तुम्ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे.तुम्ही परिस्थिती,ऋतु किंवा वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.पण तुम्ही स्वतःला बदलू शकता.- जिम रॉन अमेरिकेतील अग्रगण्य व्यवसायतज्ज्ञ
'उत्तम आयुष्य जगणे हा आपला अधिकारच आहे' ही आजच्या अमेरिकन संस्कृतीतील सर्वात मोठी गैरसमजूत आहे.आपले जीवन परिपूर्ण होण्यासाठी,आपल्याला चांगल्या व्यवसाय संधी मिळाव्यात यासाठी चांगले कौटुंबिक जीवन किंवा समृद्ध व्यक्तिगत नातेसंबंध निर्माण होण्यासाठी कुठे ना कुठे कोणीतरी (अर्थातच आपण
नव्हे) जबाबदार असते,असे आपल्याला वाटते.का? तर केवळ आपण या जगात आहोत म्हणून.
पण सत्य हे आहे - की तुम्ही ज्या दर्जाचे जीवन जगत आहात त्यासाठी फक्त एकच व्यक्ती जबाबदार असते.ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच आहात…
तुम्ही जिथे आहात, तिथून तुम्हाला, जिथे जायचे
आहे,तिथे कसे पोचावे.जँक कँनफिल्ड,अनुवाद-
नवनाथ लोखंडे,मंजुल पब्लिसिंग हाऊस मधून
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची,प्रत्येक अनुभवाची शंभर टक्के जबाबदारी तुम्हाला स्वत:लाच घ्यावी लागेल.तुमचे यश,तुमचे काम,तुमचे नातेसंबंध,तुमचे आरोग्य,तुमचे उत्पन्न,तुमचे कर्ज,तुमच्या भावना आणि तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.
हे सोपे नाही..
खरं तर आपल्यापैकी अनेकांना आयुष्यातील वाईट गोष्टीसाठी दुसऱ्या कुणाला तरी दोष देण्याची सवय लागलेली असते.आपण आपल्या पालकांना दोष देतो,आपल्या बॉसला दोष देतो. आपले मित्र,
प्रसारमाध्यमं,आपले सहकारी,आपले ग्राहक,आपला जोडीदार इतकेच नव्हे तर हवामान,अर्थव्यवस्था,आपले राशीभविष्य, आपली गरिबी अशा कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला आपण दोष देत राहतो.समस्येचे मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही.
समस्येचे मूळ आपणच असतो.
एक सुंदर गोष्ट आहे.एक माणूस रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना त्याला दुसरा एक माणूस भेटतो.तो दुसरा माणूस रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या खांबाच्या वाकून काहीतरी शोधत असतो.पहिला विचारतो,
"तू इथे काय शोधतो आहेस?" दुसरा सांगतो की माझी हरवलेली किल्ली मी शोधतोय.त्या प्रवाशाला मदत करावी म्हणून पहिला ही गुडघे टेकून खाली बसतो व किल्ली शोधू लागतो. एक तासभर शोधूनही किल्ली त्यांना सापडत नाही तेव्हा पहिला प्रवासी म्हणतो,"आपण सगळीकडे शोध घेतला तरीही किल्ली सापडली नाही.
इथेच ती हरवली आहे असे नक्की वाटते आहे का?" तुला "नाही. किल्ली माझ्या घरी हरवली आहे. पण इथे खांबाखाली अधिक उजेड आहे म्हणून मी इथे किल्ली शोधतोय."त्या माणसाने उत्तर दिले.
तुम्हाला हवे तसे आयुष्य लाभले नसेल तर त्याची कारणे बाहेर शोधू नका.कारण तुमच्या वाट्याला आलेल्या
चांगल्या-वाईट जीवनाला तुम्ही स्वतःच जबाबदार असता,अन्य कोणीही नाही ! तुम्हाला आयुष्यात अफाट यश मिळवायचे असेल हवी असलेली - प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. याला कोणताही पर्याय नाही.
