* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/११/२२

निकोलस कोपर्निकस Nicholas Copernicus (१९ फेब्रु. १४७३ १५४३)

२४ मे पोलंड मधील टोरून येथे जन्मलेल्या या प्रतिभावंताने लॅटीन आणि ग्रीक भाषेत आपले शिक्षण पूर्ण केले. इटलीतील बोलोन्या विद्यापीठात त्यांनी गणित,पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केला.कोपर्निकसचे इटलीतील प्रमुख विद्यापीठांशी,चर्च तसेच चर्चचे प्रमुख पोप यांच्याशी सौहार्दाचे संबंध होते. या संबंधाचा त्याला जसा फायदा झाला तसाच तोटाही सहन करावा लागला. 'सर्व विश्वाचा मध्यबिंदू पृथ्वी की सूर्य ?' हा एक वादाचा मुद्दा कोपर्निकसने चर्चेत आणला होता. सॅमोस येथील अरिस्टार्कस याने मांडलेला 'सूर्यकेंद्रित' म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत मागे पडलेला होता.सन १५०० सालापर्यंत 'पृथ्वीकेंद्रित' टॉलेमी-ॲरिस्टॉटलचा सिद्धांत धर्माच्या छायेखाली टिकून होता.


टॉलेमीपासून चालत आलेली पृथ्वीकेंद्रित सिद्धांताची कल्पना कोपर्निकसला अपुरी वाटत होती. त्याच्या विचारांची दिशा प्रथमपासूनच प्रचलित

मतांविरुद्ध,पृथ्वीकेंद्रित सिद्धांताविरुद्ध होती.अनेक वर्षे त्याने आपल्या मतप्रणालीवर निरीक्षणपूर्वक चिंतन केले. सूर्य स्थिर असून पृथ्वीसह इतर सर्व ग्रह त्याभोवती फिरतात हे त्याने १५१० साली एका लेखाद्वारे मांडले. सदर लेख 'कॉमेंटरी ऑलस' या लहान टीकात्मक पुस्तकातून पुढे आला. हे पुस्तक १५१४ च्या आसपास प्रसिद्ध झाले. सदर पुस्तक पोप क्लीमेंटच्या निदर्शनास आल्यावर हा संपूर्ण सिद्धांत प्रसिद्ध करावा म्हणून त्याने सूचना केली. त्याचप्रमाणे प्रोटेस्टंट पंथातल्या फॉन लॉखन अर्थात ऱ्हेटिकस यानेही कोपर्निकसला संपूर्ण पुस्तक लिहिण्यास गळ घातली. पण आपले मत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासंदर्भात कोपर्निकसला उत्साह वाटत नव्हता. राजसत्ता, धर्मसत्ता आणि पोप यांची भीती त्याला सतावत होती.


कोपर्निकस हा धर्मनिष्ठ होता. प्रस्थापित मतांना एकदम धक्का द्यावा असे त्याला वाटत नव्हते. पण सत्य लपवून ठेवावे हेही त्याच्या मनात येईना. शेवटी हेटिकसने पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम हौसेने अंगावर घेऊन छपाईचे कामही चालू केले. दरम्यान जुलै १५४० मध्ये ॲड्रियस ओसियांडर या आपल्या मित्राला पत्र लिहून कोपर्निकसने पुस्तक प्रसिद्ध करण्यासंदर्भात सल्ला विचारला. सिद्धांत सत्य असल्याचा दावा न करता गृहितक मानले तर टीकेला तोंड देता येईल असे ओसियांडरचे मत होते. पण कोपर्निकसला आपला सिद्धांत सत्य असल्याची खात्री असल्यामुळे अशा तऱ्हेची तडजोड त्याला मान्य होण्यासारखी नव्हती. पुस्तकाची छपाई सुरु असताना कोपर्निकस मात्र अंथरूणावर खिळून होता.


