'या विश्वात माणूस स्वतःच्या इच्छेविना आला आहे.स्वतंत्र असण्याची सजा त्याला मिळाली आहे.जाणीव असणारी स्व-सत्ता (बीइंग फॉर इटसेल्फ) आणि जाणीव नसणारी वस्तुरूप निर्लेप सत्ता (बीइंग इन इटसेल्फ) या दोन सत्तांमध्ये सभोवतालचा परिसर विभागलेला असतो.
माणूस म्हणजे जाणीव,स्वतःच्या पलीकडे जाता येणारे अस्तित्व;परंतु माणसाची धडपड वस्तुपदाला जाण्याची,
निर्लेप सत्ता होण्याची असते.हा अयशस्वी प्रयत्न माणसाचे जीवन असमर्थनीय करतो.स्वतःला हरवणारा माणूस ही एक व्यर्थ यातना आहे!'
अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉ पॉल सार्त्र यांनी या मूलभूत संकल्पना मांडल्या.सिमोन द बोव्हा यांनी 'द सेकंड सेक्स'मधून स्त्रीवादाचे तत्त्वज्ञान सादर केले.पुरुषप्रधान जगात स्त्रीला दुय्यम स्थान असल्याने तिला स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देता येत नाही. मानववंशशास्त्र,
मानसशास्त्र, इतिहासाचे दाखले देत,स्त्रीवादी चळवळींचा आधार ठरलेले हे विचार त्यांनी १९४९ मध्ये मांडले,तेव्हा जगभर खळबळ उडाली होती.
विवाहसंस्था नाकारून ५१ वर्षे एकमेकांना साथ देणाऱ्या बोव्हा सात्रे यांनी - विसाव्या शतकाला मूलभूत,बंडखोर विचार दिले.त्यांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या,नाटक,निबंधांतून ते व्यक्त होतात. विचारप्रक्रिया व त्यांची घडण यासंबंधीही या दिग्गजांनी आत्मचरित्र व मुलाखतींतून भरपूर सांगितले आहे.त्यावरून कित्येक स्त्रीवाद्यांनी सार्त्रकडून बोव्हा यांच्यावर झालेल्या तथाकथित अन्यायाबद्दल लिहून ठेवले आहे.सिमोन द बोव्हा अँड ज्याँ पॉल सार्त्र द रिमेकिंग ऑफ ए ट्वेंटीएथ संच्युरी लीजंड' च्या दोन खंडांतून त्यांच्या बौद्धिक वाटचालीचा अन्वय लावला आहे.अस्तित्ववादी 'सार्त्रीय' संकल्पना मुळात बोव्हा यांनी मांडल्याचा निष्कर्ष केट व एडवर्ड फुलब्रुक यांनी काढला आहे.
पुढील आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बालपणाचे वर्णन,
विश्लेषण त्यातील दोन प्रकरणांत केले आहे.दीड वर्षाचे असताना वडील वारल्यामुळे सार्त्र बारा वर्षांपर्यंत आजोळी राहिले.आई,आजी,आजोबा व पुस्तके हेच सवंगडी.मित्रांमध्ये ते मिसळत नव्हते.आजी - लुई,
आजोबा - चार्ल्स श्वाईत्झर यांच्यामुळे व्हिक्टर ह्युगो,
टॉलस्टॉय,दस्तयेव्हस्कीचे लिखाण,रशियन क्रांतीच्या चर्चा त्यांना ऐकायला मिळाल्या.चौथ्या वर्षी सार्त्र पुस्तके वाचू लागले आणि त्याच वेळी उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. तरीही बागडण्याच्या वयात विश्वकोश हाताळणाऱ्या सार्त्रच्या विलक्षण बुद्धीचे कुटुंबीयांसमोरच वारेमाप कौतुक झाल्याने, स्वतःच्या वेगळेपणाची त्यांनाही जाणीव झाली. मोठ्यांच्या भाषेत बोलणारा,गंभीर साहित्य वाचणारा मुलगा पाहून चिंताग्रस्त आईने त्यावर उतारा म्हणून कॉमिक्स आणली.सातव्या वर्षी कथा,निबंध,
कविता लिहून त्यांनी सगळ्यांना चकित केले होते.आपण कुरूप आहोत,हे जाणवल्याने स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी कुशल वाङ्मय-चौर्य सार्त्र बालवयातच करू लागले.आईने पुनर्विवाह केल्यावर सावत्र वडिलांकडून कोडकौतुक होईना.गणित - भूमितीची सक्ती त्यांना असह्य झाली.सावत्र वडिलांविषयी तिटकारा क्रमाने वाढत गेला. वडील ही संस्था नाकारणारी बंडखोर बीजे या काळातच पडली.'आयुष्यभर मी या व्यक्तीवरचा संताप लिखाणातून काढला,'असे सार्त्र यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.
