* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/३/२३

देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध

मानवजात जणू एकाच कुटुंबाची आहे.एकाच कुटुंबाच्या अनेक शाखा सर्वत्र पसरल्या आहेत. आकाशातील इतर तेजोगोलांच्या मानाने पृथ्वी ही फारच लहान आहे;आणि लहानशा पृथ्वीवरील हे मानव कुटुंब म्हणून फारच लहान वाटते.आणि या सर्व विश्वपसाऱ्यात पृथ्वीवरीलमानवासारखा प्राणी अन्यत्र नाही.असे आजचे ज्ञान तरी सांगत आहे.सर्व विश्वात अपूर्व व अद्वितीय असा हा मानव आहे.

त्याच्या जातीचा प्राणी विश्वात अन्यत्र नाही.

मानवजातीचे सारे सभासद परस्परांशी प्रेमाने व बंधुभावाने वागतील,असे वाटणे स्वाभाविक आहे.

परंतु आश्चर्य वाटते,की दोन मानवजाती जर एकत्र आल्या,तर त्यांचा परस्परांत पहिला परिचय जो होतो,तो मारामारीच्या रूपाने होतो.या मानवात काहीतरी विचित्र वेडेपणा आहे असे वाटते.


हा मानवी वेडेपणा आपण इजिप्तमध्ये,मेसापोटेमियामध्ये

व पॅलेस्टाईनमध्ये पाहिला.हा वेडेपणा दूर करू पाहणाऱ्या काही संस्फूर्त अशा दैवी पुरुषांचे प्रयत्नही आपण पाहिले.

आता आपले लक्ष पृथ्वीच्या दुसऱ्या एका भागाकडे देऊ या.हिमालयाच्या खिंडीतून जे लोक हिंदुस्थानाच्या मैदानात उतरले,त्यांनी ऐतिहासिक जीवनाची पहिली

मंगलप्रभात कशी सुरू केली, ते जरा पाहू या.


कित्येक शतके हिंदुस्थान जगापासून अलगच होता!एका बाजूस हिमालय,दुसऱ्या बाजूस अपरंपार सागर या दोन मर्यादांमध्ये त्या हिमयुगात आलेले काही खुजे कृष्णवर्ण लोक येऊन राहिले होते.हे रानटी काळे लोक सदैव भटकत असत.आपले कळप बरोबर घेऊन त्यांना चारीतचारीत ते सर्वत्र हिंडत हळूहळू त्यांनी ओबडधोबड अशी दगडी हत्यारे शोधली. पुढे काही हजार वर्षांनंतर त्यांनी तांब्याचा शोध लावला.मेसापोटेमिया व इतर पाश्चिमात्य देश यांच्याशी थोडाफार दर्यावर्दी व्यापार त्यांनी सुरू केला.


जवळजवळ दहा हजार वर्षे मूळच्या हिंदुस्थानी लोकांनी हे प्राथमिक जीवन चालविले.


परंतु हिमालयापलीकडे दुसरी एक उत्साही मानवजात वाढत होती.हे लोक उंच, गौरवर्णी व सामर्थ्यसंपन्न होते.

आशियाच्या वायव्य दिशेस कास्पियन समुद्राजवळ हे प्रथम राहत होते.पाच हजार वर्षांपूर्वी त्याच्यांत एक प्रकारची अस्वस्थता व प्रक्षुब्धता पसरली.त्याच्यांत एकदम चैतन्य संचरले.ते पृथ्वीच्या सर्व भागांत पसरू लागले.काही मध्य आशियातील इराणात आले.आणि म्हणून या सर्वांनाच 'इराणियन' किंवा 'आर्यन' असे नाव मिळाले.


आंतरिक प्रेरणेने हे आर्य सर्वत्र पसरले आणि बहुतेक सर्व युरोपियन राष्ट्रांचे पूर्वज बनले.तसेच मेडीस,इराणी व हिंदू यांचेही ते पूर्वज होते.हिंदू व युरोपियन हे एकाच पूर्वजांपासून जन्मलेले आहेत हे स्पष्टपणे दाखविण्यासाठी काही इतिहासकार 'आर्य' या शब्दाऐवजी 'इंडायुरोपीय जात' असा शब्द वापरतात.


हे इंडोयुरोपियन किंवा आर्य जेव्हा पर्वत ओलांडून हिंदुस्थानात येऊ लागले,तेव्हा या देशात राहणाऱ्या त्या खुजा व कृष्णवर्णी लोकांकडे ते तुच्छतेने पाहू लागले.या मूळच्या रहिवाश्यांना ते 'दस्यू' म्हणत.ते त्यांचा निःपात करू लागले.पुष्कळांना त्यांनी गुलामही केले.


अशा रीतीने हिंदुस्थानात जातिभेद प्रथम जन्माला आला.नवीन आलेले आर्य हे वरिष्ठ वर्ग बनले.आणि येथील जित लोकांना त्यांनी अस्पृश्य केले.आर्यांमध्ये माणसा-माणसांत हे उच्चनीच भेद मानण्याची जी मूर्ख पद्धती होती,ती अद्यापही तशीच आहे.तशीच आहे. हिंदुस्थानात नव्हे;तर 


युरोपात व अमेरिकेतही वरती ब्राह्मण व खाली तळाला अस्पृश्य असे प्रकार आहेत.ब्राह्मण

व अस्पृश्य दोघेही मेल्यावर निःपक्षपाती किड्यांना सारखीच गोड मेजवानी देतात,ही गोष्ट दिसत असली,तरीही हे मूर्खपणाचे भेद केले जातच आहेत. 


परंतु सध्या प्राचीन हिंदुस्थानाकडे पाहावयाचे आहे.


ख्रिस्त शतकापूर्वी सुमारे दोन हजार वर्षांच्या सुमारास आर्य हिंदुस्थानावर स्वारी करू लागले. आर्यांची ही स्वारी कित्येक शतके सारखी सुरू होती.हे आर्य हिंदुस्थानात आले.त्यांनी ठायीठायी राज्ये स्थापिली.या नव्या देशात निरनिराळी सोळा राज्ये त्यांनी स्थापिली,प्रत्येक जण आपापल्या राज्यात गुण्यागोविंदाने राहात होता. हत्तीची,वाघाची शिकार करीत,भूमीचे येणारे विपुल उत्पन्न उपभोगीत,एक प्रकारचे सुखी व निश्चित असे जीवन ते कंठीत.त्यांचे ते जीवन जणू स्वप्नमय होते.ते प्रत्यक्षापेक्षा कल्पना सृष्टीतीलच जणू भासे.देश उष्ण होता.जमीन सुपीक होती,विपुल होती,आणि थोड्याशा श्रमाने भरपूर पिके.फारसा वेळ काबाडकष्टात दवडावा लागत नसे.भव्य महाकाव्ये रचायला व तत्त्वज्ञाने गुंफायला त्याना भरपूर वेळ होता.पऱ्यांच्या गोष्टी लिहायला व जीवनाच्या गूढतेचा शांतपणे विचार करायला त्यांना वेळ होता.अशा या वातावरणात त्या ज्यू प्रेषिताच्या,जेरिमियाच्या,जन्मानंतर पन्नास वर्षांनी बुद्ध जन्माला आले.


बुद्धांचे मूळचे नाव शाक्यमुनी सिद्धार्थ,शाक्य कुळात त्यांचा जन्म झाला.हिमालयाच्या छायेखाली उत्तर हिंदुस्थानाच्या एका भागात त्यांचा जन्म झाला.लहानपणी त्या हिमालयाकडे त्यांनी अनेकदा पाहिले असेल.बर्फाची पांढरीशुभ्र पागोटी घालून शांतपणे उभ्या असलेल्या महाकाय देवांच्या जणू मूर्तीच अशी ती हिमालयाची शिखरे बुद्धांना आकृष्ट केल्याशिवाय कशी राहिली असतील ? हिमालयाची ती उत्तुंग,धवल शिखरे खालच्या मुलांचे चाललेले खेळ मोठ्या करुणेने पाहात असतील व म्हणत असतील,'किती पोरकट यांचे हे पोरखेळ!'


बुद्धांचा पिता शाक्य जातीचा राजा होता. राजवाड्यात सुखोपभोगात हा बाळ वाढला. बुद्ध अत्यंत सुंदर होते.राजवाड्यातील महिलांचा तो आवडता होता.राज्यात भांडणे नव्हती. लढाया व कारस्थाने नव्हती.

खाणेपिणे,गाणे, शिकार करणे,प्रेम करणे,मजा करणे म्हणजेच जीवन,वाटले तर स्वप्नसृष्टीत रमावे.हिंदूंसारखे स्वप्नसृष्टीत रमणारे दुसरे लोक क्वचितच असतील एकोणिसाव्या वर्षी गौतमाचे लग्न झाले.पत्नीचे नाव यशोधरा.सुखाचे,गोड असे सांसरिक जीवन सुरू झाले.

कशाचा तोटा नव्हता.एखाद्या पऱ्यांच्या गोष्टीतील राजाराणीप्रमाणे दोघे स्वप्नसृष्टीत जणू रंगली. मानवजातीपासून जणू ती दूर गेली.अशी दहा वर्षे गेली.अद्याप मूलबाळ नव्हते.तीच काय ती उणीव होती.गौतम सचित झाला.ईश्वराने सारे दिले.परंतु मुलाची सर्वोत्तम देणगी त्याने का बरे दिली नाही,असे मनात येई.अत्यंत सुखी अशा जीवनात विफल आशा का बरे असाव्यात ? दुधात मिठाचे खडे का पडावेत ? हे जीवन जगण्याच्या लायकीचे तरी आहे का ?


एके दिवशी रथात बसून तो हिंडायला बाहेर पडला होता.सारथी छत्र होता.रस्त्यावर एक जीर्णशीर्ण म्हतारा मनुष्य त्यांना आढळला.त्याचे शरीर गलित झाले होते.जणू सडून जाण्याच्या बेतात होते.त्याचा सारथी म्हणाला,'प्रभो,जीवन हे असेच आहे.आपणा सर्वांची शेवटी हीच दशा व्हायची आहे.'पुढे एकदा रोगग्रस्त भिकारी त्यांना आढळला.सारथी म्हणाला,"हे जीवन असेच आहे.येथे नाना रोग आहेत." गौतम विचारमग्न झाला इतक्यात न पुरलेले असे एक प्रेत दिसले.ते प्रेत सुजलेले होते,विवर्ण झाले होते.घाणीवर माशांचे थवे बसावेत,त्याप्रमाणे प्रेताभोवती माशा घोंघावत होत्या.

सारथी छत्र म्हणाला, "जीवनाचा शेवट असा होत असतो." 


(मानवजातीची कथा - हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन,साभार)


इतके दिवस गौतम राजवाड्यातील सुखांत रंगलेला होता.

अशी दुःखद दृश्ये त्याने पाहिली नव्हती.परंतु आज जीवनातील दुःख;क्लेश त्याने पाहिले.या जीवनाची शेवटी चिमूटभर राख व्हायची,हे त्याने जाणले.जीवनाचा हा केवढा अपमान! साऱ्या खटाटोपाची का अशीच इतिश्री व्हायची ? त्या ज्यू प्रेषितांप्रमाणे बुद्धांनीही निश्चय केला.मानवी दुःखावर उपाय शोधून काढण्याचे त्यांनी ठरविले.ज्यू धर्मात्मे

'मनुष्यप्राणी मूर्ख ओरडत होते.'परंतु बुद्ध एक पाऊल पुढे गेले.