प्रत्येक गोष्टीची शंभर टक्के जबाबदारी
मी प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे, १९६९ साली पदवीनंतरच्या एका वर्षात मला डब्ल्यू.क्लेमंट स्टोन यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली.ते स्वकर्तृत्वाने करोडपती बनले होते. त्या वेळी त्यांची संपत्ती सहाशे दशलक्ष डॉलर्स एवढी होती.नव्वदच्या दशकात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उद्योजक लक्षाधीश बनले त्याच्या खूप आधीची ही गोष्ट आहे.स्टोन हे अमेरिकेतील अग्रगण्य 'सक्सेस गुरू' देखील होते. 'सक्सेस मॅगझिन'चे ते प्रकाशक होते. 'द सक्सेस सिस्टिम दॅट नेव्हर फेल्स' या पुस्तकाचे ते लेखक होते.शिवाय नेपोलियन हीलसह त्यांनी 'सक्सेस थ्रू अ पॉझिटिव्ह मेंटल अॅटिट्यूड' या पुस्तकाचे लेखनही केले होते.
माझे प्रशिक्षण सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात श्री.स्टोन यांनी मला विचारले, "तू तुझ्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घेतली आहेस का?"
'मला तसं वाटतं." मी उत्तर दिले.
"मुला,हा प्रश्न 'हो' किंवा 'नाही'चा आहे.एकतर तू जबाबदारी घेतलीस किंवा नाही घेतलीस.'
"मला वाटतं,मी निश्चितपणे काही सांगू शकणार नाही."
"तुझ्या आयुष्यात एखाद्या परिस्थितीबद्दल तू कधी इतरांना दोष दिला आहेस का? तू कधी एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार केली आहेस का?"
'अं... हो, मला वाटतं मी अशा तक्रारी केल्या आहेत. "
"अंदाजे सांगू नकोस. विचार कर.
"हो.मी तक्रारी केल्या आहेत.' "
"ठीक आहे.याचा अर्थ तू तुझ्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घेतलेली नाहीस.कारण संपूर्ण जबाबदारी घेणं म्हणजे जे तुमच्या वाट्याला येते त्यासाठी फक्त स्वतःला जबाबदार धरणे होय. तुमच्या येणाऱ्या सर्व अनुभवांचे 'कारण' तुम्ही स्वतःच आहात.हे मान्य करणे म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेणे होय.जर तुला खरोखरच यशस्वी व्हायचे असेल - आणि मला माहीत आहे तुला तसं व्हायचंय तर तुला इतरांना दोष देण्याची व सबबी सांगण्याची अगर तक्रारी करण्याची सवय सोडून द्यावी लागेल आणि तुझ्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल.त्याचाच अर्थ असा की तुझे यश किंवा अपयश याला तू स्वतःच जबाबदार असशील.यशस्वी होण्याची ही पूर्वअट आहे.
आजपर्यंत तुमच्याबाबतीत जे काही घडले ते तुमच्यामुळेच घडले हे मान्य केले तरच तुम्ही इथून पुढे तुम्हाला अपेक्षित असलेले आयुष्य घडवू शकता.
"हे बघ जॅक,तुझी सध्याची परिस्थिती तूच निर्माण केली आहेस.या गोष्टीचं तुला जर पूर्ण आकलन झालं,तर तुझ्या इच्छेनुसार अशी परिस्थिती तुला निर्माण करता येईल आणि टाळताही येईल.कळतंय का तुला हे ?"
"होय सर.मला समजतंय. "
'तुझ्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घेण्याची तुझी तयारी आहे काय ?'
"होय सर,मी तयार आहे."
आणि त्या क्षणापासून मी ती जबाबदारी स्वीकारली.
सबबी सांगणे सोडून द्या
९९% अपयश हे अशा लोकांकडून येतं ज्यांना सबबी सांगण्याची सवय असते.
शेंगदाण्याचे ३१५ पेक्षा अधिक निरनिराळे उपयोग शोधून काढणारे रसायनशास्त्रज्ञ -
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील जीवन प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनाची शंभर टक्के जबाबदारी स्वीकारावीच लागेल.याचा अर्थ असा की तुम्हाला सबबी सांगण्याची सवय कायमची सोडावी लागेल. तुमच्या दुःखाला,पराभवाला आणि केविलवाण्या अवस्थेला दुसरे कोणी तरी किंवा परिस्थिती जबाबदार आहे ही तुमची लाडकी तक्रार तात्काळ थांबवा.
