* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: July 2026

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/1/26

सोन्याचा पिंपळ / Golden Peepal

वटवृक्षाप्रमाणं पिंपळाचं झाडही विशाल असतं.मात्र वडाप्रमाणं या वृक्षाला पारंब्या नसतात.त्यामुळं पिंपळाचा विस्तार कमी असतो.परंतु विस्ताराची भरपाई पिंपळानं उंचीत भरून काढली आहे.वडाखाली असतो,तसा दाटपणा आणि अंधार पिंपळाखाली नसतो.

काक विष्ठेचे झाले पिंपळ ।

म्हणून कावळे उंचावर बसून जिथं जिथं विष्ठा टाकतात, तिथं तिथं पिंपळाची लहान रोपं वाढताना दिसतात.ही रोपं इमारती आणि मंदिरं यांच्या भिंतींच्या फटींतून वाढतात.

जंगलात फिरताना तुम्हाला पिंपळाची रोपं झाडांवर बांध्यांप्रमाणं वाढलेली दिसतील.पुढं या रोपाची वाढ होताना दोरीसारख्या मुळ्या साऱ्या झाडाला घट्ट आवळून टाकतात.

पिंपळाची पानं दिसायला मोठी सुंदर असतात.पानांकडं पाहिल्यावर वाटतं,एखादा बांधेसूद पुरुष साकार होतोय. पानाच्या दोन्ही किनारी बाहेरच्या दोन्ही बाजूंना आडव्या जातात (खांदे).नंतर आतल्या बाजूला घेऊन शेवटीएका टोकापाशी येऊन मिटतात (कंबर).जणू लहान, नाजूक कटीवरचं एखादं रुंद चौकोनी धडच.पानांचे देठ लांब असल्यामुळे ती लोंबताना दिसतात.

थोडीशी जरी वाऱ्याची झुळूक आली,तरी ती सळसळू लागतात. म्हणून संस्कृतात पिंपळाला चलदल म्हटलं आहे.

मार्च महिन्यात त्याची पानगळ सुरू होते.एक-एक पान गळायला लागतं.संत कबीर जिथं मागावर विणायला बसायचा,तिथल्या समोरच्या खिडकीतून एखाद्या राईतील पिंपळाचं झाड दिसत असावं.वर्षानुवर्ष त्यानं त्या झाडाची पानगळ होताना पाहिली असणार ! त्या निरीक्षणातूनच त्याचं काव्य बाहेर आलं असावं.

पान पडत यो कहै सुनि तरुवर ! बणराई! 

अबके बिछुरे ना मिले,दूर पडेंगे जाई 

रुखडा बोले पानसे,सुन पत्ते । मेरी बात

 इस घर की यह रीति है;इक आवत इक जात !!

नंतर पिंपळाला तांबूस कोवळी पानं फुटू लागतात.याच वेळी झाडाच्या डहाळ्या पिकल्या पिंपरांनी लवून जातात.हरोळ्या,तांबट,हरिद्र,धनेश,पोपट,बुलबुल असे किती तरी पक्षी फळं खाण्यासाठी झाडावर येतात. परंतु सर्वाधिक आनंद होत असेल, तर तो पळस मैनांना. त्या थव्याथव्यांनी पिंपळावर उतरतात अन् पिंपरं आवडीनं खातात. 

एक कळप गेला,की दुसरा येतो.हळूहळू कोवळी पानं वाढत वाढत पिवळसर दिसू लागतात.हळूहळू त्यांवर सोनेरी झाक येऊ लागते.

एका चैत्री पुनवेला मी मेळघाटातल्या वनविश्रामगृहात थांबलो होतो.जिकडंतिकडं चंद्राचा रुपेरी प्रकाश पडला होता.मी व्हरांड्यात वेताच्या खुर्चीवर बसून समोरच्या पिंपळाकडं पाहात होतो.पिंपळाच्या पानापानांवर चांदण्यात सुवर्णदीपांची कांती चमकत होती.मी त्या दृश्याकडं ध्यानमग्न होऊन पाहात होतो.

प्रभात समयी पिंपळामागून उगवणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या पानांना सोन्याच्या रूपात बदलून टाकलं. ्तेव्हा मला संत तुकारामांच्या

'जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ'

या अभंगाचा प्रत्यय आला.

