* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/५/२३

कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

माहिती मिळवण्यासाठी फोन करून चौकशी करण्याऐवजी आता संकेतस्थळांवर चॅटबॉटशी संवाद साधला जातो.यंत्रे स्वतः कॉल करून आपल्याशी बोलतात. मानवी संभाषणाचे सरूपीकरण (सिम्युलेट) करत.ठरावीक वाक्याशांना प्रत्युत्तर देण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात.तज्ज्ञ प्रणालीच्या साहाय्याने दोन भिन्न भाषक समोरासमोर संवाद साधू शकतात. अर्थात,
त्यासाठी पूर्वनियोजित उत्तरांचा संचय त्यात केलेला असतो.

आंतरजालग्राही साधनांनी आखून दिलेला नकाशा आणि मार्ग अनुसरून आपण रस्ते शोधू शकतो आणि योग्य ठिकाणी पोहोचतो. आपल्याला माहीत आहे,की हवाई वाहतुकीचे नियंत्रण अत्यंत गुंतागुंतीचे असते.विमानांचा प्रवासमार्ग आखणे,आगमन आणि प्रस्थानाचे (लॅण्डिंग,टेक-ऑफ) नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहाय्य घेतले जाते.


ज्ञानप्राप्ती,तर्क करणे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवणे,ह्या मानवाच्या अंगी असलेल्या तीन विशेष कौशल्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता भर देते.


परंतु संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची उदिष्टे ह्यापेक्षा अधिक विस्तृत केली आहेत.त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या परिवर्तन घडवून आणत आहेत.

उदाहरणार्थ,मोठ्या संचयामधून दृश्यस्वरूपातील माहिती आणि वस्तूंचा शोध घेणारे 'इमेजनेट,भाषानुवादाकरिता प्रामुख्याने वापरले जाणारे 'गूगल ट्रान्स्लेट' बुद्धिबळ 'गो', 'शिगो' सारख्या पटांवरील खेळासाठी तयार केलेली 'अल्फा झीरो' प्रणाली.


डीप माइण्ड तंत्रज्ञानाने न्यूरल ट्यूरिंग मशीन तयार केले,ज्यामुळे संगणकात मानवी मेंदूच्या अल्पकालीन स्मृती सह क्षमता येऊ शकते.बोर्ड गेम 'गो' ह्या अत्यंत कठीण आणि अवघड प्राचीन खेळाच्या 'गो'पटूला हरवणारी गूगल निर्मित 'अल्फागो' संगणकीय प्रणालीसुद्धा डीप माइण्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.


'गुगल'ची चालकरहित गाडी आणि 'टेस्ला' कंपनीची स्वचालित गाडी,वाहन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची विशेष ओळख देते.दूरनियंत्रित यान (ड्रोन) निर्मिती आणि त्याच्या प्रयोगात परिस्थितीअनुसार योग्य निर्णय घेण्याची क्षमता यंत्रात असते.


"आयबीएम' निर्मित 'वॉटसन'चे वैशिष्ट्य असे आहे की ठरावीक एका कामासाठी हा संगणक तयार केला नसून विभिन्न प्रकारचे कार्य तो तितक्याच समर्थपणे करू शकतो.तो रोगचिकित्सा करू शकतो.सगळ्यांत जास्त वेळा अमेरिकन गेम शो जेपार्डीमध्ये सलग जिंकणाऱ्या जेत्या जेन केर्निम्सला हरवू शकतो. किंवा शास्त्रीय संगीतातील नादमधुर आविष्कार घडवू शकतो.

छायाचित्र,चित्रफीत,ध्वनिफीत, कोणत्याही स्वरूपातल्या माहितीचा अभ्यास वॉटसन करू शकतो.सातत्याने स्वयंअध्ययन करत असल्याने,वॉटसनने घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाही,ह्याची खात्रीसुद्धा तो स्वतःच करू शकतो; कारण कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले सल्ले विश्वासार्ह असल्याची त्याला खात्री असते.


जगात अग्रक्रमांकावर असलेल्या 'वॉस्टन डायनॅमिक्स' कंपनीने रोबोटिक्समधील आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी,अनेक भ्रमण- यंत्रमानव (मोबाइल रोबोट) निर्माण केले आहेत.'स्पॉट' नावाच्या त्यांच्या चार पायांच्या यंत्रमानवाचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चालते,

म्हणजे त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली आहे. तो चपळाईने पायऱ्यांची चढ-उतार करू शकतो.वाटेतला भाग खडबडीत किंवा गवताळ असला तरी ओलांडून पार करू शकतो. त्यासाठी त्याच्या पायांची रचना निमुळती केली आहे.त्याबरोबरच तो चलाख आणि चाणाक्षही आहे.


सर्वसाधारण यंत्रमानवांना अरुंद,दाटीवाटीच्या ठिकाणी हालचालीसाठी मर्यादा येतात आणि चिंचोळ्या भागात फिरणे अडचणीचे होऊ शकते.परंतु,स्पॉटच्या पायांना चाके लावल्यामुळे तो कानाकोपऱ्यात सहजतेने पोहोचू शकतो.तो वळूसुद्धा शकतो.


