* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१६/८/२३

चंपावतची नरभक्षक … भाग २ |Cannibals of Champawat... Part 2

३०.जुलै ३०२३ या लेखातील पुढील भाग..


कधी कधी असं होतं.अशक्य वाटणारी एखादी गोष्टदेखील करणं शक्य होऊन जातं.फारशा आरामदायी नसलेल्या,

काहीशा अडचणींच्या जागेत पडून,वरच्या दिशेने,६० अंशाच्या कोनात, २०० यार्डावर गळ्याचा फक्त लहानसा पांढरा ठिपका दिसत असलेल्या त्या घोरूलवर गोळी झाडल्यावर नेम बरोबर लागण्याची लाखात एकदेखील शक्यता नव्हती,पण तरीही त्या गोळीचा नेम बरोबर लागला.आणि निमिषार्धात ते घोरूल मरून पडलं.

डोंगरकडांवरून घरंगळत, छोट्या दऱ्या आणि दगड पार करत ते त्याच्या दोन साथीदारांजवळ येऊन पडलं.त्या दोन साथीदारांमुळे वाटेमधलं गवत दबलं गेलं होतं. अशा पद्धतीने त्या दरीत ती तीन जनावरं आमच्या पुढ्यात येऊन पडली.रायफलचा अशा पद्धतीने वापर झालेला कधीच बघितलेला नसल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्या माणसांचे चेहरे बघणं मोठं आनंददायक होतं. त्या क्षणी सगळे जण जणू त्या नरभक्षकाला विसरले आणि तिन्ही घोरूल उचलून नेण्यासाठी गडबडगोंधळ करू लागले.आमची ही मोहीम अनेक अर्थांनी यशस्वी ठरली.

घोरूलचं मांस मला सगळ्यांनाच देता तर आलंच,पण त्याचबरोबर सगळ्या गावाचा विश्वास जिंकता आला. माणसांना शिकारकथांमध्ये असलेलं औसुक्य कधीच कमी होत नाही.त्यामुळे माझ्याबरोबर आलेल्या तीन माणसांनी घोरूल सोलून त्याचे वाटे करताना आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव दिला.मोकळ्या जागेत बसून नाश्ता करत असताना मी एका मैलावरून घोरूलला कशी गोळी घातली होती,माझ्या जादूच्या रायफलने घोरूलांना नुसतं मारलंच नव्हतं,तर माझ्या पायाशीदेखील कसं आणून टाकलं होतं याची वर्णनं ऐकून त्या तिघांच्या भोवती जमलेल्या गर्दीने टाकलेले सुस्कारेही मला ऐकू येत होते.मला कुठे जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी किती माणसं सोबत लागणार होती,असं गावच्या प्रमुखाने मला दुपारच्या जेवणानंतर विचारलं. माझ्यासोबत शिकारीला आलेल्यांमधल्या दोघांची निवड तिथे चकरा मारणाऱ्या उत्साही लोकांच्या गर्दीतून मी केली.नरभक्षक वाघिणीने केलेल्या शिकारीची सगळ्यात अलीकडची दुर्दैवी घटना जिथे घडली होती,त्या जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांना घेऊन निघालो.या डोंगराळ भागात हिंदू लोक राहतात आणि ते मृतदेहाचं दफन करतात.

त्यांच्यामधल्याच कुणाला तरी नरभक्षक वाघाने अशा पद्धतीने मारलेलं असतं,तेव्हा मृत व्यक्तीचं दफन करण्यासाठी तिच्या नातेवाइकांना तिच्या शरीराचा थोडासा भाग मग तो अगदी हाडाचा एखादा तुकडा का असेना मिळवणं क्रमप्राप्त असतं. त्या महिलेचा दफनविधी अजून व्हायचा होता.आम्ही त्या जागेवर जायला निघालो,तेव्हा तिच्या शरीराचा मिळेल तो भाग घेऊन येण्याची तिच्या नातेवाइकांनी आम्हाला विनंती केली.मला अगदी लहानपणापासूनच वाचनाचा, जंगलातल्या खुणांचा अर्थ लावण्याचा छंद आहे. ती महिला जेव्हा मारली गेली होती,तेव्हा तिथे उपस्थित असलेले साक्षीदार मला भेटले होते, पण साक्षीदारांवर नेहमीच विसंबून राहता येत नाही.उलट जंगलातल्या खुणा याच घडलेल्या घटनेच्या खऱ्याखुऱ्या नोंदी असतात.घळीच्या बाजूने,झाडाच्या दिशेने आल्याने वाघीण इतरांना दिसू शकली नसण्याची शक्यता असल्याचं त्या ठिकाणी पोहोचल्यावर आणि जमिनीवर एक नजर टाकल्यावर माझ्या लगेचच लक्षात आलं. झाडाच्या खाली असलेल्या घळीत प्रवेश करून पाहणी केल्यावर मला जमिनीवर तिच्या पायांचे ठसे दिसले.ते खालच्या दिशेला असलेल्या दोन मोठ्या दगडांच्या दिशेने गेले होते.त्या ठशांवरून ती वाघीण असल्याचं आणि तिच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ संपून उतरणीचा सुरू झाल्याचं दिसून येत होतं.शिकारीच्या वेळी वाघीण दरीतून वर येऊन,झाडापासून साधारण दहा यार्ड अंतरावर दगडाच्या मागे थांबून,ती महिला झाडावरून खाली उतरण्याची वाट बघत राहिली होती.त्या महिलेची हवी होती तेवढी पानं सगळ्यांच्या आधी तोडून झाली होती.ती साधारण दोन इंची फांदीच्या आधाराने खाली उतरत असतानाच वाघीण सरपटत पुढे आली होती आणि मागच्या पायांवर उभं राहून तिने त्या महिलेचे पाय पकडले होते आणि ओढत तिला घळीत नेलं होतं.त्या दुर्दैवी महिलेने फांदीला किती घट्ट धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता,ते त्या फांदीकडे बघून समजत होतं.झाडाच्या खडबडीत सालीला तिच्या तळहाताच्या कातडीचा घासला गेलेला भाग लागला होता.वाघिणीने तिला जिथे मारलं होतं, तिथे त्यांच्यामध्ये झालेल्या झटापटीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या;

साकळलेल्या रक्ताचा एक मोठा डाग दिसत होता.तिथून माग घेत आम्ही निघालो.सुकलेले डाग दरीपर्यंत आणि नंतर पलीकडच्या बाजूला गेलेले दिसत होते.दरीतून बाहेर पडल्यावर पुढे एका झुडपात ती जागा सापडली,जिथे वाघिणीने आपली शिकार खाऊन टाकली होती.


नरभक्षक वाघ वा वाघीण माणसाचं डोकं,हात आणि पाय खात नसल्याची एक लोकप्रिय समजूत आहे,पण ती चुकीची आहे.नरभक्षकांच्या खाण्यामध्ये व्यत्यय आणला नाही,तर ते रक्ताळलेल्या कपड्यांसह सगळं खात असल्याचं मी एका प्रसंगी बघितलं आहे.


अर्थात,ती एक वेगळीच कहाणी आहे. तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी!


या जागेवर आम्हाला त्या महिलेचे कपडे आणि काही हाडं मिळाली.ते सगळं आम्ही आमच्यासोबत आणलेल्या स्वच्छ कापडात गुंडाळून घेतलं.एकूण शरीराचा भाग म्हणून ती हाडं अगदी थोडी असली,तरी ती दफन विधीसाठी पुरेशी होती.आता या महिलेच्या अस्थी गंगामातेला अर्पण करता येणार होत्या. चहा घेतल्यानंतर मी आणखी एका दुर्घटना स्थळाला भेट दिली.एका सार्वजनिक रस्त्यामुळे मुख्य गावापासून वेगळा झालेला तो काही एकरांचा परिसर होता.या जागेच्या मालकाने रस्त्यालगतच,पण डोंगरावर स्वतःसाठी एक झोपडी बांधली होती.त्याला चार वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा होता. तो,त्याची बायको,तिची धाकटी बहीण आणि त्याची दोन मुलं असे सगळे तिथे राहत होते.

