कार्थेजियन राजपुत्र...!
ग्रीक व इतर आर्य युरोपच्या मध्यभागी कार्यक्षेत्रात उतरले असताना तिकडे फोनिशियन लोक फार अशांत व अस्वस्थ झाले होते.टायर शहरातील फोनिशियन स्त्री-पुरुष येथील परिस्थितीला कंटाळले होते.जरा सुरेख नवे घर मिळावे म्हणून त्यांची धडपड सुरू झाली; नवे घर शोधावयाला ते बाहेर पडले.गलबतांत बसून ते भूमध्य समुद्रातून पश्चिमेकडे निघाले.आफ्रिकेतल्या अगदी उत्तरेच्या एका लहान प्रदेशावर ते उतरले.तो टापू सुपीक होता.
फोनिशियन तिथे वसाहत करू लागले.
त्यांनी तेथील मूळच्या रहिवाशांची कत्तल केली. हे मानवी बळी देऊन त्यांनी आपल्या देवाची प्रार्थना केली व त्याचे आभार मानले.समुद्राभिमुख अशी नवी वसाहत उभी राहिली व हळूहळू वाढू लागली. लवकरच तिथे भव्य व भरभराटलेले कार्थेज नगर उभे राहिले.
कार्थेजियनांनी फोनिशियनांपासून दोन गोष्टी घेतल्या; व्यापारातील कौशल्य व नरमेघावरील विश्वास. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यांवर,तशीच फ्रान्सच्या दक्षिण भागात व स्पेनमध्येही त्यांनी कितीतरी व्यापारी ठाणी बसविली.भूमध्य समुद्राच्या अर्ध्या भागावर त्यांचे प्रभुत्व होते व उरलेल्या अर्ध्या भागावरही प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी ते आपले आधाशी गिधाडी डोळे फिरवू लागले.यज्ञप्रिय मोलोको देवाची सदिच्छा प्राप्त व्हावी, त्याची कृपादृष्टी असावी व त्यामुळे व्यापारात व लष्करी साहसांत आपणास यश यावे म्हणून ते पुन्हापुन्हा नरमेध करून त्याला मानवी मांसाची मेजवानी देत,लाच देत. काही असो,काही होवो,
मोलोक्कोला त्याचा पोटभर वाटा नेहमी मिळे,कार्थेजियन लढाईत विजय मिळवून परतले तर युद्धकैद्यांतल्या अत्यंत सुंदर कैद्याचा नैवेद्य ते भीषण मोलोक्को देवाला अर्पण करीत व पराभूत होऊन परत आले,तर आपल्यातल्याच मोठमोठ्या घराण्यांतील मुलेबाळे होळीत फेकीत.जय-पराजय काहीही झाले,तरी मोलोक्को देवाची चैनच होती.
राज्यासाठी आपल्या मुलाबाळांचे बळी देण्याची पद्धत आजतागायत सर्वत्र सुरूच आहे.कार्थेजियन जरी आपल्या मुलाबाळांना बळी देत,तरी एकंदरीत ते सुसंस्कृतच होते.त्यांची संस्कृती उच्च दर्जाची होती व म्हणून ज्या ज्या देशांशी ते व्यापार करीत,त्या सर्व देशांकडे ते तुच्छतेने बघत.विशेषतः रोमन लोकांच्या रानवट चालीरीती पाहून तर त्यांना गंमतच वाटे.हे आडदांड व रांगडे रोमन इटलीच्या पश्चिम किनाऱ्यावर भूमध्यसमुद्राच्या पलीकडे राहत.कार्थेजमध्येही येऊन काही रोमनांनी दुकाने वगैरे घेतली.ते रस्त्यामध्येच दुकाने मांडून बसत.त्यांची वागण्याची पद्धत खेडवळ होती व त्यांची शरीरे बुटकी होती.पण त्यांचा रुबाब मात्र मोठा होता.त्यांची ती शिष्टपणाने वागण्याची पद्धत व सुसंस्कृत भाषा पाहिल्यावर दोहोंतील विरोध चांगलाच डोळ्यांत भरे.कार्थेजमध्ये रोमची पुढीलप्रमाणे टिंगलटवाळी करण्यात येत असे;
संबंध रोमन शहरात चांदीचे ताट एकच आहे व कोणा सीनेटरला कोणास मेजवानी द्यावयाची असली म्हणजे त्याला ते ताट उसने आणावे लागते !
