* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/२/२३

भारताचे प्राचीन खगोलशास्त्र..

साधारण दीड वर्षांपूर्वी,म्हणजे नक्की सांगायचं तर एप्रिल,२०१६ पासून मध्यप्रदेशाच्या उज्जैनमधे सिंहस्थ कुंभमेळा भरला.किमान २ ते ३ कोटी माणसं उज्जैन- सारख्या लहानशा शहरात महिना / दीड महिन्याच्या कालावधीत आली,त्यांनी क्षिप्रेत स्नान केलं अन् पुण्य गाठीशी बांधलं.याच उज्जैनमधे एक इतिहासकालीन आश्चर्य उभे आहे.ते म्हणजे - वेधशाळा.कुंभमेळ्याच्या भाविकांपैकी किती जणांनी ह्या वेधशाळेला भेट दिली,कोणास ठाऊक.पण ही वेधशाळा म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञानाची किंचित खुली झालेली कवाडं आहेत.आणि ते ज्ञान आहे खगोलशास्त्राचे..!


सन १७३३ मध्ये राजस्थानातील आमेरचा राजा सवाई जयसिंग (द्वितीय) याने ही वेधशाळा बांधली.तेव्हा तो माळव्याचा सुभेदार होता. उज्जैन व्यतिरिक्त दिल्ली,काशी,मथुरा आणि जयपूरमधेही ह्या राजा जयसिंगने वेधशाळांची निर्मिती केली.त्याने पहिली वेधशाळा बांधली ती दिल्लीची.सन १७१० मध्ये बांधून झाल्यावर त्या वेधशाळेतील आकड्यांचे विश्लेषण केले आणि ते बरोबर आहेत असं समजल्यावर इतर चार वेधशाळा उभारल्या.


हा सवाई जयसिंग खगोलशास्त्राचा चांगलाच जाणकार होता.संस्कृतवर त्याचं प्रभुत्व होतं.


त्याचबरोबर,मोगलांबरोबर राहून त्याने अरबी आणि फारसी भाषाही शिकल्या होत्या.गंमत म्हणजे याला मराठी सुद्धा चांगली येत होती.याचा बराच काळ औरंगाबाद,दौलताबाद,नगर इत्यादी ठिकाणी गेला होता.संभाजीला परास्त करून,हिंदवी स्वराज्य संपविण्यासाठी औरंगजेब जी चतुरंग सेना घेऊन महाराष्ट्रात शिरला,त्या सेनेत सामील व्हायचं सवाई जयसिंगाला फर्मान सुटल.त्या वेळी त्याचं वय होतं अवघं १४ वर्षं. त्याने बरीच टाळमटाळ केली.शेवटी औरंगजेबाचे दूत आमेरपर्यंत आले,तेव्हा जयसिंगाला जावंच लागलं.


असं म्हणतात,सवाई जयसिंगाने महाराष्ट्रातल्या त्या धामधुमीच्या काळातही,तिथल्या ग्रंथांचं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातून बरेच ग्रंथ गोळा करून नेले.


या जयसिंगाला खगोलशास्त्रात निपुण करण्याचं श्रेय जातं मराठी माणसाला.पंडित जगन्नाथ सम्राटाला.नावात सम्राट असलं तरी हा राजा जयसिंगाला वेद शिकविण्यासाठी नेमलेला ब्राम्हण होता.मात्र या जगन्नाथ पंडिताचा खगोलशास्त्राचा दांडगा अभ्यास होता.याने 'सिद्धांत कौस्तुभ' या ग्रंथाची रचना केली होती. आणि युक्लीडच्या भूमितीचा अरबीमधून संस्कृतमधे अनुवादही केला होता.


सम्राट जगन्नाथाच्या नेतृत्वाखाली सवाई जयसिंगने वेधशाळा बांधताना कुठेही धातूचा उपयोग केलेला नाही.


युरोपमधील वैज्ञानिकांनी धातूची उपकरणं वापरल्याने आणि धातूंमध्ये मोसमाप्रमाणे आकुंचन / प्रसरण होत असल्याने अनेकदा गणना चुकते.मात्र सवाई जयसिंगांच्या पाचही वेधशाळांमधे चुना विशिष्ट आकारात घडवलेले दगड,यांच्याच मदतीने सर्व यंत्रं उभारली आहेत.


दुर्दैवाने ह्या पाच वेधशाळांपैकी उज्जैन आणि जयपूरच्याच वेधशाळा आज ही काम करतात.मथुरेची वेधशाळा तर नष्टच झालेली आहे.तर काशीची अत्यंत जर्जर अवस्थेत आहे.उज्जैनच्या वेधशाळेत सम्राट यंत्र,नाडी वलय यंत्र,दिगंश यंत्र,भित्ति यंत्र आणि शंकु यंत्र बनलेले आहेत.ही वेधशाळा बांधण्याचा काळ हा मराठ्यांच्या माळव्यात प्रवेश करण्याआधीच्या काही वर्षांचा आहे.पुढे १९२५ मधे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी ह्या वेधशाळेची डागडुजी केली होती.


सवाई जयसिंगाच्या पाच वेधशाळांपैकी उज्जैनच्या वेधशाळेचं महत्त्व का..? तर पूर्वी, म्हणजे 


इसवी सनाच्या चारशे वर्षं पूर्वीपर्यंत अशी मान्यता होती की पृथ्वीची देशांतर रेषा (मध्यान्ह रेषा) ही उज्जैनमधून. जाते. शिवाय कर्कवृत्त रेषा ही देखील उज्जैनवरून जात असल्याने उज्जैनला भारतीय खगोलशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे..


आपल्या महाराष्ट्रातलं वाशीम म्हणजे जुन्या काळची वाकाटकांची राजधानी 'वत्सगुल्म'.ह्या वाशीममधे एक मध्यमेश्वराचे मंदिर आहे.असं मानतात की,प्राचीन काळी कल्पना केलेली पृथ्वीची देशांतर रेषा ही त्या मध्यमेश्वराच्या पिंडीच्या मधून जाते.गंमत म्हणजे पृथ्वीच्या वक्राकार पद्धतीने बघितलं तर वाशीम आणि उज्जैन ही दोन शहरं एकाच रेषेत येतात. भास्कराचार्यांनी त्यांच्या 'लीलावती' या ग्रंथात ह्या देशांतर रेषेचा उल्लेख केला आहे. ह्या उल्लेखाप्रमाणे उज्जैन (ग्रंथामधे उज्जैनला 'अवंती' ह्या जुन्या नावानेच संबोधलेलं आहे) आणि आज हरियाणामधे असलेल्या रोहतकमधून ही कल्पित देशांतर रेषा जाते.


