* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/१/२३

आणि हा आपला टायटॅनिक सोबतचा शेवटचा प्रवास…!

२ तासांनी ५८ मैलावर असलेलं कुनार्डचं कार्फाथिया जहाज हे मात्र निरोप मिळाल्याबरोबर मदतीला धावलं आणि ७०५ जणांना वाचण्यात त्यांना यश मिळालं. बाकी प्रवाशांनी मात्र टायटॅनिकबरोबरच जलसमाधी घेतली होती.दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर समुद्रात भयंकर दृश्य दिसत होतं.समुद्रातल्या थंडगार पाण्यात हजारो शवांचा सडा पडला होता.जवळपास १५०० जणांचा मृत्यू झाला होता.काहींचा जहाजाचे भाग अंगावर पडून मृत्यू झाला होता,तर काहींचा बुडून.पण अनेकांचा समुद्राच्या पाण्यान गारठून मृत्यू झाला होता. अनेकांच्या हाती जहाजातल्या सामानाच्या फळ्या लागल्या होत्या.


याच फळ्यांबरोबर तरंगत गारठून गेलेली शवं पसरलेली होती.विशेष म्हणजे ही शवं गोळा करतानाही गरीब-श्रीमंत असा भेदभाव झाला होता.


झालं असं :


टायटॅनिकमधून मृत्युमुखी पडलेल्या लोकांची शवं घेऊन येण्यासाठी काही बोटींना पाठवलं गेलं.पण तिथं इतकी शवं होती की त्या शवांना गोळा करता करता या बोटींमधला अन्न आणि इंधनपुरवठा संपतो की काय अशी भीती वाटायला लागली.शेवटी श्रीमंतांच्या शवांची ओळख पटणं शक्य असल्यानं आणि त्यांची ओळख पटणं त्यांच्या संपत्तीच्या वारसदारांसाठी अत्यावश्यक असल्यानं त्या टीमनं फक्त फर्स्ट क्लासच्या प्रवाशांचीच शवं गोळा करण्याचा निर्णय घेतला होता.


टायटॅनिकमधल्या प्रवाशांबरोबरच त्यातल्या अनेक अधिकाऱ्यांचाही यात मृत्यू झाला.


कॅप्टन स्मिथची ही शेवटची सफर होती. यानंतर तो निवृत्त होणार होता.दैवदुर्विलास बघा,ती त्याची खरोखरच शेवटची सफर ठरली! पण शेवटपर्यंत त्यानं आपली जबाबदारी निभावली.त्यानं अनेकांचे जीव वाचवण्यात मदत केली.पण त्याचा जीव मात्र त्यानं गमावला. 


टायटॅनिकचा मुख्य डिझाइनर अँड्र्यूज हाही यातून प्रवास करत होता.त्याचं कुटुंबही त्याच्याबरोबर होतं.या सगळ्याचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता.आपल्या बायकोला लाइफ बोटमध्ये जबरदस्ती बसवून तो स्मोकिंग रूममध्ये गेला. आयुष्यातलं एक मोठं स्वप्न उद्ध्वस्त होत होतं. त्याच्या भावना गारठल्या होत्या.त्या रूममधल्या एका पेंटिंगकडे तो एकटक बघत उभा राहिला आणि जहाजाबरोबर त्यानंही जलसमाधी घेतली. टायटॅनिकमध्ये इस्मेही होता.त्याच्यासाठी खरंतर हा मोठा धक्का होता.त्यानंही अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.जहाजातल्या प्रत्येकाला आपला मृत्यू समोर दिसत होता. काही जण वाचण्याची धडपड करत होते,तर काही मात्र शांतपणे आपल्या मृत्यूला सामोरं जायची तयारी करत होते.काही जण लोकांना वाचवण्याचा प्रयत्नही करत होते.याच यादीतलं एक नाव म्हणजे विल्यम स्टेड !


तेव्हाच्या लाइफ बोट्सच्या संख्येच्या नियमांविरुद्ध याआधीच अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते.'गॅझेट' या वर्तमानपत्राचा पत्रकार विल्यम स्टेड यानंही हा प्रश्न उपस्थित केला होता.त्यानं १८८८ साली याच वर्तमानपत्रात एका काल्पनिक अपघाताचं वर्णन केलं होतं.मोठमोठ्या बोटींवर लाइफ बोट्स जर पुरेशा प्रमाणात नसतील आणि ती बोट किंवा जहाज जर अँटलांटिक समुद्रात बुडालं तर काय कहर माजेल अशा आशयाची त्यानं एक गोष्ट रंगवली होती.ती काल्पनिक असली,तरी त्यात लाइफ बोट्सविषयीचा नियम किती तोकडा आहे याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याची ही भीती टायटॅनिकच्या अपघातामुळे लवकरच खरी ठरली.विशेष म्हणजे खुद्द स्टेडही टायटॅनिकमधून प्रवास करत होता.त्यानं अनेक स्त्रिया आणि लहान मुलं यांना लाइफ बोटमध्ये मदतही केली होती.


सगळ्या जीवरक्षक नौका गेल्यावर स्टेड शांतपणे टायटॅनिकच्या प्रथम दर्जाच्या धूम्रपान करायची परवानगी असलेल्या कक्षामध्ये गेला.तिथं एका खुर्चीत शांतपणे बसून "पुस्तक वाचायला" सुरुवात केली.काही मिनिटांतच त्यानं धडपडत एका जीवरक्षक नौकेला धरून ठेवायचा प्रयत्न केला, पण भयानक गारठ्यामुळे त्याच्या पायांमधली शक्ती गेली आणि त्यालाही जलसमाधी मिळाली!


स्टेडसारखे काही प्रवासी मदतीला धावले

स्वतःहून सदस्यांच्या क्रू होते.त्यातलीच एक होती.


" मला हे पुस्तक वाचत असताना या प्रवासातील आश्चर्यकारक घडलेला हा प्रसंग मनहेलावून सोडणारा होता. वमी ही अचंबित झालो."


'अनसिंकेबल मॉली ब्राऊन!' मागरिट ब्राऊन असं तिचं खरं नाव होतं.


जहाजावरच्या इतक्या गोंधळातही ती अत्यंत शांत होती.लोकांना बोटीत चढायला मदत करणं,लोकांना आणि क्रू सदस्यांना धीर देणं तिनं अत्यंत जबाबदारीनं पार पाडलं.खरंतर तीही एक प्रवासीच होती.तरीही तिनं हे सगळं केलं. इतकंच नाही,तर शेवटची बोट निघतानाही ती त्यात बसायला शेवटी तिला जबरदस्तीनं त्यात बसायला लावलं.तरी तिचं सगळं लक्ष जहाजामधल्या प्रवाशांकडे होतं.आपण जहाजाकडे परत जाऊ आणि ज्यांना वाचवणं शक्य आहे त्यांना वाचवू असं तिचं म्हणणं होतं. पण कोणी बोट फिरवायला तयारच झालं नाही. शेवटी तिनं स्वत: सुकाणू हातात घेतला.पुढे काय झालं याबद्दल अनेक मतांतरं आहेत. पण तिनं केलेल्या या धाडसामुळे तिला

 'दि अनसिंकेबल मॉली ब्राऊन' असं नाव पडलं. ती स्वत:फर्स्ट क्लासची प्रवासी असूनही तिनं सेकंड क्लास आणि थर्ड क्लास प्रवाशांसाठी न्याय मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी तिनं एक समितीही स्थापन केली. विशेष म्हणजे 'कॅलिफोर्नियन' चा त्या दिवशीचा कॅप्टन आर्थर हेन्री रॉस्ट्रोन याचा तिनं सत्कारही केला होता.'न बुडणारं जहाज बुडालंच कसं?', 'प्रवाशांना वाचवण्यात कंपनीला यश का आलं नाही?' अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रवाशांच्या नातेमंडळींना आणि सगळ्या जनतेला हवी होती.या सगळ्या घटनाक्रमातून अनेक धक्कादायक बाबीही समोर आल्या. एरवी मे महिन्यात वाहत येणारे हिमनग,त्या वर्षी मात्र एप्रिलमध्ये दिसायला लागले होते.त्यांचं प्रमाणही एरवीपेक्षा जास्त होतं.टायटॅनिकच्या पुढे प्रवास करणाऱ्या अनेक जहाजांना ते दिसतही होते. 'टायटॅनिकच्या मार्गात हिमनग आहेत' याची कल्पना देणारे आणि टायटॅनिकच्या कॅप्टनला सावध करणारे अनेक संदेश टायटॅनिकच्या टेलिग्राफ ऑपरेटर्सना सतत मिळत होते.पण ते टायटॅनिकच्या कॅप्टनपर्यंत पोहोचलेच नाहीत! 'कॅलिफोर्नियन'लाही असे संदेश मिळाले होते आणि या संदेशांमुळे त्यांनी आहे तिथंच थांबायचा निर्णय घेतला होता. पण टायटॅनिकनं मात्र आपला प्रवास थांबवला नाही.विशेष म्हणजे टायटॅनिकला 'कॅलिफोर्नियन' ही सावध करायचा प्रयत्न केला होता.पण त्या वेळी ड्युटीवर असलेला फिलिप नावाचा ऑपरेटर प्रवाशांचे संदेश देण्याघेण्यात व्यस्त असल्यामुळे 'कॅलिफोर्नियन' ऑपरेटरवर चक्क ओरडला होता.या संदेशाचं गांभीर्य तेव्हा जाणवलं नाही याचं आणखीन एक कारण म्हणजे त्या संदेशाची सुरुवात 'एम.एस. जी. 'नं केलेली नव्हती. जहाजाच्या कॅप्टनसाठीचे संदेश हे 'एम.एस.जी' म्हणजेच 'मास्टर्स सर्व्हिस ग्राम' या अक्षरांनी करणं महत्त्वाचं असायचं.त्यामुळेच हा संदेश उगाचच वायफळ संदेश आहे असं वाटल्यामुळेच फिलिपला तो संदेश कॅप्टनला देण्याची गरज वाटली नाही.जेव्हा टायटॅनिक अडचणीत सापडलं,तेव्हा मात्र फिलिपनं 'कॅलिफोर्नियन'ला बरेच एस.ओ.एस. (S.O.S.) सिग्नल्स पाठवले होते. ज्या टेहळणी खांबावरून ते हिमनग दिसले,तिथं बायनोक्युलर्सच नव्हते.रात्रीची वेळ असल्यामुळे समुद्रही शांत होता.त्यामुळे ते हिमनग दृष्टिपथात येईपर्यंत उशीर झाला होता. लाइफ बोट्सची संख्या तर कमी होतीच,पण त्या 


पाण्यात उतरवायच्या कशा याबद्दलचं प्रशिक्षण आणि तालीम दिली गेली नव्हती.टायटॅनिक बेलफास्टहून निघायच्या आदल्या दिवशी ते होणार होतं, पण ते प्रशिक्षण चक्क रद्द केलं गेलं. 


