या नाटकात टिमॉन हा एकच सिनिक नाही. अपेमॅन्टस नावाचा तत्त्वज्ञानीही सिनिकच आहे.मानवजातीचा मूर्खपणा पाहून तोही नाक मुरडतो;पण टिमॉनची दुःखी विषण्ण कटुता व अपेमॅन्टसचा उपहासात्मक चावटपणा यात फरक आहे.मानव मानवाशी माणुसकी विसरून वागतो,हे पाहून टिमॉनला जीवन अशक्य होते. पण तेच दृश्य पाहून अपेमॅन्टस उपहासाने हसतो.त्याला जणू सैतानी आनंद वाटतो.टिमॉन हे जग नाहीसे करून ज्यात प्रेमळ मित्र असतील,असे नवे जग निर्मू पाहतो. पण अपेमॅन्टस जगाला नावे ठेवतो,जग सुधारू इच्छित नाही.
अथेन्समधील एक सरदार त्याला "किती वाजले? किती समय आहे?"असे विचारतो.तेव्हा तो उत्तर देतो,
"प्रामाणिक असण्याचा हा समय आहे." पण आजूबाजूला जरासे प्रामाणिक जग दिसले तर मग जगाची टिंगल कशी करता येईल ? 'जग वाईट असावे. म्हणजे गंमत पाहता येईल.' अशी अपेमॅन्टसची वृत्ती आहे.मित्रांची कृतघ्नता पाहून टिमॉनला मरणान्तिक यातना होतात,प्राणांतिक वेदना वाटतात,अपेमॅन्टसला ती मोठ्याने हसण्याची संधी वाटते! एकाच नाटकात टिमॉन व अपेमॅन्टस यांची पात्रे रंगविणारा फारच सूक्ष्मदर्शी असला पाहिजे.त्याला स्वभावदर्शन फारच सूक्ष्म साधले आहे.बारीकसारीक छटा दाखविणे फार कठीण असते.
पण शेक्सपिअर स्वभावदर्शनात अद्वितीय आहे.
टिमॉनशिवाय अपेमॅन्टसला पूर्णता नाही,अपेमॅन्टसशिवाय टिमॉनला पूर्णता नाही.दोघांच्याद्वारे मिळून जगातील अन्यायाला शेक्सपिअर उत्तर देत आहे.जगाचा उपहास करणारा शेक्सपिअर या दोघांच्या डोळ्यांनी बघून उत्तर देत आहे. 'हॅम्लेट'मध्ये व्यवहारी माणसाचे,संसारी शेक्सपिअरचे,रामरगाड्यात पडलेल्या शेक्सपिअरचे जगाला उत्तर आहे.त्याच प्रश्नाला जगातील अन्यायाला त्याने उत्तर दिले आहे. जगातील नीचता पाहून टिमॉन आत्महत्या करतो.अपेमॅन्टस हसतो,पण हॅम्लेट काय करतो? तो खुनाचा सूड घेऊ पाहतो.हॅम्लेट टिमॉनपेक्षा कमी भावनाप्रधान आहे,पण अपेमॅन्टसपेक्षा अधिक उदार वृत्तीचा आहे. तो जगातील अन्यायाला शासन करू पाहतो.जुन्या करारातील 'डोळ्यास डोळा', 'दातास दात', 'प्राणास प्राण', 'जशास तसे' हा न्याय त्याला पसंत पडतो.
जगातील अन्याय पाहून हॅम्लेटच्या मनावर जशी प्रतिक्रिया होते.तशीच सर्वसामान्य माणसाच्या मनावर होते.
टिमॉनप्रमाणे तो जगापासून पळून जात नाही किंवा अपेमॅन्टसप्रमाणे जगाचा उपहासही करीत नाही.तो विचार करीत बसतो.या सर्व जगाचा अर्थ काय याची मीमांसा करीत बसतो.पण शेवटी त्याच्या भावना जेव्हा पराकोटीला पोहोचतात,तेव्हा तो प्रहार करतो.मात्र तो प्रहार दुष्ट कृत्यांवर नसून दुष्ट कृत्य करणाऱ्यांवर असतो आणि असे करीत असता तो आपल्या शत्रूचा व स्वतःचाही नाश करून घेतो.
