एक लाख वर्षांपर्यंत निसर्ग मानवाचे निरनिराळे नमुने बनवीत होता,मानवांवर प्रयोग करीत होता. शेवटी १५६४ साली सर्व संमीलित ज्ञान एकत्र ओतून निसर्गाने एक मूर्ती जन्माला घातली,ती शेक्सपिअर ही होय.
या जगात अनेक अनाकलनीय गूढे असतात. शेक्सपिअरसारख्यांची अलौकिक बुद्धी हे एक गूढच आहे.शेक्सपिअरचे आईबाप सामान्यांहून सामान्य होते.त्याच्या पित्याला स्वत:ची सहीही करता येत नसे.तो मोजे विणी,लोकर पिंजी,तो एका अज्ञात कुटुंबात जन्मला.आकाशात तेजाने तळपला;त्याच्या वंशात पुन्हा पुढे कोणीही चमकले नाही.शेक्सपिअरच्या पूर्वी आणि नंतरही त्याचे कूळ अज्ञातच होते.त्याला तीन मुली होत्या.त्यांपैकी दोघी दहा जणींसारख्या होत्या; पण तिसरी मात्र अगदीच अडाणी होती.
शेक्सपिअर म्हणजे निसर्गाची एक लहर होती. निसर्गाच्या हातून ही व्यक्ती नकळत जन्माला घातली गेली.तो मानवांत अती मानुष,देव होता. त्याच्या मनाची खोली कार्लाइललाही कळली नाही;जॉर्ज ब्रँडिसनेही त्या कामी हात टेकले आणि कोणाही टीकाकाराला तिचा अंत लागणार नाही,असे म्हणण्याचे धाडस मी करतो. शेक्सपिअर समजून घेणे म्हणजे सृष्टीचे गुंतागुंतीचे गूढच समजून घेणे होय.जीवनाचा हा जो विराट खेळ चालला आहे,जीवनाचे हे जे विराट नाटक चालले आहे,तेच शेक्सपिअरने थोडक्यात आपल्या नाट्यसृष्टीत निर्मिले आहे.त्याची नाटके म्हणजे सृष्टीची प्रतिनिर्मिती आहे.
अमेरिकन कवी व तत्त्वज्ञानी संतामना एका सुनीतात म्हणतो,"शेक्सपिअरला निर्मून ईश्वराने सृष्टी दुप्पट केली."
शेक्सपिअरला जणू देवाची बुद्धी व देवाची भाषा लाभल्या होत्या!पण बाह्यतः मात्र त्याचे जीवन अगदी निराळे होते.
या कविसम्राटाचे जीवन जगातील अत्यंत नीरस जीवनासारखे होते.वयाच्या चौदाव्या वर्षी तो एका खाटकाजवळ उमेदवार म्हणून राहिला.त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सव्वीस वर्षाच्या एका बाईने त्याला किंवा त्याने तिला मोह पाडला.तिचे नाव ॲन हॅथावे.तिच्याशी लग्न झाल्यावर लवकरच स्वतःचे स्ट्रॅटफर्ड गाव त्याला सोडावे लागले. कारण हरणे चोरण्याच्या आरोपावरून त्याला अटक होणार होती.लंडनला आल्यावर तो रंगभूमीकडे वळला.तो सतरा वर्षे नाटके लिहीत होता.
नाटकात बारीकसारीक कामेही तो करी. रंगभूमीवर काम करण्याबाबत तो उदासीन होता. आपली सारी नाटके छापून काढावीत,असे त्याला कधीही वाटले नाही.धंद्यात त्याने कमाई केली व तो थोडीफार सावकारी करू लागला.ऋणकोंनी वेळेवर पैसे न दिले तर तो फिर्याद करी तो दरसाल एकदा कुटुंबीयांना भेटावयास जाई.