इ. स. १५४३ मध्ये 'ऑन द रिव्होल्यूशन्स ऑफ द सेलेस्टीअल ऑब्जेक्टस' (On the Revolutions of the Celestial Objects) ही स्वतःच्या पुस्तकाची प्रत हातात आली तेव्हा कोपर्निकसला धक्काच बसला. असे म्हणतात की, आपल्या सिद्धांताला विरोधी प्रस्तावना पाहून १५४३ मध्ये काही तासातच कोपर्निकसचा मृत्यू झाला. हे खळबळजनक पुस्तक पोपला समर्पित केलेले होते.कोपर्निकसच्या मृत्यूनंतर या पुस्तकाची प्रस्तावना एक चर्चेचा विषय ठरली. कारण प्रस्तावनेत सूर्यकेंद्रित सिद्धांत ठामपणे मांडलेला नव्हता तर एक गृहितक म्हणून वापरावा,ज्यायोगे गणितातील निष्कर्ष काढणे सोपे होईल एवढेच त्यात म्हटलेले होते.


गेल्या शतकाच्या शेवटी प्रागमध्ये कोपर्निकसचे स्वतःचे हस्तलिखित सापडले. त्याला शीर्षक नाही, प्रस्तावना नाही. किंबहुना हस्तलिखित आणि प्रकाशित आवृत्तीमध्ये अनेक बदल झालेले होते. हे बदल करण्यामध्ये हेटिकस अथवा ओसियांडरचा हात होता हे निश्चितच. प्रस्तावना बदलली म्हणून एखाद्याचे विचार मात्र कोणीही बदलू शकत नाही. कोपर्निकसच्या या क्रांतिकारी सिद्धांताने त्याच्या मृत्यूनंतर सोळाव्या आणि सतराव्या शतकात धर्मामध्ये खळबळ उडवून दिली. त्याच्या सिद्धांताला धर्ममार्तंडांनी विरोध तर केलाच पण काही खगोल वैज्ञानिकांनीही विरोध केला.अर्थात दोहोंच्या विरोधामध्ये गुणात्मक फरक होता. खगोलवैज्ञानिकांचा विरोध हा निरीक्षण आणि पुराव्याशी निगडीत होता.


सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे

नागनालंदा प्रकाशन इस्लामपूर


१९/११/२२

बर्म्युडा ट्रेंगल - गूढ रहस्य की निसर्गाची कमाल?

अँटलांटिक महासागरात फ्लोरिडा,बर्म्युडा आणि प्यूर्टोरिको या तीन ठिकाणांना जोडणारा एक भाग या समुद्रात आहे.त्रिकोणाकृती असलेल्या या भागाला 'बर्म्युडा ट्रॅगल' म्हटलं जातं.हाच भाग डेव्हिल्स ट्रेंगल या नावानंसुद्धा कुप्रसिद्ध आहे. त्याला कारणही तसंच आहे.या भागात अनेक विमानं तसंच मोठमोठी जहाज गायब झाली आहेत.त्यांचा तसंच त्यावरचे कर्मचारी तसंच प्रवासी यांचा नंतर काहीही ठावठिकाणा लागला नाही.कित्येक वर्षं हे सगळं गूढ बनून राहिलं होतं.त्याविषयी विविध तर्कवितर्क केले अनेक अफवा उठल्या.समुद्री चाच्यापासून अगदी परग्रहावरच्या जिवांपर्यंत (एलियन्स) असे सर्व अंदाज लोकांनी बांधले.असं काय रहस्य होतं त्या भागात ?


'बर्म्युडा ट्रॅगल'ची ओळख तशी जुन्या काळापासून होती.अनेक दर्यावर्दींना या भागात काहीतरी रहस्यमयी आहे हे लक्षात आलं होतं. ५०० वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा पहिल्यांदा जगप्रवासाला निघाला तेव्हा त्यानं प्रथम याचा उल्लेख केला होता.१४९२ साली या भागातून जात असताना त्यान अद्भुत आणि भयावह असं काही तरी बघितलं.एका रात्री त्यानं या भागात आगीचा एक प्रचंड असा आगडोंब बघितला.त्याच्याकडचं होकायंत्र विचित्र प्रकारे दिशा दाखवत होते.वादळ नसतानाही प्रचंड मोठ्या लाटा तिथं उसळत होत्या.


