हॅनिबॉल ही शपथ कधीही विसरला नाही.स्वतःच्या पित्यासमोर,स्वतःच्या देशाच्या देवासमोर केलेल्या प्रतिज्ञेचे विस्मरण होणे कसे शक्य आहे?
जवळजवळ पंचवीस वर्षे रोमन कार्थेजियन यांच्यांत शांतता नांदली;पण ख्रि.पू. २१८ मध्ये दोघांच्याही सहनशीलतेला जणू तडेच पडले ! दोघेही केलेल्या कराराला कागदाच्या कपट्याप्रमाणे मानू लागले. प्रत्येक जण दुसऱ्याच्या वर्चस्वाखाली प्रदेशावर आक्रमण करण्याची तयारी गुप्तपणे करू लागला. रोमन लोकांनी साम्राज्याची उभारणी सुरूच ठेवली होती.कोणता नवीन प्रदेश घेता येईल;नवीन वसाहती कोठे वसविता येतील,इकडे त्यांचे सारखे लक्ष असे.त्यांनी तांब्यांच्या खाणींनी समृद्ध असा सार्डिनिया आपल्या राज्याला जोडला.त्यांची सुसंघटित लुटारूपणाची आंतरराष्ट्रीय गुंडगिरी सारखी सुरूच होती.रोमनांनी सार्डिनिया घेताच कार्थेजियनांनी दक्षिण स्पेन बळकावून त्याचा वचपा काढला.दक्षिण स्पेनमध्ये चांदीच्या खाणी होत्या. कार्थेजियनांची ही धडाडी व त्यांचे हे साहस पाहून रोम लोक चकित झाले ! कार्थेजियनांना धडा शिकविला पाहिजे असे,त्यांनी ठरविले.
पण जर्मन ज्याप्रमाणे १९१४ साली शत्रूला तोडीस तोड होते;एवढेच नव्हे.पण कांकणभर सरसच होते. तद्वतच कार्थेजियनही होते.रोमन सैन्य गलबतांत बसून निघणार तोच हॅनिबॉलच्या नेतृत्वाखाली कार्येजियन फौजा आल्प्स पर्वत ओलांडून उत्तर इटालीमधून प्रचंड लोंढ्याप्रमाणे रोमवर चालून येत आहेत अशी बातमी आली.रोमन सीनेटरांनी ती बातमी शक्य तितकी गुप्त ठेऊन हॅनिबॉलशी मुकाबला करण्यासाठी फौजा पाठविल्या.हे दुसरे प्युनिक युद्ध,रोमनांनी हे युद्ध विजयाच्या आक्रमक इच्छेने सुरू केले होते.त्यांनी चढाईला सुरुवात केली; पण चढाई तर दूरच राहिली आणि त्यांच्यावरच उलट मातृभूमीच्या रक्षणार्थ बचावावी पवित्र लढाई करण्याची वेळ आली.'रोमन रिपब्लिकची सत्ता जगभर पसरवा,रोमन सत्तेचा धोका नष्ट व्हावा म्हणून प्राणार्पण करण्यास पुढे या,'अशी घोषणा केली गेली.रोमन सेना देशभक्तीने प्रेरित होऊन वेगाने निघाल्या.इटलिच्या उंबरठ्यापाशी हॅनिबॉलला थांबवावे म्हणून त्यांनी जोराने कूच केले.पण हॅनिबॉलने त्या सैन्याला ट्रॅसिमेनस सरोवराजवळ कोंडून नष्ट केले.
रोमन सीनेटर गर्भगळीत झाले.सक्तीची सैन्यभरती करून त्यांनी दुसरी सेना उभारली व कार्थेजियनांचा लोंढा थांबविण्यासाठी ती पाठविली.रोमपासून थोड्या मैलांवर कॅन्नी येथे उभय सेनांची गाठ पडली व रोमनांचा पुरा धुव्वा उडाला ! सैन्य व अंमलदार मिळून सत्तर हजार रोमन ठार झाले.
