* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/५/२३

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन.. ' समाजसुरक्षा '

बागकाम करणाऱ्या माळ्यांकडून मला अनेक वेळा विचारणा होते की,आमची झाडं फार जवळजवळ तर लावली गेली नाहीत ना? ते एकमेकांचा सूर्यप्रकाश किंवा पाणी तर हिसकावून घेणार नाहीत ना?व्यावसायिक वनीकरण करणाऱ्यांच्या दृष्टीने ही शंका रास्त आहे.कारण झाडाचा घेर झटपट वाढवून लाकूड तयार होण्यासाठी त्यांची खटपट चालू असते. पानं छान गोलाकारात पसरली की झाडांची वाढ लवकर होते खरी,पण त्यासाठी ऐसपैस जागा लागते.लागवडीची झाडं सुमारे पाच वर्षात काढली जातात.त्यांची वाढ लवकर व्हावी यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या वनस्पती छाटून टाकल्या जातात आणि आपल्या झाडांना मुक्तपणे वाढवू दिलं जातं.व्यावसायिक लागवडीत झाडं फार काळ नसतात कारण लाकडासाठी त्यांची कत्तल होणार असते.त्यामुळे या पद्धतीच्या व्यवस्थापनाची वैगुण्यं कधीच जाणवतच नाही.


पण यात कसली वैगुण्यं आली? हे योग्यच आहे ना की,

स्पर्धा करणारी झाडे जर आजूबाजूला वाढत नसतील तर अधिक सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी मिळाल्यामुळे लागवडीच्या झाडांची झपाट्याने वाढ होईलच.हो,हे भिन्न प्रजातीच्या झाडांबाबत बरोबर आहे.भिन्न प्रजातीच्या झाडांत जीवनावश्यक संसाधनांसाठी एकमेकांत चढाओढ चालू असतेच,पण एकाच प्रजातीच्या झाडांमध्ये तसं होत नाही.आपण आधीच्या प्रकरणात पाहिलं की,


बीच झाडांमध्ये मैत्री केली जाते आणि एकमेकांना पोषणद्रव्यं पुरवली जातात.कारण जंगलातील कमकुवत सभासदांना गमावून सर्वांनाच तोटा होत असतो. एखादा सभासद वठला तर जंगलाच्या आच्छादनात खिंडार पडून परिसंस्थेच्या सूक्ष्म हवामानाचे संतुलन बिघडते.ही अडचण नसती तर कदाचित प्रत्येकच झाड स्वैरपणे वाढलं असतं.मी 'कदाचित' असं म्हटलं,कारण बीच झाडांमध्ये संसाधनांचा मिळून उपभोग घेण्यात फायदे आहेत.


आर.डब्ल्यू.टी.एच.आकेनमध्ये असलेल्या इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंटल रिसर्चच्या काही विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या बीच वृक्षांच्या जंगलात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषणात एक चमत्कारिक गोष्ट आढळून आली.त्यांना असं दिसलं की अशा जंगलातील झाडं एकमेकांशी ताळमेळ बसवत आपलं कार्य करत असतात, ज्यामुळे सर्वांचं प्रकाश संश्लेषण यशस्वी होतं. पण हे तर आपल्या अपेक्षेविरुद्ध आहे,कारण प्रत्येक बीचचं झाड भिन्न परिस्थितीत वाढत असतं.काही जास्त खडकाळ भागात असतात तर काहींना अधिक पाणी मिळतं.काहींच्या मातीत पोषणद्रव्यं मुबलक असतात तर काही अगदी उघड्या जमिनीवर वाढत असतात. त्यामुळे प्रत्येक झाडाची वाढ कमी जास्त होते. काही ठिकाणी पोषणद्रव्यं भरपूर असतात तर काही अगदीच ओसाड या कारणामुळे प्रत्येक झाडाचं प्रकाश संश्लेषण वेगळ्या प्रमाणात होत आहे,असं वाटणं साहजिकच आहे.


आणि म्हणूनच ह्या विद्यार्थ्यांचा बीच जंगलातला अनुभव आश्चर्यकारकच आहे.


बीच जंगलातल्या प्रत्येक झाडाच्या प्रकाश संश्लेषणाचा दर एकच असतो.


विद्यार्थ्यांना असं जाणवलं की जंगलांमधल्या सबळ आणि दुर्बल घटकांच्या प्रकाश संश्लेषण क्षमतेत समतोल साधला जात आहे.आपला घेर कितीही असला तरी एका प्रजातीच्या प्रत्येक झाडाचं प्रत्येक पान प्रकाशाचा वापर करून तेवढ्याच प्रमाणात साखर बनवतं,जेवढी साखर इतर पानं बनवतात. हा समतोल त्यांच्या मुळातून साधला जात होता. अर्थातच जमिनीखाली या झाडांची देवाणघेवाण आनंदाने चालू होती.ज्याच्याकडे जास्त साखर तयार होते. 


तो कमी उत्पादन करणाऱ्या सभासदाला हातभार लावत होता.आणि या विनिमयात त्या बीच वृक्षांना पुन्हा एकदा बुरशींची मदत मिळत होती.आपल्या प्रचंड जाळ्याचा वापर करून ते या वितरण व्यवस्थेत सामील होत होते. काही देशात सोशल सिक्युरिटी म्हणजे सरकारी सामाजिक सुरक्षा प्रक्रिया असते.

यामध्ये समाजात कोणी मागे पडू नये.याची काळजी घेतली जाते.बीचच्या या जंगलात असंच काहीसं चालू होतं. 


अशा प्रणालीमध्ये झाडांना एकमेकांपासून फार दूर राहता येत नाही.किंबहुना,आपल्या बांधवांबरोबर अगदी खेटून उभं राहणं त्यांना जास्त पसंत असतं.

अशामुळे वाढ झालेल्या जंगलात त्यांची खोडं एकमेकांपासून जेमतेम तीन फुटाच्या अंतरावर असतात आणि पालवीचा घेरही कमी असतो. 


व्यावसायिक वनीकरण करणाऱ्यांच्या मते झाडाच्या वाढीसाठी ही योग्य परिस्थिती नाही आणि मधली झाडं कापून टाकून वाढीसाठी जागा केली पाहिजे.परंतु 


जर्मनीतील लूबेक मधील माझ्या काही सहकाऱ्यांच्या अभ्यासात असे आढळलं की,दाटीवाटीने वाढलेल्या बीच जंगलात उत्पादकता अधिक असते आणि वर्षाभरात जंगलातून लाकडाव्यतिरिक्त इतर जैविक मालात वाढ झाली तर ते निरोगी जंगल परिसंस्थेचं लक्षण समजलं जातं. 


