* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/११/२३

शीर्षक कशाला हवे ! Why do you need the title!

चिचोरा तलाव - 

   

दिवाळी पाडव्याची ऑफिसला सुटटी असल्याने पोरींना घेवून त्यांच्या आजोळी गेलो होतो. त्यांच्या आजोबांचे घर शेतात असल्याने व खेळायला भलंमोठं अंगण असल्याने दिवसभर इकडुन तिकडे हुंदडुन पोरी थकल्या होत्या. दिवस मावळायला झाला होता.

गावातल्या मंदिरात संध्याकाळचे भजन सुरू झाले होते. अंगणात खुर्च्या टाकुन आम्ही घरबसल्या भजनाचा आनंद घेत होतो.डाॅ.रामेश्वर नाईक सरांचा मोबाईलवर काॅल आला आणि चारठाणा परिसरातल्या तलावावर पट्टेरी राजहंस दिसत असल्याची बातमी दोन दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात वाचली,उद्या भाऊबीजेची सुटटी आहे.आम्ही चारपाच जण सकाळी चारठाणाला येणार आहेत.पक्ष्यांचे लोकेशन घ्या आणि कळवा असे फर्मानच डाॅ रामेश्वर नाईक सरांनी सोडले. काॅन्फरन्स काॅलवर डाॅ.दुर्गादास कान्हडकर सुद्धा होते.साधारणतः दहा पंधरा मिनिटे आम्ही त्यावर चर्चा केली आणि तलाव व पक्ष्यांच्या स्थितीची माहीती घेवून कळवतो असे सांगुन मी फोन बंद केला.चारठाण्याच्या जवळपासच्या पट्टयात म्हटलं तर चारपाच पाझर तलाव आहेत.त्यातला सर्वात मोठा तलाव म्हणजे कवडयाचा गावशिवारी असलेला तलाव,कान्हा गाव शिवारातील तलाव व जिंतूर संभाजीनगर राज्यरस्त्यावर रायखेडयाजवळ असलेला छोटासा तलाव.परंतू पट्टेरी राजहंस आणि ज्या तलावावर नेहमीच पाणपक्षी दिसण्याची शक्यता जास्त असते त्या चिचोरा तलावाला यावर्षी पाणीच आहे की नाही याबाबत मी साशंक होतो.


चिचोरा तलाव... चारठाणा गावाला ज्या दोन तलावातुन पाणीपुरवठा केल्या जातो त्यापैकी एक असलेला मोठा तलाव.चारठाणा कावी रोडवर कान्हा शिवारात चारठाणा गावाच्या पुर्वेला असलेला हा पाझर तलाव.या तलावावर मी यापूर्वी अनेकवेळा पक्षिनिरीक्षण केले आहे.


  ४० ते ५० पट्टेरी राजहंस पक्ष्यांच्या थव्याची नोंद मागील वर्षी मी याठिकाणी घेतलेली आहे.

पावसाळा चांगला झाला आणि तलाव शंभर टक्के भरला तर हा तलाव शेतकऱ्यांच्या पिकाला हिवाळभरणी पाणी पुरवुन गावाची,वन्यप्राण्यांची,

पक्ष्यांची तहान भागवण्याचं काम हा तलाव करत असतो.


जसजसा उन्हाळा जवळ यायला लागतो,ऊन तापायला लागतं,पिकांसाठी पाणी उपस्याचा जोर वाढतो तेव्हा हळुहळु या तलावाची पाणी पातळी कमी व्हायला लागते.पाण्याची पातळी कमी झाली की पाणपक्ष्यांना खाद्य सहज उपलब्ध होतं आणि हिवाळी स्थलांतरित पाणपक्ष्यांची या तलावावर गर्दी व्हायला लागते. 


चक्रवाक बदक,थापटया बदक,चमचा, हळदीकुंकु बदक,नदीसुरय,रंगीत करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा,पांढरे बगळे,पांढरा, पिवळा धोबी,वारकरी,

जांभळी पाणकोंबडी अशा कितीकरी पक्ष्यांचे निरीक्षण या तलावावर करता येते. मागच्या तीन वर्षांपासुन मी आणि पुष्पक ने अनेकवेळा या तलावावर पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे,फोटोशुट केले आहे.मागील वर्षीच उन्हाळा संपत आलेला असतानाही मोठया प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने पट्टेरी राजहंस पक्षी येथुन आपल्या मुळ देशात परतायचे नांव घेत नव्हते.साधारणतः ४० ते ५० पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी मी या चिचोरा तलावावर घेतलेल्या आहेत.परंतू यावर्षी मुळातच पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलावात पाणी असेल कि नाही या साशंकतेनेच हिवाळा सुरू होवूनही मी अजुन त्या तलावाकडे फिरकलो नव्हतो.

परंतु आता मात्र कसंही करून त्याची माहीती घेणं आवश्यक होतं.माझे सहकारी सोमनाथ खके यांना फोन करून तलावाची व पक्ष्यांची स्थिती काय आहे याची एखाद्या शेतकऱ्यांकडुन माहीती घ्यायला सांगितली.त्यांनीही लगेच आजुबाजुच्या दोन तीन शेतकऱ्यांना फोन करून तलावातील पाण्याची व दिसणाऱ्या पक्ष्यांची माहीती घेतली. पाण्याने तळ गाठलेला आहे,पक्षी दिसतात मात्र फारसे नाही अशी खात्रीलायक माहीती मिळाली. लगेच 'माणिक' सरांना फोन करून सर्व माहीती दिली व डाॅ.नाईक सरांसोबत येण्यासाठी आग्रह केला.शाळेला सुटया असल्याने व माझ्या अगोदरच डाॅ नाईक सरांनी त्यांना फोन केल्याने क्षणाचाही विलंब न लावता सकाळी मी सोबत येतोय असं त्यांनी सांगीतलं.आता गावाकडुन सकाळी लवकर उठुन मला चारठाणा जावं लागणारं होतं.जेवण करून राजहंस दिसतील की नाही या विचारात मी तसाच बाजेवर आडवा होवून झोपेच्या आधीन झालो.


सकाळी (चार) वाजता उठण्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे उठलो.घराबाहेर आलो असता थंडीने चांगलंच डोकं वर काढलेलं जाणवत होतं. काहीशी बोचरी वाटणारी थंडी अंगाला झोंबत होती.थंडीशी दोन हात करत तसेच सकाळचे सर्व कार्यभाग उरकुन आंघोळीला फाटा देत मी साडेपाचच्या सुमारास चारठाणा जाण्यासाठी घराबाहेर पडलो.सगळीकडे काळोख दाटलेला होता.रानपाखरांचा हलकासा चिवचिवाट कानवर पडत होता.मोबाईल बॅटरीच्या उजेडात गाडीपर्यंत पोचलो.मस्त मराठी भावगीते ऐकत साधारणतः सव्वासहाच्या सुमारास मी चारठाण्यात पोचलो.नुकतंच उजाडायला लागलं होतं.माणिक सरांना फोन केला.ते जिंतूरच्या जवळपास आले होते. सातच्या आसपास वालुरहुन डाॅ.ज्ञानेश्वर हरबक चारठाण्यात पोचले.साडेसातपर्यंत डाॅ नाईक सर, माणिक सर,

गोदातीर समाचारचे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब काळे,समीर पावडे,डाॅ उमेश लाड,अशोक लाड,डाॅ रणजीत लाड,दत्ता बनसोडे,सुधीर सोनूनकर व इतर काही सहकारी चारठाण्यात पोचले.चार गाडयांचा ताफा चिचोरा तलावाच्या दिशेने निघाला होता.चिचोरा तलावाकडे जाण्यासाठी चारठाणा गावाला वळसा घालुन जाणाऱ्या कान्हा कावि रस्त्याने आम्ही चिचोरा तलावाकडे निघालो होतो.दोन किमी अंतरावर गेल्यानंतर डांबरी रस्ता सोडुन आम्ही कच्च्या रस्त्याने तलावाकडे निघालो. अंगावर पांढऱ्या मातीचा धुरळा साठवत गाडया चिचोरा तलावाकडे सरकत होत्या.