रोमन लोकांचा इतका मोठा पराभव क्वचितच झाला असेल.रोमवर ही प्रचंड आपत्ती होती.हा प्रखर प्रहार होता.हॅनिबॉल आज ना उद्या रोमवर चालून येणार हे नक्की होते.विजेच्या गोळ्याप्रमाणे तो कोणत्याही क्षणी कडाडत येईल असे पदोपदी वाटे.पण हॅनिबॉल चाल करून येईना तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले.तो रोम शहरांकडे पाठ फिरवून दक्षिण इटलीत निघून गेला.त्याच्या त्या विचित्र वर्तनाचे कारण त्या वेळी कोणाच्या ध्यानात आले नाही.पण ते उघड होते. पराभवामुळे झालेल्या रोमनांच्या नुकसनाइतकेच विजयी झालेल्या कार्येजियनांचेही नुकसान झाले होते.त्यांचे पुष्कळेसे सैन्य ठार झाले होते,त्यांची साधनसाम्रगी संपुष्टात आली होती.शक्ती क्षीण झाली होती.त्यांच्या विजयी आक्रमणाचा वेग अविश्रांतपणे सुरू होता,त्यांनी क्षणभरही दम घेतला नसल्यामुळे त्यांना विश्रांतीची जरुरी होती.रोमवर हल्ला करण्यासाठी त्यांना ताजा पुरवठाही हवा होता.नवी माणसे,नवी यंत्रे,नवी हत्यारे यांची त्यांना गरज होती.म्हणून कार्येजहून नवीन सैन्याचा व नवीन साधनसामग्रीचा पुरवठा होईपर्यंत वाट पाहण्याचे हनिबॉलने ठरविले.तोपर्यंत इटलीच्या प्रांतांतून कार्येजियनांचा प्रचार करीत तो हिंडणार होता.त्याने प्रचाराची स्वारी सुरू केली होती.
पण रोमनांनी नवेच डावपेच सुरू केल्यामुळे हॅनिबॉलच्या अडचणी वाढतच गेल्या.किंटस फेबियस मॅक्झिमस हा रोमन सैन्याचा सेनापती होता.त्याला त्याच्या देशबांधवांनी 'वेळ घेणारा दिरंगाई करणारा' (कॅक्टेटर - डिलेअर) अशी पदवी दिली होती.तो कधीही त्वरित निर्णय घेत नसे. निर्णय घेण्याचे काम तो नेहमी पुढे ढकली.ज्या लढाया आज खेळावयाला हव्यात,त्या उद्यावर ढकलणेच अधिक बरे असते,अशी त्याची ठाम समजूत होती.क्विटस फेबियस हॅनिबॉलशी लढाई देण्याची सारखी टाळाटाळ करीत होता.त्यामुळे लवकर सोक्षमोक्ष होईना.कार्थेजियन कंटाळू लागले. दिरंगाई व कालापव्यय यामुळे त्यांचे नीतिधैर्य गळाठले खचले.लढून पराजय होता तरी पत्करता, पण ही न लढण्याची लढाई नको,असे त्यांना होऊन गेले.ते शत्रूचा पाठलाग करू पाहत होते.पण शत्रू होता कोठे? ते छायामय शत्रूचा पाठलाग करीत होते. शत्रू सारखा झुकांड्या देत होता.तो जवळ दिसे,पण क्षणात दूर जाई.जिवंत शत्रूला कसे जिंकावे हे कार्येजियन जाणत होते.पण पोकळ हवेवर कसा विजय मिळवावा;छायामय शत्रूला कसे पराभूत करावे,हे त्यांना समजेना.रोमन शस्त्रास्त्रे जेथे निस्तेज व हतप्रभ ठरली;पराभूत झाली,तिथेच क्विटस फेवियसचा हा निःशस्त्र प्रतिकार प्रभावी व विजयी होत होता.
हॅनिबॉल कार्थेजहून येणाऱ्या सैन्याची व वाहतुकीची वाट पाहात होता.आपण लवकरच मदतीस येतो, असा त्याचा भाऊ हस्द्रुबॉल याचा निरोप आला.नीट सुसज्ज असे प्रचंड सैन्यच नव्हे तर रोमला वेढा घालण्यासाठी जरूर ती यंत्रेही घेऊन हस्द्रुबॉल
येणार होता..हस्द्रुबॉल विजयी होत होत उत्तरेकडून आल्प्सच्या मागनि येत होता.
त्याने स्पेनमधून रोमन शिबंदीचा फन्ना उडविला होता व तो आता इटलीत येणार होता ही विजयवार्ता कानी पडताच हॅनिबॉल आनंदाला व आपली आणि हस्द्रुबॉलची गाठ कोठे पडाची हे त्याने ठरविले. दोघांची गाठ पडल्यावर दोघेही टायबर नदीच्या तीरावरील रोम शहरावर चालून जाणार होते.