उज्जैनची ही वेधशाळा म्हणजे प्राचीन खगोलशास्त्राचे किलकिले झालेले दार आहे.ह्या वेधशाळेने नवीन काहीच प्रस्थापित केलेले नाही. पण त्याचबरोबर,ज्या ग्रंथांच्या आधारे ही वेधशाळा उभी राहिली,त्या ग्रंथांची एक झलक आपल्यासमोर उभी राहते आणि आपण थक्क होऊन जातो.


वेधशाळा ही गोष्ट जगाला नवीन नाही किंवा त्याचे अप्रूपही नाही..सवाई जयसिंगने भारतात पाच वेधशाळा बांधण्याच्या काहीशे वर्षं आधी, म्हणजे तेराव्या शतकात इराणच्या मरागामधे क्रूरकर्मा चंगेज खानच्या नातवाने,हलागू खानने,विशाल वेधशाळा बांधलेली आढळते.जर्मनीच्या कासलमधे सन १५६१ मधे वेळ दाखवणारी वेधशाळा बनवली गेली होती.


मात्र भारतातल्या वेधशाळांचं महत्त्व हे की,त्या अत्यंत पद्धतीने,खगोलशास्त्राची विविध अंगं सांगणाऱ्या वेधशाळा आहेत.


उज्जैनच्या वेधशाळेत सेकंदाच्या अर्ध्या भागापेक्षा कमी फरकाने वेळ बघता येते.


मग हे ज्ञान आपल्याजवळ आलं कोठून.. जगन्नाथ सम्राट आणि राजा सवाई जयसिंग यांनी हे सर्व कुठून शोधून काढलं.. ? तर त्यासाठी आपल्याला बरंच मागं जावं लागेल.


आपल्या खगोलशास्त्राचे सर्वांत प्राचीन उल्लेख सापडतात ते लगध ऋषींच्या 'वेदांग ज्योतिष' या ग्रंथात. याच्या शीर्षकात जरी 'ज्योतिष' असा उल्लेख आला असला तरी हा ग्रंथ खगोलशास्त्राचेच विवेचन करतो. इसवी सनापूर्वी १३५० वर्षं हा लगध ऋषींचा कार्यकाल मानला जातो.या ग्रंथात 'तीस दिवसांचा एक महिना' ह्या मानकाचा उल्लेख आहे.अर्थात आजपासून साधारण ३३०० वर्षांपूर्वी भारतात खगोलशास्त्राचे बरेच ज्ञान होते.कदाचित याआधीही असेल.कारण लगध ऋषींचा हा ग्रंथ, आपण काही नवीन शोधून काढलं,असं कुठेही म्हणत नाही.म्हणजेच त्याआधीच्या काळातील आपल्याजवळ असलेल्या खगोल शास्त्रासंबंधीच्या ज्ञानाला हा ग्रंथ लिपीबद्ध करतोय.


दुर्दैवानं भारतात प्राचीन ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ आज उपलब्ध नाहीत.मुस्लीम आक्रमणाच्या काळात अनेक महत्त्वाचे ग्रंथ नष्ट झाले. त्यानंतरही जे ग्रंथ शिल्लक उरले,त्यांच्यातील काही महत्त्वाचे ग्रंथ इंग्रज शासनाच्या काळात युरोपियन अभ्यासक घेऊन गेले.


असाच एक ग्रंथ आहे,खगोलशास्त्रावरील नारदीय सिद्धांताचा.भारतात हा मिळत नाही. पण बर्लिनच्या प्राचीन पुस्तकांच्या संग्रहालयात 'नारद संहिता' हा खगोलशास्त्रीय ग्रंथ सापडतो. (Webar Catalogue No 862),तसंच खगोलशास्त्रावरील धर्मत्तारा पुराणातील सोम - चंद्र सिद्धांतावरील दुर्मीळ ग्रंथही ह्याच पुस्तकालयात उपलब्ध आहे (Webar Catalogue No 840). प्राचीन खगोलशास्त्रात 'वसिष्ठ सिद्धांत' महत्त्वाचा मानला जातो.


सूर्य सिद्धांताशी मिळत्या-जुळत्या ह्या सिद्धांताचा ग्रंथ भारतात मिळत नाही..मात्र यातील संदर्भ कोटमब्रूक्स आणि बेन्टले (जॉन बेन्टले: १७५० - १८२४) ह्या खगोलशास्त्रज्ञांच्या ग्रंथात अनेक जागी येतात. 


विष्णुचंद्र ह्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाची गणितीय संकलने ह्या वसिष्ठ सिद्धांतावर आणि आर्यभट्टच्या ग्रंथावर आधारित आहेत.जर हा ग्रंथ उपलब्ध नाही,तर कोटमब्रूक्स आणि बेन्टले यांना ह्यातील संदर्भ कुठून,असा प्रश्न पडल्यावर शोध घेतला असता हा ग्रंथ 'मेकॅजी संग्रहात विल्सन कॅटलोगमध्ये१२१ व्या क्रमांकावर मिळाला.बेन्टलेने आर्यभट्टच्या कार्यावर आधारित दोन शोधग्रंथ लिहिले आहेत.पहिला आहे,'आर्य सिद्धांत' आणि दुसरा आहे 'लघु आर्य सिद्धांत' इसवी सनाच्या पाचव्या शतकात झालेल्या आर्यभट (प्रथम) च्या 'आर्य अष्टक शतः' (ज्यात ८०० श्लोक आहेत) आणि दश गीतिका' (दहा सर्ग) ह्या दोन ग्रंथांना बेन्टले अनेकदा उद्धृत करतो.हे दोन्ही दुर्मीळ ग्रंथ बर्लिन पुस्तकालयात वेबर कॅटेलॉग क्र. ८३४ मध्ये उपलब्ध आहेत..!


पाश्चात्त्यांनी आपल्या हिंदू खगोलशास्त्रावर बरंच अध्ययन केलेलं आहे.१७९० मधे स्कॉटिश गणितज्ञ जॉन प्लेफेयरने हिंदू पंचांगावरील माहितीच्या आधारे (जी माहिती युरोपात १६८७ ते १७८७ ह्या कालावधीत पोहोचली) हे ठाम प्रतिपादन केले की,हिंदू कालगणनेची प्रारंभिक तिथी (किंवा जिथपर्यंत उपलब्ध ग्रंथांच्या आणि गणनेच्या आधारे जाता येते) ही इसवी सनापूर्वी ४,३०० वर्षं आहे..!