'सूड घेणे हेच जणू जीवनाचे उदात्त ध्येय'असे हॅम्लेटला वाटते.या सूड घेण्याच्या पवित्र कर्माच्या आड त्याच्या मते ऑफेलियाचेही प्रेम येता कामा नये.हॅम्लेटचे जग एकंदरीत जंगलीच आहे.जरी तिथे तत्त्वज्ञानाचे विचार व सुंदर सुंदर वाक्ये ऐकावयाला आली तरी सूडभावना हेच परमोच्च नीतितत्त्व म्हणून येथे पूजिले जात आहे असे दिसते.हॅम्लेट नाटकातले सारं काव्य दूर केल्यास ते अत्यंत विद्रूप वाटेल.त्यात थोडीही उदात्तता आढळणार नाही.हॅम्लेट हा एक तरुण व सुंदर राजपुत्र असतो.त्याची बुद्धी गमावून बसतो.पित्याचे भूत आपणास खुनाचा सूड घेण्यास सांगत आहे.असे त्याला वाटते व त्याचे डोके फिरते.तो मातेची निंदा करतो व ज्या मुलीशी तो लग्न करणार असतो,तिला दूर लोटून देतो.ती निराश होऊन आत्महत्या करते.तो तिच्या भावाला व बापाला ठार मारतो.नंतर आईला मारून तो स्वतः ही मरतो आणि हे सर्व कशासाठी ? तर भुताला दिलेल्या सूड घेण्याच्या वचनाच्या पूर्ततेसाठी! सूडाच्या एका गोष्टीसाठी ही सारी दुःखपरंपरा ओढवून आणणे वेडेपणाचे वाटते.एका सूडासाठी केवढी ही जबर किंमत! या नाटकाचे 'दारू प्यायलेल्या रानवटाने लिहिलेले नाटक' असे वर्णन व्हॉल्टेअरने केले आहे ते बरोबर वाटू लागते.सारे मानवी जीवन मानवी जीवनाचे हे सारे नाटकसुद्धा एका दारुड्यानेच लिहिले आहे असेच जणू आपणासही वाटू लागते.
पण शेक्सपिअर जीवनाकडे फार संकुचित दृष्टीने पाहतो असे म्हणणाऱ्या संकुचित दृष्टीच्या टीकाकाराचे हे मत आहे.शेक्सपिअरच्या प्रज्ञेचा व प्रतिभेचा केवळ एक किरण हॅम्लेटमध्ये दिसतो.मानवी जीवनातल्या अनंत गोष्टींतील सूड ही केवळ एक गोष्ट आहे.त्याप्रमाणेच हॅम्लेटमध्ये शेक्सपिअरच्या अनंत विचारसृष्टीतील एकच गोष्ट दिसते.ते त्याचे वा जगाचे संपूर्ण दर्शन नव्हे. शेक्सपिअर हा जादूगार आहे.तो निसर्गाचे पूर्णपणे अनुकरण करू शकतो.त्याने हॅम्लेटला स्वतःच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची मूर्ती बनविलेले नाही.हॅम्लेटद्वारा स्वत:च्या बुद्धीचा फक्त एक भाग त्याने दाखवला.अनंत पात्रांद्वारा त्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे.सृष्टी आपले स्वरूप विविधतेने प्रकट करते.कोठे एक रंग, कोठे दुसरा,कोठे हा गंध,कोठे तो.तसेच या कविकुलगुरूचे आहे.त्याच्या नाटकी पोतडीत हॅम्लेटमधल्या विचारांपेक्षा अधिक उदात्त विचार भरलेले आहेत.निसर्ग कन्फ्यूशियसला प्रकट करतो.तद्वतच हॅम्लेटलाही निर्मितो.पण जगाचे पृथक्करण करताकरता,प्रयोग करताकरता, निसर्गाला व शेक्सपिअरला सुडापेक्षाअधिक उदात्त व सुंदर असे काहीतरी दाखवायचे असते. हे जे काहीतरी अधिक सुंदर व अधिक उदात्त आहे,ते आपणाला 'टेंपेस्ट'मध्ये पाहण्यास मिळेल.