एकूण या अपघातानंतर अनेक वर्षांनी या जहाजाचे अवशेष मिळाले.संपूर्णपणे गंज चढलेल्या अवस्थेतही हे जहाज आपल्या सौंदर्याचा पुरावा देत होतं.या अवशेषांमध्ये चीज तसंच वाइनच्या बाटल्याही सापडल्या होत्या.


जेम्स कॅमेरून या अमेरिकन दिग्दर्शकानं या अपघातावर १९९७ साली 'टायटॅनिक या नावाचा सुंदर चित्रपट बनवला होता.यातल्या काही गोष्टी काल्पनिक असल्या तरी बऱ्याच गोष्टी अभ्यासपूर्वक चितारल्या होत्या.विशेषत: अपघात आणि अपघातानंतरची भयानकता दाखवण्यात आणि त्याचा प्रेक्षकांवर आघात करण्यात कॅमेरून यशस्वी ठरला. 


ऑलिम्पिक आणि ब्रिटॅनिक या जहाजांचं पुढे काय झालं? ही दोन्ही जहाजंही आकाराने मोठीच होती.टायटॅनिकच्या आधी ऑलिम्पिकनं समुद्रात सेवा द्यायला सुरुवात केली होती.एक अपघात सोडला तर या जहाजानं यशस्वी सेवा दिली.१९३० साली हे जहाज स्क्रॅप केलं गेलं. ब्रिटॅनिक हे टायटॅनिकपेक्षाही देखणं बनवायचा निर्णय टायटॅनिक बनवतानाच घेतला गेला होता. त्यात टायटॅनिकपेक्षा जास्त सुविधाही असणार होत्या.पण नेमकं पहिलं महायुद्ध  सुरू झाले आणि ब्रिटॅनिकमध्ये चक्क हॉस्पिटल बनवावं लागलं.जिथं कोरीव खांब उभे राहणार होते, जिथं मऊ गालिचे अंधरले जाणार होते,जिथली सजावट एखाद्या राजमहालाला लाजवेल अशी केली जाणार होती तिथं सैनिकांच्या जखमा बऱ्या करायला हॉस्पिटलच्या खाटा आणि औषधं ठेवली गेली.ब्रिटॅनिक जर ठरल्याप्रमाणे तयार झालं असतं,सगळं सुरळीत झालं असतं तर कदाचित ब्रिटॅनिकचं नाव 'पाण्यात तरंगणारा आलिशान राजमहाल' असं कोरलं गेलं असतं! विशेष म्हणजे ब्रिटॅनिकाचा अंतही टायटॅनिकसारखाच झाला.तीही बुडाली.पण शत्रूशी लढता लढता !!


गंमत म्हणजे या तिन्ही जहाजांच्या अपघातातून एक महिला दरवेळी बचावली होती.तिला


 'मिस अनसिंकेबल' असंच नाव पडलं होतं. व्हायोलेट जेसोप (Violet Jessop) असं या महिलेचं नाव होतं. 


यातल्या दोन जहाजांवर ती स्टीवर्ड म्हणून आणि तिसऱ्या जहाजावर नर्स म्हणून कामाला होती. लहानपणापासूनच ती अनेकदा मरता मरता वाचली होती.१९१० साली वयाच्या २१व्या वर्षी ती व्हाईट स्टार कंपनीत स्टीवर्ड म्हणून कामाला लागली.१९११ साली ऑलिम्पिक जहाजावर तिची नेमणूक झाली.२० सप्टेंबर १९११ रोजी हे जहाज बंदरावरून निघालं तेव्हा काही अंतरावरच त्याची ब्रिटिश युद्धनौकेशी टक्कर झाली.ऑलिम्पिकचं नुकसान झालं असलं तरी ते सगळ्या प्रवाशांना सहीसलामत घेऊन बंदरावर परतू शकलं होतं.त्यानंतर तिची टायटॅनिकमध्ये नेमणूक झाली.लाइफ बोट्समध्ये बसवायचं काम चालू असताना तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टायटॅनिकमध्ये काहीजण इंग्लिश भाषक नव्हते, त्यामुळे इंग्लिशमध्ये दिल्या गेलेल्या सूचना त्यांना समजणं शक्य नव्हतं.अशांना खाणाखुणा करून सूचना सांगणं आणि त्याचं पालन होतं आहे की नाही हे पाहणं ही तिची जबाबदारी होती. शेवटची लाइफ बोट निघताना तिलाही त्यात बसण्याची सूचना दिली गेली.ती बसत असतानाच तिच्या हातात एक लहान बाळ दिलं गेलं.जहाजात सगळा कल्लोळ माजला होता. त्यामुळे कोणाचं कोण कुठं आहे याचं भान कुणालाच नव्हतं.याच भानगडीत कुणाचं तरी हे बाळ एका क्रू मेंबरच्या हाती लागलं. त्या बाळाचे आईवडील शोधत बसण्यासाठी वेळ नव्हता. म्हणून त्यानं ते बाळ सरळ जेसोपकडे सोपवलं. त्याचं पुढे काय याचा विचार कुणाच्याच मनाला शिवला नव्हता. कारण जीव वाचणं हा एकमेव उद्देश होता. तोही वाचेल की नाही याची अजूनही शाश्वती नव्हतीच. कॅलिफोर्नियननं या सगळ्यांना आपल्या जहाजात घेतलं.तेव्हाही हे बाळ जोसेपच्या मांडीवर होतं.सगळ्यांनाच मानसिक धक्का बसलेला होता.तशीच जोसेपही धक्क्यात होती.शून्यात बघत असतानाच एक बाई अचानक आली आणि जेसोपच्या मांडीवरचं बाळ घेऊन झटकन निघून गेली. 'ती बाई या बाळाची आई असेल का? आणि असलीच तर तिनं एक चकार शब्द उच्चारायचेही कष्ट कसे घेतले नाहीत?' असा विचार तिच्या मनात चमकून गेला.पण सगळ्यांची मनोवस्था बिकट होती. म्हणून जेसोप तो प्रसंग विसरून गेली.


दोनदा जीव जाता जाता वाचला असला तरी जेसोप डगमगली नाही.'ब्रिटॅनिका' या आता हॉस्पिटल झालेल्या जहाजात ती कामाला लागली.२१ नोव्हेंबर १९१६ रोजी जहाजात अचनाक धमाका झाला आणि अवघ्या ५७ मिनिटांत या जहाजानं जलसमाधी घेतली.यात ३० जण ठार झाले.पण जेसोप याही वेळी बचावली.ती आणि काही जण लाइफ बोटीत चढले.पण अचानक जहाजाचा प्रोपेलर त्या लाइफ बोटीवर आदळणार असल्याचं लक्षात आल्यावर तिनं लाइफ बोटीमधून उडी मारली. तरीही तिच्या डोक्यावर प्रोपेलरचा एक भाग आदळला आणि ती जबर जखमी झाली.जखम गंभीर असूनही ती त्यातून बचावली आणि नंतर आणखीनही जहाजांवर आपली सेवा दिली. निवृत्त झाल्यावर एका लहानशा खेड्यात तिनं आपलं उर्वरित आयुष्य शांतपणे घालवत असतानाच तिला एकदा एक फोन आला.'मीच ते बाळ' असं समोरच्यानं तिला सांगितलं.काही विचारायच्या आतच तो फोन कट झाला.तिला तो मुलगा भेटायलाही आला आणि त्यानं तिला आपल्या आईच्या वतीनं धन्यवाद दिल्याचाही काही जण दावा करतात.काही असो,पण तिच्या हातून एका जिवाला जीवनदान मिळालं होतं हे नक्की.मृत्यूला सतत हुलकावण्या देणाऱ्या या 'मिस अनसिंकेबल'चा वयाच्या ८३ व्या वर्षी अखेर मृत्यू झाला तो हृदयविकारामुळे! 


'अनसिंकेबल्स'च्या यादीत एक नाव घेतलं जातं. ते नाव म्हणजे ह्यु विलियम्स (Hugh Williams)! याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसली तरी हा योगायोग फारच मजेशीर आहे. १६६४ साली वेल्स जवळच्या समुद्रात एक बोट बुडाली होती.त्यात जवळपास ८१ प्रवासी ठार झाले होते,तर काही जण बचावले होते. वाचलेल्यांपैकी एकाचं नाव होतं-ह्यु विलियम्स. 


जवळपास १०० वर्षांनी त्याच ठिकाणी आणखीन एक बोट बुडाली.त्यात ६० जण ठार झाले.बचावलेल्यांपैकी एकाचं नाव होतं ह्यु विलियम्स. १८२० सालीही त्याच ठिकाणी आणखीन एक बोट बुडाली. त्यातही बचावलेल्यांपैकी एकाचं नाव ह्यु विलियम्स होतं !! जागा आणि वाचणाऱ्याचं नाव यांच्या या योगायोगाला काय म्हणावं?


उत्क्रांत होण्यामध्ये माणूस घडवण्यामध्ये या पुस्तकांचे 'असणं ' अतिशय महत्त्वपूर्ण आहे.वाचलेली पुस्तके,न वाचलेली पुस्तके हया पुस्तकांच्या निर्मिती मागे सर्वांचे,लेखकांचे प्रकाशकांचे मनस्वी आभार! आपण सर्वंजण या पुस्तकांचे ऋणी असलो पाहिजे.पुस्तकांचे उपकार सदैव आपल्यावरती राहतील..


'प्रवास' या पुस्तकातील २९.१२.२०२२ मधील टायटॅनिक या कथेतील ही शेवटची कथा..



३१/१२/२२

आता आपण पाहू टायटॅनिक…

१० एप्रिल १९१२! इंग्लंडमधल्या साऊथहँम्पटनच्या बंदरावर हजारो लोकांची गर्दी जमली होती.एक मलंमोठं जहाज रवाना होणार होतं.त्यातले प्रवासी आणि क्रू मेंबर्स तसंच त्यांना सोडायला आलेले त्यांचे नातेवाईक हे तर तिथं जमले होतेच,शिवाय अनेकजण एका खास घटनेचा साक्षीदार होण्यासाठीही जमले होते.सगळीकडे उत्साह संचारला होता.कारणही तसंच होतं.