उलट असे म्हणा की मी ठरविले असते तर ही परिस्थिती सहज बदलू शकलो असतो.तशी क्षमता तुमच्यामध्ये निश्चितच होती.पण काही ना काही कारणाने - दुर्लक्ष,
जागरूकतेचा अभाव, भीती,'बरोबर करतोय ना' ही भीती किंवा सुरक्षिततेची गरज - तुम्ही तुमची क्षमता वापरली नाही,ती का वापरली नाही कोण जाणे!पण ते महत्त्वाचे नाही.जे झाले ते झाले.महत्त्वाची गोष्ट ही आहे की या क्षणापासून तुम्ही,तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेत आहात - आणि ती स्वेच्छेने घेत आहात.इथून पुढे तुमच्या बाबतीत जे काही चांगले वाईट घडेल त्या सगळ्याची १००% जबाबदारी जणू काही तुमची आहे अशाच पद्धतीने तुम्ही स्वेच्छेने वागाल.
जर एखादे काम तुमच्या मनासारखे झाले नाही तर तुम्ही स्वतःला विचारायला हवे की, "हे मी कसे काय केले? मी काय विचार करीत होतो? मला काय करायचे होते? मी काय बोललो किंवा बोललो नाही? मी काय केले किंवा केले नाही म्हणून हे घडले? त्या माणसाला तसे वागायला मी कसे भाग पाडले? मला अपेक्षित असलेला परिणाम साध्य होण्यासाठी पुढच्या वेळी मी कोणते बदल केले पाहिजेत?"
श्री. स्टोन यांना भेटल्यानंतर काही वर्षांनी लॉस एंजेलिसमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ.रॉबर्ट रेन्सिक यांनी मला एक अतिशय साधे पण अतिशय महत्त्वाचे सूत्र शिकविले.या सूत्रामुळे शंभर टक्के जबाबदारी घेण्याचा कल्पना मला अधिकच पटला. ते सूत्र असे आहे.
E+R=0
(Event + Response = Outcome) घटना + प्रतिसाद = परिणाम
याची मूळ कल्पना अशी आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे परिणाम अनुभवता (मग ते यश असो वा अपयश,
श्रीमंती अगर गरीबी, स्वास्थ्य किंवा आजारपण,मिलन किंवा विरह, आनंद असो वा वैफल्य) तो,तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या या आधीच्या घटनांना दिलेल्या प्रतिसादाचा परिपाक असतो.
सध्याच्या परिणामांवर जर तुम्ही समाधानी नसाल,तर तुमच्यासमोर असलेल्या दोन पर्यायांपैकी एक तुम्ही निवडू शकता.
१.योग्य परिणाम घडवून न आणल्याबद्दल घटनेला दोष देणे.
थोडक्यात तुम्ही अर्थव्यवस्थेला,हवामानाला,दारिद्र्याला,
शिक्षणाच्या अभावाला,वंशवादाला,लिंग विषमतेला,
सध्याच्या प्रशासनाला.तुमच्या पतीला अगर पत्नीला,
तुमच्या बॉसच्या स्वभावाला पाठिंबा नसण्याला,राजकीय स्थितीला,व्यवस्थेला अगर अव्यवस्थेला आणि इतर कुठल्यातरी बाह्य घटनेला दोष देता.जर तुम्ही गोल्फ खेळणार असाल तर तुम्ही तुमच्या संस्थेला किंवा गोल्फच्या मैदानालासुद्धा दोष द्याल.ही सर्व कारणे असतात यात संशय नाही. पण जर तीच निर्णायक ठरणार असतील तर मग कोणताही माणूस यशस्वी होऊ शकला नसता.