थोडयाच वेळात आम्ही तलावाजवळ पोचलो.गाडीतुन खाली उतरताच माझी नजर एका शिकारी पक्ष्यावर पडली.कदाचित आपली तहान भागविण्यासाठी तो तलावावर उतरला असावा. नजरेत सामावून घेईपर्यंत व इतर सहकाऱ्यांना त्याची माहिती देई पर्यंत तो शिकारी पक्षी भर्रकन उडाला.त्याची ओळख पटेपर्यंत तो नजरेआड झाला होता.कदाचित पाणघार किंवा बोनेलीचा गरुड असावा...तलावाच्या पश्चिम दिशेकडुन खालच्या बाजुला उतरत मी तलावातील पाण्याचा व पक्ष्यांच्या स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो.पाण्याने तर तळ गाठलेला दिसत होता परंतू पक्ष्यांच्या कुठंच काही हालचाली दिसत नव्हत्या.

तलावातल्या गाळाचा उपसा केल्याने जागोजागी पाण्याचे डबके साचलेले दिसत होते.


माणिक सरांकडुन दुर्बीण घेवून तलावाच्या चौफेर मी पक्ष्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो.पलिकडच्या काठावर दक्षिणेकडुन दोन हळदीकुंकु बदक आणि पाण्यात दुरवर पसरलेल्या खरपणाच्या रांगेवर एक राखाडी बगळा ध्यान लावुन बसलेला दिसला त्याशिवाय काहीच नजरेस पडत नव्हतं. तलावाच्या दक्षिणेकडुन पुढे सरकुन पुन्हा काही हालचाली दिसतात का म्हणुन मी बाकी सर्वांना तिकडुन जाण्याचा इशारा केला आणि मी स्वतः पाळुवरच्या रस्त्याने पुढे सरकलो.माझ्या मागे डाॅ.नाईक सर आणि माणिक सर होतेच.थोडया अंतरावर एका बाभळीच्या झाडावर काळसर पांढरट रंगाचे एक पिल्लु नजरेस पडले.नाईक सरांनी त्याच्यावर कॅमेरा रोखत त्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला परंतू कॅमेरा फोकस होईपर्यंत ते पिल्लु उडुन दुसऱ्या झाडावर थोडंसं आतमध्ये जावुन बसलं.त्याच्या बाह्यरंगावरून ते  चातक पक्ष्यांचं पिल्लु असावं असा अंदाज मी आणि माणिक सरांनी लावला.


सातभाई आणि चातक पक्ष्यांची पिल्लं लहान असताना सारखीच दिसत असल्याने त्यांना ओळखणं तसं कठीणच जातं.त्याला आहे त्या अवस्थेत त्याचा नाद सोडुन आम्ही पुढे सरकलो.


 पाळुवरून तलावाच्या दिशेनं दगडांची एक उतरंड वजा पायवाट उतरली होती.तलावावर पाणी पिण्यासाठी जाणारी जनावरं किंवा शेताकडं जाणारे शेतकरी याच वाटेचा वापर करत असावीत,म्हणुन वाट दगडाची असली तरी चांगलीच रूळलेली होती.त्याच दगडी वाटेवरून आम्ही तलावाच्या दिशेनं खाली उतरलो.

वाटाड्या म्हणून मी पुढे असल्याने पुन्हा एकदा पक्ष्यांच्या काही हालचाली दिसतात का ते न्याहाळतच होतो.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खोदलेल्या विहीरीच्या खरपणाचा ढिग तलावाच्या काही भागात आतपर्यंत लांबवर गेलेला होता.ढिग संपतो त्या टोकाकडे दोन तीन मोठे दगड विखुरलेले होते त्या दोन दगडांच्या आडोशाला करवानक (ग्रेटर थिकनी) पक्ष्यांची एक जोडी जी की या भागात दिसायला अत्यंत दुर्मीळ असे पक्षी आहेत ते नजरेस पडले.यापुर्वी मागच्या वर्षी कवडा तलाव परिसरात व याच चिचोरा तलावात ग्रेटर थिकनी मी पाहीले होते.सोबत असलेल्या बाकीच्यांना मी करवानक पक्षी दाखवले.ज्यांच्याकडे कॅमेरा होता ते सर्व फोटोशुट करण्यासाठी पुढे सरकले.

दुर्बीण असलेले सहकारी दुर्बीणीतुन त्यांचे निरीक्षण करत होते.दोन्ही पक्षी दगडांच्या आड असल्याने फोटोसाठी अडथळा वाटत होता.डाॅ नाईक,डाॅ रणजीत लाड व अजुन एकजण खरपणाच्या ढिगारावर वरपर्यंत चढुन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.त्यांना आता थिकनी ठळकपणे दिसत होती.माणिक सर आणि मी इतरांना थिकनीबद्यल माहीती देत होतो.सर्वचजण लक्ष देवुन माहीती ऐकत होते आणि त्या पक्ष्यांचे निरीक्षण करत होते.आमच्या कलकलाटाने थिकनी सावध झाल्या होत्या.काही कळायच्या आत त्यांनी आमच्याजवळुन दुर होत पलिकडच्या काठावर जावुन अलिप्त बसणे पसंत केले.इकडे दोन पांढरा धोबी पक्षी तुरूतुरू किडे शोधण्यात व्यस्त असल्याचे दिसत होते.

काहीच हालचाल नाही म्हणता म्हणता करवानक,पांढरा धोबी,राखी बगळा,हळदी कुंकु बदक अशा पक्ष्यांच्या हालचाली आता नजरेला पडत होत्या.दत्ता बनसोडे आणि सुधीर सोनुनकर पक्ष्यांचे निरीक्षण करता करता पुर्वेला पुढे सरकत होते.काही अंतरावर गेल्यावर त्यांची चाहुल लागताच तलावाच्या काठावरील ओल्या मातीतल्या हिरव्या गवताचे कोवळे कोंब खाण्यात व्यस्त असलेल्या चक्रवाक बदकांनी वर माना काढत कर्कश असा बैंक बैंक असा आवाज काढला.त्यांचा आवाज कानावर पडताच आमच्या सर्वांच्या नजरा चक्रवाक पक्ष्यांकडे वळल्या.दत्ता बनसोडे आणि सुधीर सोनुनकर जसजसे पुढे सरकत होते तसे सहा ते आठ चक्रवाक हळुहळु खोलगट भागातुन वर येवुन पाण्याच्या दिशेने सरकु लागले.एका जोडीने वेळ न लावता पाण्यात उतरत दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी जलविहार सुरू केला होता.बाकीचे मात्र अजुनही अंदाज घेत जागेवरच पुढे पुढे सरकत होते.आता मात्र उरलेल्या चक्रवाक पक्ष्यांनी सुद्धा धोका न पत्करता दुर जायचं ठरवलं.एका जोडीने आकाशाकडे झेप घेत दुरपर्यंत भरारी घेतली आणि लगेच नजरेआड झाले.तर दोन जोडयांनी आकाशात काही उंचावरून दोन तीन घिरटया मारत आमच्या हालचालीचा अंदाज घेतला आणि एखाद्या लढावू विमानानं आपला वेग नियंत्रित करत आल्हादपणे जमीनीवर उतरावं तसं आमच्यापासुन काही अंतरावर पाण्यात हे चक्रवाक उतरले होते.आम्ही सर्वच त्यांच्या करामतीचे निरीक्षण करत आनंद घेत होतो. दुरवर पाण्याच्या एका वळमनीत एक काळा शराटी किडे शोधण्यात मग्न होता.दत्ता बनसोडे आणि सोनुनकर सरांच्या पाठोपाठ पलिकडचे चक्रवाक पक्षी पाहण्यासाठी मी,सोमनाथ खके आणि कैलास रावुत सुदधा तलावाच्या पुर्वेला पुढे सरकलो.काळा शराटी शेणकुडात किडे शोधण्याचा प्रयत्न करत होता.सर्वचजण आता आपापल्या परीने तलावाभोवती पांगले होते. साधारणतः तास दिड तास पक्ष्यांचे निरीक्षण केल्यावर हळुहळु सर्वजण पुन्हा एकत्र जमा होत होते.तोपर्यंत सोमनाथ खके यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती.गरमागरम खिचडी भजे घेवून दिपक पवार तलावावर येवून पोचला होता.