ईश्वराच्या दुष्टपणाविरुद्ध बुद्धांनी बंड आरंभिले.


अति सुखामुळे गौतम उदासीन झाले होते.त्या सुखाचा त्यांना वीट आला होता.आपल्या या उदासीनतेतून अधिक उच्च व उदात्त असे सुख शोधण्यासाठी ते उभे राहिले.परिवाज्रक यती व्हावयाचे त्यांनी ठरविले.सर्वसंगपरित्याग करून बाहेर पडण्याचे त्यांनी ठरविले.चिंतनाने,उपवासाने मानवी भवितव्याचे कोडे सोडवता येईल असे त्यांना वाटत होते.


इतक्यात आपल्याला मुलगा झाला आहे असे त्यांना कळले.नवीन एक बंधन निर्माण झाले; परंतु ती सारी कोमल व प्रेमळ बंधने निग्रहाने तोडण्याचे त्यांनी नक्की केले.


एके दिवशी पुत्रजन्मानिमित्त मेजवानी होती. बुद्धांच्या पित्याने खास सोहळा मांडला होता.आणि 


त्याच दिवशी मध्यरात्री निघून जाण्यासाठी बुद्धांनी सिद्धता केली.सारी मंडळी दमून भागून झोपलेली होती.बुद्ध उठले.पत्नीकडे त्यांनी शेवटचे पाहिले.

लहान बाळ तिथे आईच्या कुशीत होते.बुद्धांच्याच जीवनातील जीवनाने ते सुंदर सोन्याचे भांडे भरलेले होते.त्या मायलेकरांचे चुंबन घ्यावे असे त्यांना वाटले.परंतु ते जागे होतील या भीतीने त्यांनी तसे केले नाही.ते तेथून निघाले.त्यांनी आपल्या सारथ्याला दोन वेगवान घोडे तयार करण्यास सांगितले.त्या घोड्यांवर बसून दोघे दूर गेले.सर्व प्रेमळ बंधने तोडण्यासाठी त्यांना लांब जाणे भाग होते. जीवनाचे रहस्य शोधण्यासाठी जो मार्ग त्यांना घ्यावयाचा होता,तो मार्ग अनंत होता.पाठीमागे एकदाही वळून न पाहता सकाळ होईपर्यंत ते खूप दूर गेले.


आता उजाडले होते.आपल्या पित्याच्या राजाच्या सीमांच्या बाहेर ते होते,एका नदीतीरी ते थांबले. बुद्ध घोड्यावरून उतरले.त्यांनी आपले ते लांबसुंदर केस कापून टाकले.अंगावरचे रत्नालंकार त्यांनी काढले.ते छत्राला म्हणाले,"हा घोडा,ही तलवार ही हिरेमाणके,हे सारे परत घेऊन जा." छत्र माघारी गेला.बुद्ध आता एकटे होते.ते पर्वतावर गेले.तेथील गुहांतून ऋषिमुनी जीवन-मरणाच्या गुढाचा विचार करीत राहात असत.वाटेत स्वतःची वस्त्रेही एका भिकाऱ्या जवळ त्यांनी बदलली.

त्यांच्या अंगावर आता फाटक्या चिंध्या होत्या.

राजवैभवाचा त्यांना वीट आला होता.ज्ञानशोधार्थ बुद्ध आता एकटे फिरू लागले.


ते त्या ऋषिमुनींच्या सान्निध्यात गेले.तेथील एका गुहेत ते राहिले.प्रत्यही ते खालच्या शहरात जात. हातात भिक्षापात्र असे.ते भिक्षा मागत,पोटासाठी अधिक कष्ट करण्याची जरुरी नव्हती.तेथील आचार्यांच्या चरणांपाशी बसून गौतम त्यांची प्रवचने ऐकत.जन्म मरणाच्या फेऱ्यांतून जीव कसा जात असतो,आणि शेवटी हा जीव अत्यंत मधुर अशा शांत निर्वाणाप्रत कसा जातो,हे सारे ते ऐकत.

जीवन मालवणे हे अंतिम ध्येय प्राप्त व्हावे म्हणून शरीराला अत्र पाणी देऊ नये, शरीर- दंडनाने स्वर्गप्राप्ती होते,असे त्या ऋषिमुनींचे मत होते.जणू शरीरदंडाच्या जादूने सर्व सिद्धी मिळतात.

या तामसी व रानटी विचारांची मोहिनी काही दिवस बुद्धांच्या मनावर राहिली.

हळूहळू त्यांनी आपले अन्न कमी केले.शेवटी तर केवळ चार शितकण ते खात.

त्यांच्या हातापायांच्या केवळ काड्या झाल्या. शरीर सुकले.केवळ हाडे राहिली.मरण जवळ आले.परंतु सत्य अद्याप दूरच होते.मरणाची छाया जवळ आली;तरी सत्यप्रकाश प्राप्त झाला नव्हता.उपासतापास,ही शरीरदंडना म्हणजे ज्ञानाचा मार्ग नव्हे,जीवनाच्या अर्थाचा शोध अशा उपायांनी लागणार नाही,असे बुद्धांना कळून आले.ते पुन्हा अन्नपाणी घेऊ लागले.शरीर पुन्हा समर्थ झाले.ते एका झाडाखाली विचार करीत बसले.


एके दिवशी सर्व रात्रभर ते ध्यानमग्रच होते.सारे जग त्यांच्या पायापाशी झोपलेले होते.आणि तिकडून मंगल उषा आली आणि त्याबरोबरच जीवन-मरणाचे कोडेही सुटले.मानवी दु:खांचा निरास करण्याचा मार्ग सापडला.ते झाले बुद्ध म्हणजे ज्यांना ज्ञान प्रकाश मिळाला आहे,असे अतःपर ते बुद्ध


उर्वरित भाग पुढील भागात..

७/३/२३

आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन.. भाग २

ग्रीकांना व रोमनांना उत्क्रांतीचे तत्त्व अज्ञात नव्हते,हे आपण एपिक्यूरसवरील प्रकरणात पाहिलेच आहे.पण ख्रिश्चन धर्म येताच उत्क्रांतीचा विसर पडून बायबलमधील सृष्टीच्या उत्पत्तीची कल्पित कथा खरी मानली जाऊ लागली.गॅलिलीच्या कल्पनाप्रिय कोळ्यांच्या संगतीत मानवजात जणू शास्त्रीय दृष्टी विसरून गेली,गमावून बसली ! ती शास्त्रीय दृष्टी परत येण्यास व तिला गती मिळण्यास अठराशे वर्षे लागली.जगन्निर्मितीबाबतच्या सुडो-ख्रिश्चन कल्पनेने पाश्चिमात्य जगावर इतका परिणाम केला होता की,

डार्विनने आपली उत्क्रांतीची कल्पना उत्क्रांतीची उपपत्ती मांडली,तेव्हा तो सृष्टिनिर्मात्या ईश्वराचा खून करीत असल्यासारखा भासला.

लोकांना तो खुनी वाटला.मनुष्याच्या अमर आत्म्याच्या मनोहर कथेचा डार्विन जणू वध करीत होता.!ते मधुर काव्य तो मातीस मिळवीत होता.! प्रत्येक जण आपला तिरस्कार करीत हे डार्विनने अपेक्षिलेच होते. 

हार्वर्ड येथील स्नेही प्रोफेसर असाग्रे यांना लिहिलेल्या पत्रात डार्विन म्हणतो, 

"मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की,रूढ कल्पनेहून वेगळ्या निर्णयाप्रत मी आलो आहे.निरनिराळे प्राणी अलग अलग निर्माण करण्यात आलेले नसून ते सारे परस्परावलंबी आहेत.हे वाचून तुम्ही माझा तिरस्कार कराल हे तर खरेच;पण तुमच्यापासून माझा निर्णय लपवीन तर मी प्रामाणिक कसा राहू शकेन?"

त्याच्या प्रतिभेने व बुद्धीने लावलेला शोध सर्व जगाला ज्ञात करून देईतो त्याचा प्रामाणिकपणा त्याला स्वस्थ बसू देईना..

'Origin of spices' हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी वीस वर्षे म्हणजे १८३९ सालीच त्याने उत्क्रांतीची चालचलाऊ उपपत्ती लोकांपुढे मांडली होती.त्या रूपरेषेचा विस्तार करून १८४२ साली त्याने पस्तीस पृष्ठांचा निबंध लिहिला व तोच पुढे वाढवून १८४४ साली २३० पृष्ठांचा केला. हा सर्व काल व पुढील पंधरा वर्षे ही मीमांसा पारखून व पडताळून पाहण्यात व तिच्यातील दोष काढून टाकण्यात खर्चून जे नवे निर्माण निघाले,त्यांचे तो पुन्हा पुन्हा पर्यावलोकन करीत होता.

डार्विन स्वतःच स्वतःचा निर्भीड टीकाकार असल्यामुळे विरोधकांचे आक्षेप आधीच कल्पून त्यांना बिनतोड उत्तरे देण्यास तयार होता.

१८५८ साली डार्विन आपल्या संशोधनाला शेवटचे स्वरूप देत असता अकस्मात एके दिवशी त्याला दिसून आले की,दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने नकळत आपली सारी विद्युत चोरून घेतली.जूनच्या अठराव्या तारखेस त्याचा मित्र आल्फ्रेड रसेल बॅलेस याने उत्क्रांतीवरचा एक स्वतंत्र लेख डार्विनकडे पाठवला व 'मी मांडलेल्या उपपत्तीवरील तुमचे प्रामाणिक मत कळवा,तिच्यावर मनमोकळी टीका करा' असे 
त्याला कळवले.बॅलेस अमेरिकेत होता.डार्विन वीस वर्षे प्राण्याच्या उत्पत्तीचे संशोधन करीत होता हे त्याला माहीत नव्हते.त्यामुळे 'उत्क्रांतीच्या उपपत्तीचा संशोधक' म्हणून जगाला आपली ओळख करून देण्याबद्दल त्याने डार्विनला विनंती केली.अशा परिस्थितीत डार्विनने काय करावे? त्या विषयावरील आपल्या संशोधनाच्या व लिखाणाच्या अगदी बरहुकूम बॅलेसचे संशोधन,तसेच लिखाणही होते.हे पाहून सुप्रसिद्ध भूगर्भशास्त्रवेत्ता डॉ. लायल यास डार्विनने लिहिले, 

'असा योगायोग मी कधीच पाहिला नाही. किती आश्चर्यकारक योगायोग ! १८४२ साली मी लिहिलेले हस्तलिखित बॅलेसजवळ असते,तर याहून अधिक संक्षिप्त सारांश त्याला काढता येणे अशक्य होते.एकदा तर सारे श्रेय बॅलेसलाच द्यावे असे त्याला वाटले.'क्षुद्र वृत्तीने मी वागलो अशी शंकाही कोणाला येऊ नये म्हणून माझी सर्व हस्तलिखिते जाळून टाकावीसे मला वाटते.' 