पण रोमन लोकांत सभ्यता,संस्कृती किंवा श्रीमंती नसली तरी ते महत्त्वाकांक्षी लढवय्ये होते.ज्या वेळी आर्य लोक उत्तरेकडून आल्प्स पर्वत ओलांडून खाली आले,त्या वेळेस त्यांच्यापैकी येथे राहिलेल्या आर्य लोकांचे वंशज ते हे इटालियन हे इटालियन लोक जेव्हा त्या पायाच्या आकाराच्या भूभागात गेले,तेव्हा त्यांना तिथे आधीच येऊन राहिलेल्या दोन जाती आढळल्या.
रानटी आयबेरियन व सुसंस्कृत युट्रस्कन तिथे होते. इटालियनांनी आयब्रेरियनांचा निःपात केला,युट्रस्कन लोकांपासून ते रस्ते बांधणे,शिल्पकाम,वैद्यकी,औषधे, ज्योतिषशास्त्र इत्यादी नाना गोष्टी शिकले,व मग त्यांनी आयबेरियनांप्रमाणे त्यांचाही निःपात केला, त्यांचेही उच्चाटन केले.हे इटालियन सारे एकजुटीने लढत नव्हते.त्यांचे निरनिराळे संघ होते.ते एकमेकांपासून पृथक् राहून सर्वत्र लूटमार करीत व सर्व देशाला सळो की पळो करून सोडीत.त्यांच्या जथ्यापैकी एक जथा तर फारच रानवट होता.पळून गेलेले गुलाम,अती शूद्र लोक व ठिकठिकाणचे परित्यक्त व बहिष्कृत लोक अशांचा तो जथ्था होता.त्यांनी टायबर नदीच्या मुखाजवळचा डोंगराळ प्रदेश जिंकून घेतला,त्याची तटबंदी केली व जे जे गुलाम पळून येत,चोर दरोडेखोर न्याय चुकविण्यासाठी आधार शोधीत जात,त्या सर्वांना तिथे आश्रय देण्यास सुरुवात केली.अशा रीतीने रोम शहर स्थापले गेले.
प्रथम त्यांच्या या वसाहतीत बायका नव्हत्या.पण ज्या ज्या गोष्टीची जरुरी भासेल ती ती गोष्ट मिळवून घ्यावयाचीच असा रोमन लोकांचा बाणा होता.जवळच्या सबाइन लोकांवर ते तुटून पडले व त्यांच्या बायकांपैकी अत्यंत सुंदर व घट्ट्याकट्ट्या बायकांना घेऊन गेले.त्या बायकाही जावयाला फारशा नाखूश होत्या असे नाही.विजयी रोमनांच्या बायका होण्यास त्या तयारच होत्या.या आपल्या नव्या बायकांच्या मदतीने त्यांनी सबाइन लोकांशी मैत्री केली व नंतर सारे इटालियन द्वीपकल्प पादाक्रांत करण्यासाठी ते निघाले.
त्यांची प्रगती फार झपाट्याने झाली नाही;पण जिथे ते पाय रोवीत तिथे ते तो भक्कम करीत.त्यांचे लष्करी तंत्र हळूहळू व पण निश्चितपणे शत्रूस चिरडून टाकी व शरण यावयास लावी.रोम शहराभोवतालची शंभर मैल घेराची जागा जिंकून घ्यावयास त्यांना तीनशे वर्षे लागली.पण एकदा तो प्रदेश जिंकून इटली ताब्यात घेतल्यावर इटलीत कोणीही त्यांच्याविरुद्ध डोके वर काढू शकला नाही.शस्त्रांनी लढून ते जो जो नवीन प्रदेश मिळवीत,तिथे तिथे लगेच रोमन वसाहत स्थापीत. अशा रीतीने रोमला अनुकूल अशा लोकांचे संबंध सर्वत्र पसरून सर्व इटली देश त्यांनी आपल्या ताब्यात ठेवला.