१९१८ मध्ये 'यू.एस.एस.सायक्लोप्स' (USS cyclops) हे जहाज बार्बाडोसमधून 'मँगनीज' हे खनिज घेऊन निघालं.३०९ कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेलं हे जहाज रहस्यमयरीत्या अदृश्य झालं. नंतर त्या जहाजाचा आणि त्यावरच्या कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रोटिअस आणि नेरिअस ही दोन जहाजं तेच मँगनीज खनिज वाहून नेताना याच भागात बेपत्ता झाली आणि त्यांचाही पुढे शोध लागला नाही.५ डिसेंबर १९४५ रोजी या भागात घडलेल्या अजून एका गूढ घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं! अमेरिकन नौदलाची 'फ्लाईट १९' ही पाच 'टीबीएम अँव्हेजर (TBM Avenger) या बॉम्बर्स विमानांची तुकडी प्रशिक्षणासाठी या भागावरून जात होती.ही संपूर्ण तुकडी तिथं गायब झाली.त्या घटनेनंतर लगेचच या विमानांची शोधाशोध सुरू झाली.अनेक विमानं त्यासाठी रवाना झाली.त्यापैकी एक असलेलं 'पीबीएम मरीनर' (PBM Mariner) हे विमान त्यातल्या १३ कर्मचाऱ्यांसह याच ठिकाणी बेपत्ता झालं.यापैकी कोणत्याच विमानाचा शोध लागला नाही.


फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरच्या एका जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्या वेळी आकाशात मोठे स्फोट झाल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर तिथं मोठं वादळही आलं होतं.शेवटी वाट चुकल्यानं आणि वादळात सापडल्यानं ही विमानं अपघातग्रस्त झाली असावीत,असा निष्कर्ष अमेरिकन नौदलाकडून काढण्यात आला. बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या अथवा दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजं विमानांची यादी फार मोठी आहे. ७५ च्या आसपास विमानं तर १०० हून अधिक जहाजं इथं गायब झाल्याचं सांगितलं जातं.या भागातून जाणारी जहाजं किंवा विमानं अत्यंत रहस्यमयरीत्या बेपत्ता होतात आणि त्यांचा कुठंच शोध लागत नाही हे प्रत्येक घटनेनंतर सिद्ध होत गेलं.


अनेक वैज्ञानिक यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते.शतकानुशतकं हे प्रयत्न चालू होते.पण त्यांना यश न मिळाल्यानं यामागचं गूढ वलय आणखीनच दाट होत गेलं. भुताखेतांचा वावर,समुद्री चाच्यांची लूटमार, परग्रहावरचे जीव अर्थात एलियन्स,चक्रीवादळ, मानवी चुका,होकायंत्रात होणारे बदल तसंच या क्षेत्रात असलेलं मिथेन हायड्रेट्सचं जास्त प्रमाण अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. तरी खात्रीशीर असं कुठलंही कारण सापडत नव्हतं.अलीकडच्या काळात शास्त्रज्ञांच्या एका संशोधनादरम्यान मात्र हे रहस्य उलगडलं आहे. निदान तसा दावा तरी आहे.या दाव्याप्रमाणे त्या भागात षटकोनी ढगांची निर्मिती होते आणि हे ढग एखाद्या 'एअरबॉम्ब'सारखं काम करतात.या ढगांमध्ये मेकॅरोबर्स्ट तयार होऊन ते वेगानं समुद्रावर आदळतात.त्यामुळे तिथं २५० किमी प्रतितास यापेक्षाही अधिक वेगानं वारे वाहतात आणि प्रचंड मोठ्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे विमानं आणि जहाजं तिथून पुढे जाऊ शकत नाही आणि तिथंच गायब होतात असं या नव्या संशोधनात सांगितलं गेलं आहे.


'प्रवास' या पुस्तकातून अच्युत गोडबोले व आसावरी निफाडकर,मधुश्री पब्लिकेशन





१७/११/२२

.. सत्यकथा थक्क करुन सोडणारी

हावरटपणा,सर्व काही मलाच मिळाले पाहिजे.हा स्वार्थी विचार,व स्वार्थी वागणं पक्षी,प्राण्यांकडून कधीच होत नाही.ही सर्वजण निसर्ग नियमातून जीवन जगणारी असतात.


