* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्राचीन आश्चर्ये का अंतराळप्रवास …भाग २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/८/२३

प्राचीन आश्चर्ये का अंतराळप्रवास …भाग २

अनेक पुराणवस्तू संशोधकांच्या मते शारीरिक पुनर्जन्मावर या इतिहासपूर्व काळातील लोकांचा दृढ विश्वास होता.पण त्या काळातील कोणत्याही धर्माच्या तत्त्वज्ञानात या पुनर्जन्माच्या कल्पनेचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही.'आत्मा अमर आहे' या सिद्धान्तावरील हा दृढ विश्वास असता तर मसाला भरून राजे,राण्या,

राजकन्या,राजपुत्र यांची प्रेते ताजीतवानी ठेवण्यासाठी इतके कष्ट घेण्याची गरज इजिप्शियन लोकांना नक्कीच नव्हती;पण पुराणकालीन इजिप्तमधील शेकडो ममीज् चक्क शारीरिक पुनर्जन्मावरील स्पष्ट विश्वासाचा पुरावा देत हजारो वर्षे आपल्या नजरेस पडत आहेत.देवांचा संबंध पुन्हा इथेही येतोच.कारण जुनी चित्रे,काव्ये दर्शवतात की या जतन करून ठेवलेल्या शरीरांना पुनर्जन्म देण्यासाठी ताऱ्यांवरून परत येण्याचे वचन देवांनी दिले होते.


ममीज् जतन करून ठेवलेल्या थडग्यात नाणी, अविनाशी सोने,हिरे,माणके यांचे अलंकार, त्यांच्या आवडत्या वस्तू तर आढळतातच;पण जिवंत गाडून टाकलेले नोकर-चाकर,दास-दासीसुद्धा आढळतात.जुने आयुष्य नव्याने सुरू करण्याचीच सर्व तयारी दिसते.ही थडगी अणुस्फोटालाही दाद न देण्याइतकी भक्कम आहेत.

नुसत्या काळाचा तर त्यांच्यावर परिणाम होणेच शक्य नव्हते.पण पुनर्जन्माची ही कल्पना इतकी दृढपणे त्यांच्या मनात रूजलीच कशी? आपल्या शरीरात जीव ओतला जाईल.हा विश्वास निर्माण झाला कसा?त्याच्या मागची भूमिका अत्यंत क्रांतिकारक आहे.जतन करून ठेवलेले शरीर संरक्षक आणि अभेद्य ठिकाणी ठेवायचे की ज्यामुळे शरीराचे आणि त्यातील पेशींचे रक्षण होईल आणि हजारो वर्षानंतर पुन्हा नव्या जीवनाची घडण केली जाईल ही विचारसरणी आली कशी त्यांच्या मनात ? धार्मिक

भावना क्षणभरच बाजूला ठेवू पण फॅरोह राजांना निश्चितच देव आणि त्यांच्या चालीरितींबद्दल जास्त माहिती होती.त्यांच्यापैकी कोणत्या राजाच्या मनात,

कोणत्या कारणाने ही कल्पना प्रथम रूजली असेल ? 'मी स्वत:साठी असे थडगे बनवीन की ज्याचा हजारो वर्षांत नाश होणार नाही.ते मी अशा ठिकाणी बांधीन की, कित्येक मैलांवरून दिसू शकेल.देवांनी वचन दिले आहे की ते परत येतील आणि मला उठवतील.' (का भविष्यकालीन डॉक्टरच मला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग शोधतील ? )


पण सध्याच्या अंतराळ युगाशी ममीज् चा काही संबंध आहे?


डॉक्टर आणि खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट एरिंजर यांनी १९२६ मध्ये लिहिलेल्या 'अमरत्वाची संभाव्यता' (The prospect of Immortality) या पुस्तकात सुचविले आहे की विसाव्या शतकातच मानव स्वतःला 'गोठवून घेऊ शकेल.वैद्यकीय आणि जीवनशास्त्राच्या दृष्टीने मानव जिवंत राहील पण त्याच्या पेशी नेहमीपेक्षा कोट्यावधी पटीने हळुहळू काम करून फक्त जिवंत राहतील.अशक्य?