त्याची बायको आणि तिची बहीण एक दिवस सकाळी घरापासून थोडं वर,डोंगरावर गवत कापत असताना अचानक वाघीण तिथे आली होती आणि तिने त्या माणसाच्या बायकोला ओढून नेलं होतं.तिची धाकटी बहीण त्या वाघिणीमागे जवळजवळ १०० यार्डाचं अंतर हातात काठी उगारून, "हवं तर मला घेऊन जा,पण माझ्या बहिणीला नेऊ नको" असं ओरडत धावत गेली होती.तिचं हे धाडसी कृत्य गावामधले लोक बघत होते.त्या मृत बाईला शंभरेक यार्डापर्यंत वाहून नेल्यानंतर वाघिणीने तो मृतदेह खाली ठेवला होता आणि तिच्या पाठलागावर असलेल्या तिच्या बहिणीकडे वळली होती. मोठ्याने डरकाळ्या फोडत वाघिणीने बहिणीच्या दिशेने उसळी मारताच बहीण मागे वळली होती.आणि डोंगरउतारावरून वेगाने धावत,रस्ता ओलांडत गावाच्या दिशेने धावत सुटली होती.डोंगरावर काय घडलं होतं,ते तिला गावातल्या लोकांना सांगायचं होतं.त्यांनी तो सगळा प्रकार बघितला असल्याचं तिला माहीतच नव्हतं.प्रचंड वेगाने धावत आल्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.ती प्रचंड घाबरली होती. "काय आणि कसं सांगू' असं तिला झालं होतं.

त्यामुळे तिचं सगळंच बोलणं असंबद्ध होतं.त्यानंतर वाघिणीने ओढून नेलेल्या बाईची सुटका करण्यासाठी गावातली काही माणसं ताबडतोब बाहेर पडली होती.


ती रिकाम्या हाताने परत येईपर्यंत या बहिणीची वाचा गेली होती.


मला ही सगळी गोष्ट गावात सांगण्यात आली होती.मी त्या झोपडीच्या दिशेने जाण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात केली, तेव्हा ती बहीण कपडे धुवत होती.तिची वाचा जाऊन जवळजवळ वर्ष झालं होतं.तिच्या डोळ्यात दिसणारी वेदना वगळता,मला ती अगदी नॉर्मल वाटली.मी तिच्याशी बोलण्यासाठी थांबलो आणि तिच्या बहिणीला मारणाऱ्या वाघिणीच्या शिकारीसाठी मी आलो असल्याचं तिला सांगितलं.हे ऐकल्यावर तिने दोन्ही हात जोडले आणि माझ्या पायांना स्पर्श करण्यासाठी ती खाली वाकली.तिच्या या वागण्याने मला ओशाळल्यासारखं झालं,पण तिचं हे वर्तन मी समजू शकत होतो. मी तिथे नरभक्षक वाघिणीला मारण्याच्या उद्देशाने गेलो होतो खरा, पण ती त्याच परिसरात दुसऱ्यांदा शिकार करत

नसल्याची तिची ख्याती होती.एकदा खाऊन टाकलेल्या शिकारीकडेही ती पुन्हा परतत नसे. शेकडो चौरस मैल परिसरात तिचा वावर होता. त्यामुळे माझं उद्दिष्ट पूर्ण करणं, म्हणजे गवताच्या भाऱ्यामध्ये सुई शोधण्यासारखं होतं.


या मोहिमेसाठी नैनितालला येताना मी कितीतरी गोष्टी ठरवल्या होत्या.त्यांतली एक करायचा प्रयत्नही केला होता,पण ती माझ्या आवाक्याबाहेरची असल्याचं लक्षात आल्यामुळे पुन्हा ती करायला प्रवृत्त झालो नव्हतो. कुमाऊँमध्ये आलेली ही पहिलीच नरभक्षक वाघीण असल्यामुळे ज्याच्याशी सल्लामसलत करता येईल,असं तिथे कुणीही नव्हतं,पण तरीही काहीतरी करणंही आवश्यक होतं.त्यामुळे वाघीण दिसण्याची शक्यता असलेल्या ज्या ज्या जागा गावकऱ्यांनी सांगितल्या होत्या,

त्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धुंडाळत मी पुढचे तीन दिवस मैलोन् मैल फिरलो.


इथं मला थोडं विषयांतर करून प्रचलित झालेल्या एका अफवेचं खंडन करायचं आहे.ती अशी की,या आणि अशा अनेक प्रसंगी मी एका खेडुत बाईचा पोशाख करून जंगलात जातो, नरभक्षक वाघांना माझ्याकडे आकर्षित करून घेतो आणि कोयत्याने किंवा कुन्हाडीने त्यांना मारून टाकतो.काही वेळा मी एखादी साडी गुंडाळून गवत कापणं किंवा झाडावर चढून पानं तोडणं हे प्रकार केले आहेत,हे खरं आहे,पण या युक्त्या काही यशस्वी झालेल्या नाहीत.दोन प्रकरणांमध्ये मी ज्या झाडांचा आसरा घेतला होता,तिथपर्यंत वाघाने माझा पाठलाग केला होता.

त्यांपैकी एकदा तो दगडामागे लपला आणि दुसऱ्या वेळी एका तुटून पडलेल्या झाडामागे लपून राहिला.या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याने मला गोळी चालवण्याची संधी दिली नाही.असो.मूळ विषयाकडे येऊ या.आता वाघिणीने हा परिसर सोडल्याचं दिसत असल्यामुळे पालीच्या लोकांची नाराजी पत्करून मी १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या चंपावतला जायचं ठरवलं.त्यासाठी सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली.धुनघाट इथं नाश्ता केला आणि सूर्यास्तापर्यंत चंपावतला पोहोचलो.या प्रवासामधले सगळे रस्ते अतिशय असुरक्षित मानले जात होते.


एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका बाजाराच्या ठिकाणाहून दुसऱ्या बाजाराच्या ठिकाणी जायचं असेल,

तर लोक मोठ्या समूहाने जात.धुनघाटहून निघालो,तेव्हा आम्ही आठ जण होतो. वाटेतल्या गावांमधले लोक आम्हाला येऊन मिळत गेले आणि चंपावतला पोहोचलो,

तेव्हा आम्ही ३० जण झालो होतो.आम्हाला येऊन मिळालेल्या वीसेक जणांच्या गटातली माणसं दोन महिन्यांपूर्वी चंपावतला गेली होती.त्यांनी मला अतिशय करुण कहाणी सांगितली - 'चंपावतच्या या दिशेने जाणारा रस्ता काही मैलांवर एका डोंगराच्या दक्षिणेच्या कडेने जातो.तो दरीच्या साधारण ५० यार्डावर आहे.दोन महिन्यांपूर्वी आम्ही वीसेक जण मिळून चंपावतच्या बाजाराला जात होतो.दुपारची वेळ होती.आम्ही या रस्त्याने चालत होतो.तेवढ्यात आम्हाला खालच्या दरीतून आत्यंतिक वेदनांनी विव्हळत रडणाऱ्या कुणातरी माणसाचा आवाज ऐकू यायला लागला.तो आवाज जसजसा जवळ यायला लागला,तसे आम्ही सगळे जण अतिशय भेदरून रस्त्याच्या कडेला थांबलो.थोड्याच वेळात एक वाघ आमच्या नजरेच्या टप्प्यात आला. तो एका बाईला घेऊन जात होता.वाघाने तिला पाठीकडून तोंडात पकडलं होतं.त्यामुळे एका बाजूने तिचे केस जमिनीवर लोंबकळत होते आणि दुसरीकडून तिचे पाय ती बाई तिची छाती पिटून घेत होती आणि मदतीसाठी देवाचा आणि माणसांचा धावा करत होती. ५० यार्डावरून अगदी स्पष्ट दिसत असलेला तो वाघ तिला घेऊन निघून गेला.तो काही अंतरावर गेल्यावर त्या बाईचा आवाज ऐकू येईनासा झाला.त्यानंतर आम्ही 'आमचा रस्ता धरला'


" आणि तुम्ही २० जणांनी काहीच केलं नाही?" मी त्यांना विचारलं. "नाही साहेब,आम्ही सगळे जण अतिशय घाबरलो होतो.घाबरलेला माणूस करणार तरी काय? आणि समजा,आम्ही धोका पत्करून वाघाच्या तावडीतून त्या बाईची सुटका केली असती,तरी ती जखमांमुळे इतकी रक्तबंबाळ झालेली होती की.काही केल्या जगली नसती."

नंतर मला समजलं की, ती बाई चंपावतजवळच्याच एका खेडेगावात राहत होती.ती सरपणासाठी वाळलेली लाकडं गोळा करत असताना वाघाने तिला उचललं होतं. तिच्याबरोबरचे इतर लोक गावात धावत गेले होते आणि त्यांनी इतरांना या घटनेबद्दल सांगितलं होतं.तिला शोधण्यासाठी गावातले लोक निघत असतानाच हे घाबरलेले लोक तिथे जाऊन पोहोचले होते.वाघ तिला कुठल्या दिशेने घेऊन गेला होता,हे त्यांना माहीत असल्यामुळे तेही गावकऱ्यांच्या मदतीसाठी निघाले त्यांची कहाणी पुढे सुरू झाली.