हे जहाज काही साधंसुधं नव्हतं.प्रचंड मोठं,अतिशय देखणं,सुखसुविधांनी भरलेलं आणि मुख्य म्हणजे 'न बुडणारं (अनसिंकेबल)' असं हे जहाज होतं,असं जहाज याआधी कधीच कुणी बनवलंही नव्हतं आणि बघितलंही नव्हतं.या जहाजाचं नाव होतं 'आर. एम. एस. टायटॅनिक ! 'टायटॅनिक' नुसतं एक जहाज नव्हतं.ते एक स्वप्न होतं.'अनसिंकेबल','ड्रीम शिप' अशा अनेक उपाधी लागलेलं एक स्वप्न.या जहाजाची शोकांतिका आजही अस्वस्थ करते.


इंग्लंडमधल्या 'व्हाईट स्टार लाइन' या कंपनीचं हे जहाज होतं.कुनार्ड' आणि 'व्हाईट स्टार लाइन'या त्या काळच्या ब्रिटनमधल्या सगळ्यात गाजलेल्या कंपन्या.या दोन जहाज कंपन्यांमध्ये प्रचंडच चढाओढ चालायची.


कुनार्डनं १९०६ साली 'लुसीटानिया (Lusitania)'आणि १९०६ साली 'मॉरेटिनिया (Mauretinia)' अशी दोन जहाज सेवेत दाखल केली.या जहाजांनी आपल्या 'वेगानं सगळ्यांची मनं जिंकली.ॲटलांटिक समुद्र अतिशय वेगात पार करून या जहाजांनी एक रेकॉर्डच बनवलं. हे ऐकल्यावर 'व्हाईट स्टार लाइन कंपनीचा चेअरमन जे. ब्रूस इस्मे गप्प बसणं शक्यच नव्हतं. 'व्हाईट स्टार लाइनची जहाजं बनवण्याचं काम आयर्लंडमधल्या बेलफास्ट इथल्या 'हारलँड अँड वॉफ (Harland and Woff)' या जहाज कंपनीकडे होतं.या कंपनीचा मॅनेजर होता विल्यम पिरे (William Pirre). इस्मेनं आपल्या डोक्यातली कल्पना पिरेला ऐकवली.त्यावेळच्या जहाज कंपन्या आपल्या जहाजांचा वेग जास्त कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न करायच्या इस्मे आणि पिरे यांनी मात्र कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशी आलिशान आणि भलंमोठी जहाजं बनवायचं ठरवलं.


१९०९ साली अशा एकूण ३ जहाजांवर काम सुरू होणार होतं.या तीन जहाजांची नावं होती ऑलिम्पिक,टायटॅनिक आणि ब्रिटॅनिक! थॉमस अँड्र्यूज यानं या तिन्ही जहाजांची डिझाइन्स बनवली होती. या जहाजांचा आकार त्या वेळी असलेल्या जहाजांपेक्षा मोठा असणार होता.त्यामुळे त्यांच्या बांधणीसाठी आता असलेल्या गँट्रीज (Gantris) लहान पडणार होत्या.मग आधी ६९ मीटर उंच इतक्या मोठ्या गॅट्रीज बनवल्या गेल्या आणि एका शेजारी एक अशा दोन जहाजांवर काम सुरू झालं.३१ मार्च

१९०९ रोजी ऑलिम्पिक जहाज बांधणीला सुरुवात झाली.त्यानंतर ३ महिन्यांनी टायटॅनिक बांधणीला सुरुवात झाली.३००० कामगार या कामाला लागले.त्या काळातलं सगळ्यात मोठं जहाज बनवायचा प्रयत्न चालू होता.त्यामुळे त्यात सगळंच भलंमोठं आणि वजनदार होतं. त्याच्या एका शिप अँकरचं वजनच मुळी १७५ टन होतं. हे जहाज बनवताना तब्बल ३ लाख खिळ्यांचा (rivet) वापर झाला. इतकं मोठं धूड चालवत न्यायचं म्हणजे इंधनही तितकंच लागणार.त्यासाठी २ मोठे स्टीम इंजिन्स बसवले गेले होते.आणि त्याला ऊर्जा देण्यासाठी २९ प्रचंड मोठ्या बॉयलर्सची सोय त्यात करण्यात आली होती.८८२.५ फूट उंच आणि ९२.५ फूट रुंद असलेल्या या जहाजावर १७५ फूट उंच असे ४ फनेल्स बसवण्यात आले होते.ऑलिम्पिक हे जहाजही आलिशान बनत असलं तरी त्याच्या मानानं टायटॅनिकमध्ये जास्त सुविधा होत्या. स्वीमिंग पूल,स्कॅश आणि टेनिस कोर्ट्स,जिम, टर्किश

बाथ् स,लायब्ररी,स्मोकिंग रूम्स, आलिशान खोल्या,

आलिशान डायनिंग रूम्स,साइडवॉक कॅफेसाठी एक खास डेक वगैरे अशा सुविधा देण्यात येणार होत्या.

ऑलिम्पिकपेक्षा जवळपास १०० एक जास्तीच्या फर्स्ट क्लास केबिन्स होत्या.इतकंच काय,पण या प्रवाशांना किनाऱ्यावरच्या आप्तांबरोबर संदेशांची देवाणघेवाण करता यावी यासाठी मार्कोनी टेलिग्राफ कंपनीचे दोन ऑपरेटर्सही सेवेत तैनात होते.


या जास्तीच्या सुविधांमुळे २६ महिन्यांनी टायटॅनिक तयार झालं,तेव्हा ऑलिम्पिकपेक्षा त्याचं वजन तब्बल १००० टन जास्त भरलं.त्याची निर्मिती होत असतानाच ते चर्चेचा विषय ठरलं होतं.सौंदर्य,भलामोठा आकार आणि आलिशान सुविधा याव्यतिरिक्त टायटॅनिक हे जहाज अजून एका गोष्टीमुळे चर्चेचा विषय बनलं होतं. 


ते कारण म्हणजे कंपनीनं जहाजाबद्दल केलेला अजब दावा.त्यांनी हे जहाज चक्क 'बुडू' च शकणार नाही असा दावा केला होता! यामागे कारणही तसंच होतं.टायटॅनिकच्या खालच्या बाजूला दोन थर होते.त्यातल्या एका थरात १६ मोठाले कप्पे (वॉटरटाईट कंपार्टमेंट्स) बनवले होते.यात पाणी शिरणार नाही अशी सोय करण्यात आली होती.


त्यामुळे वर जहाजाला काहीही नुकसान झालं तरी हे कप्पे बंद केले तर त्यात पाणी शिरणार नाही आणि जहाज बुडण्यापासून वाचेल अशी यामागची संकल्पना होती.वॉटरटाईट कंपार्टमेंट्स थेट जाऊन तसंच वरच्या डेकवरूनही नियंत्रित करता यावेत.यासाठी इलेक्ट्रिकचे दरवाजे बसवले होते.हे दरवाजे एक तर हाताने सरकवता येत होते किंवा जहाजाच्या ब्रीजवर असलेल्या स्वीचनं ते नियंत्रित करता येत होते.वॉटरटाईट कंपार्टमेंट्सच्या संकल्पनेवर कंपनीला पूर्ण विश्वास आणि अभिमानही होता!


टायटॅनिक देखणं करायचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता.अत्यंत सुंदर कोरीवकाम,नक्षीकाम, रंग अशांवर प्रचंड कष्ट घेतले गेले होते.फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना त्यांच्या ४ खोल्यांमध्ये जायला किंवा डायनिंग एरियामध्ये यायला एक अत्यंत देखणा आणि मोठा जिना होता.सुंदर नक्षीकाम केलेला हा जिना म्हणजे टायटॅनिकची शान होती.दिवसा कोणत्याही वेळेला नैसर्गिक प्रकाश येत राहण्यासाठी छपरावर काचेचं डोम तयार केलं होतं. फर्स्ट क्लासच्या प्रवाशांचा डायनिंग हॉलही खास बनवला होता.या हॉलला राजेशाही थाट होता.झुंबरं,गालिचे,

सिल्कचे पडदे,महागडं फर्निचर असं सगळं तर होतंच,शिवाय ऑर्केस्ट्राही होता.सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण,संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण असं सगळ्याची सोय फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी केली गेली होती.त्यांना अनेकदा आपल्या आवडीप्रमाणे पदार्थ मागवता यायचे. सेकंड क्लासच्या प्रवाशांसाठीही अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या.त्या जरी फर्स्ट क्लास प्रवाशांपेक्षा कमी असल्या तरी त्यांनाही आलिशान प्रवासाचा अनुभव घेता येईल इतक्या तरी त्या नक्कीच होत्या. 


थर्ड क्लास प्रवाशांसाठी सेकंड क्लासपेक्षा कमी सुविधा होत्या.पण त्या वेळी इतर जहाजांमध्ये मिळणाऱ्या सुविधांपेक्षा त्या नक्कीच जास्त होत्या.पण फर्स्ट क्लास प्रवाशांना मिळणारा पदार्थ निवडीचा पर्याय या दोन्ही क्लासेसना मात्र नव्हता.एकूणच अशा आलिशान जहाजातून प्रवास करणं हीच मोठी पर्वणी होती.


हे संपूर्ण जहाज तयार व्हायला तब्बल १५०००० डॉलर्स इतका खर्च आला होता ! इतकं भव्य जहाज याआधी कधीच बनलेलं नव्हतं.त्यामुळे टायटॅनिक तयार होण्याआधीच त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.

वर्तमानपत्रांमध्ये त्याविषयी अनेकदा माहिती असायची.एकूणच ब्रिटनमधला प्रत्येकजण या जहाजाविषयी उत्सुक होता.


३१ मे १९११ रोजी पहिल्यांदा पाण्यात उतरलं. हा सोहळा पाहण्यासाठी लाखभर लोक जमा झाले होते.१० एप्रिल १९१२ रोजी २२४० प्रवासी आणि जवळपास ९०० क्रू सदस्यांना घेऊन इंग्लंडमधल्या साऊथहॅम्पटनहून न्यूयॉर्ककडे टायटॅनिक रवाना झालं. अनेक विद्वान,

उद्योजक,मोठे सरकारी अधिकारी, सेलेब्रिटीज इथपासून मध्यमवर्गीय आणि खालच्या वर्गातल्या अनेक जणांचा यात समावेश होता.टायटॅनिकमधले प्रवासी स्वतःला खूपच भाग्यशाली समजत होते.या जहाजाची जबाबदारी जहाज कंपनीचा जुना 


कॅप्टन एडवर्ड स्मिथ याच्यावर सोपवण्यात आली.एडवर्ड स्मिथ श्रीमंतांमध्ये बराच लोकप्रिय कॅप्टन होता.त्यामुळे त्याला 'मिलेनियर कॅप्टन' असंही म्हणत.


पण त्यांची वेळच चुकलेली होती.याचा त्यांना नंतर प्रत्यय येणार होता.टायटॅनिक निघालं खरं,पण काही अंतरावरच ते एका जहाजाला धडकताना थोडक्यात बचावलं आणि पुढे निघालं.