मेनन पिस्टन रिंग्ज (टोप,संभापूर) या ठिकाणी मी जनरल कास्टींगमध्ये ( फौन्ड्री ) काम करतो.या ठिकाणी प्रिसिजन मशिन् ड कास्टींग उत्पादनाची निर्मिती होते.शारीरिक श्रमाची कामे असतात.ज्यामुळे जीवनातील 'प्रतिष्ठा' वाढीला लागते.कंपनी म्हणजे जिव्हाळ्याचं,प्रेमाचं ठिकाणं आमचे 'वरिष्ठ साहेब' हे फारच मनस्वी स्वभावाचे आहेत.राकेश सावंत,सचिन पाटील,ही माणुसकी जतन करत असताना.कामामध्ये न कळत चुक झाल्यास 'शिक्षा न देता शिक्षण देतात' त्याचबरोबर सर्वोत्तम असा (HRD) विभाग,(मानव संसाधन विभाग कंपनीच्या जो मानवी संसाधनांचे व्यवस्थापन करतो.) याठिकाणी सुसंवाद साधून 'चांगुलपणा' आपल्या वागण्यातून शिकवणारे काळे साहेब कंपनीमध्ये वीजेचा अनावश्यक वापर बंद करुन वीज वाचवणे काळाची गरज आहे.वीज जीवनातील महत्वाचा भाग आहे.म्हणून ते प्रत्यक्ष येवून दिवस सुरु होताच लाईट बंद करतात.(थॉमस अल्व्हा एडिसन यांना आनंद नक्कीच झाला असेल.) त्यांना या संदर्भात बोललो असता ते सहजच म्हणालेत,आपण चांगलं करत रहायचे म्हणजे चांगुलपणा आपली पाठराखण सदैव करतो.


या ठिकाणी असाच एक प्रसंग संवेदनशील मनाला भावनिक भुरळ घालून गेला.या ठिकाणी पपईचे एक झाड आहे.(आमच्या कंपनीमध्ये निसर्गाचे जतन केले जाते.) या झाडावरती पपई लागलेल्या आहेत. एक वानर या झाडावरती चढले या झाडावर लागलेल्या सर्व पपई त्याने हाताने दाबून पिकलेल्या आहेत का? याची खात्री केली एकही पपई खाण्यासाठी पिकलेली नव्हती.ज्या सन्मानाने ते वानर त्या झाडावर चढले होते.त्याच सन्मानाने ते खाली उतरले.कोणत्याही प्रकारचा राग नाही. कोणत्याही प्रकारचा त्याचा इगो दुखावला नाही. 'जे जसं आहे,ते तसं त्यानं स्विकारलं' हा माणसाला बरंच काही शिकवणारा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला नाही.पण फेटलिंग या विभागात काम करणारे 'माणुस' असणारे आमचे सहकारी मित्र 'सोहेल' यांनी हा ह्रदयस्पर्शी प्रसंग याची देही याची डोळा पाहिला.व पळत येवून मला सांगितला. हा धडा मला बरचं काही सागून गेला.हा प्रसंग ऐकल्यानंतर माझ्यामध्ये असणारा प्राचीन व सनातन DNA मात्र सुखावला..!


'पाखरमाया' हे मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन सुरू होते.यावेळी या पुस्तकातील एक मुलाखत बरचं काही ज्ञान देऊन जाते.

एस. एच. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं

की, 'तुम्ही जर मानव नसता, तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हांला आवडलं असतं ?

त्यावर स्केफ म्हणाला,

'मला कालव-शिंपला (ऑइस्टर) व्हायला आवडेल.'

हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं,

'का बरं?'

'कारण कालव-शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते. नंतर त्याचं रूपांतर मादीत होतं अन् शेवटी तो अर्धनारीनटेश्वर होतो. जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवांतून तो जातो. त्यामुळं संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं.'

परीक्षकांना हे उत्तर आवडलं,हे सांगायला नकोच.


(हा लेख लिहीत असताना आमचे परममित्र माधव गव्हाणे सरांचा फोन आला आणि याच अनुषंगाने थोडी नवीन चर्चा झाली त्यातून नवीन माहिती मिळाली.वानरे संत्री खात नाहीत.कारण ती सोलत असताना संत्र्याच्या सालीमध्ये असणारा रस डोळ्यात उडतो,व डोळे चरचरतात,हे ज्ञान त्यांनी अनुभवातून मिळवलेले आहे त्यामुळेच वानरे संत्री खात नाहीत.)