स्पॉटची दिव्यदृष्टी ३६० अंशांपर्यंत बघू शकते,त्यामुळे मार्गातले अडथळे तो सहजपणे चुकवू शकतो.पूर्व

नियोजित लक्ष्य साध्य करण्यासाठी,स्पॉटला दुरून नियंत्रित करता येते.


तसेच,कोणत्या दिशेने आणि कसा प्रवास करायचा आहे;त्याचा मार्गक्रमही आधीच निश्चित करता येतो.

त्याच्यात अनेक प्रकारचे संवेदक बसवलेले असल्यामुळे धोकादायक प्रदेशात जाण्यासाठी किंवा जोखमीची कामे करण्यासाठी,तसेच बांधकाम,संशोधन,हवामानखाते,

खाणकाम इत्यादी क्षेत्रांत स्पॉट बहुउपयोगी आहे.


उद्योग-व्यवसायात काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची,उत्पादनाच्या वाढीचा दर वाढविण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

व्यवसायांचा उत्कर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असल्याने,कृत्रिम बुद्धिमत्ता हा उत्पादनाचा एक घटक मानला जातो.तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगाची उन्नती करण्याचे साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र विचाराधीन आहे.


'यंत्रांमध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण करता येईल का?" ह्या प्रश्नाचे स्वीकारात्मक आणि होकारार्थी उत्तर शोधणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूलभूत उद्दिष्ट असल्यामुळे मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेची प्रतिकृती,यंत्रांमध्ये निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयत्नशील आहे.

आत्मसात करण्याचा यंत्रांचा वेग लक्षात घेता,

मानवाला त्यांच्या गतीने बुद्धीला चालना देऊन धावावे लागेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यावरील संशोधन प्रगतिपथावर असल्यामुळे बुद्धिजीवी मनुष्य सर्जनशीलतेचा उपयोग नावीन्यपूर्ण निर्मितीसाठी करत आहे.


इतक्या सहजपणे,आपल्या नकळत,आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या आयुष्यात स्थान दिले आहे,की भविष्यात यंत्रे दैनंदिन पठडीतली कामे मनुष्यापेक्षा बिनचूक आणि सफाईदारपणे करतील.पण,

ह्याच्यापलीकडे कल्पनाही करू शकणार नाही असे करण्याचे सामर्थ्य कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात कुठपर्यंत मजल मारू शकेल?अनेक तत्त्वज्ञानी,संज्ञानात्मक शास्त्रज्ञांनी,संगणक

शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता कुठे असफल होऊ शकेल,

भवितव्य काय असेल,भविष्यात कशी असेल,याची अनुमाने लावली आहेत.काहींचा असा विश्वास आहे,की परिणामी तांत्रिक एकलता,दारिद्र्य आणि रोग दूर करील,तर इतर चेतावणी देतात,की


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी अस्तित्व धोक्यात येऊ शकते.


असा अंदाज आहे की, २०३०पर्यंत ७०% व्यवसाय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा किमान एक प्रकार उपयोगात आणतील.कर्मचाऱ्यांना तत्काळ सानुकूलित उपाय आणि सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मिळू शकतील.

त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित तंत्रज्ञानात कौशल्य असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी वाढतच राहील.

संगणकाद्वारे संवाद साधताना दृष्टी, श्रवण,स्पर्श आणि गंधाची अनुभूती देण्याचे तंत्रज्ञान उदयोन्मुख आहे.

प्रशिक्षण देऊन कुशल कर्मचारीवर्ग तयार केला जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कर्मचारी आणि व्यावसायिकांना नवीन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक होईल.कामाचे स्वरूप बदलेल, त्याबरोबरच नवीन संधी आणि रोजगार उपलब्ध होतील.उदाहरणार्थ : यंत्र स्वयं अध्ययन तर्कात सुधारणा करण्यासाठी संशोधक,मुबलक अपक्क माहितीस्रोताचा तपास करणे,नमुना ओळखण्यासाठी प्रणाली तयार करणे,प्रशिक्षण देणे.


भारत सरकारच्या 'स्किल इंडिया' उपक्रमाअंतर्गत 'प्रधानमंत्री कौशल विकास योजना राबवली जात आहे,ज्यात तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला जातो.


कृत्रिम बुद्धिमत्तेचे दीर्घकालीन ध्येय,सर्व कार्यामध्ये मानवी संज्ञानात्मक क्षमतांना मागे टाकण्यात यंत्रांना यशस्वी करणे,म्हणजे 'अनन्यसाधारण' बुद्धिमत्ता निर्माण करण्याचे आहे.मनुष्याची विचार करायची पद्धत खूप गुंतागुंतीची असते.आपण कसा अर्थ लावतो, एखाद्या गोष्टीचा आपल्याला काय बोध होतो; आपल्या भावना,

श्रद्धा,विश्वास,समज,समजूत, अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात..


त्याशिवाय सामान्यबोध किंवा व्यावहारिक ज्ञान, म्हणजे दैनंदिन जीवनात काही गोष्टी मनुष्याला माहीत असतील असे गृहीत धरलेले असते.


तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.


१९५० - बहुज्ञ अॅलन ट्युरिंगनी 'कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधपत्रात सुप्रसिद्ध 'ट्युरिंग टेस्ट' प्रस्तुत केली.