हा प्रवास एकूण आठवड्याभराचा असणार होता.फ्रान्समधल्या चेरबॉग (Cherboug) आणि व्कीन्सटाऊन इथं थांबा घेतल्यावर परत एकदा टायटॅनिक न्यूयॉर्कसाठी रवाना झालं.या वेळी प्रवाशांची/पत्रांची देवाणघेवाणही झाली. एकूण प्रवास छानच चालू होता.प्रवासी प्रवासात रमले होते.कोणी जहाजाच्या सौंदर्याचा,त्यातल्या सुखसुविधांचा आनंद लुटत होते, कोणी संगीताचा,कोणी पदार्थांचा,कोणी गप्पांचा आनंद लुटत होते.मुलं खेळण्यात दंग होती,तर जहाजावरचे कर्मचारी सगळ्यांना सेवा पुरवण्यात.हा सगळा माहोल पाहून कॅप्टनलाही अभिमान वाटत होता.यापुढे काही विपरीत घडणार आहे याची सुतराम शंकाही कुणाला नव्हती. 


१४ एप्रिल १९१२ रोजी रात्री ११:४० वाजता एका लुकआऊटला (क्रू सदस्याला) ओझरता हिमनग दिसला.त्यानं ताबडतोब विल्यम मर्डोकला ही खबर दिली.त्यानं धोका लक्षात घेऊन जहाजाला मागे नेण्याचे आदेश दिले आणि वॉटरटाईट कंपार्टमेंट्सची लिव्हर्स ओढले. या लिव्हरमुळे हे कप्पे बंद होतील असं त्याला वाटलं.ते कप्पे बंद झालेही.पण त्याला उशीर झाला होता.जहाज हिमनगाच्या बरंच जवळ आल्यावर हिमनग दिसल्यामुळे जहाजाचा मार्ग बदलायला थोडा उशीरच झाला होता.हे हिमनग दिसल्यापासून तब्बल ३७ व्या सेकंदाला जहाज त्या हिमनगाच्या जवळ आलं होतं. जहाज त्या हिमनगावर धडकलं मात्र नाही. ते हिमनगाला खेटून पुढे गेलं.त्या धडकेत बर्फाचा काही भाग डेकवर पडला.थोडक्यात बचावलो असं वाटल्यामुळे सगळेच निश्चिंत झाले.पण हिमनगामुळे जहाजाची खालची बाजू अनेक ठिकाणी चिरली गेली आहे हे त्यांच्या लक्षात यायला थोडा उशीरच झाला.या चिरांमुळे ६ वॉटरटाईट कंपार्टमेंट्समध्ये आधीच पाणी शिरलं होतं.या कप्प्यांमध्ये १० मिनिटांत तब्बल ७ फूट पाणी शिरलं होतं. 


खासकरून खालच्या मजल्यावरच्या प्रवाशांना जहाज कशालातरी आपटल्याची जाणीव झाली. त्यानंतर इंजिन्सही थांबल्याचं त्यांच्या आणि काही फर्स्ट तसंच सेकंड क्लासमधल्या प्रवाशांच्या लक्षात आलं.थोड्याच वेळात नेमकी परिस्थिती सगळ्यांच्याच लक्षात आली आणि एकच गोंधळ उडाला.नेमक्या सूचना न मिळाल्यानं या परिस्थितीत काय करायचं तेच कुणाला कळेना.


लाइफ बोट्स होत्या.पण त्या अपुऱ्या होत्या.

२४३५ प्रवासी आणि जवळपास ९०० क्रू सदस्य अशा ३३०० लोकांसाठी केवळ १६ जीवरक्षक नौका (लाइफ बोट्स),२ कटर्स आणि ४ कोलॅप्सेबल बोटी होत्या. तसंच ४० ते ६० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या २० बोटी होत्या. त्यावेळी एका जहाजाला कमीत कमी १४ लाइफ बोट्सची सोय करण्याचा नियम होता.पण टायटॅनिक जहाज इतर जहाजांपेक्षा प्रचंडच मोठं होतं आणि त्यात प्रवाशांची संख्या लक्षात घेता लाइफ बोट्सची संख्या अत्यल्प होती.बोटी घेतल्या तर टायटॅनिकच्या सौंदर्यात बाधा येईल असं निर्मात्यांना वाटत असल्यानं त्यांनी या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. 


या निष्काळजीपणाचा फटका आता प्रवाशांना भोगावा लागणार होता.कुणाला त्या लाइफ बोट्समध्ये बसवायचं याच्या सूचना क्रूला नीटशा मिळत नव्हत्या.आधी फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना या बोटीमध्ये बसवावं असं ठरत होतं.नंतर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमधल्या सगळ्या बायका आणि लहान मुलं यांना वाचवावं आणि पुरुषांनी मात्र तात्पुरतं तरी जहाजातच राहावं असा विचार झाला.पण यातही प्रचंड गोंधळ उडाला.अनेक बोटींमध्ये क्षमतेच्या कितीतरी कमी प्रमाणात प्रवासी भरले गेले. हे होत असताना अनेक कुटुंबं एकमेकांपासून विलग झाली.

काही पुरुष सूचनांचं पालन न करता बोटीत चढले.या सगळ्यात 


थर्ड क्लासच्या प्रवाशांवर मात्र जास्त प्रमाणात अन्याय झाला.त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही.


नंतर काही पुरुषांनाही बोटीत बसवलं गेलं.पण अजूनही अनेक महिला आणि मुलं जहाजात अडकली होती.

त्यांच्यापर्यंत सूचना गेलेल्याच नव्हत्या.हा सगळा गोंधळ चालू असतानाच रात्री २:२० ला टायटॅनिकचे दोन भाग झाले.त्यातला एक भाग पाण्याखाली गेला आणि दुसरा ९० अंशात वर तरंगायला लागला.हे झालं तेव्हा जहाजावर तब्बल १००० प्रवासी अडकले होते!


टायटॅनिक बुडत होतं,तेव्हा अवघ्या १० मैलांवरून मालवाहतूक करणारं 'कॅलिफोर्नियन' हे जहाज जात होतं.टायटॅनिकचे सिग्नल्स त्यांना मिळाले होते.पण टायटॅनिकचा अपघात व्हायच्या काही मिनिटं आधीच कॅलिफोर्नियनमधल्या वायरलेस ऑपरेटरला झोप लागली होती.त्यामुळे हे जहाज वेळेवर मदतीला येऊ शकलं नाही.


…२९ डिसेंबर २०२२ लेखामधील पुढील भाग..



२९/१२/२२

… आणि माणूस म्हणून 'मी' शहारलो..

प्रवास व मानवी जीवन हे संलग्न आहे.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण प्रवास करतच असतो.यातूनच नवीन नवीन शोध लागत गेले आणि माणूस माणसाच्या जवळ आला.असा हा मानवाचा प्रवास अविस्मरणीय व उत्कंठावर्धक आहे.


१४ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक जहाजाची दुर्घटना घडली.त्यानंतर बरोबर ३२ वर्षांनी म्हणजेच १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत एक भयंकर घटना घडली.ही घटना इतकी भयंकर होती,की त्यातून सावरायला कैक वर्षं लागली. खरंतर त्याला दुर्दैवी योगायोगच म्हणता येईल. झालं असं : २४ फेब्रुवारी १९४४ रोजी 'एस. एस.फोर्ट स्टिकाईन' (SS Fort Stikine) हे जहाज इंग्लंडमधल्या बरकेनहेडहून कराचीमार्गे बॉम्बेला (आताचं मुंबई) यायला निघालं.


 या जहाजात सुमारे १४०० टन स्फोटकं आणि दारूगोळा,कापसाच्या हजारो गाठी,करोडो रुपयांचं ३१ लाकडी खोकी भरून सोनं आणि सुमारे १००० लुब्रिकेटेड ऑइलची पिंप,मासे,लाकूड अशा जवळपास सगळ्याच ज्वालाग्राही वस्तू भरल्या होत्या.हे प्रचंडच धोकादायक ठरू शकतं याची जहाजाचा कप्तान अलेक्झांडर नेस्मिथला (Alexandar Neismith) चांगलीच कल्पना होती.त्यानं तशी तक्रारही केली होती,पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. १२ फेब्रुवारी १९४४ रोजी हे जहाज व्हिक्टोरिया डॉक (आताचं मुंबई पोर्ट ट्रस्ट)ला पोहोचलं.

पण त्यातलं सामान उतरवायला सुरुवात झाली ती तब्बल ४८ तासांनंतर ! दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जहाजातून अचानक धूर निघत असल्याचं लक्षात आलं आणि काही कळायच्या आतच जहाजाला आग लागली. ही आग इतकी झपाट्यानं पसरली की जहाजातले ज्वलनशील पदार्थ बाहेर काढायला वेळच मिळाला नाही. सुमारे ९०० टन पाणी फवारलं गेलं तरीही आग आटोक्यात आली नाही.सगळीकडे काळ्याकुट्ट धुरामुळे काहीच दिसत नव्हतं.४ वाजून ०६ मिनिटांनी एक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला आणि काही वेळातच दुसरा महाभयंकर स्फोट झाला.पहिल्या स्फोटानंतर बॉम्बे पोर्टवरच्या टॉवरवर लावलेलं घड्याळ बंद पडलं होतं

आणि ते वेळ दाखवत होतं ती ४.०६ ! कोणालाच काही कळत नव्हतं.त्या वेळी दुसरं महायुद्ध सुरू असल्यानं काहींना तर हा जपाननं केलेला हल्ला तर नाही ना असा संशय आला


त्यातून झालेलं नुकसान प्रचंडच मोठं होतं.नुसतं या जहाजाचंच नाही,तर जहाजाच्या आसपासच्या इमारती आणि बंदरात उभी राहिलेली इतर जहाजं यांचंही नुकसान झालं. ८००० टनांपेक्षा जास्त वजन असलेल्या या जहाजाचे अक्षरशः दोन तुकडे झाले आणि ते उडून जमिनीवर पडलं.या स्फोटाचा आवाज ८० किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.१२ चौरस किमी अंतरावरच्या दारं-खिडक्यांच्या काचा फुटल्या.एवढंच नाही तर तब्बल १७०० किमी दूर असलेल्या सिमल्यातल्या भूकंपमापक यंत्रामध्येसुद्धा या स्फोटाची नोंद झाली ! १२०० हून अधिक लोक यात मृत्युमुखी पडले होते. या मृतकांमध्ये ६६ अग्निशमन दलाचे जवानही होते. या स्फोटामुळे आजूबाजूची १५ हून अधिक जहाजं छिन्नविच्छिन्न झाले. २५०० हून अधिक नागरिक यात जखमी झाले तर सुमारे ८०००० हून अधिक लोक बेघर झाले.आजूबाजूच्या ५०००० टनांहून अधिक राडारोडा पसरला होता. जहाजातल्या ३१ खोक्यांमध्ये सोनं होतं.२५ किलोची एक याप्रमाणे ४ विटा प्रत्येक खोक्यात होत्या.त्यासुद्धा शहरात अनेक ठिकाणी उडून पडल्या.त्यापैकी काही विटा तर अगदी अलीकडे म्हणजे २०११ मध्ये सापडल्याचं म्हटलं जातं.तसंच स्फोटात ५०००० टनांहून अधिक अन्नधान्यही झालं.या स्फोटाची बातमी पहिल्यांदा जपानमधल्या सैगॉन रेडिओ केंद्रानं दिली असं म्हटलं जातं.दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळे आणि बातम्यांवर बंधनं असल्यानं ही बातमी देण्याची परवानगी वार्ताहरांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मिळाली. 'टाइम मॅगेझीन' मध्ये तर ती २२ मे १९४४ रोजी छापली गेली तोपर्यंत बाहेरच्या जगाला याबद्दल फारसं माहीतही नव्हतं! 


