जीवनाचा मथित अर्थ काढायचा तर एका वेळी एकच दिवस हाती येतो.तो दिवस म्हणजे आजचा दिवस.
जेसन स्टीव्हन्सच्या सर्वोत्तम देणगीच्या शोधप्रवासाच्या या अकराव्या महिन्यात आम्ही प्रवेश करत होतो,आणि मला भान आलं की,या महिन्यात रेड स्टीव्हन्सची प्रथम पुण्यतिथी येणार आहे.माझा आयुष्यभराचा मित्र आणि सखा,त्याचा विचार मी वारंवार करीत असे. रेड स्टीव्हन्स आणि मी अगदी पूर्णतःभिन्न पार्श्वभूमितून आलेलो होतो,आणि वरवर पाहिलं तर,आमच्यात तसं काही साम्य नव्हतं.पण कुठेतरी आम्हा दोघांत आलेला समान धागा आम्हाला सापडला,आणि यामुळे पाच दशकांहून जास्त टिकलेली आमची मैत्री विकसित झाली अन जोपासली गेली.
सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,
डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर
EMBASSY BOOK DISTRIBUTORS
रेड स्टीव्हन्स याची,अचाट असलेला माणूस म्हणून मला नेहमी आठवण राहील.बॅकबे बोस्टनमधल्या माझ्या कार्यालयात निवांत असलेला मी,तर रेड स्टीव्हन्स टेक्ससमध्ये मजेत असलेला.कसं कोण जाणे हे सगळं त्याला अगदी मान्य असायचं.रेड सारखी माणंस घडायची तर टेक्सससारखंच ठिकाण हवं.
पूर्वी कोणीतरी म्हणून गेल्याचं माझ्या ऐकण्यात होतं की कुणाला एकच जरी मित्र असला,तरी तो माणूस एकटा पडत नाही.रेड स्टीव्हन्ससारखा मित्र कोणाला लाभला तर तो कधीच एकटा पडणार नाही,एवढं मात्र मी खात्रीने म्हणतो.तो कायम माझ्यासोबत असणार हे मला ठाऊक होतं.सर्वोत्तम देणगी मिळण्याकडे एकेक पायरी ओलांडायची,याकरिता जेसनला साथ करायची जबाबदारी त्यानं माझ्यावर टाकली होती,याचा मला अभिमान वाटला.
जेसन स्टीव्हन्स आला तेव्हा माझ्या मनात असे विचार होते.
आमच्या कायदेविषयक फर्मच्या कॉन्फरन्स रूममध्ये आमच्या सवयीच्या जागी आम्ही जाऊन बसलो,बरोबर ठरल्यासारखा पुन्हा एकदा रेड स्टीव्हन्स व्हिडिओ टेप आणि तो खोलीच्या टोकाला असलेला मोठा पडदा यांच्यामार्फत आमच्यासामोर आला.तो हसला आणि मोठ्यानं म्हणाला,
"अभिनंदन,जेसन. मी आज तुझ्याशी बोलतोय याचा अर्थ मिस्टर हॅमिल्टनने मागच्या महिन्यात तू सर्वोत्तम देणगी ज्या प्रकारे हाताळलीस,तिला संमती दिली आहे.
'जेसन,तुला हे माहीत हवं की मी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तुला सर्वोत्तम देणगी देण्याच्या विचारात असतांना मी तुझ्याबद्दल विचार करण्यात खूप काळ खर्च केला.रोज सकाळी करण्याच्या माझ्या सोनेरी यादीत तुला कायम स्थान मिळाले आहे.तू अणि मी यांच्यात रक्ताच्या नात्यापलीकडे जाणारा,एकच कौटुंबिक वारसा आहे. याची मला धन्यता वाटते."
रेड असं बोलत होता,तेव्हा जेसन मान डोलवत असलेला मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं.
रेड पुढं बोलत होता,"माझं मृत्युपत्र करण्याच्या कामातून मी जात होतो,आणि माझं जगणं आणि माझा मृत्यु यांचा विचार करीत होतो तेव्हा,मी माझ्या जगण्यातल्या सर्व मूलतत्त्वांना विचारात घेतलं,त्यांनी ते एक खास रसायन बनवलं होतं.मी खूप आठवणींना उजाळा दिलाय आणि त्या सर्व आठवणी मी एखाद्या खजिन्याप्रमाणे संभाळतो.