सर्वांचे पुनश्च आभार व धन्यवाद


● विजय कृष्णात गायकवाड

१५/११/२२

'निसर्गाची नवलाई' मध्ये जाणून घेऊया पक्षी भाग -१

उत्क्रांतीतल्या व जीवशास्त्रातल्या अभ्यासकांच्यामते या जगातील सगळ्यात प्रगत प्रजाती ही 'पक्षी' आहे.


मेंदूचा आकार,पखांची ठेवण यांच्या क्षमता पाहील्या तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.एवढ्या छोट्या मेंदूमध्ये जीवन जगण्याच्या नोंदी कशा काय राहू शकतात? एवढ्याशा पखांचा उपयोग करुन फारच दुरचा प्रवास कसा काय करु शकतात?म्हणजेच पक्षी हा उत्क्रांत आहे याची खात्री पटू लागते.


पक्ष्यांचे अन्नशोधाचे कौशल्य लांब अंतरावरचे अचूक स्थलांतर पाहिले.तर त्याच्या बुद्धिमत्तेला नावे ठेवता येणार नाहीत पक्ष्यांना किचकट गोष्टी शिकवता येतात तर काही पक्षी न शिकवता बाह्यसाधने वापरून शिकतात.


एखादी अळी वा फुलपाखरू खाल्ल्याने त्रास होतो हे लक्षात आल्यावर पुन्हा त्या अळी वा फुलपाखराला तोंड लावत नाहीत.काही भडक रंग धोकादायक असतात हेही त्यांना अनुभवाने कळते.हेरिंग गल पक्षी सिंपले चोचीत घेऊन उंच जातात व त्या शिंपा दगडावर आपटतात तेव्हा त्यातून कालव खायला मिळतात हे त्यांना समजते.


जपानमधील काही शहरातील कावळे रस्त्यावरच्या रहदारीचे दिवे लाल असताना तिथे अक्रोड टाकतात.हिरवे दिवे लागले की रहदारी सुरु होऊन अक्रोड फुटतात.पुन्हा दिवे लाल झाले की रहदारी थांबल्यावर ते तुकडे गोळा करतात.यावरुन त्यांची निरीक्षणशक्ती लक्षात येते.(पक्षीगाथा या पुस्तकातील नोंदी)


हेरॉन नावाचा एक पक्षी आहे.तो बगळ्यासारखा साधारणत: दिसतो.पांढरा हेरॉन व काळा हेरॉन आहेत.त्यापैकी काळा हेरॉन हा आपलं खाद्य कशाप्रकारे मिळवितो.(यासंदर्भात व्हिडीओ आहेत.) 

हा पक्षी मासे धरण्यासाठी वाहणाऱ्या पाण्यात किंवा पाण्याजवळ जाऊन तिथे तो आपल्या पंखाची छत्री तयार करून सावली तयार करतो.मासे सावली आली म्हणून तिथे येतात आणि नेमक्या वेळी त्यातील एक मासा तो उचलतो,आणि खावून टाकतो. गमंतीशीर पण शिकण्यासारखी गोष्ट आहे


त्यानंतर पांढरा हेरॉन हा जरा जास्तच हुशार आहे. हा काय करतो,तर खाण्याचा एखादा पदार्थाचा तुकडा पाण्यावरती टाकतो.व तो खाण्यासाठी ज्यावेळेला मासे येतात त्यावेळी त्यातला एक मासा तो उचलतो आणि खाऊन टाकतो.


आणखी एका व्हिडीओच्या संदर्भानुसार सतिश खाडे याला कोथरुडचा पांढरा हेरॉन म्हणतात.कारण हा जरा इतरांच्यापेक्षा 'वेगळा विचार करणारा'आहे. तर हा काय करतो.कुठून तरी थर्माकॉलचा एक तुकडा आणून तो पाण्यात टाकतो,त्या पाण्यातील माशांना वाटतं.की हे काहीतरी अन्न आहे,आणि ज्या वेळेला तो तुकडा खायला मासे येतात.त्या वेळेला तो त्यांची शिकार करतो. तो थर्माकॉलचा तुकडा तो तसाच जपून ठेवतो. खाऊन झाल्यानंतर परत निवांतपणे तोच तुकडा टाकून तो अशा पद्धतीने दररोज शिकार करतो.