या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ६६ अग्निशमन दलाच्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थं १४ ते २१ एप्रिल हा आठवडा 'नॅशनल फायर सेफ्टी वीक' (National Fire Safety Week) म्हणून साजरा केला जातो.तसंच मुंबईतल्या भायखळा इथल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयात या जवानांचं स्मारकसुद्धा बनवलं आहे.


भारताला हादरवणारी आणखीन एक मोठी घटना १९४७ साली घडली.१७ जुलै १९४७ रोजी भारतातली सर्वात भयंकर जहाज दुर्घटनांपैकी एक असलेली रामदास या बोटीची दुर्घटना घडली.देश तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या उंबरठ्यावर उभा होता आणि महिनाभरात देशाला स्वातंत्र्य मिळालंसुद्धा.या सर्व धामधुमीत ही दुर्घटना काहीशी दुर्लक्षित राहिली.सुमारे ११०० फुटांपेक्षा लांब आणि ४०० टनांपेक्षा जास्त वजन असलेली ही बोट स्कॉटलंडमध्ये बनवली गेली होती आणि १९४२ नंतर तिची मालकी 'इंडियन स्टीम नेव्हिगेशन कंपनी कडे होती.


१७ जुलै १९४७ रोजी ही बोट रायगड जिल्ह्यातल्या रेवस इंथं जाण्यासाठी सकाळी ८ वाजता भाऊच्या धक्क्यावरून रवाना झाली.त्या दिवशी दीप अमावास्या (ग्रामीण भाषेत गटारी अमावास्या) होती.मुंबईतले अनेक चाकरमानी अलिबाग,मुरुड अशा आपापल्या गावी निघाले होते.सकाळी निरभ्र असणारं आभाळ बोट समुद्रात ८-९ किलोमीटरवर जाईपर्यंत भरून आलं आणि थोड्याच वेळात वादळी वारा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.त्यावेळी ही बोट मुंबईजवळच काश्याच्या खडकाजवळ होती.समुद्रात महाकाय लाटा उसळल्या आणि बोटीत पाणी शिरून ती कलंडली.ज्यांना पोहता होतं ते किनाऱ्याच्या दिशेनं पोहायला लागले.काहींच्या हाताला सेफ्टी बोट लागली.पण अनेक दर्दैवी लोक बुडून मृत्युमुखी पडले.काही वेळानं मासळी भरलेल्या मच्छीमारांच्या नौका रेवसहून मुंबईकडे निघाल्या तेव्हा त्यातल्या मच्छीमारांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले.

तरीही बोटीत असलेल्या अंदाजे ७५० लोकांपैकी सुमारे ६९० लोकांना जलसमाधी मिळाली.


'रामदास बोट दुर्घटना' ही काही भारतातली एकमेव बोट दुर्घटना नव्हती.त्याआधी सुमारे २० वर्षांपूर्वी अशीच एक हादरवून टाकणारी दुर्घटना घडली होती. ११ नोव्हेंबर १९२७ रोजी 'एस. एस. जयंती' आणि 'एस. एस. तुकाराम' या दोन बोटींचा एकाच दिवशी एकाच वेळी आणि एकाच मार्गावर लागोपाठ अपघात झाला होता.


याआधी ८ नोव्हेंबर १८८८ रोजी जुनागढ जवळ असाच एक बोटीचा अपघात झाला होता. मुंबईतल्या दहिसरमध्ये राहणाऱ्या हाजी कासम या जमीनदाराच्या मालकीची 'एस. एस. वैतरणा' ही बोट गुजरातमधल्या कच्छ भागातल्या मांडवीमधून सुमारे ५२० प्रवासी घेऊन निघाली. त्यानंतर द्वारकेला अजून काही प्रवासी बोटीत चढले.१०००च्या आसपास प्रवासी या बोटीत असल्याच म्हटलं जातं.त्यात १३ लग्नाची वऱ्हाडं आणि मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुंबईला जाणारे अनेक विद्यार्थीसुद्धा होते.

'विजली ' या टोपणनावानं ओळखलं जाणारं हे जहाज एका भीषण वादळात सापडलं आणि त्यातल्या सगळ्या प्रवाशांना जलसमाधी मिळाली!


प्रत्येक जहाजाच्या नावाच्या सुरुवातीला 'एस.एस.',

'पी.एस','आरएमएस','एचएमएस' अशी अक्षरं जोडलेली असतात हे नेमकं काय आहे? यांना 'प्रीफिक्स' असं म्हणतात. या प्रीफिक्सेसमधून त्या जहाजाचा प्रकार कळतो. म्हणजे पूर्वी वाफेच्या इंजिनाची जहाजं असायची, त्यांच्यात 'एस.एस.' म्हणजे 'स्टीम शिप',

'पी.एस.'म्हणजे 'पॅडलर शिप', 'एम. व्ही' म्हणजे 'मर्चंट व्हेसल्स','आर.व्ही.' म्हणजे 'रीसर्च व्हेसल्स',

'एम.एस.व्ही.'म्हणजे 'मल्टिपर्पज व्हेसल',

'एच.एम.एच.एस' म्हणजे 'हर / हिज मॅजेस्टिज हॉस्पिटल शिप','आर.एम.एस.' म्हणजे 'रॉयल मेल शिप' वगैरे कामाप्रमाणे आणि जहाजाच्या प्रकार यांच्यानुसार नावं दिली जातात.तर अनेक देशांनुसारही हे प्रीफिक्सेस दिली जातात.उदा.,अल्जेरिया- 'ए.एन.एस.' म्हणजे 'अल्जेरियन नेव्ही शिप',फिनलंड - 'एफ.एन.एस.' म्हणजे 'फिनलंड नेव्ही शिप', भारत- 'आय.सी.जी.एस.' म्हणजे 'इंडियन कोस्ट गार्ड शिप' आणि 'आय.एन.एस.' म्हणजे 'इंडियन नेव्हल शिप' वगैरे.


जाणून घेवू 'प्रवास' या पुस्तकातील आपल्याला उत्क्रांत करणारा प्रवास…


लेखक - 

अच्युत गोडबोले 

आसावरी निफाडकर 


मधुश्री पब्लिकेशन

प्रकाशक - शरद अष्टेकर


२७/१२/२२

जगणं सुंदर आहे हे सांगणारं,व मृत्यूवर प्रेम करायला लावणारं जिवाभावाचं पुस्तक...!

मृत्यू सुंदर आहे?


मृत्यू फक्त नकारच नाही. मृत्यू त्यापेक्षा भरपूर काही आहे,हे कधी तरी समजून घ्यावं लागेल !


मृत्यूला सुंदर म्हणता येईल? त्याला सुंदर करता येईल?


हे प्रश्न तसे अवघडच. पण ते आपणाला आपल्या हृदयावर झेलावे लागतीलच! हे प्रश्न गडद करण्यापेक्षा त्यांच्या उत्तरासाठी सुरुवात तर करावी लागेल !


हे पुस्तक कदाचित निर्णायक उत्तर देणार नाही,पण निर्धारक सुरुवात मात्र निश्चितच करेल.


 हे पुस्तक मृत्यू मांडते,जगणंही मांडते.


भयमुक्त मृत्यूसाठी मृत्यूसाक्षरता,मृत्यूजागरूकता आवश्यक असते.ह्या पुस्तकाचा जन्म खरं तर त्या दिशेने चालण्यासाठी आहे,एवढे मात्र निश्चितच या पुस्तकाबाबत सांगता येईल."मराठीतले या विषयावर हे पहिले वहिले पुस्तक...!


या पुस्तकातील शेवटाचे मलपृष्ठ जगण्याबाबत सांगणार व त्याचबरोबर न चुकता मृत्यू ही आनंदी करणारं..!


मी लहान असताना एका इमारतीचे बांधकाम सुरू होते.या इमारतीवर काम करणार्‍या मजुरांची लहान लहान मुले दररोज सकाळी जरा लवकरच आगगाडीचा खेळ खेळायची त्या खेळाचा आवाज यायचा,सिग्नल देण्याचा आवाजही न चुकता जोडीला असायाचा.असा हा खेळ दररोजच रंगात यायचा.या खेळाचं निरीक्षण एक चिकिस्तक व्यक्ती करत होते.सात दिवस त्यांनी हा खेळ पाहिला आठव्या दिवशी ते त्या मुलांना भेटायला गेले.तर या खेळामध्ये बदल व्हायचे.तो बदल म्हणजे आज जो मुलगा डब्बा आहे.तो उद्या इंजिन व्हायचा प्रत्येक मुलगा आळीपाळीने इंजिन व्हायचा पण एकच मुलगा असा होता जो डब्बा होता नव्हता आणि इंजिनही होत नव्हता.तो नेहमीच सिग्नल माणुस असायचा.ती व्यक्ती या सिग्नल मुलग्या जवळ गेली व त्यांनी त्याला प्रश्न विचारला. 'बाळ तू सोडून बाकी सर्व मुले आळीपाळीने रेल्वेचा डब्बा व इंजिन बनतात.तुला डबा किंवा इंजिन बनायला आवडत नाही का ?' त्या मुलाने जीवन जगण्याचे एक तत्व सांगितले.तो मुलगा म्हणाला," 


रेल्वेचा डबा किंवा इंजिन बनण्यासाठी अंगामध्ये शर्ट असावा लागतो.त्या शर्टाला धरूनच इंजिन किंवा डबा होता येत.आणि माझ्याकडे शर्टचं नाही?" 