'त्या बाईच्या सुटकेसाठी निघालो,तेव्हा आम्ही ५० ते ६० जण होतो.गावकऱ्यांपैकी अनेकांकडे बंदुका होत्या.ती स्त्री जिथे सरपण गोळा करत होती,त्या जागेपासून फर्लांगभर अंतरावर लाकडं पडलेली होती.वाघाने जिथून तिला उचललं होतं, तिथे तिचे फाडलेले कपडे आम्हाला मिळाले. त्यानंतर आम्ही ढोल वाजवायला आणि बंदुका चालवायला सुरुवात केली.दरीच्या उजवीकडे वरच्या दिशेने आम्ही मैलभर चढून गेलो असू, तेवढ्यात आम्हाला एका मोठ्या दगडावर ती बाई मरून पडलेली दिसली.बाई कसली, नुकतीच वयात येत असलेली पोरसवदा मुलगीच होती ती! तिच्या शरीरावरचं सगळं रक्त चाटून तिचं शरीर स्वच्छ करण्याव्यतिरिक्त वाघाने तिला काही केलं नव्हतं.

आमच्याबरोबर कुणीही महिला नव्हती.कुणीतरी दिलेल्या लुंगीमध्ये तिचं शरीर गुंडाळलं जात असताना आम्ही सगळे पुरुष एकमेकांच्या नजरा टाळत होतो.जणू काही ती मुलगी पाठीवर झोपली होती आणि तिला स्पर्श झाल्यावर ती लज्जित होऊन उठणार होती'


मी कोण होतो आणि तिथे कशासाठी आलो होतो,या संदर्भातलं एक पत्र चंपावतच्या तहसीलदारांना पाठवलं होतं.मी राहत होतो,त्या डाक बंगल्यात ते त्याच रात्री मला भेटायला आले.या बंगल्याच्या परिसरात बरीच माणसं मारली गेलेली असल्यामुळे तिथे न राहता,तिथून काही मैलांवर असलेल्या बंगल्यात राहायला जाण्याविषयी त्यांनी मला सुचवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदारांबरोबरच लवकर बाहेर पडून दुसऱ्या बंगल्यात जायचं ठरवलं. शव्हरांड्यात बसून माझा नाश्ता सुरू असतानाच दोन माणसं तिथे आली.या डाक बंगल्यापासून दहा मैल अंतरावर असलेल्या गावात वाघिणीने एक गाय मारल्याची बातमी घेऊन ती आली होती.तहसीलदारांना चंपावतमध्ये काही तातडीचं काम आलं होतं. "ते काम करून मी संध्याकाळी बंगल्यावर परत येतो आणि आजची रात्र तुमच्याबरोबर घालवतो." असं सांगून त्यांनी माझी रजा घेतली.माझ्या वाटाड्यांना चालण्याची सवय होती,असं दिसत होतं.आम्हाला ज्या गावात जायचं होतं,तो रस्ता डोंगरउताराचा असल्यामुळे आम्ही अतिशय कमी वेळेत दहा मैलांचं अंतर पार केलं.

गावात पोहोचल्यावर मला एका गोठ्यात नेण्यात आलं. तिथे बिबट्याने अर्धवट खाऊन टाकून दिलेलं एका आठवड्याचं एक वासरू पडलं होतं. बिबट्याची शिकार करत बसण्याइतका वेळ माझ्याकडे नसल्यामुळे मी त्या वाटाड्यांना इनाम दिलं आणि नव्या बंगल्याचा रस्ता धरला. तहसीलदार अजून आलेले दिसत नव्हते आणि अंधार पडायला अजून तासभरापेक्षाही जास्त वेळ होता.त्यामुळे मी बंगल्याच्या चौकीदाराबरोबर बाहेर पडलो.त्याने मला एक जागा सांगितली.त्याच्या म्हणण्यानुसार,त्या जागी पाणी पिण्यासाठी एक वाघ येत असे.ही जागा म्हणजे,एका ओहोळाचा वरचा भाग होता. तिथूनच बागेला पाणी दिलं जात होतं.त्या ओहोळाच्या परिसरात असलेल्या मऊशार जमिनीवर मला बऱ्याच दिवसांपूर्वीचे वाघाच्या पावलांचे ठसे आढळले,पण त्यापूर्वी पाली या गावाजवळच्या दरीत,जिथे वाघिणीने बाईला मारलं होतं,तिथे पाहिलेल्या ठशांपेक्षा हे ठसे अगदी वेगळे होते.मी बंगल्यावर पोहोचलो, तोपर्यंत तहसीलदारदेखील परत आलेले होते.आम्ही व्हरांड्यात गप्पा मारत बसलेलो असताना,मी दिवसभरात जे जे अनुभवलं होतं, ते ते त्यांना सांगितलं.इतक्या लांबवर मला विनाकारणच तंगडतोड करावी लागली.असल्याबद्दल खंत व्यक्त करून त्यांनी सांगितलं की,त्यांना कामासाठी कुठेतरी बऱ्याच लांबच्या ठिकाणी जायचं असल्यामुळे त्यांना ताबडतोब निघावं लागणार होतं.


ते रात्री माझ्याबरोबर राहणार असल्याचं त्यांनी मला दिवसभरात दोन वेळा सांगितलं असल्यामुळे त्यांच्या या सांगण्याचं मला थोडं आश्चर्यच वाटलं.ते रात्री तिथं राहणार नसल्याची मला चिंता नव्हती,पण रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याचा धोका ते पत्करत होते,याची मला काळजी वाटत होती.पण त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही.चार मैलांवरच्या ज्या परिसरात माणसं दिवसाउजेडीदेखील मोठा समूह सोबतीलाअसल्याशिवाय बाहेर पडत नव्हती,त्या परिसरात जाण्यासाठी सोबतीला मिणमिणता प्रकाश देणारा धुरकट कंदील हातात धरलेला एक माणूस घेऊन त्यांनी त्या व्हरांड्याबाहेर असलेल्या काळ्याकुट्ट अंधारात पाऊल ठेवलं,तेव्हा मी माझी हॅट उंचावून त्या धाडसी माणसाला अभिवादन केलं.ते दिसेनासे होईपर्यंत मी तिथेच थांबलो आणि मग बंगल्यात शिरलो.


या बंगल्यासंदर्भात माझ्याकडे एक छोटीशी कहाणी आहे,पण मी ती इथे सांगणार नाही.कारण हे जंगलकथांचं पुस्तक आहे.आणि निसर्गनियमांच्या विरुद्ध ठरतील,अशा गोष्टी या जंगलकथांबरोबर जाऊ शकत नाहीत.


कथा अजून सुरुच आहे.लवकरच या ठिकाणी पुढील कथेसोबत भेटू..

१५/८/२३

राहून गेलं सांगणारा वन बेडरुम फ्लॅट | A one bedroom flat that tells the story

माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नाेकरीला लागावे.जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवऴपास पुर्ण हाेत आले हाेते.आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे.मी असे ठरवले हाेते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलाे की पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल.

माझे वडिल सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट,अन तुटपुंजी पेंशन,

पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते.

घरची,आई-बाबाची खुप आठवण यायची.एकटं वाटु लागायच.स्वस्तातल एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३  वेळा त्यांना काँल करत हाेताे.दिवस वार्‍यासारखे उडत हाेते.दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली.अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले.रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय  घेतला.आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली.मी खुश हाेताे,आईबाबांना भेटणार हाेताे. नातेवाईक व मित्रांसाठी खुप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या हाेत्या.त्याही राहुन गेल्या.

घरी पाेहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फाेटाे मी पाहिले,

वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली.

मुलीचे वडिल समजुतदार हाेते.दाेन दिवसात माझे लग्न लागले.खुप सारे मित्र येतील असं वाटत असताना फक्त बाेटावर माेजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर  टेकवले. "आम्हाला तुझे पैसे नकाे पाेरा पण वरचेवर भेटायला येत जा " अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खाेल गेला हाेता.बाबा आता थकले हाेते,चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या,

पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत हाेत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती  केली व आम्ही अमेरिकेला पाेहचलाे.


पहिले दाेन वर्ष बायकाेला हा देश खुप आवडला.वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत हाेत.

बचत कमी हाेऊ लागली पण ती खुश हाेती.हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल.कधीकधी ती आठवड्यातुन दाेनदा किंवा तिनदा भारतात फाेन करु लागली. दाेन वर्षानी आम्हाला मुले झाली.एक मुलगा अन एक मुलगी.मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचाे तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे.

त्यांना नातवंडाना पाहायचे हाेते.


दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचाे. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा.वर्षामागन वर्ष सरत हाेती,भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले हाेते.एक दिवस अचानक ऑफिसमध्ये असताना भारतातन काॅल आला, "माेहन बाबां सकाळीच गेले रे".खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही,अग्निला तर साेडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उद्विग्न झालेल.