सहकार्याने जेव्हा झाडं एकत्र वाढतात तेव्हा पोषणद्रव्यं आणि पाण्याचं योग्य वितरण होऊ शकतं आणि प्रत्येक झाडाला आपल्या क्षमतेनुसार वाढता येतं.पण जेव्हा आपण एका झाडाला मदत म्हणून त्याच्या तथाकथित 'स्पर्धकांना' काढून टाकतो.तेव्हा इतर झाडं 


एकटी पडतात.मग आपल्या शेजाऱ्याला एखादा संदेश पाठवला तर तो वाया जातो,कारण शेजारी फक्त खुंट उरलेले असतात.


अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला स्वतःच्या जोरावर जगावं लागतं आणि त्या वेळेस प्रत्येकाची जैविक उत्पादकता वेगवेगळी होते. काही झाडं मोठ्या जोमाने साखरेचं उत्पादन करतात आणि धष्टपुष्ट बनतात.पण याचा अर्थ ते दीर्घायुषी होतात असं नव्हे,कारण एका झाडाचं आरोग्य जंगलाच्या आरोग्यापेक्षा फार काही वेगळं नसतं.या परिस्थितीत जंगलात अनेक झाडं अपयशी ठरू शकतात.ज्या अशक्त झाडांना इतरांकडून मदत मिळू शकली असती ते आता मागे पडत जातात.

प्रतिकूल जागेमुळे असो,पोषणाअभावी असो,तात्पुरती कमजोरी असो किंवा जनुकीय रचना कमकुवत असो; कारण कोणतंही असलं तरी अशी झाडं कीटक आणि बुरशींच्या आहारी जाऊ लागतात.


आता तुम्ही विचाराल की उत्क्रांती अशीच चालते ना? परिस्थितीला लायक असतील तेच टिकतील,असंच असतं ना? या वाक्यावर झाडं आक्षेप घेतील.त्यांचं कल्याण त्यांच्या समूहावर अवलंबून असतं.जेव्हा दुर्बल सदस्य नाहीसे होतात तेव्हा त्यांच्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.प्रखर सूर्यप्रकाश आणि वादळी वारे आत शिरून अनुकूल हवामानाचं संतुलन बिघडवतात आणि सुदृढ सभासदही कमकुवत होऊ लागतात.त्या वेळेस त्यांच्या शेजारी मदतीला कोणी नसतो आणि कीटकांच्या हल्ल्यासमोर भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही.


पूर्वी मीसुद्धा झाडांना अशा प्रकारची 'मदत' करायचो.

माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाडांची दाटी कमी करण्यासाठी काही झाडांना मी 'गर्डलिंग' करायचो.


या प्रक्रियेत झाडाच्या बुंध्याचं तीन फूट रुंदीचे साल काढून टाकलं जातं.काही वर्षांतच ते झाड मरून जातं.त्याची पालवी जाते आणि जमिनीत फक्त निर्जीव लाकडाचं खोड उभं असतं.असं केल्याने इतर झाडांना अधिक सूर्यप्रकाश पोहोचतो. 


लागवडीच्या व्यवस्थापनाची ही पद्धत तुम्हाला जरा क्रूर वाटते का? मला तर नक्कीच वाटते, कारण या पद्धतीत मरण संथपणे येतं.त्यामुळे मी भविष्यात कधीच 'गर्डलिंग'चा वापर जंगलाच्या व्यवस्थापनात करणार नाही.तेव्हाही मला हे जाणवलं होतं की,गर्डलिंग केलेल्या बीच वृक्षांनी जगण्यासाठी खूप धडपड केली आणि आश्चर्य म्हणजे त्यातले काही आजपर्यंत तग धरून आहेत.


खरंतर एकदा साल काढून टाकलं तर झाड जगू शकत नाही कारण पानातून तयार झालेली साखर मुळापर्यंत पोहोचू शकत नाही.मुळांची उपासमार होते आणि ते पाणी पम्पिंगची प्रक्रिया बंद करू लागतात. 


अशा वेळेस जमिनीतलं पाणी झाडाच्या वरच्या भागाला पोहोचू शकत नाही आणि हळूहळू झाड वठायला लागतं.पण मी गर्डलिंग केलेली काही झाडं थोड्याफार प्रमाणात वाढत होती.आज मला कळतंय की त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मदत मिळत होती.जमिनीखालच्या जाळ्यामुळे शेजाऱ्यांना गर्डलिंग केलेल्या झाडाच्या मुळाला साखर पुरवठा करता येत होता आणि ते जिवंत राहू शकत होतं.काही झाडांनी आपलं गेलेलं सालही वाढवायला सुरुवात केली.मला नक्कीच आज या कृत्याची लाज वाटत आहे.यातून मला एक शिकायला मिळालं ते म्हणजे जंगल परिसंस्थेत झाडाचं सामूहिक सहजीवन किती शक्तिशाली असतं ते! एक प्रचलित म्हण आहे, 


'कोणत्याही साखळीची ताकद त्याच्या सर्वांत कमकुवत सभासदाइतकीच असते.'कोण जाणे, कदाचित झाडांनीच ही म्हण आपल्याला दिली असेल. 


आणि स्वाभाविकपणे त्यांना हे कळतं त्यामुळे आपल्या स्वकीयांना मदत करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

१५ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग..

८/५/२३

वर्क्स - ॲरिस्टॉटल - (१८३७)

" जेवढं जास्त कळत जातं,तेवढं आपल्याला काहीच कळलेलं नाही,हे कळतं."


'वर्क्स' या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिद्धान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत.

तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं,आत्मा,निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग,अशा अनेक गोष्टींबद्दल त्यानं आपली मतं या पुस्तकात मांडली होती.

'मानवाचं कल्याण करत असताना निसर्गाची तसूभरही हानी होता कामा नये.' 


असं त्याचं मत होतं.निसर्ग आणि प्राणिजात हे परस्परपूरक आहेत असं तो म्हणे.तत्त्वज्ञानावर आणि विश्वाच्या रहस्यांवर बोलणारा ॲरिस्टॉटल त्याच वेळी कविता आणि नाटक या विषयांवरही तितकाच समरस होऊन बोलत असे.