हे उत्तर देताना त्याचे डोळे लकाकले व तो नम्रपणे म्हणाला,माझ्याकडे शर्ट नाही पण या खेळातील सर्व आनंद घेतो.कारण माझ्या परवानगीशिवाय संपूर्ण आगगाडी जाग्यावरुन हलूच शकत नाही.उद्या माझ्याकडे भरपूर शर्ट असतील पण तरीही मी सिग्नल माणूसच होणार.कारण हे मला मनापासून आवडतं हे उत्तर ऐकून त्या व्यक्तींने त्याचे आभार मानले .


प्रत्येकाचे लहानपणं हे संघर्षातून जात असते. त्यातूनच जीवन जगण्याची उर्मी जागृत होते.जीवनावर श्रद्धा बसते.मग आपण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करतो.


कष्ट करून घाम गाळून जीवनामध्ये उभं राहावं लागतं.शारीरिक कष्टाचे कामे करीत असताना.दम लागतो,वेदना होतात.तरीही आपण जीवन आनंदी जगण्याचा प्रयत्न करतो.


अशी काम करत असताना आपला श्वास या भूतलावरील सर्वात मूल्यवान श्वास आहे याची कधी जाणीव झालीच नाही.


परवा मृत्यू सुंदर आहे? या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती यांना भेटण्याचा व यांच्याशी बोलण्याचा योग आला.आमच्या भेटीतून संवादातून जीवन,

जीवनातील हेतू,आपलं या पृथ्वीतलावरील स्थान,अशा गहन व जटिल जीवनातील चढ उतारांवर चर्चा झाली.


 या चर्चेतून डॉक्टर साहेबांनी केलेला अभ्यास, चिंतन-मनन,स्वतःला स्वतःकडून नियंत्रित करणारे व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. 


धीर गंभीर नेहमीच शुन्यामध्ये विचार करणारे पण प्रेमाने सोबत घेऊन सत्य सांगणारे,व्यक्तीच्या सोबत जाणारे त्याला कधीही एकटे न सोडणारी ही व्यक्ती मला जगावेगळी वाटली.यावेळी त्यांनी मला मृत्यू सुंदर आहे? हे पुस्तक प्रेमपूर्वक भेट स्वरूप दिले.


जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आपण मरणारच हे मी लहानपणापासून ऐकत आलो आणि वाचत आलो.एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली.दुःखद प्रसंग घडला.शारीरिक वेदना वाढली. तरी या सर्वातून सुटका होण्यासाठी अस्वस्थतेतून मरण आलं तर बरं होईल.असं काही वेळा सुद्धा बोललं जातं.मृत्यू न समजून घेता यावर भाष्य केलं जातं.


बऱ्याच महिन्यापूर्वी मला निमोनिया झाला होता.शारीरिक दुःख, रक्तदाब वाढलेला त्यात सोबत आसपास पाहिलेले जिवंत मृत्यू,झोप लागायची बंद झाली.आणि मीही मरणार ही भीती वाढीला लागली.यादरम्यान मी जगण्यापेक्षा मृत्यूचा विचार जास्त करायला लागलो.मी मेलो म्हणजे सगळंच संपलं.हताश झालो,बरा झालो घरी काही दिवस विश्रांती घेतली.कामावर रुजू झालो.पुन्हा मृत्यू चा विसर पडला. पुन्हा मागील पानावरील जीवन पुढील पानावर घेतले.पुस्तक वाचत होतो.जीवन पुन्हा नव्याने समजून घेत होतो.


मृत्यू सुंदर आहे हे पुस्तक वाचायला घेतले.या ठिकाणी बुद्ध म्हणाले,


तुम्ही स्वतः च स्वतःला शरण जा आणि स्वतः प्रज्ञा-व्दिप बना. कुणावरही विसंबून राहू नका.नाहीतर तुम्ही शोक आणि निराशा यांच्या भोवऱ्यात सापडाल. 


माझ्यासाठी हे पुस्तक हा विषय अतिशय वेगळा होता,चौकटीच्या बाहेर नेणारा होता,मृत्यूकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यास भाग पाडणारा हा वाचन प्रवास सुरू झाला होता.अतिशय उच्च कोटीचे तत्त्वज्ञान,सत्य शोधण्यासाठी केलेले प्रयास या सर्वांची मनापासून जाणीव होत होती.


मरण माझे मरोन गेले | मज केले अमर ||


पुसिले बुड पुसिले वोस | वोसले देहभाव ||


आला होता गेला पूर || धरिला धीर जीवनी ||


तुका म्हणे बुनादीचे | जाले साचे उजवणे ||


- तुकाराम ( तु.गा.२३३८)


वाचत असताना पुस्तक अवघड जात होते. वेळच्या वेळी लेखकांना फोन करून चर्चा करत होतो.डॉक्टर साहेब ही मनापासून मला समजेल अशा सोप्या भाषेत समजून सांगत होते.म्हणूनच हे पुस्तक समजून घेण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.


शारीरिक इजा वेदना झाली की मला मृत्यू आठवायचा,पण हे पुस्तक वाचत असताना माझ्या मध्ये सूक्ष्म पण अमुलाग्र बदल होत होता.


पान नंबर ६७ व ६८ वाचत असताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.


चुंदाच्या घरी घेतलेल्या भोजनानंतर त्या रात्री बुद्धांच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्या रात्री त्यांना शांत झोप येऊ शकली नाही. त्या रात्री ते तडफडत राहिले. त्या तशा अवस्थेतही त्यांनी कुशिनाराच्या दिशेने प्रवास सुरु केला.पोटात भयानक वेदनांचा महाकल्लोळ आणि त्यातच अतिसारामुळे शरीर कोरडे,शुष्क झालेले. त्यामुळे वाटेतच एका वृक्षाखाली विश्रांती घ्यावीच लागली.अतिसारामुळे शरीर कोरडे पडलेले; प्रचंड तहान लागलेली.त्यामुळे अस्वच्छ असलेले पाणी त्यांना प्यावे लागले. पाणी प्राशन केल्यानंतरही त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे बुद्ध पुन्हा तिथे आडवे होतात.जीर्ण वस्त्र बदलण्यासाठी त्यांना आनंदचा आसरा घ्यावा लागतो.ही सर्व वर्णने त्यांच्या देहाला किती पीडा होत होती, त्याची साक्ष देतात.


त्या तशा अवस्थेतही ककुथ नदीवर ते स्नान करतात आणि पुन्हा पाणी पिऊन घेतात. त्यानंतर त्यांना पुन्हा विश्रांती घ्यावी लागते. या सर्व गोष्टींचा पुन्हा उल्लेख करायचे कारण म्हणजे शरीर आजारी असताना,तेही अतिसाराने,बुद्ध प्रचंड पायपीट करतात.

यातनांनी,वेदनांनी शरीर पोखरले असतानाही समस्त लोकांवरील अमाप मायेपोटी महाकरूणेपोटी त्यांना 'देशना' देत राहतात. आयुष्याचे शेवटचे काही क्षण शिल्लक असताना ते हे करतात हे विशेष महत्त्वाचे !


एकमेकांत गुंतलेली ही दृश्य,नजरेसमोरून हटणार नाहीत ही दृश्ये;त्यांना क्रमांकही देता येणार असे क्षण,प्रचंड घालमेलीचे पण तसेच मनाला सुंदर बनवणारे क्षण ! एकाच वेळी आनंद आणि दुःख देणारे महाक्षण !


... बुद्धांच्या आयुष्याची सायंकाळ आणि त्या वेळी त्या आसमंतात उभी ठाकलेली सायंकाळ.कुशीनाराच्या सुंदर मनात,फुललेल्या त्या दोन साल वृक्षांच्यामध्ये वेदनांनी घायाळ होऊन सुद्धा,शरीर शुष्क होऊन गेलयं तरी,

मुखावरचे मंदस्मित पांघरलेला बुद्ध नजरेसमोरुन हटत नाही.सोबत संपत चाललेले आयुष्य आणि कोमजते शरीर यांच्या साथीने बुद्ध त्या सालवृक्षाखाली बहरत चाललेत. ते बहरणे शरीराचे की मनाचे ? माहित नाही. कदाचित ते बहरणे दोन्हीचेही.


बुद्ध नावाच्या दृष्टीला आणि द्रष्ट्याला वसंत ऋतु येण्यापूर्वीच साल वृक्ष बहरलेले दिसतात. त्या साल वृक्षांच्या पाकळ्या तथागत आणि भिक्खुंचे चीवर यांच्यावर शिडकाव करत आहेत.सूर्याची सुंदर लालिमा,साल वृक्षांच्या फांद्यांमधून गात्रे शीतल करणारी मंद हवा,तथागतला हे प्रिय आहे,आनंदी करणारे आहे.. असे असंख्य उद्गार बुद्धांच्या मुखातून,दुःखाच्या गडद छायेत हळवे बनवून बसलेला भिक्खू संघ‌,वरील उद्गार एकूण त्यांच्या मनाचे त्यांच्या हृदयाचे काय होत असेल? तेही फुलत होते की आणखी काय होत होते? तिथे उमटलेल्या त्या दृश्यांचे वर्णनच करता येणार नाही..


कोमजलेल्या बुद्धांचे फुलत चाललेले दृश्य एकीकडे आणि त्या तिकडे वृक्षांच्या गर्दीत दडपून,कोमेजून गेलेले;बुद्धांची आत्तापर्यंत सावली असलेले भन्ते आनंद रडत आहेत.. ते रडणे खरे रडणे आहेच.


मानवी संवेदनशील मनाला पिळ पाडणारा तसाच हा आक्रोश ! उजेडाचा अंधार होतानाची ती घालमेल,ती धास्ती सुंदरतेचा शेवट हृदय पिळवटणारा असतोच. आनंदाचे तेच झालेय..


आनंद दिसत नाही,कुठे आहे तो ? तथागताची नजर व्याकुळ बनतेय,आनंदासाठी.आनंदांना त्यांनी आरपार बघितलंय.त्यांची बलस्थाने, त्यांची मर्मस्थाने त्यांना माहीत आहेत.भूतकाळ आणि भविष्यकाळातील कोणत्याही संबोधी प्राप्त गुरुला आनंदापेक्षा अधिक प्रतिभासंपन्न आणि निष्ठावंत सहाय्यक मिळू शकणार नाही,असा आनंदाचा बुद्ध गौरव करतात.त्याची मुक्तता व्हावी,अर्हपतपद प्राप्त व्हावे यासाठी बुद्धांचे सम्यक मनसुद्धा अपार चिंताक्रांत आहे..


... समजावणारे बुद्ध आणि त्यांचा योग्य अर्थ समजणारे आनंद.त्यांना नव्याच व्यथेने ग्रासलेय. मातीने बनविलेल्या झोपडींचा एक छोटासा कसबा असलेल्या कुशनगरीत तथागतांनी शरीराचा त्याग करू नये,असे त्यांना वाटते. त्यासाठीही ते व्याकूळ आहेत.त्यांना समजावतानाचे बुद्धांचे उद्गार ही लाजवाब.