आयुष्याच्या अखेरीस त्याने स्टॅटफर्ड येथे एक घर विकत घेतले व तिथे तो मरेपर्यंत एखाद्या सुखवस्तू गृहस्थाप्रमाणे राहिला.रंगभूमीवरील काम करणारे वागत,तसाच तोही वागे.ते वागणे मोठेसे सुसंस्कृत अगर सदभिरुचीला पोषक होते असे मुळीच नव्हे. एकदा तर त्याने इतकी दारू घेतली की,तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली झिंगून पडला! प्रेमाची विफलताही त्याने अनुभविली होती.तो आपल्या एका सुनीतात लिहितो,"माझी प्रियकरीण जेव्हा 'मी सत्यनिष्ठ आहे' असे सांगते,तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो;पण ती खोटे बोलत आहे हे मला ठाऊक असते."नारीजनांना आकर्षण वाटेल असा पुरुष तो नव्हता,पण कधीकधी आपल्या प्रतिस्पर्थ्यांना तो प्रेमस्पर्धेत जिंकी.त्याचे कौटुंबिक जीवन सुखाचे नव्हते.ते वादळी होते.मरेपर्यंत त्याची पत्नी त्याला सतावीत होती. त्याने आपल्या मृत्यूपत्रात तिला केवळ आपला एक भिकार बिछाना चांगला होता तो मात्र ठेवला.थोडक्यात त्याची जीवनकथा ही अशी आहे.पण या हकिकतीने त्याच्या मनाचा थांग लावून घेण्यास प्रकाश मिळत नाही.मनुष्य या दृष्टीने त्याच्याच नाट्यसृष्टीतल्या कॅलिबन नावाच्या पात्राहून फार फार तर थोड्या उच्च दर्जाचा तो होता,असे म्हणता येईल.कॅलिबन हा अत्यंत क्षुद्र वृत्तीचा व क्षुद्र वासनाविकारांत लडबडलेला असा दाखविण्यात आला आहे.पण मानवजातीचा शिक्षक या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिल्यास तो पृथ्वीवरच नसून स्वर्गातील आहे,असे वाटते.तो अती मानुष वाटतो.क्षुद्र मनाच्या या मानवात तो चुकून जन्माला आला असावा,असे वाटते.
जगातील अत्यंत प्रतिभासंपन्न प्रज्ञावंतांनी शेक्सपिअरच्या बुद्धीचे मोजमाप करण्याची खटपट केली,त्याची विचारसृष्टी तर्कदृष्टीने मांडून दाखविण्याची त्यांनी पराकाष्ठा केली.पण तो खटाटोप यशस्वी झाला नाही.
टीकाकार त्याला रोमन कॅथॉलिक म्हणतात.कोणी त्याला नास्तिक म्हणतात,कोणी देशभक्त मानतात,तर कोणी युद्धविरोधक मानतात.कोणी त्याला प्रवचनकार समजतात,तर कोणी त्याला सिनिक म्हणजे कशातच अर्थ नाही,असे म्हणणारा मानतात. कोणी त्याला मानव्यवादी म्हणतात,तर कोणी 'संशयात्मा' म्हणतात.कोणी त्याला राजांचा बडेजाव करणारा म्हणतात.वस्तुतः तो यापैकी काहीच नव्हता;पण असे असूनही तो सारे काही होता असे विरोधाभासाने म्हणावे लागते.! कोणाही एका मनुष्याचे वा मानवसंघाचे जे विचार अगर त्याच्या ज्या कल्पना असू शकतील, त्यांच्यापलीकडे शेक्सपिअरचे विचार व कल्पना जात.तो विचारसिंधू होता,कल्पनाविश्वंभर होता. तो जे जे पात्र निर्मी,त्याच्या त्याच्या जीवनाशी तो तितक्याच प्रेमाने व सहानुभूतीने मिळून जाई. कॅलिबानशी तो जितका एकरूप होई,तितकाच प्रॉस्पेरोशीही.शेक्सपिअरची मनोबुद्धी मानवजातीच्या मनोबुद्धीला व्यापून राहिलेली होती,तिजशी एकरूप झाली होती.शेक्सपिअरचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न मी करणार नाही, किंवा त्याची विचारसृष्टी विवरूनही सांगणार नाही.कारण,असा प्रयत्न करणे निरुपयोगी आहे. पण मी त्याच्या विशाल मनोभूमीच्या कोपऱ्यात शिरून पाहणार आहे.त्याच्या अनंत बुद्धीच्या सागरात बुडी मारून पेलाभर शहाणपण मिळाले,तर मी आणणार आहे.या दृष्टीने शेक्सपिअरच्या तीन नाटकांकडे आपण जरा नजर टाकू या.पहिल्या नाटकात तो उपहास करणारा दिसतो,दुसऱ्यात केवळ ऐहिकदृष्टीचा दिसतो,तिसऱ्यात तत्त्वज्ञानी दिसतो.कोणती बरे ही तीन नाटके? टिमॉन ऑफ अथेन्स,हॅम्लेट,
टेंपेस्ट.