गंमत म्हणजे अठराव्या शतकातच,युरोपियन खगोलशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं होतं की, प्राचीन हिंदू खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रह-ताऱ्यांची जी दिशा आणि जे चलन होतंय त्यात एका मिनिटाचीही चूक नाही.


त्या काळात सेसिनी आणि मेयर यांनी ४५०० वर्षांपूर्वीच ताऱ्यांचे जे तक्ते आधुनिक पद्धतीने तयार केले ते प्राचीन हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी केलेल्या तक्त्यांप्रमाणेच होते..!


प्लेफेयर,बेली आणि वर्तमान काळात 'नासा'मधे काम करणारे प्रो. एन. एस. राजाराम ह्यांनी हे प्रतिपादित केलंय की चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी तयार केलेले तक्ते हे प्रत्यक्ष ग्रह-ताऱ्यांच्या पाहणीवर आधारलेले होते आणि त्या आधारावरच खगोलशास्त्राची गणितीय सूत्रे तयार केली गेली.


बेली आणि प्लेफेयर ह्यांनी एक अजून कुतूहल वाढवेल असं निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे. 


हिंदू खगोलशास्त्रज्ञांनी सात ग्रह-ताऱ्यांची गुरू, मंगळ, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र) स्थिती आणि रेवती नक्षत्राच्या सापेक्ष त्यांचे स्थान,हे सर्व श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या वेळेस नोंदवून ठेवलं आहे. आजची अत्याधुनिक साधनं तिथी काढली तर ती येते १८ फेब्रुवारी इसवी सनापूर्वी ३१०२. याचा अर्थ बेली आणि प्लेफेयर लिहितात की, त्या काळातील लोकांना आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे फार चांगले ज्ञान होते आणि प्रत्यक्ष निरीक्षणे नोंदवण्याची पद्धत त्या काळी होती. गंमत म्हणजे त्या काळात नोंदवलेल्या चंद्राच्या स्थितीत आणि आजच्या गणनेप्रमाणे केलेल्या चंद्राच्या स्थितीत अंतर आहे फक्त ३७ अंश,अर्थातच नगण्य..!


हे सर्व वाचून / बघून थक्क व्हायला होतं. प्राच्य खगोलशास्त्रातल्या अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की,भारतीय ग्रंथांमधे आढळलेल्या कालगणनेनुसार इसवी सनाच्या ११००० वर्षापर्यंत माहिती मिळते.म्हणजे आजपासून तेरा हजार किंवा त्याही पूर्वीपासून आपल्या पूर्वजांना अवकाशाचं हे ज्ञान असेल.मग मूळ प्रश्न शिल्लकच राहतो,हे असं अत्याधुनिक अद्ययावत ज्ञान,इतक्या हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांकडे कुठून आलं..?


३० जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

३०/१/२३

भारतीय स्थापत्यशास्त्र - २

एखाद्या वस्तूची वॉरंटी,गॅरंटी किंवा हमी किती असू शकते? एक वर्ष,दोन वर्षं,पाच वर्षं,दहा वर्षं...? आपली झेप यापलीकडे जात नाही नं..? 


पण निर्माण किंवा स्थापत्य क्षेत्रातल्या भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या विटेची गॅरंटी आहे,हमी आहे - ५,००० वर्षे..! होय.पाच हजार वर्षं.अन् ह्या विटा आहेत मोहन-जो-दारो आणि हडप्पा येथे सापडलेल्या पुरातन संस्कृतीच्या अवशेषांमधल्या !


भारतात जेव्हा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची तयारी चाललेली होती,त्या काळात भारताच्या उत्तर पश्चिमेला (म्हणजे आजच्या पाकिस्तानात) इंग्रज रेल्वेचं जाळं उभं करण्याच्या खटपटीत होते.लाहोर ते मुलतान ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीतर्फे चालू होत.या कामाचे प्रमुख होते जॉन आणि विलियम ब्रुनटन हे ब्रिटिश अभियंते यांच्या समोर मोठं आव्हान होतं की,रेल्वे लाईनच्या खाली टाकण्यासाठीची खडी (गिट्टी) कुठून मिळवावी हे.


काही गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की, ब्राम्हनाबाद जवळ एक पुरातन शहर 'खंडहर' झालेल्या स्थितीत पडलंय.तिथल्या विटा तुम्हाला मिळू शकतील.


रेल्वे अभियंता असलेल्या ह्या दोघा भावांनी मग त्या अवशेषांमधल्या विटा शोधून काढल्या.त्या बऱ्याच होत्या.

लाहोर ते कराची ह्या सेगमेंटमधील रेल्वे लायनीत जवळपास ९३ किलोमीटरची लाईन ही या विटांनी बांधली गेली आहे.


या दोघा अभियंत्यांना हे कळलंच नाही की, एका अतिशय पुरातन आणि समृद्ध अशा हडप्पाच्या अवशेषांना आपण नष्ट करत आहोत!


पुढे बरीच वर्षं ह्या ऐतिहासिक विटांनी लाहोर-मुलतान रेल्वे लाईनला आधार देण्याचं काम केलं.


नवीन झालेल्या कार्बन डेटिंगच्या शोधाने हे सिद्ध झालंय की मोहन- जो-दरों,हडप्पा,लोथल इत्यादी ठिकाणची आढळलेली पुरातन संस्कृती ही साडेसात हजार वर्षं जुनी असावी. ह्या विटा जरा अलीकडल्या म्हटल्या तरी त्या पाच हजार वर्षं जुन्या होतात.अशा ह्या किमान पाच हजार वर्षं जुन्या विटा,१८५७ साली मिळाल्या तेव्हाही मजबूत असतात आणि त्या पुढे ८० / ९० वर्षं रेल्वेचे रूळ सांभाळण्याचं काम करतात...!! आज अशा विटा बनू शकतील..?


हडप्पा येथे सापडलेल्या ह्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.ह्या भट्टीत व्यवस्थित भाजलेल्या आहेत. 