आपल्या अंगावर पडणारी साल वृक्षाची फुले.. हे दृश्य तथागत आनंदांना दाखवताहेत.


सुंदरता ही कुठल्या ठिकाणांवर अवलंबून असत नाही.सुंदरता छोट्या गोष्टीत सुद्धा असते... 


त्या छोट्या कसब्यात सौंदर्य शोधणारे तथागत म्हणूनच मनाला व्यापून राहतात !


अश्रुंनी डबडबल्या डोळ्यांनी घेतलेल्या या 'स्व' अनुभवांनी मृत्यूवर असणारे प्रेम,गुरू-शिष्याच्या या नात्याला शिर साष्टांग दंडवत घालून माझ्या जीवनावर अज्ञानाच्या दृष्टिकोनातून मृत्यूवर पडलेला अंधार प्रकाशमय झाला.


एखाद्या झोपडीमध्ये उद्याच्या अन्न मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा विचार करणारी व्यक्ती असो,सध्या सुरू असणाऱ्या युद्धाचा मानवी आयुष्यात होणाऱ्या बदलावर विचार करणारी व्यक्ती असो, किंवा सर्वार्थाने सुखसोयी उपलब्ध असणारी श्रीमंत व्यक्ती असो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो.सर्व सुख-सोयी असतानाही जर दाड दुखत असेल तर त्या व्यक्तीला आपली दाढ व त्याची वेदना हीच महत्वाचे वाटते.इतर सर्व गोष्टी गौण वाटतात.


आपलं जीवन जितकं साधं सरळ,आनंदी,सुखी असेल.आपल्या मृत्यू ही तसाच असेल.जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मध्ये जो कालावधी आहे त्याला जीवन म्हणतात.व तेच जीवन सुखी आनंदी कसं जगायचं न चुकता हे पुस्तक सांगतं.शरीर आहे त्यासोबत वेदना संवेदना आहेतच. पण हे पुस्तक वाचल्यामुळे या वेदणेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. 


परवाच एक घटना घडली.माझी दाढ दुखत होती.असह्य वेदना होत होत्या.परवाच मी ती दाढ काढून घेण्यासाठी गेलो होतो.त्या ठिकाणी रिसर्च सेंटर असल्याकारणाने शिकाऊ डॉक्टर होते.त्यांनी माझी संपूर्ण चौकशी केली विचारपूस केली. त्यांनी माझे संपूर्ण दात मोजले.आणि त्यांनी मला प्रश्न विचारला,'तुम्ही कधी तुमची अक्कल दाढ काढली आहे का यापूर्वी ? मी नाही म्हणून सांगितले. ते म्हणाले बरं झालं तुम्हाला तीनच 'अक्कल' दाढा आहेत.हा संवाद होत असताना दाढ प्रचंड प्रमाणात दुखत असतानाही मला हसू आले.मी म्हणालो अक्कल दाढा किती असतात.ते म्हणाले वर दोन खाली दोन अशा चार दाढा असतात.तसा विचार करा गेलं तर या दाढांचा आपल्याला काही उपयोग होत नाही.' ते म्हणाले,पण या दाढा काढताना  त्या हाडांमध्ये असल्याकारणाने खूप त्रास होतो. मी म्हणालो,आपण तर म्हणता या दाढांचा आपल्याला काही उपयोग नाही. मग तयार करणाऱ्याने हे उगीचच केले नसेल.याचाही आपण विचार करावा. मी म्हणालो,चला मला तीनच अक्कलदाढा आहेत. येथे आलेला हा एक फायदा झाला. दाढ काढत असताना होणार्‍या वेदनेमध्येही मी आनंदी होतो.


धर्म कोणताही असो,त्यातल्या माणसांनी आपल्या धर्मातल्या मयत माणसांची 'शवशरीरे' स्नान घालून,फुले वाहून;पेटीला,तिरडीला फुलाचे हार घालून आजही सजवत ठेवली आहेत.दुसऱ्या,तिसऱ्या,बाराव्या,तेराव्या दिवशी ( दिवसाचा आकडा कोणताही असू दे ) गोड पदार्थ करून आजही शेवट गोड केला जातोय. तथागतांच्या महापरिनिर्वाणाचेच हे कदाचित संचित असेल; त्याचाच हा कदाचित संस्कार असेल.युरोप- अमेरिकेतल्या काही प्रांतात मयत माणसाला निरोप देण्यासाठी नातलग, मित्रमंडळी नटून-थटून येतात.हसत-खेळत त्याला निरोप देतात.प्रेत सजवतात, सुगंधी द्रव्य त्यावर शिंपडतात आणि त्याद्वारे त्या मयताचा मृत्यू सोहळा साजरा करतात.हा सोहळा म्हणजे मला जणू जीवनाचे केलेले हे स्वागतच वाटले.


असाच परवा व्हाट्सअप वरती डॉ.रवींद्र श्रावस्ती आदरणीय लेखकांचा संदेश पडला.बोलायचं आहे वेळ आहे का? एवढा थोर माणूस पण उच्च कोटीची नम्रता पाहून मी नतमस्तक झालो. त्यांनी या पुस्तकाची निर्माण कथा सांगितली. हे पुस्तक लिहिण्यासाठी,विचार करण्यासाठी,चिंतन करण्यासाठी,मनन करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्षे लागली. हे पुस्तक लिहिलं पण लोकं हे पुस्तक स्वीकारतील का ? हा प्रश्न त्यांना रात्रंदिवस भंडावून सोडत होता. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाची सामग्री एका कोपऱ्यात ठेवून दिली. लेखकांच्या आदरणीय सासुबाईचे निधन झाले.आणि त्यावेळी सर्वप्रथम सर्व लोकांच्या समोर मृत्यू सुंदर आहे ? यास अनुषंगाने ते बोलले. त्यांचं ते बोलणं ऐकून बऱ्याच जणांनी सांगितलं आपले हे मृत्यूबाबतचे सुंदर विचार ऐकून आमची ही मृत्यूबाबतची भीती कमी झाली.आपण या विषयावर पुस्तक लिहावे. मग त्या नंतर पुन्हा अभ्यास सुरू झाला.अनेक संदर्भ ग्रंथ,रात्रीचा दिवस करून त्यांनी या मृत्युला सुंदर बनवले आहे.अशाच एका कार्यकर्त्याचा धडधाकट भाऊ मृत्यू पावला.त्याला होणारा त्रास,

जीवनातील क्षणभंगुरता,या सगळ्यांचा विचार करता लेखकांच्या एका डॉक्टर मित्रांनी हे पुस्तक त्या कार्यकर्त्याला भेट म्हणून दिले. त्यानी ते वाचावयास सुरू केले. व तीन दिवसांनी थेट लेखकांना फोन केला.आपले पुस्तक वाचून मी पूर्णपणे सावरलो आहे. मृत्यू हे जीवनातील सत्य मी मनापासून स्वीकारले आहे. आपला व आपल्या पुस्तकाचा मी मनापासून आभारी आहे. ही सत्य कथाच या पुस्तकाचं महात्म्य अधोरेखित करते.


या पुस्तकामध्ये मृत्युचे सौंदर्यशास्त्र मांडणारी कथा आहे.प्रभा व अश्वघोष ही कथा जीवन मृत्यू यामधल्या बदलांची जाणीव करून देणारी,सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जीवन जगून, जीवनातील सत्य समजून घेण्यासाठी प्रभा ने केलेले आत्मदान हे खऱ्या प्रेमाची माहिती सांगते.


'वृक्ष बोला पत्ते से,सुन पत्ते मेरी बात |


इस घर की यह रीत है,एक आवत इक जात ||


_कबीर


हे जीवनातील सत्य समजून घेतले


मृत्यु नसता तर या जगाचे वैराण वाळवंट झाले असते ! माणसातले प्रेम आटले असते; माणसे जनावरेच राहिली असते.खरे तर मृत्यूने जगण्याचे भान दिले,नैतिकता दिली.


मृत्यू सुंदर जगण्याची प्रेरणा देतो.मानवी जीवनाचे मांगल्य तगवून ठेवणारे निसर्गाचे विनाशकारी रूप म्हणजे मृत्यू ! मृत्यू तर असणारच आहे. तो येण्यापूर्वी आपले छान आयुष्य जगवून घेतलं पाहिजे.


चला, सुंदर माणसे तयार करूया,सुंदर माणसे होऊया ! मग मृत्यूचे काय बिशाद आहे

माणसांना ' ठार ' मारण्याची !


इतक्या प्रगल्भ,गुंतागुंतीच्या जीवनाची उकल साधी-सोपी करण्यामध्ये लेखक यशस्वी ठरले आहेत.


अस्तित्वा संदर्भातील काही सुक्ष्म पैलू डॉ.बंदिष्टे यांच्या भाषेतच बघूया.


प्रत्येक अस्तित्व बदलत असते.व्यक्तीच्या प्रत्येक गोष्ट म्हणा किंवा संपूर्ण विश्व म्हणा, प्रत्येक अस्तित्व सतत बदलत असते. काही अस्तित्वे (उदा. घड्याळातील वर्ष दाखविणारा काटा) अगदी हळूहळू बदलत असतात,तरी इतर काही गोष्टी लवकर लवकर बदलतात व त्या बदलत आहेत,हे दिसतेसुध्दा ( उदा. नदीचे पाणी,घड्याळाचा सेकंद दाखवणारा काटा आदी ) एकूण निष्कर्ष असा, ती प्रत्येक अस्तित्व सतत बदलत असते. अस्तित्व ( वास्तव ) = बदलणे, असे असेल तर बदलणाऱ्या अस्तित्वाचा प्रवाह अखंड असतो व त्या प्रवाहाचा आकारसुद्धा जवळजवळ एकसारखाच असतो.म्हणून जी वस्तू आपण पाहतो आहे,ती पूर्वीची वस्तू आहे,असा आभास पाहणाऱ्यांना होतो.असे वाटते,की त्याच वस्तू व प्राणी पुष्कळ वेळेपर्यंत टिकून राहतात.म्हणून आपण अमुक माणसाला,झाडाला किंवा इमारतीला पुष्कळ वर्षानंतर पाहतो आहे,अशी भाषा वापरतो. पण,खरे पाहिली तर कोणतीच गोष्ट दोन क्षणसुद्धा न बदलता राहत नाही.वेळेच्या दृष्टीने प्रत्येक अस्तित्व क्षणिक आहे.


बुद्धांच्या या भूमिकेला म्हणतात.