पण या बाहेरच्या विजयी मुलूखगिरीस घरच्या भांडणांमुळे अधूनमधून अडथळा येई.रोमन लोकांसारखे आपसात भांडणारे लोक जगाच्या इतिहासात दुसरे क्वचितच दिसून येतील.त्यांनी प्रथम युट्रस्कन लोकांतील राजांचे शासन मान्य केले;पण हळूहळू त्यांना या राजांचा वीट आला व त्यांनी निराळी शासनपद्धती सुरू केली.दरसाल दोन पालनकर्ते निवडले जात. प्रतिष्ठित नागरिकांचे एक पार्लमेंट असे.हे दोन पालनकर्ते या पार्लमेंटमधील प्रतिनिधींच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवीत.
या प्रतिष्ठित प्रतिनीधींना 'पॅट्रिशियन' म्हणत.ज्या गुलामांनी व दरोडेखोरांनी रोम स्थापिले.त्यांच्या वंशजांना 'पॅट्रिशियन' किंवा 'वरच्या वर्गाचे लोक' म्हणण्यात येई.हे इतर लोकांचे जणू मायबापच ! जे गरीब व दरिद्री लोक असत,त्यांना 'प्लीबियन' म्हणण्यात येत असे.वरिष्ठ वर्गाच्या अहंमन्यतेमुळे व दुष्टतेमुळे हे सामान्य लोक शेवटी बंड करून उठले. त्यांनी सार्वत्रिक संप पुकारला.ते जवळच्या एका टेकडीवर गेले व तिथे प्रतिस्पर्धी असे दुसरे शहर उभारण्याची त्यांनी धमकी दिली.रोमच्या दरवाज्याजवळच असा एक प्रबळ शत्रू उत्पन्न झाला म्हणून प्रतिष्ठित पॅट्रिशियनांना भीती वाटली.त्यांनी प्लीबियनांना बोलावून त्यांनाही राज्यकारभारात भाग देण्याचे कबूल केले.तेव्हापासून हे सामान्य लोकही आपले प्रतिनिधी पाठवू लागले.बहुजन समाजाच्या या प्रतिनिधींना 'ट्रायब्यून्यस' म्हणत.अमुक एक कायदा आपल्या मतदारांच्या हिताविरुद्ध आहे असे वाटले, तर ते तो कायदा नामंजूर करू शकत.
जरी या तडजोडीमुळे रोमन लोकांची आपसांतील भांडणे तात्पुरती मिटली तरी भांडणांचे व द्वेष-मत्सरांचे वणवे पुन्हापुन्हा पेटतच,
असंतुष्ट लोकांची दुःखे,अती महत्त्वाकांक्षी लोकांच्या परस्परविरोधी महत्त्वाकांक्षा वगैरेंमुळे रोम शहर म्हणजे जणू खाटिकखानाच बने ! पण दरवाज्याच्या आत जरी ते आपसांत लढत असले, तरी बाहेर मात्र ते रोमची सत्ता वाढवीतच राहिले.
टायबर नदीच्या उत्तरेकडील जाती-जमाती रोमनांच्या ताब्यात प्रथम आल्या नंतर दक्षिणेकडील मॅग्ना ग्रीशीयात वसाहत केलेल्या लोकांस रोमनांच्या पोलादी मुठीचे बक्षीस मिळाले.या वसाहती ग्रीकांनी वसविल्या होत्या,हे मॅग्नागिशीया या नावावरूनच दिसून येत आहे. रोमनांनी त्यांना शस्त्रास्त्रांनी जिंकले तर उलट ग्रीकांनी त्यांना आपल्या लष्करी जेत्यांना स्वतःच्या उच्च संस्कृतीने जिंकले.रोमनांनी ग्रीकांचे संगीत घेतले;त्यांचे काव्य उचलेले;त्यांचे तत्त्वज्ञान,त्यांच्या देवदेवता सारे घेतले;त्याचा त्यांना नीट उपयोग मात्र करून घेता आला नाही.
हसणारे-खेळणारे थोर ग्रीक आदर्श घेऊन त्यांनी उग्र व भीषण चेहऱ्याचे व नेहमी खिन्न आणि रुष्ट असणारे प्रकार बनविले.रोमन लोक जेव्हा ग्रीकांचे अनुकरण करीत,तेव्हा एखादा हत्ती एखाद्या सुंदर नृत्यकुशलाचे अनुकरण करीत आहे असे वाटे.