तलावाच्या काठावरच मोकळी जागा पाहुन आम्ही सर्वांना नाश्त्यासाठी गोलाकार बसवले. काही जणांनी घरून येताना दिवाळी फराळ, पराठे,गोड पदार्थ सोबत आणले होते.खिचडी भज्यांसोबत या सर्व पदार्थांवर ताव मारत आम्ही सर्वांनी नाश्ता उरकला.तिकडे पक्षी सुदधा आपल्या खाण्यावर ताव मारण्यात मग्न झालेले दिसत होते.वर्तमानपत्रातुन पट्टेरी राजहंसची बातमी प्रसिद्ध झाली होती.पट्टेरी राजहंस नजरेस पडले नसले तरी करवानक आणि चक्रवाक पक्ष्यांनी ती कमतरता भरून काढल्याने कुणी नाराज झालं नव्हतं.


तलाव आणि जंगलं कधीच नाराज करत नाहीत. त्यांच्याजवळ जे असेल ते मुक्तहस्ते ते इतरांना देत असतात.


 पट्टेरी राजहंस दिसायला लागल्यावर पुन्हा या तलावावर यायचे असे ठरवुन आम्ही चिचोरा तलावावरून परतीच्या मार्गाला लागलो होतो.


विजय जनार्धन ढाकणे

शिवाई,शिवाजी नगर,जिंतूर 


सहज सुंदर घडलेली अशी घटना आपल्या सहज सुंदर भाषेमध्ये मांडलेली आहे.हे वाचत असताना.


फर्ननचे एक वाक्य समोर आले.


" समजून घेणे ही एक कला आहे.आणि प्रत्येकजण कलाकार नसतो. "


शीर्षक कशाला हवे !


छोटे ओठ बालकाचे

आईच्या विस्तारित गालावर

महाकाय सुख अनुभवत

त्याचे मन मोठे मोठे होत जाते 

आहे का हे सत्य ?


ही आमची सृष्टी

पृथ्वीने जन्मास घातली

ही जीवसृष्टी

बाईपणातून प्रसवली

हे खरे सत्य.


कळते झाल्यावर आम्ही

हे जग विराट पुरूषाने

ईश्वराने जन्मास घातले

असे सांगत सुटतो

 बिनदिक्कत


वय उमलते तसे

प्रेम शरीरात फुलून येते

आपले आपले वेगळेपण 

विसरून क्षणभर सर्व 

इच्छितात एकांत


मिलन संपले की

पुन्हा वेगळे ते,

तो पुरुष महान

अन् ती स्त्री लहान 

 मनोविश्वात - धर्मग्रंथात 


श्रमणांचे एक संचित इथे

पुसट जरी काहीसे ते

माझ्या जाणीवेत दाटून येते

नेणीवेला चकवा देऊन मी

होतो उत्कट काठोकाठ 


मी उमलवून माझे पुरूषत्व

तिच्याकडे खेचला जातो 

तिच्यात असतेच स्त्रीत्व - मातृत्व

अन् प्रेमाचे कोवळे बळ

विराट अफाट


ओठ माझे छोटे

तिच्या ओठावर झुकतात जेव्हा 

ती पृथ्वी होऊन

 बिलगते विराटतेने अन् तेव्हा 

होते जीवन संतृप्त 


 माझ्यातला छोटा पुरूष

विरघळतो वितळतो

रूपांतरित होऊन

आदिमाया बनतो मी

होतो मातृत्व 


क्षणिक असते पुरूषत्व

सदोदित उरते मातृत्व

लिंग म्हणजे केवळ जीव

 पुरूषपण निभावत हरवत

उरवावे मनुष्यत्व


डॉ.रवींद्र श्रावस्ती


अतिशय मार्मिक व बरचं काही सांगुन जाणारी ही कविता तयार करण्यास .डॉ..रवींद्र श्रावस्ती यांना 

चार तास लागले.आपल्या सर्वांसाठी ही पहिली कविता..

२२/११/२३

अज्ञात बेटाच्या शोधात.. In search of the unknown island

बेटावर पोचल्यावर तिच्या आणखी गोष्ट लक्षात आली.सेंट हेलेनामध्ये लोकांच्या मुलाखती घेताना सावधगिरीने बोलणं गरजेचं होतं.बेटावर नेपोलियनच्या बाजूने बोलणारे फ्रेंच होते आणि नेपोलियन ज्यांच्या खिजगणतीतही नाही असे स्थानिकही होते.नेपोलियन जिथे वास्तव्यास होता तो बेटावरचा भाग म्हणजे 'लॉगवुड'.फ्रेंच प्रतिनिधी आताही तिथे राहत होते.त्यांचा जेम्सटाऊनमधील ब्रिटिश राज्यपालांशी अत्यल्प आणि आवश्यकतेपुरताच संवाद आहे.बेटावरचे छोटे छोटे भूभाग फ्रेंचांच्या मालकीचे,तर उरलेलं बेट ब्रिटिशांचं अशी परिस्थिती होती.या सगळ्या गोंधळातून माहिती काढत ज्युलिया नेपोलियनच्या आगमनाचं आणि वास्तव्याचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करते.


सतराव्या शतकात हे बेट ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाऊन तिथे वसाहतीस सुरुवात झाली होती.

अर्थात तिथे राहणाऱ्या लोकांची संख्या अगदीच थोडी होती.रशिया,पुशिया आणि ऑस्ट्रिया यांच्या मदतीने ब्रिटिशांनी १८ जून १८१५ मध्ये वॉटर्लू इथे नेपोलियनचा निर्णायक पराभव करून त्याला बंदी बनवलं.त्याआधीच्या वर्षी नेपोलियनला युरोप

जवळच्याच एल्बा बेटावर बंदी बनवून ठेवण्यात आलं होतं;पण तिथून आपली सुटका करून घेण्यात त्याला यश आल्यामुळे या वेळी ब्रिटिशांनी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्यावर असणाऱ्या दुर्गम सेंट हेलेना बेटाची निवड केली.नेपोलियनला त्याच्याबरोबर वास्तव्यासाठी तीन अधिकारी निवडायचे होते.त्याचा वैयक्तिक डॉक्टर त्याच्याबरोबर येणार होता.शिवाय आणखी बाराजण घरकामासाठी त्याच्या बरोबर असणार होते.नेपोलियनला कुठल्याही परिस्थितीत सेंट हेलेना बेट सोडता येणार नव्हतं.


नेपोलियनच्या नजरकैदेसाठी निवड झाल्यामुळे सेंट हेलेनाचं जागतिक महत्त्व अचानक वाढलं. बाजारातील सर्व वस्तूंचे भाव दुपटी-तिपटीने वाढले.नेपोलियन इथे पोहोचण्याआधी जेम्सटाऊनमध्ये अनेक फर्मानं निघाली.

त्यात कुणालाही पूर्वपरवानगीशिवाय जेम्सटाऊन बंदरात जाता येणार नाही,असं एक फर्मान होतं. नेपोलियनच्या आगमनाची बातमी आणणाऱ्या जहाजातून आणखी एक सरकारी फतवा आला होता.

तो म्हणजे हे बेट आता ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचं राहिलेलं नव्हतं,तर ते आता ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनलं होतं.इथे आता ब्रिटिश राजवटीचे कायदे लागू झाले होते.ब्रिटिश कायद्यानुसार पुढील सूचना निघेपर्यंत या बेटाला तुरुंगाचा दर्जा देण्यात आला. 


(ही अधिसूचना नेपोलियनचं प्रेत फ्रान्सला पोचल्यानंतर रद्द झाली आणि हेलेना पुन्हा ब्रिटिश वसाहत बनलं.)


कुठलंही जहाज या बेटाच्या कुठल्याही भागाजवळ थांबवण्यास मनाई करण्यात आली. ज्या जहाजांना अधिकृत परवानगी असेल तीच जहाजं जेम्सटाऊनच्या बंदरात नांगर टाकू शकत होती.त्यावरची कुणीही व्यक्ती ते जहाज सोडून जेम्सटाऊनमध्ये पाय ठेवू शकत नव्हती.ज्यांना तिथे काही कारणासाठी उतरायचं असेल त्यांनी राज्यपालांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक होतं. बेटावर उतरल्यावर ते नक्की काय करणार, कुणाला किती वेळ भेटणार आणि जहाजावर केव्हा परतणार हे लिहून देणं आणि त्यानुसार वागणं आवश्यक होतं.