प्राचीन ग्रीसमधला,अभिजात काळातला ॲरिस्टॉटल हा एक प्रचंड प्रभावशाली तत्त्वज्ञ होऊन गेला.ॲरिस्टॉटलचा गुरू प्लेटो ॲरिस्टॉटला 'फादर ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी' म्हणायचा.ॲरिस्टॉटलनं जवळपास सर्वच विषयांमध्ये मुशाफिरी केली होती.भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र;वनस्पतीशास्त्र असो वा खगोलशास्त्र;तर्कशास्त्र असो वा सौंदर्यशास्त्र; कविता असोत वा नाटकं;संगीत असो वा वक्तृत्व;मानसशास्त्र असो वा भाषाशास्त्र; अर्थशास्त्र असो वा राज्यशास्त्र या सर्व विषयांतला त्याचा अभ्यास पाहून आजही बुद्धिवंत अवाक् होतात.आणि त्यावर चर्चा करतात.ऑरस्टॉटलनं त्या काळात (ख्रिस्तपूर्व ३८४) २५० प्रबंध लिहिले होते.त्यातले केवळ ३० प्रबंध आज उपलब्ध आहेत.त्याचे सगळे प्रबंध एकत्र करून त्यावर जो ग्रंथ तयार झाला त्यालाच 'वर्क्स' असं संबोधलं गेलं.ख्रिस्ती बुद्धिवाद्यांनी ऑरस्टॉटलचं काम जगासमोर आणलं.


"वर्क्स" या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिद्धान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत.

यामध्ये तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं,आत्मा,

निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरिता केलेला उपयोग,अशा अनेक गोष्टींबद्दल त्यानं आपली मतं मांडली होती.मानवाचं कल्याण करत असताना निसर्गाची तसूभरही हानी होता.कामा नये,असं त्याचं मत होतं.निसर्ग आणि प्रणित हे परस्परपूरक आहेत,असं तो म्हणे.


ऑरिस्टॉटलच्या विश्लेषणात्मक ज्ञानाचा प्रभाव त्या काळापासून संपूर्ण पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर पडला.

एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी ॲरिस्टॉटलनं तर्कशास्त्राचा वापर केला. तत्त्वज्ञानामध्ये त्यानं गणिताचा वापर करून सूत्रही तयार केली होती.मेटॅफिजिक्स हा शब्द पहिल्यांदा ॲरिस्टॉटलच्या सिद्धान्तातल्या गोष्टींसाठी वापरण्यात आला होता.मात्र ऑरिस्टॉटलन स्वतः मात्र या संकल्पनेसाठी फिलॉसॉफी हा शब्द वापरला.विज्ञान हे गणित आणि विज्ञान यांच्यापेक्षा वेगळं आहे.असे तो म्हणात असे.निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीच अस्तित्व हे निसर्गातल्या गोष्टींची हालचाल,त्यांची वाढ

आणि त्यातले बदल यावर अवलंबून असते असं अरिस्टॉटलचं म्हणणं होतं.तसचं सबस्टन्स हा शब्द देखील त्यांनच पहिल्यांदा वापरला.प्रत्येक गोष्ट ही सबस्टन्स म्हणजेच नैसर्गिक कणांनी बनलेली असते,असं तो म्हणत असे.लोकांचं ज्ञान है त्यांच्या ज्ञानग्रहण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं,असंही तो म्हणायचा.इथेही ॲरिस्टॉटलचं म्हणणं आणि प्लेटोचं म्हणणं यात फरक होता.प्लेटोचं तत्त्वज्ञान हे कल्पनेवर (आयडियाज) अवलंबून असायचं,तर ॲरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठ आणि प्रायोगिक गोष्टींवर अवलंबून होतं.


प्रत्येक वस्तू,अगदी सजीवदेखील ठरावीक पदार्थांपासून बनलेले असतात,असं ॲरिस्टॉटल म्हणत असे.त्यांची क्षमता त्या पदार्थांवर अवलंबून असते.एखादी निर्जीव वस्तू किंवा पुतळा हादेखील ज्या कणांपासून बनला आहे त्या कणांमधल्या क्षमतेवर तो अवलंबून असतो,असं ॲरिस्टॉटलचं मत होतं. 


सजीवांमध्ये आत्मा आहे असं आपण मानलं पाहिजे आणि मानवजातीचं अस्तित्व हे तर्क संगत,शास्त्रशुद्ध आणि काही कारणांसाठी आहे,असंही तो म्हणे.

वनस्पतींमध्ये आत्मा कमी प्रमाणात असतो,तर प्राण्यांमध्ये तो जास्त प्रमाणात असतो,असं ॲरिस्टॉटल म्हणे.


प्राणिशास्त्रातलं ॲरिस्टॉटलचं योगदान अनमोल आहे.ऑक्टोपसपासून अनेक समुद्री प्राण्यांचं विच्छेदन करून ॲरिस्टॉटलनं आपल्या प्रयोगांची अचूक निरीक्षणं नोंदवली.कोंबडीच्या पिल्लांची एम्ब्रिऑलॉजिकल डेव्हलपमेंट त्यानं सविस्तरपणे मांडली.इतकंच नाही तर व्हेल्स आणि डॉल्फिन्स इतर माशांपेक्षा कसे वेगळे आहेत.याचीही मांडण ॲरिस्टॉटलनं केली होती. काही समुद्री जीव (अंडी घालणारे) आणि काही प्रत्यक्ष पिल्लांना जन्म घालणारे या विषयांवरची शेकडो निरीक्षणं ॲरिस्टॉटलनं आपल्या ग्रंथात नोंदवली होती.रक्त असलेले आणि रक्त नसलेले असे प्राण्यांचे त्यानं दोन गट केले होते.प्लॅन्ट ऍनिमल असाही एक गट त्यानं शोधला होता. सर्वसामान्य काही लक्षणं समान असलेल्या काही जाती एकत्र येतात आणि त्यांची प्रजाती बनते यालाच जेनेरा म्हणतात.हा जेनेरा शब्द पहिल्यांदा ॲरिस्टॉटलनं वापरला.या प्रजाती किंवा जेनेरा एकत्र येऊन एक फॅमिली बनते. 


ऑक्टोपसचे सगळे हात म्हणजे त्याचे प्रजननाचे अवयव आहेत,असंॲरिस्टॉटलनं म्हटल्यावर अनेकांनी त्याच्या या म्हणण्याला विरोध केला होता.अगदी १९ व्या शतकापर्यंत त्याचं हे विधान अमान्य करण्यात आलं होतं;पण प्रयोगांती ते पुढे खरं ठरलं!


ॲरिस्टॉटलचा आत्मविश्वास आणि निरीक्षण इतकं दांडगं होतं की अनेक गोष्टी तो त्यावरून ठामपणे सांगत असे आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसत असे.प्रत्यक्षात मात्र त्याचे तर्क गंमतशीर तर असतच,पण चुकीचेही असत. आपल्या हृदयात बुद्धी असते असं तो म्हणायचा. तसंच निसर्गातले पशु-पक्षी आणि वनस्पती यांच्यामध्ये एक शिडी असून शिडीच्या प्रत्येक पायरीवर कोणी ना कोणी असतं,मात्र मनुष्य हा एकमेव प्राणी शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर असल्याचं तो छातीठोकपणे सांगत असे.आज जरी अशी वाक्यं गमतीदार वाटत असली,तरी त्या काळात ॲरिस्टॉटल बोले आणि दल हाले अशी परिस्थिती होती.