पण झगड्यांवाचून मात्र ग्रीक वसाहती रोमनांना शरण गेल्या नाहीत.ग्रीकांनी एपिरसचा राजा पिन्हास मदतीस बोलाविले.
एपिरस देश म्हणजे अलेक्झांडरच्या आईचे माहेर.राजा पिन्हास याला आपण दुसरे अलेक्झांडर होणार असे वाटे. आपण रोमन लोकांचा तेव्हाच धुव्वा उडवून देऊ,
अशी त्याची कल्पना होती.रोमन लोकांची चटणी उडवून पुढे कार्थेजिनयनांसही जिंकावे व सारे जग जिंकून घेण्यास अशा रीतीने आरंभ करावा असे विचार त्याच्या मनात आले.
पिन्हासच्या स्वारीचा धोका समोर असल्यामुळे रोमनांनी व कार्थेजियनांनी एक होऊन परस्पर संरक्षक करार केला,रोम व कार्थेज ही दोन्ही समोरासमोरची शहरे भूमध्य समुद्रावरून परस्परांकडे मत्सराने पाहत असत. त्यांना एकमेकांचे वैषम्य वाटे.आफ्रिकेच्या खाद्यांवर बसलेले वैभवोन्मत कार्थेज शहर साऱ्या जगाचे आव्हान स्वीकारावयास तयार होते,इटली ताब्यात घेणारे रोमही स्वतःच्या महत्त्वाकांक्षांचे क्षितिज वाढवू लागले होते.या दोघांच्या दरम्यान समृद्ध व संपन्न सिसिली बेट होते. दोघांच्याही बुभुक्षित जिभांना सिसिली पाहून पाणी सुटत होते.सिसिलीचा कब्जा कोणी घ्यावयाचा या प्रश्नावर आज ना उद्या त्यांची जुंपणारच होती.पण पिन्हासने जेव्हा मॅग्ना ग्रीशियावर स्वारी केली,तेव्हा परस्पर स्पर्धाळू रोमन व कार्थेजियन लोक आपसातील भांडणे तात्पुरती विसरून समान शत्रूशी लढवण्यासाठी एक होऊन एका झेंड्याखाली जमले.त्यांनी आपसांतील मतभेद पुढे मिटवावयाचे असे ठरविले.
फारशी अडचण न पडताच रोमला पिन्हासवर विजय मिळाला व नंतर रोमने कार्थेजकडे नजर वळविली.
रोम व कार्थेज यांमधील पहिले युद्ध तेवीस वर्षे (ख्रि.पू. २६४ ते खि. पू. २४१) टिकले.'पहिले प्यूनिक फोनेशियन युद्ध' या नावाने ते प्रसिद्ध आहे.ते मुख्यतः आरमारी युद्ध होते.
मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी, मधुश्री पब्लिकेशन
सुरुवातीला कार्थेजियन अधिक हुशार खलाशी ठरले. पण युद्धाच्या हालचाली करण्यात रोमन लोक फार पटाईत होते.
युद्धातील गोष्टी ते झट्कन शिकत.प्रथम प्रथम त्यांचे आरमारी पराजित झाले,पण त्या पराजयांतून ते विजयाचे पेचप्रसंग शिकले.आरमारी लढाया कशा जिकाव्यात हे शिकून शेवटी आरमारी लढायात त्यांनी आपल्या गुरूंचा पराभव केला. रोमनांनी सिसिली जिंकली.तह होऊन एकमेंकाच्या वर्चस्वाखालचे प्रदेश नक्की झाले व परस्परांचा अडथळा न होता दोघांनाही लुटालूट करण्यास भरपूर वाव मिळावा,अशी व्यवस्था त्यांनी करून टाकली,पहिल्या प्यूनिक युद्धातील कार्थेजियनांचा पुढारी हमिल्कर बार्का हा होता.रोमनांनी पराजय केल्यावर पाच वर्षांनंतरची गोष्ट.हमिल्कर नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन एके दिवशी रात्री बालच्या मंदिरात गेला व मोलोक्कोच्या मूर्तीपुढे त्याने त्याला "मी मरेपर्यंत रोमनांचा द्वेष करीन" अशी शपथ घ्यावयास लावली. मानवी यज्ञाहुती मिळण्यात मोलोक्को देवाला फार आनंद वाटत असे.
★★★ अपुर्ण,राहिलेला भाग पुढील लेखात…