स्थानिक मच्छिमारांना मासेमारीसाठी सागरात केव्हा जायचं आणि केव्हा परतायचं यासाठी वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या.दर दिवशी सागरात उतरण्यापूर्वी नियोजित अधिकाऱ्याकडून त्या तारखेचा परवाना घेणं त्यांना सक्तीचं करण्यात आलं होतं. रात्री नऊ ते सकाळी सहा या काळात कुणीही कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडू शकत नव्हतं.असे अनेक जाचक नियम या बेटावर नव्याने जारी झाले.त्यावरून ब्रिटिशांच्या मनात नेपोलियनबद्दल किती धास्ती होती हे दिसून येतं. नेपोलियन इथून पळून जायचा प्रयत्न करणारच,असं त्यांना खात्रीपूर्वक वाटत होतं.प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही.नेपोलियनला बेटावर आणायचं ठरल्यावर तिथे एकाएकी अनेक नवे चेहरे दिसू लागले. इंग्लंडहून दोन हजार सशस्त्र सैनिक बेटावर दाखल झाले.त्या सैनिकांचा आणि नागरिकांचा परस्पर संबंध येणार नाही याचीही व्यवस्था केली गेली.बंदरात पाचशे नौसैनिकांनी भरलेल्या जहाजांचा ताफा गस्त घालू लागला. याशिवाय अनेक मुलकी अधिकारी या बेटावर आपल्या कुटुंबीयांसह दाखल झाले.


मात्र,यातल्या कुणालाही नेपोलियनचं नखसुद्धा दिसणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.अशा जय्यत तयारीनंतर १४ ऑक्टोबर १८१५ रोजी नेपोलियनचं जहाज सेंट हेलेनाच्या बंदराला लागलं.पण त्याच्या मुक्कामाच्या तयारीची खातरजमा करून घ्यायची असल्याने तीन दिवस नेपोलियनचा मुक्काम जहाजावरच होता.जहाज पोहोचलं त्या दिवशी दुपारी त्या जहाजाचा कॅप्टन असलेला अ‍ॅडमिरल,बेटाचे राज्यपाल,बेटावरचा डॉक्टर आणि एक व्यापारी नेपोलियनला भेटायला आले.नेपोलियनच्या आणि त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याबद्दल त्यांच्यात चर्चा झाली.या बेटावर राहण्याचा खर्च किती येईल,वस्तूंचे भाव काय वगैरे प्रापंचिक गोष्टींबद्दल नेपोलियनने राज्यपालांशी चर्चा केली;तर डॉक्टरला तिथला जन्मदर,

मृत्युदर,स्थानिक लोक कुठल्या आजारांना बळी पडतात.कुठले रोग जास्त प्रमाणात आढळतात वगैरे प्रश्न विचारले.तसंच, नेपोलियनकडची दोन सोन्याची घड्याळं बंद पडली होती ती या बेटावर दुरुस्त होतील का, अशी त्याने त्या व्यापाऱ्याकडे चौकशी केली.


जहाजावरून दिसणारे ते काळेकभित्र नैसर्गिक खडकांचे तट पाहून नेपोलियन निराश झाला.'इथे राहण्यापेक्षा मी इजिप्तमध्ये राहिलो असतो तर फार बरं झालं असतं.'असे उद्रार त्याने सेंट हेलेना पाहून काढले अशी नोंद आहे. १७ ऑक्टोबरला नेपोलियनला सेंट हेलेनावर उतरवण्याचं ठरलं.लोकांच्या गराड्या

पासून सुटका व्हावी यासाठी रात्री बंदरावर उतरावं, असं त्यानेच अ‍ॅडमिरलला सुचवलं होतं.त्याच्या सूचनेमुळे एका छोट्या बोटीने नेपोलियनला जेम्सटाऊनच्या बंदरावर नेण्यात आलं.रात्र असली तरीही या प्रख्यात योद्ध्याला पाहण्यासाठी सेंट हेलेनातले नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

तोफ झाडून नेपोलियनच्या आगमनाची वार्ता जाहीर करण्यात आली.त्या रात्री नेपोलियनचा मुक्काम जेम्सटाऊनमध्येच होता.दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे नेपोलियन तयार झाला.ब्रिटिश अ‍ॅडमिरल त्याच्यासाठी एक काळा घोडा घेऊन आले होते. ते,नेपोलियन,एक फ्रेंच जनरल आणि दोन फ्रेंच हुजरे असे तिथून नेपोलियनच्या नियोजित निवासस्थानी जायला निघाले.


यानंतर नेपोलियन पुन्हा जेम्सटाऊनमध्ये परतलाच नाही.नेपोलियनने या बेटावर पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा इथली शांतता आणि अतीव एकटेपणाची भावना निर्माण करणारं वातावरण यांनी त्याला हादरवलं होतं.या बेटाबद्दल त्याच्या मनात प्रथम

दर्शनीच जी द्वेषभावना पैदा झाली ती अखेरपर्यंत टिकून होती.


नेपोलियनच्या मुक्कामासाठीची जागा तयार होत असल्याने तोपर्यंत त्याने तिथून जवळच राहणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या बेलकॉम्ब नावाच्या एका अधिकाऱ्याच्या आऊटहाऊसमध्ये काही महिने मुक्काम ठोकला.या घरातल्या मुलांसोबत तो खेळत असे.

विशेषतः त्यांच्या बेट्सी नावाच्या किशोरवयीन मुलीसोबत त्याची दोस्ती झाली होती.पुढे या बेट्सीने आपल्या चरित्रात या खास पाहुण्यासोबतच्या दिवसांचं वर्णन केलं आहे.


नेपोलियनच्या हेलेना येथील सहा वर्षांच्या मुक्कामात बेटावरील व्यक्तींचे त्याच्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध आले. त्यातल्या अनेकांनी या भेटींची वर्णनं नोंदवून ठेवली आहेत.ज्युलियाने हे पुस्तक लिहिण्यासाठी या सर्व नोंदी अभ्यासल्या, त्यातील रोचक माहिती आपल्यासमोर मांडली आहे.त्यातून अज्ञातवासातल्या या योद्ध्याचं दर्शन तर होतंच,पण त्याच्याभोवती असणारी असामान्यत्वाची प्रभा बाजूला ठेवून एक माणूस म्हणून नेपोलियनला समजून घेण्याची संधीही आपल्याला मिळते. 


अर्थात,दोनशे वर्षांपूर्वीच्या या नोंदींमध्ये कधी विरोधाभास,तर कधी अपुरेपण आहे,हेही आपल्याला सांगायला ज्युलिया विसरत नाही.


बेलकॉम्ब यांच्या घरून लाँगवुड या आपल्या मुक्कामी पोहोचल्यावर मात्र नेपोलियन काहीसा एकटा पडला.

शय्यागाराच्या खिडकीतून बेटावरची शिखरं पाहत बसणं हा त्याचा आवडता उद्योग होता.


सहा वर्षांनंतर पाच मे १८२१ या दिवशी नेपोलियनचं निधन झालं.नेपोलियन जिवंत असताना काय करायचं याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना होत्या;पण तो मेल्यानंतर त्याच्या मृतदेहाचं काय करावं याबद्दल कसल्याही शासकीय सूचना नव्हत्या.त्यामुळे गोंधळाचीच परिस्थिती होती.नेपोलियन मेल्याचं राज्यपालांना कळवून त्याच्या शवविच्छेदनाची परवानगीही विचारण्यात आली.मृत्यूबद्दल कुठल्याही शंका उद्भवू नयेत यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर करण्याचं ठरलं.या प्रक्रियेची माहिती अद्भुत म्हणावी अशीच आहे.


एका शासकीय चित्रकाराने नेपोलियनचं अधिकृत असं अखेरचं पोर्ट्रेट चितारायला सुरुवात केली.त्याच्या मृतदेहाला अंघोळ घालण्यात आली.त्याची दाढी केली गेली. शवविच्छेदनाच्या वेळी आठ डॉक्टर उपस्थित होते.प्रत्यक्ष शवविच्छेदन डॉक्टर अँटोमार्ची यांनी केलं.त्यांना रटलेजनी मदत केली.व्हिन्याली या फ्रेंच डॉक्टरने फ्रेंच शासनासाठी,तर डॉ.हेन्री यांनी ब्रिटिश प्रशासनासाठी टिपणं घेतली.