'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात शेक्सपिअर जगातील अन्यायाला उपहासाने उत्तर देतो.हॅम्लेटमध्ये जगातील अन्यायाची परतफेड सुडाने करण्यात आली आहे.पण टेंपेस्टमध्ये अन्यायाची परतफेड क्षमेने करण्यात आली आहे.टिमॉन व हॅम्लेट यांच्याप्रमाणेच प्रॉस्पेरोही दुःखातून व वेदनांतून गेलेला आहे. पण दुःखाने तो संतापत नाही तर उलट अधिकच प्रेमळ होतो.त्याच्या हृदयात अधिकच सहानुभूती उत्पन्न होते.ज्यांनी त्याच्यावर आपत्ती आणलेली असते,त्यांच्याबद्दलही त्याला प्रेम व सहानुभूती वाटते.तो जगाला शिव्याशाप देत नाही.जगाचा उपहासही करीत नाही.तर आपल्या मुलांच्या खोड्या पाहून बाप जसा लाडिकपणे हसतो, तसा प्रॉस्पेरो हसतो.
टेंपेस्टमध्ये उपहास व तिरस्कार यांचा त्याग करून जरा अधिक उदात्त वातावरणात शेक्सपिअर एखाद्या हृदयशून्य देवाप्रमाणेच मानवाची क्षुद्रता आणि संकुचितता पाहून मिस्कीलपणे हसतो.तो एखाद्या राजाला सिंहासनावरून खाली खेचतों व 'हा तुझा डामडोल,ही तुझी ऐट सर्व नष्ट होऊन किडे तुला खाऊन टाकणार आहेत.त्या किड्यांना मासे खातील व ते मासे एखाद्या भिकाऱ्याच्या पोटात जातील.' असे त्याला सांगतो.पण टेंपेस्टमध्ये जरा रागवायचे झाले,तरी तो रागही सौम्य व सुंदर आहे.या नाटकात कडवट व विषमय उपहासाचे उत्कट करुणेत पर्यवसान झाले आहे.
आता आपण टेंपेस्टमधील कथा जरा पाहू या. प्रॉस्पेरो हा मिलनचा ड्यूक.तो हद्दपार केला जातो.तो आपल्या मुलीसह एका जादूच्या बेटावर राहतो.तिचे नाव मिरान्दा.
त्याच्या भावानेच त्याला मिलनमधून घालवून दिलेले असते.भावाचे नाव न्टोनिओ.नेपल्सचा राजा अलोन्सो याच्या मदतीने तो भावाला हाकलून देतो.प्रॉस्पेरो व त्याची तीन वर्षांची मुलगी यांना गलबतात बसवून तो ते समुद्रात सोडून देतो.हे गलबत सुदैवाने या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.तिथे प्रॉस्पेरो मुलीला शिकविण्यात व मंत्रतंत्राचा अभ्यास करण्यात वेळ घालवतो. एरियल नामक एक विद्याधर असतो व कॅलिबन नामक एक राक्षस असतो. त्या दोघांना वश करून तो त्यांना आपली सेवा करावयास लावतो.एके दिवशी एक गलबत त्या बेटाच्या बाजूने जात असते.गलबतात एका लग्न समारंभाची मंडळी असतात,ट्यूनिसहून ही मंडळी इटलीस परत येत असतात.या मंडळीत राजा अलोन्सो व ॲन्टोनिओ हे असतात.यांनी प्रॉस्पेरोला हद्दपार केलेले असते.राजाचा भाऊ सेबॅस्टियन व मुलगा फर्डिनंड हेही त्यांच्याबरोबर असतात.
प्रॉस्पेरो आपल्या मंत्रसामर्थ्यानि समुद्रावर एक वादळ उठवतो.ते गलबत वादळातून जात असता या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.प्रॉस्पेरो एरियलला सर्व उतारूंना वाचवण्यास सांगतो. पण वाचवल्यावर त्यांना बेटावर चारी दिशांना अलग अलग करण्याची सूचना देतो.फर्डिनंड बापापासून वियुक्त होतो व बाप मेला असे वाटून शून्य मनाने भटकत भटकत प्रॉस्पेरोच्या गुहेकडे येतो.वस्तुतः तो तिकडे जादूमुळे खेचला गेलेला असतो.मिरान्दाची व त्याची तिथे दृष्टिभेट होऊन दोघांचे परस्परांवर प्रेम जडते.