भूशास्त्र (जिऑलॉजी) आणि हवामानशास्त्र (मीटिरीऑलॉजी) हे शब्दही ॲरिस्टॉटलनं व्यापक अर्थानं वापरले.जलचक्रांबद्दलची विस्तृत माहितीही त्यानंच शोधून काढली.पृथ्वीवरच समुद्रातलं गोड पाणी वाफेच्या रूपात ढगांमध्ये जमा होत आणि थंड होऊन पावसाच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर येतं,असं त्यानं लिहून ठेवलं.हाच सिद्धान्त आज आपण वॉटर सायकल किंवा जलचक्र म्हणून ओळखतो.


माती,वायू,पाणी, सूर्य या सगळ्यांमध्ये एक आकर्षण असतं,असंही ऑरिस्टॉटलचं म्हणणं होतं.भूकंप,

ज्वालामुखी,इंद्रधनुष्य,धूमकेतू,आकाशगंगा

सगळ्यांबद्दल त्यानं लिहिलं होतं.ॲरिस्टॉटलनं बनवलेलं पृथ्वीच्या इतिहासाचं मॉडेल आधुनिक विज्ञानाशी साम्य दाखवताना दिसतं.पृथ्वीवरचा भूभाग कायम बदलत असून त्यामुळे एखाद्या ठिकाणची आर्द्रता किंवा कोरडेपणाही त्याप्रमाणे बदलत असतो,असं तो म्हणे.या विश्वविज्ञानाच्या बाबतीत विश्वाला सुरुवात किंवा शेवट नाही, त्यात होणारे बदल आणि या बदलाचं चक्र हे अनंत काळ चालणारे असल्याचं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं.विश्व हे खूप मर्यादित स्वरूपाचं आहे.तसंच ते एकात एक असलेल्या आणि चमचमणाऱ्या इथरच्या दंडगोलांनी बनलेलं असून ते दंडगोल पारदर्शक असल्याचंही तो सांगत असे.नेमके यातले मोठे दंडगोल पृथ्वीभोवती फिरतात आणि या दंडगोलांमध्ये तारे असल्यामुळे तेही आपोआपच पृथ्वीभोवती फिरत असल्याचं ॲरिस्टॉटल म्हणत असे.या विश्वात एकूण ५५ दंडगोल असून ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत.या वेगवेगळ्या आकाराच्या दंडगोलांमध्ये पोकळी असून ती देखील इथरच्या वाफेने भरलेली आहे,अशा चित्रविचित्र गोष्टी तो ठामपणे सांगत असे.


ॲरिस्टॉटलचा दबदबा त्या काळी चर्चवरच नव्हे तर सर्वत्र होता.त्यामुळे त्याने म्हटलेलं कुठलंही वाक्य प्रमाण अशी समजूत त्या काळी होती.एखादा वजनाने जड असलेला दगड आणि एखादं वजनानं हलकं असलेलं पक्ष्याच पीस दोन्हीही उंच ठिकाणावरून खाली टाकले तर दगड हा पक्ष्याच्या पिसाच्या आधी खाली पडेल कारण जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा लवकर खाली पडते असं त्याचं मत होतं.काही लोक जेव्हा त्याच्या म्हणण्याची शहानिशा करून बघत, तेव्हा तसंच घडत असे.याचं कारण हवेच्या खालून असलेल्या दाबामुळे पक्ष्याचं पीस हे दगडापेक्षा किंचित उशिरा पडत असे आणि मग लोक ॲरिस्टॉटलची वाहवा करत,तोच कसा खरा असं म्हणून त्याची प्रशंसा करत. 


आपण काहीही सांगितलं तर लोक डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात त्यावर विश्वास ठेवतात.हे

ॲरिस्टॉटलला माहीत असल्यामुळे तो हास्यास्पद वाटतील अशा अनेक गोष्टी सांगत असे.


सजीव जसे वागतात तशाच निर्जिव वस्तूही वागताल असं त्याला वाटे आणि म्हणूनच सजीवांचे सगळे नियम तो निर्जिव वस्तूंनाही लावत असे.एखादी वस्तू वरून खालीच का पडते याचे उत्तर देताना,माणूस नाही का बाहेर गेला तरी काळी वेळाने पुन्हा आपल्या घरीच परत येतो,

त्याप्रमाणे वरून फेकलेली वस्तू खाली,म्हणजे तिच्या घराकडेच परतते असा त्याचा दावा होता.


केवळ तर्कावर मांडलेल्या ॲरिस्टॉटलच्या गोष्टींना पुढे जवळ जवळ १९०० वर्षांचा कालावधी गेल्यावर गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ आला.आणि त्याने प्रयोगाच्या साहाय्याने ॲरिस्टॉटलचं लोकांच्या मनावरचं गारूड आणि डोळ्यावरची झापड उतरवली.


ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणे माणूस आणि पृथ्वी हे विश्वाच्या केंद्रस्थानी होते.त्याचं हे मत चर्चलाही मान्य होतं.त्याच्या मताविरुद्ध कोणी बोललं तर त्याला कठोर शासन होत असे.ॲरिस्टॉटलचा रसायनशास्त्र या शाखेतलाही अभ्यास होता.त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पदार्थ हा चार नैसर्गिक तत्त्वांपासून बनलेला आहे.पृथ्वी,अग्नी,हवा आणि पाणी ही ती चार तत्त्वं.


हवेलासुद्धा वजन असतं,हाही सिद्धान्त त्यानं प्रथम मांडला.


ॲरिस्टॉटलन राज्यशास्त्र हा विषयही अभ्यासला.

'मनुष्य हा नैसर्गिकदृष्ट्या राजकीय प्राणी आहे,असं त्यानं म्हणून ठेवलंय.


कोणत्या प्रकारचं सरकार अस्तित्वात असायला हवं आणि ते कसं संतुलित ठेवता येईल यावरही त्यानं विस्तृत चर्चा केली आहे.लिहिताना त्यानं ग्रीक शब्दकोशाचा वापर केला आहे. लोकशाहीबद्दल ॲरिस्टॉटलनं केलेली चर्चा

आधुनिक राज्यशास्त्रासाठी दिशादर्शक आहे. 


ॲरिस्टॉटलच्या कामाचा आवाका इतका प्रचंड होता.