हॅनिबॉल हस्द्रुबॉलची वाट पाहत असता हस्द्रुबॉलऐवजी रोमन लोकांनीच त्याला एक अभिनंदपर भेट पाठविली.हॅनिबॉल ती उघडून पाहू लागला,तो आत त्याला काय आढळले? त्याच्या भावाचे मुंडके ! रोमन लोकांनी हस्द्रुबॉलच्या
अचानक हल्ला करून त्याला ठार केले होते.
भावाच्या मरणामुळे हॅनिबॉलच्या आशा धुळीस मिळाल्या,त्याचे मनोरथ ढासळले.इटलीत यापुढे एक क्षणही राहणे उपयोगी नव्हते;नव्हे ते मूर्खपणाचेच ठरले असते.हस्द्रुबॉलवर
मिळालेल्या विजयामुळे रोमनांनीही चढाई सुरू करून भूमध्यसमुद्रातून थोडे सैन्य खुद्द कार्थेजवर पाठविले.कार्थेज संकटात पडले.हॅनिबॉलला स्वतःच्या नगरीच्या रक्षणार्थ धावपळ करीत मागे फिरावे लागले.कितीतरी वर्षांनी तो स्वदेशात परत आला होता.तो भर तारुण्यात इटलीत गेला होता, त्या वेळी त्याच्या नसानसांत रोमनांचा द्वेष भरला असून त्याला तेव्हा विजयाबाबत खात्री होती.पण आता त्याच्या डोळ्यांवरची झापड उडाली होती;तो हताश होऊन वृद्धावस्थेत कार्थेजला परतला होता. त्याच्या मनातील द्वेषबीजाचेच आता निराशेच्या
हलाहलात रूपांतर झाले होते व ते त्याला सारखे जाळीत होते.त्याच्या देवांनी त्याची वंचना केली होती.आपला नक्की पराजय होणार हे जाणून तो लढत होता-गमावलेल्या गोष्टीसाठी लढत होता. तरीही तो डगमगला नाही.सैन्याचे अवशिष्ट जिर्णशीर्ण भाग घेऊन तो उभा राहिला.ख्रि.पू. २०२ मध्ये झामा येथे रोमनांची व त्याच्या सैन्याची गाठ पडली.कार्थेजिनयांचा पुरा मोड झाला. हॅनिबॉलने तहाची बोलणी सुरू केली.
हॅनिबॉल कार्थेजमध्ये काही दिवस सार्वजनिक खात्यांचा मंत्री म्हणून काम करीत होता.पण आपल्या अमर द्वेषाच्या शमनार्थ रोमवर पुन्हा जंगी स्वारी करण्याची तयारी तो गुप्तपणे करीत असल्याची कुणकुण कानी आल्यामुळे रोमनांनी साशंक होऊन कार्थेजकडे हॅनिबॉलला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.आपल्या भावाचा क्रूरपणे करण्यात आलेला वध डोळ्यांसमोर असल्यामुळे हॅनिबॉल पण रोमन तिथेही त्याच्या पाठोपाठ आले.तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी सारखी धावपळ करीत होता व शत्रूही सारखे त्याचा पाठलाग करीत होते.शिकारी कुत्रे पाठीस लागावे,त्याप्रमाणे रोमन त्याचा पिच्छा सोडीनात.वन्य पशूची शिकार करणे हा तर रोमनांचा आवडता खेळ होता;पण पराभूत व भयभीत शत्रूची शिकार करणे हा त्यांचा त्याहूनही आवडता खेळ होता.शेवटी काळ्या समुद्राच्या तीरी बिथिनिया येथे तो पकडला गेला.निसटून जाणे अशक्य,असे वाटले तेव्हा आत्महत्या केली.'रोमनांची चिंता सरावी, त्यांना हायसे वाटावे म्हणून मी स्वतःच स्वतःला मारून घेतो',असे तो उपहासाने म्हणाला.
म्हाताऱ्या व अगतिक हॅनिबॉलचा सूडबुद्धीने असा सारखा पाठलाग करणे हे खरोखर गुन्हेगारीचे कृत्य होते.पण पुढे कार्थेज शहराचा जो जाणूनबुजून खून करण्यात यावयाचा होता त्या नीचतम व अती भयानक गुन्ह्याची ही केवळ नांदी होती,त्या घोरतम पापाची ही केवळ प्रस्तावना होती.
०३.०४.२०२६ या लेखातील शेवटचा भाग...!!