एक शब्दही उच्चारला जाण्यापूर्वी हृदये दिली घेतली जातात.
पण बेटाच्या दुसऱ्या एका भागावर सेबॅस्टियनने व ॲन्टोनिओ राजाचा खून करण्याचे कारस्थान करीत असतात.तर कॅलिबन व गलबतातून आलेले काही दारूडे खलाशी प्रॉस्पेरोचा खून करू पाहतात.हे बेट मंतरलेले असल्याचे त्यांना माहीत नसते.हे पाहुणे ज्या जगातून आलेले असतात त्या जगातील अनीतिविषयक प्रचार व मूर्खपणा येथेही करू लागतात.तेव्हा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान प्रॉस्पेरो त्यांचे सारे रानवट बेत हाणून पाडतो.राजाला व त्याच्याबरोबरच्या लोकांना त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल शासन करावे असे प्रॉस्पेरोला प्रथम वाटते.पण एरियल दैवी विचारांचा असल्यामुळे तो प्रॉस्पेरोला अधिक थोर दृष्टी देतो व सांगतो, "राजा, त्याचा भाऊ आणि तुझा भाऊ सारेच दुःखी व त्रस्त आहेत.
त्यांच्या दुःखाचा पेला काठोकाठ भरलेला आहे.त्यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे.तुझ्या जादूचा त्यांच्यावर फार परिणाम झाला आहे.तू त्यांना पाहशील तर तुझेही हृदय विरघळेल.तुझ्या भावना अधिक कोमल होतील." यावर प्रॉस्पेरो विचारतो,"विद्याधरा,तुला खरेच का असे वाटते?" एरियल उत्तर देतो, "मी मनुष्य असतो,तर माझे हृदय विरघळले असते.माझ्या भावना कोमल झाल्या असत्या." तेव्हा प्रॉस्पेरो म्हणतो, "तू अतिमानूष आहेस.
जणू वायुरूप आहेस.तरीही जर तुला त्यांच्याविषयी इतकी सहानुभूती वाटते,तर मग मी मानव असल्यामुळे, त्यांच्याच जातीचा असल्यामुळे,मला का बरे वाटणार नाही? त्यांच्याप्रमाणेच मीही सुख-दुःखे भोगतो,मलाही वासनाविकार आहेत.मग मला माझ्या मानवबंधूविषयी तुला वाटतात,त्यापेक्षा अधिक प्रेम व दया नको का वाटायला ? त्यांनी केलेले दुष्ट अन्याय आठवून माझे हृदय जरी प्रक्षुब्ध होते.तरी माझ्यातल्या दैवी भागाने,उदात्त भावनेने मी आपला क्रोध जिंकीन व दैवी भागाशीच एकरूप होईन.एरियल,जा.त्यांना मुक्त कर."
टिमॉनने सिनेटरांजवळ काढलेले उद्गार व प्रॉस्पेरोचे हे एरियलजवळचे उद्गार त्यांची तुलना करा.म्हणजे मानवी अन्यायाकडे मानवी दृष्टीने पाहणे व अमानुष दृष्टीने पाहणे यातील फरक लक्षात येईल.