रक्तपेढीसारख्या हल्ली अस्थिपेढी अस्तित्वात आहेत.

वर्षानुवर्षे अस्थी गोठवलेल्या परिस्थितीत ठेवून गरजे-

नुसार त्या पुन्हा वापरता येतात.रक्त तर अनंत काळपर्यंत (-) १९६° सेंटिग्रेड तापमानात ठेवून देता येते.शरीरातील पेशी द्रवरूप नायट्रोजनच्या तापमानात त्याच तऱ्हेने अनंतकाळ जिवंत ठेवता येतात.कोणत्या तरी फॅरोह राजाच्या मनात आलेली कल्पना सत्यसृष्टीत उतरण्याची वेळ हजारो वर्षानंतर खरोखरच आली आहे का?मार्च १९६३ मध्ये अमेरिकेतील ओक्लाहामा युनिव्हर्सिटीच्या दोन जीवशास्त्र तंत्रज्ञांनी खात्री पटवली की इजिप्तची राजकन्या मेने हिच्या कातडीच्या पेशी पुन्हा काम करण्याच्या परिस्थितीत आहेत.ही राजकन्या तर हजारो वर्षांपूर्वी मरण पावली आहे.त्याच वर्षी रशियन टेलिव्हिजनवर दोन कुत्रे दाखवले गेले.आठ दिवस त्यांना पार गोठवून टाकले होते, बाहेर काढल्यावर ते हळुहळू जिवंत झाले.


अमेरिकेच्या अंतराळ योजना कार्यक्रमात आज एक कठीण पेच उभा आहे.त्यात गुप्त असे काहीच नाही.

अंतराळातील कोणत्याही ग्रहावर स्वारी करायची म्हटले तर जो काळ जाईल तो शेकडो वर्षांचा सुद्धा असेल.

त्यासाठी दीर्घं निद्रावस्थेतील (Hibernation) परिस्थितीत अंतराळवीरांना जिवंत कसे ठेवायचे? 


प्रोफेसर एरिंजर यांची आज टर उडवली जाते.त्यांनी भविष्यात मानवाचा कृमिकीटक व आग यांनी नाश होणार नाही असे भविष्य वर्तवले आहे. अति शीत थडग्यात किंवा पेट्यात मृत माणसे ठेवली जातील.

वैद्यकशास्त्रात झपाट्याने जे शोध लागत आहेत; त्यात एक शोध असाही असणार आहे की मृत माणसे ज्या कारणांनी मरण पावलेली असतील त्यावर इलाज सापडला की ते कारणच शरीरातून काढून टाकायचे की तो माणूस पुन्हा जिवंत होईल..


पण मुख्य मुद्दा राहतोच.आपल्या प्राचीन पूर्वजांना पुनर्जन्माची ही कल्पना प्रथम कोणी दिली ?


शरीरातील सर्वच पेशी एकच कार्य करीत नाहीत. त्यांची निर्मिती,वाढ आणि क्षय या गोष्टी जन्मभर चालू असतात.

पण त्यांची क्रयशक्ती कमी करायची,ज्यामुळे त्यांचा क्षय लवकर होणार नाही.आणि त्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढेल; ही क्रांतिकारक कल्पना इजिप्शियन लोकांच्या मनात आली कशी ? इथेच ममीज् चा आणि प्राचीन भूतकाळात पृथ्वीला भेटी दिलेल्या अंतराळवीरांचा काही संबंध असेल ? एखाद्या राजाने राजपुत्राने,समाजातील प्रतिष्ठित माणसाने 'देव',त्यांची प्रेते अशा तऱ्हेने जतन करून अविनाशक दगडी पेट्यात ठेवताना पाहिले होते का? का काही देवांनीच (अंतराळवीरांनी) त्यांना आपणहून या मागची भूमिका समजावून सांगितली होती?


आजपासून काही शतकात पृथ्वीवरील मानवजात अंतराळ प्रवासात प्राविण्य मिळवील हे निर्विवाद ! या आधी अंतराळ प्रवासाच्या संशोधनाबरोबर इतर शास्त्रांच्या संशोधनातही प्रगती करावी लागणार आहे.इलेक्ट्रॉनिक्स सारख्या फक्त एखाद्याच तंत्रातील प्राविण्य उपयोगी पडणार नाही.मानवप्राणी शेकडो वर्षे जिवंत ठेवण्याचे कार्य वैद्यकशास्त्र आणि जीवनशास्त्रातील तज्ञांना अंतराळ संशोधनाचा एक भाग म्हणूनच पार पाडावे लागणार आहे.पण प्रक्रिया करून जतन केलेली शरीरे हजारो वर्षांनी पुन्हा चालती बोलती करण्याचे ज्ञान इतिहासपूर्व काळातील देवांना (अंतराळवीरांना) होते का ?-सुमेरियन राजे आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखांचे कल्पनातील आयुष्यमान आपण पाहिले आहे.अंतराळयानात प्रकाश वेगाने प्रवास करताना जाणाऱ्या काळात आणि पृथ्वीवरील काळात फार मोठी तफावत असणार हे आपल्याला कळत आहे.


'ममीज्' हा त्यांच्या अमर्याद आयुष्याचा दुसरा पुरावा असेल का? पुराण काळातल्या या व्यक्तींना अतिशीत पेट्यात गोठवून ठेवत असतील तर? समजा की प्राचीन काळातील अज्ञात अंतराळवीरांनीच त्या काळातील प्रमुख व्यक्तींना असे दीर्घ निद्रावस्थेत ठेवले होते आणि नंतरच्या त्यांच्या प्रत्येक भेटीच्या वेळी पुन्हा जिवंत करून संभाषण केले होते प्रत्येक वेळी परत जाताना या व्यक्तींना अंतराळवीरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अतिशीत करून ममीज् बनविण्याचे काम धर्मगुरू करीत असतील आणि त्यांना पुन्हा देव येईपर्यंत भव्य मंदिरात ठेवून देत असतील. अशक्य? हास्यास्पद ? सबंध हिवाळा निद्रावस्थेत घालवणारे प्राणी आपल्याला माहिती नाहीत? थंडीने गोठून लाकडासारखे बनणारे काही तऱ्हेचे मासे उष्ण पाण्यात आल्यावर पुन्हा पोहायला सुरुवात करतात हे आपल्याला माहिती नाही ? मग ममीज् ची कल्पना इजिप्शियन लोकांच्या मनात निसर्गाकडे बघून आली का? पण अशी कोणतीही टूम निघाली की श्रद्धेने ती आचरणाऱ्यांचा एक पंथ तयार होतो; हे ऐतिहासिक सत्य आहे पण इजिप्शियन लोकात असा पंथ कधी होता असे आढळलेले नाही.इजिप्तचे हवामान लक्षात घेता निसर्गाकडून अशी निद्रावस्था ते शिकले असतील असे वाटत नाही.फॅरोहांच्या थडग्यात सोने,हिरे,मोती यांचे अलंकार असायचेच पण शिवाय धान्य,मसाले, कापड यांचीही तरतूद असायची.नंतर कोणत्याही राजाने ही थडगी उघडली की या सर्व गोष्टींचा नवीन साठा भरून ठेवत.पुनर्जन्म ही थोड्या काळाने मिळणारी गोष्ट नव्हती,तर ती हजारो वर्षांनी मिळणारी होती,याची इजिप्शियन लोकांना पूर्ण जाणीव होती.ही थडगी लुटण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. 'देव' हे प्राचीन काळात परग्रहांवरून आलेले अंतराळवीर होते.या सिद्धातांशी या लुटमारीचा तसा संबंध नाही.पण जून १९५४ मध्ये सक्कर येथे असा काही प्रकार न झालेले थडगे मिळाले. पहिल्या खोलीत रत्नांची पेटी होती तशीच होती. दगडी शवपेटी बाहेर काढून ठेवायच्या झाकणाने बंद केली नव्हती तर सरकत्या झाकणाने.९ जून रोजी समारंभाने ही शवपेटी उघडली तर आत काहीच नव्हते.

अक्षरशः काही नाही.आपले रत्नभांडार मागे ठेवून 'ममी' निघून तर गेली नव्हती?


मंगोलियात जे थडगे सापडले आहे ते एखादी छोटी टेकडी आतून लाकडी फळ्यांनी आच्छादिलेली असावी असे दिसते.वर्षानुवर्षे राहणाऱ्या बर्फाने ती शीतगृहच वाटते.

त्यात स्त्री-पुरुषांच्या ममीज्,अन्न,वस्त्रे,रत्ने याशिवाय संगीताची वाद्ये ठेवली होती.एका खोलीत एक चित्र आहे.

एका मोठ्या चौकोनात सहा चौरसांच्या तीन ओळीत डोक्यावर चित्रविचित्र शिंगे,पाठीवर पंख असलेल्या स्फिंक्ससारख्या आकृत्या आकाशात उडण्यास सज्ज आहेत असे वाटते.पण ही प्रतिकृती निनेव्ह येथील असीरियन राजवाड्यातील दगडी गालिच्याची प्रतिकृती आहे.असे तज्ञांचे मत आहे हे आश्चर्य !


ॲन्डीज पर्वत,सैबेरिया,चीन,सुमेरिया,इजिप्त, दक्षिण आफ्रिका या सर्व ठिकाणी ममीज् सापडल्या असल्या तरी पुनर्जन्माची ही कल्पना आपल्या पूर्वजांच्या मनात भरवली कोणी,या कोड्याचा उलगडा मात्र अजून होत नाही तो नाहीच.सर्वच मृत माणसांबरोबर त्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत,दागदागिने आहेत,स्वेच्छेने पुरून घेणारे नोकर-चाकर आहेत.सर्व जगात घडणाऱ्या या गोष्टी काय योगायोगाच्या आहेत?


दहा दहा हजार वर्षांपूर्वीच्या ममीज् जेरिको येथे सापडल्या आहेत.प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये आठ हजार वर्षांपूर्वी बनवलेली कित्येक डोकी सापडतात.त्या काळात साधी मातीची भांडी बनवण्याची क्षमतासुद्धा त्या लोकात नव्हती. जेरिको येथे दुसऱ्या भागात अगदी सरळ रेषेत बांधलेली प्राचीन घरे आढळतात.त्यांच्या गोलाकार भिंती आतल्या बाजूला वळलेल्या आहेत घुमटासारख्या.कार्बन- १४ या पद्धतीने या घरांचे 'वय' आहे १०४०० वर्षे. 


इजिप्शियन धर्मगुरुंनी ११००० वर्षांचा इतिहास हेरोडोटसला सांगितला होता. ते नक्की खरेच असेल की यालाही योगायोगच म्हणायचे ? फ्रान्समध्ये प्राचीन शिलांवर आधुनिक पद्धतींच्या हॅटस्,पॅन्ट्स,जॅकेट्स् घातलेल्या माणसांची चित्रे आहेत.ही चित्रे कोणी कोरून काढली? जनावरांची कातडी पांघरून वावरणाऱ्या प्राचीन काळातल्या अत्यंत मागासलेल्या लोकांना, विसाव्या शतकातल्या माणसांची चित्रे काढण्याइतकी कल्पनाशक्ती असेल? ही चित्रे आपल्या सबंध इतिहासात गोंधळ माजवायला कारणीभूत होत आहेत.फ्रान्समधील गुहेत काढलेली अप्रतिम पेंन्टिग्जसुद्धा आपल्याला थक्क करतात.ती अगदी कालच पूर्ण झाली आहेत असे वाटते.

आपले पाषाणयुगातील रानटी पूर्वज जर अशी चित्रे काढू शकत असतील,तर त्यांनी राहण्यासाठी झोपड्या वगैरे कधी का बांधल्या नाहीत? लक्षावधी वर्षांपासून पक्षी स्वतःसाठी घरटी बांधत आहेत.इतर प्राणी आसरा शोधत आले आहेत,पण मानवसदृश प्राण्याला स्वतःसाठी आसरा कधी बांधता आला नव्हता.


बोर्निओच्या पश्चिम किनाऱ्यावरील दऱ्याखोऱ्यात जे गुहांचे जाळे आहे त्यातल्या गुहा तर कॅथेड्रलसारख्या भव्य आहेत.आणि त्यामध्ये अत्यंत तलम अशा वस्त्रांचे नमुने सापडले आहेत.कितीही इच्छा झाली तरी प्राचीन काळातल्या रानटी लोकांनी ही वस्त्रे बनविली असतील अशी कल्पनाच करता येत नाही.या सर्व शोधांनी पुराणवस्तू संशोधनाच्या चाकोरीतून बाहेर पडायची निकड जास्तीच जाणवायला लागते.गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल तसा काही संशय नाही पण परग्रहांवरील अंतराळवीरांनी,त्या अज्ञात जमातींनी,

आपल्यावर संस्कार करायला सुरुवात केली तो काळ साधारणतः १०,००० ते ४०,००० वर्षे इतकाच असावा एवढेच वाटते.याहून जास्ती काही सांगता येत नाही.

कोणत्याही प्राचीन अवशेषांचे 'वय' सांगणारी गाजलेली कार्बन- १४ पद्धत या संशोधनात उपयोगी पडेल असे वाटत नाही.मानवशास्त्र,भूगर्भशास्त्र यांचे संशोधक

मिळालेल्या ऐतिहासिक गोष्टींचे 'वय' शोधून काढण्यासाठी ही पद्धत वापरतात.या पद्धतीच्या बाबतीत एक गोष्ट गृहीत धरली जाते रेडिओ अँक्टिव्ह आयझोटोप कार्बन वातावरणामध्ये नेहमी एकाच पातळीवर असतो.

माणसे आणि प्राणी कोणत्या तरी पद्धतीने झाडे,मुळे,

गवत, पाने खातच असतात.त्यामुळे त्यांच्याही शरीरात एकाच प्रमाणात हा कार्बन असतो.सर्व अणू किरणोत्सर्गी पदार्थांचे आयुष्य ठरलेले असते आणि मग ते नाश पावतात.सर्व प्राणीमात्रात त्यांच्या मृत्यूनंतर आणि झाडे तोडल्यानंतर ही क्रिया सुरू होते.दर ५६०० वर्षांनी कोणत्याही सेद्रिंय पदार्थांमधला अर्धा कार्बन नष्ट होतो. म्हणजे ५६०० वर्षांनी त्याच्यात १/२ कार्बन राहतो,

११२०० वर्षांनी १/४,२२४०० वर्षांनी १/ ८ भाग कार्बन शिल्लक राहतो.वातावरणातले कार्बनचे प्रमाण माहीत असल्याने व प्रयोगशाळेत जुन्या सेद्रिंय अवशेषात किती कार्बन शिल्लक आहे हे कळू शकत असल्याने, एखाद्या हाडाचे किंवा कोळशाच्या तुकड्याचे वयही सांगता येते.

पण आज वातावरणात जितका कार्बन आहे तितकाच हजारो वर्षांपूर्वीही होता ही जी गोष्ट आपण गृहीत धरून चाललो आहोत तीच जर बरोबर नसली तर? देव अणुस्फोटासारखी उष्णता निर्माण करू शकत होते,असे सर्व पौराणिक वाड्मयात लिहिले आहे;म्हणजे त्या

काळात सर्व गोष्टींमध्ये कार्बनची पातळी खूपच होती.

आजच्याएवढी नव्हतीच.मग चुकीची उत्तरे मिळण्याचा संभव वाढतो.या पद्धतीचा मुख्य तोटा म्हणजे ज्या पदार्थांचे वय आपण शोधून काढत असतो तो नष्ट होतो.शिवाय मौल्यवान धातू,दगड वगैरे गोष्टी किती जुन्या आहेत ते आपण शोधून काढू शकत नाही.संशोधन करण्यात येणारा पदार्थ जितका जुना तितकी ही पद्धत अचूक निर्णय देऊ शकत नाही.ती अविश्वसनीय ठरते.

सेद्रिंय पदार्थ समजा ३०,००० ते ५०,००० वर्षे इतका जुना असेल,तर याच कालखंडात कुठे तरी, इतकीच माहिती ही पद्धत देऊ शकते.तेव्हा कार्बन-१४ या पद्धतीवरच आपण अवलंबून राहू शकणार नाही.यापेक्षा चांगल्या आणि विश्वसनीय पद्धती शोधून काढणे आवश्यक आहे.


१०.८.२३ या भागातील पुढील दुसरा भाग समाप्त..