दहा दिवसात दुसरा काॅल आला,आईची पण प्राणज्याेत मालवली हाेती. साेसायटीतील लाेकांनी विधी केले,

नातवंडाचे ताेंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले हाेते.आईबाबा जाऊन दाेन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पाेकळी तयार झालेली.

आईबापाची शेवटची इच्छा इच्छाच राहिलेली.

 मुलांचा विराेध असताना भारतात येऊन स्तिरस्थावर हाेण्याचे मी ठरवले.पत्नी मात्र आनंदात हाेती.

राहण्यासाठी घर शाेधत हाेताे पण आता पैसे कमी पडत हाेते नवीन घर ही घेता आले नाही.मी परत अमेरिकेत आलाे.मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलाे.मुले माेठी झाली,मुलीने अमेरिकी मुलासाेबत लग्न केल.मुलगाही आनंदात अमेरिकेत राहताे.मी ठरविले हाेते आता पुरे झाले,गाशा गुंडाळुन भारतात आलाे.

चांगल्या साेसायटीत 'दाेन बेडरुमचा' फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे हाेते.फ्लॅटही घेतला. 


आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दाेन बेडरुमच्या' फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहताे.उरलेल आयुष्य जिच्यासाेबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव साेडला.


कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटाेप केला ताे कशासाठी? ? याचे माेल ते काय? ?


माझे वडील भारतात राहत हाेते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट हाेता.माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही.फक्त एक बेडरुम जास्त आहे.त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले,मुलांना साेडुन आलाे, बायकाेपण गेली. 


खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते,त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात.

अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फाेन येताे ते माझ्या तब्येतीची चाैकशी करतात, अजुनही त्यांना माझी आठवण येते यातच समाधान आहे. 


आता जेव्हा माझा मृत्यु हाेईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील देव त्यांच भल कराे.


पुन्हा प्रश्न कायम आहे.हे सर्व कशासाठी अन् काय किंमत माेजुन.


मी अजुनही उत्तर शाेधताेय.


फक्त एका बेडरुम साठी ?

जगण्याचे माेल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे.त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका.


(written by An unintended Indian Engineer who hv lived his dream life in USA)


लेखक - अनामिक 


माझ्या वाचनात अलीकडेच आलेली.


१२/८/२३

प्राचीन आश्चर्ये का अंतराळप्रवास …भाग २

अनेक पुराणवस्तू संशोधकांच्या मते शारीरिक पुनर्जन्मावर या इतिहासपूर्व काळातील लोकांचा दृढ विश्वास होता.पण त्या काळातील कोणत्याही धर्माच्या तत्त्वज्ञानात या पुनर्जन्माच्या कल्पनेचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही.'आत्मा अमर आहे' या सिद्धान्तावरील हा दृढ विश्वास असता तर मसाला भरून राजे,राण्या,

राजकन्या,राजपुत्र यांची प्रेते ताजीतवानी ठेवण्यासाठी इतके कष्ट घेण्याची गरज इजिप्शियन लोकांना नक्कीच नव्हती;पण पुराणकालीन इजिप्तमधील शेकडो ममीज् चक्क शारीरिक पुनर्जन्मावरील स्पष्ट विश्वासाचा पुरावा देत हजारो वर्षे आपल्या नजरेस पडत आहेत.देवांचा संबंध पुन्हा इथेही येतोच.कारण जुनी चित्रे,काव्ये दर्शवतात की या जतन करून ठेवलेल्या शरीरांना पुनर्जन्म देण्यासाठी ताऱ्यांवरून परत येण्याचे वचन देवांनी दिले होते.


ममीज् जतन करून ठेवलेल्या थडग्यात नाणी, अविनाशी सोने,हिरे,माणके यांचे अलंकार, त्यांच्या आवडत्या वस्तू तर आढळतातच;पण जिवंत गाडून टाकलेले नोकर-चाकर,दास-दासीसुद्धा आढळतात.जुने आयुष्य नव्याने सुरू करण्याचीच सर्व तयारी दिसते.ही थडगी अणुस्फोटालाही दाद न देण्याइतकी भक्कम आहेत.

नुसत्या काळाचा तर त्यांच्यावर परिणाम होणेच शक्य नव्हते.पण पुनर्जन्माची ही कल्पना इतकी दृढपणे त्यांच्या मनात रूजलीच कशी? आपल्या शरीरात जीव ओतला जाईल.हा विश्वास निर्माण झाला कसा?त्याच्या मागची भूमिका अत्यंत क्रांतिकारक आहे.जतन करून ठेवलेले शरीर संरक्षक आणि अभेद्य ठिकाणी ठेवायचे की ज्यामुळे शरीराचे आणि त्यातील पेशींचे रक्षण होईल आणि हजारो वर्षानंतर पुन्हा नव्या जीवनाची घडण केली जाईल ही विचारसरणी आली कशी त्यांच्या मनात ? धार्मिक

भावना क्षणभरच बाजूला ठेवू पण फॅरोह राजांना निश्चितच देव आणि त्यांच्या चालीरितींबद्दल जास्त माहिती होती.त्यांच्यापैकी कोणत्या राजाच्या मनात,

कोणत्या कारणाने ही कल्पना प्रथम रूजली असेल ? 'मी स्वत:साठी असे थडगे बनवीन की ज्याचा हजारो वर्षांत नाश होणार नाही.ते मी अशा ठिकाणी बांधीन की, कित्येक मैलांवरून दिसू शकेल.देवांनी वचन दिले आहे की ते परत येतील आणि मला उठवतील.' (का भविष्यकालीन डॉक्टरच मला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग शोधतील ? )


पण सध्याच्या अंतराळ युगाशी ममीज् चा काही संबंध आहे?


डॉक्टर आणि खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट एरिंजर यांनी १९२६ मध्ये लिहिलेल्या 'अमरत्वाची संभाव्यता' (The prospect of Immortality) या पुस्तकात सुचविले आहे की विसाव्या शतकातच मानव स्वतःला 'गोठवून घेऊ शकेल.वैद्यकीय आणि जीवनशास्त्राच्या दृष्टीने मानव जिवंत राहील पण त्याच्या पेशी नेहमीपेक्षा कोट्यावधी पटीने हळुहळू काम करून फक्त जिवंत राहतील.अशक्य?

रक्तपेढीसारख्या हल्ली अस्थिपेढी अस्तित्वात आहेत.

वर्षानुवर्षे अस्थी गोठवलेल्या परिस्थितीत ठेवून गरजे-

नुसार त्या पुन्हा वापरता येतात.रक्त तर अनंत काळपर्यंत (-) १९६° सेंटिग्रेड तापमानात ठेवून देता येते.शरीरातील पेशी द्रवरूप नायट्रोजनच्या तापमानात त्याच तऱ्हेने अनंतकाळ जिवंत ठेवता येतात.कोणत्या तरी फॅरोह राजाच्या मनात आलेली कल्पना सत्यसृष्टीत उतरण्याची वेळ हजारो वर्षानंतर खरोखरच आली आहे का?मार्च १९६३ मध्ये अमेरिकेतील ओक्लाहामा युनिव्हर्सिटीच्या दोन जीवशास्त्र तंत्रज्ञांनी खात्री पटवली की इजिप्तची राजकन्या मेने हिच्या कातडीच्या पेशी पुन्हा काम करण्याच्या परिस्थितीत आहेत.ही राजकन्या तर हजारो वर्षांपूर्वी मरण पावली आहे.त्याच वर्षी रशियन टेलिव्हिजनवर दोन कुत्रे दाखवले गेले.आठ दिवस त्यांना पार गोठवून टाकले होते, बाहेर काढल्यावर ते हळुहळू जिवंत झाले.


अमेरिकेच्या अंतराळ योजना कार्यक्रमात आज एक कठीण पेच उभा आहे.त्यात गुप्त असे काहीच नाही.

अंतराळातील कोणत्याही ग्रहावर स्वारी करायची म्हटले तर जो काळ जाईल तो शेकडो वर्षांचा सुद्धा असेल.

त्यासाठी दीर्घं निद्रावस्थेतील (Hibernation) परिस्थितीत अंतराळवीरांना जिवंत कसे ठेवायचे? 


प्रोफेसर एरिंजर यांची आज टर उडवली जाते.त्यांनी भविष्यात मानवाचा कृमिकीटक व आग यांनी नाश होणार नाही असे भविष्य वर्तवले आहे. अति शीत थडग्यात किंवा पेट्यात मृत माणसे ठेवली जातील.

वैद्यकशास्त्रात झपाट्याने जे शोध लागत आहेत; त्यात एक शोध असाही असणार आहे की मृत माणसे ज्या कारणांनी मरण पावलेली असतील त्यावर इलाज सापडला की ते कारणच शरीरातून काढून टाकायचे की तो माणूस पुन्हा जिवंत होईल..