१९५६ - संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅक्कार्थी यांनी डार्टमाउथ परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम मांडली.


१९६९- केवळ सूचनांचे क्रमवार पालन करण्याशिवाय,हेतू सफल करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्यासाठी सक्षम असा पहिला व्यापकउद्देशीय चलित यंत्रमानव 'शँकी' तयार झाला.


१९९७ - महासंगणक 'डीप ब्लू'ने विश्वविजेत्या बुद्धिबळपटूला खेळात हरवले. 'डीप ब्लु' निर्माण करणाऱ्या 'आयबीएम'च्या दृष्टीने मोठा टप्पा समजला जातो. 


२००२ - व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असा पहिला 'रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर' तयार करण्यात आला.


२००५ - 'स्टॅनली' ह्या यंत्रमानवाने 'डीएआरपीए ग्रॅण्ड चॅलेंज' मनुष्याच्या साहाय्याशिवाय वाहन चालवून जिंकले.


२००५ - शोधक आणि भविष्यवादी रे कुर्झवील यांनी 'एकलता' ह्या घटनेचे भाकीत केले,जी २०४५ च्या सुमारास घडेल,जेव्हा कृत्रिम मनाची बुद्धिमत्ता मानवी मेंदूपेक्षा जास्त असेल.


२०११ - अमेरिकन गेम शो 'जेपार्डी'मध्ये सगळ्यांत जास्त वेळा जेत्या ठरलेल्या जेन केनिंग्सला 'आयबीएम' निर्मित वॉटसनने हरवल


२०११ - 'अॅपल'च्या 'आयफोन'मध्ये बुद्धिमान साहाय्यक 'सिरी' समाविष्ट झाला. 


२०१७ - देशाचे नागरिकत्व मिळवणारी मानव सदृश 'सोफिया' पहिली रोबोट ठरली.


जॉन मॅककार्थी यांनी १९५९ साली 'अॅडव्हाइस टेकर' हा काल्पनिक प्रोग्रॅम त्यांच्या 'प्रोग्रॅम्स विथ कॉमन सेन्स' ह्या शोधपत्रामध्ये प्रस्तावित केला होता.त्यात त्यांनी असे सांगितले,की तर्काच्या साहाय्याने माहितीचा बोध संगणक लावतील आणि लगेच निष्कर्ष काढून 'सुसंगत' निर्णय घेऊ शकतील.

त्यामुळे निर्णयाचा परिणाम काय होईल हे जर संगणक ठरवू आणि सांगू शकला,तर त्याच्यात 'कॉमनसेन्स' आहे असे म्हणता येईल.


चित्रपटात किंवा काल्पनिक कथांमध्ये रंगवलेले संवेदनशील यंत्रमानव प्रत्यक्षात निर्माण करणे नजीकच्या काळात शक्य होणे कठिण आहे. जरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र विकसित होऊन मानवसदृश यंत्रमानव तयार करण्याची क्षमता आली,तरी नैतिकतेचे प्रश्न अडथळा ठरू शकतील.


 विचार आणि भावना समजून संवाद साधणारे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे


भविष्यातील तंत्रज्ञान स्वयं अभिज्ञ (सेल्फअवेअर),

त्याबरोबरच अधिक चतुर,संवेदनशील आणि जागरूक असेल.मानवाचे भविष्यातील जीवन कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित असेल ह्याची मानसिक तयारी करणे अपरिहार्य आहे.


विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, विज्ञानकल्पनांमधून बुद्धिमान यंत्रमानवाच्या संकल्पनेचा कृत्रिमरीत्या परिचय जगाला झाला. त्या सुरुवात 


'विझार्ड ऑफ ओझ'च्या हृदयहीन 'टिन मॅन' पासून झाला.त्यानंतर 'मेट्रोपोलिस' चित्रपटात मानवसदृश यंत्रमानव 'मारिया'.बुद्धी आणि कार्य ह्या दोघांमध्ये हृदयाची मध्यस्थी आवश्यक आहे,असा संदेश ह्यातून दिला आहे. त्यामुळे मनुष्य आणि यंत्रांनी एकत्रितपणे समस्यांची उकल केली,तर कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल भविष्यातही यशस्वी होईल.


- वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ

मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,

२०२२ नोव्हेंबर भाग - २ ( सदरचा हा लेख संपला.)

१४/५/२३

कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास,प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख.


कृत्रिम बुद्धिमत्ता,आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'एआय'चा उल्लेख आजच्या काळात सहजपणे होऊ लागला आहे.

ह्या संज्ञा जनमानसात प्रचलित होत आहेत.अमेझॉनची 'अलेक्सा', ॲपलचे सिरी सारखे मदतनीस,आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तत्पर आहेत,तर आंतरजालावर आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायला आवडतील याचा अंदाज लावण्यापर्यंत,आधुनिक जगात आपल्या अवतीभोवती कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र आढळत आहे..


मानवनिर्मित प्रज्ञ- यंत्रमानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख ग्रीक पौराणिक कथांमध्येही आल्याचे आढळते.ग्रीक तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार करण्याचा युक्तिवाद (सिलॉजिजम) सर्वप्रथम केला.त्यात दोन किंवा अधिक स्वीकृत विधानांवरून,तर्कशुद्ध निष्कर्ष पद्धतशीरपणे काढला जातो आणि त्या आधारे तिसरे किंवा नवीन तार्किक विधान मांडले जाते. मनुष्याला जन्मजात मिळणाऱ्या बुद्धिमतेच्या क्षमतेचा स्वतःला दाखला देणारा तो महत्त्वपूर्ण क्षण होता.


ॲरिस्टॉटलने प्रस्तुत केलेल्या संकल्पनेपासून सुरुवात झाली असली,तरी ज्या स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या काळात विचारात घेतली जाते आणि विकसित होत आहे.त्याचा इतिहास केवळ गेल्या शतकातला आहे.


१९५०च्या दशकात शास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या समुदायाने कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना केली.त्यात ब्रिटिश तरुण बहुज्ञ अॅलन ट्युरिंग होते,ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची गणितीय शक्यता शोधली.त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की,


'समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेताना मनुष्य उपलब्ध माहिती तसेच,कारणांचा आधार घेतात,तर यंत्रे तसे का करू शकणार नाहीत?' 


१९५० साली 'कम्प्यूटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधनिबंधात त्यांनी बुद्धिमान यंत्रे कशी तयार करत येतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी कशी करावी,

ह्यांची तार्किक चर्चा केली.ट्युरिंगची संकल्पना तात्त्विकरीत्या योग्य असली,तरी कार्य सुरु करताना अनेक अडथळे आले.संगणकांना मूलभूतपणे बदलण्याची सर्वप्रथम आवश्यकता होती; कारण १९४९ पर्यंत वापरात असलेले संगणक, 


आज्ञावली कार्यान्वित करू शकत होते,परंतु ते साठवण्याची तरतूद त्यांच्यात नव्हती.थोडक्यात सांगितलेले कार्य संगणक करू शकत होते परंतु काय केले ते स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे,संगणक अत्यंत खर्चिक होते.केवळ प्रतिष्ठित विद्यापीठे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाच ह्या अनोख्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धारिष्ट करणे शक्य होते.


तसेच,प्रज्ञ यंत्र निर्मितीची संकल्पना निधी स्रोतांना पटवून देणाऱ्या समर्थकांची आवश्यकता होती.


संज्ञा बोध आणि आकलन (कॉग्निटिव्ह) विज्ञानावर संशोधन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रवर्तक,जॉन मॅक् कार्थी आणि मार्विन मिन्स्की कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात.त्यांनी दिलेली व्याख्या अशी आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता आहे,ज्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.


१९५६ साली डार्टमाउथ परिषदेत,मॅक् कार्थी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मुक्त चर्चेसाठी विविध क्षेत्रांतील प्रमुख संशोधकांना एकत्र आणले. एका मोठ्या सहयोगी प्रयत्नाची कल्पना करून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा त्यांनी,त्याच परिषदेत तयार केली.संज्ञानात्मक शास्त्रज्ञ मार्विन मिन्स्की तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल आशावादी होते;परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबद्दल प्रमाणित पद्धती निश्चित करण्यासाठी परिषदेत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही.तरीही कृत्रिम बुद्धिमत्ता साध्य करण्यायोग्य आहे ह्या विचारावर एकमत झाल्यामुळे संशोधनाने वेग घेतला.


१९५७ ते १९७४ हा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या भरभराटीचा काळ होता.जलद,वापरायला सुलभ आणि अधिक माहिती संचयित करणारे संगणक तयार होत होते,जे तुलनात्मक स्वस्त होते.यंत्र स्वयंअध्ययनाच्या ( मशीन लर्निंग) तर्कात सुधारणा होऊन,कोणती समस्या सोडवण्यासाठी कोणता तर्क उपयोगात आणायचा,ते ठरवता यायला लागले.हर्बर्ट सायमन,जॉन शॉ आणि अॅलन नेवेल ह्यांनी तयार केलेल्या 'जनरल प्रॉब्लेम सॉल्व्हर च्या साहाय्याने समस्या सोडवल्या जाऊ लागल्या,तर जोसेफ वायझेनबॉम यांनी तयार केलेल्या 'एलायझा' ह्या चॅटबॉटला बोलीभाषेचा अर्थबोध होत होता.


ह्या यशामुळे काही सरकारी संस्थांची खात्री पटली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी त्यांनी निधी मंजूर केल्यामुळे आशा आणि अपेक्षा उंचावल्या.सरकारी संस्थांना अशा यंत्रांमध्ये अधिक स्वारस्य होते,जे बोलीभाषेचे लिप्यांतर आणि भाषांतर कर शकतील,तसेच अपक्व माहितीवर (रॉ डेटा) प्रक्रिया करतील. भाषा आकलनाची मूळ तत्त्वे जरी तयार झाली असली,तरी नैसर्गिक भाषाप्रक्रियेचे (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.


संवाद साधण्यासाठी एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याबरोबरच संदर्भ जाणून घेणे आवश्यक असते. सगळ्यांत मोठी समस्या अशी होती.काही ठोस करण्यासाठी तितक्या ताकदीच्या संगणकीय शक्तीचा अभाव त्यामुळे यंत्राद्वारे भाषानुवाद करण्यासाठी अपेक्षित यश मिळाले नाही.


त्यानंतर अडथळ्यांचे डोंगर उभे राहायला लागले आणि संशोधनाची गती मंदावली.कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन प्रमुख संशोधक,रॉजर रॉन्क आणि मार्विन मिन्स्की ह्यांनी व्यापारी समूहांना असा इशारा दिला होता,की


कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनकार्याचा उत्साह अनियंत्रित होत असल्यामुळे १९८०च्या दशकात नैराश्याची लहर उठेल.


ह्युबर्ट ड्रेफस यांनी भूतकाळातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या सदोष गृहीतकांवर प्रकाश टाकला आणि १९६६ च्या सुरुवातीला अचूक भाकीत केले,की कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाची पहिली लाट सार्वजनिक आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरेल.


नोम चॉम्स्कींसारख्या समीक्षकांनी असा युक्तिवाद केला,की कृत्रिम बुद्धिमत्ता आंशिक प्रमाणात सांख्यिकीय तंत्रावर अवलंबून असल्याने संशोधन अयोग्य दिशेने जाण्याची शक्यता आहे.



१९७४ ते १९८० दरम्यान संशोधनासाठी मंजूर होणाऱ्या निधीत घट झाली.पर्यायाने संशोधनाचा वेग थंडावला,

टीका होऊ लागली,वातावरण निराशाजनक झाले.त्यामुळे हा काळ 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा शीतकाल' समजला जातो.

कृत्रिम बुद्धिमत्ता समुदायात निराशावादाने सुरवात होऊन त्याला श्रृंखलाक्रियेचे स्वरूप आले.त्याचे पर्यवसान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन न होण्यात झाले.


विकासकांनी दिलेली अवाजवी आश्वासने, वापरकर्त्यांच्या अवास्तव अपेक्षा आणि जाहिरातबाजीचा अतिरेक कारणीभूत झाला. काही वेळा नवीन तंत्रज्ञान उदयाला येण्याआधी त्याचा प्रमाणाबाहेर उदोउदो होतो,तसेच काहीसे झाले.कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असेलेले अब्जावधी डॉलर्सचे उद्योग-व्यवसाय कोसळू लागले.


१९८०च्या दशकात गणितीय तर्काचा विस्तार होऊन तंत्रज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ झाल्यावर उत्साह पुन्हा सळसळायला लागला.१९९०च्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आस्था वाढत जाऊन आशावाद निर्माण झाला.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असे उतार-चढाव आले,तरीही यशस्वी तंत्रज्ञान विकसित होत आहे.'शीतकाल' कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला मिटवू शकला नाही.ती अल्पकालीन स्थिती होती.आज हजारो अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेवर विकसित झाले आहेत.


१९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मोठ्या प्रणालींचा घटक म्हणून वापरले जाऊ लागले.पूर्वी विज्ञानकल्पनेच्या क्षेत्रात असणाऱ्या किंवा वाङ्मयाच्या कपोलकल्पित कक्षेत असलेल्या अनेक नवकल्पनांचे वास्तवात रूपांतरण गेल्या काही दशकांमध्ये झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.


यंत्रांना किती आणि काय-काय शिकवायचे त्याला कधीतरी मर्यादा येतील,त्यामुळे मानवासारखी विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता जर यंत्रांमध्ये निर्माण करायची असेल,तर यंत्राच्या स्वयं-अध्ययनाची आवश्यकता भासायला लागली.जॉन हॉपफील्ड आणि डेव्हिड रुमेलहार्ट यांनी गहन अध्ययन (डीप लर्निंग) तंत्र लोकप्रिय केले,ज्यामुळे संगणकांना पूर्वानुभवरून शिकणे शक्य झाले.


मोठ्या प्रमाणातील मजकूर,प्रतिमा,ध्वनिफीत, चित्रफीत यांसारख्या असंरचित माहितीचा संचय यंत्रे गहन स्वाध्यायात करतात.मानवाच्या साहाय्यातेशिवाय पूर्वीचे संदर्भ आणि विद्यमान माहितीच्या आधारे यंत्रे स्वअध्ययन करण्यासाठी सक्षम होतात.


विशेषज्ञ तंत्राचे (एक्स्पर्ट सिस्टिम) जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणकशास्त्रज्ञ एडवर्ड फीगेनबॉमने मानवाच्या निर्णयप्रक्रियेसदृश तज्ज्ञ प्रणाली सादर केली.


एखाद्या क्षेत्रातील तज्ञाने ठरावीक परिस्थितीत दिलेल्या प्रतिसादाचे रूपांतर संगणक प्रणालीत केले,तर तीच प्रणाली वापरून तज्ज्ञ नसलेली कोणतीही व्यक्ती सल्ला देऊ शकेल,असा त्यामागचा हेतू होता. उद्योग-व्यवसायांमध्ये तज्ज प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या.


काय बदल झाला असेल ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला पुन्हा सोन्याचे दिवस आले असतील,असा प्रश्न मनात येतो.आज्ञावली लिहिण्याचे तंत्र बुद्धिमान झाले?की संगणक प्रणाली तयार करणारे अधिक बुद्धिमान झाले? असे दिसून येते,की संगणकाचे स्मृति-तंत्र सुधारित झाले.