जंगलात पक्षिनिरीक्षण करताना वाऱ्याची झुळूक नसली,तरी पिंपळाची पानं सारखी सळसळत असतात. जणू मी उन्हातून जंगलात फिरत असताना माझं लक्ष वेधून मला सावलीत येण्यासाठी ती पालवीत असत. तिथल्या वातावरणात थंडगार वायुलहरी पसरत. दुपारच्या वेळी झाडाखाली उताणा पडून मी निळ्या आभाळाकडं पाहात राही.त्या वेळी मला आकाशाचं आगळंवेगळं सौंदर्य जाणवे.सळसळत्या पानांचं अंगाईगीत ऐकत-ऐकत मला केव्हा डोळा लागे,हे कळत नसे.पावसाच्या थेंबांच्या आवाजानं मी जागा होऊन वर बघतो,तो पिंपळाच्या लांबसडक,

पातळ डहाळ्या सारख्या एकमेकांवर आदळून हा आवाज निर्माण झालेला असे.

जपान देशात छान प्रथा आहे,नवीन वर्षाच्या सुरुवातीला बुद्ध मंदिरातील घंटेचा आवाज ऐकायला जायचं.प्रत्येक मंदिरातील घंटेचा नाद व लय वेगळी.तसंच मला सर्व ऋतूंत पिंपळपानाची साद ऐकण्याचं आकर्षण आहे.

मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात कधी पुनरावृत्ती नसते.देवळासमोरच्या पिंपळाचा घोषनाद एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा वाटतो.पिंपळाची सळसळणारी पानं वातावरणात एक प्रकारची नादमाधुरी ओतीत असतात.नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते. सागरकिनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यांतला कुठला आवाज गूढ आहे,हे सांगता येत नाही.घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगाई गीताप्रमाणं वाटते.

पिंपळ जसा पाखरांना अन्न देतो,तसा घरट्यासाठी आसराही देतो.पावसाळ्यात पिंपळाच्या झाडावर बगळे, ढोकरी,

पाणकावळे समूहानं घरटी बांधून पिलांना जन्म देतात.या सारंगागारांप्रमाणे काकागारंदेखील गावातल्या पिंपळावरच असतात.नागझिराजवळच्या मंगेझरी गावातील विशाल पिंपळावर मोरकुंचाची दोन-तीन घरटी असायची.ब्रह्मा,विष्णु आणि महेश या तीन देवांचा या वृक्षाशी संबंध,म्हणून हे झाड पूज्य मानलं जातं. भगवद्‌गीतेमध्ये विभूतियोगामध्ये 'वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे,असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे.

श्रीकृष्ण आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात याच वृक्षाच्या सावलीत ध्यानाला बसला असता,त्याचे पाय हरणाच्या मुखासारखे वाटल्यामुळं पारध्यानं तिथं बाण मारला.त्यामुळं श्रीकृष्णाचा त्यात अंत झाला.

राजकुमार सिद्धार्थ या वृक्षाखाली बसून साधना करीत असता त्याला साक्षात्कार झाला.तेव्हापासून तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला.पिंपळाचं झाड बोधिवृक्ष म्हणून संबोधलं जाऊ लागलं.ही घटना इ.स. पूर्व २८८ मधील आहे.

जातककथा,बुद्धाच्या पूर्वजन्माच्या दंतकथा आणि बौद्धकालीन शिल्पं यांत अनेक बोधिवृक्षांचा उल्लेख असल्याचं पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.पिंपळ हा शाक्य मुनींचा,वटवृक्ष हा काश्यप मुनींचा,औदुंबर हा कनक मुनींचा,शिरीष वृक्ष हा क्रकुच्छंदांचा,शालवृक्ष हा विश्वबाहूचा,असे बोधिवृक्षांचे उल्लेख आढळून येतात.

राजकुमार सिद्धार्थ याला झालेल्या साक्षात्काराविषयी बरंच संशोधन झालं आहे.लिअल वॅटसन (Lyall Wastson) आपल्या 'द बायॉलॉजी ऑफ डेथ' या ग्रंथात लिहितो :

'Until about fifteen years ago, our pineal was thought to be a useless vestigial appendage, something left over from reptilian times. Then in 1959, Aaron Lerner of Yale University discovered that it produced a harmone which is called melatonin, and the pineal changed its image from degenerate body to renascent gland. Interest in pineal revived and a year later it became clear that melatonin was manufactured from serotonin, a very strange substance that occurs in the most unlikely places. It is found in dates and bananas and plums, but now where it is more common than in a species of wild figs that grow in tropics into huge sprawling trees with hanging roots that prop their branches up in beautiful shady colonnades. In Africa these banyan trees are sacred to many people and are very seldom cut. In India they are known as bo, and it is said that it was beneath one of these trees that the prince Siddharth Gautma sat (eating the figs?) when he suddenly understood the causes of human suffering. It was this enlightenment that led to his being called the Buddha.'