साधारण १५ वेगवेगळ्या आकारांत ह्या आढळतात.पण ह्या सर्व आकारांत एक साम्य आहे ह्या सर्व विटांचं - प्रमाण हे ४ : २: १ असं आहे. म्हणजे ४ भाग लांबी, २ भाग रुंदी आणि १ भाग उंची (जाडी). याचाच अर्थ ह्या विटा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तयार झाल्या असाव्यात.मग प्रश्न निर्माण होतो की,साधारण पाच ते सात हजार वर्षांपूर्वी हे बांधकामशास्त्रातलं प्रगत ज्ञान आपल्या भारतीयांजवळ कुठून आलं.. ? की भारतानंच हे शोधून काढलं ?


याचं काहीसं उत्तर आपल्याला जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये मिळतं.


तंत्रशास्त्राचे काही ग्रंथ वाचिक परंपरेमुळे आज उपलब्ध आहेत.त्यातील कपिल वात्सायनाचा ग्रंथ आहे.'मयमतम कला- मुला शास्त्रं' नावाचा.हा ग्रंथ बांधकामासंदर्भातील अनेक बाबी स्पष्ट करतो. यातील एक श्लोक आहे


'चतुष्पश्चषडष्टाभिमत्रिस्तद्विद्विगुणायतः ॥ व्यासार्धार्धत्रिभागैकतीव्रा मध्ये परेऽपरे ।

इष्टका बहुशः शोष्याः समदग्धाः पुनश्च ताः।।'


याचा अर्थ आहे -'ह्या विटांची रुंदी चार,पाच, सहा आणि आठ ह्या नंतर भाजून घटकांमधे असून लांबी ह्याच्या दुप्पट आहे.ह्यांची उंची (जाडी) ही रुंदीच्या एक द्वितीयांश किंवा एक तृतीयांश असावी.ह्या विटा वाळवून घ्याव्यात.'


हा श्लोक ज्या ग्रंथात आहे,तो ग्रंथ लिहिला गेलाय इसवी सनाच्या सहाव्या शतकात. म्हणजे आजपासून साधारण दीड हजार वर्षांपूर्वी. आणि हडप्पामध्ये याच प्रमाणात/ आकारात सापडलेल्या विटा आहेत पाच ते सात हजार वर्षं जुन्या.


याचा अर्थ स्पष्ट आहे.बांधकामशास्त्रातलं अत्यंत प्रगत असं ज्ञान ज्ञात इतिहासाच्या काळापासून भारताजवळ होतं आणि ते शास्त्रशुद्धरीत्या वापरलं जात होतं.


एक तुलनेनं अलीकडचं उदाहरण घेऊ. विजयनगर साम्राज्याच्या उत्तर काळात,म्हणजे सन १५८३ मधे बांधलं गेलेलं लेपाक्षी मंदिर. असं सांगितलं जातं की,जटायूने सीतेचं हरण करणाऱ्या रावणाबरोबर संघर्ष करून येथेच देह ठेवला होता.बंगलोरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर,पण आंध्र प्रदेशाच्या अनंतपूर जिल्ह्यात असलेलं हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.विजयनगर साम्राज्याच्या वीराण्णा आणि विरूपण्णा ह्या दोन सरदार भावंडांनी हे मंदिर बांधलेय.कूर्मशैल पठारावर म्हणजे कासवाच्या पाठीच्या आकाराच्या टेकडीवर बांधलेले हे मंदिर वीरभद्राचे आहे.सुमारे सव्वापाचशे वर्षं जुने हे मंदिर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे.


सत्तर खांबांवर आधारलेल्या ह्या मंदिराचा एक खांब हा झुलता आहे..! अर्थात तो तसा वाटत नाही.जमिनीवर टेकलेलाच वाटतो.मात्र त्याच्या खालून पातळ कापड आरपार जाऊ शकते.वरती बघितलं तर त्याला बांधून ठेवणारी अशी कोणतीही रचना तेथे दिसत नाही.


बांधकामशास्त्रातल्या दिग्गजांना आणि शास्त्रज्ञांना सतावणारे हे गूढ आहे.हा खांब (स्तंभ) कोणत्याही आधाराविना झुलता कसा राहतोय हे कोणालाही सांगता येत नाही. इंग्रजांचे शासन असताना एका इंग्रज अभियंत्याने ह्या खांबावर बरेच उपद्व्याप करून बघितले.पण त्यालाही ह्या रचनेचे रहस्य शोधता आले नाही.


म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बांधकामशास्त्रातले हे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होते.पुढेही ते अनेक ठिकाणी दिसते. 


प्रतापगड आणि रायगड तर शिवाजींच्या काळातच बांधले गेले.पण इंग्रजांनी मुद्दाम केलेली पडझड सोडली तर आजही हे किल्ले बुलंद आहेत.


पण नंतर इंग्रजांनी आपले सिव्हील इंजिनिअरिंग भारतात आणले आणि 


स्थापत्य / बांधकामशास्त्रातील थोडेफार उरलेले भारतीय ग्रंथ बासनात गुंडाळले गेले आणि अडगळीत पडले.


भारतीय शिल्पशास्त्राचे (किंवा स्थापत्यशास्त्राचे) अठरा प्रमुख संहिताकार मानले जातात.ते म्हणजे भृगु,अत्री,वसिष्ठ,विश्वकर्मा,मय,नारद, नग्नजीत,

विशालाक्ष,पुरंदर,ब्रम्हा,कुमार,नंदिश, शौनक,

गर्ग,वासुदेव,अनिरुद्ध,शुक्र व बृहस्पती. या प्रत्येकाची शिल्पशास्त्रावरील स्वतंत्र अशी संहिता होती.मात्र आज फक्त मय,विश्वकर्मा,भृगु,नारद आणि कुमार यांच्याच संहिता उपलब्ध आहेत.अर्थात शिल्पशास्त्रातील एक तृतीयांशपेक्षाही कमी ज्ञान आज उपलब्ध आहे.इतर संहिता मिळाल्या तर कदाचित लेपाक्षी मंदिरातील झुलणाऱ्या खांबाच्या रहस्यासारखी इतर रहस्ये उघडकीला येतील.


भारतात उत्तरेकडून ज्या काळात मुसलमानांच्या आक्रमणांची तीव्रता वाढली,त्याच काळात, म्हणजे ११ व्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने 'समरांगण सूत्रधार' हा ग्रंथ संकलित केला. यात ८३ अध्याय आहेत.आणि स्थापत्य - शास्त्रापासून ते यंत्रशास्त्रापर्यंत अनेक बाबींचे विस्तृत विवरण आहे.अगदी हायड्रोलिक शक्तीने टर्बाईन चालविण्याचा विधीही यात दिलेला आहे-


'धारा च जलभारश्च पायसो भ्रमणम तथा । यथेोच्छ्रायो यथाधिक्यम यथा निरन्ध्रतापिच । एवमादिनी भूजस्य जलजानीप्रचक्षते' ।। अध्याय ३१


अर्थात जलधारा वस्तूला फिरवते.आणि उंचावरून जलधारा पडली तर तिचा प्रभाव अधिक तीव्र असतो आणि तिच्या वेगाच्या आणि वस्तूच्या भाराच्या प्रमाणात वस्तू फिरते.