कावळा आपल्या सर्वांना माहीत असणारा जवळचा व सुपरिचित असा आहे,त्यामुळे त्याचा जास्त अभ्यास केला गेलेला आहे. त्याला अभ्यासाअंती बुद्धिमानही

म्हटलेलं आहे.त्यातील काही प्रयोग..


एकदा काय झालं कावळ्याला आवडणाऱ्या मांसाचे तुकडे एका दोरीला बांधून झाडाच्या फांदीला अडकून ठेवले.आता अडकून ठेवल्यामुळे ही दोरी मागे पुढे होत होती कावळ्याने ते बघितले आणि त्याने दोरीवरील मांसाला टोच मारून खात्री करून घेतली. त्याने बराच वेळा टोच मारून ते खाण्याचा प्रयत्न केला पण ते थांबत नव्हते.मग त्यांने थोडा थांबून विचार केला.

आणि एक भन्नाट कल्पना त्याला सुचली.त्याने मग काय केले तर एका पायाने ती हलणारी दोरी वर ओढून घेतली. (जशी आपण आडातून पाण्याची घागर वर ओढतो तशी) आणि मग निवांतपणे त्यांने ते मांस खाल्ले..


ज्या वेळेला आपण आरशामध्ये बघतो त्यावेळेला आरशामध्ये दिसणारी वस्तू डावीकडे किंवा उजवीकडे अशी दिसते त्या ठिकाणी आपण गोंधळतो.कावळ्याच्या समोर आरसा ठेवण्यात आला.व त्याच्या मागच्या बाजूला त्याला आवडणारा मांसाचा तुकडा ठेवला.कावळ्याने आरशात तो तुकडा बघितला आणि मागे वळून त्याने तो चटकन खाऊन टाकला मागे वळून बघितल्यानंतर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असा त्याचा गोंधळ झाला नाही. हे त्याच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे.


अभ्यासकांच्या अभ्यासानुसार माणसांच्या ७ वर्षाच्या मुलाला जेवढी बुद्धिमत्ता असते,बुध्यांक असतो.तेवढी बुद्धिमत्ता व बुद्ध्यांक कावळ्याला असतो.


काही पक्षांना आकडेसुद्धा मोजता येतात.जपान व चीनमध्ये मासेमारी करताना एका विशिष्ट लांब मानेच्या बगळ्यासारख्या पक्षाचा मासेमारीसाठी उपयोग करून घेतात.तो मासे पकडण्यामध्ये माहीर असतो. लहान नावेतून अशा दोन-चार पक्षांना ते घेऊन जातात.त्यांच्या लांब मानेमध्ये एक कडी अडकवली जाते,त्याने मासा खाऊ नये म्हणून,पण त्याने ७ मासे पकडून आणल्यानंतर तो मासेमारी करणारा माणूस त्या पक्षाच्या मानेमध्ये घातलेले कडी काढतो,आणि त्याला एक मासा खायला देतो.यात गमतीशीर भाग असा आहे,की ७ मासे आणल्यानंतर जर त्या माणसाने त्याची कडी काढून त्याला मासा खायला दिला नाही तर तो पक्षी मासे पकडण्यासाठी जातच नाही.म्हणजेच तो पक्षी आकडे ओळखतो त्याला आकड्याचे ज्ञान झालेले आहे.