असे त्याने लायलला लिहिले.त्यावर लायलने उत्तर दिले,

'तुम्ही आपले सर्व विचार ताबडतोब प्रसिद्ध करा.स्वतःच्या बाबतीत अन्याय नका करून घेऊ. 

आपल्या आधी वीस वर्षे डार्विनने ही उपपत्ती अजमावली होती हे ऐकून बॅलेसला वाईट न वाटता आनंदच होईल.' शेवटी लिनयिन सोसायटीसमोर आपले व वॅलेसचे संयुक्त संशोधन म्हणून ही उपपत्ती मांडण्याचे त्याने ठरवले.तथापि, 

उदारपणात आपणही मागे नाही हे, 'ज्या उपपत्तीचे संपूर्ण श्रेय वस्तुतः डार्विनचे आहे तिच्या श्रेयात मलाही भाग मिळावा हे माझे केवढे सुदैव !' 

असे जाहीर करून वॅलेसने दाखवले.अशा रीतीने ही सुप्रसिद्ध चर्चा थांबली. प्रत्येकाने आपल्या कीर्तीचा प्रश्न बाजूस सारून दुसऱ्याचे नाव मोठे व्हावे म्हणून मोठे मन दाखवले.

शास्त्रज्ञांसमोर आपली उपपत्ती मांडल्यानंतर ती छापून काढण्यासाठी डार्विन आपले हस्तलिखित झपाट्याने तयार करू लागला. २३ नोव्हेंबर १८५६ रोजी पुस्तकाची पहिली आवृत्ती तयार झाली.पुस्तकाला 'नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा जीवनार्थ कलहात अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीचे टिकून राहणे'असे लांबलचक व अवजड नाव देण्यात आले होते.

ज्या शास्त्रीय पुराव्याच्या महापुराने अँडम व ईव्ह यांची गोष्ट,स्वर्गातील बाग वगैरे सारे पार वाहून गेले.त्याचा थोडक्यात गोशवारा असा,

या जगात जिवंत प्राणी सारखे अमर्यादपणे वाढत असतात.पण अन्नपुरवठा अगर राहण्याची जागा या मात्र मर्यादितच असल्यामुळे सर्व सजीव प्राण्यांत जीवनार्थ कलह अहोरात्र चाललेला असतो.
परिस्थितीशी झगडण्यात अधिक समर्थ असणारे टिकतात. बाकीचे मरतात.
उत्क्रांतिवादी याला 'समर्थ असतात ते टिकतात' असे म्हणतात.पण आजूबाजूची परिस्थितीदेखील बदलत असतेच.समुद्र असतो तिथे जमीन होते,जमीन असते तिथे समुद्र येतो.पर्वत जाऊन त्यांच्या जागी दऱ्या येतात.बर्फ असते तिथेच एकदम उष्णता पुढे येते.आजूबाजूच्या नैसर्गिक जगात हे फरक होत असल्यामुळे प्राण्यांनाही स्वतःमध्ये व स्वत:च्या राहणीत बदलत्या परिस्थितीत जगता यावे म्हणून फेरफार करावे लागतात.

 हे फरक कधी कधी क्रांतिकारक होतात.एका प्राण्याहून दुसरेच प्राणी जन्माला येतात.असे करूनच ते जगू शकतात.ज्या पद्धतीने ही उत्क्रांती होत जाते,तिला दुसरे चांगले नाव सापडत नसल्यामुळे 'नैसर्गिक निवड' हे नाव देण्यात येत असते.नैसर्गिक निवड म्हणजे, ज्या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी फरक करावे लागले व ते ज्यांनी केले तेच जगावेत, टिकावेत,असेच जणू निसगनि ठरवले.त्या फरकांची जगण्याला सक्षम म्हणून निसर्गाने निवड केली व नवीन परिस्थितीत जरूर व राहिलेल्या बाबी हळूहळू काढून टाकण्याचेही निसर्गाने नक्की केले.

उत्क्रांतीची उपपत्ती थोडक्यात अशी आहे. जीवनाची अमर्याद वाढ होत असल्यामुळे जीवनार्थ कलह सुरू असतो व त्यात अधिक सक्षम व समर्थ असणारे टिकतात.बाकीच्या प्राण्यांच्या जाती नष्ट होतात.एकीतून दुसरी उत्पन्न होते.'

या उपपत्तीप्रमाणे आपण जे अगदी खालचे प्राणी म्हणून समजतो,त्यांच्यापासून मानव फार दूर नाही.त्यांचीच पुढची पायरी म्हणजे मानवप्राणी.ही पुढची पायरी डार्विनने 'मानवाचा अवतार' या पुस्तकात प्रतिपादिली आहे.मानवप्राणी माकडापासून उत्क्रांत झाला. या उपपत्तीचे श्रेय वा अश्रेय सामान्यतः डार्विनला देण्यात येत असते.पण खरोखर पाहिल्यास डार्विनने असे काही एक म्हटलेले नाही.त्याने जास्तीत जास्त इतकेच सांगितले की,

मानव व वानर हे एकाच पूर्वजापासून केव्हा तरी जन्मले. 

हा प्राचीन प्रागैतिहासिक पूर्वज आज अस्तित्वात नाही.म्हणजेच वानर हा आपला आजोबा नसून भाऊ आहे. 

डार्विनच्या मते,प्राण्यांतील परमोच्च विकास मानवात झाला आहे.सर्वांत जास्त विकसित प्राणी म्हणजे मानव समर्थांचे अस्तित्व' या कायद्याप्रमाणे त्याने इतर प्राण्यांवर प्रभुत्व मिळवले आहे.समर्थ व सक्षम या शब्दांचा डार्विनचा अभिप्रेत अर्थ 'अती बलाढ्य किंवा अती निर्दय असा नाही.खालच्या प्राण्यांत कोणी टिकावयाचे व कोणी नष्ट व्हायचे हे बलाबलानेच (शारीरिक झटापटीनेच) ठरते. पण मानवांच्या बाबतीत वैयक्तिक झगडा नष्ट होऊन सर्व मानवप्राण्यांचे सामाजिक सहकार्यच संरक्षणाचे साधन बनते.स्वार्थी आक्रमणशीलता जाऊन तिच्या जागी हळूहळू अन्योन्य साह्य व सहकार्य यांचे तत्व रूढ होते. मानवी जीवनाला अतः पर जंगलाचा कायदा लावणे बरे नाही.व्यक्तीचे जीवन नीट राहायला पाहिजे असेल,तर सर्व मानवजातीने नीट जगावे यासाठीच खटपट केली पाहिजे.सर्व मानवांच्या जीवनार्थ झटण्यातच व्यक्तीच्याही संरक्षणाचा परमोच्च मार्ग आहे.ही गोष्ट हळूहळू का होईना,पण आपण शिकत आहोत.

म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.तो ईश्वराची प्रतिकृती म्हणून जन्मलेला नाही.तो पडलेला अधोगत देवदूत नसून उत्क्रांतीच्या सोपानाने उन्नत होत असलेला रानटी पशू आहे.रानटी मानव आहे.त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे.तो अधिक खाली नाही जाणार.या

जगात जे जे सजीव आहे,जे जे जीवनार्थ धडपडत आहे.त्याच्या त्याच्याशी मानवांचा संबंध आहे. 

त्यामध्ये पशुत्वाचे व लाखो,करोडो प्राण्यांचे अंश आहेत.जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्यापि एक प्राणी म्हणूनच म्हणावे लागेल.पण प्रेमाची अपरंपार,अनंत शक्यता असणारा हा प्राणी आहे

खुद्द डार्विनचेच जीवन त्याच्या उपपत्तीचा सबळ व उत्कृष्ट पुरावा आहे.त्याची प्रेमशक्ती सारखी वाढत होती.त्याच्या उपपत्तीसाठी त्याच्या टीका,निंदा,शिव्याशाप यांची लाखोली वाहण्यात आली,तरी त्याने निंदकांविरुद्ध एकही कटू शब्द उच्चारला नाही.आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचा एक नम्र साहायक म्हणून तो वागे.त्याने त्यांच्यावर कधीही वरचष्मा गाजवला नाही.ज्यांची नावेही कोणाला माहीत नसत अशा प्रयोगशाळेतील कामगारांविषयी व माहिती गोळा करून देणाऱ्यांविषयी तो फार कृतज्ञता दाखवी. 

ते अमोल मदत देत.डार्विन त्यांना विज्ञानशास्त्रातील हमाल म्हणे.प्राणी कितीही क्षुद्र असला तरी तो त्याचा तिरस्कार करीत नसे.प्राणी मात्र त्याला पवित्र वाटे.बुद्धाला साऱ्या विश्वाविषयी अपार प्रेम वाटे.तसाच थोडासा डार्विनचा प्रकार होता.तो बुद्धाच्याच जातीचा होता.त्याला सारे जीवन पवित्र वाटे. सजीव प्राण्याविषयी बोलावे तसे तो झाडेमाडे, तृणवेली वगैरेंविषयीही बोले.त्याने लावलेल्या एखाद्या झाडाचे अगर गवताचे रोवलेले पान वर आले की त्याची ती हुशारी पाहून तो म्हणे,"अरे लबाडा,वर आलास? मी अडकवून,डांबून ठेवले तरी वर डोके काढलेसच अं?"अशी त्यांची प्रेमाने खरडपट्टी काढून तो त्यांच्यावर रागवायचा.काही बीजांकुरांवर प्रयोग करता करता तो चिडून म्हणे,"ही भिकारडी चिमुरडी मला पाहिजे,त्याच्या नेमके विरुद्ध करतात.! चावट कोठची!"प्रत्येक रोपटे त्याला जणू व्यक्तित्वसंपन्न पवित्र व्यक्तीच वाटे.

फुलांचे सौंदर्य पाहून त्याची जणू समाधी लागे. फुलांपासून मिळणाऱ्या निर्दोष व निरूपम आनंदाबद्दल तो सदैव कृतज्ञता प्रकट करी.तो फुलांच्या पाकळ्यांना अगदी हळुवारपणे स्पर्श करी. त्यावेळी त्याच्या डोळ्यांत एखाद्या संताचे अपरंपार प्रेम वा एखाद्या बालकाचे निष्कपटी कुतूहल दिसे. 

त्याचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता.तरीही त्याचा स्वभाव मात्र ख्रिस्तासारखा होता.तो म्हणे,"ईश्वराने कोणाला एखादा ग्रंथ दिला, यावर माझा तरी विश्वास बसत नाही."तो अज्ञेयवादी होता.अपरंपार दुःखाने भरलेल्या या जगाची रचना एखादा ज्ञानी ईश्वर करणे शक्य आहे का,असे तो विचारी.तो लिहितो,'या  जगाच्या पाठीमागे काही कल्याणावह योजना तर नाहीच नाही;पण मुळी योजनाच असेलसे वाटत नाही.' पण तो केवळ नास्तिक नव्हता. तो जपून जाणारा होता.तो या निर्णयाप्रत आला की, 'हा सारा विषय मानवी बुद्धीच्या अतीत आहे.मनुष्याने आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले.'

