बागकाम करणाऱ्या माळ्यांकडून मला अनेक वेळा विचारणा होते की,आमची झाडं फार जवळजवळ तर लावली गेली नाहीत ना? ते एकमेकांचा सूर्यप्रकाश किंवा पाणी तर हिसकावून घेणार नाहीत ना?व्यावसायिक वनीकरण करणाऱ्यांच्या दृष्टीने ही शंका रास्त आहे.कारण झाडाचा घेर झटपट वाढवून लाकूड तयार होण्यासाठी त्यांची खटपट चालू असते. पानं छान गोलाकारात पसरली की झाडांची वाढ लवकर होते खरी,पण त्यासाठी ऐसपैस जागा लागते.लागवडीची झाडं सुमारे पाच वर्षात काढली जातात.त्यांची वाढ लवकर व्हावी यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या वनस्पती छाटून टाकल्या जातात आणि आपल्या झाडांना मुक्तपणे वाढवू दिलं जातं.व्यावसायिक लागवडीत झाडं फार काळ नसतात कारण लाकडासाठी त्यांची कत्तल होणार असते.त्यामुळे या पद्धतीच्या व्यवस्थापनाची वैगुण्यं कधीच जाणवतच नाही.
पण यात कसली वैगुण्यं आली? हे योग्यच आहे ना की,
स्पर्धा करणारी झाडे जर आजूबाजूला वाढत नसतील तर अधिक सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी मिळाल्यामुळे लागवडीच्या झाडांची झपाट्याने वाढ होईलच.हो,हे भिन्न प्रजातीच्या झाडांबाबत बरोबर आहे.भिन्न प्रजातीच्या झाडांत जीवनावश्यक संसाधनांसाठी एकमेकांत चढाओढ चालू असतेच,पण एकाच प्रजातीच्या झाडांमध्ये तसं होत नाही.आपण आधीच्या प्रकरणात पाहिलं की,
बीच झाडांमध्ये मैत्री केली जाते आणि एकमेकांना पोषणद्रव्यं पुरवली जातात.कारण जंगलातील कमकुवत सभासदांना गमावून सर्वांनाच तोटा होत असतो. एखादा सभासद वठला तर जंगलाच्या आच्छादनात खिंडार पडून परिसंस्थेच्या सूक्ष्म हवामानाचे संतुलन बिघडते.ही अडचण नसती तर कदाचित प्रत्येकच झाड स्वैरपणे वाढलं असतं.मी 'कदाचित' असं म्हटलं,कारण बीच झाडांमध्ये संसाधनांचा मिळून उपभोग घेण्यात फायदे आहेत.
आर.डब्ल्यू.टी.एच.आकेनमध्ये असलेल्या इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंटल रिसर्चच्या काही विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या बीच वृक्षांच्या जंगलात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषणात एक चमत्कारिक गोष्ट आढळून आली.त्यांना असं दिसलं की अशा जंगलातील झाडं एकमेकांशी ताळमेळ बसवत आपलं कार्य करत असतात, ज्यामुळे सर्वांचं प्रकाश संश्लेषण यशस्वी होतं. पण हे तर आपल्या अपेक्षेविरुद्ध आहे,कारण प्रत्येक बीचचं झाड भिन्न परिस्थितीत वाढत असतं.काही जास्त खडकाळ भागात असतात तर काहींना अधिक पाणी मिळतं.काहींच्या मातीत पोषणद्रव्यं मुबलक असतात तर काही अगदी उघड्या जमिनीवर वाढत असतात. त्यामुळे प्रत्येक झाडाची वाढ कमी जास्त होते. काही ठिकाणी पोषणद्रव्यं भरपूर असतात तर काही अगदीच ओसाड या कारणामुळे प्रत्येक झाडाचं प्रकाश संश्लेषण वेगळ्या प्रमाणात होत आहे,असं वाटणं साहजिकच आहे.
आणि म्हणूनच ह्या विद्यार्थ्यांचा बीच जंगलातला अनुभव आश्चर्यकारकच आहे.