'टिमॉन ऑफ अथेन्स' या नाटकात एखाद्या ज्यू प्रेषिताप्रमाणे जगातील अन्यायांविरुद्ध तो गर्जना करतो व शिव्याशाप देतो.दुसऱ्या नाटकात तो फक्त जीवनाचे प्रतिबिंब दाखवितो,नीतीचे पाठ देत बसत नाही.जेव्हा कधी त्या वेगाने जाणाऱ्या नाट्यक्रियेत मध्येच क्षणभर जीवनावरील टीकेचे एखादे वाक्य उच्चारण्यासाठी तो थांबतो,तेव्हा जणू काय दुसऱ्या एखाद्या गोलावरून उतरलेल्या माणसाप्रमाणे या जगाला क्षुद्र व तुच्छ समजून तो फेकून देतो.!या जगाला तो फार महत्त्व देत नाही.हे जग म्हणजे मूर्खाची कथा,फुकट आदळआपट व आरडाओरड, निरर्थक पसारा असे म्हणून तो निघून जातो.पण या 'टिमॉन ऑफ अथेन्स' नाटकात जगाबद्दलचा त्याचा तिरस्कार,क्रोध ज्वालेत परिणत झालेला दिसतो.जीवन ही मूर्खाने नव्हे;तर कपटपटू सैतानाने सांगितलेली कथा असे येथे वाटते. आणि जग निरर्थक न वाटता द्रोह,नीचता,द्वेष, दंभ,कपट यांनी भरलेले दिसते.टिमॉन हा अथेन्समधील एक श्रीमंत मनुष्य आहे.तो उदारपणामुळे आपली सर्व संपत्ती मित्रांना वाटून टाकतो.त्यांना तो कधी नाही म्हणत नाही. मित्रांना त्यांच्या सावकारांचा तगादा लावला की तो त्यांचे कर्ज फेडून टाकी,मित्रांची लग्ने होत, तेव्हा त्यांना आंदण देई.त्याचा नवा संसार मांडून देई,तो त्यांना मेजवानीस बोलावी व जाताना देणग्या देई,हिरे- मोती देई.त्याचा कारभारी फ्लॅव्हियस 'हे औदार्य अखेर तुम्हाला धुळीला मिळवील' असे सांगतो.पण आपली संपत्ती संपणार नाही व आपले मित्र कृतज्ञ राहतील, टिमॉनला वाटते.फ्लॅव्हियसच्या सांगण्याकडे तो लक्ष देत नाही व शेवटची दिडकी संपेपर्यंत दुसऱ्यांना देतच राहतो.अखेर तो कर्जबाजारी होतो. त्याचे सावकार त्याला सतावू लागतात.ज्या मित्रांना आपण आपले सर्वस्व दिले,ते आपल्या संकटकाळी धावून येतील.असे त्याला वाटते.पण एकामागून एक सारे त्याला सोडून जातात;प्रत्येक जण निरनिराळ्या सबबी सांगतो व मदत नाकारतो.पुन्हा एकदा टिमॉन त्या सर्वांना मेजवानीस बोलावतो व त्यांच्यासमोर केवळ कढत पाण्याचे पेले ठेवतो.पण त्या वेळेपर्यंत आपणास त्याचे मित्र म्हणविणारे ते आश्चर्यचकित होऊन काही बोलण्याच्या आधीच तो ते कढत पाणी त्यांच्या तोंडावर व ताटे त्यांच्या अंगावर फेकतो व त्यांना घालवून देतो.