पुढे,सत्ता गाजवणाऱ्या,स्वातंत्र्यावर बंधने आणणाऱ्या
धर्म,राजसत्तेच्या विरोधात सार्त्रनी लिखाण व कृती केली.
कडक शिस्तीच्या कॅथलिक संस्कारात सिमोन द बोव्हा वाढल्या.चौथ्या वर्षापासून त्यांनाही वाचनाची आवड लागली.आई- वडिलांनी पुस्तकप्रेम जपले.बालपणापासून गोष्टी लिहिण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे खूप कौतुक झाले.
'लेखक होण्याइतके जगात दुसरे काहीही वेधक,आकर्षक नाही,हे तेव्हाच त्यांच्या मनावर पक्के ठसले.बोव्हासुद्धा समवयीन मैत्रिणींपासून वंचित होत्या.भावंडांत मोठ्या असल्याने अधिकार गाजवायला हेलेना,धाकटी बहीण होती.जॉर्ज इलियटची 'मिल ऑन द प्लॉस व लुईसा मे ऑलकॉटची कादंबरी 'लिटल वुमन' तिने बाराव्या वर्षी वाचून काढली.'मिल ऑन द फ्लॉस'मधील मॅगी तुलिव्हरचा 'स्व' आणि 'पर' या ताणात चोळामोळा होतो.
बोव्हा स्वतःला 'मॅगी'त पाहू लागल्या.पुढील आयुष्यातला हा वळणाचा टप्पा ठरला.बोव्हा यांचे वडील जॉर्जेसनी एक दिवस घोषणा केली,यापुढे आई - वडिलांचे काही चुकले आणि टीका खरी असली, तरी मुलांना तो अधिकार नाही.'मात्र,बोव्हा यांना त्यांच्या वाचनामुळे 'सत्य हे निष्ठेपेक्षा श्रेष्ठ', अशी मूल्ये प्राणापेक्षा प्रिय वाटत होती. वडिलांची पोलादी नियमावली जाचक वाटत असताना आलेले वक्तव्य,बोव्हा यांना त्यांच्या आणि कुटुंबीयांमधील दरीचे भान देणारे ठरले, बहीण आता आदर्श मानत नाही.
वडिलांना कुरुपतेबद्दल चिंता वाटतें आहे.आईने बोव्हा यांच्यामध्ये होणारे बदल टिपले आहेत.या अवस्थेत त्यांना एकाकीपण भेडसावू लागले. तेव्हापासूनच स्वातंत्र्य जपणारा,विचार समजू शकणारा साथीदार असावा,अशी आदर्श सहजीवनाची स्वप्ने त्या पाहू लागल्या.
सार्त्रप्रमाणेच बोव्हा यांचेही बालपण फार लवकर उरकून त्यांनी प्रौढत्वाकडे झेप घेतली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मूल्ये नाकारून विसाव्या शतकाच्या मध्य -
काळातील नवी मूल्यप्रणाली देणारी ही झेप ठरली,असा आदरपूर्वक उल्लेख लेखकांनी केला आहे.
कायद्याचे शिक्षण घेऊन निवृत्तिवेतन देणारी प्रशासन सेवा करावी,ही वडिलांची इच्छा,तर सुखाने ग्रंथपाल व्हावे,ही आईची आकांक्षा झिडकारून बोव्हा यांनी तत्त्वज्ञानात संशोधन करायचे ठरवले.एकविसाव्या वर्षी त्यांनी तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली,तेव्हा त्या फ्रान्स
मधील पहिल्या प्राध्यापिका ठरल्या. स्वतःची वाट शोधणाऱ्या बोव्हा यांना मार्ग सापडला.शिक्षण घेतानाच सार्त्रशी ओळख झाली.वडिलकीचा आव न आणता,
तासन् तास विद्यार्थ्यांना अवघड समस्या समजून सांगणारे सार्त्र इतरांपेक्षा वेगळे प्राध्यापक होते.दोघांनाही तत्त्वज्ञानाची,महत्त्वपूर्ण लेखनाची आस होती. परिपक्व,इतरांच्या मतांचा आदर करणारा जोडीदार बोव्हा यांनी सार्त्रमध्ये पाहिला. चमकदार बुद्धीच्या बोव्हा उत्तीर्ण झाल्याची बातमी सांगतानाच सार्त्रनी,दंतकथा ठरलेली घोषणा केली,'यापुढे मी तुला माझ्या पंखाखाली घेणार आहे.' कॉफी हाऊस,लक्झेम्बर्ग रस्त्यावर त्यांच्या प्रदीर्घ भेटी सुरू झाल्या,त्या सार्वच्या मृत्यूनंतरच (१५ एप्रिल १९८०) थांबल्या.