प्रॉस्पेरो अती मानुष आहे.शेक्सपिअरने किंवा सृष्टीने निर्मिलेला अत्यंत निर्दोष व सर्वांगपरिपूर्ण असा मानवी स्वभावाचा नमुना म्हणजे प्रॉस्पेरो. हा शेक्सपिअरच्या सृष्टीतील कन्फ्यूशियस होय. हृदयात अपरंपार करुणा व सहानुभूती असल्यामुळे नव्हे;तर त्याची बुद्धी त्याला 'क्षमा करणे चांगले' असे सांगते.म्हणून तो क्षमा करतो. ज्या जगात राहणे प्रॉस्पेरोस प्राप्त होते,त्या जगात भांडणे व द्वेष,मत्सर,महत्त्वाकांक्षा व वासनाविकार,फसवणुकी व अन्याय,वंचना व स्पर्धा,पश्चात्ताप व सूड यांचा सर्वत्र सुळसुळाट आहे! पण प्रॉस्पेरोसचे मन या जगातून अधिक उंच पातळीवर जाऊन,या क्षुद्र धुळीपलीकडे जाऊन विचार करू लागते.तो जीवनाची कठोरपणे निंदा करीत नाही.तो स्मित करतो व जरासा दुःखी असा साक्षी होऊनच जणू राहतो. त्या मंतरलेल्या बेटावर मिरांदाला आपल्या पित्याहून वेगळी आणखी माणसे दिसतात,तेव्हा ती आश्चर्यचकित होते.पिता वगळल्यास अन्य मानवप्राणी तिने आतापर्यंत पाहिला नव्हता. नवीन माणसे दिसताच ती एकदम उगारते, "काय आनंद! अहो, केवढे आश्चर्य! किती सुंदर ही मानवजात! किती सुंदर व उमदे हे जग. ज्यात अशी सुंदर माणसे राहतात!" पण प्रॉस्पेरो मुलीचा उत्साह व आनंद पाहून उत्तर देतो, "तुला हे जग नवीन दिसत असल्यामुळे असे वाटत आहे!" अनुभवाने त्याला माहीत झालेले असते की,या जगातील प्रत्येक प्राणी जन्मजात सैतान आहे. या सैतानांना कितीही उपदेश केला तरी तो 'पालथ्या घड्यावर पाणी' या न्यायाने फुकटच जातो. त्याचा कोणाही माणसावर विश्वास नसतो,तरी तो सर्वांगसुंदर प्रेम करतो. शेक्सपिअरने निर्मिलेल्या पात्रांपैकी प्रॉस्पेरो हे सर्वोत्कृष्ट आहे.एवढेच नव्हे,तर खुद्द शेक्सपिअरच जणू परमोच्च स्थितीतील प्रॉस्पोरोच्या रूपाने अवतरला आहे असे वाटते. प्रॉस्पेरोप्रमाणेच खुद्द शेक्सपिअरही एक जादूगारच आहे.
त्याने आपल्या जादूने या जगात पऱ्या,यक्ष,गंधर्व,किन्नर इत्यादी नाना प्रकार निर्मिले आहेत.भुतेखेते,माणसे वगैरे सर्व काही त्याने निर्मिले आहे.त्याने आपल्या जादूने मध्यान्हीच्या सूर्याला मंद केले आहे.तुफानी वाऱ्यांना हाक मारली आहे.खालचा निळा समुद्र व वरचे निळे आकाश यांच्या दरम्यान महायुद्ध पेटवून ठेवले आहे.पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वत्र रणांगण पेटवून ठेवले आहे.
शेक्सपिअरचा हुकूम होताच आत्मे जागृत होऊन थडग्यातून बाहेर पडतात.थडग्यांची दारे उघडतात! महान जादूगार!
सर्जनाची परमोच्च स्थिती अनुभवून प्रॉस्पेरोप्रमाणेच शेक्सपिअरही मग आपली जादू गुंडाळून ठेवतो.
टेंपेस्टमध्ये परमोच्च कला प्रकटवून तो आपली जादूची कांडी मोडून टाकतो व आपली जादूची पोतडी गुंडाळून ठेवून नाट्यसृष्टीची रजा घेतो.मथ्थड डोक्याच्या मानवांना उपदेश पाजून,त्यांची टिंगल करून, त्यांचा उपहास करून दमल्यावर आता तो केवळ कौतुकापुरता साक्षी म्हणून दुरून गंमत पाहत राहतो.शेक्सपिअर अज्ञातच मेला! त्याची अगाध बुद्धिमत्ता,त्याची अद्वितीय प्रतिभा जगाला कळल्या नाहीत,पण जगाच्या स्तुतीची त्याला तरी कोठे पर्वा होती ?
२१.जुलै.२०२३ या लेखातील शेवटचा भाग..