* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: साहित्यातील 'पाणी' आणि पाण्यातील 'साहित्य'..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/३/२३

साहित्यातील 'पाणी' आणि पाण्यातील 'साहित्य'..!

"पाणी" मानव व इतर जिवंत असणाऱ्या जीवांच्या जीवनातील अविभाज्य अंग.पाणी आहे तर सर्व काही आहे. धान्य पिकवताना जे पाणी लागतं तेच पाणी धान्यापासून अन्न शिजवताना लागतं. पाण्याजवळ तळ्याकाठी नदीकाठीच माणसाने राज्ये व नगरे वसवली होती.पहिला जीव पाण्यातच जन्माला आला. वनस्पती निसर्ग या सर्वांठायी पाणी असतेच.


"पाणी हा जसा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसाच वनस्पतींचाही,हरित वनस्पती पाण्याचा उपयोग करून सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण क्रियेमधून स्वतःचे कर्बयुक्त अन्न तयार करतात.(पाणवनस्पती डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद पत्रिका नोव्हेंबर 2022 )


आम्ही लहान असताना जुनी माणसं अनुभवाचा दाखला देत असताना मी किती अनुभव संपन्न आहे हे सांगत असताना 'मी बारा गावचे पाणी प्यालो आहे,अशी वाक्य रचना ते नेहमी करायचे. त्यावेळी मला वाटायचं नुसतं बारा गावात जावून पाणीच तर पिऊन आलेत.त्यात अनुभवाचा काय संबध पण हे समजण्यास फार काळ जावा लागला.'समजलेला' अनुभव पुढे येईलच.


हेन्री डेव्हिड थोरोचे वॉल्डन पुस्तक व त्या पुस्तकातील 'तळी' मध्ये असणारं वर्णन विचार करायला लावते.


संध्याकाळी अनेक वेळा मी तळ्यावरील वारा अंगावर घेत बोटीत माझी बासरी वाजवत बसायचो पर्च मासा माझ्या भोवती गिरट्या घालायचे.बहुदा माझ्या बासरीच्या सुरांनी ते समोहित होत असावेत काय माहित खाली पाण्यात घिरट्या घालणारे मासे त्यांच्या खाली पाण्यात खडबडीत तळ व त्यावर बुडलेली जंगलातील लाकडे,ओडंके आणि पाण्यात चालणारा चंद्र मला दिसायचा आणि मी संमोहित व्हायचो.


मला वाटायचं (थोरोला ) शांत काळोख्या रात्री जेव्हा तुमचे विचार विश्वाच्या पलीकडे स्वच्छंद सैर करत असतात अशावेळी हाताला बसलेला एखादा नाजूक झटका आहे तुमची विचार श्रुंखला तोडून तुम्हाला त्या अवस्थेतून बाहेर निसर्गात आणतो.पण मला वाटायचं पुढच्या वेळेला मी हवेत जाळे फेकून माझे विचार पकडू शकेन आणि त्याच जाळ्यांनी खाली पाण्यातील मासे एकाच जाळ्यात दोन्ही प्रकारचे मासे मी पकडत असे.


कारण वास्तव जगाची खोली बहुतेक माझ्या वैचारिक जगापेक्षा कमी असावी.


तलावाच्या मध्यभागी बोटीत बसून पाण्याला वेढलेल्या जंगलावर नजर टाकली तर निसर्ग सौंदर्य म्हणजे काय ते तुम्हाला कळेल निवळ्ळ अप्रतिम! स्तब्ध पाण्यात पडलेले जंगलाचे प्रतिबिंब या दृश्याला अतिसुंदर पुरोभाग पुरवतो. नुसते एवढेच नाही तर ते पाहताना असे वाटते की पाण्याला जंगलाच्या प्रतिबिंबाने त्याच्यात बंदिस्त केले आहे की काय ! किनाऱ्यावर सगळे कसे जेथल्या तेथे आहे फक्त काही ठिकाणी जेथे जंगलतोड झाली आहे. किंवा लागवड झाले आहे ते मात्र थोडासा ओबडधोबडपणा आला आहे.झाडांना वाढण्यासाठी पाण्याच्या बाजूला मुबलक जागा आहे आणि किनाऱ्यावरील प्रत्येक झाडाने एक महाकाय फांदी पाण्यावर वाढवलेलीच आहे.कापड फिसकू नये म्हणून जशी दोऱ्याची वीण घालतात तशी त्या तळ्याला झाडांनी एक वीण घातली आहे असे मला वाटते. पाण्यावर पसरलेल्या फांद्यांच्या ढहाळ्यावरून आपली नजर हळूहळू उंच झाडावर जाते.मानवी हस्तक्षेपाच्या काही खुणा आजही दिसतात पण हजारो वर्षे तळ्याचे पाणी या खुणा धुवत आले आहे.आणि कदाचित पुढेही तसेच होत राहील.


.....निसर्गातील सगळ्यात बोलकी व्यक्ती कोण असेल तर तळे.मी तर तळ्याला व्यक्तिच मानतो. कारण प्रत्येक तळ्याला स्वतःचे असे एक खास व्यक्तिमत्व असते... तळे म्हणजे पृथ्वीचे नेत्र. त्या डोळ्यात डोकावून पाहताना, पाहणारा स्वतःच्या मनाची व व्यक्तिमत्वाची खोली चाचपडत असतो. तळ्याकाठी असलेली झाडे त्या डोळ्याच्या सुंदर लांबसडक पापण्या, तर तळ्याकाठी घनदाट जंगले असलेले पर्वत त्या डोळ्याच्या भुवया....


तळे म्हणजे एखादी वितळलेली,गार झालेली पण पूर्ण घनरुप न झालेली काच असावी असे दिसते आणि त्यातील काही कण हे काचेत दिसणाऱ्या बुडबुड्याप्रमाणेच सुंदर दिसतात.बऱ्याच वेळा तुम्हाला चकाकणाऱ्या काळसर पाण्याचा अजून एक पट्टा तळ्यात दिसेल.तळ्यातील इतर पाण्यापासून एखाद्या कोळ्याच्या जाळ्याने वेगळा केल्यासारखा.

जणू जलदेवतेने तेथे कोणी येऊ नये म्हणून रेषा आखली आहे.


प्रकाशाची तळी! जर पृथ्वीवरील हे हिरे आकाराने लहान असते तर गुलामांनी ते उचलून नेऊन एखाद्या महाराणीच्या मुकुटात विराजमान केले असते.नशिबाने ते द्रव स्वरुपात आहेत. त्यामुळे आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी निरंतर उपलब्ध आहेत. या अस्सल हिऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि कोहिनूरच्या मागे लागतो.कुठे ही तळी आणि कुठे तो कोहिनूर!हे अस्सल हिरे इतके निर्मळ आहेत की बाजाराला त्यांची किंमतच करता येणार नाही.एकवेळ कोहिनूरमधे दोष सापडतील पण यांच्यात कसले दोषच नाहीत.ही तळी आपल्या जीवनापेक्षा,आयुष्यांपेक्षा कितीतरी सुंदर आहेत.त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शक आहे. त्यांच्याकडून तुम्हाला कसलीही वाईटसाईट विचारांची शिकवणी मिळणार नाही याची मला खात्री आहे.


दुर्दैवाने या निसर्गाचे कोडकौतुक करणारी,त्याचे आभार मानणारी माणसे आता या जगात नाहीत.पक्षी त्यांची पिसे आणि गुंजनासकट फुलांशी अद्वैत राखून आहेत.पण आजचे तरुण तरुणी आणि अफाट,मूक निसर्ग यांच्यात असे अद्वैत आहे का? निसर्ग आपला शहरापासून दूर फुलतोय! स्वर्गाचे गोडवे गाऊन तुम्ही निसर्गाचा अपमान करीत आहात एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही....


हे साहित्यातील पाणी आपल्या वास्तविक जीवनातही 'ओलावा' देवून जाते.


आणि मी विचार केला साहित्यातील पाणी मग पाण्यातही साहित्य असणारच. एखादा माणूस बारा गावचे पाणी पितो त्यावेळी त्या विचारा मागचा एक विचार असतो. पाण्यामधून संस्कार,नीतिमत्ता,शिष्टाचार,नियम त्या गावच्या परंपरा,त्या गावातील असणाऱ्या माणसांचा स्वभाव,त्या गावातील माणसांचे असणारे एकमेकां-सोबतचे संबंध,व्यवहार,वैचारिक पातळीवरील बैठक हे सर्व 'पाणी' या माध्यमातून समजून घेतलेलं असतं.

पूर्वीच्या काळी ओळख नातेवाईक असण्याची काही गरज नसायची. रस्त्यावरून जाणारा अनोळखी माणूस सुद्धा ओळखीचा असायचा कारण तो माणूस असणं इतकं पुरेसं असायचं.तहान लागली असता पाणी पीत असताना.अनेक विषयांवर वैचारिक व बौद्धिक चर्चा व्हायची व ज्ञानामध्ये अनुभवांमध्ये वाढ व्हायची.अनेक ज्ञानी ऋषीमुनी हे पाण्याजवळच ध्यानाला बसत मानवी स्वभावात असणारे जे प्रतिबिंब आहे ते पाण्याचे आहे. पाण्याचे स्थिती पाण्याचा स्वभाव तीच माणसाची स्थिती तोच माणसाचा स्वभाव असतो.अवखळपणा,नवीन ठिकाणी जात असताना मनाची होणारी घालमेल,उन्हाने तहान लागली असताना जीवाची होणारी घालमेल, तहान लागण्यानंतरची परिस्थिती आणि पाणी पुर्ण झाल्यानंतरची शरीराची स्थिती या सर्व गोष्टींचा जीवंत साक्षीदार म्हणून पाणी आपल्या सोबत नेहमीच असते.


पाण्याचा वापर करून आपण खाण्यायोग्य धान्याचे उत्पादन करीत असतो.पण दुसऱ्या बाजूला ('वेस्ट-अनकव्हरिंग द ग्लोबल फूड स्कँन्डल' ट्रीस्ट्रँम स्टुअर्स,ग्रंथाचिया द्वारी-अतुल देवुळगाकर,विश्वकर्मा पब्लिकेशन)पुस्तकातील नोंदी विचार करायला लावणाऱ्या आहेत.


मार्क अँड स्पेन्सर या कंपनीला ब्रेडच्या गट्ट्यातील वरचा व खालचा ब्रेड चालत नाही, म्हणून ब्रेडच्या कारखान्यातील २०,००० ब्रेडचे स्लाइस दररोज फेकून दिले जातात.'ना मला ना तुला,घाल डस्टबिनला' अशी म्हण कशी जगली जाते, हे वाचकाला उमगत जाते उत्तम अवस्थेतील ५० कोटी दह्याचे डब्बे,२५ कोटी ब्रेड स्लाइस,३० कोटी रुपयांची केळी,१६ लक्ष सफरचंद,१० लक्ष मांसाची पाकिटे,म्हणजेच २ कोटी टन वजनाच्या या सर्व जिनसा दरसाल ब्रिटनमध्ये कचराकुंडीत जातात.

अमेरिका याहून पुढे! तिथे एकंदरीत उत्पादनापैकी तब्बल ५० टक्के अन्न फेकून दिले जाते.'सुशी' व 'कॅव्हिअर' या फास्टफूडवर जपानमध्ये उड्या असतात. दरवर्षी सुमारे ४५०० कोटी रुपयांचे हे पदार्थ कसे नष्ट करायचे,ही जपानपुढे विवंचना आहे.


फेकून देण्याचे विडंबन करताना 'जाने भी दो यारो' या चित्रपटात नसरुद्दीन शहा खाता खाता सांगतो,'थोडा खाओ,जादा बाहर फेक दो,मजा आता है! ' ही धनदांडग्यांची मनोवृत्ती आहे.ते गरीब देशातील असोत वा श्रीमंत,गुणांमध्ये तसूभर फरक नाही.सर्वसामान्य जनतेपासून फारकत झालेले धनाढ्य जगभर आहेत.हे अन्न निर्माण करण्यासाठी किती कष्ट,वेळ व ऊर्जा खर्च झाली हा विचारसुद्धा त्यांना शिवत नाही.नासाडीबद्दल त्यांना यत्किंचितही खेद-खंत वाटत नाही.वरचेवर नासाडी ही जीवनशैली असणारे वाढत आहेत.त्यातूनच अख्खी फळे,स्पर्श न झालेल्या पाकीटबंद फास्टफूडचा प्रवास रेफ्रिजरेटर ते डस्टबिन असा होत आहे.उकिरडे साफ करणाऱ्या डुकरांची चंगळ होत आहे.त्याच युरोपमध्ये ४ कोटी,अमेरिकेत ३.५ कोटी, तर ब्रिटनमध्ये ४० लक्ष भुकेले राहतात,याचे भान लेखक आणून देतो .