हेमलकसा या ठिकाणी प्रकाश आमटे त्यांच्या घरी घडलेली घटना.. त्यांच्या घरी पाहूणे आलेले. प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांची मैत्रीण त्यांना भेटण्याकरता आली होती. तर या ठिकाणी मंदाकिनी अंगणामध्ये बसल्या होत्या आणि त्यांची मैत्रीण घरातून त्यांच्याशी बोलत होती. एक दोन वाक्य बोलल्यानंतर काही वेळे शांततेत गेला आणि त्यांनी बोललेली दोन वाक्ये त्यांच्या आवाजात जशी आहेत तशी त्यांच्या कानावर आलीत. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण त्यांना काही दिसलं नाही,त्यांना वाटले आपल्याला भास झाला असेल म्हणून त्या पुन्हा बोलू लागल्या.परत दोन-तीन वाक्ये बोलल्यानंतर त्यांच्या आवाजात हुबेहुब पुन्हा तीच वाक्ये त्यांना ऐकायला आलीत.आता मात्र त्यांना काही समजेना आसपास तर कोणी दिसेना,मग हे कोण बोलत आहे? त्या तशाच तडक बाहेर मंदाकिनी जवळ गेल्या आणि म्हणाल्या 'अगं या ठिकाणी कोणीतरी आहे जे माझ्या आवाजाची नक्कल करून बोलत आहे'.मला तर इथं कोणीही दिसत नाही,मला तर हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय.त्यावर मंदाकिनी हसल्या,आपल्या मैत्रिणीला घेऊन आत गेल्या आणि म्हणाल्या ही गमंत आमच्या येथे येणाऱ्या जवळजवळ सर्व पाहुण्यांच्या बाबतीत घडते.घरात आल्यानंतर भिंतीवरती एका खुट्टीवर एक लहान मैना बसली होती.तिच्याकडे बघत त्या आपल्या मैत्रीणीला म्हणाल्या,ही मैना तुझी हुबेहूब नक्कल करते.आपल्याला फक्त मिठू मिठू पोपट माहीत असतो. पण माणसाच्या आवाजाची नक्कल करणारी जंगली मैना माहीत नसते.


'निसर्गाची नवलाई' या सतीश खाडे यांच्या पाॅडकास्टमधून..

विजय कृष्णात गायकवाड

१३/११/२२

प्रेम जाणून घेताना..

खरे प्रेम तसे कठीणच असते. पण आपण ते अनुभवायला आतुर असतो.प्रेम हे जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी सर्व त्याच्या पार्श्वभूमीसाठी असते. प्रेम करणे हे निसर्गाने मानवावर सोपवलेले सर्वांत कठीण आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. तरुणाईला वाटते की प्रेम हा आपला प्रांत आहे,पण तरुणांची प्रेम करायची कुवतच नसते.आपल्या सर्वस्वानिशी प्रेम करायला शिकावे लागते. प्रेम म्हणजे दुसऱ्यामध्ये विरघळून जाणे किंवा स्वतःला समर्पित करणे किंवा एक होणे नव्हे ! कारण दोन अपूर्ण, स्वतःला नीट न ओळखणारी,एकस्पंद नसलेली माणसे एक कशी होतील ?


प्रेम हे तुम्हाला संपूर्ण परिपक्क करणारी गोष्ट आहे. स्वतः पूर्णत्वाकडे नेणारी,आपल्या आतील अवकाश असीम विस्तारणारी,दुसऱ्यासाठी अवघे विश्वच बनायची प्रेरणा देणारी बाब म्हणजे प्रेम !कधी कधी एका आयुष्यात ते पूर्णत्वाला जाईल असे नाही.प्रेम जीवनाचे अंतिम रूप आहे.तरुण माणसे प्रेमात स्वतःला विरून टाकतात. एकासाठी दुसरा मिटवून घेतो,अन् आपल्याबरोबर दुसऱ्यालाही अपूर्ण बनवतो.अशा तुकड्यातून कुणाला कसे काय पूर्णत्व मिळू शकेल? त्यातच आनंद मानून राहणाऱ्याच्या वाट्याला भविष्यात निराशा अन तिरस्कार हेच येईल. सामान्यांना त्यातच स्वर्ग आहे,असे वाटते,पण आपला आतील अवकाश,आपला सर्जनाला प्रेरक ठरणारा असीम एकाकीपणा कधीही मिटू देऊ नये. प्रेमाने त्याच्या या अवकाशाच्या कक्षा आणखी रुंदावायला हव्यात खऱ्या प्रेमात दोघांचाही विकास व्हायला हवा ! एकमेकांपासून स्वतंत्र, विकसनशील अन तरीही बंधनात असणे, ही भावना जाणवायला हवी !


'प्रेम' या मूल्याविषयी जर्मन कवी रिने मारिया रिल्के याने एका तरुण कवीला लिहिलेले पत्र..!


'अवेकन द जायंट विदिन मधून..'