नेपोलियन जिवंत असताना तो अँटोमार्चीना अनेक प्रश्न विचारत असे.आतड्यात काय घडतं,नखं आणि केसांची योजना कशासाठी आहे अशा अनेक गोष्टींबद्दल त्याला उत्सुकता होती. अँटोमाचींनी नेपोलियनच्या डोक्याची मोजमापं घेतली.त्या काळात 'कॅनिऑलॉजी' म्हणजे कवटीवरून मनुष्यस्वभाव सांगणारं शास्त्र जोरात होतं.आक्रमकता,महत्त्वाकांक्षा, चतुराई,दयाळूपणा हे कवटीच्या मोजमापांवरून सांगणं शक्य आहे,असा तेव्हा समज होता.त्यासाठी अँटोमाचींना नेपोलियनचा मेंदूही तपासून बघायचा होता;पण त्याला प्रतिबंध करण्यात आला.मात्र,इंग्रज डॉक्टरांचं लक्ष नाही हे पाहून त्यांनी नेपोलियनच्या बरगड्यांचे दोन तुकडे काढले.एक व्हिन्यालींना तर दुसरा नेपोलियनच्या कुर्सो नावाच्या बटलरला दिला.नेपोलियनच्या जठराच्या अस्तरासकट एक अल्सरग्रस्त तुकडा त्यांनी डॉ. ओ-मीअरा या इंग्रज शल्यशास्त्रज्ञाला दिला.तो 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स'च्या संग्रही होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मन बॉम्बफेकीत तो नष्ट झाला.


 नेपोलियनचं शव शिवल्यावर त्याला परत गणवेश चढवण्यात आला.त्याची सर्व पदकं त्या गणवेशाच्या कोटावर लावली गेली आणि तो मृतदेह आता दर्शनासाठी खुला केला गेला.एकात एक व्यवस्थित बसणाऱ्या चार शवपेट्यांच्या आत ठेवून नेपोलियनचं बेटावरच दफन झालं दर्शनायाच्या आत ठेवून नेपोलियनचं बेटावरच दफन झालं.पुढे १८४० मध्ये त्याचा मृतदेह इथून फ्रान्समध्ये नेण्यात आला आणि पॅरिसमध्ये त्याचं पुन्हा सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं.नेपोलियनच्या मृत्यूनंतर बेटावर प्रचंड धावपळ झाली.बेटाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच ढवळून निघाली.


नेपोलियनच्या घरावरचे पहारेकरी काढून घेतले गेले;

बेटाच्या आणि नेपोलियनच्या रक्षणासाठी ठेवलेली फौज इंग्लंडला परत जायची तयारी करू लागली;

बेटाची लोकसंख्या आता काही हजारांनी कमी होणार हे स्पष्ट होताच वस्तूंचे भाव कोलमडले;अशा अनेक नोंदी ज्युलियाने या पुस्तकात केल्या आहेत.एवढंच नव्हे,तर नेपोलियनच्या सुरक्षेसाठी तैनात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या बेटावरील पर्यावरणाच्या नोंदीही केल्या,त्याबद्दलही ज्युलियाने लिहिलं आहे.अशा प्रकारची किती तरी रोचक माहिती या पुस्तकातून समोर येते.


इतरांसोबत होणाऱ्या संवादामधून नेपोलियनला या बेटाच्या इतिहासाबद्दल आणि फर्नांडो लोपेझबद्दलही नक्कीच कळलं असेल.दोन शतकांपूर्वी लोपेझ या निर्जन बेटावर अक्षरशः एकटा राहिला होता.या बेटावर अडकलेला नेपोलियनही माणसांनी वेढलेला असूनही एकटाच होता.अशा या एकान्तवासी बेटाचा सोळाव्या शतकापासूनचा इतिहास आपल्यासमोर उलगडणाऱ्या ज्युलियाचं आणि तिच्या पुस्तकाचं कौतुक करावं तितकं कमी, असं वाटत राहतं.


२०.११.२३ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..


२०/११/२३

अज्ञातवासी बेटाच्या शोधात In search of the uncharted island

नेपोलियन बोनापार्टच्या अखेरच्या बंदिवासाच्या दिवसांत काय घडलं हे जाणून घेण्यासाठी एक ब्रिटीश महिला ज्युलिया ब्लॅकबर्न अटलांटिक महासागरातल्या एका छोट्याशा बेटावर जाऊन थडकते.आणि उलगडतो या बेटाचा आजवर अज्ञात असलेला इतिहास.


 ज्युलिया ब्लॅकबर्न ही इंग्लंडमधली मध्यमवयीन लेखिका एकदा फ्रान्समध्ये सहलीसाठी गेली आणि तिथे नेपोलियनच्या प्रेमात पडली. नेपोलियनबद्दल जेवढं शक्य तेवढं वाचून काढल्यावर तिच्या लक्षात आलं,की युरोपच्या इतिहासावर आपला कायमचा ठसा उमटवणाऱ्या या असामान्य योद्ध्याच्या अखेरच्या दिवसांबद्दल कोणत्याच चरित्रात पुरेशी नोंद नाही.

ब्रिटिशांनी वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव केल्यानंतर त्याला युद्धकैदी म्हणून सेंट हेलेना या अटलांटिक महासागरातील जगापासून तुटलेल्या बेटावर ठेवण्यात आलं.नजरकैदेत सहा वर्षं काढल्या

नंतर तिथेच नेपोलियनचा मृत्यू झाला. या बेटावर तो कुठे राहिला,त्याने इतकी वर्षं काय केलं,बेटावरच्या रहिवाशांशी त्याचे कसे संबंध होते याबद्दल फारच त्रोटक माहिती उपलब्ध असल्याचं ज्युलियाच्या लक्षात आलं.तिच्या मनाने घेतलं,की आपण या बेटावर जाऊन राहायचं आणि नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांबद्दल समजून घ्यायचं.एकदा ठरल्यावर ज्युलियाने लंडन,पॅरिस आणि लिस्बन इथल्या ग्रंथालयांमध्ये या बेटाबद्दल जेवढी माहिती मिळेल तेवढी गोळा केली.


'सोसायटी ऑफ ऑथर्स' या संस्थेने आणि ऑथर्स फाउंडेशन यांनी ज्युलियाच्या प्रवासासाठी,संदर्भ शोधण्यासाठी आणि वाटखर्चासाठी अनुदान दिलं.

ट्रेव्हर हर्ल हे सेंट हेलेनाचे अभ्यासक तिच्या मदतीस धावले. सेंट हेलेनाची माहिती आणि तिथल्या स्थानिकांचे संदर्भ हाताशी घेऊन ज्युलिया या बेटाच्या प्रवासावर जाण्यासाठी सज्ज झाली.


ही गोष्ट १९८९-९० च्या दरम्यानची.त्या वेळी सेंट हेलेना या बेटावर दोन महिन्यांतून एकदाच जहाज जात असे.त्यामुळे ते एकदा गेलं की पुढचं जहाज येईपर्यंत दोन महिने या बेटावर मुक्काम करण्यावाचून पर्यायच नसे.या बेटावर राहण्याच्या सोई आहेत की नाही,तिथे आपल्याला हवी ती माहिती मिळेल की नाही याचा काथ्याकूट करत बसण्यापेक्षा ज्यूलियाने बेटावर जाऊन थडकण्याचं ठरवलं. तिच्यासोबत तिची दोन मुलं होती.आईला बेटावर सोडून त्याच जहाजाने ती परत येणार होती.आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अटलांटिक सागरकिनारी अंगोला नावाचा एक देश आहे.


तिथून विषुववृत्तावरून प्रवास करायला सुरुवात केली की सुमारे १,९२० किलोमीटरवर सेंट हेलेना बेट आहे.दहा कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकी भूखंड दक्षिण आफ्रिकेहून वेगळा होऊन सध्याच्या जागेकडे प्रवास करत असताना ते अस्तित्वात आलं.अमेरिका खंडातून यायचं झालं तर दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझिलच्या पूर्व किनाऱ्यावरून बेटावर येण्यासाठी आफ्रिकेच्या दिशेने २,५६० किलोमीटर प्रवास करावा लागतो.वाटेत दुसरं कुठलंही बेट लागत नाही.सोळा बाय आठ किलोमीटरचा परीघ असणारं हे छोटं बेट ब्रिटिशांच्या ताब्यात असून तिथली लोकसंख्या आजही पाच हजारांच्या वर नाही.