डार्विनच्या मते,त्याचे स्वतःचे कर्तव्य आमरण सारखे श्रम करीत राहणे हे होते.आपल्या बांधवांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी अविरत झटणे हे त्याचे कर्तव्य होते.पण श्रम करताना त्याला वरचेवर दोन अडथळे येत.तो सुखी व संपन्न असल्यामुळे त्याला फार श्रमण्याची सवय नव्हती.प्रकृती बरी नसल्यामुळे काबाडकष्ट करणे त्याला अशक्यच होई.पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने या दोन्ही अडचणींवर जय मिळवला. सुखासीनतेची सवय त्याने सोडून दिली. पत्नीच्या प्रेमळ सेवापरायणतेमुळे शारीरिक व्यथेची व आजाराची अडचण दूर झाली. डार्विनची पत्नी अत्यंत दयाळू व फार थोर स्त्री होती.डार्विनने तिला 'अत्युत्तम व अती प्रेमळ' असे संबोधून अमर केले आहे.अशी पत्नी लाभल्यामुळेच मी ताण सहन करू शकलो व शेवटपर्यंत नीट धडपड चालवली.असे डार्विनने लिहिले आहे. 

डार्विन नेहमी आजारी आजारीच असायचा. त्याच्या पत्नीने त्याच्या या प्रकृतीला अनुरूप असे शांत जीवन ठेवले.कधी आदळआपट नाही,कधी रागवारागवी नाही.ती त्याला उत्साह देई; पण टोचीत नसे. 'भराभरा आटपा' असे ती कधी म्हणत नसे.त्याच्या प्रयोगांशी ती परिचित राही.प्रुफे तपासण्याच्या कामी त्याला मदत करी व त्याला शारीरिक वेदना होत तेव्हा त्याची इतक्या प्रेमळपणे व कनवाळूपणे शुश्रूषा करी की तो म्हणे, "तुझ्याकडून शुश्रूषा करून घेण्यासाठी आजारी पडणेही बरे."

एम्माचे डार्विनवर जितके प्रेम होते तितकेच डार्विनचे एम्मावरही होते.दोघांचे हे अन्योन्य प्रेम त्यांच्या मुलांच्या स्वभावात पूर्णपणे उतरले होते.पूर्णपणे विकसित अशा जीवांचे हे कुटुंब होते.त्यांचे संवर्धन फारच उत्कृष्टपणे झाले होते.ती मुले आनंद,सौम्यता व अन्योन्य-आदर अशा वातावरणात वाढली होती.आदरभाव म्हणजे काय ? दुसऱ्यांच्या भावनांची सहानुभूतीपूर्वक जाणीव.सानुकंप विचार म्हणजेच सद्भाव,आदरभाव.डार्विनच्या चारित्र्याची ही मुख्य किल्ली आहे.वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्याने लंडनला शेवटची भेट दिली.आपल्या एका मित्राच्या घरात शिरत असता त्याला घेरी येऊ लागलीसे पाहून त्याचा मित्र बाहेर गेलेला होता तरी आचाऱ्याने त्याला 'आत या ना', असे म्हटले.पण बटलरला कशाला उगीच त्रास या भावनेने डार्विन आत न जाता धडपडत बाहेर गेला व गाडी पाहू लागला.पुढे तीन महिन्यांनी,म्हणजे १८८२ सालच्या मार्चच्या सातव्या तारखेस तो मरण पावला.त्याला मरणाची यत्किंचितही क्षिती वाटली नाही.तो मरण्यास तयारच होता. त्याच्या अधार्मिक मतांसाठी त्याच्या शत्रूंनी त्याला नरकाचा धनी ठरवले.पण एका धर्मशील स्त्रीच्या मते,'तो इतका चांगला होता की,तो खात्रीने स्वर्गासच गेला असला पाहिजे. डार्विनचे ईश्वराशिवाय चालेल,पण त्या सर्वशक्तिमान प्रभूचे डार्विनशिवाय कसे चालणार?'

शेवटचा पुर्ण भाग..

५ मार्च २०२३ या लेखामधील पुढील भाग.

५/३/२३

आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन..

पास्कल एकदा म्हणाला की,क्लिओपात्रा हिच्या नाकाच्या आकारामुळे साऱ्या जगाचे स्वरूप बदलून गेले.त्यानंतर जवळजवळ दोन हजार वर्षांनी इतिहासाचे सारे स्वरूप एका केसावर आधारलेले होते.दुसऱ्या एकाच्या नाकावर नाकाच्या आकारावर इतिहास लोंबकळत होता. तो १८३१मधील मंदीचा काळ होता.बावीस वर्षांचा धर्माभ्यासक चार्लस डार्विन बादशहाच्या गलबतातून अवैज्ञानिक निसर्गाभ्यासक म्हणून जाणार होता.पण गलबताचा कप्तान फिट्झरॉय त्याला घेईना.त्याचे नाक पाहून शास्त्रज्ञ होण्याची पात्रता अगर त्यासाठी आवश्यक तो उत्साह त्याच्या (डार्विनच्या) ठिकाणी असेल,असे कप्तानला वाटेना.


डार्विन या 'बीगल' नामक जहाजातून न जाता,तर तो धर्मोपदेशक झाला असता.मानवाच्या उत्क्रांतीवरील त्याच्या युगप्रवर्तक संशोधनाला जग मुकले असते व या शोधामुळे इतिहास समृद्ध झाला,तसा झाला नसता.


 डार्विन वस्तुतः धर्मोपाध्यायच व्हावयाचा;पण थोडक्यात चुकले.एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी मस्तिष्कशास्त्राचा फार बोलबाला होता. एका मस्तिष्कशास्त्रज्ञाने डार्विनचे डोके तपासून सागितले की,तो धर्माचा मोठा आधारस्तंभ होईल.कारण त्याला त्याच्या डोक्यातला धर्मशास्त्रदर्शक भाग चांगलाच वर आलेला दिसला.दहा सामान्य धर्मोपाध्यायांच्या डोक्यांतल्या भागाइतका भाग त्याच्या एकट्याच्या डोक्यात त्या मस्तिष्कशास्त्रज्ञाला आढळला.डार्विनचे नाक,तसेच त्याचे डोके त्याला सरळ इंग्लंडमधील चर्चच्या सिंहासनावर नेऊन बसवणार असे दिसत असता,


मानव जातीच्या सुदैवाने कप्तानाचे डार्विनच्या नाकाबद्दलचे मत बदलले व डार्विनला 'बीगल' गलबतावर जागा मिळाली. 


त्याने बायबल मिटले.त्यातील सृष्टिनिर्मितीच्या कल्पित कथा सोडून दिल्या व साता समुद्रांत फिरून पशुपक्ष्यांत,

फुलाफळांत,वृक्षवनस्पर्तीत जगाचा इतिहास पाहण्यास प्रारंभ केला.जगाच्या इतिहासावरील प्रवचने दगडार्धोड्यांतून,नद्यांतून,वाळवंटांतून व पर्वतांतून ऐकत तो सर्वत्र हिंडला. किती मनोरंजक व सत्यमय ही जगाची कथा ! परत आल्यावर पूर्वी धर्मोपदेशक होऊ इच्छित असलेलाच डार्विन ज्या आधारावर चर्चची उभारणी झाली होती,त्या आधाराच्याच सत्यतेविषयी शंका घेऊ लागला.त्याने आव्हान दिले.


अदृश्य स्वर्गाचा अभ्यास व परलोकाचा विचार सोडून देऊन तो प्रत्यक्ष पृथ्वीचा अभ्यास करू लागला.जग एका धर्मोपदेशकाला मुकले खरे;पण त्याला एक अत्यंत मोठा शास्त्रज्ञ लाभला.


डार्विन व अब्राहम लिंकन एकाच दिवशी १२ फेब्रुवारी १८०९ रोजी जन्मल्यामुळे प्रोफेसर लल् म्हणे की,लिंकनने मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले.त्याप्रमाणे डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या बंधनांपासून मुक्त केले.


 १८०९ साल महापुरुषांच्या जन्मांनी भरलेले आहे.या वर्षी निसर्गाने मानवजातीच्या मांडीवर जणू महापुरुषाचे ताटच वाढून आणून ठेवले.डार्विन,लिंकन,गॉडस्ट,मेंडेलसन,

चॉपिन,पो,टेनिसन,ऑलिव्हर वेंडेल होल्म्स,एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग या सर्वांचा जन्म याच वर्षी झाला. 


आणखीही कित्येक याच साली जन्मले असतील.यांपैकी प्रत्येकाने मानवजातीला शाश्वत सुंदरतेची व उदात्ततेची जोड करून दिली आहे. त्यात भरपूर भर घातली आहे.

डार्विनने घातलेली भरही काही कमी नव्हती.


डार्विनची मातृकुल व पितृकुल दोन्ही चांगली होती.त्याच्या वडिलांचे वडील इरॅस्मस डार्विन हे प्रसिद्ध निसर्गशास्त्री होते.त्यांनी वनस्पतींच्या प्रेमलीला हे काव्य तसेच लॉज ऑफ ऑरंगनिक लाइफ (सेंद्रीय जीवनाचे नियम) हे पुस्तक लिहिले.त्याचे आईकडचे पणजोबा चिनी मातीच्या भांड्यांचे मोठे कारखानदार होते.त्यांचे नाव जोशिया वेजवूड.शास्त्रे व कला यात खूप रस घेणारे वातावरण डार्विनच्या घरात असणे साहजिकच आहे.लहानपणी डार्विन सौम्य वृत्तीचा व चिंतनशील होता.त्याला लहानलहान खडे,दगड,शिंपले,नाणी,फुले,कृमी,जीवजंतू पक्ष्यांची अंडी,कीटक वगैरे जमविण्याचा फार नाद होता.तो जिवंत कीटक पकडीत नसे.मेलेले आढळले तरच उचली.फुलपाखरांनाही तो मारीत नसे.पण पक्षी मात्र आपल्या छोट्या बंदुकीने तो खुशाल मारी.दुरून जीव घेण्यात त्याच्या बालमनाला जणू हरकत वाटत नसावी.

पुष्कळ वर्षे त्याला शिकारीचा नाद होता.पण एके दिवशी एका जखमी पक्ष्याच्या वेदना पाहून त्याच्या मनावर खूप परिणाम झाला व केवळ करमणुकीखातर पुन्हा प्राण्यांची हिंसा करायची नाही,असा निश्चय त्याने केला.त्याची आई तो आठ वर्षांचा असताना वारली.त्याचा बाप रॉबर्ट वेअरिंग डार्विन हा भीमकाय पुरुष होता.त्याचे वजन साडेतीनशे पौंड होते.तो अत्यंत आनंदी व कार्यक्षम होता.पण त्याला पुत्राचा स्वभाव मात्र नीट समजला नाही.


तो निरुपयोगी उडाणटप्पू आहे,असे त्याचे मत होते.जगातला सारा केरकचरा फुले,पाखरे,

दगडधोंडे घरात आणून भरणारा हा पोरगा पुढे काय करणार असे त्याला वाटे. 