"जेव्हा आपल्याला मृत्युच्या छायेचं भान येतं,तेव्हा आपण आयुष्याचा हिशोब मांडतो,किती जगून झालं, आणि किती जगायचं राहिलं,वाळूच्या घड्याळात वाळू सरकत असते,तसं असंत ते.आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला वाटत रहातं,हा आयुष्याचा एकच दिवस राहिलाय.तेव्हा,किंवा मरायच्या दिवशी आपण कसे जगायचे याचा मी विचार करत असे.मला असं लक्षात आलं की,तो दिवस पुढे पुढे ढकलण्याचं चित्र मनात नीट ठसलं तर जीवनाचा गाभा माझ्या हाती लागला आहे,कारण आयुष्य म्हणजे दिवसांमागून जाणारे दिवस याहून दुसरं काय असतं ? एक दिवस,त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायला आपण शिकलो तर आपलं जीवन खूप अर्थपूर्ण होईल आणि समृद्ध होईल.
"जेसन,पुढच्या तीस दिवसांत,तू तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा घालवशील याची योजना तू करायची आहेस.महिन्याच्या शेवटी,माझी मागणी अशी आहे की तू त्याचा सविस्तर अहवाल मिस्टर हॅमिल्टनला सांगायचा.एका दिवसाच्या वेळात जीवनाचा केवढा भाग सामावता येतो,याचा तुला शोध लागेल आणि मग ज्याचा शोध मला लागला,त्याचाच शोध तुलाही लागेल. जास्तीत जास्त जगणे भोगण्यासाठी आपण शेवटच्या दिवसाची का बरं वाट बघायची ? या शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम आखण्यासाठी लागेल अशी सगळी साधनसामग्री तुझ्याजवळ आहे,मी तुला आजच्या आणि उरलेल्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसासाठी शुभेच्छा देतो."
पडद्यावरून रेड स्टीव्हन्स दिसेनासा झाला.
जेसननं दीर्घ श्वास सोडला,आणि म्हणाला, "माहिती आहे,आयुष्याचा शेवटचा दिवस किंवा मृत्यू याबद्दल मी खरंच अजिबात विचार केला नाहीये."
मी हसून उत्तर दिलं,"मी तुझ्या वयाचा असताना मी ही याचा फार विचार केला नव्हता.
पण मला वाटतं,तुझे आजोबा तुला जे शिकवण्याचा प्रयत्न करताहेत ते असं की,पद्धतशीर विचार केला तर खूप काही मिळण्यासारखं आहे,आणि मला तर खरंच वाटतं की याचा विचार आपण तरूण वयात केला तर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढेल." जेसन आणि मी उठून हस्तांदोलन केलं,आणि महिनाभरात दिवस ही एक देणगी कशी असते याचा शोध घ्यायला,त्या विचारसृष्टीत जायला,जेसन निघून गेला.जेसनहून माझं निराळं होतं.मी आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा घालवणार याचा काही विचार मी केला होता.त्या शेवटच्या चोवीस तासांत मला काय उरकायला आवडेल असं मनांत येत होतं. महिनाभर माझ्या मनांत हेच विचार येत राहिले.
महिन्याच्या अखेरीस,जेसन स्टीव्हन्स माझ्या कार्यालयात आला.एका मोहिमेवर निघालेल्या माणसाची त्याची चालचलणूक होती.तो माझ्या अशिलांसाठी असलेल्यापैकी एका खुर्चीत बसला, आणि मिस् हेस्टिंग्ज दुसरीत बसली.
मी म्हटलं,"तुला पुन्हा भेटायला छानच वाटतंय,जेसन हा महिना तुझ्यासाठी सफल झाला असावा."
जेसन उत्साहानं उद्गारला,"अगदी मौज वाटली.मी मरण्यापूर्वी जे जे करावसं वाटणार,ते ते सर्व काही एका दिवसात मावण्याइतका दिवस पुरेल,याची मला खात्री नाहीये.अगदी विस्मयकारक गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी कराव्याशा वाटतात अशा गोष्टी अगदी सामान्य आणि साध्यासुध्या आहेत.
"सुरुवातीला मी या गोष्टीचा विचार करायला लागलो, तेव्हा वाटलं,एका उंच पर्वतावर जाऊन यावं किंवा एखादी भव्य कलाकृती निर्माण करावी,किंवा असंच काहीतरी.पण नीट विचार केल्यावर,असं लक्षात आलं की सुंदर,छोट्याछोट्या गोष्टींनी माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस खरोखर मला भरून पावेल."
जेसन थांबला,आणि मिस् हेस्टिंग्ज आणि मी दोघांकडे त्यानं पाहिलं.त्यानं कोटाच्या खिशात हात घातला आणि एक लहानसा कागद बाहेर काढला.त्या टिप्पणाकडे एक नजर टाकून पुन्हा तो बोलायला लागला.
"माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी मी सकाळी लवकर उठणं पसंत करीन.वाया घालवायला वेळ नसेल.अंथरूण सोडण्याच्याही आधी मला ज्या ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते,त्या गोष्टींची उजळणी करीन, आणि माझ्या मनाची सोनेरी यादी तयार करीन.पण मागच्या महिन्यात जशी तयार केली तशी ती दहा गोष्टींपर्यंत मर्यादित नसेल,मला वाटतं आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशी मी ज्यासाठी धन्य असावं अशा बऱ्याच गोष्टींची भर घालावी लागेल.
"घराच्या मागच्या उघड्या ओट्यावर कांही खास मित्रांच्या समवेत जरा लवकरच नाश्ता करायला आवडेल,मला माझ्या आयुष्यात त्यास किती मोठ स्थान आहे हे मी त्यांना सांगेन त्यांच्यातल्या प्रत्येकाला मी अशी भेट देईन की ती मिळाल्यामुळे त्यांचे सर्व आयुष्य सार्थकी लागेल.'नाश्ता झाल्यावर मी काही खास लोकांशी फोनवर बोलणार.
टेक्सासमधला गस कोल्डवेल,दक्षिण अमेरिकेतली रेड स्टीव्हन्स वाचनालयात येणारी माणस, मेनमध्ये राहणारी ती वसतीगृहातली मुलं आणि अशी बरीचजण आहेत.असे कांही नातेवाईक आहेत की मी ज्यांच्याशी फारसे चांगले संबंध ठेवले नाते आणि इतर असेच लोक आहेत,त्यांना मी फोनवर भेटणार. त्यातल्या प्रत्येकाला मी सांगेन की आपल्यामध्ये जे चुकलंमाकलं त्याबद्दल मी दिल्लगीर आहे.मी जे करतोय ते त्यांनीही करावं अम मी त्यांना सागेन ते असे की चांगल्या आठवणी तेवढ्या ठेवून वाईट आठवणींची छुट्टी करायची.
"दुपारच्या जेवणासाठी मी ब्रायनला कुठेतरी बाहेर घेऊन जाईन,आणि त्याला हवं ते खायला घालीन, त्याची त्याच्या जीवनाबद्दल जी स्वप्न असतील त्यात मी वाटेकरी होईन.
"सरत्या दुपारी मी साध्या साध्या गोष्टींचा आनंद लुटणार.त्यात बागेत फिरायला जाणं असेल.या वर्षाच्या सुरुवातीला रूग्णालयातून आलेली ती एमिली,ती असावी माझ्यासोबत.नंतर बोस्टनच्या धक्क्यावर जाऊन एखादी बोटीतनं छोटीशी चक्कर मारीन,आणि कलादालनाला भेट देऊन येईन.
"मग संध्याकाळी मी एक खास पार्टी देणार.त्यात माझे सगळे मित्र,त्यांचे मित्र आणि खास म्हणजे तुम्ही दोघे असाल,पार्टीच्या शेवटी मी तिथल्या स्टेजवर सर्वांसमोर उभा राहून माझे आजोबा रेड स्टीव्हन्स यांनी मला जी सर्वोत्तम देणगी दिली.त्याबद्दल सांगेन,मी त्याचं व्हिडिओ टेप रेकॉर्डिंग करून घेणार म्हणजे मला जे हवंय,की मी मेल्यानंतरही अशा मस्त देणगीचा लाभ माझ्यासारख्या इतरही सर्व तरुणांना होईल."
जेसननं मिस् हेस्टिंग्जकडं आणि माझ्याकडं ओझरतं पाहीलं आणि परत त्याच्या कागदाकडे पाहिलं.काही क्षणांनी त्यानं कागदाची घडी घातली आणि तो परत खिशात ठेवून दिला.तो म्हणाला,"खरं तर खूप गोष्टी आणखी करायच्या होत्या,आणि त्या सगळ्या चांगल्याही होत्या.पण मी ज्या लिहिल्यायत त्या मला वाटलं,माझ्या शेवटच्या दिवसात बरोबर बसवता येतील."
मी हसून म्हटलं,"जेसन,शेवटचा दिवस घालवण्याचा याहून दुसरा चांगला मार्ग मला तरी ठाऊक नाही.मला वाटतं,तुझ्या रेड आजोबांच्या मनांतलं दिवस म्हणजे एक देणगी कशी असते हे तुला नीट समजलंय,यावर आपलं सर्वांचं एकमत असणार."
जेसन उठला,आणि माझ्याशी मनापासून हस्तांदोलन करून मिस् हेस्टिंग्जला उराउरी भेटला.मिस् हेस्टिंग्ज त्याला पोचवायला लिफ्टपर्यंत गेली,तेव्हा एका वर्षापूर्वी माझ्या कार्यालयात आलेला तो रागीट दुर्मुखलेल्या चेहऱ्याचा तरूण मला आठवला.मला माहीत आहे,रेड स्टीव्हन्स हसतोय आमच्या कडे बघून.
अपूर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….