सातेरी आई डोलत होती वाऱ्यामंदी।
आम्ही तिची पुरी केली नाकेबंदी।
सातेरी आई न्हात होती पावसामंदी।
आम्ही तिला राउळ बांधले चिरेबंदी ।।
वेताळ बाबा शेकत होता उन्हामंदी।
त्याला पार झाकुन टाकला सावलिमंदी।
खुशिमंदी नाचत होता पावसामंदी।
आम्ही त्याला गाडुन टाकला देवळामंदी।।
मी जिथे जन्मलो त्या पुण्यातल्या सर्वोच्च स्थानावर वेताळ बाबा आरूढ आहेत.त्यांच्या कृपाछत्राखाली, त्यांच्या टेकडीवर भटकत भटकत मी वाढलो.आमचा मूळ गाव आहे गोव्यात.तिथल्याही गावा-गावांत वेताळ बाबा राहतात,जवळपास सोबतीला असते सातेरी आई, दोघेही स्वयंभू,सातेरी वसतीला असते वारुळांत,तर वेताळबाबा एखाद्या सुळक्यासारख्या शिळेत.सातेरी धरणीमातेची योनी आहे तर वेताळ लिंग.निसर्गाच्या प्रसवशक्तीची प्रतीके,त्यांच्या संगमातून सारी जीवसृष्टी उद्भवली.सातेरी वेताळांनी नेहमीच मोकळ्यावर निसर्गाच्या सान्निध्यात खुलावे.त्यांची रावळे देवळे कधीच बांधू नयेत.खरे तर साऱ्याच जीवजातींनी खुलेपणे निसर्गातली आपापली भूमिका वठवत 'वसुधैव कुटुंबकम्' अशा भावनेने नांदावे.पण हळूहळू मानवाची आणि परिसराची नाळ तुटली आहे.त्याला सगळ्याभोवती काहीतरी कृत्रिम वेष्टन घालायची खोड पडली आहे.तेव्हा आता सातेरी वेताळांना तो मोकळ्यावर,डोंगरमाळांवर,वनकाननांत राहू देत नाही. खणाखणी,तोडफोड करत त्यांच्या अवतीभोवती दगड, विटा,चुना,सिमेंट,पोलादाचे इमले रचतो.हे सगळे साहित्य जुळवण्यासाठी आणखी नासधूस करतो. मूळच्या वारुळांना शिळांना पार गाडून टाकतो.
मनमोर
पण सतत बांधकामात गढूनही मानवाचे निसर्गप्रेम काही पूर्णपणे आटलेले नाही.लहानपणी मी वेताळाच्या डोंगरावर मनमुराद हिंडायचो,तेव्हा बरोबर असायचा माझा एक आणि आमच्या शेजाऱ्यांचे तीन,असे चार कुत्रे राजा,टिपू,गोट्या आणि पिंग्या.वेताळाच्या आसपास फारसे कोणी भेटायचे नाही.कारण डोंगराच्या अवती-भोवती सगळी शेती होती,आणि गवळ्यांची वस्ती.आमच्या घरासारखी अगदी मोजकी घरे.एखाद वेळी भटक्या जमातींतले दोन-चार शिकारी भेटायचे. म्हणायचे,तुझ्याकडे चार कुत्री आहेत.आम्हाला दे की त्यातली एक-दोन ! लहानपणापासून मला पक्षी बघायचा नाद होता.तेव्हा डोंगरावर भरपूर सातभाई, चंडोल,होले,लावे,तित्तर,खाटीक,ससाणे होते; पण ह्या शिकाऱ्यांच्या फेऱ्यांत मोर टिकणे शक्य नव्हते.नंतर चाळीस वर्षे पुण्याबाहेर काढून परतलो.आपसूकच माझी पावले वेताळाच्या डोंगराकडे वळली.वेताळाला आता देवळात झाकलेले पाहून जरा हळहळलो.पण अवती-भोवतीचे दृश्य पाहून माझ्या मनमोराचा पिसारा अक्षरशः फुलला,कारण आज इथे चिक्कार मोर बागडताहेत.मधे एक बातमी होती की ह्या परिसरात मोरांना पकडायचे सापळे नजरेस आले.सजग पक्षीमित्रांनी ते हुडकून हुडकून मोर वाचवले.जसजशी डोंगराभोवतीची वस्ती वाढली,जसजसे जास्तीत जास्त लोक टेकड्यांवर फिरायला लागले,तसतसे त्यांच्या जागरूकतेतून मोरांना संरक्षण मिळू लागले.वृक्षराजी पण फोफावली.ह्या टेकड्यांवर बांधकामे अजिबात नकोत म्हणून हे नागरिक लढताहेत.हा पुण्यातलाच नाही,तर जगभरचा अनुभव आहे.निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी - धनदांडग्यांशी आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या सत्ताधीशांशी भांडत-भांडत. आपल्या भारतभूत जसे अनेक जागरूक निसर्गप्रेमी आहेत तसेच अमेरिकेतही.अशा एका तरुण निसर्गप्रेमीची लढत हेच आहे वारूळ पुराण या पुस्तकाचे सूत्र.
वारूळ पुराण
पर्यावरणाची,निसर्गाच्या सुरक्षेची वारूळ पुराणाच्या लेखकांना एड् विल्सनना मोठी कळकळ आहे. आधुनिक जगातल्या उलथापालथी निसर्गावर प्रचंड आघात करताहेत,हे त्यांना दिसते.तरीही एड् विल्सन हे ह्या उलाढाली घडविणाऱ्या आधुनिक अर्थ-शासनव्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत.
'अँटहिल' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी ह्या द्वंद्वातून त्यांच्या मनात चालू असलेला जो 'आपुलाचि वाद आपणासी'आहे त्याचा मागोवा घेते.कथानायकाचे वंशद्वेषी अलाबामा राज्यातील बालपण,निसर्ग निरीक्षणाची आवड,महाविद्यालयातले कीटकांवरचे शास्त्रीय काम,सगळे जणू एड् विल्सनच्या आयुष्याचे प्रतिबिंब आहे.मग कादंबरीचा नायक रॅफ त्यांच्यासारखाच पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्डला येतो. तोही निसर्गसंरक्षण आणि 'दिल मांगे मोअर'वाली हव्यासवादी,चंगळवादी,आक्रमक अर्थव्यवस्था यांच्या संघर्षात बुडून जातो.फक्त एड् विल्सन हार्वर्डला येऊन एक ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ बनतात,तर रॅफ विज्ञान बाजूला ठेवून वकील बनतो आणि एका मोठ्या बांधकाम व्यवसायात शिरून त्याच्या पुढचा तिढा सोडवतो.माझ्याही आयुष्यात असे बरेच काही घडले आहे.मला पण बालपणी निसर्ग निरीक्षणाची गोडी लागली,मीही पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्डला गेलो. त्या वेळी व्हिएटनामच्या युद्धाने अमेरिका ढवळून निघाली होती;हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांची युद्धविरोधी मोहीम जोरात होती.रॅफसारखा मीही अशा सगळ्या वादविवादांत रंगून गेलो.नंतर जन्मभर भारतात निसर्गरक्षण आणि आर्थिक विकास यांच्या संघर्षातून तोड कशी काढावी या समस्येशी झगडत राहिलो.म्हणून नंदा खरेंनी,'तू या अँटहिलच्या अनुवादाला दीर्घ प्रस्तावना लिही' म्हटल्यावर खूप खुललो.
इलियड
अँटहिल पुस्तकाची सुरुवात होते होमरच्या इलियडमधल्या एका अवतरणाने ! जन्मल्यापासून मरेपर्यंत एकमेकांना रक्तबंबाळ करत मानवाची यातनामय जीवनगाथा उलगडत राहावी ही तर ईश्वरेच्छा आहे.जीवन म्हणजे एक संघर्ष आहे,बळी तो कान पिळी हा तर जगाचा नैसर्गिक न्याय आहे,उत्क्रान्तीचा परिपाक आहे,अशी एक विचारधारा आहे.ह्याला म्हणतात सामाजिक डार्विनवाद.जगात आज अग्रगण्य समजले जाणारे उत्क्रान्तिशास्त्रज्ञ विल्सन ह्याच विचारधारेचे पुरस्कर्ते आहेत.कट्टर उजव्या पंथाच्या राजकीय नेत्यांशी त्यांची दोस्ती आहे.विल्सनच्या बुद्धीचा फेरा चौफेर चालतो.त्यांनी उत्क्रांतिशास्त्र,सामाजिक शास्त्रे आणि धर्म ह्यांच्या परस्परसंबंधांवरचे एक पुस्तक लिहिले आहे.पण त्या पुस्तकातल्या विवेचनातला धर्म म्हणजे केवळ येशू ख्रिस्ताचा धर्म.मी त्यांना म्हटले,अहो ह्यात तुम्ही मांडलेल्या अनेक संकल्पनांचा गौतम बुद्धाने खोलवर विचार केला आहे,त्यावर मांडणी केली आहे. तुम्हाला कशी कल्पना नाही? ते म्हणाले.