मुलाच्या हातून काही कर्तबगारी होईल असे बापाला वाटेना.त्याच्या डोक्यात थोडेफार जुने ज्ञान कोंबण्यासाठी बापाने त्याला ग्रीक व लॅटिन शिकवणाऱ्या एका शाळेत घातले.पण मुलाने शिक्षणाकडे लक्ष न देता बापाच्या बागेतच एक गुप्त प्रयोगशाळा सुरू करून रसायनशास्त्राचे व पदार्थविज्ञानाचे प्रयोग चालवले.त्यामुळे त्याला सारे जण वेडपट म्हणू लागले.मुले त्याला 'गॅस' म्हणत.

हेडमास्तरांनी त्याला 'निष्काळजी माणूस' ही पदवी दिली.मुलाच्या या प्रयोगांमुळे व उंदीर पकडण्याच्या खेळामुळे विटून व घाबरून बापाने त्याला क्लासिकल शाळेतून काढून घेऊन एडिंबरो येथे वैद्यकाचा अभ्यास करण्यास पाठवले.


पित्याच्या धंद्याचे शिक्षण घेण्यात डार्विन थोडा वेळ रमला.पण अँनॉटॉमीची व्याख्याने त्याला कंटाळवाणी वाटू लागली.


शस्त्रक्रियेचे प्रयोगही त्याला बघवेनात.एका मुलावर करण्यात येत असलेली शस्त्रक्रिया पाहून डार्विन खोलीतून पळून गेला.त्यावेळी गुंगी आणणारा क्लोरोफॉर्म नसल्यामुळे तो मुलगा फोडीत असलेल्या किंकाळ्या पुढे कित्येक वर्षे तो विसरू शकला नाही.


गटेप्रमाणेच तो वर्गात फारसे शिकला नाही.तो शाळेबाहेरच बरेचसे शिकला.तो दारू पिई, जुगार खेळे,प्रेम करी.हे सर्व करीत असताना तो आपल्या अजबखान्यात अधिकाधिक वस्तूंची भर घाली.'मुलगा डॉक्टर होणे शक्य नाही'असे वाटल्यामुळे बापाने त्याला धर्मोपदेशक करायचे ठरवून केंब्रिजच्या ख्रिश्चन कॉलेजात घातले.या वेळी तो अठरा वर्षांचा होता.येथे तो तीन वर्षे होता. 'ही तीन वर्षे फुकट गेली,वाईट वाटते.नुसती फुकट जाती तरी बरे.पण प्रार्थना,दारू पिणे,गाणे,पत्ते खेळणे या आणखी गोष्टी त्यात होत्या.'


'बीगल' गलबतावरच्या प्रवासाने डार्विनच्या जीवनाला तर नवीन दिशा लावलीच.पण साऱ्या मानवी विचारांचीही दिशा बदलली.ही युगप्रवर्तक सफर पाच वर्षे चालली होती. गलबतातून पृथ्वीप्रदक्षिणा करून डार्विनने जीवनाचे कोडे उलगडण्यासाठी निसर्गाच्या अनेक वस्तू जमा केल्या.सृष्टीत सर्वत्र विखुरलेले नाना नमुने त्याने पाहिले,गोळा केले व त्यांचे वर्गीकरण केले.त्याची दृष्टी शास्त्रज्ञाची होती. त्याचे मन व त्याची बुद्धी ही कवीची होती.त्याने जमवलेले प्राण्यांचे हजारों नमुने एकत्र जोडून त्यातून सुसंगत अशी प्राण्यांच्या उत्पत्तीची मीमांसा करून उपपत्ती त्याने लावली व त्यांच्या विविधतेचे विवेचन केले.आपले संशोधन आपणास कोठे घेऊन जात आहे याची तो गलबतावर होता,तेव्हा त्याला नीटशी कल्पना आली नव्हती.प्रत्येक खऱ्या निरीक्षकाप्रमाणे आधीच मनात एखादी मीमांसा निश्चित करून तो निघाला नाही.प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून तो सिद्धांताकडे जाई.वीस वर्षे त्याचे संशोधन अखंड व परिश्रमपूर्वक चालू होते.त्याने अपरंपार माहिती मिळवली व तिची निःपक्षपातीपणे छाननी केल्यावर त्याला उत्क्रांतीची महत्त्वाची उपपत्ती आढळून आली.


हे सारे जगत म्हणजे डार्विनपुढे एक प्रश्नचिन्ह होते.एक गूढ व बिकट अशी समस्या होती.तो जणू गणितातलाच एक प्रश्न होता.भूमितीतील एक सिद्धांत होता.तो सोडवावयास पाहिजे होता.त्यात पुष्कळच अज्ञात राशी होत्या.जग हे कौतुक करण्यासारखी कलाकृती नसून ते एक गणित आहे.एक कोडे आहे असे डार्विनला वाटे.वाड् मयाची त्याची आवड कधीच नष्ट झाली होती.

पण त्यांचे विज्ञानच त्याला वाड्मयाप्रमाणे,

कलेप्रमाणे,संगीताप्रमाणे झाले होते.मानवांविषयीचे त्याचे प्रेम कधीही नष्ट झाले नाही.विज्ञानाखालोखाल त्याला न्यायाविषयी उत्कट आस्था वाटे.एकदा त्याचे 'बीगल' गलबत ब्राझील येथे थांबले.काही नीग्रो गुलाम पळत होते.त्यामध्ये एक स्त्रीही होती.पाठलाग करणाऱ्यांच्या हाती लागू नये म्हणून त्या म्हाताच्या नीग्रो स्त्रीने कड्यावरून उडी घेतली.तिचे तुकडेतुकडे झाले!डार्विन लिहितो, 


एखाद्या पोक्त व पावन रोमन स्त्रीने जर असे केले असते तर 'केवढे हे स्वातंत्र्यप्रेम!' असे म्हटले गेले असते.पण तेच नीग्रो स्त्रीने केले म्हणून त्याचे 'पाशवी हट्टीपणा'असे विकृत वर्णन करण्यात आले!


 गुलामगिरीवर अन्यत्र टीका करताना तो लिहितो (आणि त्याने अमेरिकेतील सिव्हिल वॉरच्या आधी वीस वर्षे हे लिहिले होते,हे लक्षात घेतले पाहिजे.)

'गुलामांच्या धन्याकडे करुणेने व आस्थेने पण गुलामांकडे मात्र निष्ठुरतेने पाहणारे लोक स्वतः गुलामांच्या स्थितीत असल्याची करू पाहतील,तर गुलामांची स्थिती किती निराशजनक असते हे त्यांना कळून येईल.


आशेचा किरण नाही,उत्साह नाही,आनंद नाही, जीवनात कधी काही फरक पडण्याची वा स्थिती सुधारण्याची तीळमात्र शक्यता नाही!किती केविलवाणे जीवन!आपली मुले-बाळे व पत्नी आपणापासून केव्हा वियुक्त केली जातील, ओढून नेली जातील याचा नेम नाही.क्षणोक्षणी ताटातूट होण्याची चिंता सतावीत आहे अशी परिस्थिती डोळ्यांसमोर आणा.ही माझी पत्नी, 'ही माझी मुलेबाळे !'असे म्हणण्याचा, निसर्गानेही न नाकारलेला गुलामांचा हक हिरावून घेऊन त्यांची लाडकी मुले-बाळे,त्यांची प्रियतम पत्नी यांची गुराढोराप्रमाणे अधिकात अधिक किंमत देणाऱ्यांना विक्री करण्यात येते आणि तीही कोणाकडून!तर शेजाऱ्यांवरही आपल्याइतकेच प्रेम करण्याचा आव आणणाऱ्यांकडून!ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे, त्याच्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर सर्वांनी वागावे असे उपदेशिणारेच या प्रकाराचे पुरस्कर्ते असावेत, त्यांनी त्याचे समर्थन करावे,व 'यात काय आहे!' असे म्हणून उडवाउडवी करावी हे केवढे आश्चर्य !'


'बीगल'मधून सफर करीत असता मानवप्राण्यांची उत्पत्ती कसकशी होत गेली,हे शोधून काढण्यासाठी ज्याप्रमाणे त्याने बारकाईने निरीक्षण चालवले होते,त्याप्रमाणेच मानवांच्या दुःखांकडेही त्याची बारीक नजर होती.त्याकडे तो काणाडोळा करीत नव्हता,करुणेने पाहत होता.


सफरीहून परत आल्यावर त्याने आपली भाची एम्मा वेजवूड हिच्याशी विवाह केला.त्याला पुढे दहा मुले झाली.या मुलांचे खरे पूर्वज कोण याचाही शोध तो करीतच राहिला.त्याने खेड्यात एक घर खरेदी केले.

त्याच्याभोवती विस्तृत बगिचा होता.सुदैवाने,त्याला पोटासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती.त्याच्या वडिलांनी भरपूर मिळवून ठेवले होते.आपली मुले काहीही कष्ट न करता नीट जगू शकतील,आळसात राहू शकतील अगर आपल्या उज्वल प्रतिभेची व अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोय त्यांनी करून ठेवली होती.चार्लस डार्विन आपल्या प्रतिभेच्या पूजनात रमला.


लग्न करण्याच्या किंचित आधी त्याची प्रकृती बरीच खालावली होती.ती कधीच सुधारली नाही.तो जवळजवळ चाळीस वर्षे आजाऱ्यासारखाच होता.तरीही त्याने एकट्याने दहा माणसांइतके काम केले!प्रथम त्याने 'बीगल' वरून केलेल्या प्रवासाचे इतिवृत्त प्रसिद्ध केले.हे पुस्तक शास्त्रीय असूनही एखाद्या मनोरंजक कादंबरीप्रमाणे रसाळ वाटते.

हरएक गोष्ट लिहिताना त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असे लिहिलेले सर्वांना समजेल अशी भाषाशैली तो वापरत असे तो लिहितो,'लहानलहान जुने सॅक्सन शब्द वापरणे चांगले.'एखादे लहान रोपटे अफू घेतल्याप्रमाणे जणू गुंगीत असते आणि अशा वृत्तीनेच ते जगते',अशी वाक्ये कानाला इंग्रजी नाही वाटत.त्याचे भाषांतर करावेसे वाटते.पण हेही खरे की,भाषाशैली अती सोपी,सहजसुंदर व प्रासादिक असावी यासाठी फार श्रम घेणे बरे नाही.वाग्वैभव केवळ निरुपयोगी असेही नाही.लिखाणात परमोच्च वक्तृत्व असूनही फारसा आटापिटा न करता प्रसाद व सहजसुंदरता दोन्ही साधता येतील तर चांगलेच.'