या समरांगण सूत्रधारावर युरोपमधे बरेच काम चालले आहे.मात्र आपल्या देशात या बाबतीत उदासीनताच दिसून येते.साधारण ८० च्या वर वय असलेल्या डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे यांनी या ग्रंथाचा चिकाटीने इंग्रजीत अनुवाद केला अन् पाश्चात्त्य जगाचे लक्ष या ग्रंथाकडे गेले.


हे असं स्थापत्यशास्त्रावरचं ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात अडगळीत पडलंय.त्याला बाहेर आणणं आवश्यक आहे.मंदिर स्थापत्यशास्त्र आणि मूर्तिकला या विषयांवर आपल्यापर्यंत झिरपत आलेलं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचं 'भारतीय मूर्तिविज्ञान' या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे.पण या विषयावर आजच्या काळात बरंच काम होणं आवश्यक आहे.


एकुणात काय,तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाची कवाडं शोधणं आणि ती उघडणं याचाच हा सारा प्रवास आहे..!


२८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…

२८/१/२३

भारतीय स्थापत्यशास्त्र - १

जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल कोणतं,असा प्रश्न विचारला की साधारणपणे त्याचं उत्तर हे व्हेटिकन सिटीमधलं एखादं चर्च / बेसिलिका किंवा स्पेनमधलं चर्च किंवा मस्कतची मशीद वा मक्का यांसारखी उत्तरं समोर येतात.पण जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल हे हिंदूंचं मंदिर आहे हे अनेकांना माहीत नसतं.आणि हे मंदिर भारताबाहेरचं आहे ही माहिती तर बहुतेकांना नसतेच !


 कंबोडियाच्या उत्तर-पश्चिम सीमेवर असलेलं 'अंगकोर वाट' हे मंदिर म्हणजे जगातील सर्वांत मोठे पूजास्थल आहे.दक्षिणपूर्व आशियात 'वाट' चा अर्थ 'मंदिर' होतो.कित्येक मैल पसरलेल्या ह्या मंदिरात बांधलेली एक भिंतच मुळी साडेतीन किलोमीटर लांब आहे.मेरू पर्वताच्या प्रतिकृतीप्रमाणे बनविलेल्या ह्या मंदिराच्या आतील बांधकामाची लांबी-रुंदी दीड किलोमीटर बाय दीड किलोमीटर आहे.ह्या मंदिराचा एकूण परिसर चारशे चौरस किलोमीटर पसरलेला आहे.


ह्या मंदिराचं महत्त्व किती आहे? तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजात ह्या हिंदू मंदिराला जागा दिलेली आहे.हे मंदिर आपल्या देशाच्या हद्दीत रहावं म्हणून काही वर्षांपूर्वी कंबोडिया आणि थायलंड ह्या देशांमध्ये भलं मोठं युद्ध भडकणार होतं.युनेस्कोने ह्या मंदिराचा 'जागतिक वारशांच्या यादीत' समावेश केलेला आहे.आणि जगभरातल्या पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.


इसवी सन अकराशेच्या प्रारंभीच्या काळात ह्या मंदिराचे निर्माण झाले आणि अकराशेच्या मध्यावर ते पूर्ण झाले.त्या काळात हा प्रदेश 'कंबोज प्रांत' म्हणून ओळखला जात होता.


जावा,सुमात्रा,मलाया,सुवर्णद्वीप,सिंहपूर हा संपूर्ण प्रदेश हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता.कंबोजचा तत्कालीन राजा सूर्यवर्मा (द्वितीय) ने ह्या विष्णू मंदिराचे निर्माण केले. मुळात हे एक मंदिर नाही,तर हा मंदिरांचा समुच्चय आहे.संस्कृतमधे 'अंगकोर'चा अर्थ होतो - मंदिरांची नगरी.मंदिरांचा भव्य परिसर एका चौकोनी कालव्यामुळे किंवा खंदकामुळे सुरक्षित राहील अशी रचना केलेली आहे.ह्या खंदकावरचा पूल पार करून आपण मंदिरात प्रवेश करू लागलो की,एका एक हजार फूट रुंदीच्या,अक्षरशः भव्य-दिव्य अशा प्रवेशद्वाराने आपले स्वागत होते.ह्या मंदिरांच्या भिंतींवर रामायणातले प्रसंग कोरून ठेवलेले आहेत. समुद्रमंथनाचे अद्भुत दृश्य अनेक मूर्तीच्या मदतीने साकारलेले आहे.अंगकोरचे जुने नाव यशोधपुर होते.नंतर मात्र ह्या विशाल मंदिरांमुळे ते अंगकोर झाले.


ह्या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि संपूर्ण मंदिर परिसराची रचना बघून मन थक्क होतं. 


सुमारे ९०० ते १,००० वर्षांपूर्वी इतके अचूक बांधकाम करणे त्या काळच्या हिंदू स्थापत्यकारांना कसे शक्य झाले असेल? ह्या मंदिराची केंद्रीय संरचना बघून हे अनुमान निश्चित काढता येतं की,त्या काळी मंदिर बांधण्यापूर्वी,ह्या मंदिर परिसराचे नकाशे काढले गेले असतील.त्यात 'सिमेट्री' साधली गेली असेल,अन् त्याप्रमाणेच नंतर निर्माणकार्य झाले असेल.इजिप्त आणि मेक्सिकोच्या स्टेप-पिरामिडप्रमाणे ही मंदिरं,जिन्यांच्या पायऱ्यांवर उठत गेली आहेत.ह्या मंदिरांवर पूर्णपणे चोल आणि गुप्तकालीन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव जाणवतो.विशेषतः रामायणाचे प्रसंग ज्या नजाकतीनं दाखविले आहेत,ते बघून आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत राहतात.