प्रत्येक विषयाचा त्यानं अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासातून त्यानं प्लेटोच्या विचारांबाबत आपले मतभेद स्पष्टपणे मांडले होते.तत्त्वज्ञानावर आणि विश्वाच्या रहस्यांवर बोलणारा ॲरिस्टॉटल त्याच वेळी कविता आणि नाटक या विषयांवरही तितकाच समरस होऊन बोलत असे.नाटकाची संहिता,त्यातली पात्रं, पात्रांच्या भावमुद्रा,

नाटकाचं दिग्दर्शन,त्यातली गाणी या सगळ्यांविषयी त्यानं सखोलपणे मांडणी केली होती.त्याच्या सौंदर्यशास्त्र (एस्थेटिक्स) या विषयावरच्या विवेचनात त्यानं खलनायक कसा असावा याविषयीही लिहून ठेवलंय.

खलनायक हा कुरूप,घृणास्पद किंवा बावळट,निर्बुद्ध दाखवता कामा नये.तो कपटी तर असावाच,पण हुशार आणि देखणाही असावा.नाही तर तो नायिकांना आपल्या पाशात कसा ओढू शकेल?आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल प्राण,प्रेम चोप्रा,डॅनी आणि विनोद खन्ना यांच्याकडे बघितलं की याची प्रचीती येते.


ॲरिस्टॉटलचा जन्म ख्रिस्तपूर्व ३८४ साली ग्रीसमधल्या मॅसेडोनियाजवळ झाला.त्याचे वडील राजवैद्य होते.

ॲरिस्टॉटल लहान असतानाच त्याचे वडील निकोमॅक्स यांच निधन झालं.त्यानंतर काहीच दिवसात त्याच्या आईचादेखील मृत्यू झाला.त्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या नातेवाईकांनी केला.तो सॉक्रेटिसचा शिष्य असलेल्या प्लेटोला आपला गुरू मानत असे आणि प्लेटोनं सुरू केलेल्या अकॅडमीमध्ये तो शिकायला जात असे. वयाची १७ ते ३७ वर्ष हा कालावधी त्यानं प्लेटोच्या अकॅडमीमध्ये व्यतीत केला.या अकॅडमीमधला तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता, नैतिकता या विषयावर प्लेटो जास्त बोलत असे, कारण त्याला हा विषय मनापासून आवडत असे.


प्लेटो निसर्गातलं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा गणितामध्ये शोधत बसायचा.प्लेटोची ही गोष्ट ॲरिस्टॉटलला मुळीच आवडत नसे.अनेक विषयांवर प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यात मतभेद होते.याच कारणामुळे प्लेटोलाही ॲरिस्टॉटल आपली परंपरा पुढे नेणारा वारस वाटत नसे.प्लेटोच्या मृत्यूनंतर ॲरिस्टॉटलनं अॅथेन्स सोडलं. ॲरिस्टॉटलनं स्वतःची लिसीयम नावाची एक अकॅडमीही काढली.शिकवताना तो एका जागी स्थिर राहत नसे,तर फिरत फिरत आपल्या शिष्यांना ती गोष्ट समजावून सांगत असे. त्यामुळे त्याच्या शिष्यांना 'पेरीपॅटेटिक्स' असं लोक म्हणत.ॲरिस्टॉटलला लिहायला इतके आवडत असे,की पपायरसच्या पानांची तो बंडलच्या बंडल सहजपणे संपवत असे.


ॲरिस्टॉटलच्या मनातलं कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नसे.या कुतूहलापोटीच त्याला आपण या जगात कुठल्या गोष्टीमुळे आहोत,आपलं अस्तित्व म्हणजे काय,आपल्या असण्यामागे कुठला हेतू असू शकतो का,इतकंच नाही तर संपूर्ण विश्व असण्यामागे काही उद्देश असेल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्नं त्याला सतावत असत. त्याच्या अशा प्रकारच्या हेतूवादाचा प्रभाव अनेक शतकं समाजमनावरच नव्हे,तर विज्ञानाच्या प्रगतीवरही झाला.


ग्रीसमध्ये जन्मलेल्या ॲरिस्टॉटलला ग्रीसचा खूप मोठा तत्वज्ञ म्हणून मान होता.ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतरही अलेक्झांडर या त्याच्या शिष्यानं त्याचे विचार समाजात रुजवले.


विश्वविज्ञानातली अनेक तत्त्वं पुढे ॲरिस्टॉकर्स, हिपॉकर्स आणि टॉलेमी मांडत राहिले. ॲरिस्टॉकर्स यानं पुढे ग्रहताऱ्यांचा अत्यंत खोलवर अभ्यास करून ॲरिस्टॉटलच्या चुका दाखवल्या.ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे सूर्य आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात असं नसून पृथ्वी,चंद्र आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात असं त्याने सांगितलं.पण ॲरिस्टॉटलचा शब्द म्हणजे परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द असं समजणाऱ्या लोकांनी ॲरिस्टॉकर्सचं म्हणणं धुडकावून लावलं.ॲरिस्टॉटल च्या सिंहासनाला तडा देण्याचं पुढे १६-१७ व्या शतकात विज्ञानानेच केलं.असं असलं तरीहीॲरिस्टॉटल आणि त्याच्या विचारांवर,सिद्धांतांवर आधारलेला त्याचा 'वर्क्स' या ग्रंथाचं योगदान जगाला महत्त्वाचं वाटतं हे मात्र खरं!



४ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..

६/५/२३

सिस्टिमा नॅचरे - (कॅरोलस) कार्ल लीनियस (१७३५)

१७७८ साली लीनियसचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या 'सिस्टिमा नॅचरे' पुस्तकाची बारावी आवृत्ती निघाली होती.फरक इतकाच,की फक्त त्यात १३ ऐवजी २३०० पानं होती.! आणि त्याचे तीन खंडही निघाले होते.! या सगळ्या प्रकल्पात त्यानं साधारणपणे वनस्पतींच्या ७७०० आणि प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून ठेवलं.

युरोपमध्ये तोपर्यंत सजीवांच्या तेव्हढ्याच जाती माहीत होत्या.थोडक्यात,लिनियसनं त्या काळी माहीत असलेल्या सजीवांचं पूर्णपणे वर्गीकरण केलं होतं.


" निसर्गाची अर्थव्यवस्था अपरिवर्तनीय आणि पायाभूत आहे.निसर्गाचं ज्ञान नसलेला अर्थशास्त्रज्ञ म्हणजे गणिताचं ज्ञान नसलेला भौतिकशास्त्रज्ञ होय."