संगणकाची माहिती संचयनाची मर्यादा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला मागे खेचत होती.गॉर्डन मूर ह्यांनी निर्धारित केलेल्या 'मूर नियमानुसार संगणकाची संचयनक्षमता आणि गती दरवर्षी दुप्पट होते.परंतु,मूरने वर्तवलेला वेग आणि संचय प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी विलंब होत होता.जवळपास तीस वर्षांच्या कालखंडानंतर तंत्रज्ञानाने मूरच्या नियमाला गाठले.


तर्क-वितर्काच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकाला विवेकी कार्यासाठी सक्षम करते. १९९७ साली,

'आयबीएम'ने बुद्धिबळात निपुण विशेषज्ञ प्रणालीचा महासंगणक 'डीप ब्लू' निर्माण केला.रशियन ग्रॅण्डमास्टर गॅरी कास्परोव्हला शह देऊन हरवणाऱ्या पहिल्या संगणकाने इतिहास रचला.कृत्रिमरीत्या बुद्धिमान निर्णय घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेल्याने,हा सामना सुप्रसिद्ध झाला.


सॉफ्टवेअर विकसित करून विंडोज कार्यप्रणालीवर कार्यान्वित केले.बोलीभाषेचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडले.रोबोटिक्स शास्त्रज्ञ सिंथिया ब्रेझिल ने तयार केलेला यंत्रमानव 'किस्मत',

भावना ओळखण्यात आणि प्रदर्शित करण्यात यशस्वी ठरला.


२००५ ते २०१९ दरम्यान वाक् आणि भाष्य अभिज्ञान,

स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन),

वस्तु-आंतरजाल (इन्टरनेट ऑफ थिंग्स),सक्षम निवासस्थान (स्मार्ट होम) तत्सम तंत्रज्ञानाला गती मिळाली.


भाषांतर,संगणकीय प्रतिमा ओळखणे,खेळात निष्णात संगणकप्रणाली यांत बहुतांश प्रगती आणि यश २०१० पासून मिळाले.


२०१२ साली संशोधन आणि उद्योग-व्यवसायांना यंत्र- स्वयंअध्ययन क्षेत्रात स्वारस्य निर्माण झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकरिता होणाऱ्या गुंतवणूक आणि निधीत आकस्मिक वाढ झाली.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेला संगणकीय शक्तीच्या (वेग आणि संचय) पातळीवर आणल्यावर तंत्र हाताळू शकणार नाहीत अशी कोणतीच समस्या उरणार नाही,असे वाटायला लागले. ह्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनात आलेल्या उतार-चढावांच्या कारणांना पुष्टी मिळते.


आपण सध्या 'बिग डेटा'च्या युगात आहोत. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करण्याची क्षमता आहे;परंतु त्यावर प्रक्रिया करणे किचकट आणि गुंतागुंतीचे असते.

मूरचा नियम कदाचित तंतोतंत साध्य होत नसेल;परंतु संगणकीय विदा (डेटा) जमा होण्याचा वेग मंदावलेला दिसत नाही.


निरीक्षण,विश्लेषणक्षमता,समस्यांची उकल, अध्ययन हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजले जातात.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रणाली तयार करताना,

गणिती तार्किक पद्धती बुद्धिमत्तेत विलीन होते.ह्या संयोगामुळे अपक्व माहितीमधील वैशिष्ट्य ओळखून,

विश्लेषण करून,प्रतिरूप देता येते.


यंत्र जर मनुष्याची स्वभाववैशिष्ट्ये,क्षमता आणि बौद्धिक शक्ती वेगाने स्वतःत निर्माण करू शकले,तर त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे असे म्हणता येईल.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मानवी बुद्धीप्रमाणे विचार करणारा संगणक, कार्य करणारा संगणक-नियंत्रित यंत्रमानव किंवा सॉफ्टवेअर तयार करता येते.


काही यंत्रे केवळ एकाच विशेष कार्यासाठी तयार केली जातात.कार्याचा विशिष्ट उद्देश समजून घेऊन ते साध्य करण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात उदाहरणार्थ बुद्धिबळात खेळी ओळखून सर्वोत्तम संभाव्य चाल ठरवणारी संगणक प्रणाली तर,काही यंत्रणा साठवलेल्या माहितीच्या आधारे साजेशी गाणी,प्रेक्षणीय स्थळे सुचवतात.


आपल्या घरापासून ते रस्त्यावरच्या गाड्यांपर्यंत सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याचे दिसत आहे.आपल्या दैनंदिन जीवनावर आणि कार्यावर यंत्रे आणि संगणकांचा परिणाम होत आहे.प्रभाव पडत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे,त्यात नजीकच्या काळात झपाट्याने होणारी उत्क्रांती.स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक्स) आणि वस्तु आंतरजाल या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने आंतरजालग्राही साधने (वेव-एनेबल्ड डिव्हायसेस) स्वतः आकलन करू शकतील,असे कौशल्य त्यांच्यात निर्माण केले जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र व्यापक होत आहे.अनेक शाखा- उपशाखांमध्ये विस्तारित होत आहे. तंत्रज्ञान,बैंकिंग,क्रय-विक्रय,शिक्षण,कृषिउद्योग, विज्ञान,आधारभूत संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर),ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांकरिता फलदायी ठरत आहे. अनेक अत्याधुनिक अनुप्रयोगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार असल्याचे गृहीत धरले जात आहे.