जॅकी रॉबिन्सन मोठमोठ्या क्रीडामंडळांकडून बेसबॉल खेळू शकला नसता.सिडने पॉइटियर व डेन्झेल वॉशिंग्टन कधीही चित्रपट अभिनेते बनू शकले नसते.डायन (Dianne ) फिनस्टेन व बार्बरा बॉक्सर कधीही संसद सदस्य बनू शकले नसते.एरिन ब्राँकोविच कॅलिफोर्नियातील हिंकले शहरातील दूषित पाण्याचे कारण शोधू शकला नसता,बिल गेटस् मायक्रोसॉफ्टची स्थापना करू शकला नसता,स्टीव्ह जॉब्जने अॅपल कॉम्प्युटर्स सुरू केली नसती.अडचणींवर मात करून यशस्वी होणारे शेकडो लोक आहेत.त्यांनी परिस्थितीला नावे ठेवली असती तर ते यशस्वी होऊच शकले नसते.
पुष्कळ लोकांनी अशा 'तथाकथित' अडथळ्यांवर मात केली आहे.म्हणूनच अडथळे तुम्हाला रोखू शकत नाहीत हे लक्षात घ्या.बाह्य परिस्थिती तुम्हाला थांबवत नाही,तर तुम्हीच तुम्हाला थांबवत असता.आपणच आपल्याला अटकाव करीत असतो.आपण स्वतःला मर्यादित करणारे विचार मनात आणतो आणि स्वतःलाच मागे खेचणारे वर्तन करतो.मद्यपान व धूम्रपानासारख्या आत्मघातकी सवयीचे आपण तार्किक युक्तिवाद लढवून समर्थन करतो. उपयुक्त सूचनांकडे आपण दुर्लक्ष करतो,नवीन कौशल्ये व नवे ज्ञान मिळविण्याचा आपण कंटाळा करतो.फालतू बाबींमध्ये आपला वेळ वाया घालवतो.निरर्थक व बाष्कळ गप्पांमध्ये आपण स्वत:ला गुंतवून घेतो.निकस आहार घेतो, व्यायाम करत नाही.आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसा खर्च करतो,भविष्यासाठी कसलीही गुंतवणूक करत नाही,संघर्ष गरजेचा असतानाही संघर्ष करीत नाही.सत्य बोलायला आपण कचरतो,आपल्याला काय हवं आहे ते आपण सांगत नाही आणि मग आपण विचार करतो की आपल्याला यश का मिळत नाही ? बहुतेक लोक असेच वागतात.प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी ते दुसऱ्या कोणालातरी किंवा परिस्थितीला दोषी ठरवितात.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे सबब तयार असते.
२. पेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही एखाद्या घटनेसाठी असणारा तुमचा प्रतिसादच बदला.
तुम्ही तुमचे विचार बदलू शकता,अभिव्यक्ती बदलू शकता,स्वतःविषयी व जगाविषयी तुमच्या डोक्यात असलेल्या कल्पना बदलू शकता.तुम्ही तुमचे वर्तन - तुमची कार्यपद्धती बदलू शकता. तसेही,आपल्या हातात इतकेच तर असते. दुर्दैवाने आपल्यापैकी अनेक लोक सवयींच्या इतके आहारी गेलेले असतात की ते स्वतःचे वर्तन कधीच बदलत नाहीत.आपण घटनांना साचेबद्ध प्रतिसाद देत राहातो.आपल्या जोडीदाराशी व मुलांशी,कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी,
आपल्या ग्राहकांशी व अशिलांशी,आपल्या विद्यार्थ्यांशी आणि एकूणच जगाशी त्याच पद्धतीने वागतो.आपण म्हणजे प्रतिक्षिप्त व परिस्थितीजन्य प्रतिसाद देणारे जणू यंत्रच बनलो आहोत.आपल्यावर जणू त्याचंच नियंत्रण असते.तुम्हाला तुमच्या विचारांवर, तुमच्या कल्पनांवर,
तुमच्या स्वप्नांवर व दिवास्वप्नांवर आणि तुमच्या वर्तनावर नियंत्रण मिळवावे लागेल.तुमचे विचार,तुमचे बोलणे आणि तुमचे वागणे,तुमच्या हेतूंशी,उद्दिष्टांशी, मूल्यांशी आणि ध्येयाशी सुसंगत असले पाहिजे.