'क्षणिकवाद'.आपण पुष्कळदा असे म्हणतो,की हा तोच माझा मित्र आहे,जो मला पाच वर्षानंतर भेटतो आहे.परंतु आपण जर शांतपणे वास्तविकता पाहिली,तर आपल्याला असे दिसेल,की आपल्या त्या मित्राचा प्रत्येक कण क्षणाक्षणाला बदलत असतो; परंतु तो बदल सूक्ष्म व सतत होत असल्याने,तो आपल्या लक्षात येत नाही.


 ही सगळी स्थिती 'एकाच नदी मध्ये कोणीही दोनदा अंघोळ करू शकत नाही'या वाक्याने दर्शविली जाते. ज्या नदीमध्ये आपण आधी कधी अंघोळ केली होती,ते पाणी कधीचेच वाहून गेले असल्याने 'त्याच'नदीमध्ये आपण दुसऱ्यांदा आंघोळ करू शकत नाही.आता तिथे दुसरे पाणी आहे.ही स्थिती लोक नीट पाहत नाही व अमुक नदीमध्ये मी चौथ्यांदा किंवा दहाव्यांदा अंघोळ करतो आहे,अशी वाक्य बोलत असतात.असो, या ठिकाणी आणखी एका गोष्टीकडे दुर्लक्ष होते, ही नदी बदलते तशी अंघोळ करणारी व्यक्ती सुद्धा सतत बदलत असते.म्हणून मग जशी कोणी व्यक्ती कोणत्याही नदीमध्ये दोनदा अंघोळ करू शकत नाही,तसेच कोणीही,कोणत्याच खुर्चीवर सुद्धा दोनदा बसू शकत नाही. खरे पाहिले तर कोणीच माणूस कोणतीही गोष्ट दुसऱ्यांदा करू शकत नाही.ज्या गोष्टी सध्याचे विज्ञान म्हणते आहे,त्या अडीच हजार वर्षांपूर्वी ( २५०० ) बुद्धांनी म्हणाव्यात ही आश्चर्याची व कौतुकाची गोष्ट आहे.दिक् - काल - शक्ती यांच्या सतत भूतकाळापासून भविष्य कडे जात असणाऱ्या प्रवाहामध्ये कोणत्याच गोष्टीची कुठेच पुनरावृत्ती असू शकत नाही.अगदी सारख्या दिसणाऱ्या दोन गोष्टींमध्येही काही न काही  (जागेचा,वेळेचा,

रचनात्मकतेचा) फरक अगदी हमखास असतो .


बुद्धांच्या या क्षणिकवादाचा अर्थ,प्रत्येक गोष्टीमध्ये होणारा बदल हा त्या गोष्टीमध्ये होत असणारा पूर्ण बदल असतो.वस्तूंमध्ये काय किंवा व्यक्तींमध्ये काय अपरिवर्तित राहणारे, न बदलणारे,नित्य असे कोणतेच तत्व नसते.


वाहत असणाऱ्या प्रवाहापेक्षा निराळी अशी नदी नसते;


क्रिया व कर्ता ही दोन भिन्न तत्वे नसतात.करणारा व क्रिया एकमेकांपासून निरनिराळ्या गोष्टी नाहीत.बदलत राहणे,परिवर्तित होत जाणे हा प्रत्येक अस्तित्वाचा,प्रत्येक वास्तवाचा स्वभाव आहे, धर्म आहे.


जग हे फक्त आपापल्या स्वभावानुसार सतत परिवर्तीत होत असलेल्या,परिवर्तन पाहणाऱ्या अगणित गोष्टींचा एक अखंड प्रवाह आहे.


डॉ.बंदिष्टे लिहितात,'प्रत्येक अस्तित्व बदलते याचा अर्थ एवढाच आहे,कि ते आपल्यासारख्याच आणखी एका क्षणिक अस्तित्वाला,वास्तवाला जन्म देते. प्रत्येक अस्तित्व आपल्यासारख्याच अस्तित्वाला निर्माण करू शकते; तेवढीच त्याची निर्माणशक्ती असते व तीच हमखासपणे तिच्या निर्माणशक्तीची दिशा असते.


तथागत गौतम बुद्ध त्यांनी कोणत्याही प्रकारचे कुंपण घातलेले नाही.याच अनुषंगाने लेखकांशी मी नेहमी बोलतो.बोलण्यातून वाचण्यातून मृत्यूबाबत प्रगल्भता वाढत आहे. त्यावेळी मी लेखक साहेबांशी बोलतो त्यांची ती समजावून सांगण्याची पद्धत माझ्या मनाला प्रेमाची फुंकर घातल्यासारखी वाटते.आता तर मी ठामपणे म्हणू शकतो डॉ.रवींद्र श्रावस्ती त्यांच्याशी बोलतो तेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या मृत्यूशी बोलतो.


जैन परंपरेत निर्वाण म्हणजे मृत्यू असे मानले जाते.बौद्ध परंपरेत निर्वाणाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे; निर्वाण जिवंत असतानाच प्राप्त करावयाची गोष्ट आहे,तर परिनिर्वाण हा मृत्यू आहे.


जैनांचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांचे इसवीसन पूर्व ५९९ साली अश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता 'पावापुरी' येथे निर्वाण झाले; त्यांनी मोक्ष मिळविला.जैन पुराणाचा आधार घेऊन असे सांगता येईल,की भगवान महावीरांच्या अनुयायांनी त्यांच्या मृत्यूनंतर आनंद सोहळा म्हणून अमावास्येच्या अंधारात असंख्य दिवे लावले.दिवाळी किंवा दीपावली तेव्हापासुनच साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते.या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव'असेही म्हणतात.


सुफी संत शेख इब्न अल्-हबीब या़ंच्या नजरेतून मृत्यूला जाणून घेऊ हबीब म्हणतात-


रे माझ्या बंधू,

मृत्यूसाठी स्वतःला तयार कर

मृत्यू येणारच आहे,

त्यातून येणाऱ्या दुःखाने

हृदय त्रासले - संतापले

तरी आशा सोडू नकोस

निश्चयपूर्वक प्रयत्न कर

अधिकाधिक चांगली कामे कर

एक ना एक दिवस मृत्यू आम्हाला

विलग करणारच आहे


सुफी संत रुमी हा मोठा अवलिया संत.त्याची Death is our marriage with eternity हि रचना समजून घेऊ या.


'एक दिवस मी मरणार आहे

मला माझ्या थडग्याकडे नेताना

तू मेलास,

तू मेलास,असे म्हणत

अजिबात रडू नका

मृत्यू म्हणजे जाणं नव्हे

सूर्य मावळतो,चंद्र मावतो

पण ते कुठे जात नाहीत

मृत्यू म्हणजे चिरंतनाशी लग्नच

थडगं कैदखाना वाटतो

पण ती तर मुक्ती आहे

पाशातून मुक्त होऊ या

माझे मूख बंद होते अन्

त्यातून आनंदाची आरोळी उमटून

ताबडतोब ते पुन्हा उघडते !


अशा सर्वच धर्मानी,संतांनी मृत्यूबाबत सांगितलेले.जीवन सत्य आपणास मृत्यूसौंदर्यभान आणि धर्म यामध्ये वाचावयास मिळते.थक्क करणारे सर्वच आहे.


लोकायत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले,आयुष ग्राफिक्स कोल्हापूर यांची अक्षरजुळणी आहे. या सर्वच लोकांनी जीवन व मृत्यू सुंदर आहे. हे सांगण्याचे महान कार्य केलं आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!


आपलं शरीर हे मूल्यवान आहेच.शरीरासोबत असणारा आनंद,वेदना संवेदना,भावनिक गुंतागुंत,बौद्धिक गुंतागुंत असणारच!


आपलं जीवन आपल्या जीवनात घडलेल्या घटना प्रसंग त्याला धैर्याने सामोरे जावे लागेल.जीवण जसं आहे तसं ते आनंदाने स्वीकारले पाहिजे.यामध्येच जीवनाचे इतिकर्तव्य आहे.


हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकांमध्ये मला दोन औषधांच्या 'मोकळ्या चिठ्या' मिळाल्या. या मोकळया चिठ्ठ्या मला सांगत होत्या.आयुष्य मोकळ्या मनाने जगा.जे नाविन्यपूर्ण असेल,नवीन असेल ते स्वीकारा ! आयुष्य अलगदपणे फुलासारखे जगा,फुल आपलं संपूर्ण आयुष्य अलगदपणे जगते.व ज्या झाडासोबत ते आयुष्यभर राहिले. ते झाड हि ते 'अलगदपणे' सोडते.यालाच मृत्यू सुंदर आहे असं म्हटलं जातं.


जाता - जाता


या पुस्तकाचे आदरणीय लेखक माझे परम मित्र फारच कमी काळामध्ये माझ्याशी व मी त्यांच्याशी घट्ट जोडले गेलो. त्यांचं व्यक्तिमत्व हे मला फार भावलं.सुंदर जीवन कसं जगायचं,आपला मृत्यू सुंदर कसा करायचा.हा विषय तर माझ्यासाठी फारच गुंतागुंतीची आणि अवघड होता. पण मी कधीही त्यांना फोन लावला.तरी कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता ते लगेच माझ्याशी बोलायचे.इतक्या शांतपणाने,सरळ साध्या सोप्या मला समजेल अशा सोप्या भाषेत ते निरंतर मला सांगत होते.'हे पुस्तक माझ्यासाठी सुंदर वाचन, अनोळखी प्रवास होता.या प्रवासामध्ये त्यांनी मला एक क्षणही 'वाऱ्यावर' सोडले नाही.आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात ही ते मला वाऱ्यावर सोडणार नाहीत. ह्या पुस्तकाने मला ही सर्वोत्तम अशी भेट दिली आहे.


हे पुस्तक वाचून माझ्यामध्ये लौकिक व अमुलाग्र असा बदल झाला आहे.आपलं जीवन जेवढं आनंदी,सुंदर असेल,तेवढाच आपला मृत्युही आनंदी व सुंदर आहे.याची मला मनस्वी जाणीव झाली. येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायचा,उत्साहात साजरा करायचा. तो मी करतच आहे करीत राहीन. मी या सुंदर जीवनावर प्रेम करायला शिकलो आहे. मृत्यू कोणत्याही वेळी जर मला भेटायला आला. याबद्दल माझ्या मनात कोणतीही भीती,अगर शंका नाही. हेच धाडस,सत्य मला या पुस्तक वाचनातून मिळालं.


या पुस्तकानं मला खरंच ' मृत्यू सुंदर आहे ? हे सांगितलं. प्रत्येक माणसानं जीवन आनंदी व मृत्यू सुंदर आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक वेळ नक्कीच वाचावं आपला दृष्टीकोन नक्कीच बदलणार..!