स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ,प्राणिशास्त्रज्ञ आणि फिजिशियन कार्ल लीनियस यानं निसर्गातल्या प्रजातींचं वर्गीकरण करण्याचं अतिशय क्लिष्ट आणि किचकट काम केलं.खरं तर त्याच्या आधीदेखील हे काम करण्याचे प्रयत्न साधारणपणे २०० वर्षं आधी झाले होते; पण कार्ल लीनियसचं वैशिष्ट्य असं की त्यानं हे सगळं पुस्तकरूपात नोंदवलं. १७३५ साली त्याच्या 'सिस्टिमा नॅचरे' या ग्रंथाची पहिली आवृत्ती जगासमोर आली.तिथून मात्र या पुस्तकाच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघतच राहिल्या आणि कार्ल लीनियसनं स्वतःचं आणि आपल्या कामाचं एक वेगळं स्थान जगात निर्माण केलं.


खरं तर कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या तितक्याच कोट्यवधी जीवप्रकारांनी नटलेल्या सृष्टीचं वर्णन आणि वर्गीकरण कसं करायचं ? प्रत्येक जीवाला कोणत्या नावानं ओळखायचं ? आणि एवढी नाव आणणार तरी कुठून? कुठलाही जीव सापडला की,त्याची नोंद पूर्वी झाली आहे की नाही हे तपासणं म्हणजे एक दिव्य परीक्षाच असायची.हे करणाऱ्यांना 'टॅक्सोनॉमिस्टस्' म्हणतात.ते कसब शिकायला आजही चक्क ८-१० वर्ष लागतात.!त्यातून प्रत्येक देशाची त्या जीवांना नाव देण्याची,त्यांची वर्गवारी करण्याची पद्धतही वेगळी असायची.ते दिसायला कसे आहेत ? देखणे की कुरूप,लहान की मोठे वगैरेंवरूनही त्यांचं वर्गीकरण व्हायचं.'बफाँ' यानं तर कुठलाही जीव माणसाला किती उपयोगी आहे यावरून त्यांचं वर्गीकरण केलं होतं!


बरं,प्रत्येक नावही प्रचंड मोठं असायचं.जमिनीत येणाऱ्या चेरीला 'फिजॅलिस अम्नो रॅमोसिम रॅमिस ॲग्न्युलॉसिस ग्लॅब्रिस फॉलीस 'डेंटोसेरॅटिस' असं नाव दिलं होतं. ते एका श्वासात म्हणणंही शक्य नसायचं!एखाद्याला तर ती शिवीच वाटली असती! त्यातून कित्येक वनस्पतींची किंवा प्राण्यांची वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नावांनी नोंद होई.म्हणजे या सगळ्या जीवसृष्टीची जागतिक 'डिरेक्टरी' अशी नव्हतीच. म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीच्या ०.०१%च सजीव आपल्याला आतापर्यंत सापडलेले होते,पण त्यांचाही आकडा काही कमी नव्हता आणि त्यांच्याही नोंदीमध्ये पूर्ण अंदाधुंदी होती! म्हणजे गोंधळच गोंधळ!


या सगळ्यातून मार्ग काढला तो कॅरोलस

 ( किंवा कार्ल ) या अतिगर्विष्ठ आणि अतिविक्षिप्त माणसानं,१७०७ साली तो स्वीडनमध्ये एका गरीब धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला.त्याचं खरं नाव होत इंगेमार्सन पण त्याच्या वडिलांनी आपल्या जमिनीत आलेल्या एका मोठ्या लिंबाच्या झाडावरून त्याचं नाव लीनियस असं ठेवलं.त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती.लीनियसनंही आपल्या- सारखंच धर्मोपदेशक व्हावं असं त्याच्या वडिलांना वाटायचं;पण कार्लला त्यात मुळीच रस नव्हता.


लहानपणी कार्ल लीनियस शाळेला सर्रास दांड्या मारत असे आणि तासन् तास आजूबाजूची झाडं,वनस्पती यांचंच निरीक्षण करत बसे.तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता.'तू फारफार तर चांभार होऊ शकशील',असं त्याचे शिक्षक म्हणायचे.इतर काहीच येत नाही म्हणून वडिलांनीही त्याला चांभारच करायचं ठरवलं होतं;पण लीनियसनं आपल्याला आणखी एक 'चान्स' मिळावा यासाठी गयावया केली तेव्हा दया येऊन वडिलांनी तो त्याला दिला.मग मात्र लीनयस अभ्यास करायला लागला.


लीनियसला निसर्गाविषयी खूपच आकर्षण वाटे. त्याला सगळ्या गोष्टींच्या सुसंगत नोंदी ठेवाव्यात (डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड कीपिंग) आणि कुठल्याही गोष्टीचं नीटपणे वर्गीकरण करावं याचं चक्क वेडच होतं! एरव्ही अशा एखाद्या माणसाला इतरांनी चक्क मूर्ख ठरवून त्याची चेष्टाच केली असती;पण लीनियसच्या बाबतीत हीच गोष्ट त्याला उपयोगी पडणार होती.अशाच नोंदी या सगळ्यातून मार्ग काढला तो 'कॅरोलस करण्यासाठी १७३२ साली आर्क्टिक सर्कलच्या वर 'लाप्लांड' इथे लीनियसनं एक मोहीम काढली.तब्बल पाच महिने तिथे तळ ठोकून त्यानं अनेक तऱ्हेच्या वनस्पतींचे नमुने गोळा केले.तिथले

किटक,पक्षी आणि इतरही प्राणी त्यानं अभ्यासले.त्याच्या या मोहिमा अगदी सैन्यातल्या शिस्तीनं चालत.

त्याच्याबरोबरच्या विद्यार्थ्यांनी कसा पोशाख घालावा,(याला तो 'बॉटनिकल युनिफॉर्म वनस्पतीशास्त्रीय गणवेश' असं म्हणे!) ७ वाजता कसं बाहेर पडावं,२ वाजता जेवून ४ पर्यंत विश्रांती घेऊन पुन्हा कसं कामाला लागावं आणि या सगळ्यामध्ये त्यानं दर अर्ध्या तासानं कशी प्रात्यक्षिकं द्यावीत हे सगळं अगदी काटेकोरपणे चालायचं,पण या सगळ्या मोहिमेसाठी त्याच्याजवळ फक्त १०० डॉलर्स एवढेच पैसे होते.यामुळे त्या सगळ्यांचे प्रचंड हालही झाले.वाईट हवामान,खराब प्रदेश आणि भूक,तहान या सगळ्या हालअपेष्टा सहन करूनही लीनियसनं वनस्पतींविषयीं खूपच माहिती गोळा केली.तो सतत अनेक महिने, अनेक वर्षं पायीच चालत असे.प्राण्यांच्या कातडीवरच तो झोपायचा.असं करत कडाक्याच्या थंडीत त्यानं पायी ४६०० चौ.मैल एवढा प्रांत पिंजून काढला! तो परतला तेव्हा त्याची कीर्ती खूपच वाढली असली तरी त्याचे खिसे मात्र पूर्णच रिकामे झाले होते.