भाषा सहजसुंदर व स्वच्छ आणि विशद अर्थ सांगणारी व्हावी म्हणून डार्विनने खूप प्रयत्न केले.सुंदर लिहिणे प्रथम त्याला जड जात होते. पण अविरत प्रयत्नाने त्याने स्वतःची एक विशिष्ट भाषाशैली बनवली.मोकळी,सोपी व मनोहर भाषाशैली त्याने निर्मिली.त्याच्या जीवनाचे ब्रीदवाक्य 'सतत प्रयत्नाने कार्य होते',हे होते. काव्याविषयी आपणास फार आवड नसल्याबद्दल त्याला वाईट वाटे.तरीही पण 'बीगलवरील प्रवास' या त्याच्या पुस्तकात कवितांचे पुष्कळ उतारे आहेत.ब्राझीलचे पुढील वर्णन पाहा,'येथील जमीन म्हणजे एक विस्तृत, अनिर्बंध,

भव्य,भीषण व वैभवसंपन्न असे निसर्गाचे जणू उष्ण मंदिरच आहे.पण निसर्गाच्या या घराचा कब्जा मानवाने घेतला आहे.येथे मानवाने ठायीठायी सुंदर घरे व लहानलहान बागा निर्मिल्या आहेत.' ब्राझीलची भूमी पाहून त्याला प्रथम काय वाटले ते पाहा,तो म्हणतो, "आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळात मी बुडून गेलो." व मग लिहितो,'नारिंगे,संत्री,नारळ,ताड, आंबे,केळी वगैरेंची बाह्यरूपे पृथक् आहेत.पण या भिन्न भिन्न वृक्षवनस्पतींची सहस्त्रावधी सौंदर्ये शेवटी एक भव्य अशी सौंदर्यकल्पना देतात आणि वेगवेगळी सुंदर रूपे विलीन होऊन एकच सौंदर्यकल्पना मनात राहते.पण ही विविधता गेली तरीही अस्पष्ट;पण अत्यंत सुंदर अशा आकृतींची चित्रे हृदयफलकावर राहतातच. '


'बीगलवरील प्रवास' हे पुस्तक लिहून शंभर वर्षे होऊन गेली.तरीही तें पुस्तक अरबी भाषेतील सुरस गोष्टींप्रमाणे गोड वाटते. 


डार्विनचे यानंतरचे पुस्तक मात्र केवळ शास्त्रीय होते.त्यात निसर्गाच्या स्वरूपाविषयी बरीच माहिती असून समुद्रातल्या बानेंकल नामक प्राण्याची ही हकिकत आहे.हा प्राणी आपल्या डोक्यावर उभा असतो व आपल्या पायांनी तोंडात अन्न फेकतो,हे पुस्तक डार्विन आठ वर्षे लिहित होता. 


त्याच्या आयुष्यातली ही आठ वर्षे अत्यंत उपयोगी कामात गेली.या एका विषयाला सतत आठ वर्षे चिकटून बसून डार्विनने स्वत:मध्येही जणू बार्नेकलची चिकाटी बाणवून घेतली. असल्या विषयावर निरर्थक इतके प्रयत्न करण्याबद्दल डार्विनचे मित्र त्याची खूप टिंगल करीत.पण डार्विन हळूहळू 'सर्वांत मोठा सृष्टिज्ञानी व निसर्गाभ्यासी'अशी आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करीत होता व आपल्या आयुष्यातल्या सर्वांत मोठ्या कामासाठी आपले मन आपल्या मनाचे स्नायू मजबूत करीत होता.


ही आठ वर्षे किती मोलाची!तो सारखा मिळवीत होता व चिकित्सक बुद्धीने त्या माहितीतून सत्य शोधीत होता, निवडानिवड करीत होता. 'निरनिराळ्या जातींची उत्पत्ती आणि मानवाची उत्क्रांती ( मानवाचा अवतार ) ' यासंबंधी आपली उपपत्ती पूर्णावस्थेस नेऊ पाहत होता.


अपुरे ( अपूर्ण )

१९ फेब्रुवारी २०२३ या लेखामधील पुढील भाग..

३/३/२३

अनंत विश्वात दुसऱ्या बुद्धिमान जमाती आहेत का?

या अनंत विश्वात विसाव्या शतकात पृथ्वीवर राहणारी मानवजात ही एकच बुद्धिमान जमात अस्तित्वात आहे का?


रात्रीच्या स्वच्छ आणि निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी आपल्याला किमान ४५०० तारे दिसतात असे निदान खगोलशास्त्रज्ञ तरी सांगतात.छोट्याशा वेधशाळेतील दुर्बिणीतून वीस लाख तारे दिसू शकतात.आधुनिक वेधशाळेतील रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या (आरशाच्या दुर्बिणीच्या सहाय्याने आणखी कोट्यावधी तारे आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात.


पण अनंत विश्वाचा विचार करता आपली ग्रहमाला हा अगदी नगण्य भाग आहे.आकाशात तारे सारख्याच दाटीवाटीने पसरलेले नाहीत. आकाशाच्या विशिष्ट भागात त्यांनी बरीच गर्दी केलेली आढळते.या ताऱ्यांच्या दाटीवाटीमुळे आकाशाच्या मध्यभागी एक लांबचलांब व थोडा रूंद असा पांढुरका पट्टा तयार झाला आहे. त्याचा आकार लंबवर्तुळाकार चकतीसारखा आहे.यालाच म्हणतात आकाशगंगा !


आपली ग्रहमाला अशा आकाशगंगेच्या कडेला जे तुरळक तारे दिसतात त्यातल्या एका ताऱ्याभोवती म्हणजे सूर्याभोवती आहे


या ताऱ्यांमधील अंतर मोजायला मैल हे परिमाण अगदीच तोकडे पडते.त्यासाठी प्रकाशवर्ष, म्हणजे एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर कापील तितके मैल (प्रकाशवर्ष १८६००० X ६० X ६० X २४X३६५ मैल) हेच परिमाण वापरावे लागते. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या सहाय्याने ज्या काही आकाशगंगा दिसतात,त्यांची त्रिज्याच १५ लाख प्रकाशवर्ष असेल आणि इलेक्ट्रॉनिक टेलिस्कोपने आपण जितके तारे पाहू शकतो तो आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यातही तो येऊ शकत नाही.अर्थातच हे सर्व आकडे फक्त आजतागायतच्या झालेल्या संशोधनाला अनुलक्षून आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.


खगोलशास्त्रज्ञ हार्लो शेपली यांच्या मते आपल्या दुर्बिणीच्या टप्प्यात साधारण १० (२०) (एक वर वीस शून्ये) इतके तारे येतात.समजा की हजारात एखाद्याच ताऱ्याभोवती आपल्यासारखी ग्रहमाला आहे आणि अशा ताऱ्यांपैकी पुन्हा हजारात एकाच ताऱ्यावर जीवन निर्मितीस आवश्यक अशी परिस्थिती आहे.तरी अशा ताऱ्यांची संख्या येईल १० (१४) (एक वर चौदा शुन्ये)

अशा ताऱ्यांपैकी पुन्हा हजारात एखाद्याच ताऱ्यावर जीवनास आवश्यक अशी परिस्थिती खरोखरच निर्माण झाली असेल असे समजले तरी अशा ताऱ्यांची संख्या असेल १०(११) (एक वर आकरा शुन्ये)आणि यापैकी हजारात एका ताऱ्यावर जीवसृष्टीचे अस्तित्व गृहीत धरले तरी १० कोटी इतक्या ताऱ्यांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता निर्माण होते.हा आकडा थक्क करणारा नाही ? 


प्रोफेसर डॉ.विली ली दुसऱ्या तऱ्हेने विचार करतात.

त्यांच्या मते आपल्या आकाशगंगेतच साधारणतः३० अब्ज तारे आहेत आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते त्यापैकी १८ अब्ज ताऱ्यांना तरी आपल्यासारख्या ग्रहमाला आहेत. समजा शंभरात एखाद्या ग्रहमालेतील एकाच ग्रहावर जीवन निर्माण होण्यासारखी परिस्थिती अस्तित्वात आहे असे समजले आणि पुन्हा त्यापैकी शंभरात एकाच ग्रहावर जीवसृष्टी खरोखरच निर्माण झाली असेल तरी अशा ग्रहांची संख्या होईल १८ लाख,हा आकडा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून मानवसदृश प्राणी पुन्हा शंभरात एकाच ग्रहावर निर्माण झाला असेल असे गृहीत धरले तरी फक्त आपल्याच आकाशगंगेत १८००० ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता निर्माण होते.


पण शेवटी ही सर्व आकडेवारी तशी फसवीच ठरते.

दुर्बिणीच्या तंत्रात जसजशी सुधारणा होते आहे तसतसा जो मूळ आकडा धरून आपण गणिते करीत आहोत तो आकडाच बदलतो आहे.आता खगोलशास्त्रज्ञ म्हणायला लागलेत की आकाशगंगेत ३० अब्ज नव्हे तर १०० अब्ज तारे आहेत म्हणून !


तेव्हा या आकड्यांच्या जंजाळात फसण्यापेक्षा अमेरिकेच्या अणुशक्ती कमिशनच्या एम्स संशोधन केंद्रातील बायोटेक्निकल विभागाचे प्रमुख डॉ.जॉन बिलिंगहॅम म्हणतात ते खरे समजायला हरकत नाही.ते म्हणतात,


 'पृथ्वीपेक्षा अब्जावधी वर्षे प्रथम निर्माण झालेले किती तरी ग्रह आहेत.त्यांच्यापैकी ज्या ग्रहांवर बुद्धिमान जीव निर्माण झाले असतील,त्यांच्या संस्कृतीही त्याच प्रमाणात आपल्यापेक्षा प्रगत असेल ही शक्यता मुळीच नाकारता येत नाही.पाषाण युगातील मानवापेक्षा आपण जितके पुढारलेले आहोत तेवढ्याच त्या संस्कृती आज आपल्यापुढे असतील. '


जीवन अस्तित्वात असण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी आवश्यक मानतो ? त्यासाठी पृथ्वीसदृश वातावरण तसेच वनस्पती जीवन, प्राणी जीवन आवश्यक आहे असे गृहीत धरूनच आपण सर्व विचार करतो.पण पृथ्वीसारख्या ग्रहांवरच जीवन शक्य आहे असे ठामपणे म्हणायला कुठे काही आधार कधी तरी आपल्याला सापडला आहे का? मुळीच नाही. 


इतकेच काय तर प्राणवायू आणि पाणी यांच्याशिवाय जीवन अशक्य आहे हे म्हणणे सुद्धा चूक आहे.

प्राणवायूची आवश्यकता नसलेले,एवढेच नव्हे तर थोडा फार प्राणवायू असलाच तर ज्यांना तो विषवत वाटेल असे जीवजंतू आपल्या पृथ्वीवरच अस्तित्वात आहेत.


खूप उष्ण नाही,खूप थंड नाही,भरपूर पाणी आणि प्राणवायू यांनी समृद्ध अशी पृथ्वी म्हणजे जीवन निर्मितीसाठी आदर्श असा ग्रह आपण मानतो. शयाला तसा काही पुरावा आहे काय? आणि तुलना कोणत्या ग्रहांशी करणार? निरनिराळ्या तऱ्हेचे वीस लाख जीवजंतू पृथ्वीवर अस्तित्वात आहेत असा अंदाज असला तरी साधारण बारा लाखांहून अधिक तर आपल्या वैज्ञानिकांना ठाऊकच नाहीत.त्यापैकी हजारो जीवजंतू पृथ्वीवर अस्तित्वात असायलाच नको होते,जगायलाच नको होते.खरोखर जीवनासाठी आवश्यक अशा नक्की गोष्टी कोणत्या आहेत याबाबतचे प्रचलित सिद्धान्त पुन्हा तपासून बघणेच आवश्यक आहे.


रेडिओ अँक्टिव्ह पाण्यात सूक्ष्म जंतूसुद्धा जिवंत राहणे शक्य नाही असे कोणालाही वाटेल.पण अणुभट्टयांच्या आसपासच्या अशा प्राणघातक पाण्यात फोफावणारे जीवजंतूही आहेत.