बीच जंगलातल्या प्रत्येक झाडाच्या प्रकाश संश्लेषणाचा दर एकच असतो.
विद्यार्थ्यांना असं जाणवलं की जंगलांमधल्या सबळ आणि दुर्बल घटकांच्या प्रकाश संश्लेषण क्षमतेत समतोल साधला जात आहे.आपला घेर कितीही असला तरी एका प्रजातीच्या प्रत्येक झाडाचं प्रत्येक पान प्रकाशाचा वापर करून तेवढ्याच प्रमाणात साखर बनवतं,जेवढी साखर इतर पानं बनवतात. हा समतोल त्यांच्या मुळातून साधला जात होता. अर्थातच जमिनीखाली या झाडांची देवाणघेवाण आनंदाने चालू होती.ज्याच्याकडे जास्त साखर तयार होते.
तो कमी उत्पादन करणाऱ्या सभासदाला हातभार लावत होता.आणि या विनिमयात त्या बीच वृक्षांना पुन्हा एकदा बुरशींची मदत मिळत होती.आपल्या प्रचंड जाळ्याचा वापर करून ते या वितरण व्यवस्थेत सामील होत होते. काही देशात सोशल सिक्युरिटी म्हणजे सरकारी सामाजिक सुरक्षा प्रक्रिया असते.
यामध्ये समाजात कोणी मागे पडू नये.याची काळजी घेतली जाते.बीचच्या या जंगलात असंच काहीसं चालू होतं.
अशा प्रणालीमध्ये झाडांना एकमेकांपासून फार दूर राहता येत नाही.किंबहुना,आपल्या बांधवांबरोबर अगदी खेटून उभं राहणं त्यांना जास्त पसंत असतं.
अशामुळे वाढ झालेल्या जंगलात त्यांची खोडं एकमेकांपासून जेमतेम तीन फुटाच्या अंतरावर असतात आणि पालवीचा घेरही कमी असतो.
व्यावसायिक वनीकरण करणाऱ्यांच्या मते झाडाच्या वाढीसाठी ही योग्य परिस्थिती नाही आणि मधली झाडं कापून टाकून वाढीसाठी जागा केली पाहिजे.परंतु
जर्मनीतील लूबेक मधील माझ्या काही सहकाऱ्यांच्या अभ्यासात असे आढळलं की,दाटीवाटीने वाढलेल्या बीच जंगलात उत्पादकता अधिक असते आणि वर्षाभरात जंगलातून लाकडाव्यतिरिक्त इतर जैविक मालात वाढ झाली तर ते निरोगी जंगल परिसंस्थेचं लक्षण समजलं जातं.
सहकार्याने जेव्हा झाडं एकत्र वाढतात तेव्हा पोषणद्रव्यं आणि पाण्याचं योग्य वितरण होऊ शकतं आणि प्रत्येक झाडाला आपल्या क्षमतेनुसार वाढता येतं.पण जेव्हा आपण एका झाडाला मदत म्हणून त्याच्या तथाकथित 'स्पर्धकांना' काढून टाकतो.तेव्हा इतर झाडं
एकटी पडतात.मग आपल्या शेजाऱ्याला एखादा संदेश पाठवला तर तो वाया जातो,कारण शेजारी फक्त खुंट उरलेले असतात.
अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला स्वतःच्या जोरावर जगावं लागतं आणि त्या वेळेस प्रत्येकाची जैविक उत्पादकता वेगवेगळी होते. काही झाडं मोठ्या जोमाने साखरेचं उत्पादन करतात आणि धष्टपुष्ट बनतात.पण याचा अर्थ ते दीर्घायुषी होतात असं नव्हे,कारण एका झाडाचं आरोग्य जंगलाच्या आरोग्यापेक्षा फार काही वेगळं नसतं.या परिस्थितीत जंगलात अनेक झाडं अपयशी ठरू शकतात.ज्या अशक्त झाडांना इतरांकडून मदत मिळू शकली असती ते आता मागे पडत जातात.