पण मुख्य मुद्दा राहतोच.आपल्या प्राचीन पूर्वजांना पुनर्जन्माची ही कल्पना प्रथम कोणी दिली ?


शरीरातील सर्वच पेशी एकच कार्य करीत नाहीत. त्यांची निर्मिती,वाढ आणि क्षय या गोष्टी जन्मभर चालू असतात.

पण त्यांची क्रयशक्ती कमी करायची,ज्यामुळे त्यांचा क्षय लवकर होणार नाही.आणि त्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढेल; ही क्रांतिकारक कल्पना इजिप्शियन लोकांच्या मनात आली कशी ? इथेच ममीज् चा आणि प्राचीन भूतकाळात पृथ्वीला भेटी दिलेल्या अंतराळवीरांचा काही संबंध असेल ? एखाद्या राजाने राजपुत्राने,समाजातील प्रतिष्ठित माणसाने 'देव',त्यांची प्रेते अशा तऱ्हेने जतन करून अविनाशक दगडी पेट्यात ठेवताना पाहिले होते का? का काही देवांनीच (अंतराळवीरांनी) त्यांना आपणहून या मागची भूमिका समजावून सांगितली होती?


आजपासून काही शतकात पृथ्वीवरील मानवजात अंतराळ प्रवासात प्राविण्य मिळवील हे निर्विवाद ! या आधी अंतराळ प्रवासाच्या संशोधनाबरोबर इतर शास्त्रांच्या संशोधनातही प्रगती करावी लागणार आहे.इलेक्ट्रॉनिक्स सारख्या फक्त एखाद्याच तंत्रातील प्राविण्य उपयोगी पडणार नाही.मानवप्राणी शेकडो वर्षे जिवंत ठेवण्याचे कार्य वैद्यकशास्त्र आणि जीवनशास्त्रातील तज्ञांना अंतराळ संशोधनाचा एक भाग म्हणूनच पार पाडावे लागणार आहे.पण प्रक्रिया करून जतन केलेली शरीरे हजारो वर्षांनी पुन्हा चालती बोलती करण्याचे ज्ञान इतिहासपूर्व काळातील देवांना (अंतराळवीरांना) होते का ?-सुमेरियन राजे आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखांचे कल्पनातील आयुष्यमान आपण पाहिले आहे.अंतराळयानात प्रकाश वेगाने प्रवास करताना जाणाऱ्या काळात आणि पृथ्वीवरील काळात फार मोठी तफावत असणार हे आपल्याला कळत आहे.


'ममीज्' हा त्यांच्या अमर्याद आयुष्याचा दुसरा पुरावा असेल का? पुराण काळातल्या या व्यक्तींना अतिशीत पेट्यात गोठवून ठेवत असतील तर? समजा की प्राचीन काळातील अज्ञात अंतराळवीरांनीच त्या काळातील प्रमुख व्यक्तींना असे दीर्घ निद्रावस्थेत ठेवले होते आणि नंतरच्या त्यांच्या प्रत्येक भेटीच्या वेळी पुन्हा जिवंत करून संभाषण केले होते प्रत्येक वेळी परत जाताना या व्यक्तींना अंतराळवीरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अतिशीत करून ममीज् बनविण्याचे काम धर्मगुरू करीत असतील आणि त्यांना पुन्हा देव येईपर्यंत भव्य मंदिरात ठेवून देत असतील. अशक्य? हास्यास्पद ? सबंध हिवाळा निद्रावस्थेत घालवणारे प्राणी आपल्याला माहिती नाहीत? थंडीने गोठून लाकडासारखे बनणारे काही तऱ्हेचे मासे उष्ण पाण्यात आल्यावर पुन्हा पोहायला सुरुवात करतात हे आपल्याला माहिती नाही ? मग ममीज् ची कल्पना इजिप्शियन लोकांच्या मनात निसर्गाकडे बघून आली का? पण अशी कोणतीही टूम निघाली की श्रद्धेने ती आचरणाऱ्यांचा एक पंथ तयार होतो; हे ऐतिहासिक सत्य आहे पण इजिप्शियन लोकात असा पंथ कधी होता असे आढळलेले नाही.इजिप्तचे हवामान लक्षात घेता निसर्गाकडून अशी निद्रावस्था ते शिकले असतील असे वाटत नाही.फॅरोहांच्या थडग्यात सोने,हिरे,मोती यांचे अलंकार असायचेच पण शिवाय धान्य,मसाले, कापड यांचीही तरतूद असायची.नंतर कोणत्याही राजाने ही थडगी उघडली की या सर्व गोष्टींचा नवीन साठा भरून ठेवत.पुनर्जन्म ही थोड्या काळाने मिळणारी गोष्ट नव्हती,तर ती हजारो वर्षांनी मिळणारी होती,याची इजिप्शियन लोकांना पूर्ण जाणीव होती.ही थडगी लुटण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. 'देव' हे प्राचीन काळात परग्रहांवरून आलेले अंतराळवीर होते.या सिद्धातांशी या लुटमारीचा तसा संबंध नाही.पण जून १९५४ मध्ये सक्कर येथे असा काही प्रकार न झालेले थडगे मिळाले. पहिल्या खोलीत रत्नांची पेटी होती तशीच होती. दगडी शवपेटी बाहेर काढून ठेवायच्या झाकणाने बंद केली नव्हती तर सरकत्या झाकणाने.९ जून रोजी समारंभाने ही शवपेटी उघडली तर आत काहीच नव्हते.

अक्षरशः काही नाही.आपले रत्नभांडार मागे ठेवून 'ममी' निघून तर गेली नव्हती?


मंगोलियात जे थडगे सापडले आहे ते एखादी छोटी टेकडी आतून लाकडी फळ्यांनी आच्छादिलेली असावी असे दिसते.वर्षानुवर्षे राहणाऱ्या बर्फाने ती शीतगृहच वाटते.

त्यात स्त्री-पुरुषांच्या ममीज्,अन्न,वस्त्रे,रत्ने याशिवाय संगीताची वाद्ये ठेवली होती.एका खोलीत एक चित्र आहे.

एका मोठ्या चौकोनात सहा चौरसांच्या तीन ओळीत डोक्यावर चित्रविचित्र शिंगे,पाठीवर पंख असलेल्या स्फिंक्ससारख्या आकृत्या आकाशात उडण्यास सज्ज आहेत असे वाटते.पण ही प्रतिकृती निनेव्ह येथील असीरियन राजवाड्यातील दगडी गालिच्याची प्रतिकृती आहे.असे तज्ञांचे मत आहे हे आश्चर्य !


ॲन्डीज पर्वत,सैबेरिया,चीन,सुमेरिया,इजिप्त, दक्षिण आफ्रिका या सर्व ठिकाणी ममीज् सापडल्या असल्या तरी पुनर्जन्माची ही कल्पना आपल्या पूर्वजांच्या मनात भरवली कोणी,या कोड्याचा उलगडा मात्र अजून होत नाही तो नाहीच.सर्वच मृत माणसांबरोबर त्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत,दागदागिने आहेत,स्वेच्छेने पुरून घेणारे नोकर-चाकर आहेत.सर्व जगात घडणाऱ्या या गोष्टी काय योगायोगाच्या आहेत?


दहा दहा हजार वर्षांपूर्वीच्या ममीज् जेरिको येथे सापडल्या आहेत.प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये आठ हजार वर्षांपूर्वी बनवलेली कित्येक डोकी सापडतात.त्या काळात साधी मातीची भांडी बनवण्याची क्षमतासुद्धा त्या लोकात नव्हती. जेरिको येथे दुसऱ्या भागात अगदी सरळ रेषेत बांधलेली प्राचीन घरे आढळतात.त्यांच्या गोलाकार भिंती आतल्या बाजूला वळलेल्या आहेत घुमटासारख्या.कार्बन- १४ या पद्धतीने या घरांचे 'वय' आहे १०४०० वर्षे. 


इजिप्शियन धर्मगुरुंनी ११००० वर्षांचा इतिहास हेरोडोटसला सांगितला होता. ते नक्की खरेच असेल की यालाही योगायोगच म्हणायचे ? फ्रान्समध्ये प्राचीन शिलांवर आधुनिक पद्धतींच्या हॅटस्,पॅन्ट्स,जॅकेट्स् घातलेल्या माणसांची चित्रे आहेत.ही चित्रे कोणी कोरून काढली? जनावरांची कातडी पांघरून वावरणाऱ्या प्राचीन काळातल्या अत्यंत मागासलेल्या लोकांना, विसाव्या शतकातल्या माणसांची चित्रे काढण्याइतकी कल्पनाशक्ती असेल? ही चित्रे आपल्या सबंध इतिहासात गोंधळ माजवायला कारणीभूत होत आहेत.फ्रान्समधील गुहेत काढलेली अप्रतिम पेंन्टिग्जसुद्धा आपल्याला थक्क करतात.ती अगदी कालच पूर्ण झाली आहेत असे वाटते.

