लोहस्तंभ…
दक्षिण दिल्लीत आपण मेहरोलीच्या दिशेने जाऊ लागलो की,दुरूनच आपल्याला कुतुबमिनार दिसू लागतो.२३८ फूट उंच असलेला हा मिनार म्हणजे जवळपास २३ मजली उंच इमारत.पूर्ण जगात विटांनी बांधलेली ही सर्वोच्च वास्तू आहे. जगभरातले पर्यटकही मिनार बघायला येत असतात.
साधारण ९०० वर्षं जुनी असलेली ही इमारत युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.आज जिथे हा मिनार उभा आहे,तिथे पूर्वी, म्हणजे पृथ्वीराज चौहानच्या काळात,त्याची राजधानी 'ढिल्लीका' ही होती. ह्या ढिल्लीकामधील लालकोट ह्या किल्लेवजा गढीला पाडून मोहम्मद घोरीच्या सेनापतीने, म्हणजे
कुतुबुद्दीन ऐबकाने हा मिनार बांधला.पुढे इल्तुतमिष आणि मोहम्मद तुघलकाने याचं बांधकाम पूर्ण केलं असं तिथे सापडलेले शिलालेख सांगतात.
मात्र ह्या 'ढिल्लीका' च्या परिसरात,ह्या कुतुब मिनारपेक्षा कितीतरी जास्त विलक्षण गोष्ट अनेक शतकं उभी आहे.कुतुब मिनारपेक्षाही त्या गोष्टीचे महत्त्व अनेक पटींनी जास्त आहे.कुतुब मिनारला लागूनच,साधारण शंभर,दीडशे फूट अंतरावर एक लोहस्तंभ उभा आहे.कुतुब मिनारपेक्षा बराच लहान.फक्त ७.३५ मीटर्स किंवा २४.११ फूट उंच... कुतुब मिनारच्या एक दशांश..! पण हा स्तंभ कुतुब मिनारपेक्षा बराच जुना आहे. इसवी सन ४०० च्या आसपास बनलेला हा स्तंभ म्हणजे भारतीय ज्ञानाच्या रहस्याचा खजिना आहे.
ह्या लोहस्तंभात ९८% लोखंड आहे.इतकं लोखंड म्हणजे हमखास गंजण्याची शाश्वती.मात्र गेली सोळा-सतराशे वर्षं सतत उन्हा-पावसात उभं राहूनही ह्याला अजिबात गंज चढलेला नाही.विज्ञानाच्या दृष्टीने हे एक मोठं आश्चर्य आहे.आजच्या एकविसाव्या शतकातही,प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात,धातुशास्त्रात अनेक प्रयोग, शोध आणि संशोधनं होऊनही ९८% लोखंड असलेला स्तंभ,गंजल्यावाचून राहत नाही.त्या स्तंभावर एखादं 'कोटिंग' केलं तर तो स्तंभ फक्त काही काळ गंजल्यावाचून राहू शकतो.मग ह्या लोहस्तंभात असं काय वैशिष्ट्य आहे की, हा स्तंभ आजही जसाच्या तसा उभा आहे..?
आय.आय.टी.कानपूरच्या 'मटेरियल्स अँड मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग' विभागाचे प्रमुख प्रोफेसर आर.सुब्रमण्यम यांनी यावर बरंच काम केलेल आहे.इंटरनेटवरही त्यांचे ह्या विषयासंबंधी अनेक पेपर्स मिळतात.
प्रो.सुब्रमण्यम यांच्या मतानुसार लोह-फॉस्फरस संयुगाचा उपयोग इसवी सनाच्या चारशे वर्षांपूर्वी,म्हणजे अशोकाच्या काळात,भरपूर व्हायचा.आणि ह्या पद्धतीनेच हा लोहस्तंभ तयार करण्यात आलेला आहे.