इंग्लंडहून सेंट हेलेनाला जायला सोळा दिवस लागतात.वाटेत आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्या

जवळच्या कॅनरी बेटांवर एक थांबा आहे.मग आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका दरम्यानचा प्रवास सुरू होतो.

वाटेत असेन्शन बेटाशी थांबून जहाज सेंट हेलेनाच्या दिशेने पुढे निघतं.असेन्शन बेटावरचे रहिवासी परक्यांना घाबरतात.या बेटाच्या एका टोकाला ब्रिटिश हवाई दलाचा तळ आहे.


फॉकलंडला जाणारी विमानं इथे इंधन घेऊन पुढे जातात.या बेटावर ज्वालामुखीजन्य खडकात कोरून अठराव्या शतकात मेलेल्या खलाशांच्या कबरी तयार केल्या आहेत.या बेटापासून तीन दिवसांच्या सागरी प्रवासानंतर सेंट हेलेनाचे कडे दिसू लागतात.सेंट हेलेनाच्या पूर्व बाजूला उंच उंच पहाडांची तटबंदी आहे.त्यातल्या एका दरीत जेम्सटाऊन हे बंदर वसलं आहे.सेंट हेलेनाला ज्वालामुखीय खडकांची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे.वारा आणि पाऊस यांच्या प्रभावामुळे या तटबंदीत काही खोरी निर्माण झाली आहेत.यामुळे जी शिखरं निर्माण झाली आहेत त्यांना स्थानिकांनी बायबलमधली नावं दिली आहेत,


तर काहींना त्यांच्या आकारांवरून नावं देण्यात आली आहेत. गाढवाचे कान,तुर्की टोपी,चिमणी,इत्यादी. थोडा कल्पनेला ताण दिला,तर एक शिखर, त्रिकोणी टोपी घातलेल्या नेपोलियनच्या डोक्यासारखं दिसतं,

असं स्थानिक म्हणतात.आपण त्याला 'हो' म्हणायचं असतं, असं ज्युलिया मजेने लिहिते.


सेंट हेलेना बेटावर सर्वसामान्य माणसांसोबत राहायचं असं ज्युलियाने ठरवलं होतं.तिथे गेल्यावर कळलं की त्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता.ज्युलियाने बेटावर मुक्काम ठोकला.नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांचा शोध घेता घेता या बेटाचा अद्भुत इतिहास तिच्यासमोर उलगडत गेला.त्यामुळेच सेंट हेलेनावरून परत आल्यावर ज्युलियाने जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव 'एम्परर्स 'लास्ट आयलंड' असं असलं, तरी प्रत्यक्षात ते नेपोलियनबरोबरच सेंट हेलेनाची आणि हे बेट माणसाळवणाऱ्या फर्नांडो लोपेझचीही गोष्ट सांगतं.बेटावर स्थिरस्थावर झाल्यावर आणि ओळखीपाळखी करून घेतल्यावर स्थानिक मंडळींना ज्युलियाचा पहिला प्रश्न अर्थातच नेपोलियनबद्दल होता.


नेपोलियनचा सहा वर्षांचा मुक्काम ही बेटवासीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असणार अशी ज्युलियाची समजूत होती. पण आश्चर्य म्हणजे या बेटावरच्या कित्येकांना नेपोलियनबद्दल माहितीही नव्हती.त्यांच्या दृष्टीने बेटाच्या इतिहासातली सर्वांत महत्त्वाची व्यक्ती होती फर्नांडो लोपेझ.या लोपेझने ज्युलियाला हेलेनाच्या इतिहासात डोकवायला भाग पाडलं. हे बेट युरोपी दर्यावर्दीच्या नजरेस पहिल्यांदा पडलं ते १५०२ मध्ये.पोर्तुगीज दर्यावर्दी अ‍ॅडमिरल डी नोव्हा याला या बेटाचा शोध लागला.तो आपल्या जहाजासह भारतातून पोर्तुगालला चालला होता.हटके भटके - निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन.


या बेटाला प्रदक्षिणा घातल्यावर अखेरीस त्याला जहाज लावता येईल अशी एकमेव जागा सापडली.

आज तेच जेम्सटाऊन हे ठिकाण हेलेनावरचं एकमेव बंदर आणि या बेटाची राजधानी आहे.जहाज किनाऱ्याला लावून डी नोव्हा आणि त्याचे खलाशी या बेटावर उतरले. बेटावर मानवी वस्ती नव्हती,एवढंच नव्हे तर प्राणीही नव्हते.भरपूर झाडं, फळं,मासे असं मुबलक अन्न मिळाल्याने डी नोव्हा कंपनीने या बेटावर काही दिवस मजेत घालवले.तिथून जाताना त्या वेळच्या प्रथेप्रमाणे डी नोव्हाने जहाजावरच्या बकऱ्यांच्या काही जोड्या बेटावर सोडल्या.संकटकाळी या बेटावर कुणी उतरलं तर त्यांची सोय व्हावी,हा हेतू त्यामागे होता.डी नोव्हामुळे या बेटाच्या अस्तित्वाचा शोध जगाला लागला.बेटाच्या किनाऱ्यावर नांगर टाकलात्या दिवशी सम्राट कॉन्स्टंटाइनच्या आईचा,

हेलेनाचा वाढदिवस होता.त्यावरून या बेटाचं नाव सेंट हेलेना पडलं. बेटाबद्दल माहिती झाल्यावर जहाजं या बेटावर थांबू लागली.पुढे त्यानंतर तेरा वर्षांनी,म्हणजे १५१५ मध्ये आणखी एक जहाज या बेटावर थांबलं.

त्यातले उतारू पाय मोकळे करण्यासाठी बेटावर उतरले.त्यातच एक होता फर्नांडो लोपेझ. लोपेझ हा एक पोर्तुगीज सरदार होता.जनरल अल्बुकर्क बरोबर तो भारतात आला होता. लोपेझच्या नेतृत्वाखाली काही सैन्य भारतात ठेवून अल्बुकर्क आणखी कुमक आणायला पोर्तुगालला परत गेला.तो दोन वर्षांनी परतला,तेव्हा लोपेझने इस्लामचा स्वीकार करून स्थानिक राजाची नोकरी स्वीकारल्याचं त्याला आढळून आलं.त्यामुळे लोपेझला राजद्रोह आणि धर्मद्रोह या दोन अपराधांसाठी शिक्षा झाली. त्याचा उजवा हात,डावा अंगठा,कान आणि नाक तोडण्यात आले.डोक्यावरचे केस,भुवया आणि दाढी-मिश्याही चिमट्याने उपटून काढल्या गेल्या.या घटनेनंतर तीन वर्षांनी अल्बुकर्कचं निधन झालं,तेव्हा लोपेझने पोर्तुगालला परतायचा निर्णय घेतला.हे जहाज पाणी घेण्यासाठी सेंट हेलेना बेटाजवळ थांबलं,तेव्हा पोर्तुगालला परतण्याबद्दल लोपेझच्या मनात द्विधा निर्माण झाली.अशा अवस्थेत आपला कोण स्वीकार करेल,असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे तो सेंट हेलेनावर उतरला आणि जंगलात जाऊन लपला.जहाज निघताना ही गोष्ट खलाशांच्या लक्षात आली.त्यांनी लोपेझला शोधण्याचा प्रयत्न केला,पण तो सापडला नाही. त्याच्यासाठी एक डबा बिस्किटं आणि खारवलेल्या मांसाच्या काही पट्ट्या किनाऱ्यावर ठेवून जहाज पोर्तुगालकडे निघालं.इकडे लोपेझने एक खड्डा खणून त्याच्या बाजूने दगड रचले आणि राहण्याची सोय केली.बेटावर भरपूर कंदमुळं आणि फळं उपलब्ध होती.समुद्रात मासे मिळत होते,पक्ष्यांची अंडी सहज हाती लागत होती.बेटावर कुठलाही हिंस्र प्राणी नव्हता.दुसरी माणसं नसल्यामुळे संसर्गजन्य आजाराचा प्रश्न नव्हता. त्यामुळे लोपेझ तिथे टिकून राहिला,स्थिरावला. सेंट हेलेनावर असा मुक्काम करणारा तो पहिलाच माणूस.एक वर्ष उलटलं.तिथल्या एकमेव नैसर्गिक बंदराला आणखी एक जहाज लागलं.