खरे आहे मी धर्माबद्दल खूप लिहिले पण मला माझ्या ईसाई धर्माखेरीज कशाचीही जाण नाही. जीवनात जबरदस्त संघर्ष आहे तसाच सहकारही.आजपावतो उत्क्रांती शास्त्रातले बहुतांश प्रतिपादक एकांगी,रात्रंदिन जीवांना युद्धाचा प्रसंग,अशा संघर्षाच्या भूमीवर भर देऊन सहकाराकडे दुर्लक्ष होत आले आहे पण उत्क्रांती वादाच्या प्रमुख उद्गात्याचा चार्ल्स डार्विनचा दृष्टिकोन असा संकुचित नव्हता.त्याने जीवसृष्टीतला संघर्ष कसा उद्भवतो ह्याचे सुस्पष्ट निरुपण केले.पण ह्याबरोबरच डार्विनला जीवसृष्टीत सहकार्य आहे,परोपकारही आहे, आणि त्याचा मुलस्तोत्र काय आहे हे कोडे सोडवणे अत्यावश्यक आहे हेही जाणवत होते.म्हणूनच तो आवर्जून म्हणतो की,मुंग्या,मधमाशांच्या संघातल्या श्रमिकांच्या परोपकारी जीवनशैलीचा उलडडा करणे हे उत्क्रांतीशास्त्रापुढचे एक महत्त्वाचे आव्हान आहे.
निसर्ग निवड
डार्विनने उत्क्रान्तीला दिशा देणाऱ्या,गती देणाऱ्या प्रक्रियेचा उलगडा करून दाखवला.ही आहे निसर्ग निवडीची - natural selection ची प्रक्रिया.ही प्रक्रिया कुठे कुठे अपेक्षित आहे ? जिथे जिथे पुनरुत्पादन असते व त्यातून ज्या नव्या आवृत्त्या,नकला,प्रती बनतात त्या बहुतांश मुळासारख्याच असल्या तरी अधूनमधून त्यांच्यात थोडे फार तरी बदल घडत असतात आणि मग अशा बदललेल्या प्रतींच्यात जी वेगळी गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात,त्यांचा त्या प्रती तगण्यावर,फळण्यावर परिणाम होऊ शकतो,तिथे तिथे. थोडक्यात म्हणजे प्रजनन,आनुवंशिकता आणि अखंड वैविध्यनिर्मिती ह्यांच्या त्रिवेणी संगमातून निसर्गात अहोरात्र निवडीची प्रक्रिया चालू राहते,आणि त्या प्रक्रियेतून एक अफाट वैविध्याने नटलेली सृष्टी उभारली जाते.ही सृष्टी त्रिविध आहे : प्रथम अस्तित्वात आलेली जीवसृष्टी आणि तिच्या जोडीलाच क्रमाने अवतरलेली मानवनिर्मित कल्पसृष्टी व कृत्रिम वस्तुसृष्टी.सगळ्या कल्पसृष्टीच्या मुळाशी असलेल्या शब्दांचाच विचार करा.मुले आईच्या शब्दांच्या नकला करतात,त्यांना नवे आयुष्य देतात,वापरता वापरता शब्दांत बदल होत राहतात,आज चलती असलेले भारनियंत्रणासारखे शब्द फोफावतात,तर तोच अर्थ अधिक स्पष्ट करून सांगणारे वीजकपातीसारखे शब्द लयाला जातात.
Satericha Wada Zala Chirebandi | Madhav Gadgil,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी। माधव गाडगीळ Varul Puran | E. O. Willson.Sankshipta Anuwad: Nanda Khare
वारूळ पुराण । ई. ओ. विल्सन
संक्षिप्त अनुवाद । नंदा खरे
प्रकाशक । अरविंद घनःश्याम पाटकर,
जीवसृष्टीसारखी शब्दसृष्टीही सतत नवनवी रूपे घेत वाढत राहते.तसेच कृत्रिम वस्तूंचे.मोबाईल फोनांच्या प्रती सारख्या बनवल्या जातात,त्यांच्यात सारखे बदल होत राहतात,वस्तुसृष्टीही सतत नवनवी रूपे घेत वाढत राहते.जीवसृष्टी,कल्पसृष्टी आणि वस्तुसृष्टी ह्या त्रिविध सृष्टींचे वेगवेगळे आविष्कार आपले विश्व घडवत राहतात.अँटहिल कादंबरीत ह्या तीन विश्वांचा खेळ डोळ्यासमोर आणला आहे.
राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…!