आपले पाषाणयुगातील रानटी पूर्वज जर अशी चित्रे काढू शकत असतील,तर त्यांनी राहण्यासाठी झोपड्या वगैरे कधी का बांधल्या नाहीत? लक्षावधी वर्षांपासून पक्षी स्वतःसाठी घरटी बांधत आहेत.इतर प्राणी आसरा शोधत आले आहेत,पण मानवसदृश प्राण्याला स्वतःसाठी आसरा कधी बांधता आला नव्हता.


बोर्निओच्या पश्चिम किनाऱ्यावरील दऱ्याखोऱ्यात जे गुहांचे जाळे आहे त्यातल्या गुहा तर कॅथेड्रलसारख्या भव्य आहेत.आणि त्यामध्ये अत्यंत तलम अशा वस्त्रांचे नमुने सापडले आहेत.कितीही इच्छा झाली तरी प्राचीन काळातल्या रानटी लोकांनी ही वस्त्रे बनविली असतील अशी कल्पनाच करता येत नाही.या सर्व शोधांनी पुराणवस्तू संशोधनाच्या चाकोरीतून बाहेर पडायची निकड जास्तीच जाणवायला लागते.गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल तसा काही संशय नाही पण परग्रहांवरील अंतराळवीरांनी,त्या अज्ञात जमातींनी,

आपल्यावर संस्कार करायला सुरुवात केली तो काळ साधारणतः १०,००० ते ४०,००० वर्षे इतकाच असावा एवढेच वाटते.याहून जास्ती काही सांगता येत नाही.

कोणत्याही प्राचीन अवशेषांचे 'वय' सांगणारी गाजलेली कार्बन- १४ पद्धत या संशोधनात उपयोगी पडेल असे वाटत नाही.मानवशास्त्र,भूगर्भशास्त्र यांचे संशोधक

मिळालेल्या ऐतिहासिक गोष्टींचे 'वय' शोधून काढण्यासाठी ही पद्धत वापरतात.या पद्धतीच्या बाबतीत एक गोष्ट गृहीत धरली जाते रेडिओ अँक्टिव्ह आयझोटोप कार्बन वातावरणामध्ये नेहमी एकाच पातळीवर असतो.

माणसे आणि प्राणी कोणत्या तरी पद्धतीने झाडे,मुळे,

गवत, पाने खातच असतात.त्यामुळे त्यांच्याही शरीरात एकाच प्रमाणात हा कार्बन असतो.सर्व अणू किरणोत्सर्गी पदार्थांचे आयुष्य ठरलेले असते आणि मग ते नाश पावतात.सर्व प्राणीमात्रात त्यांच्या मृत्यूनंतर आणि झाडे तोडल्यानंतर ही क्रिया सुरू होते.दर ५६०० वर्षांनी कोणत्याही सेद्रिंय पदार्थांमधला अर्धा कार्बन नष्ट होतो. म्हणजे ५६०० वर्षांनी त्याच्यात १/२ कार्बन राहतो,

११२०० वर्षांनी १/४,२२४०० वर्षांनी १/ ८ भाग कार्बन शिल्लक राहतो.वातावरणातले कार्बनचे प्रमाण माहीत असल्याने व प्रयोगशाळेत जुन्या सेद्रिंय अवशेषात किती कार्बन शिल्लक आहे हे कळू शकत असल्याने, एखाद्या हाडाचे किंवा कोळशाच्या तुकड्याचे वयही सांगता येते.

पण आज वातावरणात जितका कार्बन आहे तितकाच हजारो वर्षांपूर्वीही होता ही जी गोष्ट आपण गृहीत धरून चाललो आहोत तीच जर बरोबर नसली तर? देव अणुस्फोटासारखी उष्णता निर्माण करू शकत होते,असे सर्व पौराणिक वाड्मयात लिहिले आहे;म्हणजे त्या

काळात सर्व गोष्टींमध्ये कार्बनची पातळी खूपच होती.

आजच्याएवढी नव्हतीच.मग चुकीची उत्तरे मिळण्याचा संभव वाढतो.या पद्धतीचा मुख्य तोटा म्हणजे ज्या पदार्थांचे वय आपण शोधून काढत असतो तो नष्ट होतो.शिवाय मौल्यवान धातू,दगड वगैरे गोष्टी किती जुन्या आहेत ते आपण शोधून काढू शकत नाही.संशोधन करण्यात येणारा पदार्थ जितका जुना तितकी ही पद्धत अचूक निर्णय देऊ शकत नाही.ती अविश्वसनीय ठरते.

सेद्रिंय पदार्थ समजा ३०,००० ते ५०,००० वर्षे इतका जुना असेल,तर याच कालखंडात कुठे तरी, इतकीच माहिती ही पद्धत देऊ शकते.तेव्हा कार्बन-१४ या पद्धतीवरच आपण अवलंबून राहू शकणार नाही.यापेक्षा चांगल्या आणि विश्वसनीय पद्धती शोधून काढणे आवश्यक आहे.


१०.८.२३ या भागातील पुढील दुसरा भाग समाप्त..

१०/८/२३

प्राचीन आश्चर्ये का अंतराळप्रवास स्थानके ?

लेबनॉनमधील ३७६० फूट उंचीवरील बालबेक या ठिकाणी रोमन सम्राट ऑगस्टस याने बांधलेल्या भव्य मंदिराचे अवशेषसुद्धा आज प्रवाशांना स्तंभित करतात.

त्यांनी ग्रीक लोकांच्या मंदिरांच्या अवशेषांच्या ठिकाणी ही अप्रतिम मंदिरे बांधली होती.पण प्रत्यक्षात ग्रीक आणि रोमन यांनी त्यांच्या अलौकिक इमारती बांधल्या होत्या ती जागा,तो टेरेस किंवा भव्य प्लॅटफॉर्म ग्रीक वा रोमन यापैकी कोणीच बांधलेला नव्हता. आणि बालबेकच्या टेरेसचे रहस्य हेच आहे. ग्रीकांनी प्रथम इथे मंदिरे बांधली तेव्हा त्यांनी या शहराला नाव दिले हेलिओपोलिस किंवा 'सूर्यदेवाचे शहर.पण ही मंदिरे त्यांनी बांधली ती आधीच अस्तित्वात असलेल्या बालबेकच्या टेरेसवर.तो ३००० वर्षांहून जास्त काळ आपल्याला माहिती आहे.

टिआहुआन्कोप्रमाणेच बालबेक तंत्रशुद्ध आधारावर बांधलेले होते.हा टेरेस बांधण्यासाठी ६०-६० फूट लांब आणि २००० टन वजनाच्या शिळा वापरल्या आहेत. तो खरोखर किती जुना आहे.याची कल्पना नाही;पण ग्रीक आणि रोमन दोघांनीही त्यांची मंदिरे बांधायला त्याचा उपयोग केला हे खरे. प्रथम हा टेरेस जेव्हा बांधला गेला तेव्हा या अजस्त्र शिळा इथे कशा हलवल्या गेल्या असतील?


आज शास्त्रज्ञांनी खूप संशोधन करून काही संस्कृती या भूतलावर होऊन गेल्या हे सिद्ध केले आहे.त्यातल्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अशा तीन संस्कृती आहेत.माया,सुमेरियन आणि इजिप्शियन! पण या संस्कृतींचा सुद्धा सलग असा इतिहास सापडत नाही.त्या फार पुढारलेल्या होत्या हेच आपल्याला माहीत आहे. तसे पाहिले तर ज्याला मानवाचा ज्ञात इतिहास म्हणता येईल तो फार प्राचीन काळापासूनचा नाही.तो सुरू होतो सुमारे ७००० वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन संस्कृतीपासून.


इजिप्शियन संस्कृती म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते पिरॅमिड;पण पिरॅमिडच्या बांधणीत गणिताचा भाग फार मोठा आहे.म्हणजे त्यावेळच्या मानवाने गणितात खूप प्राविण्य मिळविले होते हे उघडच आहे.याच संस्कृतीत अक्षरलिपी जन्माला आली,

औषधांचा वापर सुरू झाला,पण डोळ्यात भरते ते इजिप्शियन लोकांचे वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्र.


त्यांनी बांधलेली प्रचंड शहरे,भव्य मंदिरे,दुतर्फा शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने असलेले सुंदर रस्ते, खडकात कोरलेली वैभवशाली थडगी आणि जगप्रसिद्ध पिरॅमिडस् आणि स्फिंक्स पाहताना आपली छाती दडपून जाते. या इजिप्शियन संस्कृतीचा जन्म म्हणजे जणू एका रात्रीत घडलेला चमत्कार वाटतो.या संस्कृतीचा आधीचा इतिहास माहिती नाही.हळुहळू सुधारणा होऊन ती भरभराटीला आली असे दिसत नाही.आपली प्रगत आणि अप्रतिम संस्कृती घेऊन इजिप्शियन लोक आले कुठून?अगदी अचानक आणि एकाएकी ?


तसे त्या लोकांनी अनेक पिरॅमिडस् बांधले परंतु त्यापैकी सर्वांत प्रसिद्ध असलेला पिरॅमिड म्हणजे कैरो शहराच्या पश्चिमेकडील खुफू या राजाचा पिरॅमिड.तसा तो जवळ जवळ ५११ फूट उंच असावा पण हजारो वर्षे नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आता त्याची उंची ४९० फूटच राहिली आहे. या भव्य पिरॅमिडसाठी प्रत्येकी १२ टन वजनाचे २६ लाख दगड तरी ठराविक आकारात कापून वापरले आहेत.


इजिप्तमध्ये धान्य पिकते ते फक्त नाईल नदीच्या खोऱ्यात.

७००० वर्षांपूर्वी तो प्रचंड पिरॅमिड बांधताना इजिप्तची लोकसंख्या कोटी होती. असे तज्ज्ञ सांगतात तर फक्त ५००० वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या म्हणे फक्त कोटी होती असे दुसरे तज्ज्ञ सांगतात.लोकसंख्येचा वाद सोडला तरी एक गोष्ट निश्चित होती.या सर्व लोकांना अन्नपाणी पुरवायलाच हवे होते.लाखो गुलाम,हातात अमर्याद सत्ता असणारे आणि लाडावून ठेवलेले धर्मगुरू,व्यापारी,

शेतकरी,सैन्य व इतर प्रजा या सर्वांची गुजराण त्या काळात इजिप्तमध्ये पिकू शकणाऱ्या धान्यावर होणार होती? अशक्य! आजतागायत कधीही,फक्त इजिप्तच्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्यही तिथे पिकवता आलेले नाही.पिरॅमिडसाठी लागणारे दगड खाणींपासून पिरॅमिडच्या जागेवर आणण्यासाठी म्हणे लाकडी रोलर्स वापरले.पुन्हा लाकडी ठोकळ्यांच्या आणि फळ्यांच्या सहाय्याने ते एकमेकांवर चढवले.पण इजिप्तच्या वाळवंटात एवढे लाकूड कधी होते आणि आणणार तरी कुठून?थोडी फार खजुरांची झाडे असतील तरी ती तोडणे शक्यच नव्हते. तेवढेच अन्न आणि निवारा त्यावेळी होता, आजही आहे.लाकूड आयात करण्याचे म्हटले तर तेवढे नौदल पाहिजे.पुन्हा अलेक्झांड्रिया बंदरात लाकडे उतरवल्यावर नाईल नदीतून कैरोला न्यायला हवीत. छे! पिरॅमिडसाठी वापरलेले दगड खाणीपासून पिरॅमिडच्या जागेपर्यंत कसे नेले त्याला पटणारे स्पष्टीकरण नाही.तरी 'इजिप्त' या विषयावरचे तज्ज्ञ अजूनही हे चिरे लाकडी रोलर्सवरून ओढून नेले या आपल्या आवडत्या सिद्धान्ताला चिकटूनच आहेत.


पिरॅमिड बांधण्याच्या तंत्राबद्दल सुद्धा अनेक शंका आहेत.इजिप्शियन लोकांनी खडकांमध्ये दैदिप्यमान थडगी कशी कोरून काढली? पुन्हा या थडग्यात,

खोल्या,गॅलऱ्या,बोगदे यांचे इतके चक्रव्यूह आहेत की मती गुंग होते.सर्व भिंती, जमिनी अगदी गुळगुळीत आहेत.

अगदी तळाशी असणाऱ्या शवघरांकडे जाणाऱ्या पायऱ्यासुद्धा अगदी उत्कृष्ट आहेत.इजिप्शियन लोक सूर्योपासक होते. पिरॅमिडवरील ग्रंथ सांगतात की त्यांचे राजे अंतराळात देवांबरोबर संचार करीत असत.तेव्हा देव आणि इजिप्तचे राजे यांचा पुन्हा उडण्याशी संबंध होताच.

खुफूच्या पिरॅमिडच्या उंचीला १००० दशलक्षांनी गुणले तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातले अंतर कळते. (९ कोटी ३० लक्ष मैल) पिरॅमिड दुभंगणारी रेषा फक्त सर्व खंडांचीच नव्हे तर पृथ्वीवरील महासागरांची सुद्धा बरोबर दोन भागात विभागणी करते. पिरॅमिडच्या पायाच्या क्षेत्रफळाला पिरॅमिडच्या दुप्पट उंचीने 'भागले तर सुप्रसिद्ध π = ३.१४१५९ हा आकडा मिळतो.पृथ्वीच्या वजनाबाबतची कोष्टके पिरॅमिडमध्ये मिळतात. या सर्व काय योगायोगाच्या गोष्टी आहेत ?


पिरॅमिड बांधला तिथला खडकाळ भाग तरी इतका व्यवस्थित सपाट कसा केला ?इजिप्तमधील वाळवंटी आणि खडकाळ भागात पिरॅमिडसाठी हीच जागा का निवडली ? शक्य आहे की तिथल्या खडकाळ प्रदेशात नैसर्गिक असा खड्डा होता की ज्याचा योग्य वापर करून तो पिरॅमिड त्यांनी बांधला.किंवा राजाची इच्छा असेल की रात्रंदिवस काम कसे चालले आहे यावर लक्ष ठेवावे आणि म्हणून त्याच्या राजवाड्याजवळची जागा निवडली. पण या गोष्टी संपूर्णतःअव्यवहार्य आहेत. जागाच निवडायची तर ती निदान दगडांच्या खाणीजवळच का निवडली नाही? लाखो दगड खाणींपासून दूर न्यायचा त्रास तरी वाचला असता.बांधल्या जाणाऱ्या पिरॅमिडवर नजर ठेवता यावी म्हणून वर्षानुवर्षे खडाखडा, घणाघणा आवाज ऐकायला जर कोणता फॅरोह राजा तयार झाला असता तर त्याचे डोके ठिकाणावर आहे का असेच विचारावे लागले असते. पिरॅमिडची जागा शोधताना कुणाची सोय पाहिली? कसली सोय पाहिली ? पिरॅमिडसाठी नेमकी तीच जागा का निवडली यालाही उत्तर नाही.मग 'देवांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे ही जागा निवडली नसेल ना?' धर्मगुरुंच्या मुखातून ही आज्ञा वदविली गेली असेल तर त्याला कोणी विरोध करणे शक्य नव्हते.


पिरॅमिड दुभंगणारी रेषा सर्व खंडे आणि महासागरांची दोन सारख्या भागातविभागणी करतेच पण पिरॅमिडसुद्धा बरोबर सर्व खंडांच्या गुरुत्वमध्याच्या जागी आहे.


( देव ? छे परग्रहावरील अंतराळवीर 

बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे )


या सर्व गोष्टी योगायोगाच्या असणेच अशक्य आहे.

पृथ्वीचा चेंडूसारखा आकार,खंडे, महासागर या सर्वांचा विचार करूनच पिरॅमिडची जागा निश्चित केली असली पाहिजे.पण इतके ज्ञान त्यावेळी होते कुणाला ? कोणती शक्ती, कोणती यंत्रे,कोणते तंत्रज्ञान वापरून हा खडकाळ भाग सपाट केला? भूगर्भात खोलपर्यंत जाणारे रस्ते कसे बांधले? पिरॅमिडमध्ये काय किंवा खडकातून कोरून काढलेल्या अप्रतिम थडग्यात काम करताना उजेडासाठी काय वापरले? छतांवर,भिंतींवर कधी कुठे काजळी धरल्याची दिसत नाही किंवा काजळी धरली होती आणि मग ती साफ केली अशी पुसटशी खूणही दिसत नाही.


कोणत्या आयुधांनी खाणीतून गुळगुळीत बाजू आणि धारदार कडा असलेले दगड बनवले,ते पिरॅमिडच्या जागेवर आणले आणि १/१००० इंच जवळ ठेवून एकमेकांवर रचले ? 


चोखंदळपणे विचार केला तर पिरॅमिडच्या बाबतीत आजवर देण्यात आलेली स्पष्टीकरणे पटत नाहीत.स्पष्ट दिसते ती एकच गोष्ट.खुफूचा पिरॅमिड नक्की कुठल्या काळात बांधला गेला ते कळत नाही,त्याचे खरे महत्त्व समजत नाही आणि विसाव्या शतकातले अत्याधुनिक तंत्रज्ञान एकवटून प्रयत्न केला तरी त्याची प्रतिकृती बांधता येत नाही.पिरॅमिडची जागा म्हणे फॅरोह राजाच्या लहरीने निवडली.पिरॅमिडची उंची,पाया वगैरे मापे बांधणाऱ्यांना सहज सुचली.प्रत्येकी १२ टन वजनाचे २६ लाख दगड खाणीतून काढले,गुळगुळीत केले, अस्तित्वात नसलेल्या लाकडी रोलर्सवरून पिरॅमिडच्या जागेपर्यंत खेचत नेले,एकमेकांवर रचले आणि आतल्या खोल्यात रंगीत चित्रेही काढली.पिरॅमिड बांधणारे लक्षावधी गुलाम आणि इजिप्तची लोकसंख्या यांची गुजराण इजिप्तमध्ये पिकू न शकणाऱ्या धान्यावर होत होती.आणि गुलामांना उत्तेजन देण्यासाठी व दगड एकमेकांवर चढवताना करमणूक करण्यासाठी काय लाऊडस्पीकरवर गाणी लावत होते? आणि हे सर्व प्रकार किती वर्षे चालू होते? कमीत कमी ६५० वर्षे तरी ! अगदी ढोबळपणे दिवसाला दहा दगड खाणीतून काढून, व्यवस्थित गुळगुळीत करून, ठराविक मापात कापून एकमेकांवर चढवले असते तरीही लाखो गुलामांनी या कामासाठी इतका काळ घेतलाच असता.आजपर्यंतच्या इतिहासाने दुसरे काही नाही तरी एक गोष्ट साधली होती.आपली बुद्धीच भ्रष्ट केली होती.

नाहीतर पिरॅमिड कसा बांधला गेला याबाबत इतिहासात दिलेले एकही स्पष्टीकरण व्यवहाराच्या कसोटीला उतरत नाही हे आपल्याला कधीच कळले असते.


अजूनही म्हणाल की पिरॅमिड उभारण्याच्या तंत्रातील गणित,भूगर्भशास्त्र,खगोलशास्त्र याबाबतचे सर्व ज्ञान हा एक योगायोगाचा प्रकार होता म्हणून? किंवा त्यामागे कोणत्याही तऱ्हेची योजना नव्हती म्हणून? इजिप्तमध्ये सापडलेले प्राचीन लिखाण दर्शविते की पिरॅमिड खुफू या राजाच्या आज्ञेने बांधला.कोणत्याही एका राजाच्या आयुष्यात पिरॅमिड बांधून होणे शक्य नव्हते; पण खुफूने हा पिरॅमिड बांधलाच नव्हता आणि स्वतःला प्रसिद्धी मिळावी या हेतूने खोटे लिखाण करवून घेऊन तो त्याने स्वत:च्या नावावर 'खपवला' असा तर प्रकार नसेल? निरंकुश सत्ताधाऱ्यांची प्रसिद्धीची हाव व त्यासाठी त्यांनी इतिहासच बदलून लिहिण्याचे केलेले प्रयत्न दाखवणारे पुरावे ऐतिहासिक काळात सुद्धा कमी नाहीत.शक्य आहे की अस्तित्वात असलेला पिरॅमिड आपणच बांधला अशी नोंद भविष्यकाळात व्हावी अशी काळजी खुफूने घेतली होती म्हणून! ही शंका मनात यायलाही तशीच कारणे आहेत.पिरॅमिडवर जितके जितके जास्त संशोधन होत आहे,तसा तसा तो वाटत होता त्याहून जास्तीच प्राचीन असावा असा संशय यायला लागला आहे.


ऑक्सफर्ड येथे सापडलेल्या एका पौराणिक हस्तलिखितात म्हटले आहे की,पिरॅमिड राजा सुरीद याने बांधला.साधारण ११००० वर्षांपूर्वी महान जलप्रलयाने जगबुडीची वेळ आली होती असे सर्व धर्मग्रंथ सांगतात आणि सुरीदने तर महापुराच्या आधी इजिप्तमध्ये राज्य केले होते. राजा सुरीद हा खरोखरच अत्यंत विद्वान राजा होता. त्याने त्याच्या धर्मगुरुंना आज्ञा दिली होती की त्यांनी त्यांचे सर्व ज्ञान लिहून पिरॅमिडमध्ये जतन करून ठेवावे म्हणून. या हस्तलिखिता प्रमाणे तर पिरॅमिड बांधण्याचा काळ खूपच मागे जातो.हेरोडोटस हा ग्रीक इतिहासकार होऊन गेला. सिसेरोने त्याला 'इतिहासाचा 'जन्मदाता' असेच नाव दिले होते. त्याने आयुष्याचा बराच काळ आफ्रिका आणि मध्यपूर्वेतले देश भटकण्यात घालवला होता.तो जेव्हा प्रवास करीत इजिप्तमध्ये आला तेव्हा थेबेस येथील धर्मगुरुंनी आधीच्या प्रत्येक धर्मगुरुचा एक याप्रमाणे ११३४० वर्षातील ३४१ प्रमुख धर्मगुरुंचे प्रचंड पुतळे त्याला दाखवले होते. स्वतःच्या आयुष्यातच आपला पुतळा बनवून ठेवण्याची त्यावेळची पद्धत होती.त्यावेळच्या धर्मगुरुंनीही त्यांचे बनवलेले पुतळे त्याला दाखवले होते.बापानंतर मुलगा त्याची गादी पुढे चालवणार ही परंपरा त्या काळात चालत आली होती.

धर्मगुरुंनी सत्याला स्मरून हेरोडोटसला आश्वासन दिले की त्यांनी दिलेली माहिती खरीच आहे आणि त्याप्रमाणे त्यांची कित्येक ग्रंथात पिढ्यान्पिढ्या केलेली नोंदही आहे.पुतळे दर्शवत असलेल्या ३४१ पिढ्यांपूर्वी त्यांचे देव त्यांच्यात राहत होते.त्यानंतर मात्र कधीही त्यांचे देव त्यांच्यात रहायला आले नव्हते.


इजिप्तचा काळ साधारणतः ६५०० वर्षांपूर्वीचा असताना धर्मगुरुंनी चक्क ११३४० वर्षांचा काळ कुठला सांगितला ? की हेरोडोटसला त्यांनी सरळ खोटीच माहिती दिली होती? आणि ३४१ पिढ्यांपूर्वी देव त्यांच्यात राहत होते असे ते पुनः पुन्हा का सांगत होते? देव त्यांच्यात खरोखर राहून गेले नसतील तर ही सर्व आकडेवारी फुकट होती.

पिरॅमिडबद्दल शेवटी एकच गोष्ट वादातीत दिसते.


४९० फूट उंचीचा, ३१,२००,००० टन वजनाचा, अजस्त्र पिरॅमिड कोणी बांधला,कसा बांधला, या कोणत्याही गोष्टीची खरी माहिती आपल्याला नाही.


अत्यंत प्रगत अशा तंत्रज्ञानाची साक्ष पटवत हजारो वर्षे उभे असलेले हे ऐतिहासिक स्मारक एका राजाचे थडगे आहे असे अजूनही ज्यांना म्हणावेसे वाटते त्यांनी ते म्हणावे आणि त्यावर ज्यांचा विश्वास बसत असेल त्यांनी तो ठेवावा. इजिप्शियन संस्कृतीशी संबंधित आणखी एक गूढ रहस्य म्हणजे 'ममीज् .'


उर्वरीत भाग पुढील लेखामध्ये..


जुनी पुस्तके!

जुनी पुस्तके,

उनाड स्वतंत्र पुस्तके,

विस्थापित पुस्तके!

पक्षांच्या थव्यासारखी माझ्या दारी अवतरली.

रंगबिरंगी पिसे असलेली विविध पुस्तके!

त्यांचे प्रकार वेगळे नावे वेगळी!

ग्रंथालयातील शिष्ठ आणि माणसाळलेल्या

पुस्तकात यांची मजा नाही.

या अचानक गवसलेल्या पुस्तकांमध्ये

एखादा जिवापाडाचा मित्र मिळून जातो

आयुष्यभर सोबत करण्यासाठी.

- व्हर्जिनिया वुल्फ

(जसे मला वॉल्डन मिळाले!) 

- जयंत कुलकर्णी.

' ज्ञात,अज्ञात,लेखक,अनुवादक,प्रकाशक पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सर्वोत्तम सहभागी असणारे या सर्वांचा मी एक वाचक म्हणून ऋणी आहे.सदैवच '