त्या खलाशांना लोपेझचं राहण्याचं ठिकाण सापडलं.

कपड्यांवरून तिथली व्यक्ती पोर्तुगीज असावी हे त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी तिथे बिस्किटं,चीज आणि आणखी काही टिकाऊ खाद्यपदार्थ ठेवले.त्याबरोबर 'तू जो कोणी आहेस त्याने लपायची गरज नाही. तुला कुणीही त्रास देणार नाही,'अशा अर्थाची चिठ्ठीही त्याच्या निवाऱ्यात ठेवली.हे जहाज तिथून निघत असताना एक कोंबडा त्यावरून खाली पडला आणि लाटांबरोबर किनाऱ्याला आला.लोपेझने त्याला उचलून घेतलं व खाणं भरवलं.हा कोंबडा लोपेझच्या मागे मागे फिरू लागला.हळूहळू लोपेझ थांबलेल्या जहाजांवरील खलाशांना भेटू लागला.बऱ्याच खलाशांनी त्याला भेटवस्तू द्यायला सुरुवात केली.त्याला भेटवस्तू दिली की जहाजावर संकट येत नाही,ही समजूत हळूहळू दृढ होत गेली.या भेटीत भाजीपाला,

केळी,नारळ आदींची रोपं आणि बिया;डाळिंब,संत्री आणि लिंबाची रोपं; बदकं,कोंबड्या आदी पक्षी;मोर

,टर्की,ठिपक्या- ठिपक्यांच्या गिनी कोंबड्या,गायी,

डुकरं,कुत्री, मांजरं,बकऱ्या असे प्राणी यांचा समावेश होता. लोपेझ कष्टाळू होता.एका हाताने काम करता करता त्याने इथे मळे फुलवले.त्याचे प्राणी बेटभर हिंडू लागले.त्याच्या मळ्यातल्या फळांच्या बिया पशुपक्ष्यांनी बेटभर पसरवल्या.लोपेझ त्या बेटाचा राजा आणि एकमेव नागरिक होता.


जवळपास दहा वर्षांनंतर लोपेझची हकीकत पोर्तुगालच्या राजा-राणीच्या कानावर गेली. राणीने एक आज्ञापत्र पाठवून लोपेझला लिस्बनला बोलावून घेतलं.राजाज्ञेमुळे नाइलाजाने लोपेझ लिस्बनला पोहोचला.राजाने 'जे हवं ते माग' असं म्हणताच लोपेझने पोपना भेटायची इच्छा व्यक्त केली.पोपसमोर स्वतःच्या पापांचा झाडा देऊन त्याने क्षमायाचना केली. त्यानंतर लगेचच 'मला परत माझ्या बेटावर सोडा' असं त्याने राजाला सांगितलं.त्यानुसार त्याला पुन्हा सेंट हेलेनावर सोडण्यात आलं.पुढे लोपेझ आणखी वीस वर्षं एकटाच या बेटावर नांदला.जणू सेंट हेलेनाच्या शांततेने त्याच्या विद्रूपतेसह त्याला आपलंसं करून टाकलं होतं. सेंट हेलेना म्हणजे लोपेझ असं समीकरण बनलं. १५४६ मध्ये लोपेझचं सेंट हेलेना बेटावरच निधन झालं.

त्यानंतर पोर्तुगीज जहाजांवरचे जे खलाशी खूप आजारी असतील त्यांना या बेटावर उतरवण्याची प्रथा पडली.या बेटाच्या नैसर्गिक वातावरणात त्यांची तब्येत सुधारली की त्यांना पुन्हा मायदेशी आणलं जात असे.

त्यामुळे बेटावर एक लाकडी प्रार्थनागृह,एक छोटा धक्का आणि काही घरं यांची भर पडली.


यानंतर तब्बल २७० वर्षांनी, म्हणजे १८१५ मध्ये सेंट हेलेनाच्या इतिहासात नेपोलियनचा प्रवेश झाला.

नेपोलियनचं सेंट हेलेनावर आगमन,त्याचा बेटावरचा मुक्काम आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या घडामोडी यांचाही ज्युलियाने एखादी रहस्यकथा उलगडावी तसा आढावा घेतला आहे.याचं कारण नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांच्या शोधात सेंट हेलेनावर पोहोचण्याआधी तिने उपलब्ध जुनी वृत्तपत्रं नेपोलियनच्या मृत्यूनंतर सेंट हेलेना बेटावरून परतलेले फ्रेंच सैनिक,सैन्याधिकारी आणि नोकरचाकर यांच्या दैनंदिनी अशा सर्व संदर्भांचा अभ्यास केला होता.त्यातले कच्चे दुवे लक्षात ठेवूनच ती सेंट हेलेनावर पोहोचली.तिथल्या वास्तव्यात तिने बेटावरची उपलब्ध जुनी कागदपत्र तपासली आधी मिळवलेल्या माहितीशी त्याचा ताळमेळ घातला.


उर्वरीत भाग पुढील २२.११.२३ या लेखामध्ये...


टिप - १८.११.२३ या दिवशी प्रसारित झालेला लेख किंगफिशरची चार भावंडं…Kingfisher's four siblings… सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन) मधील आहे.

१८/११/२३

किंगफिशरची चार भावंडं… Kingfisher's four siblings...

पक्ष्यांचा सहवास अनुभवण्याची संधी आम्हाला आणखी एकदा मिळाली.काही कामानिमित्त मी सकाळी सकाळी आळंदीला गेलो होतो.परत येताना चऱ्होली

 गावाजवळ शाळकरी मुलांचा घोळका दिसला.मुलांना साप वगैरे दिसलाय की काय अशी शंका येऊन मी स्कूटर थांबवली. अचानकच त्यांच्यासमोर उभा ठाकल्यामुळे पोरं बावचळली आणि काही तरी लपवायला लागली. पाहिलं तर त्यात किंगफिशरची,

म्हणजे खंड्या पक्ष्याची चार पिल्लं होती.घरट्यातून काढून पोरं ती विकायला निघाली होती.असं करणं बरोबर नाही हे मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला;पण पोरं बधेनात,तेव्हा मात्र गळ्यातलं आयडेंटिटी कार्ड दाखवून त्यांना झापलं.मग घाबरून त्यांनी ती चारही पिल्लं माझ्या स्वाधीन करून टाकली.कापडा

सहित त्यांना हलकेच शबनम बॅगमध्ये ठेवून गाडीला किक मारली.


चारही पिल्लांना थेट घरी आणलं.घरात चौथं शिरल्या

बरोबरच माझ्या हातातून एक पिल्लू भुर्रकन उडून पंख्यावर बसलं.दुसरं पुस्तकाच्या रॅकवर,तिसरं जिन्याच्या पायरीवर आणि चौथं थेट देव्हाऱ्यात जाऊन बसलं.आमच्या घरी आल्यानंतर त्यांच्या त्या वेळच्या हालचालींच्या आणि वर्तणुकीचा मी माझ्या अंदाजानुसार अर्थ लावला.आमच्या बंगल्यातल्या स्टडी रूममध्ये सर्वप्रथम पंख्याच्या पात्यावरच्या उच्च स्थानावर स्थानापन्न झालेला मला निवृत्तिनाथ वाटला. पुस्तकांच्या रॅकवर ठामपणे जाऊन बसलेला ज्ञानदेव,पायऱ्यांवर विसावलेला सोपानदेव आणि हक्काने देव्हाऱ्यात जाऊन बसलेली या तिघांची बहीण मुक्ताबाई ! आळंदीहून परत येताना भेटली म्हणून या चार पिल्लांना आम्ही या चार संतांची नावं देऊन टाकली.


आमच्या नेहमीच्या ट्रांझिट केजमध्ये या चारही पिल्लांची राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी फिश मार्केट गाठलं.