वैद्यकीय क्षेत्रात,लक्षणांवरून रोगनिदान करण्यापासून,

औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसंबंधित प्रक्रियेपर्यंत फार मोलाची मदत होत आहे.यंत्राच्या साहाय्याने शल्यचिकित्सा करताना किमान छेद देऊन शस्त्रक्रिया करणे संभव होत आहे.तसेच,रुग्णांचे अहोरात्र निरीक्षण करून त्यांना अखंड आरोग्यसेवा देण्यासाठी यांत्रिक मदतनीस म्हणजे चालते-फिरते यंत्रमानव तयार केले जात आहेत.


बैंक आणि वित्तीय संस्थांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते.तिथल्या आर्थिक व्यवहारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लक्ष ठेवले जात आहे.डेबिट / क्रेडिट कार्डावर संशयास्पद किंवा अनपेक्षित व्यवहार आढळले, तर गैरव्यवहारांचा शोध घेणे आणि वेळीच आळा घालणे शक्य झाले आहे.


खेळ आणि मनोरंजन क्षेत्राने तर फारच भरारी घेतली आहे.आपली आवड ओळखून साधने, गाण्यांचा अल्बम आपल्यासाठी तयार करतात. चित्रपट,मालिका सुचवतात.शिवाय आंतरजालावर खेळताना इतर खेळाडूंची आवश्यकता पडत नाही.कारण त्यांची जागा बॉट्सनी घेतली आहे.चित्रालेख (ग्राफिक्स) आणि 'चेतनीकरण'(ॲनिमेशन) प्रगत झाल्यामुळे आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअँलिटी) विश्व आपल्या पसंतीप्रमाणे आपल्याला आपल्या उभे करता येते.


मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,नोव्हेंबर २०२२

वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ

भाग - १





१२/५/२३

अघटित सत्यघटना..!

मी नोकरीवर अलिबागला रुजू झालो.

येणारी प्रत्येक केस माझ्या पुस्तकी ज्ञानात भर टाकत होती.प्रत्येक पेशंट शिकवत होता.


त्या दुपारी अशीच एक स्त्री आली.


लग्न होऊन ११ वर्षांनंतर नवसासायासाने

आलेले गर्भारपण.पण काय व्हावं ?


आमच्या अलिबागच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलानं नेमकी हिला ढुशी दिली आणि शिंग तिच्या पोटाला भोसकून बाहेर आलं ! तिला साऱ्यांनी मिळून हॉस्पिटलमध्ये आणलं होतं.जखम पाहिली तर पोट भोसकले गेले होते.


त्यामधून डोकावत होतं उदरपोकळीचं संरक्षक आवरण,आतड्यांचं एक वळण व बाळाचा एक हात ! जखम अगदी नुकतीच झालेली होती.हाताच्या आणि आतड्याच्या हालचाली दिसत होत्या. ही ७ महिन्यांची पहिलटकरीण.तिच्या दृष्टीनं हे दृश्य काही बरे लक्षण नव्हते. शिंगाने गर्भाशयाची भिंतही छेदली होती.त्यातून बाहेर आलेला तो चिमुकला हात 'काही तरी करा हो' म्हणून विनवणी करीत होता जणू.परिस्थिती गंभीर होती.

आता एकूण प्रसंग बघा.


गर्भाशयाला इजा म्हणजे बाळालाही इजा झालेली असण्याची शक्यता.


तसं असेल तर आता सातव्यातच बाळंतपण करावं लागणार.म्हणजे मग मूल जगण्याची आशा फारच कमी.


त्या साठीही सिझेरियन करावं लागणार,म्हणजे पोटावर वण येणार आणि शिवाय मुलाचीही खात्री नाही.काय उपयोग ?


आईच्या जीवासाठी हे करणं भाग पडू शकते आणि मुलाच्या जीवाला धोका संभवू शकतो ही गोष्ट मी नातेवाईकांना तातडीने समजावून सांगितली.


आता त्या घरातलं हे बाळ म्हणजे

किती मोलाचं कौतुक.त्याच्या जन्मघडीची सारे घरदार वाट बघत बसलेलं.किती बेत,किती स्वप्नं जन्माआधीच त्याच्या भोवती विणलेली असतील !


रोजच्या रस्त्याने जाता-जाता सांडाने सारं क्षणात उधळून दिलं.मी सांगायला गेल्यावर त्यांनी निक्षून सांगितलं, "की आईचा जीव वाचवायचा बघा.बाळाला हात लावू नका."

 ते मला लिहून द्यायला तयार होते.पण

त्यांच्या सहीने शस्त्रक्रियेमधील प्रश्न कुठे सुटत होता?

तांत्रिक बाबी पुऱ्या होतील पण सद्सद्विवेक बुद्धीचं काय? 