या स्वार्थी जगात निःस्वार्थीपणा म्हणजे मूर्खपणा असे तो शिकतो.जग काय हे त्याला नीट समजते.तो अथेन्स शहर सोडून जंगलातील गुहेत राहायला जातो.तिथे त्याला 'अत्यंत निर्दय पशूही माणसांहून अधिक दयाळू आढळतात. आपल्या गुहेसमोर तो कंदमुळांसाठी खणीत असता त्याला अकस्मात एक ठेवा 'पिवळा - गुलाम' - पिवळे सोने सापडते;मानवजातीला गुलाम करणारे व मानवजातीचे गुलाम असणारे सोने पाहून त्याला त्याचा तिटकारा वाटतो व तो ते पुन्हा मातीत पुरून टाकतो.पण काही नाणी मात्र कोणी मानवी प्राणी त्रास द्यावयास आले तर त्यांना देण्यासाठी म्हणून तो वर ठेवतो.
टिमॉनला सोने सापडल्याची गोष्ट अथेन्समधील लोकांना कळते व एकामागून एक ते त्याच्या गुहेकडे येतात.कवी,चित्रकार,योद्धे,वेश्या,भिकारी,डाकू,सारे येतात.पुन्हा एकदा टिमॉनची मैत्री जोडण्यासाठी ते उत्सुक होतात.तो प्रत्येकाला मूठ,दोन मुठी नाणी देतो.
एखाद्या संतप्त व तिरस्कार करणाऱ्या देवाप्रमाणे तो त्यांना म्हणतो, "जा,चालते व्हा,तुमच्या शहरात जा व हे द्रव्य पुजून ठेवा,नाही तर सूकरवत् चाललेल्या तुमच्या सुखोपभोगात खर्च करा." काही चोरांना तो द्रव्य देतो व म्हणतो,"जा,लुटा एकमेकांना,म्हणजे अधिक मिळेल.कापा गळे. जे तुम्हाला भेटतील ते सारे चोरच आहेत.जा अथेन्स शहरात व फोडा दुकाने.ज्यांचे लुटाल तेही चोरच ! चोर चोरांना लुटू देत.सारेच चोर !" हे सारे जग टिमॉनला डाकूंची गुहा वाटते.पण एक अपवाद मात्र असतो,तो म्हणजे त्याचा कारभारी फ्लॅव्हियस.तो आपल्या धन्याच्या दुःखात भागीदार असतो.फ्लॅव्हियस म्हातारा झालेला असतो.तो जेव्हा धन्याजवळ येतो, त्याला भक्तिप्रेम दाखवितो व रडतो,तेव्हा टिमॉन म्हणतो,"जगात अद्यापि थोडी माणुसकी आहे. या जगात एक फक्त एकच प्रामाणिक मनुष्य आहे.पण फक्त एकच हो! माझे म्हणणे नीट लक्षात घ्या.एकच,अधिक नाही;व तो म्हणजे हा माझा वृद्ध कारभारी." पण तो फ्लॅव्हियसला म्हणतो, "तू फसशील हो! इतके चांगले असणे बरे नव्हे. तू प्रामाणिक आहेस;पण शहाणपणात कमी दिसतोस.तू मला फसवून व छळून दुसरी चांगली नोकरी मिळवू शकशील.आपल्या पहिल्या धन्याच्या मानेला फास लागला,म्हणजे शहाणे नोकर दुसरा धनी मिळवितात.जगाची तर ही रीतच आहे.तू वेडाच दिसतोस.'