किंगफिशर हा पक्षी मत्स्याहारी. त्यामुळेच तो पाणथळींच्या आसपास आढळतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मासे आणणं भाग होत. पण त्या दिवशी आकुर्डी,

चिंचवड,पिंपरी यापैकी कुठल्याच मासेबाजारात छोट्या आकाराचे मासे मिळाले नाहीत.शेवटी अर्धा किलो मोठे मासे घेऊन घरी परतलो.मग जर्सीच्या मुक्कामात पक्ष्यांना भरवण्यासाठी आत्मसात केलेल्या तंत्राचा वापर करायचं ठरवलं.त्याचा इथे खूपच छान उपयोग झाला.किंगफिशर पक्षी त्यांच्या पिल्लांच्या पालन

पोषणाची जबाबदारी अत्यंत काळजीने घेत असतात.पिल्लांना भरवण्यासाठी छोटे मासे मिळाले नाहीत,तर ते मोठे मासे चोचीत धरून जमिनीवर किंवा एखाद्या झाडाच्या फांदीवर आपटून छोटे तुकडे करतात आणि मोठ्या मायेने पिल्लांना भरवतात.मीसुद्धा त्या मोठ्या माशांचे आडवे तिडवे तुकडे करून घेतले.आता हे तुकडे छोट्या माशांसारखेच दिसत होते.चौघाही भावंडांनी एकापाठोपाठ चोची उघडून ते तुकडे अध्याश्यासारखे गिळून टाकले.पोटं भरल्यावर पिल्लं शांतपणे झोपी गेली.त्यांच्या पिंजऱ्याभोवती चादर टाकली आणि खोलीतला दिवा बंद करून आम्हीही झोपायला गेलो.


दुसऱ्या दिवशी पहाटे साखरझोपेत असतानाच या चौघांच्या चिवचिवटाने आम्हाला जाग आली.आदल्या दिवशीचं जेवण पचून पोरं पुन्हा भुकावली असावीत.

ब्रेकफास्टसाठी त्यांनी माशांच्या उरलेल्या तुकड्यांवर ताव मारला.बाहेर मस्त ऊन पडलं होतं.त्यांचा पिंजरा उचलून पोर्चमध्ये ठेवला.बागेतल्या पाइपने त्यांना अंघोळ घातली आणि पिंजराही धुऊन घेतला. कंपाऊंडचं गेट लावून घेतलं आणि आमच्या लाडक्या कुत्र्यावर,पिंटूवर या चौघांच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली.तोही इमानदारीने कावळे आणि मांजरांना पिल्लांपासून दूर हाकलू लागला.आसपासचे दयाळ,

बुलबुल,साळुंक्या आणि पोपटही किलबिलाट करत या नव्या पाहुण्यांना भेटून गेले.पिल्लं टकमक नजरेने हे सगळं पाहत होती.थोड्या वेळाने त्यांना घरात घेतलं आणि मी पुन्हा एकदा मासेखरेदी करून आलो.दुपारी प्रतिभा शाळेतून घरी आली तेव्हा तिला पाहून

पिल्लांनी चिवचिवाट सुरू केला होता.मासे चिरून ठेवले आणि दारं-खिडक्या बंद करून आम्ही पिल्लांना मोकळं सोडलं.भुर्रकन उडून पिल्लांनी वेगवेगळ्या जागा पटकावल्या. प्रतिभाने प्रत्येकापाशी जाऊन माशांचे तुकडे त्यांना भरवायला सुरुवात केली.आश्चर्य म्हणजे ही पिल्लं आम्हाला घाबरत नव्हती की बुजतही नव्हती.एक पिल्लू प्रतिभाच्या खांद्यावर बसलं, तर एक हातावर तिसरं हवेत झेपावून तिच्या हातातल्या डिशवरच लँड झाला आणि मासे मटकावू लागलं,तर चौथ्याने कमालच केली.तो उडत उडत येऊन डिशवर न बसता फक्त एक तुकडा घेऊन उडाला.अगदी पाण्यातून मासा पकडून उडून जाव तसाच.


जेवण झाल्यावर त्यांची रवानगी पुन्हा एकदा पिंजऱ्यात केली आणि आम्ही आमच्या कामाला लागलो.

संध्याकाळी मात्र मला आंबळी,म्हणजे छोटे मासे मिळाले.मग काय,पोरं खूष! पुढचा आठवडाभर असाच दिनक्रम होता.दिवसभरात चार ते पाच वेळा खाणं,

पिंजरे स्वच्छ करणं, त्यांना अंघोळी घालणं,ऊन दाखवणं,थोडा वेळ घरात मोकळं सोडणं आणि रात्री पिंजऱ्यावर चादर टाकून त्यांना गुडूप झोपवणं.आता ही चारही भावंड आम्हा तिघांना चांगलीच ओळखू लागली होती.जेवणाच्या वेळी न बुजता आमच्या अंगाखांद्यावर खेळायची.चौघंही आता चांगलीच धष्टपुष्ट झाली होती.

आता त्यांना पुन्हा निसर्गात सोडलेलं चालणार होतं,पण त्यापूर्वी घराबाहेरच्या थोड्या मोठ्या आकाराच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं.इथे त्यांना चोवीस तास आजूबाजूच्या जगाचा अनुभव मिळणार होता. खरोखरच त्या चौघांना हा पिंजरा मनापासून आवडला.

मोकळं आकाश,पक्ष्यांचे आवाज,वेट मोटमधल्या पाणीसाठ्यात सूर मारून मासे पकडणारे इतर किंगफिशर पक्षी आता त्यांना दिवसभर दिसत होते.

त्यांच्यासारखंच आपणही पाण्यात सूर मारून मासे खावेत अशी इच्छा एव्हाना त्यांच्यात जागी झाली असेल असं आम्हाला वाटू लागलं.


त्या दिवशी नारळी पौर्णिमा होती.मुसळधार पाऊस पडत होता.जेवायला घरी येताना मी सहज या पोरांच्या पिंजऱ्याजवळ थांबलो,तर आत तीनच पिल्लं ! एवढ्या पावसात चौथं पिल्लू गेलं कुठे?आजूबाजूला पाहिलं,तर त्या भावंडांमधलं सगळ्यात छोटं पिल्लू,म्हणजे मुक्ती मंकी हिलच्या दिशेने दहा-बारा फूट अंतरावर जाऊन आपल्या भावंडांना च्यूक-च्यूक करून बोलवत होती.

मला वाटलं,मुक्ती आपणहूनच बाहेर पडली असावी.पण तिचं वागणा पाहता लक्षात आलं,की आकाराने लहान असल्यामुळे ती पिंजऱ्याबाहेर येऊ शकली होती.

थोरल्या भावंडांना ते शक्य नव्हतं.पण का कुणास ठाऊक,भावंडांना सोडून जाण्याची तिची तयारी दिसत नव्हती.च्यूक च्यूक करत ती माघारी फिरली आणि माझ्यासमोर येऊन थांबली. 


मी उजवा हात तिच्यासमोर धरला. आज्ञाधारकपणे ती हातावर आली.पिंजऱ्याचं दार उघडून मी हात आत घातला.क्षणात माझ्या हातावरून उडून ती आपल्या भावंडांच्यामध्ये जाऊन बसली. 


गंमत म्हणजे मुक्त होण्याची संधी मिळूनही भावंडांसाठी मुक्ता पिंजऱ्यात परतली ते कुठल्या दिवशी,तर रक्षाबंधनाच्या !


दोन दिवसांनी पाऊस थांबला होता.चांगलं ऊन पडलं.या चार संत भावंडांना निरोप देण्याची वेळ आली होती.त्यांनाही बहुधा ते कळलं असावं.चौघांनी पोटभर नाश्ता केला.हलकेच एकेकाला ट्रान्झिट केजमध्ये घेतलं.हा पिंजरा गाडीत टाकून भोसरी तळ्यावर गेलो.पिंजरा गाडीबाहेर काढला.पिंजऱ्याचं दार उघडलं.काही क्षणांत निवृत्ती,ज्ञानदेव आणि सोपान पिंजऱ्याबाहेर पडून जवळच्याच झाडावर जाऊन बसले.तिथून ते मुक्ताला हाक मारत होते.त्या हाकांमुळे छोटी मुक्ताईही आत्मविश्वासाने पिंजऱ्याबाहेर झेपावली.चारही भावंडांनी उत्तरेला आळंदीच्या दिशेने झेप घेतली.