डॉ.सिगेल या शास्त्रज्ञाने 'गुरू' या ग्रहासारखे वातावरण प्रयोगशाळेत तयार करून त्यात जंतू व छोटे कीडे वाढवले.अमोनिया,मिथेन, हायड्रोजनसुद्धा त्यांना मारू शकले नाहीत.


हिन्टन आणि ब्लूम या कीटक शास्त्रज्ञांनी चिलटासारख्या प्राण्यांना १००० सेंटिग्रेड तपमानावर कित्येक तास ठेवून वाळवले व नंतर द्रवरूप हेलियममध्ये बुडवले.अति गरम वातावरणातून अति शीत हेलियममध्ये बुडवल्यावर व नंतर पुन्हा नेहमीच्या वातावरणात सोडल्यावरसुद्धा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.ज्वालामुखीत राहणारे,

दगड खाणारे,लोखंड निर्माण करणारे जीवजंतूही आपल्याला माहीत आहेत.


आपण पृथ्वीवरचे वातावरण जीवन निर्मितीसाठी योग्य म्हणत असतानाच दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावर अगदी वेगळे वातावरण असेल आणि तरीही जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर तेथील बुद्धिमान प्राण्यांनाही असेच वाटत असेल की त्यांच्या ग्रहावरचे हवामानच जीवनिर्मितीसाठी आवश्यक आहे तेव्हा या अथांग विश्वात आपणच तेवढे बुद्धिमान प्राणी अस्तित्वात आहोत हे म्हणणे अगदीच निरर्थक आहे.अशीही शक्यता आहे की भविष्यकाळात अंतराळात अनेक तऱ्हेचे जीवन अस्तित्वात आहे हे आपल्या भावी पिढ्या बघतील.


आपण ते बघायला नसलो तरीही त्या पिढ्यांना मात्र आपली मानव-जमात हीच सर्वांत जुनी व बुद्धिमान अशी जमात आहे ही कल्पना बाजूला ठेवावीच लागेल.


जुने जीवजंतू आणि प्राणी नष्ट होणे व त्यांची जागा नवीन तऱ्हेच्या जीवजंतू आणि प्राण्यांनी घेणे ही क्रिया अखंडपणे कोट्यावधी वर्षे चालू आहे व पुढेही चालू राहणार आहे.जगात सापडणाऱ्या निरनिराळ्या तऱ्हेच्या दगडांचे वेगवेगळ्या तऱ्हानी संशोधन केल्यावर पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला असे शास्त्रज्ञ म्हणतात.पण शास्त्र एवढेच जाणते की २० लाख वर्षांपूर्वी प्रथम मानवसदृश प्राणी अस्तित्वात आला.

त्यापैकी आपल्याला साधारणतःसात एक हजार वर्षांचा इतिहास थोडा फार कळला आहे.त्यासाठी सुद्धा किती श्रम आणि कष्ट घ्यावे लागले आहेत.तरीही मधली कित्येक शतके अशी आहेत.की त्या काळात खरोखर काय घडले ते आपल्याला माहीत नाही.अज्ञात विश्वाच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासाशी तुलना करता मानवाच्या सात हजार वर्षांच्या इतिहासाला खरोखर किती किंमत आहे?


विसाव्या शतकात प्रगतीच्या ज्या पल्ल्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत तिथे पोहोचायला चार लाख वर्षे घेऊन पुन्हा या विश्वात आमच्यासारखे बुद्धिमान आम्हीच,असा गर्व आपण किती करावा?


कशावरून दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहांवर आपल्याला स्पर्धक नसतील? कशावरून काही ग्रहांवर प्रगतीला जास्त पोषक परिस्थिती निर्माण झाली नसेल की ज्यामुळे तेथील जमाती इतक्या प्रगत अवस्थेला पोहोचल्या असतील की आजसुद्धा आपणच त्यांच्यापुढे मागासलेले

 ठरू ?


शेकडो पिढ्या म्हणत होत्या की पृथ्वी सपाट आहे म्हणून,सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे हजारो वर्षे विद्वान लोक आपल्याला सांगत होते.हा अनुभव असूनही आपण म्हणावे की आपल्या आकाशगंगेच्या मध्यापासून तीस हजार प्रकाशवर्षे लांब कडेला असलेला आपला पृथ्वी हा नगण्य ग्रहच सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू आहे म्हणून ?


विश्वाचा विचार करता पृथ्वी अगदीच क:पदार्थ आहे हे लक्षात घेऊन अज्ञात अंतराळाचे संशोधन करण्याची वेळ आज आली आहे.आपल्या उज्ज्वल भविष्यकाळातील संधी अंतराळ संशोधनातच मिळतील असे आपल्या 'देवांनी' नाहीतरी सांगून ठेवले आहेच.या भविष्यकाळात नजर टाकेपर्यंत प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे आपला भूतकाळ तपासण्याचे धैर्य आपल्याला मिळणार नाही.


देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर !

लेखक - बाळ भागवत

मेहता पब्लिशिंग हाऊस

१/३/२३

साहित्यातील 'पाणी' आणि पाण्यातील 'साहित्य'..!

"पाणी" मानव व इतर जिवंत असणाऱ्या जीवांच्या जीवनातील अविभाज्य अंग.पाणी आहे तर सर्व काही आहे. धान्य पिकवताना जे पाणी लागतं तेच पाणी धान्यापासून अन्न शिजवताना लागतं. पाण्याजवळ तळ्याकाठी नदीकाठीच माणसाने राज्ये व नगरे वसवली होती.पहिला जीव पाण्यातच जन्माला आला. वनस्पती निसर्ग या सर्वांठायी पाणी असतेच.


"पाणी हा जसा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसाच वनस्पतींचाही,हरित वनस्पती पाण्याचा उपयोग करून सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण क्रियेमधून स्वतःचे कर्बयुक्त अन्न तयार करतात.(पाणवनस्पती डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद पत्रिका नोव्हेंबर 2022 )


आम्ही लहान असताना जुनी माणसं अनुभवाचा दाखला देत असताना मी किती अनुभव संपन्न आहे हे सांगत असताना 'मी बारा गावचे पाणी प्यालो आहे,अशी वाक्य रचना ते नेहमी करायचे. त्यावेळी मला वाटायचं नुसतं बारा गावात जावून पाणीच तर पिऊन आलेत.त्यात अनुभवाचा काय संबध पण हे समजण्यास फार काळ जावा लागला.'समजलेला' अनुभव पुढे येईलच.


हेन्री डेव्हिड थोरोचे वॉल्डन पुस्तक व त्या पुस्तकातील 'तळी' मध्ये असणारं वर्णन विचार करायला लावते.


संध्याकाळी अनेक वेळा मी तळ्यावरील वारा अंगावर घेत बोटीत माझी बासरी वाजवत बसायचो पर्च मासा माझ्या भोवती गिरट्या घालायचे.बहुदा माझ्या बासरीच्या सुरांनी ते समोहित होत असावेत काय माहित खाली पाण्यात घिरट्या घालणारे मासे त्यांच्या खाली पाण्यात खडबडीत तळ व त्यावर बुडलेली जंगलातील लाकडे,ओडंके आणि पाण्यात चालणारा चंद्र मला दिसायचा आणि मी संमोहित व्हायचो.


मला वाटायचं (थोरोला ) शांत काळोख्या रात्री जेव्हा तुमचे विचार विश्वाच्या पलीकडे स्वच्छंद सैर करत असतात अशावेळी हाताला बसलेला एखादा नाजूक झटका आहे तुमची विचार श्रुंखला तोडून तुम्हाला त्या अवस्थेतून बाहेर निसर्गात आणतो.पण मला वाटायचं पुढच्या वेळेला मी हवेत जाळे फेकून माझे विचार पकडू शकेन आणि त्याच जाळ्यांनी खाली पाण्यातील मासे एकाच जाळ्यात दोन्ही प्रकारचे मासे मी पकडत असे.


कारण वास्तव जगाची खोली बहुतेक माझ्या वैचारिक जगापेक्षा कमी असावी.


तलावाच्या मध्यभागी बोटीत बसून पाण्याला वेढलेल्या जंगलावर नजर टाकली तर निसर्ग सौंदर्य म्हणजे काय ते तुम्हाला कळेल निवळ्ळ अप्रतिम! स्तब्ध पाण्यात पडलेले जंगलाचे प्रतिबिंब या दृश्याला अतिसुंदर पुरोभाग पुरवतो. नुसते एवढेच नाही तर ते पाहताना असे वाटते की पाण्याला जंगलाच्या प्रतिबिंबाने त्याच्यात बंदिस्त केले आहे की काय ! किनाऱ्यावर सगळे कसे जेथल्या तेथे आहे फक्त काही ठिकाणी जेथे जंगलतोड झाली आहे. किंवा लागवड झाले आहे ते मात्र थोडासा ओबडधोबडपणा आला आहे.झाडांना वाढण्यासाठी पाण्याच्या बाजूला मुबलक जागा आहे आणि किनाऱ्यावरील प्रत्येक झाडाने एक महाकाय फांदी पाण्यावर वाढवलेलीच आहे.कापड फिसकू नये म्हणून जशी दोऱ्याची वीण घालतात तशी त्या तळ्याला झाडांनी एक वीण घातली आहे असे मला वाटते. पाण्यावर पसरलेल्या फांद्यांच्या ढहाळ्यावरून आपली नजर हळूहळू उंच झाडावर जाते.मानवी हस्तक्षेपाच्या काही खुणा आजही दिसतात पण हजारो वर्षे तळ्याचे पाणी या खुणा धुवत आले आहे.आणि कदाचित पुढेही तसेच होत राहील.


.....निसर्गातील सगळ्यात बोलकी व्यक्ती कोण असेल तर तळे.मी तर तळ्याला व्यक्तिच मानतो. कारण प्रत्येक तळ्याला स्वतःचे असे एक खास व्यक्तिमत्व असते... तळे म्हणजे पृथ्वीचे नेत्र. त्या डोळ्यात डोकावून पाहताना, पाहणारा स्वतःच्या मनाची व व्यक्तिमत्वाची खोली चाचपडत असतो. तळ्याकाठी असलेली झाडे त्या डोळ्याच्या सुंदर लांबसडक पापण्या, तर तळ्याकाठी घनदाट जंगले असलेले पर्वत त्या डोळ्याच्या भुवया....


तळे म्हणजे एखादी वितळलेली,गार झालेली पण पूर्ण घनरुप न झालेली काच असावी असे दिसते आणि त्यातील काही कण हे काचेत दिसणाऱ्या बुडबुड्याप्रमाणेच सुंदर दिसतात.बऱ्याच वेळा तुम्हाला चकाकणाऱ्या काळसर पाण्याचा अजून एक पट्टा तळ्यात दिसेल.तळ्यातील इतर पाण्यापासून एखाद्या कोळ्याच्या जाळ्याने वेगळा केल्यासारखा.

जणू जलदेवतेने तेथे कोणी येऊ नये म्हणून रेषा आखली आहे.