दुर्दैवाचा भाग इतकाच की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजात जगातले सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे,त्या देशाशी भारताने आजवर कसे संबंध ठेवले ? तर अगदीच कोरडे.हे जगप्रसिद्ध मंदिर बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.पण त्यात भारतीय पर्यटकांची संख्या अक्षरशः नगण्य असते.पण मूळ मुद्दा तसाच राहतो,तो असा की भारतीय (किंवा त्या काळात म्हटल्या गेल्याप्रमाणे हिंदू) स्थापत्यशास्त्राची ही कमाल भारताबाहेर प्रकटली तरी तिचे मूळ किती जुने आहे...? म्हणजे स्थापत्यशास्त्रात आपण भारतीय किती काळापासून पुढारलेले आहोत ?


भारतातील अनेक देवळे विदेशी आक्रमकांनी आणि विशेषतः मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केली. त्यामुळे दोन / तीन हजार वर्षांपूर्वीची स्थापत्यकला आपल्याकडे दिसणं हे तसे दुर्मीळच.मात्र त्या कलेचे अंश झिरपत आलेले आहेत.


त्यामुळे अगदी हजार / दीड हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देवळांमध्येही स्थापत्यशास्त्राचे अद्भुत चमत्कार दिसतात.विजयनगर साम्राज्याची राजधानी 'हम्पी'ला होती.या साम्राज्याला तीन मुसलमान पातशाह्यांनी मिळून पराभूत केल्यानंतर त्या सर्वांनी ह्या समृद्ध हिंदू साम्राज्याला मनसोक्त लुटले.अनेक मंदिर फोडली,नष्ट केली.मात्र जी काही उरली ती आजही स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत खुणा मिरवताहेत.


हम्पीच्या एका मंदिरात प्रत्येक खांबामधून संगीताचे सा, रे, ग, म. असे वेगवेगळे सप्तसूर निघतात. 


हे त्यांनी कसं केलं असेल ? यासंबंधी काहीही लिहून ठेवलेलं नाही.असेल तरी ते आक्रमकांनी नष्ट केलंय.इंग्रजांनी ह्या स्थापत्य चमत्काराचे गूढ शोधण्यासाठी त्या संगीतमय सुरावटीतला एक खांब कापला (त्याचा क्रॉस सेक्शन घेतला). तो खांब पूर्ण भरीव निघाला..! त्याला बघून इंग्रजांचंही डोकं चालेना.अगदी एकसारख्या दिसणाऱ्या खांबांमधून संगीताचे वेगवेगळे सूर कसे उमटत असतील ? जगाच्या पाठीवर भारत सोडून इतरत्र कोठेही ही अशी खांबांमधून उमटणाऱ्या स्वरांची गंमत आढळत नाही.


फक्त इतकंच नाही,तर भारतातलं एकेक मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचं एक एक बुलंद उदाहरण आहे.ह्या मंदिरांचा वास्तुविशारद कोण, बांधकाम- प्रमुख कोण होता,ही मंदिरं कशी बांधली,ह्या सर्वांबद्दल काही म्हणता काहीही माहिती मिळत नाही.


मंदिरातील स्थापत्यशास्त्राविषयी आणि त्यातील विज्ञानाविषयी तसं अनेकांनी लिहिलंय.पण पुण्याच्या श्री. मोरेश्वर कुंटे आणि सौ. विजया कुंटे ह्या दम्पतीने दुचाकीवर फिरत महाराष्ट्राच्या अनेक दुर्लक्षित आणि उपेक्षित मंदिरांमधील 'स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आणि विज्ञानाचे अधिष्ठान'उजेडात आणले आहे.


ग्रीनविच ही पृथ्वीची मध्य रेषा आहे असे इंग्रजांनी ठरविण्याच्या बरेच आधी भारतीयांनी पृथ्वीचे अक्षांश/ रेखांश आणि मध्यरेषा यांची व्यवस्थित कल्पना केलेली होती.ती मध्यरेषा तेव्हाच्या 'वत्सगुल्म' (म्हणजे आताच्या वाशीम) मधील मध्येश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीतून जाणारी हीच रेषा पुढे उज्जयिनीत जात होती, जिथे मोठी वेधशाळा बांधण्यात आली.आजही उज्जैन आणि वाशीम हे एका सरळ रेषेत येतात. 


कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात विशिष्ट दिवशी सूर्याच्या किरणांचा प्रकाश सरळ देवीच्या मूर्तीवर पडतो हेही ह्या स्थापत्यशास्त्राच्या परफेक्शनचं उदाहरण.


स्थापत्यशास्त्रात आपण किती पुढारलेले होतो? तर ज्या काळात कम्बोडियात अंगकोर मंदिर बांधलं जात होत,त्याच काळात चीनच्या बीजिंग ह्या राजधानीची नगररचना एक हिंदू स्थापत्यशास्त्री करत होता..! होय,बीजिंग शहराचं आर्किटेक्ट हे एका हिंदू माणसाचं आहे. त्याचं नाव बलबाहू.सध्या नेपाळमधे असणाऱ्या पाटणचा हा रहिवासी.


पाटण हे कांस्य आणि इतर धातूंच्या ओतकामाबद्दल प्रसिद्ध होतं.या शहरातील लोकांनी घडविलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तीना तिबेट आणि चीनमधे मागणी होती.बाराव्या शतकाच्या मध्यावर चिनी राजाने केलेल्या मदतीच्या विनंतीला मान देऊन पाटणमधील ऐंशी कुशल कामगार चीनकडे निघाले.त्यांचं नेतृत्व करत होता,बलबाहू,जो तेव्हा फक्त १७ वर्षांचा होता.


पुढे चीनमधे बलबाहूचे आरेखन आणि बांधणीतले कौशल्य बघून चीनच्या राजाने त्याला बीजिंग शहराची रचना करण्याचे काम दिले. बलबाहूने ते सफलतापूर्वक करून दाखवले. 


चिनी संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या, उतरत्या टोकदार,डौलदार व एकाखाली एक छपरांची परंपरा बलबाहूनेच सुरू केली.

चीनमधे बलबाहू 'आर्निको' नावाने ओळखला जातो. चिनी शासनाने १ मे सन २००२ मधे बलबाहू (आर्निको) च्या नगररचनेमधील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीजिंगमधे त्याचा मोठा पुतळा उभारलाय.


२६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..


२६/१/२३

धातूचा आरसा,आपला जागतिक वारसा !