प्रतिकूल जागेमुळे असो,पोषणाअभावी असो,तात्पुरती कमजोरी असो किंवा जनुकीय रचना कमकुवत असो; कारण कोणतंही असलं तरी अशी झाडं कीटक आणि बुरशींच्या आहारी जाऊ लागतात.
आता तुम्ही विचाराल की उत्क्रांती अशीच चालते ना? परिस्थितीला लायक असतील तेच टिकतील,असंच असतं ना? या वाक्यावर झाडं आक्षेप घेतील.त्यांचं कल्याण त्यांच्या समूहावर अवलंबून असतं.जेव्हा दुर्बल सदस्य नाहीसे होतात तेव्हा त्यांच्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.प्रखर सूर्यप्रकाश आणि वादळी वारे आत शिरून अनुकूल हवामानाचं संतुलन बिघडवतात आणि सुदृढ सभासदही कमकुवत होऊ लागतात.त्या वेळेस त्यांच्या शेजारी मदतीला कोणी नसतो आणि कीटकांच्या हल्ल्यासमोर भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही.
पूर्वी मीसुद्धा झाडांना अशा प्रकारची 'मदत' करायचो.
माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाडांची दाटी कमी करण्यासाठी काही झाडांना मी 'गर्डलिंग' करायचो.
या प्रक्रियेत झाडाच्या बुंध्याचं तीन फूट रुंदीचे साल काढून टाकलं जातं.काही वर्षांतच ते झाड मरून जातं.त्याची पालवी जाते आणि जमिनीत फक्त निर्जीव लाकडाचं खोड उभं असतं.असं केल्याने इतर झाडांना अधिक सूर्यप्रकाश पोहोचतो.
लागवडीच्या व्यवस्थापनाची ही पद्धत तुम्हाला जरा क्रूर वाटते का? मला तर नक्कीच वाटते, कारण या पद्धतीत मरण संथपणे येतं.त्यामुळे मी भविष्यात कधीच 'गर्डलिंग'चा वापर जंगलाच्या व्यवस्थापनात करणार नाही.तेव्हाही मला हे जाणवलं होतं की,गर्डलिंग केलेल्या बीच वृक्षांनी जगण्यासाठी खूप धडपड केली आणि आश्चर्य म्हणजे त्यातले काही आजपर्यंत तग धरून आहेत.
खरंतर एकदा साल काढून टाकलं तर झाड जगू शकत नाही कारण पानातून तयार झालेली साखर मुळापर्यंत पोहोचू शकत नाही.मुळांची उपासमार होते आणि ते पाणी पम्पिंगची प्रक्रिया बंद करू लागतात.
अशा वेळेस जमिनीतलं पाणी झाडाच्या वरच्या भागाला पोहोचू शकत नाही आणि हळूहळू झाड वठायला लागतं.पण मी गर्डलिंग केलेली काही झाडं थोड्याफार प्रमाणात वाढत होती.आज मला कळतंय की त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मदत मिळत होती.जमिनीखालच्या जाळ्यामुळे शेजाऱ्यांना गर्डलिंग केलेल्या झाडाच्या मुळाला साखर पुरवठा करता येत होता आणि ते जिवंत राहू शकत होतं.काही झाडांनी आपलं गेलेलं सालही वाढवायला सुरुवात केली.मला नक्कीच आज या कृत्याची लाज वाटत आहे.यातून मला एक शिकायला मिळालं ते म्हणजे जंगल परिसंस्थेत झाडाचं सामूहिक सहजीवन किती शक्तिशाली असतं ते! एक प्रचलित म्हण आहे,
'कोणत्याही साखळीची ताकद त्याच्या सर्वांत कमकुवत सभासदाइतकीच असते.'कोण जाणे, कदाचित झाडांनीच ही म्हण आपल्याला दिली असेल.
आणि स्वाभाविकपणे त्यांना हे कळतं त्यामुळे आपल्या स्वकीयांना मदत करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
१५ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग..