* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/१०/२३

निवळीचे तळे - एक जीवंत अनुभव.. A living experience of Nivli Tale


 १.खूप दिवसांपासून निवळीचे तळे पाहण्याची इच्छा होती.पण कामाच्या व्यापामुळे शक्य व्हायचं नाही.त्यामुळे तळे पाहण्यासाठी वाट पाहावी लागायची.पावसाळ्या

पासून अनेक बेत आखले.परंतु ते बेत मनातच राहिले.

त्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडला.थंडी चांगलीच वाढलेली.अशा गारव्यात तळ्याच्या काठाकाठानं मनसोक्त भटकायचं असं ठरवूनच घरातून बाहेर पडलो.पहाटेची वेळ.थंडीनं अंगात हुडहुडी भरलेली.

पाठीवर बॅग,गळ्यात दुर्बिण, हातात नोंदवही आणि 'भारतातील पक्षी' पुस्तक घेऊन करपरा नदीच्या पात्राजवळ पोहोचलो. तसं नदीचं पात्र विस्तारलेलं नव्हतंच.पण जिथं नदीच्या प्रवाहाला थोपविलेलं तिथपासून तळ्याचा विस्तार मोठा होत गेलेला दृष्टीस पडला.पक्षीमित्र 'अनिल उरटवाड' हा सोबती होता.

आम्ही दोघांनी अनेक पाणपक्ष्यांच्या नोंदी घेतलेल्या होत्या.या तळ्यातील आणि लगतच्या परिसरातील पाणपक्ष्यांचा अधिवास समजून घेण्यासाठी आम्ही पक्ष्यांच्या दिशेनं निघालो. 


काठालगत उगवलेल्या गवतात 'तुतवार' पक्षी काहीतरी टिपताना दिसला.दलदलही नव्हती. आणि कोरडी जमीनही नव्हती.तिथं बोटभर उंचीचं गवत वाढलेलं.

गवताच्या मूळाशी टोचण्या मारायचा.असं काही वेळा केलं की,पुन्हा तुतवार गुडघाभर पाण्यात जाऊन उभा राहायचा.तिथं पाण्यातील किटक चोचीनं पकडून खायचा.तुतवारची पाठ तपकिरी रंगाची.पोट पांढऱ्या रंगानं चितारलेलं.दोन्ही बाजूनं खांद्यालगत पांढरा भाग वर सरकलेला.काळी टोकदार चोच.डोळ्यावरून पांढरी पट्टी पाठीमागे सरकते. काळया मण्यासारखे काळेभोर डोळे.जणू चिटकून बसविलेले ! तो तुरुतुरु चालायचा. पाण्याजवळ गेला की,पंख पसरून हवेत तरंगायचा.त्याचं पाण्याजवळून उडणं मला मोहित करत होतं.तो फार दूर पाण्याकडं जात नसे.काही वेळातच पुन्हा तो गवतात येऊन बसे.त्याचं असं एकाकी राहणं मला मुळीच आवडलं नाही.कदाचित त्याला तसंच आवडत असावं. जिंतूरपासून १० किलोमीटर अंतरावर विसावलेल्या या तळ्याच्या परिसरात त्याचं राहणं मला महत्त्वाचं वाटत होतं.तो हिवाळ्यातच या परिसरात दिसायचा हे निरीक्षणातून हळू-हळू कळू लागलं.त्यासाठी तीन वर्षाचा कालावधी निघून गेला.अनिल उरटवाड मागील तीन वर्षांपासून निवळीच्या तलावातील पाणपक्ष्यांचा अभ्यास करत आहे.त्यानेच ही माहिती पुरविली. 

 

पाण्यालगत काही दगडं अस्ताव्यस्तपणे दिसू लागली.त्यातील एका दगडावर ठिपकेवाला तुतवार पक्षी येऊन बसला.त्याचं दुर्बिणीतून निरीक्षण केलं.त्याच्या अंगावरील खवलेधारी ठिपक्यामुळेच त्याला 'ठिपकेवाला तुतवार' नाव मिळालं असावं.या पक्ष्याच्या गळ्यापासून शेपटीपर्यंतचा खालचा भाग पांढऱ्या रंगाचा दिसू लागला.ही याची आणखी एक ओळखीची खूण. 


ठिपकेवाला तुतवार पक्ष्याच्या शेजारील दगडावर गवतात दिसणारा तुतवार येऊन बसला.जणू दोन्ही पक्षी एकमेकांशी बोलताहेत असंच वाटायचं.दोघेही समोरा-समोर उभे.दोघांतील फरक स्पष्ट दिसू लागला.आम्ही जेवढा वेळ त्या ठिकाणी होतो तेवढ्या वेळात ठिपकेवाला गवतात उतरला नव्हता.काही वेळानं दोन 'कांडीमार' दगडाजवळ उतरले.ते दोन्ही कांडीमार नदीच्या कोरड्या पात्राकडून आले होते.हळू-हळू पाण्याकडं सरकले.

तेवढ्यात तुतवार आणि ठिपकेवाला तुतवार दोघांनी जागा सोडल्या.निघून गेले.कांडीमार पाय उचलून पाण्यात चालू लागले.काही पावलं सोबतच उचलत तेव्हा सैनिकाची परेडच सुरू आहे असं वाटत असे.चोच पाण्यात बुडवीत.काहीतरी सापडल्याचा आनंद त्यांच्या वागण्यातून स्पष्टपणे जाणवायचा.पण दोघांनीही लवकर पळ काढला.ज्या दिशेनं तुतवार गेले त्याच दिशेनं या दोघांनीही उड्डाण केले.आम्ही दोघेही त्याच दिशेनं निघालो.तेवढ्यात एक 'पिवळा धोबी' बोटभर गवतातून पुढ्यात उतरला.त्याला वळसा घालून पाय उचलले.थोडं अंतर चालून गेल्यावर काठालगत महारुखाचं झाड दिसू लागलं.तशी लहान-मोठी बाभळीची अनेक झाडं होती.

पण महारुखाचं एक वेगळं झाड त्या बाभळीच्या बनात पाहायला मिळालं याचा आनंद होता.त्या झाडावर ९ ढोकरी ऊन खात बसलेल्या दिसल्या.आम्ही झाडाजवळ येऊन थांबलो. तेवढ्यात तळ्याकडून आणखी ८ ढोकरी त्या झाडावर येऊन बसल्या.१७ ढोकरीचं ओझं घेऊन महारुख पाण्याच्या दिशेनं झुकलेला दिसत होता.या झाडांनी पाखरांना किती लळा लावलाय ! ढोकरी फांद्या - फांद्यांवर बसून आराम करत होत्या.अशी झाडं पाखरांना खुणावतात.घरट्यासाठी जागा पुरवितात. पाखरांवर माया करणारी अशी अनेक झाडं या तळ्याच्या काठालगत ताठपणे उभी आहेत. 


 २.निवळीचे तळे मी ताज्या वर्तमानपत्रासारखे वाचत होतो.तेच पक्षी पण त्यातील नावीनता कळू लागली.या पाखरांनी मला लळा लावला होता.बाभळीच्या बनातून पुढं सरकलो.एक उंच बाभूळ पाण्यात उभी होती.त्या बाभळीनंतर पुढे सगळं पाणीच पाणी ! पुन्हा बाभळीच्या बनात येऊन वळसा घेऊन पुढं जायचं असं ठरविलं. उंच बाभळीजवळ पाणकणीस गवतानं जागा धरलेली.त्या गवतात दोन जांभळ्या पाणकोंबड्या उभ्या होत्या.त्या गवतातून बाहेर आल्या.अजूनही गवतात काहीतरी हालचाल सुरूच होती.काही दिसत नव्हतं पण गवत हळूवारपणे हलल्यासारखं जाणवत होतं.बाहेर आलेल्या दोघीपैकी एकीनं आवाज दिला. तेवढ्यात त्या गवतातून आणखी दोन जांभळ्या पाणकोंबड्या बाहेर सरसावल्या.त्या दोघीजणी सुद्धा धीटपणाने चालू लागल्या. आम्ही दोघे खाली बसून त्यांच्या करामती पाहत होतो.अनिलने त्यांचे काही फोटोही काढले.मी त्यांना नोंदवहीत टिपत होतो.कमी उंचीच्या पाणकणीस गवताच्या मुळाशी चोच मारत. गवताच्या मुळाचा भाग खाताना दिसू लागल्या. जसं आपण कंदमुळे खातो अगदी तशा पद्धतीने त्यांनी ताव मारायला सुरुवात केली.त्यांच्या चालण्यात मात्र अजिबात सुंदरता दिसत नव्हती.त्यांनी अंगावर निळा जांभळा रंग ओतून घेतलेला.लालसर पाय.

चोच आणि कपाळ सुद्धा लाल रंगात बुडवून काढलेले.

शरीराच्या मानाने चोच आखूड वाटते.इतर पाणपक्ष्यांच्या चोचीपेक्षा या पक्ष्यांच्या चोचीची रचना थोडीशी वेगळी जाणवते.या पाणकोंबड्या दलदलीत उगवलेल्या गवतातूनच फिरत होत्या.काहीतरी टिपत होत्या. चोचीला लागलेला चिखल पायाच्या साहाय्याने  काढून टाकत.जसे बुलबुल पक्ष्यांच्या शेपटीखालची पिसं लाल रंगाची दिसून येतात. तशा पद्धतीने जांभळ्या पाणकोंबडीच्या शेपटी

खालची पिसं पांढऱ्या रंगाची दिसून आली. ही एक वेगळी ओळख.त्यांना आमची चाहूल लागली.त्या पाण्याच्या दिशेनं निघाल्या.पाण्यात उतरल्या.पोहू लागल्या.पुढे काही अंतरावर गवतानं व्यापून गेलेलं लहानसं बेट होतं.तिथं उतरल्या.दोघीजणी अजूनही पाण्यातच होत्या. गवतात पोहोचलेल्या दोघीजणी एकमेकींचा पाठलाग करू लागल्या.जणू शाळेतल्या दोन मुलीच ! त्या बेटाजवळ वारकरी पक्ष्यांचा थवा लाटासोबत हेलकावे घेत होता.तो थवा बेटाजवळून पोहत-पोहत खोल पाण्याकडं सरकला.

तशा पाण्यातल्या दोन पाणकोंबड्या त्या बेटावर चढल्या.

चौघींनी मिळून ते बेट डोक्यावरच घेतलं.किती नाचल्या ! पैशाच्या दुनियेत हरवलेल्या माणसाला तसा आनंदच घेता येत नाही याची जाणीव होऊ लागली. 


आमच्या समोर पाणपक्ष्यांची हालचाल कमी जाणवू लागली.जांभळ्या पाणकोंबड्या निघून गेल्यानंतर तीन शेकाटी पक्षी येऊन गेले.त्यांच्या उंच पायांनी आमचं लक्ष वेधून घेतलं एवढच! पण ते जास्त वेळ रमलेच नाहीत.

बेटाच्या पलीकडे तळ्याच्या मध्यभागात २०० पेक्षा जास्त 'लालसरी' दिसू लागल्या.त्यासाठी दुर्बिणीचा उपयोग होई.पण सारखं - सारखं दुर्बिणीतून पाहिल्यामुळे डोळे जड पडत.थोडा वेळ डोळे मिटून बसलं की पुन्हा बरं वाटत असे.दूरवरचे पक्षी ओळखण्यापुरताच दुर्बिणीचा वापर केला जाई.शक्य तेवढं जवळचे पक्षी डोळ्यांनीच पाहायचे असं आम्ही ठरवलेलं.पक्षी आणि आपल्यातील होईल तेवढं अंतर कमी करायचं. म्हणजे पाखरांच्या हालचाली सहज टिपता येतात.डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नसेल तेव्हा थोड्या वेळापुरती दुर्बीण वापरत असू.या पक्ष्यांना कॅमेऱ्यात टिपल्यामुळे त्यांच्याविषयीची अधिकची माहिती मिळू लागली.आम्ही निघायच्या तयारीत असताना उंच बाभळीभोवती काही कावळ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.आम्ही जागा बदलली.

त्यांचं निरीक्षण करू लागलो. 


कावळे बाभळीभोवती घिरट्या घालू लागले. त्यांच्या आवाजातील कर्कशपणा अधिकच वाढलेला.तेवढ्यात 'दलदली भोवत्या' दिसला. त्या शिकारी पक्ष्याचा कावळे पाठलाग करू लागले.त्याची परिसरातून हकालपट्टी करू पाहत होते.हे नाट्य अचानकच पाहायला मिळालं होतं. या शिकारी पक्ष्याला 'मॉन्टग्यूचा भोवत्या' असंही नाव आहे.

भोवत्या फक्त हिवाळ्यातच निवळीच्या तळ्याजवळ उतरतात.काही दिवस वास्तव्य करून निघूनही जातात.

भोवत्या झाडाभोवती गिरट्या घालू लागला.तसे कावळेही त्याच्या मागावरच पडलेले.कावळ्यांनी एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविला की,ते काम फत्ते करूनच सोडतात.या गोष्टीचा इथेही प्रत्यय आला.भोवत्यानं तिथून पळ काढला.तसे कावळेही निघून गेले.आता पूर्वीसारखीच वातावरणात शांतता नांदू लागली.आमच्या शेजारी उंच बाभळीचं झाड दिसत होतं.पाणकणीस गवतात एक शेराटी विराजमान झाला.सहा हळदी-कुंकू बदक पोहत-पोहत बाभळीच्या दिशेनं येऊ लागले.तसे आम्ही परतीच्या वाटेनं निघालो.बाभळीच्या बनातून वाट काढत बाहेर पडलो. 


३.आम्ही निवळी गावाचा परिसर मागं सोडून कुडा गावाच्या दिशेनं चालू लागलो.उजव्या बाजूला हरभरा - ज्वारीची पिकं फुलून आलेली. हरभऱ्याला घाटे लगडलेले.ज्वारी हुरड्यात आलेली.कणसावर पळसमैना उतरायच्या.दाणे टिपायच्या.पुन्हा झाडावर विराजमान व्हायच्या. सकाळचं कोवळं ऊन त्यांच्या अंगावर पडायचं. तेव्हा त्या पळसमैना उजळून निघत.आम्ही त्यांच्या हालचाली पाहण्यात रममान झालो.चिंचेच्या झाडाजवळ कंबरेत वाकलेली एक बाभूळ होती.त्या बाभळीवर एक पळसमैना त्या थव्याकडं पाठ करून बसलेली.ती रुसली तर नसेल ? आजारी असावी असंही मनात आलं. तिनं ज्वारीची दाणे टिपण्याचा मोह सोडून दिला. ती टेहळणी करीत असावी असं काहीसं वाटलं. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या.पण तिनं आम्हाला हुलकावणी दिली होती. तिचं असं एकाकी असणं माझ्या मनाला कुरतडत होतं. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून थकून गेली असावी ? रानातला थवा बाभळीकडं झेपावला पण बाभळीवर उतरलाच नाही.तशा पळसमैना तळ्याच्या पाण्यावरून 'मापा' गावाच्या दिशेनं निघूनही गेल्या.पण कंबरेत वाकलेल्या बाभळीवरची पळसमैना जागच्या जागी बसून होती.ती त्या थव्याकडं एकटकपणे पाहत होती.ती थव्यासोबत का गेली नसावी ? तिला थव्यातून हाकलून दिलंय ? तिचं वय झालंय ? ती स्वतःहून थव्यातून बाहेर पडली ? ती कुणाची तरी वाट पाहते का ? झाडांची वाढ खुंटते.फांद्या वाळून जातात.साल गळून पडते.फळे लागत नाहीत.तेव्हा झाडाचा शेवटचा काळ सुरू होतो हे कळू लागतं.पण या पाखरांचं वय झालंय हे कशावरून ओळखायचं.म्हातारी माणसं चटकन ओळखून येतात.बाभळीसारखी कंबरेत वाकलेली दिसतात.तसं पाखरांचं असतं का…


कुबड्या बाभळीजवळच एक झुडुप होतं.त्या झुडपात मनोलीच घरटं होतं.सुरक्षित होतं.तरीही त्या झुडपावर 'लांब शेपटीचा खाटीक' विराजमान झाला.थोडा वेळ टेहळणी करून निघूनही गेला.तशी मनोली घरट्यातून बाहेर डोकावली.फांदीवर येऊन बसली.भुर्रकन उडून गेली.पुन्हा घरट्याकडं लवकर परतली नाही. त्या झुडपाखाली पसरट बेशरम वाढत चाललेली दिसली.तिने हात-पाय चांगलेच पसरलेले.तिची फुलं तेवढी सुंदर दिसू लागली.ती दुरूनच सुंदर दिसतात.त्या फुलांना केसात कुणीही माळीत नाही.बेशरमीला लागूनच पाणकणीस गवतानं डोकं वर काढलेलं.तिथं ९ 'अडई' स्वतःला लपवित होत्या.त्या हळूवार चालल्या आणि पाण्याच्या दिशेनं उडूनही गेल्या.अजूनही ती पळसमैना तिथंच बसून होती.तिच्याशिवाय त्या झाडावर इतर कोणतेही पक्षी नव्हते. 


आम्ही तळ्याच्या काठा-कठानं हळूवार चालू लागलो.कुडा गाव दिसू लागलं.तळ्याचा परिसर कमी होऊ लागला.

हरभरा आणि ज्वारीची दाटी वाढलेली.सगळी रानं हिरवीगार दिसू लागली.सायंकाळची वेळ.कुडा गावातील मंदिरातून टाळांचा आवाज येऊ लागला.गावाकडून पळसमैनेचा एक थवा आमच्याच दिशेनं येताना दिसला.

तसे आम्ही हरभऱ्याच्या रानातच थबकलो.त्यांना निरखून पाहू लागलो.तेवढ्यात निवळी गावाच्या दिशेकडून आणखी एक थवा उतरला.दोन्ही थव्याचा एकच थवा झालेला.आम्ही टेकडीकडं पाठ करून बसलो.आमच्या डोक्यावरून आणखी काही पळसमैना अवतरल्या आणि त्यात एकरूप झाल्या.तळे, मापा,कुडा,निवळी,टेकडी सगळीकडून या पळसमैना भरभर येऊ लागल्या.या पळसमैनेचा भला मोठा तारकापुंज झाल्यासारखं भासत होतं.तळ्याकडून आलेल्या हजारो पळसमैना हरभऱ्याच्या रानात उतरल्या.त्यांचं एका लयीत उतरणं मनाला मोहून टाकत होतं.अनोळखी वाटणाऱ्या पळसमैना ओळखीच्या वाटू लागल्या. त्या हरभऱ्यात दिसेनाशा झाल्या.आणखी एक थवा आला आणि त्यांना सोबत घेऊन गेला. हरभऱ्यात बसलेल्या पळसमैना जणू त्यांचीच वाट पाहत थांबलेल्या.त्यांना संकेत मिळाला अन् सगळ्या सोबतच हवेवर स्वार झाल्या.आमच्या डोक्यावरून जाताना त्यांच्या पंखातील संगीत ऐकायला मिळाले.आनंदाची एक लहर अंगभर पसरत गेली.जखमेवर हळूवार फुंकर घालावी असंच वाटलं.त्यांच्या पंखांची हवा आम्हाला जाणवली.माझ्या हातात एखादी काठी असती तर त्यांच्यापर्यंत सहज पोहोचली असती.


हजारो पळसमैना थव्यानं येऊ लागल्या.हितगूज करू लागल्या.त्यांच्याजवळ मोबाईल सारखे कोणतेही साधन नसताना त्या ठराविक वेळेला एकत्र आल्या होत्या याचंच नवल वाटत होतं.या सगळ्या थव्यामध्ये कुबड्या बाभळीवर बसलेली पळसमैना असेल का असं सारखं वाटायचं.त्या पळसमैनेची आठवण आली की या आनंदी थव्याला पाहूनही आनंद व्हायचा नाही. सगळ्या पळसमैना उत्सवासाठी एकत्र आलेल्या होत्या.त्यामुळे ती एकटीच पळसमैना त्या झाडावर कशी असेल ? ती माझ्यासमोरील थव्यात असावी असं मनोमन वाटत होतं.सूर्य पश्चिमेकडं सरकत राहिला.अंधार येऊ पाहत होता.तशा अवस्थेतही पळसमैना भराभर हरभऱ्याच्या रानात उतरत.पुन्हा भरारी घेत. उजव्या बाजूला एक आंबा होता.त्यावर उतरत. पुन्हा मोठ्या थव्यात सगळ्या एकरूप होत असत.आकाशात जणू काळाकुट्ट ढगच मिरवत आहे असं दृश्य समोर दिसत होतं.त्यांच्या कसरती पाहून मी थक्क झालो.निरनिराळे आकार तयार होत.

काही हजार पळसमैना एका तालात नाचू लागल्या.

गिरक्या घेऊ लागल्या. जमिनीकडं पुन्हा आकाशाकडं भरारी घेऊ लागल्या.कधी पतंगाचा आकार तर कधी झाडासारखा आकार पाहून मी थक्क झालो. 


त्या सगळ्यांना कोण नियंत्रित करत होतं ? हे कळत नव्हतं.ती सगळी पाखरं एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेनं कशी वळत असत ? हे कुतूहल शेवटपर्यंतच होतं.एकाही पक्ष्याचा अपघात झाला नव्हता.आम्ही दोघे त्यांना दुर्बिणीतून पाहत होतो.त्यांचे पंखसुद्धा एकमेकांना स्पर्श करत नव्हते.कोणती गणितीय क्रिया त्यांना अवगत होती ? हे न उलगडणारं कोडं समोर दिसत होतं.आता उत्सवाला भरती आलेली.सगळ्या पाखरांनी चांगलाच वेग पकडलेला.ही सगळी पाखरं कुडा गावाच्या दिशेनं हळू-हळू सरकू लागली.जेव्हा ही पाखरं मंदिराच्या कळसावरून भरारी घेऊ लागली तेव्हाच कळालं.तोपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त त्या पाखरांनाच डोळे भरून पाहत होतो.त्या थव्यानं पुन्हा तळ्याकडं मार्गक्रमण केलं. पाण्याजवळून उडताना त्यांचं प्रतिबिंब पाण्यात उतरलं होतं.तेवढ्यापुरतीच पाण्याची हालचाल जाणवली होती. 

     

सूर्य मावळतीला निघून गेला तसा अंधार चांगलाच वाढला.तळ्यावर घिरट्या घालणारा थवा अंधुकसा दिसू लागला.आम्ही हरभऱ्याच्या रानातून काढता पाय घेतला. कुडा गावाच्या दिशेनं जाणाऱ्या पायवाटेवरून चालू लागलो.पळसमैना 'भोरडी' या नावानं सुद्धा ओळखली जाते.गुलाबी रंगाचा साळुंकीएवढा पक्षी.डोळे, मान,छाती,

पंख आणि शेपटीकडील भाग काळ्या रंगाचा.त्या रंगातही गुलाबी छटा दिसून येते.त्यांचा चक् - चक्  चक् - चक् आवाज ऐकू येतो.पळस फुलू लागले की फुलातील मकरंद चाखायला विसरत नाहीत.ज्वारी हुरड्यात आली की दुधाळ दाणे आवडीनं खातात.त्यांच्यामुळे परागी

करणाची प्रक्रिया सुलभच होते.युरोपमधून येणारे पाहुणे पक्षी आपल्याला खूप काही देऊन जातात.आम्ही कुडा गावात प्रवेश केला. मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली पोहोचलो. वळून तळ्याकडं पाहिलं.भोरड्या रात निवाऱ्याला निघून गेल्या होत्या.त्यांची रातनिवाऱ्याची झाडं पाहता आली नाहीत.अनिलने मोटार सायकल सुरू केली.जिंतूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. उघड्या बाभळीवरची पळसमैना पुन्हा - पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येई.ती थव्यात परतली असावी असं मनोमन वाटत होतं.


४.आम्ही दोघे पहाटे तळ्याच्या काठावर पोहोचलो.अजून चांगलं फटफटलं नव्हतं. कुबड्या बाभळीच्या समोर काही अंतरावर अजून पाच बाभळी उभ्या होत्या.तिथं आम्ही पाणकणीस गवताचा आडोसा धरून पाणपक्ष्यांच्या निरीक्षणासाठी तयारी केली.अडईचा एक थवा बाभळीच्या झाडाजवळून उडून गेला.एकच लालसरी.पण ती १७ वारकऱ्यांच्या मधोमध पोहत होती.काही वेळानं ती  तळ्याच्या खोल पाण्याकडं सरकली.शेजारी अस्ताव्यस्तपणे वाढलेल्या बेशरमीवर पांढऱ्या छातीच्या दोन खंड्यांनी आश्रय घेतलेला.तशी फांदी पाण्याकडं झुकली.पाठीमागे एक धानचिमणी गवतात चरत होती.

गवताच्या पुंजक्यावर बसली.कावरी - बावरी होऊन चहूबाजूला पाहू लागली.पाण्याच्या विरुद्ध दिशेनं उडून गेली.बुलबुल पक्ष्यांनी बाभळीवर बसून बोलायला सुरुवात केली. उडून गेले तेव्हा त्यांची संख्या २४ होती.९ भोरड्यांचा थवा तळ्यावरून मापा गावाच्या दिशेनं निघून गेला.एक टिटवी  कर्कश आवाज काढत डोक्यावरुन निघून गेली. तिच्या अशा वागण्यानं पाखरांना आमची खबर लागली होती.तिथे पाच बाभळीची झाडं होती. एक लहानसं.दोन मध्यम आकाराचे.दोन मोठ्या बाभळी.

त्यातील एक बाभूळ टाचा उचलून पाहिल्यासारखं उंच वाढलेली दिसायची. जमिनीवर पक्ष्यांची शीट पडलेली.

काही पाखरांची पिसे गळून पडलेली.पाण्यालगत दलदलीवर पक्ष्यांच्या पायांची नक्षी रेखाटलेली. त्यातही सरमिसळ झालेली.ओळखू येईल अशी नक्षी नव्हतीच.

दोन मोठ्या बाभळीच्या खोडावर, फांद्यावरही पक्ष्यांची सीट पडलेली.त्यामुळे ती झाडं पांढरट दिसू लागली. 


कुबड्या बाभळीवर जशी पळसमैना एकटीच बसून होती.

अगदी त्याप्रमाणे इथे सुद्धा मोठ्या बाभळीवर एकच 'उघड्या चोचीचा करकोचा' बसलेला होता.ही झाडं करकोचा पक्ष्यांच्या रातनिवाऱ्याची जागाच आहे हे कळू लागलं. इतर पक्षी चरण्यासाठी निघून गेले होते.एकट्या करकोचानं सुद्धा तळ्याकडं झेप घेतली.

बाभळीची सगळी झाडं एक - एकटी भासत होती.काही वेळानं एक कोतवाल लहानशा बाभळीवर येऊन बसला. तशी आम्ही जागा बदलली.पूर्वी कुडा गाव जिथं वसलेलं होतं त्या पडलेल्या गढीच्या दिशेनं एक पायवाट जाते. त्या पायवाटेवरून हळूवार चालू लागलो.अनिलने उंच वाढलेल्या पिंपळाकडं बोट दाखवीत हरोळ्यांचा थवा दाखविला.हरोळ्यासारखी सुंदर पाखरं पाहिली की चालण्यातील थकवा आपोआप कमी होत असे. 


५.आम्ही पहिल्या दिवसापासून पायवाटा न्याहाळीत आलो होतो. कंबरेत वाकलेल्या बाभळीजवळ एक चिंच होती. तिथं अजगर निघून गेल्याच्या खाणाखुणा दिसल्या होत्या.पायवाटेजवळ उंदरांच्या चोरवाटाही दिसून येत. बोटभर वाढलेल्या गवतात सशाच्या गोलाकार लेंढ्याही दिसून यायच्या.पाण्यावर आलेल्या काळविटांच्या खुरांचे ठसेसुद्धा ओळखून पडत.बुरजाची पांढरी माती दूरवर पसरत आलेली.त्या मातीत १७ चिमण्या धुळस्नान करताना दिसल्या.गाव स्थलांतरित झालं पण या चिमण्यांनी अजून तरी त्यांच्या पूर्वजांचा गाव सोडलेला नव्हता.त्यांची पिलावळ तिथंच गोतावळा होऊन नांदत होती. ढासळून गेलेल्या बुरुजाजवळून लहानसा ओढा करपरा नदीला मिळतो.तिथं बोरी बाभळीची झाडं चांगलीच वाढलेली होती.तांबड्या गुंजाची वेल बोरीवर चढलेली.पानं वाळत चाललेली.गुंजाच्या शेंगा फुटून आतील गुंजा बाहेर डोकावत.खूप गुंजा पांढऱ्या मातीत मिसळलेल्या दिसू लागल्या.शेंगा तडकल्या की बिया ओढ्याच्या दिशेनं घरंगळत जात असत.मी गुंजा गोळा केल्या.काही शेंगा तोडून घेतल्या.अनिल ओढ्यात उतरलेल्या पायवाटा न्याहाळू लागला.त्या पायवाटेनं रानडुकरांची टोळी गेल्याचं त्यानं सांगितलं.या परिसरात अजूनही काही टोळ्या असू शकतात म्हणून आम्ही सावधपणानं या पडलेल्या बुरजावरून जायचं असं ठरविलं.सगळे काटेरी झाडं अंगाला ओरबाडत असत.   


एका पायवाटेला अनेक पायवाटा मिळालेल्या दिसू लागल्या.एका पायवाटेला अनेक फाटे फुटलेले.सगळा गोंधळच.काटेरी झुडपं वाट अडवायला तयारच.खाली बसून तर कधी वेगळ्या पायवाटेनं रस्ता शोधू लागलो.

पडलेला बुरुज ओलांडायला अर्धा तास निघून गेला.ऊन वाढत चाललेलं.एवढ्या वेळात घामानं अंग भिजलेलं.

सगळी वास्तू भगनावस्थेत दिसू लागली.सगळ्या चोरवाटा फक्त रानडुकरांच्याच होत्या.फक्त त्यांनाच पळता यावं अशी व्यवस्था त्यांनी केलेली.तिथं आमचा निभाव लागणं कठीण होतं हे कळून चुकलं.  दुसऱ्या बुरजाची चढण लागली.आम्ही त्या पायवाटेवरून वरच्या दिशेनं चढू लागलो.मी पुढे होतो.अनिल पाठीमागून येत होता.

अनोळखी काटेरी झुडपांनी आम्हाला घेरलेलं.कशीतरी वाट काढत थोड्याशा मोकळ्या जागेत पोहोचलो.

तेवढ्यात रानडुकरांची भली मोठी टोळी गोंधळ घालत बुरजाभोवती घुटमळत राहिली.आम्हा दोघांना चक्रव्यूहात अडकल्यासारखं झालं.हात दाखवून अवलक्षण अशी आमची गत झाली होती.भितीचा काटा अंगभर सरसरत गेला.मी अनिलला आणि अनिल मला उसनं आवसान द्यायचा प्रयत्न करू लागला.त्या भग्नावस्थेतील वास्तूत फक्त पिंपळ तेवढाच हिरवागार दिसू लागला.त्या पिंपळावर अवतरलेल्या हरोळ्या केव्हाच निघून गेलेल्या. 'दुरून डोंगर साजरे' ही म्हण इथे सुद्धा लागू पडते.जेव्हा आम्ही बाभळीच्या पाच झाडाजवळ पोहोचलो होतो तेव्हा अनिल या पिंपळाकडे बोट दाखवीत म्हणाला होता की,

दुपारचे जेवण त्या हिरव्यागार पिंपळाखालीच करूया.इथे आल्यावर पळती भुई थोडी झाली होती.आम्ही तळ्याच्या बाजूनं गढीवर चढलो होतो.पायवाट जिकडं घेऊन जाईल तिकडं आम्ही चालू लागलो.नवीन पायवाट निर्माण करण्याची धमक आमच्यात उरली नव्हतीच.नशीब आम्ही गढीच्या मधोमध पिंपळाच्या दिशेनं गेलो नव्हतो.बाहेरील बाजूनं जाण्यासाठी एवढा वेळ खर्ची पडला होता. 

 दुसऱ्या बुरजावर पोहोचलो तेव्हा पाठीवरील बॅग काटेरी झुडपांनी फाडलेली दिसली.तिथं रानडुकरांच्या लोळण्याची जागा पाहायला मिळाली.पांढऱ्या मातीत खड्डा केलेला.एका बाजूला खोलगट भाग दिसू लागला. 


आजूबाजूला त्यांची विष्ठा पडलेली.आम्ही चढण चढू लागलो.तेव्हा इथल्याच रानडुकरांनी गोंधळ घातलेला होता हे कळालं.ती टोळी अजूनही अधून - मधून खुडबुड करीतच होती.एका मागोमाग पळत असल्याची जाणीव व्हायची. काटेरी झुडपांचा आवाज कानी येई.वाळलेला पालापाचोळा त्यांच्या येण्या-जाण्याची चाहूल द्यायचा.ती गढी एक भुलभुलय्याच भासत होती. दुसऱ्या बुरुजापासून एका तटबंदीनं तळ्याच्या बाजूनं गोलाकार धारण केलेला.त्यावरून एक पायवाट पाण्याच्या दिशेनं खाली उतरलेली दिसली.आम्ही जास्त वेळ विचार केलाच नाही. पटकन त्या पायवाटेवरून खालच्या दिशेनं सरकलो.सुरुवातीला मातीचे पेंड घातलेला रस्ता तर पुढं दगडाचा आधार घेत खालच्या रस्त्यावर उतरलोआम्ही तळ्याच्या पाण्यालगत पोहोचलो. तिथं पायवाट पाण्यात एकजीव झालेली पुन्हा एकदा तळ्याच्या काठा-काठानं पायवाट तयार केली.मोकळ्या जागेत आलो होतो.वळून बुरुजाकडं पाहिले.अजूनही बुरुज छातीवरच बसलेला वाटत होता. 


६.झाडांची पाने गळून पडावीत तसे बुरुजावरचे विचार गळून पडू लागले.पाण्यातील एका बाभळीवर सुगरणीची तीन घरटी झुलू लागली होती.त्यांच्या विणीचा हंगाम संपलेला होता.घरटी रिकामी झुलू लागली.बाळाचा रिकामा पाळणा हलवू नये असं म्हणतात.पण इथे वाऱ्याला कोण अडविणार ? 


तीन नदीसुरय पक्षी पाण्यावर भिरभिरत राहिले. त्यांच्या आवाजांना टवटवीतपणा आला होता.मी डोळ्याला दुर्बीण लावून तळ्याकडं पाहू लागलो.अडईचे दोन थवे पाण्यात उतरलेले.ते एकमेकात मिसळून पाण्याच्या आतील भागाकडं पोहत चाललेले.अचानक सगळ्यांनी पंख उघडले. हवेवर स्वार झाले.बुरुजाच्या दिशेनं निघूनही गेले.आमचे पाय आपोआप जिंतूरच्या दिशेनं वळाले. 


७.चित्रदर्शी तळे सतत मला खुणावित असे. तिथं माहेराला आलेली कितीतरी पाखरं भेटत. बाभळीचा गोतावळा पाण्यालगत एकवटलेला दिसे.त्या झाडांच्या आसऱ्यानं पाणपक्षी वास्तव्याला येत असत.काही दिवस तिथं आनंदानं राहत.पुन्हा आपल्या गावी निघून जात असत.अनेक पायवाटा तळ्यात विरून गेलेल्या दिसायच्या.पाणवनस्पतींची फुलं पाण्यावर डोकं काढून ऊन खात बसलेली दिसायची टिटवीच्या आवाजानं पाण्यालगतचे पक्षी सावध व्हायचे. माजून गेलेल्या गवताच्या आसऱ्यानं पाणमोर वावरायचे एखाद्या वाद्यावर आघात करावा तसा गवतातून टक् आवाज ऐकू यायचा. त्यानंतर वारकरी डोकावताना दिसे.अनेक झाडं काठालगत उभी राहून स्वतःचं प्रतिबिंब निरखून पाहण्यात हरवून गेलेली दिसायची.एखादी फांदी पाण्याला स्पर्श करीत असे.तेव्हा ते झाड जणू पाण्यावर बोटं फिरवीत असल्याचा भास होई


सकाळच्या वेळी लहान पाणकावळे बाभळीच्या फांदीवर बसून पंख सुकविताना दिसायचे.त्याच झाडाच्या गळफांदीवर सामान्य खंड्या शिकारीच्या तयारी दिसायचा.नदीसुरय पक्ष्यांचा आवाज तळ्याभोवती सतत यायचा.मी त्या आवाजाचा अर्थ समजून घेण्यात बराच वेळ खर्ची घालायचो.पण कोडं काही उलगडायचं नाही.

पक्षीशास्त्रज्ञ 'अर्नेस्ट सेटन' याने कावळ्यांच्या आवाजाचा अर्थ समजून सांगितला.इथं मला तर नदीसुरयचा आवाजच कळत नव्हता. तेव्हा समजावून सांगणं दूरच.जांभळ्या पाणकोंबड्या पाणकणीस गवतात स्वतःला लपवून घ्यायच्या.पांढऱ्याशुभ्र बगळ्यांचा एक थवा तळ्यावरून कुडा गावाच्या दिशेनं निघून गेला.

तेव्हा सूर्य पश्चिमेकडं सरकत होता.कवड्या धीवर पंख फडफड करीत पाण्यावर स्थिर होवू पाहत होता.तेवढ्यात त्यानं पाण्यात बुडी घेतली.वर येऊन बाभळीच्या फांदीवर बसला.तेव्हा त्याच्या चोचीत मासा दिसला होता.राखी कोहकाळ गुडघाभर पाण्यात उभा दिसायचा.आम्हाला पाहून पलीकडील बाजूस जायचा. आम्ही लपणात बसलो की पुन्हा पूर्वीच्या जागी दिसायचा.पाण्यालगत पक्ष्यांच्या पायांच्या खाणाखुणा आढळून येत.त्यात कितीतरी विविधता दिसून येई.बदकांच्या पायांची नक्षी पाहून नवल वाटतं. मध्येच गवताचं बेट यायचं तेव्हा ती रांग खंडित व्हायची.या भिरभिरणाऱ्या पाखरांच्या पायांची रेखांकित नक्षी नोंदवहीत उमटायची.दुसऱ्या दिवशी मेहंदीसारखी रंगीत व्हायची. 


 ८.सकाळचे आठ वाजलेले. काल जिथं अडईच्या थव्यानं आम्हाला चकवा दिला होता त्या ठिकाणी पोहोचलो. तो थवा बुरजाच्या दिशेनं निघून गेल्याचं पाहिलं होतं.आम्ही दोघे कुडा गावाच्या दिशेनं हळूवार चालू लागलो. तळ्याचं पाणी पसरट दिसू लागलं. त्यापुढं तळ्यानं हात-पाय आखडून घेतलेले.जिथं पाणी कमी झालेलं तिथं गवतानं डोकं वर काढलेलं. त्याच्या पलीकडं हिरवळ दाटलेली. जणू बगीच्यामधील गालिचाच ! त्या हिरवळीवर सहा चक्रवाक पक्ष्याने आसरा घेतलेला.अनिल बाभळीच्या झाडाखाली बसून 'ई-बर्ड' च्या वेबसाईटवर नोंदी करत होता.मी झाडाचा आधार घेत दुर्बिणीतून चक्रवाक पक्ष्यांचे निरिक्षण करू लागलो.तीन चक्रवाक समोरासमोर जणू बोलताहेत असंच वाटायचं.शेजारील दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरवलेली. जणू दोन भांडखोर शेजारीच!एक चक्रवाक त्यांच्यापासून काहीसा दूर उभा होता.२० मिनिटे झाली तरी सुद्धा ही पाखरं कोवळ्या उन्हात उभी होती.तेवढ्यात आमच्यासमोर दोन पठाणी होले पाणी पिण्यासाठी खाली उतरले.दोघांनीही सभोवतालचा कानोसा घेतला.पाण्यात चोच बुडविली.पोटभर पाणी पिलं.त्यांच्या शेजारी एक 'लालपंखी चंडोल' उतरला.पण त्याने पाणी पिलं नाही.पुन्हा तो काठालगत येऊन बसला. तिथं त्याचा जोडीदार वाट पाहत बसलेला होता. काही वेळानं दोघेही भुर्रकन उडून गेले.उजव्या बाजूनं चार माळटिटव्या अवतरल्या.अचानक कुठून आल्या कळालच नाही म्हणून त्या अवतरल्या असं म्हणालो.त्यांच्या आवाजानं पाखरं सावध झाली.दोन माळटिटव्या दगडाजवळ रेंगाळल्या.पण दोन माळटिटव्या चक्रवाकाजवळ पोहोचल्या तरीसुद्धा त्यांच्यात ठराविक अंतर होतच ! पण चक्रवाक पक्ष्यांनी हालचाल करायला सुरुवात केली.एकानं पंखाची उघडझाप केली.लहान आकाराची पिसे गळून पडल्याचं पाहिलं.हे सगळं दुर्बिणीतून दिसत होतं.दुर्बिणीचा पुरेपूर उपयोग आम्ही करत होतो.आम्ही आणखी पुढं सरकलो.चक्रवाक पक्ष्यातील काहीसं अंतर कमी केल्याचं समाधान वाटत होतं.पण तो आनंद फारच कमी वेळ टिकला.आम्ही बसण्याची जागा निवडली तेवढ्यात चक्रवाक पाण्यात उतरले. 

     

हिरवाळीवर जाऊन चक्रवाक पक्ष्यांची गळून पडलेली पिसे नोंदीसाठी जमा केली.नारंगी रंगाची ती पिसे बाभळी खालीच ठेवली.तिथंच विसरली. खरं तर ती पिसे काही काळ जपून ठेवायची होती.चक्रवाक पाणपक्ष्याला 'ब्राह्मणी बदक'असं म्हटलं जातं.एका ठिकाणी चक्रवाक साठी 'चकवा' हे नाव वाचण्यात आलं.हे नाव वाचल्यावर माझं मलाच हसू आलं.सुरुवातीला मी अडईच्या थव्यानं चकवा दिला असं म्हणालो. आता इथं चक्रवाक या नावाचा कुणी चकवा पक्षी आहे हे सांगतोय.एकाच पक्ष्याच्या नावातील गंमती-जंमती अभ्यासल्यावर त्यातील बारीकशा नोंदी कळू लागतात.चक्रवाक एकटे - एकटे फिरताना दिसून येत नाहीत.जोडीनं किंवा थव्यानं वावरतात. त्यांना थोडी जरी कुणकुण लागली की,लगेच जागा बदलतात.सुरक्षित ठिकाणी पोहोचतात.आम्ही थोडसं अंतर काय कमी केलं त्यांनी लगेच पाण्यात उतरायची घाई केली.हवं तर आपण यांना भित्रे पक्षी म्हणूया. माणसांची सावलीसुद्धा पडू देत नाहीत.तसा माणसाचा काय भरवसा ? पाणपक्ष्यांचा तळ्यावर जसा विश्वास असतो तसा माणसावर नसतो हेच सत्य ! चक्रवाक पोहत-पोहत खोल पाण्याकडं जाऊ लागले. दूरवर जाऊन स्थिरावले. हे पक्षी हिवाळ्यातच निवळीच्या तलावात दिसून येतात. राजहंस पक्ष्यांसारखंच या पक्ष्यांनाही स्थलांतरित पक्षी म्हणून आम्ही नोंदवहीत टिपलं होतं. 


दोन माणसं पाण्यात उतरली. होडीनं तळ्याच्या आतील भागाकडं जाताना दिसले.ते मासे पकडणारे भोई होते.त्यांच्यामुळे सहा चक्रवाक पक्ष्यानं तेथून पळ काढला.ते मापा गावाच्या दिशेनं निघून गेले.ज्या दिशेनं माळटिटव्या अवतरल्या त्या दिशेनं आम्ही वळालो. तिकडं फार जुनी एक विहीर दिसली. शेजारी पिपरणी वाढत चाललेली.बुरुजावरची माणसं आणि ही विहीर यांचं नातं तसं जुनंच असावं… 

     

करपरा नदी पावसाळ्यात दूषित होत असावी तेव्हा या विहिरीनच गढीला पाणी पुरविलं असणार.बुरुजावर खेळणारी लेकरं या विहिरीजवळ बसून आंघोळ करत असतील.. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी वाटेवरच्या पाऊलखुणा गेल्या सांगूनी असं म्हणतच आम्ही सोबत आणलेल्या भाकरी हातावर घेतल्या. भाकरी खाल्ल्या.हातावर पाणी घेतलं.पिपरणी खाली थोडा वेळ आराम केला.त्यावेळी 'नागझिरा' पुस्तकातील कांचन मृगाची शिकार आठवली.पुस्तकातील झाड पिपरणी नव्हतं.पण तसे विचार डोक्यात सुरू झाले.माझे डोळे पिपरणीच्या खोडावर भिरभिरू लागले.अजून काही विचार येण्याअगोदर आम्ही पाण्यालगतच्या पाणकणीस गवताच्या आडोशानं पाण्यावर आलेल्या काळविटांच्या पाडसाला पाहू लागलो. 


 ९.दुपारची वेळ.आम्ही डोक्यावर हॅट घातलेल्या. तळ्याच्या पलीकडील काठ फार दूर नव्हता. कुडा गावाच्या बाजूनं तळं निमूळतं होत आलेलं. त्यापुढं गावाकडून येणारा ओढा दिसतो.सध्या तो वाळूनं भरलेला दिसू लागला.या ओढ्यालगत हमखास शेळ्या चरताना दिसत.एका दिवशी त्या शेळ्यांची मोजदाद केली.तेव्हा त्या १७ होत्या.आम्ही पाणकणीस गवतात लपून बसलेलो. पुढ्यात हळदी-कुंकू बदकाच्या आठ जोड्या दिसल्या.त्यातील नर - मादी ओळखता आले नाहीत.

एकूण १६ बदकांच्या हालचाली दिसू लागल्या.हळदी कुंकू आमच्या समीप आले होते. उघड्या डोळ्यांनी त्यांना सहज पाहता येत होतं. या बदकाला हळदी-कुंकू नाव कसं मिळावं याविषयी त्यांचं निरीक्षण केलं.पिवळे टोक असलेली चोच आणि कपाळावर तांबड्या रंगाचा ठिपका पाहून याची कल्पना येते.डोळे काळेभोर. भुवई काळसर रंगाची.अंगावर खवलेधारी पिसे. पंखाच्या मागील बाजूस हिरवी पिसे.हवेत उडताना तो हिरवा रंग अधिक उठून दिसायचा.त्यातील एक बदक गवतावर आले.तेव्हा त्याचे तांबड्या रंगाचे पाय जवळून पाहता आले.अजून आमचा त्यांना सुगावा लागला नव्हता.म्हणून ते धीटपणे पाणवनस्पतीवर ताव मारत होते. पक्षीनिरिक्षण करताना संयमाची फार गरज असते ते इथं अनुभवायला मिळाले. 


बाहेर आलेल्या बदकाने पुन्हा पाण्यात उडी घेतली.या तळ्यात त्यांना राहण्यासाठीची जागा उत्तम होती.खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. धोक्याची शक्यता फारच कमी म्हणून बदकाच्या विविध जाती इथं गुण्यागोविंदानं मुक्तपणे वावरताना दिसू लागल्या.हळदी कुंकू बदक पाण्याच्या दिशेनं सरकले.थोड्या अंतरावर चक्रांग बदकाची एक जोडी पोहताना दिसली. त्याच दिशेनं या बदकांनी मोर्चा वळविला.पलीकडच्या काठावर काळवीटांचा कळप एकवटलेला दिसला.हरभऱ्याचं रान तुडवित त्यांनी पाण्याच्या दिशेनं चालायला सुरुवात केली.काळवीट नर उंचावट्यावर उभा होता. माद्यांनी पाण्याला तोंड लावले.त्यातील पाडसावर दुर्बीण स्थिरावली.पाणपक्ष्यांची निरीक्षणे करताना पाण्यावर आलेल्या प्राण्यांच्या नोंदी सुद्धा घेऊ लागलो.पक्ष्यांचं आणि या प्राण्यांचं सहजीवन समजून घेऊ लागलो. 

     

पाडसानं सुद्धा पाण्याला तोंड लावलं.त्याच्या आईसारखं कावरं-बावरं होऊन पाहत नव्हतं. त्याला अजून धोक्याची जाणीव नव्हती.ते अजून तरी बिकट प्रसंगाला सामोरं गेलं नव्हतं.त्याच्या कळपानं त्याला सुरक्षित ठेवलेलं.जस-जसं पाडस मोठं होईल तस-तशी संकटाची मालिका त्याला कळू लागेल.तेव्हा ते कानोसा घेऊनच पुढचं पाऊल उचलेल.त्याचे कान रात्रीच्या वेळी डोळे म्हणून काम करतील.तूर्तास त्या पाडसानं पोटभरून पाणी पिलं.त्यानंतर पाणकणीस गवताच्या बाजूला असलेल्या हिरवळीवर हुंदडलं. 


काळविटाचा कळप पाण्यावर आला तेव्हा त्यांनी बराच वेळ घेतला.सगळ्यांनी मनसोक्त पाणी पिऊन घेतलं. बाजूला हुंदडत राहिले. तेव्हा बाभळीवर बसलेल्या ढोकरी पाण्याकडं सरकल्या.काळविटानं स्वतःच्या अस्तित्वाच्या काही खाणाखुणा तिथंच सोडल्या.त्यानं बाभळीच्या खोडाला अंग घासलं.काही वेळानं कळप आलेल्या वाटेनं परत गेला.जिथं काळविटांनी पाणी पिलं तिथं आता पाच-सहा जांभळ्या पाणकोंबड्या वावरू लागल्या. 



माणिक पुरी - पक्षी येती अंगणी या पुस्तकाचे लेखक व निसर्ग लेखक त्याच बरोबर माझेही सस्नेह मित्रच..

१३/१०/२३

तुमच्या जीवनाची १००% जबाबदारी घ्या.. Take 100% responsibility of your life..

तुम्ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे.तुम्ही परिस्थिती,ऋतु किंवा वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.पण तुम्ही स्वतःला बदलू शकता.- जिम रॉन अमेरिकेतील अग्रगण्य व्यवसायतज्ज्ञ


'उत्तम आयुष्य जगणे हा आपला अधिकारच आहे' ही आजच्या अमेरिकन संस्कृतीतील सर्वात मोठी गैरसमजूत आहे.आपले जीवन परिपूर्ण होण्यासाठी,आपल्याला चांगल्या व्यवसाय संधी मिळाव्यात यासाठी चांगले कौटुंबिक जीवन किंवा समृद्ध व्यक्तिगत नातेसंबंध निर्माण होण्यासाठी कुठे ना कुठे कोणीतरी (अर्थातच आपण

नव्हे) जबाबदार असते,असे आपल्याला वाटते.का? तर केवळ आपण या जगात आहोत म्हणून.


पण सत्य हे आहे - की तुम्ही ज्या दर्जाचे जीवन जगत आहात त्यासाठी फक्त एकच व्यक्ती जबाबदार असते.ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच आहात…


तुम्ही जिथे आहात, तिथून तुम्हाला, जिथे जायचे

आहे,तिथे कसे पोचावे.जँक कँनफिल्ड,अनुवाद-

नवनाथ लोखंडे,मंजुल पब्लिसिंग हाऊस मधून


जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची,प्रत्येक अनुभवाची शंभर टक्के जबाबदारी तुम्हाला स्वत:लाच घ्यावी लागेल.तुमचे यश,तुमचे काम,तुमचे नातेसंबंध,तुमचे आरोग्य,तुमचे उत्पन्न,तुमचे कर्ज,तुमच्या भावना आणि तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.

हे सोपे नाही..


खरं तर आपल्यापैकी अनेकांना आयुष्यातील वाईट गोष्टीसाठी दुसऱ्या कुणाला तरी दोष देण्याची सवय लागलेली असते.आपण आपल्या पालकांना दोष देतो,आपल्या बॉसला दोष देतो. आपले मित्र,

प्रसारमाध्यमं,आपले सहकारी,आपले ग्राहक,आपला जोडीदार इतकेच नव्हे तर हवामान,अर्थव्यवस्था,आपले राशीभविष्य, आपली गरिबी अशा कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला आपण दोष देत राहतो.समस्येचे मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही.

समस्येचे मूळ आपणच असतो. 


एक सुंदर गोष्ट आहे.एक माणूस रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना त्याला दुसरा एक माणूस भेटतो.तो दुसरा माणूस रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या खांबाच्या वाकून काहीतरी शोधत असतो.पहिला विचारतो,


"तू इथे काय शोधतो आहेस?" दुसरा सांगतो की माझी हरवलेली किल्ली मी शोधतोय.त्या प्रवाशाला मदत करावी म्हणून पहिला ही गुडघे टेकून खाली बसतो व किल्ली शोधू लागतो. एक तासभर शोधूनही किल्ली त्यांना सापडत नाही तेव्हा पहिला प्रवासी म्हणतो,"आपण सगळीकडे शोध घेतला तरीही किल्ली सापडली नाही.

इथेच ती हरवली आहे असे नक्की वाटते आहे का?" तुला "नाही. किल्ली माझ्या घरी हरवली आहे. पण इथे खांबाखाली अधिक उजेड आहे म्हणून मी इथे किल्ली शोधतोय."त्या माणसाने उत्तर दिले.


तुम्हाला हवे तसे आयुष्य लाभले नसेल तर त्याची कारणे बाहेर शोधू नका.कारण तुमच्या वाट्याला आलेल्या

चांगल्या-वाईट जीवनाला तुम्ही स्वतःच जबाबदार असता,अन्य कोणीही नाही ! तुम्हाला आयुष्यात अफाट यश मिळवायचे असेल हवी असलेली - प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. याला कोणताही पर्याय नाही.


प्रत्येक गोष्टीची शंभर टक्के जबाबदारी


मी प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे, १९६९ साली पदवीनंतरच्या एका वर्षात मला डब्ल्यू.क्लेमंट स्टोन यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली.ते स्वकर्तृत्वाने करोडपती बनले होते. त्या वेळी त्यांची संपत्ती सहाशे दशलक्ष डॉलर्स एवढी होती.नव्वदच्या दशकात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उद्योजक लक्षाधीश बनले त्याच्या खूप आधीची ही गोष्ट आहे.स्टोन हे अमेरिकेतील अग्रगण्य 'सक्सेस गुरू' देखील होते. 'सक्सेस मॅगझिन'चे ते प्रकाशक होते. 'द सक्सेस सिस्टिम दॅट नेव्हर फेल्स' या पुस्तकाचे ते लेखक होते.शिवाय नेपोलियन हीलसह त्यांनी 'सक्सेस थ्रू अ पॉझिटिव्ह मेंटल अ‍ॅटिट्यूड' या पुस्तकाचे लेखनही केले होते.


माझे प्रशिक्षण सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात श्री.स्टोन यांनी मला विचारले, "तू तुझ्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घेतली आहेस का?"

'मला तसं वाटतं." मी उत्तर दिले.

"मुला,हा प्रश्न 'हो' किंवा 'नाही'चा आहे.एकतर तू जबाबदारी घेतलीस किंवा नाही घेतलीस.'

"मला वाटतं,मी निश्चितपणे काही सांगू शकणार नाही."

"तुझ्या आयुष्यात एखाद्या परिस्थितीबद्दल तू कधी इतरांना दोष दिला आहेस का? तू कधी एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार केली आहेस का?" 

'अं... हो, मला वाटतं मी अशा तक्रारी केल्या आहेत. "

"अंदाजे सांगू नकोस. विचार कर.

"हो.मी तक्रारी केल्या आहेत.' "

"ठीक आहे.याचा अर्थ तू तुझ्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घेतलेली नाहीस.कारण संपूर्ण जबाबदारी घेणं म्हणजे जे तुमच्या वाट्याला येते त्यासाठी फक्त स्वतःला जबाबदार धरणे होय. तुमच्या येणाऱ्या सर्व अनुभवांचे 'कारण' तुम्ही स्वतःच आहात.हे मान्य करणे म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेणे होय.जर तुला खरोखरच यशस्वी व्हायचे असेल - आणि मला माहीत आहे तुला तसं व्हायचंय तर तुला इतरांना दोष देण्याची व सबबी सांगण्याची अगर तक्रारी करण्याची सवय सोडून द्यावी लागेल आणि तुझ्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल.त्याचाच अर्थ असा की तुझे यश किंवा अपयश याला तू स्वतःच जबाबदार असशील.यशस्वी होण्याची ही पूर्वअट आहे.

आजपर्यंत तुमच्याबाबतीत जे काही घडले ते तुमच्यामुळेच घडले हे मान्य केले तरच तुम्ही इथून पुढे तुम्हाला अपेक्षित असलेले आयुष्य घडवू शकता.


"हे बघ जॅक,तुझी सध्याची परिस्थिती तूच निर्माण केली आहेस.या गोष्टीचं तुला जर पूर्ण आकलन झालं,तर तुझ्या इच्छेनुसार अशी परिस्थिती तुला निर्माण करता येईल आणि टाळताही येईल.कळतंय का तुला हे ?"

"होय सर.मला समजतंय. "

'तुझ्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घेण्याची तुझी तयारी आहे काय ?'

"होय सर,मी तयार आहे."

आणि त्या क्षणापासून मी ती जबाबदारी स्वीकारली.


सबबी सांगणे सोडून द्या


९९% अपयश हे अशा लोकांकडून येतं ज्यांना सबबी सांगण्याची सवय असते.

शेंगदाण्याचे ३१५ पेक्षा अधिक निरनिराळे उपयोग शोधून काढणारे रसायनशास्त्रज्ञ - 

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर


जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी स्वीकारावीच लागेल.याचा अर्थ असा की तुम्हाला सबबी सांगण्याची सवय कायमची सोडावी लागेल. तुमच्या दुःखाला,पराभवाला आणि केविलवाण्या अवस्थेला दुसरे कोणी तरी किंवा परिस्थिती जबाबदार आहे ही तुमची लाडकी तक्रार तात्काळ थांबवा.


उलट असे म्हणा की मी ठरविले असते तर ही परिस्थिती सहज बदलू शकलो असतो.तशी क्षमता तुमच्यामध्ये निश्चितच होती.पण काही ना काही कारणाने - दुर्लक्ष,

जागरूकतेचा अभाव, भीती,'बरोबर करतोय ना' ही भीती किंवा सुरक्षिततेची गरज - तुम्ही तुमची क्षमता वापरली नाही,ती का वापरली नाही कोण जाणे!पण ते महत्त्वाचे नाही.जे झाले ते झाले.महत्त्वाची गोष्ट ही आहे की या क्षणापासून तुम्ही,तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेत आहात - आणि ती स्वेच्छेने घेत आहात.इथून पुढे तुमच्या बाबतीत जे काही चांगले वाईट घडेल त्या सगळ्याची १००% जबाबदारी जणू काही तुमची आहे अशाच पद्धतीने तुम्ही स्वेच्छेने वागाल.


जर एखादे काम तुमच्या मनासारखे झाले नाही तर तुम्ही स्वतःला विचारायला हवे की, "हे मी कसे काय केले? मी काय विचार करीत होतो? मला काय करायचे होते? मी काय बोललो किंवा बोललो नाही? मी काय केले किंवा केले नाही म्हणून हे घडले? त्या माणसाला तसे वागायला मी कसे भाग पाडले? मला अपेक्षित असलेला परिणाम साध्य होण्यासाठी पुढच्या वेळी मी कोणते बदल केले पाहिजेत?"


श्री. स्टोन यांना भेटल्यानंतर काही वर्षांनी लॉस एंजेलिसमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ.रॉबर्ट रेन्सिक यांनी मला एक अतिशय साधे पण अतिशय महत्त्वाचे सूत्र शिकविले.या सूत्रामुळे शंभर टक्के जबाबदारी घेण्याचा कल्पना मला अधिकच पटला. ते सूत्र असे आहे.


E+R=0

(Event + Response = Outcome) घटना + प्रतिसाद = परिणाम


याची मूळ कल्पना अशी आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे परिणाम अनुभवता (मग ते यश असो वा अपयश,

श्रीमंती अगर गरीबी, स्वास्थ्य किंवा आजारपण,मिलन किंवा विरह, आनंद असो वा वैफल्य) तो,तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या या आधीच्या घटनांना दिलेल्या प्रतिसादाचा परिपाक असतो.


सध्याच्या परिणामांवर जर तुम्ही समाधानी नसाल,तर तुमच्यासमोर असलेल्या दोन पर्यायांपैकी एक तुम्ही निवडू शकता.


.योग्य परिणाम घडवून न आणल्याबद्दल घटनेला दोष देणे.


थोडक्यात तुम्ही अर्थव्यवस्थेला,हवामानाला,दारिद्र्याला,

शिक्षणाच्या अभावाला,वंशवादाला,लिंग विषमतेला,

सध्याच्या प्रशासनाला.तुमच्या पतीला अगर पत्नीला,

तुमच्या बॉसच्या स्वभावाला पाठिंबा नसण्याला,राजकीय स्थितीला,व्यवस्थेला अगर अव्यवस्थेला आणि इतर कुठल्यातरी बाह्य घटनेला दोष देता.जर तुम्ही गोल्फ खेळणार असाल तर तुम्ही तुमच्या संस्थेला किंवा गोल्फच्या मैदानालासुद्धा दोष द्याल.ही सर्व कारणे असतात यात संशय नाही. पण जर तीच निर्णायक ठरणार असतील तर मग कोणताही माणूस यशस्वी होऊ शकला नसता.


जॅकी रॉबिन्सन मोठमोठ्या क्रीडामंडळांकडून बेसबॉल खेळू शकला नसता.सिडने पॉइटियर व डेन्झेल वॉशिंग्टन कधीही चित्रपट अभिनेते बनू शकले नसते.डायन (Dianne ) फिनस्टेन व बार्बरा बॉक्सर कधीही संसद सदस्य बनू शकले नसते.एरिन ब्राँकोविच कॅलिफोर्नियातील हिंकले शहरातील दूषित पाण्याचे कारण शोधू शकला नसता,बिल गेटस् मायक्रोसॉफ्टची स्थापना करू शकला नसता,स्टीव्ह जॉब्जने अ‍ॅपल कॉम्प्युटर्स सुरू केली नसती.अडचणींवर मात करून यशस्वी होणारे शेकडो लोक आहेत.त्यांनी परिस्थितीला नावे ठेवली असती तर ते यशस्वी होऊच शकले नसते.


पुष्कळ लोकांनी अशा 'तथाकथित' अडथळ्यांवर मात केली आहे.म्हणूनच अडथळे तुम्हाला रोखू शकत नाहीत हे लक्षात घ्या.बाह्य परिस्थिती तुम्हाला थांबवत नाही,तर तुम्हीच तुम्हाला थांबवत असता.आपणच आपल्याला अटकाव करीत असतो.आपण स्वतःला मर्यादित करणारे विचार मनात आणतो आणि स्वतःलाच मागे खेचणारे वर्तन करतो.मद्यपान व धूम्रपानासारख्या आत्मघातकी सवयीचे आपण तार्किक युक्तिवाद लढवून समर्थन करतो. उपयुक्त सूचनांकडे आपण दुर्लक्ष करतो,नवीन कौशल्ये व नवे ज्ञान मिळविण्याचा आपण कंटाळा करतो.फालतू बाबींमध्ये आपला वेळ वाया घालवतो.निरर्थक व बाष्कळ गप्पांमध्ये आपण स्वत:ला गुंतवून घेतो.निकस आहार घेतो, व्यायाम करत नाही.आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसा खर्च करतो,भविष्यासाठी कसलीही गुंतवणूक करत नाही,संघर्ष गरजेचा असतानाही संघर्ष करीत नाही.सत्य बोलायला आपण कचरतो,आपल्याला काय हवं आहे ते आपण सांगत नाही आणि मग आपण विचार करतो की आपल्याला यश का मिळत नाही ? बहुतेक लोक असेच वागतात.प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी ते दुसऱ्या कोणालातरी किंवा परिस्थितीला दोषी ठरवितात.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे सबब तयार असते.


२. पेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही एखाद्या घटनेसाठी असणारा तुमचा प्रतिसादच बदला. 


तुम्ही तुमचे विचार बदलू शकता,अभिव्यक्ती बदलू शकता,स्वतःविषयी व जगाविषयी तुमच्या डोक्यात असलेल्या कल्पना बदलू शकता.तुम्ही तुमचे वर्तन - तुमची कार्यपद्धती बदलू शकता. तसेही,आपल्या हातात इतकेच तर असते. दुर्दैवाने आपल्यापैकी अनेक लोक सवयींच्या इतके आहारी गेलेले असतात की ते स्वतःचे वर्तन कधीच बदलत नाहीत.आपण घटनांना साचेबद्ध प्रतिसाद देत राहातो.आपल्या जोडीदाराशी व मुलांशी,कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी,

आपल्या ग्राहकांशी व अशिलांशी,आपल्या विद्यार्थ्यांशी आणि एकूणच जगाशी त्याच पद्धतीने वागतो.आपण म्हणजे प्रतिक्षिप्त व परिस्थितीजन्य प्रतिसाद देणारे जणू यंत्रच बनलो आहोत.आपल्यावर जणू त्याचंच नियंत्रण असते.तुम्हाला तुमच्या विचारांवर, तुमच्या कल्पनांवर,

तुमच्या स्वप्नांवर व दिवास्वप्नांवर आणि तुमच्या वर्तनावर नियंत्रण मिळवावे लागेल.तुमचे विचार,तुमचे बोलणे आणि तुमचे वागणे,तुमच्या हेतूंशी,उद्दिष्टांशी, मूल्यांशी आणि ध्येयाशी सुसंगत असले पाहिजे.

११/१०/२३

सार्त्र - बोव्हा नात्याची अनेकांगी चिकित्सा - A multifaceted treatment of the Sartre-Bova relationship

'या विश्वात माणूस स्वतःच्या इच्छेविना आला आहे.स्वतंत्र असण्याची सजा त्याला मिळाली आहे.जाणीव असणारी स्व-सत्ता (बीइंग फॉर इटसेल्फ) आणि जाणीव नसणारी वस्तुरूप निर्लेप सत्ता (बीइंग इन इटसेल्फ) या दोन सत्तांमध्ये सभोवतालचा परिसर विभागलेला असतो.

माणूस म्हणजे जाणीव,स्वतःच्या पलीकडे जाता येणारे अस्तित्व;परंतु माणसाची धडपड वस्तुपदाला जाण्याची,

निर्लेप सत्ता होण्याची असते.हा अयशस्वी प्रयत्न माणसाचे जीवन असमर्थनीय करतो.स्वतःला हरवणारा माणूस ही एक व्यर्थ यातना आहे!' 


अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉ पॉल सार्त्र यांनी या मूलभूत संकल्पना मांडल्या.सिमोन द बोव्हा यांनी 'द सेकंड सेक्स'मधून स्त्रीवादाचे तत्त्वज्ञान सादर केले.पुरुषप्रधान जगात स्त्रीला दुय्यम स्थान असल्याने तिला स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देता येत नाही. मानववंशशास्त्र,

मानसशास्त्र, इतिहासाचे दाखले देत,स्त्रीवादी चळवळींचा आधार ठरलेले हे विचार त्यांनी १९४९ मध्ये मांडले,तेव्हा जगभर खळबळ उडाली होती.


विवाहसंस्था नाकारून ५१ वर्षे एकमेकांना साथ देणाऱ्या बोव्हा सात्रे यांनी - विसाव्या शतकाला मूलभूत,बंडखोर विचार दिले.त्यांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या,नाटक,निबंधांतून ते व्यक्त होतात. विचारप्रक्रिया व त्यांची घडण यासंबंधीही या दिग्गजांनी आत्मचरित्र व मुलाखतींतून भरपूर सांगितले आहे.त्यावरून कित्येक स्त्रीवाद्यांनी सार्त्रकडून बोव्हा यांच्यावर झालेल्या तथाकथित अन्यायाबद्दल लिहून ठेवले आहे.सिमोन द बोव्हा अँड ज्याँ पॉल सार्त्र द रिमेकिंग ऑफ ए ट्वेंटीएथ संच्युरी लीजंड' च्या दोन खंडांतून त्यांच्या बौद्धिक वाटचालीचा अन्वय लावला आहे.अस्तित्ववादी 'सार्त्रीय' संकल्पना मुळात बोव्हा यांनी मांडल्याचा निष्कर्ष केट व एडवर्ड फुलब्रुक यांनी काढला आहे.


पुढील आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बालपणाचे वर्णन,

विश्लेषण त्यातील दोन प्रकरणांत केले आहे.दीड वर्षाचे असताना वडील वारल्यामुळे सार्त्र बारा वर्षांपर्यंत आजोळी राहिले.आई,आजी,आजोबा व पुस्तके हेच सवंगडी.मित्रांमध्ये ते मिसळत नव्हते.आजी - लुई,

आजोबा - चार्ल्स श्वाईत्झर यांच्यामुळे व्हिक्टर ह्युगो,

टॉलस्टॉय,दस्तयेव्हस्कीचे लिखाण,रशियन क्रांतीच्या चर्चा त्यांना ऐकायला मिळाल्या.चौथ्या वर्षी सार्त्र पुस्तके वाचू लागले आणि त्याच वेळी उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. तरीही बागडण्याच्या वयात विश्वकोश हाताळणाऱ्या सार्त्रच्या विलक्षण बुद्धीचे कुटुंबीयांसमोरच वारेमाप कौतुक झाल्याने, स्वतःच्या वेगळेपणाची त्यांनाही जाणीव झाली. मोठ्यांच्या भाषेत बोलणारा,गंभीर साहित्य वाचणारा मुलगा पाहून चिंताग्रस्त आईने त्यावर उतारा म्हणून कॉमिक्स आणली.सातव्या वर्षी कथा,निबंध,

कविता लिहून त्यांनी सगळ्यांना चकित केले होते.आपण कुरूप आहोत,हे जाणवल्याने स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी कुशल वाङ्मय-चौर्य सार्त्र बालवयातच करू लागले.आईने पुनर्विवाह केल्यावर सावत्र वडिलांकडून कोडकौतुक होईना.गणित - भूमितीची सक्ती त्यांना असह्य झाली.सावत्र वडिलांविषयी तिटकारा क्रमाने वाढत गेला. वडील ही संस्था नाकारणारी बंडखोर बीजे या काळातच पडली.'आयुष्यभर मी या व्यक्तीवरचा संताप लिखाणातून काढला,'असे सार्त्र यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

पुढे,सत्ता गाजवणाऱ्या,स्वातंत्र्यावर बंधने आणणाऱ्या

धर्म,राजसत्तेच्या विरोधात सार्त्रनी लिखाण व कृती केली.


कडक शिस्तीच्या कॅथलिक संस्कारात सिमोन द बोव्हा वाढल्या.चौथ्या वर्षापासून त्यांनाही वाचनाची आवड लागली.आई- वडिलांनी पुस्तकप्रेम जपले.बालपणापासून गोष्टी लिहिण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे खूप कौतुक झाले.

'लेखक होण्याइतके जगात दुसरे काहीही वेधक,आकर्षक नाही,हे तेव्हाच त्यांच्या मनावर पक्के ठसले.बोव्हासुद्धा समवयीन मैत्रिणींपासून वंचित होत्या.भावंडांत मोठ्या असल्याने अधिकार गाजवायला हेलेना,धाकटी बहीण होती.जॉर्ज इलियटची 'मिल ऑन द प्लॉस व लुईसा मे ऑलकॉटची कादंबरी 'लिटल वुमन' तिने बाराव्या वर्षी वाचून काढली.'मिल ऑन द फ्लॉस'मधील मॅगी तुलिव्हरचा 'स्व' आणि 'पर' या ताणात चोळामोळा होतो.

बोव्हा स्वतःला 'मॅगी'त पाहू लागल्या.पुढील आयुष्यातला हा वळणाचा टप्पा ठरला.बोव्हा यांचे वडील जॉर्जेसनी एक दिवस घोषणा केली,यापुढे आई - वडिलांचे काही चुकले आणि टीका खरी असली, तरी मुलांना तो अधिकार नाही.'मात्र,बोव्हा यांना त्यांच्या वाचनामुळे 'सत्य हे निष्ठेपेक्षा श्रेष्ठ', अशी मूल्ये प्राणापेक्षा प्रिय वाटत होती. वडिलांची पोलादी नियमावली जाचक वाटत असताना आलेले वक्तव्य,बोव्हा यांना त्यांच्या आणि कुटुंबीयांमधील दरीचे भान देणारे ठरले, बहीण आता आदर्श मानत नाही.

वडिलांना कुरुपतेबद्दल चिंता वाटतें आहे.आईने बोव्हा यांच्यामध्ये होणारे बदल टिपले आहेत.या अवस्थेत त्यांना एकाकीपण भेडसावू लागले. तेव्हापासूनच स्वातंत्र्य जपणारा,विचार समजू शकणारा साथीदार असावा,अशी आदर्श सहजीवनाची स्वप्ने त्या पाहू लागल्या.


सार्त्रप्रमाणेच बोव्हा यांचेही बालपण फार लवकर उरकून त्यांनी प्रौढत्वाकडे झेप घेतली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मूल्ये नाकारून विसाव्या शतकाच्या मध्य -

काळातील नवी मूल्यप्रणाली देणारी ही झेप ठरली,असा आदरपूर्वक उल्लेख लेखकांनी केला आहे.


कायद्याचे शिक्षण घेऊन निवृत्तिवेतन देणारी प्रशासन सेवा करावी,ही वडिलांची इच्छा,तर सुखाने ग्रंथपाल व्हावे,ही आईची आकांक्षा झिडकारून बोव्हा यांनी तत्त्वज्ञानात संशोधन करायचे ठरवले.एकविसाव्या वर्षी त्यांनी तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली,तेव्हा त्या फ्रान्स

मधील पहिल्या प्राध्यापिका ठरल्या. स्वतःची वाट शोधणाऱ्या बोव्हा यांना मार्ग सापडला.शिक्षण घेतानाच सार्त्रशी ओळख झाली.वडिलकीचा आव न आणता,

तासन् तास विद्यार्थ्यांना अवघड समस्या समजून सांगणारे सार्त्र इतरांपेक्षा वेगळे प्राध्यापक होते.दोघांनाही तत्त्वज्ञानाची,महत्त्वपूर्ण लेखनाची आस होती. परिपक्व,इतरांच्या मतांचा आदर करणारा जोडीदार बोव्हा यांनी सार्त्रमध्ये पाहिला. चमकदार बुद्धीच्या बोव्हा उत्तीर्ण झाल्याची बातमी सांगतानाच सार्त्रनी,दंतकथा ठरलेली घोषणा केली,'यापुढे मी तुला माझ्या पंखाखाली घेणार आहे.' कॉफी हाऊस,लक्झेम्बर्ग रस्त्यावर त्यांच्या प्रदीर्घ भेटी सुरू झाल्या,त्या सार्वच्या मृत्यूनंतरच (१५ एप्रिल १९८०) थांबल्या.


बोव्हा यांनी आई-वडिलांचे घर सोडून भाड्याचे घर घेतले.

आता त्यांच्यावर कुणाचेही बंधन असणार नव्हते.१९२९ च्या ऑक्टोबर महिन्यात सार्त्र बोव्हा यांनी परस्परांना साथ देण्याचा ऐतिहासिक निश्चय केला.एकमेकांपासून काहीही लपवायचे नाही,दोन वर्षे एकमेकांना तपासण्याच्या काळात परस्परांशी एकनिष्ठ राहण्याचे ठरवले.मात्र,ते दोघांनाही शक्य झाले नाही.कसलेच बंधन दोघांनी मानले नाही. एकमेकांना ते अटळ जोडीदार समजत असले तरी आकस्मिक प्रेमप्रकरणे चालूच राहिली; सार्त्रनी दोन वेळा विवाह करण्याचे प्रस्ताव ठेवले.विवाहसंस्था अटळ असल्याने तडजोड करू,ही त्यांची भूमिका बोव्हा यांनी नाकारली. सार्त्र मांडत असलेल्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी विवाह विसंगत असल्याने हे योग्य नाही,असे बोव्हा यांचे म्हणणे होते.लष्कराच्या हवामानशास्त्र विभागात सार्त्रना जावे लागले.दीड वर्षानंतर परतल्यावर सार्त्र पुन्हा शिकवू लागले.मध्यंतरी,बोव्हा कादंबरी लिहीत होत्या.सार्त्र धारदार सुरीने व्यक्तींचे मनोविश्लेषण करत होते.बोव्हा यांच्या लिखाणात अधिभौतिक बाजूला महत्त्व असे.सार्त्र तत्त्वज्ञान व साहित्याची गल्लत करतात,असे बोव्हा यांनी अनेक वेळा सांगितले.त्यांना तत्त्वज्ञानामागे न लागता साहित्यनिर्मिती करण्याचा सल्लाही दिला.


१९३८ - ४८ हे दशक बोव्हा सार्त्र यांचे ठरले. 'शी कम्स टू स्टे','द ब्लड - ऑफ अदर्स','ऑल मेन आर मॉर्टल'या कादंबऱ्या,'द एथिक्स ऑफ अँबिग्युटी'सारखा तात्त्विक ग्रंथ ४३ - ४८ मध्ये लिहिल्याने बोव्हा यांचा दबदबा निर्माण झाला. 'नॉशिया','इंटिमसी' या कादंबऱ्यांमुळे सार्त्रकडे 'उगवता तारा म्हणून पाहिले गेले.'नो एक्झिट' हे नाटक,'बिईंग अँड नथिंगनेस' हा तात्त्विक ग्रंथ याच काळात लिहिला गेला.दोघांनी त्यांच्या लेखनातून सामाजिक,नैतिक,तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या ऐरणीवर आणल्या.जगभर त्यांची चर्चा सुरू झाली.अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा विचार सुरू झाला.

साहित्य, नाटक,चित्रपटांत उलथापालथ करण्याचे श्रेय अस्तित्ववाद्यांनाच जाते.


बोव्हा यांनी 'शी कम्स टू स्टे' लिहून पूर्ण केल्यावर,सार्त्रनी 'बिईंग अँड नथिंगनेस' लिहिले. पॅरिसमधील 'कॅफे प्लोरा' मध्ये बोव्हा यांच्या समवेत बसून त्याच्या मसुद्याला अंतिम रूप दिले.याचे अनेक दाखले त्यांच्या पत्रांतून मिळतात. 'शी कम्स टू स्टे'मधील बोव्हांच्या अपश्रद्धा (बॅड फेथ) ह्या संकल्पनेचे प्रतिबिंब 'बिईंग अँड नथिंगनेस' मध्ये उमटले आहे.माणूस सदैव आपल्या अस्तित्वाचे खोटे रूप पाहू इच्छितो.आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठीच्या धडपडीतूनच अश्रद्धा निर्माण होते.

ह्या संकल्पनेची बीजे व विस्तार बोव्हा यांनी केल्याचे लेखकांनी म्हटले आहे.


(ग्रंथाचिया द्वारी- अतुल देऊळगावकर,विश्वकर्मा पब्लिकेशन्स)


१९४०मध्ये जर्मनीने हॉलंड,बेल्जियमपाठोपाठ फ्रान्स पादाक्रांत केले.सार्त्रच्या जवळच्या मित्रांचे खून झाले.

अन्नाचा भीषण तुटवडा झाला.डाव्या विचारसरणीच्या गटात बोव्हा सार्त्र सामील झाले.जर्मन सैनिकांसमोर फ्रेंच भाषेतील निषेधपत्रके वाटण्यात,निदर्शने करण्यात दोघेही सक्रिय होते.बोव्हा रूढार्थाने राजकीय भूमिका कधीच घेत नव्हत्या.बटबटीत,बालिश कृती त्यांना अर्थशून्य वाटायच्या.राजकीय गटातल्या व्यक्ती बोव्हा यांना परिपक्व वाटत नव्हत्या. सार्त्रना उत्तरोत्तर सर्जनशील लिखाणापेक्षा कृती महत्त्वाची वाटू लागली.१९४१ मध्ये 'द प्लाईज' रंगभूमीवर आल्याने सार्त्रना ज्याँ जने,आल्बेर कामू यांच्यासारखे प्रतिभावंत मित्र मिळाले.'शी कम्स टू स्टे'ची मनापासून स्तुती व गौरव करणाऱ्यांत ज्याँ कोक्तो,गॅब्रियल मार्सेल होते. कामू व सार्त्रची वाढती मैत्री बोव्हा यांना त्रासदायक वाटू लागली.बोव्हा यांनी,

'बुद्धिमान महिलांसमोर कामू अवघडत,'असे म्हटले आहे.तरी सार्त्र यांनी 'माझा शेवटचा चांगला मित्र' असा कामूविषयी उल्लेख केला आहे.


१९५० ते ६० च्या दशकात अल्जिरियाचा मुक्तीसंघर्ष सुरू झाला.फ्रान्समध्ये द गॉल सत्तेवर आल्याने भ्रामक राष्ट्रवादाला उधाण येत होते.बोव्हा सार्त्रनी अल्जिरियात होत असलेल्या फ्रेंच अत्याचाराचा निषेध केला.संतप्त वंशवाद्यांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.१९६१ मध्ये सार्त्रच्या घरावर बाँब टाकला गेला.याची कल्पना आल्याने त्यांना दुसरीकडे हलवले होते.बोव्हा यांच्या घराची नासधूस विद्यार्थ्यांनी वाचवली.स्पष्ट,प्रामाणिक भूमिका घेण्याचा हा परिणाम होता. 'द सेकंड सेक्स' प्रकाशित झाल्यानंतर कॅथलिक ख्रिश्चनांचा मस्तकशूळ उठला.बोव्हा यांची यथेच्छ बदनामी, क्रूर नालस्ती झाली.

'असमाधानी,षंढ, समसंभोगी,अविवाहित माता' म्हणून त्यांना हिणवले गेले.समाजाच्या पुढे कित्येक दशके असणाऱ्या बोव्हा यांनी धीराने हे सर्व सहन केले.


संकल्पित दोन खंडांपैकी ह्या पहिल्या खंडात लेखकांनी सार्त्र बोव्हा यांच्या समग्र साहित्याचा परिश्रमाने अभ्यास करून चिकित्सा केली आहे. विभूतिपूजेकडे चुकून जाणार नाही,याची दक्षता घेतली आहे.सहसा अनेक स्त्रीवादी केवळ एकनिष्ठ न राहण्याला जास्त महत्त्व देतात.हा उल्लेख टाळला नसला,तरी त्याला अवाजवी महत्त्वही दिले नाही.सार्त्र - बोव्हा यांच्या बौद्धिक कामगिरीत बोव्हा यांचे पारडे जड ठरवल्याने, नव्या वादाला तोंड फोडले आहे.