बोव्हा यांनी आई-वडिलांचे घर सोडून भाड्याचे घर घेतले.
आता त्यांच्यावर कुणाचेही बंधन असणार नव्हते.१९२९ च्या ऑक्टोबर महिन्यात सार्त्र बोव्हा यांनी परस्परांना साथ देण्याचा ऐतिहासिक निश्चय केला.एकमेकांपासून काहीही लपवायचे नाही,दोन वर्षे एकमेकांना तपासण्याच्या काळात परस्परांशी एकनिष्ठ राहण्याचे ठरवले.मात्र,ते दोघांनाही शक्य झाले नाही.कसलेच बंधन दोघांनी मानले नाही. एकमेकांना ते अटळ जोडीदार समजत असले तरी आकस्मिक प्रेमप्रकरणे चालूच राहिली; सार्त्रनी दोन वेळा विवाह करण्याचे प्रस्ताव ठेवले.विवाहसंस्था अटळ असल्याने तडजोड करू,ही त्यांची भूमिका बोव्हा यांनी नाकारली. सार्त्र मांडत असलेल्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी विवाह विसंगत असल्याने हे योग्य नाही,असे बोव्हा यांचे म्हणणे होते.लष्कराच्या हवामानशास्त्र विभागात सार्त्रना जावे लागले.दीड वर्षानंतर परतल्यावर सार्त्र पुन्हा शिकवू लागले.मध्यंतरी,बोव्हा कादंबरी लिहीत होत्या.सार्त्र धारदार सुरीने व्यक्तींचे मनोविश्लेषण करत होते.बोव्हा यांच्या लिखाणात अधिभौतिक बाजूला महत्त्व असे.सार्त्र तत्त्वज्ञान व साहित्याची गल्लत करतात,असे बोव्हा यांनी अनेक वेळा सांगितले.त्यांना तत्त्वज्ञानामागे न लागता साहित्यनिर्मिती करण्याचा सल्लाही दिला.
१९३८ - ४८ हे दशक बोव्हा सार्त्र यांचे ठरले. 'शी कम्स टू स्टे','द ब्लड - ऑफ अदर्स','ऑल मेन आर मॉर्टल'या कादंबऱ्या,'द एथिक्स ऑफ अँबिग्युटी'सारखा तात्त्विक ग्रंथ ४३ - ४८ मध्ये लिहिल्याने बोव्हा यांचा दबदबा निर्माण झाला. 'नॉशिया','इंटिमसी' या कादंबऱ्यांमुळे सार्त्रकडे 'उगवता तारा म्हणून पाहिले गेले.'नो एक्झिट' हे नाटक,'बिईंग अँड नथिंगनेस' हा तात्त्विक ग्रंथ याच काळात लिहिला गेला.दोघांनी त्यांच्या लेखनातून सामाजिक,नैतिक,तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या ऐरणीवर आणल्या.जगभर त्यांची चर्चा सुरू झाली.अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा विचार सुरू झाला.
साहित्य, नाटक,चित्रपटांत उलथापालथ करण्याचे श्रेय अस्तित्ववाद्यांनाच जाते.
बोव्हा यांनी 'शी कम्स टू स्टे' लिहून पूर्ण केल्यावर,सार्त्रनी 'बिईंग अँड नथिंगनेस' लिहिले. पॅरिसमधील 'कॅफे प्लोरा' मध्ये बोव्हा यांच्या समवेत बसून त्याच्या मसुद्याला अंतिम रूप दिले.याचे अनेक दाखले त्यांच्या पत्रांतून मिळतात. 'शी कम्स टू स्टे'मधील बोव्हांच्या अपश्रद्धा (बॅड फेथ) ह्या संकल्पनेचे प्रतिबिंब 'बिईंग अँड नथिंगनेस' मध्ये उमटले आहे.माणूस सदैव आपल्या अस्तित्वाचे खोटे रूप पाहू इच्छितो.आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठीच्या धडपडीतूनच अश्रद्धा निर्माण होते.