अन्नधान्यामुळे जग एकवटले असल्यामुळे नासाडी हा मुद्दा वैयक्तिक राहत नाही.त्याचा परिणाम जगभर दिसतो या जगड्याळ नासाडीमुळे अधिक धान्याची गरज निर्माण होते (त्यात भर म्हणून अमेरिकेने २ वर्षांत १० कोटी टन धान्यापासून जैवइंधन केलं.)त्यातूनच गरीब राष्ट्रांच्या जमिनी बळकावून धान्योत्पादन चालू होते,लाखो हेक्टर जंगल नामशेष करून शेती होते.दुसरीकडे धान्याची प्रचंड वाहतूक,साठवण व प्रक्रियेवरचा खर्च अक्षरशः बाद ठरतो. शेतापासून ताटात अन्न पडेपर्यंत (अथवा कुजेपर्यंत) प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा लागते.कर्ब वायूचे उत्सर्जन होते.समस्त घनकचरा अजस्र खड्डयात साठवला जातो तिथे तो कुजवला अथवा जाळला जातो.एका सर्वेक्षणानुसार युरोपमधील ३३ टक्के कर्ब वायूचे उत्सर्जन अन्नधान्याचे उत्पादन व वाहतूक यामधून होते.जगातील अन्नधान्याचा पर्वत आणि नासाडी ही पर्यावरणीय जोखीम होऊन बसली आहे. जगभरातील उच्चमध्यमवर्गीयांचा मांसाहार झपाट्याने वाढत आहे.वाढत्या मागणीनुसार मांस खाण्यास योग्य पशुपैदास व पशुखाद्य यांची गरज वाढते.त्यामुळे तृणधान्य (गहू, मका, बाजरी ) अधिक प्रमाणात पशुखाद्य होऊ लागले. कोंबडीचे वजन एक किलो करण्याकरिता दोन किलो धान्य भरवावे लागते,तीन किलो तृणधान्याने पोसल्यावर दोन किलो डुकराचे मांस तयार होते तर एक किलो बैलाचे मांस तयार होण्यासाठी आठ किलो धान्य पसार होत असते.


हे अन्नधान्य वाया गेले नसते तर कुणाच्या पोटात गेले असते?हा भाबडा आशावाद आहे असे कोणी म्हणू शकेल.धनवान व गरीब देशासाठी जागतिक बाजारपेठ एकच आहे ही वस्तुस्थिती आहे.धनवानांची हजारो टन खरेदी ते कचरा अशी धान्याचे वाट लागते,तेव्हा दारिद्र्य देश धान्यांपासून वंचित राहत असतात.हे सर्व तयार करण्यासाठी कितीतरी हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असते.याचा आपण माणूस म्हणून विचार नक्कीच करायला हवा.याच अनुशंगाने माहितीयुक्त ज्ञानासाठी हे पुस्तक वाचणे महत्वाचे ठरेल.


परवाच आमचे मित्र सतीश खाडे यांचा पॉडकास्ट श्रवण करत असताना.एक कप चहा बनवण्यासाठी साधारणतःएक कप पाणी,एक चमचा साखर,एक चमचा चहा पूड साहित्य लागतं.ही झाली सर्वसाधारण चहा बनविण्याची कृती पण निसर्गातील संसाधनाचा विचार केला असता १०० ते १२० लिटरपाणी लागते.साखर तयार करताना लागणारे पाणी,चहा बनवताना लागणारे दूध हे दूध तयार होण्यासाठी जनावरांना लागणारा चारा व त्या चाऱ्यासाठी लागणारे पाणी,चहा मळ्यांना लागणारे पाणी या सर्वांचा विचार करता पाणी हे जास्तीचे लागतेच.असे हे पाणी थोड्याफार फरकाने आपल्या सर्वांच्यात आहे…


परवा वाचत असताना काही विचारांनी लक्ष वेधून घेतले.


जगणं म्हणजे विचार करणे.तुम्ही मुळात भौतिक शरीर असलेले मन असता.तुमच्या अस्थी,मज्जा व स्नायू म्हणजे ८० टक्के पाणी व काही कमी महत्त्वाच्या रासायनिक द्रव्यांखेरीज काही नसते; पण "तुम्ही कोण आणि काय आहात हे ठरवीत असतात तुमचे मन व तुमचे विचार..!.


जाता.. जाता..


'अरण्यवाचन' या पुस्कातील हे अनुभव घेतलेले वाक्य विचार करा म्हणून सांगून गेले.


'तलाव' म्हणजे फक्त 'साठलेलं पाणी नाही' आणि तलावाचा काठ म्हणजे ' नुसता चिखल' नाही.


पूर्व प्रसिद्धी - ' जलसंवाद ' मासिक फेब्रुवारी २०२३ सर्वांचे मनापासून आभार..