठक सांगतात,जगात सर्वात अवघड काय आहे? तर सर्वात सोपी सुविधा निर्माण करणे.फिल्टरच्या बाबतीतही आम्ही ते करताना १२ ते १४ वर्षे सतत उत्तमोत्तम गोष्टींचा ध्यास घेतला आणि जागतिक दर्जाचा सर्वसामान्य उपयोग होणारा प्रॉडक्ट तयार झाला.


शिक्षक दार उघडून देतो. पण आत प्रवेश तुम्हालाच करावा लागतो.एक चायनीज म्हण..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड