लेबनॉनमधील ३७६० फूट उंचीवरील बालबेक या ठिकाणी रोमन सम्राट ऑगस्टस याने बांधलेल्या भव्य मंदिराचे अवशेषसुद्धा आज प्रवाशांना स्तंभित करतात.
त्यांनी ग्रीक लोकांच्या मंदिरांच्या अवशेषांच्या ठिकाणी ही अप्रतिम मंदिरे बांधली होती.पण प्रत्यक्षात ग्रीक आणि रोमन यांनी त्यांच्या अलौकिक इमारती बांधल्या होत्या ती जागा,तो टेरेस किंवा भव्य प्लॅटफॉर्म ग्रीक वा रोमन यापैकी कोणीच बांधलेला नव्हता. आणि बालबेकच्या टेरेसचे रहस्य हेच आहे. ग्रीकांनी प्रथम इथे मंदिरे बांधली तेव्हा त्यांनी या शहराला नाव दिले हेलिओपोलिस किंवा 'सूर्यदेवाचे शहर.पण ही मंदिरे त्यांनी बांधली ती आधीच अस्तित्वात असलेल्या बालबेकच्या टेरेसवर.तो ३००० वर्षांहून जास्त काळ आपल्याला माहिती आहे.
टिआहुआन्कोप्रमाणेच बालबेक तंत्रशुद्ध आधारावर बांधलेले होते.हा टेरेस बांधण्यासाठी ६०-६० फूट लांब आणि २००० टन वजनाच्या शिळा वापरल्या आहेत. तो खरोखर किती जुना आहे.याची कल्पना नाही;पण ग्रीक आणि रोमन दोघांनीही त्यांची मंदिरे बांधायला त्याचा उपयोग केला हे खरे. प्रथम हा टेरेस जेव्हा बांधला गेला तेव्हा या अजस्त्र शिळा इथे कशा हलवल्या गेल्या असतील?
आज शास्त्रज्ञांनी खूप संशोधन करून काही संस्कृती या भूतलावर होऊन गेल्या हे सिद्ध केले आहे.त्यातल्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अशा तीन संस्कृती आहेत.माया,सुमेरियन आणि इजिप्शियन! पण या संस्कृतींचा सुद्धा सलग असा इतिहास सापडत नाही.त्या फार पुढारलेल्या होत्या हेच आपल्याला माहीत आहे. तसे पाहिले तर ज्याला मानवाचा ज्ञात इतिहास म्हणता येईल तो फार प्राचीन काळापासूनचा नाही.तो सुरू होतो सुमारे ७००० वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन संस्कृतीपासून.
इजिप्शियन संस्कृती म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते पिरॅमिड;पण पिरॅमिडच्या बांधणीत गणिताचा भाग फार मोठा आहे.म्हणजे त्यावेळच्या मानवाने गणितात खूप प्राविण्य मिळविले होते हे उघडच आहे.याच संस्कृतीत अक्षरलिपी जन्माला आली,
औषधांचा वापर सुरू झाला,पण डोळ्यात भरते ते इजिप्शियन लोकांचे वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्र.
त्यांनी बांधलेली प्रचंड शहरे,भव्य मंदिरे,दुतर्फा शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने असलेले सुंदर रस्ते, खडकात कोरलेली वैभवशाली थडगी आणि जगप्रसिद्ध पिरॅमिडस् आणि स्फिंक्स पाहताना आपली छाती दडपून जाते. या इजिप्शियन संस्कृतीचा जन्म म्हणजे जणू एका रात्रीत घडलेला चमत्कार वाटतो.या संस्कृतीचा आधीचा इतिहास माहिती नाही.हळुहळू सुधारणा होऊन ती भरभराटीला आली असे दिसत नाही.आपली प्रगत आणि अप्रतिम संस्कृती घेऊन इजिप्शियन लोक आले कुठून?अगदी अचानक आणि एकाएकी ?
तसे त्या लोकांनी अनेक पिरॅमिडस् बांधले परंतु त्यापैकी सर्वांत प्रसिद्ध असलेला पिरॅमिड म्हणजे कैरो शहराच्या पश्चिमेकडील खुफू या राजाचा पिरॅमिड.तसा तो जवळ जवळ ५११ फूट उंच असावा पण हजारो वर्षे नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आता त्याची उंची ४९० फूटच राहिली आहे. या भव्य पिरॅमिडसाठी प्रत्येकी १२ टन वजनाचे २६ लाख दगड तरी ठराविक आकारात कापून वापरले आहेत.
इजिप्तमध्ये धान्य पिकते ते फक्त नाईल नदीच्या खोऱ्यात.
७००० वर्षांपूर्वी तो प्रचंड पिरॅमिड बांधताना इजिप्तची लोकसंख्या ५ कोटी होती. असे तज्ज्ञ सांगतात तर फक्त ५००० वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या म्हणे फक्त ३ कोटी होती असे दुसरे तज्ज्ञ सांगतात.लोकसंख्येचा वाद सोडला तरी एक गोष्ट निश्चित होती.या सर्व लोकांना अन्नपाणी पुरवायलाच हवे होते.लाखो गुलाम,हातात अमर्याद सत्ता असणारे आणि लाडावून ठेवलेले धर्मगुरू,व्यापारी,
शेतकरी,सैन्य व इतर प्रजा या सर्वांची गुजराण त्या काळात इजिप्तमध्ये पिकू शकणाऱ्या धान्यावर होणार होती? अशक्य! आजतागायत कधीही,फक्त इजिप्तच्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्यही तिथे पिकवता आलेले नाही.पिरॅमिडसाठी लागणारे दगड खाणींपासून पिरॅमिडच्या जागेवर आणण्यासाठी म्हणे लाकडी रोलर्स वापरले.पुन्हा लाकडी ठोकळ्यांच्या आणि फळ्यांच्या सहाय्याने ते एकमेकांवर चढवले.पण इजिप्तच्या वाळवंटात एवढे लाकूड कधी होते आणि आणणार तरी कुठून?थोडी फार खजुरांची झाडे असतील तरी ती तोडणे शक्यच नव्हते. तेवढेच अन्न आणि निवारा त्यावेळी होता, आजही आहे.लाकूड आयात करण्याचे म्हटले तर तेवढे नौदल पाहिजे.पुन्हा अलेक्झांड्रिया बंदरात लाकडे उतरवल्यावर नाईल नदीतून कैरोला न्यायला हवीत. छे! पिरॅमिडसाठी वापरलेले दगड खाणीपासून पिरॅमिडच्या जागेपर्यंत कसे नेले त्याला पटणारे स्पष्टीकरण नाही.तरी 'इजिप्त' या विषयावरचे तज्ज्ञ अजूनही हे चिरे लाकडी रोलर्सवरून ओढून नेले या आपल्या आवडत्या सिद्धान्ताला चिकटूनच आहेत.
पिरॅमिड बांधण्याच्या तंत्राबद्दल सुद्धा अनेक शंका आहेत.इजिप्शियन लोकांनी खडकांमध्ये दैदिप्यमान थडगी कशी कोरून काढली? पुन्हा या थडग्यात,
खोल्या,गॅलऱ्या,बोगदे यांचे इतके चक्रव्यूह आहेत की मती गुंग होते.सर्व भिंती, जमिनी अगदी गुळगुळीत आहेत.
अगदी तळाशी असणाऱ्या शवघरांकडे जाणाऱ्या पायऱ्यासुद्धा अगदी उत्कृष्ट आहेत.इजिप्शियन लोक सूर्योपासक होते. पिरॅमिडवरील ग्रंथ सांगतात की त्यांचे राजे अंतराळात देवांबरोबर संचार करीत असत.तेव्हा देव आणि इजिप्तचे राजे यांचा पुन्हा उडण्याशी संबंध होताच.
खुफूच्या पिरॅमिडच्या उंचीला १००० दशलक्षांनी गुणले तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातले अंतर कळते. (९ कोटी ३० लक्ष मैल) पिरॅमिड दुभंगणारी रेषा फक्त सर्व खंडांचीच नव्हे तर पृथ्वीवरील महासागरांची सुद्धा बरोबर दोन भागात विभागणी करते. पिरॅमिडच्या पायाच्या क्षेत्रफळाला पिरॅमिडच्या दुप्पट उंचीने 'भागले तर सुप्रसिद्ध π = ३.१४१५९ हा आकडा मिळतो.पृथ्वीच्या वजनाबाबतची कोष्टके पिरॅमिडमध्ये मिळतात. या सर्व काय योगायोगाच्या गोष्टी आहेत ?
पिरॅमिड बांधला तिथला खडकाळ भाग तरी इतका व्यवस्थित सपाट कसा केला ?इजिप्तमधील वाळवंटी आणि खडकाळ भागात पिरॅमिडसाठी हीच जागा का निवडली ? शक्य आहे की तिथल्या खडकाळ प्रदेशात नैसर्गिक असा खड्डा होता की ज्याचा योग्य वापर करून तो पिरॅमिड त्यांनी बांधला.किंवा राजाची इच्छा असेल की रात्रंदिवस काम कसे चालले आहे यावर लक्ष ठेवावे आणि म्हणून त्याच्या राजवाड्याजवळची जागा निवडली. पण या गोष्टी संपूर्णतःअव्यवहार्य आहेत. जागाच निवडायची तर ती निदान दगडांच्या खाणीजवळच का निवडली नाही? लाखो दगड खाणींपासून दूर न्यायचा त्रास तरी वाचला असता.बांधल्या जाणाऱ्या पिरॅमिडवर नजर ठेवता यावी म्हणून वर्षानुवर्षे खडाखडा, घणाघणा आवाज ऐकायला जर कोणता फॅरोह राजा तयार झाला असता तर त्याचे डोके ठिकाणावर आहे का असेच विचारावे लागले असते. पिरॅमिडची जागा शोधताना कुणाची सोय पाहिली? कसली सोय पाहिली ? पिरॅमिडसाठी नेमकी तीच जागा का निवडली यालाही उत्तर नाही.मग 'देवांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे ही जागा निवडली नसेल ना?' धर्मगुरुंच्या मुखातून ही आज्ञा वदविली गेली असेल तर त्याला कोणी विरोध करणे शक्य नव्हते.
पिरॅमिड दुभंगणारी रेषा सर्व खंडे आणि महासागरांची दोन सारख्या भागातविभागणी करतेच पण पिरॅमिडसुद्धा बरोबर सर्व खंडांच्या गुरुत्वमध्याच्या जागी आहे.
( देव ? छे परग्रहावरील अंतराळवीर
बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे )
या सर्व गोष्टी योगायोगाच्या असणेच अशक्य आहे.
पृथ्वीचा चेंडूसारखा आकार,खंडे, महासागर या सर्वांचा विचार करूनच पिरॅमिडची जागा निश्चित केली असली पाहिजे.पण इतके ज्ञान त्यावेळी होते कुणाला ? कोणती शक्ती, कोणती यंत्रे,कोणते तंत्रज्ञान वापरून हा खडकाळ भाग सपाट केला? भूगर्भात खोलपर्यंत जाणारे रस्ते कसे बांधले? पिरॅमिडमध्ये काय किंवा खडकातून कोरून काढलेल्या अप्रतिम थडग्यात काम करताना उजेडासाठी काय वापरले? छतांवर,भिंतींवर कधी कुठे काजळी धरल्याची दिसत नाही किंवा काजळी धरली होती आणि मग ती साफ केली अशी पुसटशी खूणही दिसत नाही.
कोणत्या आयुधांनी खाणीतून गुळगुळीत बाजू आणि धारदार कडा असलेले दगड बनवले,ते पिरॅमिडच्या जागेवर आणले आणि १/१००० इंच जवळ ठेवून एकमेकांवर रचले ?
चोखंदळपणे विचार केला तर पिरॅमिडच्या बाबतीत आजवर देण्यात आलेली स्पष्टीकरणे पटत नाहीत.स्पष्ट दिसते ती एकच गोष्ट.खुफूचा पिरॅमिड नक्की कुठल्या काळात बांधला गेला ते कळत नाही,त्याचे खरे महत्त्व समजत नाही आणि विसाव्या शतकातले अत्याधुनिक तंत्रज्ञान एकवटून प्रयत्न केला तरी त्याची प्रतिकृती बांधता येत नाही.पिरॅमिडची जागा म्हणे फॅरोह राजाच्या लहरीने निवडली.पिरॅमिडची उंची,पाया वगैरे मापे बांधणाऱ्यांना सहज सुचली.प्रत्येकी १२ टन वजनाचे २६ लाख दगड खाणीतून काढले,गुळगुळीत केले, अस्तित्वात नसलेल्या लाकडी रोलर्सवरून पिरॅमिडच्या जागेपर्यंत खेचत नेले,एकमेकांवर रचले आणि आतल्या खोल्यात रंगीत चित्रेही काढली.पिरॅमिड बांधणारे लक्षावधी गुलाम आणि इजिप्तची लोकसंख्या यांची गुजराण इजिप्तमध्ये पिकू न शकणाऱ्या धान्यावर होत होती.आणि गुलामांना उत्तेजन देण्यासाठी व दगड एकमेकांवर चढवताना करमणूक करण्यासाठी काय लाऊडस्पीकरवर गाणी लावत होते? आणि हे सर्व प्रकार किती वर्षे चालू होते? कमीत कमी ६५० वर्षे तरी ! अगदी ढोबळपणे दिवसाला दहा दगड खाणीतून काढून, व्यवस्थित गुळगुळीत करून, ठराविक मापात कापून एकमेकांवर चढवले असते तरीही लाखो गुलामांनी या कामासाठी इतका काळ घेतलाच असता.आजपर्यंतच्या इतिहासाने दुसरे काही नाही तरी एक गोष्ट साधली होती.आपली बुद्धीच भ्रष्ट केली होती.
नाहीतर पिरॅमिड कसा बांधला गेला याबाबत इतिहासात दिलेले एकही स्पष्टीकरण व्यवहाराच्या कसोटीला उतरत नाही हे आपल्याला कधीच कळले असते.
अजूनही म्हणाल की पिरॅमिड उभारण्याच्या तंत्रातील गणित,भूगर्भशास्त्र,खगोलशास्त्र याबाबतचे सर्व ज्ञान हा एक योगायोगाचा प्रकार होता म्हणून? किंवा त्यामागे कोणत्याही तऱ्हेची योजना नव्हती म्हणून? इजिप्तमध्ये सापडलेले प्राचीन लिखाण दर्शविते की पिरॅमिड खुफू या राजाच्या आज्ञेने बांधला.कोणत्याही एका राजाच्या आयुष्यात पिरॅमिड बांधून होणे शक्य नव्हते; पण खुफूने हा पिरॅमिड बांधलाच नव्हता आणि स्वतःला प्रसिद्धी मिळावी या हेतूने खोटे लिखाण करवून घेऊन तो त्याने स्वत:च्या नावावर 'खपवला' असा तर प्रकार नसेल? निरंकुश सत्ताधाऱ्यांची प्रसिद्धीची हाव व त्यासाठी त्यांनी इतिहासच बदलून लिहिण्याचे केलेले प्रयत्न दाखवणारे पुरावे ऐतिहासिक काळात सुद्धा कमी नाहीत.शक्य आहे की अस्तित्वात असलेला पिरॅमिड आपणच बांधला अशी नोंद भविष्यकाळात व्हावी अशी काळजी खुफूने घेतली होती म्हणून! ही शंका मनात यायलाही तशीच कारणे आहेत.पिरॅमिडवर जितके जितके जास्त संशोधन होत आहे,तसा तसा तो वाटत होता त्याहून जास्तीच प्राचीन असावा असा संशय यायला लागला आहे.
ऑक्सफर्ड येथे सापडलेल्या एका पौराणिक हस्तलिखितात म्हटले आहे की,पिरॅमिड राजा सुरीद याने बांधला.साधारण ११००० वर्षांपूर्वी महान जलप्रलयाने जगबुडीची वेळ आली होती असे सर्व धर्मग्रंथ सांगतात आणि सुरीदने तर महापुराच्या आधी इजिप्तमध्ये राज्य केले होते. राजा सुरीद हा खरोखरच अत्यंत विद्वान राजा होता. त्याने त्याच्या धर्मगुरुंना आज्ञा दिली होती की त्यांनी त्यांचे सर्व ज्ञान लिहून पिरॅमिडमध्ये जतन करून ठेवावे म्हणून. या हस्तलिखिता प्रमाणे तर पिरॅमिड बांधण्याचा काळ खूपच मागे जातो.हेरोडोटस हा ग्रीक इतिहासकार होऊन गेला. सिसेरोने त्याला 'इतिहासाचा 'जन्मदाता' असेच नाव दिले होते. त्याने आयुष्याचा बराच काळ आफ्रिका आणि मध्यपूर्वेतले देश भटकण्यात घालवला होता.तो जेव्हा प्रवास करीत इजिप्तमध्ये आला तेव्हा थेबेस येथील धर्मगुरुंनी आधीच्या प्रत्येक धर्मगुरुचा एक याप्रमाणे ११३४० वर्षातील ३४१ प्रमुख धर्मगुरुंचे प्रचंड पुतळे त्याला दाखवले होते. स्वतःच्या आयुष्यातच आपला पुतळा बनवून ठेवण्याची त्यावेळची पद्धत होती.त्यावेळच्या धर्मगुरुंनीही त्यांचे बनवलेले पुतळे त्याला दाखवले होते.बापानंतर मुलगा त्याची गादी पुढे चालवणार ही परंपरा त्या काळात चालत आली होती.
धर्मगुरुंनी सत्याला स्मरून हेरोडोटसला आश्वासन दिले की त्यांनी दिलेली माहिती खरीच आहे आणि त्याप्रमाणे त्यांची कित्येक ग्रंथात पिढ्यान्पिढ्या केलेली नोंदही आहे.पुतळे दर्शवत असलेल्या ३४१ पिढ्यांपूर्वी त्यांचे देव त्यांच्यात राहत होते.त्यानंतर मात्र कधीही त्यांचे देव त्यांच्यात रहायला आले नव्हते.
इजिप्तचा काळ साधारणतः ६५०० वर्षांपूर्वीचा असताना धर्मगुरुंनी चक्क ११३४० वर्षांचा काळ कुठला सांगितला ? की हेरोडोटसला त्यांनी सरळ खोटीच माहिती दिली होती? आणि ३४१ पिढ्यांपूर्वी देव त्यांच्यात राहत होते असे ते पुनः पुन्हा का सांगत होते? देव त्यांच्यात खरोखर राहून गेले नसतील तर ही सर्व आकडेवारी फुकट होती.
पिरॅमिडबद्दल शेवटी एकच गोष्ट वादातीत दिसते.
४९० फूट उंचीचा, ३१,२००,००० टन वजनाचा, अजस्त्र पिरॅमिड कोणी बांधला,कसा बांधला, या कोणत्याही गोष्टीची खरी माहिती आपल्याला नाही.
अत्यंत प्रगत अशा तंत्रज्ञानाची साक्ष पटवत हजारो वर्षे उभे असलेले हे ऐतिहासिक स्मारक एका राजाचे थडगे आहे असे अजूनही ज्यांना म्हणावेसे वाटते त्यांनी ते म्हणावे आणि त्यावर ज्यांचा विश्वास बसत असेल त्यांनी तो ठेवावा. इजिप्शियन संस्कृतीशी संबंधित आणखी एक गूढ रहस्य म्हणजे 'ममीज् .'
उर्वरीत भाग पुढील लेखामध्ये..
जुनी पुस्तके!
जुनी पुस्तके,
उनाड स्वतंत्र पुस्तके,
विस्थापित पुस्तके!
पक्षांच्या थव्यासारखी माझ्या दारी अवतरली.
रंगबिरंगी पिसे असलेली विविध पुस्तके!
त्यांचे प्रकार वेगळे नावे वेगळी!
ग्रंथालयातील शिष्ठ आणि माणसाळलेल्या
पुस्तकात यांची मजा नाही.
या अचानक गवसलेल्या पुस्तकांमध्ये
एखादा जिवापाडाचा मित्र मिळून जातो
आयुष्यभर सोबत करण्यासाठी.
- व्हर्जिनिया वुल्फ
(जसे मला वॉल्डन मिळाले!)
- जयंत कुलकर्णी.
' ज्ञात,अज्ञात,लेखक,अनुवादक,प्रकाशक पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सर्वोत्तम सहभागी असणारे या सर्वांचा मी एक वाचक म्हणून ऋणी आहे.सदैवच '