प्रकाशाची तळी! जर पृथ्वीवरील हे हिरे आकाराने लहान असते तर गुलामांनी ते उचलून नेऊन एखाद्या महाराणीच्या मुकुटात विराजमान केले असते.नशिबाने ते द्रव स्वरुपात आहेत. त्यामुळे आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी निरंतर उपलब्ध आहेत. या अस्सल हिऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि कोहिनूरच्या मागे लागतो.कुठे ही तळी आणि कुठे तो कोहिनूर!हे अस्सल हिरे इतके निर्मळ आहेत की बाजाराला त्यांची किंमतच करता येणार नाही.एकवेळ कोहिनूरमधे दोष सापडतील पण यांच्यात कसले दोषच नाहीत.ही तळी आपल्या जीवनापेक्षा,आयुष्यांपेक्षा कितीतरी सुंदर आहेत.त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शक आहे. त्यांच्याकडून तुम्हाला कसलीही वाईटसाईट विचारांची शिकवणी मिळणार नाही याची मला खात्री आहे.


दुर्दैवाने या निसर्गाचे कोडकौतुक करणारी,त्याचे आभार मानणारी माणसे आता या जगात नाहीत.पक्षी त्यांची पिसे आणि गुंजनासकट फुलांशी अद्वैत राखून आहेत.पण आजचे तरुण तरुणी आणि अफाट,मूक निसर्ग यांच्यात असे अद्वैत आहे का? निसर्ग आपला शहरापासून दूर फुलतोय! स्वर्गाचे गोडवे गाऊन तुम्ही निसर्गाचा अपमान करीत आहात एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही....


हे साहित्यातील पाणी आपल्या वास्तविक जीवनातही 'ओलावा' देवून जाते.


आणि मी विचार केला साहित्यातील पाणी मग पाण्यातही साहित्य असणारच. एखादा माणूस बारा गावचे पाणी पितो त्यावेळी त्या विचारा मागचा एक विचार असतो. पाण्यामधून संस्कार,नीतिमत्ता,शिष्टाचार,नियम त्या गावच्या परंपरा,त्या गावातील असणाऱ्या माणसांचा स्वभाव,त्या गावातील माणसांचे असणारे एकमेकां-सोबतचे संबंध,व्यवहार,वैचारिक पातळीवरील बैठक हे सर्व 'पाणी' या माध्यमातून समजून घेतलेलं असतं.

पूर्वीच्या काळी ओळख नातेवाईक असण्याची काही गरज नसायची. रस्त्यावरून जाणारा अनोळखी माणूस सुद्धा ओळखीचा असायचा कारण तो माणूस असणं इतकं पुरेसं असायचं.तहान लागली असता पाणी पीत असताना.अनेक विषयांवर वैचारिक व बौद्धिक चर्चा व्हायची व ज्ञानामध्ये अनुभवांमध्ये वाढ व्हायची.अनेक ज्ञानी ऋषीमुनी हे पाण्याजवळच ध्यानाला बसत मानवी स्वभावात असणारे जे प्रतिबिंब आहे ते पाण्याचे आहे. पाण्याचे स्थिती पाण्याचा स्वभाव तीच माणसाची स्थिती तोच माणसाचा स्वभाव असतो.अवखळपणा,नवीन ठिकाणी जात असताना मनाची होणारी घालमेल,उन्हाने तहान लागली असताना जीवाची होणारी घालमेल, तहान लागण्यानंतरची परिस्थिती आणि पाणी पुर्ण झाल्यानंतरची शरीराची स्थिती या सर्व गोष्टींचा जीवंत साक्षीदार म्हणून पाणी आपल्या सोबत नेहमीच असते.


पाण्याचा वापर करून आपण खाण्यायोग्य धान्याचे उत्पादन करीत असतो.पण दुसऱ्या बाजूला ('वेस्ट-अनकव्हरिंग द ग्लोबल फूड स्कँन्डल' ट्रीस्ट्रँम स्टुअर्स,ग्रंथाचिया द्वारी-अतुल देवुळगाकर,विश्वकर्मा पब्लिकेशन)पुस्तकातील नोंदी विचार करायला लावणाऱ्या आहेत.


मार्क अँड स्पेन्सर या कंपनीला ब्रेडच्या गट्ट्यातील वरचा व खालचा ब्रेड चालत नाही, म्हणून ब्रेडच्या कारखान्यातील २०,००० ब्रेडचे स्लाइस दररोज फेकून दिले जातात.'ना मला ना तुला,घाल डस्टबिनला' अशी म्हण कशी जगली जाते, हे वाचकाला उमगत जाते उत्तम अवस्थेतील ५० कोटी दह्याचे डब्बे,२५ कोटी ब्रेड स्लाइस,३० कोटी रुपयांची केळी,१६ लक्ष सफरचंद,१० लक्ष मांसाची पाकिटे,म्हणजेच २ कोटी टन वजनाच्या या सर्व जिनसा दरसाल ब्रिटनमध्ये कचराकुंडीत जातात.

अमेरिका याहून पुढे! तिथे एकंदरीत उत्पादनापैकी तब्बल ५० टक्के अन्न फेकून दिले जाते.'सुशी' व 'कॅव्हिअर' या फास्टफूडवर जपानमध्ये उड्या असतात. दरवर्षी सुमारे ४५०० कोटी रुपयांचे हे पदार्थ कसे नष्ट करायचे,ही जपानपुढे विवंचना आहे.


फेकून देण्याचे विडंबन करताना 'जाने भी दो यारो' या चित्रपटात नसरुद्दीन शहा खाता खाता सांगतो,'थोडा खाओ,जादा बाहर फेक दो,मजा आता है! ' ही धनदांडग्यांची मनोवृत्ती आहे.ते गरीब देशातील असोत वा श्रीमंत,गुणांमध्ये तसूभर फरक नाही.सर्वसामान्य जनतेपासून फारकत झालेले धनाढ्य जगभर आहेत.हे अन्न निर्माण करण्यासाठी किती कष्ट,वेळ व ऊर्जा खर्च झाली हा विचारसुद्धा त्यांना शिवत नाही.नासाडीबद्दल त्यांना यत्किंचितही खेद-खंत वाटत नाही.वरचेवर नासाडी ही जीवनशैली असणारे वाढत आहेत.त्यातूनच अख्खी फळे,स्पर्श न झालेल्या पाकीटबंद फास्टफूडचा प्रवास रेफ्रिजरेटर ते डस्टबिन असा होत आहे.उकिरडे साफ करणाऱ्या डुकरांची चंगळ होत आहे.त्याच युरोपमध्ये ४ कोटी,अमेरिकेत ३.५ कोटी, तर ब्रिटनमध्ये ४० लक्ष भुकेले राहतात,याचे भान लेखक आणून देतो .


अन्नधान्यामुळे जग एकवटले असल्यामुळे नासाडी हा मुद्दा वैयक्तिक राहत नाही.त्याचा परिणाम जगभर दिसतो या जगड्याळ नासाडीमुळे अधिक धान्याची गरज निर्माण होते (त्यात भर म्हणून अमेरिकेने २ वर्षांत १० कोटी टन धान्यापासून जैवइंधन केलं.)त्यातूनच गरीब राष्ट्रांच्या जमिनी बळकावून धान्योत्पादन चालू होते,लाखो हेक्टर जंगल नामशेष करून शेती होते.दुसरीकडे धान्याची प्रचंड वाहतूक,साठवण व प्रक्रियेवरचा खर्च अक्षरशः बाद ठरतो. शेतापासून ताटात अन्न पडेपर्यंत (अथवा कुजेपर्यंत) प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा लागते.कर्ब वायूचे उत्सर्जन होते.समस्त घनकचरा अजस्र खड्डयात साठवला जातो तिथे तो कुजवला अथवा जाळला जातो.एका सर्वेक्षणानुसार युरोपमधील ३३ टक्के कर्ब वायूचे उत्सर्जन अन्नधान्याचे उत्पादन व वाहतूक यामधून होते.जगातील अन्नधान्याचा पर्वत आणि नासाडी ही पर्यावरणीय जोखीम होऊन बसली आहे. जगभरातील उच्चमध्यमवर्गीयांचा मांसाहार झपाट्याने वाढत आहे.वाढत्या मागणीनुसार मांस खाण्यास योग्य पशुपैदास व पशुखाद्य यांची गरज वाढते.त्यामुळे तृणधान्य (गहू, मका, बाजरी ) अधिक प्रमाणात पशुखाद्य होऊ लागले. कोंबडीचे वजन एक किलो करण्याकरिता दोन किलो धान्य भरवावे लागते,तीन किलो तृणधान्याने पोसल्यावर दोन किलो डुकराचे मांस तयार होते तर एक किलो बैलाचे मांस तयार होण्यासाठी आठ किलो धान्य पसार होत असते.


हे अन्नधान्य वाया गेले नसते तर कुणाच्या पोटात गेले असते?हा भाबडा आशावाद आहे असे कोणी म्हणू शकेल.धनवान व गरीब देशासाठी जागतिक बाजारपेठ एकच आहे ही वस्तुस्थिती आहे.धनवानांची हजारो टन खरेदी ते कचरा अशी धान्याचे वाट लागते,तेव्हा दारिद्र्य देश धान्यांपासून वंचित राहत असतात.हे सर्व तयार करण्यासाठी कितीतरी हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असते.याचा आपण माणूस म्हणून विचार नक्कीच करायला हवा.याच अनुशंगाने माहितीयुक्त ज्ञानासाठी हे पुस्तक वाचणे महत्वाचे ठरेल.


परवाच आमचे मित्र सतीश खाडे यांचा पॉडकास्ट श्रवण करत असताना.एक कप चहा बनवण्यासाठी साधारणतःएक कप पाणी,एक चमचा साखर,एक चमचा चहा पूड साहित्य लागतं.ही झाली सर्वसाधारण चहा बनविण्याची कृती पण निसर्गातील संसाधनाचा विचार केला असता १०० ते १२० लिटरपाणी लागते.साखर तयार करताना लागणारे पाणी,चहा बनवताना लागणारे दूध हे दूध तयार होण्यासाठी जनावरांना लागणारा चारा व त्या चाऱ्यासाठी लागणारे पाणी,चहा मळ्यांना लागणारे पाणी या सर्वांचा विचार करता पाणी हे जास्तीचे लागतेच.असे हे पाणी थोड्याफार फरकाने आपल्या सर्वांच्यात आहे…


परवा वाचत असताना काही विचारांनी लक्ष वेधून घेतले.


जगणं म्हणजे विचार करणे.तुम्ही मुळात भौतिक शरीर असलेले मन असता.तुमच्या अस्थी,मज्जा व स्नायू म्हणजे ८० टक्के पाणी व काही कमी महत्त्वाच्या रासायनिक द्रव्यांखेरीज काही नसते; पण "तुम्ही कोण आणि काय आहात हे ठरवीत असतात तुमचे मन व तुमचे विचार..!.


जाता.. जाता..


'अरण्यवाचन' या पुस्कातील हे अनुभव घेतलेले वाक्य विचार करा म्हणून सांगून गेले.


'तलाव' म्हणजे फक्त 'साठलेलं पाणी नाही' आणि तलावाचा काठ म्हणजे ' नुसता चिखल' नाही.


पूर्व प्रसिद्धी - ' जलसंवाद ' मासिक फेब्रुवारी २०२३ सर्वांचे मनापासून आभार..