परतल्यावर त्याचं एका श्रीमंत डॉक्टरच्या सारा मोराए नावाच्या मुलीवर प्रेम बसलं.मुख्य म्हणजे त्या डॉक्टरलाही असा उचापत्या माणूस जावई म्हणून आवडला;पण 'मेडिकलची पदवी तुला मिळाल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही,'असं सारानं त्याला सांगितलं.मग भावी सासऱ्याच्या पैशावर लीनियनं हॉलंडला जाऊन चक्क एम.डी.ही पदवी १७३५ साली मिळविली.


१७३९ साली लीनियसनं साराशी लग्न केलं. त्यानंतर १७४१ सालापर्यंत त्यानं वैद्यकीय प्रॅक्टिसही केली.त्याला याच वर्षी उप्साला इथे मेडिसनचा प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. १७४२ साली तो वनस्पतीशास्त्राचा प्रोफेसर बनला आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो याच पदावर होता.तो चांगल शिकवत असल्यामुळे तो विद्यार्थिप्रिय होता.


पण या सगळ्या अगोदर लीनियसन पूर्वीच विद्यार्थिदशेत असताना १७३५ साली 'स्पीशीज प्लॅटॅरम'हे वनस्पतींच्या वर्गवारीवर पुस्तक लिहिलं होतं.त्यात त्यानं त्यासाठी 'बायनॉमियल' पद्धत वापरली होती.१७३८ साली त्यानं हीच पद्धती प्राण्यांना वापरून त्याच्या 'सिस्टीमा नॅचरे' याची १३ पानांची अतिसंक्षिप्त आवृत्ती प्रकाशित केली.लीनियसच्या अगोदर सजीवांचं हे वर्गीकरण कसं करायचं याविषयी बरेच वाद होते.


व्हेल मासा आणि कुत्रा यात फरक ओळखता येतो.पण कुत्रा आणि लांडगा किंवा कुत्रा आणि कोल्हा यात फरक किती आहे? तसंच गाढव आणि घोड़ा एकाच प्रकारचे की वेगळ्या ? मग हे वर्गीकरण बाहेर दिसणाऱ्या गुणधर्मावरून करायचं की आतल्या अवयवांवरून,असे अनेक प्रश्न त्या काळी लोकांना पडत.


लीनियसनं सर्व सजीव सृष्टीचे गट पाडले.त्यांना तो 'जेनेरा' म्हणे.एक गट म्हणजे 'जीनस'. जेनेरा हे त्याचंच बहुवचन.प्राण्याची रचना, आकार किंवा पुनरुत्पादनाची पद्धत अशा कुठल्याशा गोष्टीवरून ही गटवारी केलेली असे. उदाहरणार्थ,झेब्रा आणि घोडा यांत साम्य आहे, पण घोडा आणि कुत्रा यांत खूपच कमी साम्य आहे.वगैरे

म्हणून घोडा आणि झेब्रा यांना 'ईक्वस' या गटात त्यानं टाकलं.कुत्र्यांचा त्यानं गट केला होता 'कॅनिस' कोल्ह्यांचाही तोच गट होता.यानंतर त्यानं त्या गटाचे उपगट केले. त्यांना तो 'स्पीशीज' म्हणे.म्हणजे 'ईक्वस' गटातली झेब्रा ही एक 'स्पीशीज' आहे आणि घोडा ही दुसरी स्पीशीज.म्हणजेच प्रत्येक प्राण्याचं नाव हे जीनस स्पीशीज हे जोडून होतं. उदाहरणार्थ,ईक्वस झेब्रा (म्हणजे झेब्रा) किंवा ईक्वस कॅबॅलस (म्हणजे घोडा) वगैरे.या नामकरण पद्धतीत जीनस आणि स्पीशीज हे दोन भाग असल्यानंच त्याला 'बायनॉमियल' किंवा 'बायनरी नॉमेनक्लेचर'असं म्हणतात.या दोन घटकांचा उपयोग करून नाव ठरवण्याची बायनॉमियल पद्धत तशी खूप पूर्वीपासून चालत आलीय;पण लीनियसनं ही पद्धत खूप शिस्तबद्ध रीतीनं वापरून त्याची एक सिस्टीम बनवली आणि ती प्रचलितही केली.हे विशेष होतं.


 म्हणूनच २५० वर्षांनंतरही लीनियसची हीच पद्धत अजूनही वापरली जाते!आजही जिथे जिथे लीनियसनं दिलेलं सजीवाचं नाव लिहिलं जातं त्याच्यापुढे एल.सी.अशी अक्षरं लिहिली जातात.(याचा अर्थ हे नाव कार्ल लीनियसनं दिलेलं आहे.)


'व्हेलंट' या फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञानं १७१७ साली वनस्पतींनाही पुनरुत्पादनाचे अवयव असतात ही भन्नाट कल्पना मांडली.लीनियस या कल्पनेनं भारावूनच गेला होता.कदाचित त्यामुळे त्याच्या लिखाणात,

नामकरणात सतत सेक्सचा भाग खूप असे.

'वल्वा','लाबिया', 'प्यूब्ज','अनस','हिमेन'आणि 'क्लायटोरिया' अशी थेट लैंगिक नावं तो द्यायचा.त्याच्या लिखाणात तो वनस्पतींच्या 'लग्नाची' आणि 'संभोगांची' रसाळ वर्णनंही करे.कित्येक लोकांनी त्यावर आक्षेपही घ्यायला सुरुवात केली.'गटे' सारखी मंडळीही लीनियसचं लिखाण बायकांनी आणि विद्यार्थ्यांनी वाचू नये,असं म्हणायला लागली.मग काय मंडळी ते आणखीनच चोरून वाचायला लागली!एवढंच कशाला,अजूनही त्याविषयी वर्गात शिकवताना शिक्षक आणि विशेषतः शिक्षिका 'ते' शब्द किंवा 'ती' वर्णनं निदान सगळ्यांसमोर वाचायचं तरी टाळतात किंवा लाजत लाजत तरी वाचतात! लीनियस वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या लैंगिक अवयवांच्या थिअरीमुळे एवढा प्रभावित झाला होता की,भुंगे आणि इतर कीटक यांच्यामुळे वनस्पतींमध्ये परागीभवन होतं याकडे लीनियसनं पूर्णपणे दुर्लक्षच केलं.लीनियसनं त्याचं वनस्पतींमधलं वर्गीकरण करतानाही या वनस्पतींमधल्या लैंगिक अवयवांचाच उपयोग केला होता.