प्रो. सुब्रमण्यम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ह्या स्तंभावर वेगवेगळे प्रयोग करून हे सिद्ध करून दाखवलंय.त्यांच्या म्हणण्यानुसार लोखंडाला गंजनिरोधन करण आजच्या तंत्रज्ञानापुढचं मोठं आव्हान आहे.बांधकाम व्यवसाय,मेकॅनिकलशी संबंधित उद्योग यात अशा गंजरोधक लोखंडाची आवश्यकता असते आणि त्यासाठी इपोक्सी कोटिंग,कॅडोडिक प्रोटेक्शन पद्धत इत्यादी वापरल्या जातात.मात्र या साऱ्या पद्धती गंज लागणं लांबवतात.पूर्णपणे थांबवत नाहीत. गंज लागू द्यायचा नसेल तर त्या लोखंडातच गंजरोधक थर निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे.आज एकविसाव्या शतकात असे लोखंड निर्माण होऊ शकलेले नाही जे स्वत:च असा गंजरोधक थर निर्माण करते..!
पण भारतात चौथ्या शतकात असे लोखंड निर्माण होत होते,आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे दिल्लीचा लोहस्तंभ.हा लोहस्तंभ मुळात दिल्लीसाठी बनलेलाच नव्हता.
चंद्रगुप्त विक्रमादित्य या प्रसिद्ध राजाने इसवी सन ४०० च्या आसपास हा स्तंभ,मथुरेतील विष्णु मंदिराच्या बाहेर लावण्यासाठी बनवला होता.या स्तंभावर गरुडाची मूर्ती पूर्वी विराजित झाली असावी.त्यामुळे याला 'गरुडस्तंभ' असेही म्हटले जाते.
ह्याला आधार आहे,ह्या स्तंभावर ब्राम्ही लिपीत कोरलेला एक संस्कृत श्लोक.चंद्र नावाच्या राजाच्या स्तुतीने भरलेला हा श्लोक विष्णुमंदिरा समोरच्या ह्या स्तंभाचं महत्त्व सांगतो.चंद्र नावावरून आणि चौथ्या शतकात हा स्तंभ तयार केला गेला असावा असा विचार करून,चंद्रगुप्त विक्रमादित्याने हा स्तंभ बांधला असावा असा तर्क काढण्यात आला.या कोरलेल्या श्लोकाची शैली ही गुप्तकालीन वाटत असल्याने ह्या तर्काला बळकटी मिळते.मथुरेजवळ असलेल्या विष्णुपद ह्या पर्वतावरील विष्णु मंदिरासमोर बांधण्यासाठी हा स्तंभ तयार करण्यात आल्याची नोंद ह्या श्लोकात मिळते.
(मात्र अनेक इतिहासतज्ज्ञांचे मत असे नाही. त्यांच्या मते इसवी सनापूर्वी ९१२ मधे हा स्तंभ बनवण्यात आला आहे.)
७ मीटर उंच असलेला हा स्तंभ,५० सेंटीमीटर (म्हणजे साधारण पावणे दोन फूट) जमिनीखाली आहे.४१ सेंटीमीटरचा व्यास खाली तळाशी तर ३० सेंटीमीटरचा व्यास वर टोकाला आहे.पूर्वी, म्हणजे सन १९९७ पर्यंत,पर्यटक ह्या स्तंभाला पाठीमागून कवेत पकडण्याचा प्रयत्न करायचे. अशा प्रकारे स्तंभ कवेत आला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जायचं.पण त्यामुळे स्तंभाच्या लोखंडाला ठोकणे,त्यावर कोरण्याचे प्रयत्न करणे असं सगळं व्हायला लागल्यामुळे सन १९९७ पासून आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने या स्तंभाभोवती एक संरक्षक फेन्सिंग उभारले.त्यामुळे आता ह्या लोहस्तंभाला प्रत्यक्ष स्पर्श करणं शक्य नाही.