चिंचोळ्या आकारात असलेल्या केरळच्या दक्षिणेला,पण आतल्या भागात,मध्यभागी,एक लहानसं सुबक गाव आहे - अरणमुला. तिरुअनंतपुरम पासून ११६ किमी.अंतरावर असलेलं हे गाव राष्ट्रीय महामार्गावर नसलं,तरी अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे.पंपा नदीच्या काठावर वसलेल्या अरणमुलाला ओळखलं जातं ते नावांच्या (बोटींच्या) शर्यतीसाठी. 'स्नेक बोट रेस' नावाने प्रसिद्ध असलेल्या या शर्यती बघण्यास देश-विदेशांतून पर्यटक येतात.


याच अरणमुलामधे श्रीकृष्णाचे एक भव्य-दिव्य मंदिर आहे.'अरणमुला पार्थसारथी मंदिर'ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिरामुळे हे स्थान जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे.अशी मान्यता आहे की,भगवान परशुरामाने

श्रीविष्णूंची १०८ मंदिरं बांधली,त्यांपैकीच हे एक

मंदिर आहे.केरळचें प्रसिद्ध शबरीमलाई मंदिर

येथून तसे जवळच.एकाच 'पथनामथिट्टा' ह्या

जिल्ह्यात.. भगवान अय्यप्पांची जी भव्य यात्रा

दरवर्षी शबरीमलाईहून निघते,त्या यात्रेचा एक टप्पा म्हणजे हे 'अरणमुला पार्थसारथी मंदिर'..


आणखी एका गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे.ते म्हणजे येथील शाकाहारी थाळी.

'वाला सध्या'नावाच्या ह्या जेवण प्रकारात ४२ वेगवेगळे पदार्थ असतात.आणि हे सर्व,अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने,आयुर्वेदाचा विचार करून,आहारशास्त्रानुसार वाढले जातात.


अरणमुलाच्या आजूबाजूला असलेल्या संपन्न सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम असेल कदाचित,पण त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून ख्रिश्चनांनी येथे बरेच उपक्रम चालविले आहेत.येथे चर्चेसची संख्या बरीच जास्त आहे. दरवर्षी त्यांचा एक महाप्रचंड मेळावा येथे भरतो.

पण ह्या सर्व बाबींपेक्षाही एका अगदी 


आगळ्या-वेगळ्या गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे.आणि ते म्हणजे 'अरणमुळा कन्नडी!' कन्नडीचा मल्याळममधला अर्थ आहे,आरसा ! अर्थात 'अरणमुळा आरसा.' ह्या आरशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आरसा काचेचा नसून धातूचा असतो..!


जगभरात आरसे म्हणजे काचेचेच असे समीकरण आहे.


काचेला पाऱ्याचा थर लावून आरसे तयार केले जातात.सिल्वर नाइट्रेट आणि सोडियम हायड्रोक्साईड यांच्या द्रवरूपातील मिश्रणात किंचित साखर मिसळून गरम करतात आणि अशा मिश्रणाचा थर काचेच्या मागे देऊन आरसा तयार करतात.ही झाली आरसे बनविण्याची ढोबळ पद्धत.यात विशिष्ट रसायने वापरून आणि विशिष्ट प्रकारची काच वापरून सामान्य ते अत्युत्कृष्ट दर्जाचे आरसे बनविले जातात.


अर्थात ही आरसे बनविण्याची पद्धत गेल्या दीडशे-दोनशे वर्षांतली.पाऱ्याचा थर दिलेले आरसे बनविण्याचा शोध जर्मनीत लागला.

सन १८३५च्या आसपास जर्मन रसायनशास्त्रज्ञ जुस्तुस लाईबिग याने पहिला 'पाऱ्याचा थर दिलेला आरसा'तयार केला.


मात्र जगाच्या पाठीवर आरसे बनविण्याची कला फार जुनी आहे.


सर्वांत जुना म्हणजे सुमारे ८००० वर्षांपूर्वी आरशांचा उल्लेख आस्तोनिया म्हणजे आजच्या तुर्कस्थानात आढळतो.त्याच्यानंतर इजिप्तमधे आरसे मिळाल्याची नोंद आहे.दक्षिण अमेरिका, चीनमधेही काही हजार वर्षांपूर्वी आरसे वापरात होते असे उल्लेख आढळतात.


या आरशांचे प्रकार वेगवेगळे होते.दगडाचे, धातूचे,काचेचे आरसे वापरण्याच्या नोंदी आहेत. मात्र काचेशिवाय इतर धातू / दगडांपासून बनविलेले आरसे उच्च प्रतीचे नसायचे. 


तुर्कस्थानात सापडलेले आरसे हे ओब्सिडियन (म्हणजे लाव्हा रसापासून बनविलेली काच) चे होते.


आरशासंबंधी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रबंधांत किंवा विकिपीडियासारख्या ठिकाणी भारताचा उल्लेख फारसा आढळत नाही.याचे कारण म्हणजे भारतातले लिखित साहित्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात आक्रमकांनी नष्ट केले.श्रुती, स्मृती,वेद,पुराण,उपनिषदे वगैरे ग्रंथ वाचिक परंपरेच्या माध्यमातून टिकले..पण आपली प्राग-ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झाली.असे असले तरीही अजिंठ्याच्या चित्रात किंवा खजुराहोच्या शिल्पात,हातात आरसा घेतलेली, शृंगार करत असलेली रमणी आपल्याला दिसते. म्हणजे आरशाचा उपयोग हजारो वर्षांपासून भारतात सर्वमान्य होता हे निश्चित.


सध्या बेल्जियमची काच आणि बेल्जियमचे आरसे जगभरात प्रसिद्ध आहेत.मात्र त्या बेल्जियमच्या आरशांना टक्कर देतील असे धातूचे आरसे अरणमुलाला बनवले जातात. अगदी नितळ आणि आरस्पानी प्रतिमा दाखविणारे आरसे..!


हे आरसे एका विशिष्ट मिश्र धातूचे बनलेले असतात.मात्र यात नेमके कोणते धातू वापरले जातात हे अजूनही गुलदस्त्यात आहे. धातुशास्त्रज्ञांनी ह्या आरशांचं विश्लेषण करून सांगितलं की,तांबे आणि टीनच्या विशिष्ट मिश्रणाने बनविलेल्या धातूला अनेक दिवस पॉलिश केले की बेल्जियमच्या काचेच्या आरशांशी स्पर्धा करणारे आरसे तयार होतात. आणि हे ओळखले जातात,'अरणमुळा कन्नडी' ह्या नावाने.