ह्या संकल्पनेची बीजे व विस्तार बोव्हा यांनी केल्याचे लेखकांनी म्हटले आहे.
(ग्रंथाचिया द्वारी- अतुल देऊळगावकर,विश्वकर्मा पब्लिकेशन्स)
१९४०मध्ये जर्मनीने हॉलंड,बेल्जियमपाठोपाठ फ्रान्स पादाक्रांत केले.सार्त्रच्या जवळच्या मित्रांचे खून झाले.
अन्नाचा भीषण तुटवडा झाला.डाव्या विचारसरणीच्या गटात बोव्हा सार्त्र सामील झाले.जर्मन सैनिकांसमोर फ्रेंच भाषेतील निषेधपत्रके वाटण्यात,निदर्शने करण्यात दोघेही सक्रिय होते.बोव्हा रूढार्थाने राजकीय भूमिका कधीच घेत नव्हत्या.बटबटीत,बालिश कृती त्यांना अर्थशून्य वाटायच्या.राजकीय गटातल्या व्यक्ती बोव्हा यांना परिपक्व वाटत नव्हत्या. सार्त्रना उत्तरोत्तर सर्जनशील लिखाणापेक्षा कृती महत्त्वाची वाटू लागली.१९४१ मध्ये 'द प्लाईज' रंगभूमीवर आल्याने सार्त्रना ज्याँ जने,आल्बेर कामू यांच्यासारखे प्रतिभावंत मित्र मिळाले.'शी कम्स टू स्टे'ची मनापासून स्तुती व गौरव करणाऱ्यांत ज्याँ कोक्तो,गॅब्रियल मार्सेल होते. कामू व सार्त्रची वाढती मैत्री बोव्हा यांना त्रासदायक वाटू लागली.बोव्हा यांनी,
'बुद्धिमान महिलांसमोर कामू अवघडत,'असे म्हटले आहे.तरी सार्त्र यांनी 'माझा शेवटचा चांगला मित्र' असा कामूविषयी उल्लेख केला आहे.
१९५० ते ६० च्या दशकात अल्जिरियाचा मुक्तीसंघर्ष सुरू झाला.फ्रान्समध्ये द गॉल सत्तेवर आल्याने भ्रामक राष्ट्रवादाला उधाण येत होते.बोव्हा सार्त्रनी अल्जिरियात होत असलेल्या फ्रेंच अत्याचाराचा निषेध केला.संतप्त वंशवाद्यांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.१९६१ मध्ये सार्त्रच्या घरावर बाँब टाकला गेला.याची कल्पना आल्याने त्यांना दुसरीकडे हलवले होते.बोव्हा यांच्या घराची नासधूस विद्यार्थ्यांनी वाचवली.स्पष्ट,प्रामाणिक भूमिका घेण्याचा हा परिणाम होता. 'द सेकंड सेक्स' प्रकाशित झाल्यानंतर कॅथलिक ख्रिश्चनांचा मस्तकशूळ उठला.बोव्हा यांची यथेच्छ बदनामी, क्रूर नालस्ती झाली.
'असमाधानी,षंढ, समसंभोगी,अविवाहित माता' म्हणून त्यांना हिणवले गेले.समाजाच्या पुढे कित्येक दशके असणाऱ्या बोव्हा यांनी धीराने हे सर्व सहन केले.
संकल्पित दोन खंडांपैकी ह्या पहिल्या खंडात लेखकांनी सार्त्र बोव्हा यांच्या समग्र साहित्याचा परिश्रमाने अभ्यास करून चिकित्सा केली आहे. विभूतिपूजेकडे चुकून जाणार नाही,याची दक्षता घेतली आहे.सहसा अनेक स्त्रीवादी केवळ एकनिष्ठ न राहण्याला जास्त महत्त्व देतात.हा उल्लेख टाळला नसला,तरी त्याला अवाजवी महत्त्वही दिले नाही.सार्त्र - बोव्हा यांच्या बौद्धिक कामगिरीत बोव्हा यांचे पारडे जड ठरवल्याने, नव्या वादाला तोंड फोडले आहे.