मी बाळाबाबतची त्यांची अट न स्वीकारता ऑपरेशन करण्याचे मान्य केलं.मुला बाबत काहीही न केलं तर आईच्या जीवाला धोका पोहोचू शकतो,अशा वेळी मला योग्य वाटेल ते मी करीन असे सांगितले.पण ते ठाम होते.प्रसंग आणीबाणीचा होता.मी माझ्या विवेकाला स्मरुन ठरवलं,की बाहेर आलेला हात आत लोटून गर्भाशय शिवून घेता आले तर ठीक. नाहीतर बाळंतपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी हे करावं लागलं,असं सांगण्याचं मी ठरवलं.

 

मी नाही म्हटले असते तर ते तरी कोठे जाणार  होते?

१०० मैलांपर्यंत काही सोयीही नव्हत्या.


मी पोटावर छेद घेतला.इतर इजा फार गंभीर नव्हती.गर्भाशयानेच पुढे राहून इतर अवयवांचे रक्षण केले होते.पण बाळाचा हात काही केल्या आत जाईना.


गर्भाशयाचे स्नायू चांगलेच जाड व भक्कम असतात.हाताभोवती त्यांचं घट्ट आकुंचन झाले होते.गर्भाशयाला सुदैवाने दुसरी काही इजा नव्हती.


 हा एवढा हात आत गेला आणि जखम शिवली की माझं कर्तव्य पार पडलं असं माझ्या मनात येत होतं.


पण नेमकं तेच होत नव्हतं आणि तो चिमुकला हात आता पांढरा पडायला लागला होता.हे लक्षण धोक्याचं होतं.रुधिराभिसरण थांबलं की अवयव प्रथम निळा पडतो आणि मग पांढरा.पुढचा टप्पा

म्हणजे गॅंगरीन!हात कापून तर गर्भाशय शिवता येणार नव्हते.


माझ्या मनात असला विचार डोकावून गेला याचाच मला धक्का बसला.


पण मी घायकुतीला आलो होतो आणि या छोट्या हाताशी झगडताना रंजीस आलो होतो.


माझ्यावरचा हा पेचप्रसंग आमच्या जुन्या वॉर्डबॉयच्या लक्षात आला. त्याचं नाव सांडे !


तो ऑपरेशन थिएटर मध्ये डोकावला.आता हा प्राणी कायमच प्यायलेला असायचा.तारेतच चालायचा.

त्याच्या ' आनंदाला ' व्यत्यय तो कसा माहीतच नव्हता.त्याला बघता क्षणी वाटायचं,याला 'चालता हो' म्हणावं.पण त्याचा कुणाला त्रास नसे आणि त्याचं काम तो चोख करीत असे.


थिएटरची स्वच्छता आणि शस्त्र क्रियेची सामुग्री निर्जंतुक करणं ही त्याची नेमलेली कामं.आधीच माझ्याकडे मनुष्य बळ कमी.त्यात याला जाऊ देणं परवडण्यासारखं नव्हतं.


शिवाय त्याची एक जमेची बाजू म्हणजे त्याच्या कधीही दांड्या नसायच्या.नेहमी कामावर हजर !


मी तो हात हलके आत लोटण्यासाठी झगडत होतो.


तेवढ्यात सांडे म्हणाला,

"साहेब,गरम सुईचा चटका द्या हाताला,हात दचकून मागे जाईल! "


मी मेडिकलचे शिक्षण घेतलं त्या रुग्णालयात किंवा अभ्यासासाठी पालथ्या घातलेल्या पुस्तकांत ही सूचना नव्हती.पण माझे सर्व पर्याय संपले होते.


मन घट्ट करून आणि परमेश्वराचे नाव घेऊन, मनात लाख वेळा त्या बाळाला सॉरी म्हणत एक इंजेक्शनची सुई लाल तापवून मी त्या हातावर टेकवली.


आणि..... खरंच हात आत गेला !

मुलानं ओढून घेतला म्हणायला हवं. 

मग सगळं एकदम सोपं झालं. 


आश्चर्य म्हणजे बाई पूर्ण दिवस घेऊन सुखरूप बाळंत झाली आणि बाळाच्या हातावर डागाचा कसलाही मागमूस नव्हता !


हा सगळा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.

गुरू, हा  माणसाला कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरे.कल्पनातीत अडथळ्यांमधूनही सुखरूप सुटका हे अघटीतच घडले होते. 


यालाच, 'ही तर श्रींची इच्छा' म्हणत असावेत. 


हा आमचा वॉर्डबॉय आता हयात नाही.मी इतर कुणाची नावे घेतली नाहीत,


पण या थरार नाट्याच्या सुखांत शेवटाचे श्रेय हे त्याचेच आहे. 


पुढे त्याच्या ' सांडे ' आडनावावरून आमच्यात एक विनोद प्रचलित झाला होता, 

'सांडानं मारलं पण सांडेनं तारलं ! ' 


( " Behind the mask " या डॉ.सुभाष मुंजे 

या शल्यविशारदाने लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या श्यामला वनारसे यांनी ' बिहाइंड द मास्क ' याच नावाने केलेल्या अनुवादित व मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई 

प्रकाशित पुस्तकातून वेचलेला एक थक्क करणारा अनुभव.


मित्र एन.के यांनी व्हाट्सअप वरती पाठविलेली कथा..