केरळच्या अरणमुलामधे तयार होणारे हे आरसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत,कारण जगाच्या पाठीवर, इतरत्र कोठेही असे आरसे तयार होत नाहीत. किंबहुना धातूपासून इतके नितळ आणि सुस्पष्ट प्रतिमा दाखविणारे आरसे तयार करण्याचं तंत्र, ह्या एकविसाव्या शतकातही कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य झालेलं नाही.जगात प्रचलित आरशांमध्ये प्रकाशाचे परावर्तन मागून होते.मात्र अरणमुला कन्नडीमधे ते समोरच्या पृष्ठभागातून होते,आणि त्यामुळे उमटलेली प्रतिमा ही स्वच्छ आणि सुस्पष्ट असते.लंडनच्या 'ब्रिटिश म्युझियम' मध्ये एक ४५ इंचांचा भला मोठा अरणमुला कन्नडी ठेवलेला आहे,जो पर्यटकांचे आकर्षण आहे.


ह्या आरशांच्या उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे काही कुटुंबाच्या समूहाने जपलेले एक रहस्य आहे. त्यामुळे ह्या लोकांशिवाय हे आरसे इतर कुणालाही तयार करता येत नाहीत.असं म्हणतात,अरणमुलाच्या पार्थसारथी (श्रीकृष्ण) मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी,काही शतकांपूर्वी तेथील राजाने,शिल्पशास्त्रात प्रवीण असलेल्या आठ कुटुंबांना पाचारण केलं होतं. या कुटुंबांजवळ हे धातूचे आरसे तयार करण्याचं तंत्रज्ञान होतं.मुळात बांधकामात तज्ज्ञ असलेल्या या कुटुंबांजवळ हे तंत्रज्ञान कुठून आलं,याबद्दल काहीही भक्कम माहिती मिळत नाही.ही आठ कुटुंबं तामिळनाडूमधून अरणमुलाला आली हे निश्चित.यांच्याजवळ धातूंना आरशाप्रमाणे चकचकीत करण्याचं तंत्रज्ञान फार आधीपासून होतं.मात्र त्याचा व्यापारिक उपयोग करायचं काही ह्या कुटुंबांच्या लक्षात आलं नसावं.


अरणमुला पार्थसारथी मंदिराचा जीर्णोद्धार करून झाल्यावर पुढे काय ? असा विचार करत असताना या कुटुंबांनी तिथल्या राजाला चमकत्या धातूचा राजमुकुट करून दिला. राजाला तो इतका आवडला की,त्याने ह्या कुटुंबांना जागा दिली,भांडवल दिलं आणि त्यांना धातूचे आरसे तयार करायला सांगितलं.ह्या आरशांना बायकांच्या आठ सौभाग्य लेण्यांमध्ये समाविष्ट केलं.आणि तेव्हापासून ह्या कुटुंबांनी धातूंचे आरसे तयार करण्याचा पेशा पत्करला.


ह्या आरशांमागे अनेक पौराणिक कथा / दंतकथा आहेत.हा आरसा सर्वप्रथम पार्वतीने शृंगार करताना वापरला असंही मानलं जातं.विशेषतः वैष्णवांच्या पार्थसारथी मंदिराच्या परिसरात ही पौराणिक कथा शेकडो वर्षांपासून श्रद्धेने ऐकली जाते.आज हे आरसे म्हणजे जागतिक ठेवा आहे.हे सर्व आरसे हातानेच तयार केले जातात. सुमारे डझनभर आरसे तयार करायला दोन आठवडे लागतात.कोणतेही दोन आरसे सहसा एकसारखे नसतात.परदेशी पर्यटकांमध्ये ह्या आरशांबद्दल प्रचंड आकर्षण आहे.अगदी लहानात लहान,म्हणजे एक-दीड इंचाच्या आरशाची किंमत १,२०० रुपयांच्या पुढे असते.दहा- बारा इंची आरसे तर अनेकदा वीस-पंचवीस हजारांपर्यंत विकले जातात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या हे आरसे भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वापरतात.


जगाच्या पाठीवर एकमेव असलेली आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडणारी,ही धातूचे आरसे तयार करण्याची कला काही शतकांपूर्वी उजेडात आली.मात्र ती काही हजार वर्षं जुनी असावी हे निश्चित,पण मूळ मुद्दा तसाच राहतो- हजारो वर्षांपूर्वी धातुशास्त्रातली ही नजाकत,हे ज्ञान आपल्याजवळ आले कोठून.. ?


२२ जानेवारी २०२३ लेखामधील पुढील भाग..

२४/१/२३

कारण ..हे आयुष्य पुन्हा नाही..

आपल्या आयुष्यातील सर्व उंट एकाचवेळी झोपनार नाहीत.'


एक गोष्ट शिकण्यासारखी :

आपण सर्व ५ मिनिटांसाठी आप आपल्या आयुष्यातील आप आपले उंट सांभाळणाऱ्या एका राखवालदारा प्रमाणेच आहोत असे समजूया.. एका माणसाकडे १०० उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्‍या माणसाची नेमणुक केली.दुसर्‍या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्‍यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही.एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. 


नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.दोन दिवस, तीन दिवस त्याला झोप मिळाली नाही.तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र १५/२० दिवस तो झोपू शकला नाही,कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.एके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. १०० पैकी ९९ उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट पाहू लागला. मात्र तो काही झोपेना.म्हणून बर्‍याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावे लागले.


वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, "एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिलास? कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत."

त्यावर तो म्हणाला "मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही.माझ्या वेळेत मी झोपत होतो.कारण सर्व उंट एकावेळी झोपणे हे अशक्य आहे.आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे…"

Moral of the story…

मित्रांनो,आपण आपल्या आयुष्यात बर्‍याचदा असे ठरवतो,कि आता हा एक टप्पा पूर्ण केला कि मग संपलं सगळं,मग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले,की मी निवांत;मला कुठलीही काळजी नाही;मग मी आनंदात जगेन.हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं,कि मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..

त्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतो,एखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो.पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालो,असं म्हणून श्वास सोडतो;पण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.आपल्या कामांच्या आणि अपेक्षांचे,चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत,एखादा जागा राहणार आहेच,त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नका,त्याकडे "थोडसं" दुर्लक्ष करा,आणि आयुष्य उपभोगा!!! आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगने थांबाले पाहिजे...जीवनाचा आनंद घेऊया.


नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का,हे तरी आपल्याला माहीत आहे का? याचाही विचार होणं गरजेचं आहे.

बघा विचार करा..


एका सेमिनारमधील गोष्ट..