इतिहासातून बाहेर निघालेला हा एकटाच लोहस्तंभ अपवाद म्हणून आपल्याला दिसतो का..? तर तसे नाही. इतरही काही ठिकाणी असे न गंजलेले लोहस्तंभ उभे राहिलेले दिसतात.
भारतात ही कला इसवी सनापूर्वी सहाशे,सातशे वर्षं (किंबहुना त्याही पूर्वी) होती असे अनेक पुरावे मिळालेले आहेत.सोनभद्र जिल्ह्यात राजा नाल-का-टीला,छत्तीसगडमधील मल्हार आणि पश्चिम बंगालमधील पांडुराजार धिबी व मंगलकोट ह्या जिल्ह्यांत उत्तम प्रतीच्या लोखंडाचे अनेक अवशेष सापडले आहेत.आणि हे सर्व पुरावे नि:संशयपणे हेच सांगताहेत की, लोखंडाचं धातुकर्म भारतात विकसित झालं. अत्यंत उच्च प्रतीचं लोखंड भारतात तयार व्हायचं, शअसं त्या काळातल्या विदेशी प्रवाशांनीही लिहिलेलं आढळतं.
भारतात त्या काळापासून लोखंड तयार करणारे विशिष्ट समूह आहेत.त्यांपैकी 'आगरिया लोहार' समाज हा आजही,कोणतीही आधुनिक यंत्र न वापरता,जमिनीतील खाणींमधून लोखंडाची माती गोळा करतो.मातीतून लोखंडाची दगडे वेचून त्या दगडांवर प्रक्रिया करतो आणि या सर्व प्रक्रियेतून शुद्ध लोखंड तयार करतो.लोखंड निर्माण करण्याची ही आगरिया लोहार समाजाची परंपरागत पद्धत आहे.
'आगरिया' हा शब्द 'आग' ह्या शब्दापासून तयार झाला आहे.लोखंडाच्या भट्टीचे काम म्हणजे आगीचे काम. म्हणूनच 'आगरिया' हा शब्द.मध्य प्रदेशातल्या मंडला,शहडोल,अनुपपूर आणि छत्तिसगढच्या बिलासपूर आणि सरगुजा ह्या जिल्ह्यांत हा समाज आढळतो.हा समाज म्हणजे गोंड समाजाचेच अंग समजले जाते. ह्या समाजात दोन पोट-जाती आहेत -'पथरिया' आणि 'खुंटीया' यापैकी लोखंडाची भट्टी तयार करताना जे दगडाचा उपयोग करतात,ते झाले पथरिया (पत्थर म्हणजे दगड) आणि जे भट्टी तयार करताना खुंटीचा वापर करतात,ते झाले खुटीया.आजही ह्या समाजाच्या उपजीविकेचे साधन हे लोखंड 'तयार' करून त्यापासून अवजारं आणि हत्यार तयार करण्याचं आहे. भोपाळच्या संगीत वर्मा ह्या दिग्दर्शकाने ह्या आगरिया लोकांवर एक वृत्तचित्र तयार केलं आहे.ह्या वृत्तचित्रात जंगलातल्या मातीतून लोखंडाचे दगड निवडण्या पासून तर लोखंडाची अवजारं तयार करण्यापर्यंत पूर्ण चित्रण केलेलं आहे.
म्हणजे दोन-अडीच हजार वर्षांपासूनची ही धातुशास्त्राची परंपरा,फक्त या जमातीत का होईना,झिरपत झिरपत शिल्लक राहिलेली आहे. मग राजाश्रय आणि लोकाश्रय असताना अडीच हजार वर्षांपूर्वी ह्या धातुशास्त्राच्या कलेचं स्वरूप कसं असेल..?
नुसत्या कल्पनेनंच मन थक्क होतं..!
१४ जानेवारी २०२३ मधील लेखातील पुढील भाग…
पुढील भागात पाहू-अदृश्य शाईचे रहस्य..