शेक्सपिअर खालच्या वर्गातील लोकांना तुच्छ मानतो,असा त्याच्यावर एक आरोप आहे. टीकाकार म्हणतात, "अशांविषयी शेक्सपिअरला सहानुभूती वाटत नसे. तो त्यांच्याबद्दल नबाबी तिरस्काराने व तुच्छतेने बोलतो.काटक्याकुटक्या,दगडधोंडे,यांच्याहून त्यांची किंमत अधिक नाही असेच जणू तो दाखवितो." अशा 'टीकाकारांना शेक्सपिअरच्या मनाची विश्वव्यापकता कळत नाही.'अथेन्सचा टिमॉन' या नाटकात शेक्सपिअरने अथेन्समधील जी मानवसृष्टी उभी केली आहे,तीत त्याचे अत्यंत प्रेमळ पात्र जर कोणते असेल,तर ते टिमॉनच्या गुलामाचे फ्लॅव्हियसचे होय.टीकाकारांच्या तत्त्वज्ञानात जितकी सहानुभूती असेल,त्यापेक्षा अपरंपार अधिक सहानुभूती शेक्सपिअरच्या अनंत मनात आहे.जीवनाकडे प्रत्येक दृष्टिकोनातून पाहणारा शेक्सपिअरसारखा द्रष्ट दुसरा झाला नाही. प्रसंगविशेषी तो शेलेप्रमाणे क्रांतिकारक होऊ शके,हीनप्रमाणे कडवट व कठोर होऊ शके, तसाच युरिपिडीसप्रमाणे निराशावादी तर बायरनप्रमाणे निस्सारवादी (सिनिक) ही होऊ शके.
स्विनबर्गप्रमाणे तो मायेतून पाहणारा होई, तर गटेप्रमाणे तत्त्वज्ञानीही होई;टेनिसनप्रमाणे तो आशावादी आणि शांतपणे शरणागती स्वीकारणारा,जे आहे ते चांगलेच आहे असे मानणाराही होई.जीवनाकडे नाना रंगांच्या चश्म्यांतून पाहणारा हा महाकवी आहे.याची दृष्टी एकांगी नाही.
'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात निराशेच्या काळ्या चष्म्यातून तो पाहत आहे.जगात कशातही सार नाही,सारा चौथा, सारे निःसार,घाण! टिमॉनचा एक मित्र अल्सिबिआडीस म्हणून असतो.(मानवजातीची कथा-हेन्री थॉमस)तो अथेन्स शहर वाचवू पाहतो;पण त्याला हद्दपारीचे बक्षीस मिळते! अल्सिविआडीस रागाने सैन्य उभारून आपला अपमान करणाऱ्या मातृभूमीवरच चालून येतो तेव्हा सीनेटर घाबरतात.ते सारे टिमॉनकडे जातात व म्हणतात, "अथेन्स संकटात आहे.या वेळेस तू ये." पण टिमॉन त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही.तो शक्य तेवढे सारे शिव्याशाप त्यांना देतो.पण शेवटी त्याच्या मनात एक विचार येतो.तो म्हणतो, "अल्सिबिआडीसच्या हातून मरण येऊ नये असे वाटत असेल तर एक गोष्ट मी करू शकेन." आणि मग तो म्हणतो,"माझ्या शेजारीच एक झाड आहे.
मला ते माझ्यासाठी कापावे लागणार आहे.मी ते तोडणारच आहे. पण अथेन्समधील माझ्या मित्रांना... साऱ्या अथेन्सलाच खालपासून वरपर्यंत रावापासून रंकापर्यंत सर्वांना माझा हा निरोप सांगा,ज्यांना ज्यांना येणारे संकट टाळायचे असेल,ज्यांना ज्यांना आपली दुःखे थांबवायची असतील, त्यांनी त्यांनी येथे त्वरेने धावून यावे.माझ्या कुऱ्हाडीने झाड पडण्यापूर्वीच या झाडावर त्यांनी स्वतःला टांगून घ्यावे."
आपल्या विषारी तिरस्काराचा शेवटचा बाण शहराकडे परतणाऱ्या त्या आपल्या नगरबंधूंवर सोडून टिमॉनने स्वतःचे थडगे खणले.तेथील खारट पाण्याच्या प्रवाहाजवळ त्याने खड्डा खणला व स्वतःचे विषण्ण जीवन संपविले. मातीतील,पृथ्वीच्या पोटातील कृतज्ञ किड्यांना मेजवानी देणेच अधिक चांगले.पृथ्वीवर चालणारा व्दिपाद मानवी पशुंपेक्षा पृथ्वीच्या पोटातले किडे व जीवजंतू किती तरी चांगले..
उर्वरित भाग पुढील लेखामध्ये