सुमारे पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत,आपली पीनियल ग्रंथी ही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काळातील एक निरुपयोगी अवशेष मानली जात होती.मग १९५९ मध्ये,येल विद्यापीठातील ॲरॉन लर्नर यांनी शोध लावला की ही ग्रंथी मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन तयार करते,

आणि त्यामुळे पीनियल ग्रंथीची प्रतिमा एका क्षीण झालेल्या अवयवावरून बदलून एका पुनरुज्जीवित ग्रंथीमध्ये रूपांतरित झाली.पीनियल ग्रंथीबद्दलची उत्सुकता पुन्हा जागृत झाली आणि एका वर्षानंतर हे स्पष्ट झाले की मेलाटोनिन हे सेरोटोनिनपासून तयार होते,जो एक अत्यंत विचित्र पदार्थ आहे आणि तो अगदी अनपेक्षित ठिकाणी आढळतो.तो खजूर,केळी आणि आलुबुखार यांसारख्या फळांमध्ये आढळतो,पण तो उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढणाऱ्या जंगली अंजिरांच्या एका प्रजातीपेक्षा अधिक सामान्य कुठे आहे हे सांगता येत नाही.ही झाडे प्रचंड पसरट होतात आणि त्यांची लोंबणारी मुळे त्यांच्या फांद्यांना सुंदर,सावलीच्या स्तंभांप्रमाणे आधार देतात.आफ्रिकेत ही वडाची झाडे अनेक लोकांसाठी पवित्र आहेत आणि ती क्वचितच तोडली जातात. भारतात त्यांना 'बो' या नावाने ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की राजकुमार सिद्धार्थ गौतम याच झाडांपैकी एकाखाली बसले होते (अंजीर खात असताना?) तेव्हा त्यांना मानवी दुःखाची कारणे अचानक समजली.याच ज्ञानप्राप्तीमुळे त्यांना 'बुद्ध' म्हटले जाऊ लागले.(मुळ पुस्तकात फक्त इंग्रजी उतारा आहे.गुगल भाषांतर वापरुन त्याचा हा अनुवाद आहे.)

हिंदू लोक पिंपळाला विशेष पवित्र मानतात.वैदिक काळात पिंपळाच्या लाकडाच्या घर्षणानं अग्नी तयारी करीत.

बोधिद्रुम,चलदल,पिप्पल,कुञ्जाशन व अश्वत्थ असे पिंपळ वृक्षासाठी अमरकोशात पर्यायी शब्द दिले आहेत.

बोधिद्रुमश चलदलःपिप्पलःकुञ्जराशनः अश्वत्थे ॥

वरील शब्दांचं अनुकरण करून 

'अभिधान चिंतामणी' कोशात श्रीवृक्ष व कृष्णावास अशा पर्यायी शब्दांची नोंद केली आहे.पिंपळाची पानं हे.हत्तीचं अतिशय आवडतं खाद्य आहे.म्हणूनच पिंपळाला कुञ्जराशन म्हटलं आहे.हत्तींचं पालन करणाऱ्या हिंदूंनी मुसलमान अथवा परधर्मीय माहूत ठेवून हत्तींना पिंपळपानाचा चारा देण्याची समस्या सोडवली आहे। 

अश्वत्थ म्हणजे ज्याच्याकडं घोडे आहेत,अशा अर्थाचा पर्यायी शब्द आहे.हत्ती आणि घोडे हे प्राचीन काळात अमूल्य धन समजलं जाई.प्राण्यांचा उपयोग प्रवासासाठी,तसाच युद्धातही केला जाई.हत्तीचं आरोग्य चांगलं राहावं, म्हणून पिंपळपानाचा चारा देत,तर पिंपळ वृक्षाखाली हवा निरोगी राहाते,म्हणून घोडे बांधीत असत. 

विष्णुपुराणात पिंपळ वृक्षाचा मोठा मार्मिक उल्लेख आला आहे ज्याप्रमाणे विशाल पिंपळ वृक्ष एका सूक्ष्म बीजात सामावलेला असतो,त्याप्रमाणे संपूर्ण विश्व एका ब्रह्माच्या ठायी सामावलेलं आहे.

गुरुचरित्रात पिंपळ वृक्षाचा कल्पवृक्ष असा उल्लेख करून 

'कल्पवृक्ष असे अश्वत्थ। कल्पिले फळ त्वरित होय।'

असा त्याचा सविस्तर महिमा सांगितला आहे.