१७७८ साली लीनियसचा मृत्यू पुस्तकाची बारावी आवृत्ती निघाली होती.फरक इतकाच की,फक्त त्यात १३ ऐवजी २३०० पानं होती! आणि त्याचे तीन खंडही निघाले होते! या सगळ्या प्रकल्पात त्यानं साधारणपणे वनस्पतींच्या ७७०० आणि माहीत होत्या. थोडक्यात,लीनियसनं त्या वेळच्या माहीत असलेल्या सजीवांचं पूर्णपणे वर्गीकरण केलं होतं.लीनियसनं त्याच्या वर्गीकरणासाठी जीनस आणि स्पीशीज सोडून वापरले होते.आज त्यात किंगडम,फायलम आणि सबफायलम हेही शब्द वाढले आहेत.


लीनियसनं प्राण्यांचेही सहा प्रकार मानले.सस्तन प्राणी,सरपटणारे प्राणी,पक्षी,मासे,कीटक (इन्सेक्ट्स) आणि कृमी (वर्मुस) हे ते प्रकार.


लीनियसनं दिलेल्या नावांमध्ये आणि वर्गीकरणामध्ये कालांतरानं थोडेफार बदल केले गेले असले तरीही त्यातला बराचसा भाग आणि त्यामागची तत्त्वं अजूनही तशीच टिकून आहेत! लीनियसची वर्गीकरणाची तत्त्वं इतकी मजबूत आहेत की,पुढे जेव्हा युरोपच्या बाहेर गेल्यावर अभ्यासकांना सजीवांच्या नव्या प्रजाती मिळाल्या तेव्हा त्यांचंही वर्गीकरण करताना तीच तत्त्वं लागू पडली होती!हे सगळं काम अत्यंत अवघड असलं तरी ते दुसन्या कोणाला तरी जमलंही असतं;पण लीनियसच वैशिष्ट्य असं की,त्यानं माणसालाही या वर्गीकरणामध्ये बसवलं.माणसाच्या बाबतीत त्याच्या वर्गीकरणाची उतरंड अशी होती :


• किंग्डम - अॅनिमेलिया (Animalia) 'होण्यापूर्वी त्याच्या 'सिस्टिमा नॅचरे' प्राणी


●फायलम - कॉर्डेटा (Chordata) मज्जारज्जू असलेला.


• सबफायलम - व्हर्टिब्रेटा (Vertebrata) मणका असलेला.


• क्लास - मॅमेलिया (Mammalia) सस्तन


ऑर्डर - प्रायमेट्स (Primates) माकडवर्गीय


• फॅमिली - होमिनाइड (Hominidae)


• जीनस - होमो (Homo) माणूस


• स्पीशीज - सेपियन (Sapiens) आधुनिक 'होमो सेपियन्स' हा शब्दही लीनियसनंच प्रथम वापरला.


अर्थात काही वेळा लीनियस उगाचच काही गोष्टी घुसडून द्यायचा.समुद्रावरच्या सफरीवरून खलाशी आले आणि त्यांनी कुठल्याही काल्पनिक 'राक्षसी' प्राण्यांची किंवा चार पायावर चालणाऱ्या रानटी,मुक्या किंवा शेपटी असणाऱ्या माणसांची वर्णनं केली की,लीनियस तेही पुस्तकात घुसडायचा!आणि त्याही प्रजाती तो होमो या जीनसमधल्या वेगवेगळ्या स्पीशीजमध्ये घालायचा.


लीनियसच्या पद्धतीमध्ये त्रुटी होत्याच.मग ब्रिटिशांनी त्यात सुधारणा करून १८४२ साली नवीन स्टँडर्ड निर्माण केलं.अर्थातच फ्रेंचांना ते न आवडल्यामुळे त्यांनी त्यांचं वेगळंच स्टँडर्ड काढलं.आणखी गोंधळ म्हणजे अमेरिकनांनी लीनियसनं १७५८ साली मांडलेली पद्धतीच वापरायचं ठरवलं.म्हणजे मज्जाच मजा !


लीनियसचा दबदबा युरोपभर पसरला होता. १७३५ साली पॅरिसच्या भेटीत 'बर्नार्ड द ज्यसियू' या वनस्पतिशास्त्रज्ञाचं भाषण ऐकायला लीनियस गेला.भाषणात एका दुर्मिळ वनस्पतीचं नाव जेव्हा वक्ता विसरला,तेव्हा ते नाव मागे बसलेल्या लीनियसनं ओरडून सांगितलं.तेव्हा बर्नार्डनं चमकून मागे बघितलं आणि 'हे कोण बोललं?'असं विचारताच लीनियस उभा राहिला.त्या वेळी त्या वनस्पतिशास्त्रज्ञानं विचारलं,'तू लीनियस तर नाहीस?'लीनियसशिवाय हे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही हे त्याला माहीत होतं.लीनियस जेव्हा 'हो' म्हणाला तेव्हा स्वतःचं स्टेटस किंवा प्रतिष्ठा वगैरे विसरून तो खाली त्याच्याकडे धावत गेला आणि लीनियसला त्यानं कडकडून मिठी मारली.!


लीनियस स्वतःला 'ग्रेट' मानायचा आणि गंमत म्हणजे तसं तो गर्वानं सगळ्यांना सांगायचा. स्वतःचीच स्तुती करणारे मोठमोठे लेखही तो लिहायचा.त्यानं स्वस्तुतीची चार (!) आत्मचरित्रंही लिहिली! पण गंमत म्हणजे त्या चारही आत्मचरित्रांमध्ये फारसं काहीच साम्य नव्हतं!'

आपल्यापेक्षा मोठा वनस्पति- शास्त्रज्ञ आणि प्राणिशास्त्रज्ञ अख्ख्या मानवी इतिहासात झाला नाही.'असंही तो सगळीकडे सांगे आणि लिही.


आपल्या मृत्युशिलेवर 'वनस्पतिशास्त्रज्ञाचा राजपुत्र' असं कोरलं जावं,अशीही त्याची इच्छा होती.त्याला विरोध करायलाही कुणी धजावत नसे,कारण कुणी तसंच केलंच तर त्याचं नाव कुठल्याही तणाला किंवा अत्यंत 'फालतू' वनस्पतीला तो देऊन टाके.


लीनियसला प्रसिद्धी अमाप मिळाली.एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लीनियसला १७६१ साली 'स्वीडिश हाऊस ऑफ नोबल्स'चं सदस्य बनवण्यात आलं.वैयक्तिक आयुष्यात मात्र लीनियसला फारसं सुख मिळालं नाही.

अपंग अवस्थेत १७७८ साली लीनियसचा मृत्यू झाला. मात्र आपल्या कामाच्या रूपात आणि 'सिस्टिमा नॅचरे' या ग्रंथाच्या रूपात तो आजही जिवंत आहे.हे मात्र खरं!


४ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..