असा पिंपळ वृक्ष लोकसाहित्यात न आला तरच आश्चर्य, श्रीमती दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या 'लोकसाहित्याची रूपरेखा' या ग्रंथात सोन्याच्या पिंपळाविषयी सुंदर लोककथा दिली आहे :

'एका राजाला स्वप्नात सोन्याचं झाड दिसतं.त्याला रुप्याचं खोड असतं.सोन्याच्या फांद्या असतात. हिऱ्यामाणकांची फुलं आणि मोत्यांचे घोस असतात. - त्याच्या नावडत्या राणीचा मुलगा ते झाड प्रत्यक्षात शोधायला निघतो.तळ्याखालच्या राक्षसाच्या चार मुली सोनावंती,रूपावंती,हिरावंती,मोतावंती या नायकाला भेटतात.

राक्षसाला तो मारतो आणि मग त्या मुली स्वतःची शिरं त्या नायकाला तोडायला सांगतात.त्या चार मुलींचं मिळून ते झाड होतं.फिरून शिरं धडाला लावली, की झाड अदृश्य होतं व मुली परत जिवंत होतात.'

ही कथा 'सोन्याचा पिंपळ' म्हणून प्रसिद्ध आहे.

'मकुज्जिय कनसुगळु' (मुक्या आजीची स्वप्नं) ही डॉ. शिवराम कारंथांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेली कादंबरी.या कादंबरीला कथानक नाही.कथानायक नाही,कथानायिका आहे.मुकज्जी म्हणजे मुकी आजी. तिचा बालपणीच विवाह झाला होता.ती लवकरच विधवा झाली.ऐन तारुण्यात तिच्या मनाला धक्का देणारी एक घटना घडते आणि तिच्या मनाचा तोल जातो.

लोकांना वाटतं,मुकज्जीला भूतबाधा झालेली आहे.अंगातून भूत काढून टाकण्यासाठी तिला खूप मारहाण करतात.मुकज्जीला असं वाटतं,की आपण बोललो,की मार बसणार!अनेक वर्षं ती कुणाशीही एक शब्दही बोलत नाही.तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो.ती स्वतःशीच चिंतन-मनन करू लागते.अस्वस्थ झालेलं मन शांत होतं.तिला जणू आत्मज्ञान होतं.हे आत्मज्ञान तिला घरासमोरच्या पिंपळ वृक्षाखाली होतं. या ऐंशी वर्षांच्या वृद्धेला अर्तीद्रिय शक्ती प्राप्त झालेली असते.तिचा पुतण्या मानववंशशास्त्रज्ञ आहे. 

मुकज्जीवर त्याची खूप श्रद्धा असते.तो साऱ्या जंगलात भटकंती करून ठिकठिकाणांहून मृत माणसांच्या कवट्या गोळा करून घरी आणतो.त्या कवट्यांची मोजमापं घेऊन तो संशोधन करीत असतो.

या संशोधनात मुकुज्जीचं फार मोठं साहाय्य होतं.प्रथम ती पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नंतर कवटीला स्पर्श करते. हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा भूतकालीन इतिहास ती तिच्याजवळ असलेल्या अतींद्रिय ज्ञानाच्या साहाय्यानं सांगते.

मौनव्रत ही एक प्रकारची योगसिद्धी आहे. पिंपळस्पर्शानं तिला अतींद्रिय ज्ञान प्राप्त झालं आहे.पूर्वी प्रत्येक खेड्यात वडा-पिंपळाची झाडं लावीत. त्यांच्यापासून सावली तर मिळेच,परंतु त्या झाडांमुळं पिकांचं पाखरं आणि वानर-माकडं यांपासून होणारं नुकसान टळे.जेव्हा वड-पिंपळ फळांनी बहरून जातात, तेव्हा पाखरं,वानर-माकडं यांना त्यांचं भरपूर खाद्य मिळतं.

श्रीलंका येथील एका पिंपळ वृक्षाचं वय २१४७ वर्षांचं आहे असं म्हणतात.पिंपळाची झाडं लावणं आणि त्यांच्याभोवती पार बांधणं हे धार्मिक कृत्य समजलं जाई.रामदास स्वामींनी म्हटलं आहे:

'वृंदावने पार पिंपळा बांधी तो सत्त्वत्गुण।'

पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार,केंद्र, सीताबर्डी,नागपूर

पिंपळाच्या झाडाची उपयुक्तता,पर्यावरणाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व,धार्मिक भावनेतून पिंपळाला मिळणारं संरक्षण यांचा विचार करून टाटांनी त्यांच्या शिक्षण संस्था,कारखान्यांचे परिसर व लोणावळ्याजवळ शिरवते पक्षी अभयारण्यात पिंपळाची झाडं लावली आहेत. टाटांचं अनुकरण सर्व देशभरात झालं पाहिजे.

समाप्त..